तो अजुन वाट बघतोय - eka bhutachi gosht |
पुणे जिल्ह्यामध्ये वाल्हे नावाचे रेल्वेस्टेशन लागते ते गाव म्हणजे माझ्या वहीनीचे माहेर. वाल्ह्या कोळी ने त्याच गावी डोंगरावर बसून तपस्या केली म्हणून त्या गावाला वाल्हे असे नाव पडले अशी अख्यायिका आहे. तिथेच वाल्ह्याचा वाल्मिकी झाला. असे हे ऐतिहासिक वारसा असलेले गाव. माझ्या वाहिनी लहान होत्या तेव्हाची हि गोष्ट. त्यांच्या गावाबाहेर एक जुनी परंतु नेहमी पाण्याने भरलेली एक पडकी विहीर होती. त्या विहिरीमध्ये म्हणे एक खविस नावाचं पिशाच्च वास्तव्याला होतं. त्यामुळे अमावस्या - पौर्णिमेला सहसा तिकडे कुणी फिरकत नसे. कारण गावातील अनेकांना त्या गोष्टीचा प्रत्यय आला होता. तसे गावामध्ये ज्यांचा भुतावर विश्वास नाही असेदेखील लोक होते. अशा लोकांनी मिळून एक पैज लावली. जी व्यक्ती पौर्णिमेच्या रात्री १२ वाजता त्या विहिरीवर जाऊन पाण्याने घागर भरून आणील त्याला ५०० रु . रोख गावाकडून इनाम दिले जाईल. परंतु त्या खविसाच्या भीतीने कुणीही ती पैज जिंकायला तयार होईना.
त्याच गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होते. नवरा दारुडा होता. बाई कुणाच्याही शेतावर राबून आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं पोट भरत होती. खायला पोटभर अन्न नाही कि अंग झाकायला वीतभर कापड नाही अशी तिची दुरावस्था होती. त्यात घरात तीन मुलं . छोटं मूल अगदीच लहान होतं . म्हणून ती कामावर जाताना त्याला सोबत घेऊन जाई . दारिद्र्याला आणि दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला ती अक्षरशः कंटाळली होती बिच्चारी . तिने विचार केला आपण विहिरीवर जायचं . जगले वाचले तर आपल्या मुला - बाळांच्या तोंडात दोन सुखाचे घास तरी पडतील. आणि मेले तर सुटका तरी होईल एकदाची . मन घट्ट करून ती उठली आणि ग्रामपंचायतीच्या दिशेने चालू लागली . मनात विचारांचं काहूर उठलं. पण आपल्या चिल्या - पिल्यांसाठी तिने हि जोखीम उचलायची ठरवली होती. ग्रामपंचायतीत पोहचून ती पैज स्वीकारायला तयार आहे असं सांगितलं. येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस ठरविण्यात आला. सगळ्या गावात दवंडी पिटण्यात आली . म्हाताऱ्या बायकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. पण तिने आता पक्का निर्धार केला होता.
आणि शेवटी तो दिवस आला. पौर्णिमा असल्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे टपोर चांदणं पडलं होतं. सगळं कसं लक्ख दिसत होतं . थंडीचा वारा मात्र अंगाला चांगलाच झोम्बत होता. वाऱ्याच्या झुळकी बरोबर अंगावर शहरा येत होता. अंगावर फाटकी आणि मळकी साडी नेसलेली. ठीक ठिकाणी ठिगळे लावून शिवलेली. फाटक्या चोळीने कसंतरी अंग झाकलेलं. नवरा दारू पिऊन पडलेला. त्याला काही तिची पर्वा नव्हती. डबडबल्या डोळ्यांनी तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांना जवळ घेऊन त्यांचे पापे घेतले. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. लहान बाळाला उराशी धरून पोटभर दूध पाजून त्याला झोपवलं . पुन्हा एकदा मुलांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. मन घट्ट करून ताडकन उठली. कोपऱ्यातलं एक फाटकं चिरगुट उचललं आणि त्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली. रिकामी घागर उचलली आणि निघाली तडक त्या गावाबाहेरच्या विहिरीवर. तिने केलेलं हे धाडस पाहण्यासाठी सारा गाव जागा होता त्या रात्री. घरापासून विहिरीपर्यंतचं अंतर बरंच दूर होतं . झपाझप पावलं टाकत ती वेगानं निघाली. मनात अनेक वाईट विचार येत होते. अनवाणी पायांनी ती वेगाने निघाली. थोड्याच वेळात विहिरीपासून शंभर पावलांच्या अंतरावर पोहचली.
गावाबाहेरील माळावर कुणी चिट - पाखरूही दिसत नव्हतं . थंडगार वारा अंगाला झोम्बत होता. वाऱ्याची सळसळ आणि रातकिड्यांची किकीर कानावर पडत होती. दुरून कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता. पौर्णिमेच्या चांदण्या प्रकाशात सगळं कसं लक्ख दिसत होतं.दबक्या पावलांनी ती विहिरीवर पोहचली. विहिरीवर कुणीच नव्हतं , सगळीकडे निरव शांतता. तिच्या काळजाची धडधड वाढली. तिने विहिरीत खाली डोकावून पाहिले. एक दीर्घ श्वास घेऊन जड पावलांनी ती विहिरींची एक एक पायरी उतरू लागली. एका एका पायरीबरोबर तिच्या काळजाचे ठोके वाढत होते. ती पाण्याजवळ पोहचली. घागर पाण्यात बुडवली. आणि डोक्यावर ठेऊन ती वर चढायला मागे फिरली. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. डोक्याला भलं मोठं पागोठं , अंगावर सदरा आणि धोतर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी धरून विहिरीच्या वरच्या पायरीवर तो बसला होता. आडदांड शरीरयष्टी. भरभक्कम जबडा , पिळदार आणि झुपकेदार मिशा. त्याला पाहून तिला असल्या थंडीतही दरदरून घाम फुटला. श्वासांचा वेग वाढला. मन घट्ट करून ती एक एक [पायरी वर चढू लागली. तसा तो खविस म्हणाला कोण तू ? या वक्ताला इथं कशी आलीस ? तिने सांगितले. शेजारच्या गावी कांदाभरणीला गेले होते. यायला उशीर लागला. घरात पाण्याचा थेंब देखील नाही म्हणून आले होते पाणी भरायला तिनं सांगितले. तसा थोडं वेळ थांबून तो तिच्याकडं बघून म्हणाला . आता आलीस तर माझं पाय धुव . त्याशिवाय मी तुला असा जाऊ देणार नाही. तिने क्षणभर विचार केला आणि त्याच्या पायावर ती भरलेली घागर ओतली. आणि पुन्हा घागर भरायला खाली उतरली. घागर भरून ती पुन्हा वर आली तसा तो म्हणाला. नुसतं पाय धुतलंस व्हयं आन पुसायचं कुणी ? तशी ती बिथरली. तिने कुठे तरी ऐकले होते. कि पिशाच्याचे पाय धुवून पुसले कि आपण त्याचे गुलाम होतो. स्वतःला सावरत ती म्हणाली तुझं पाय पुसायला माझ्याकडं काय बी न्हाय ! घरी जाऊन परत पाणी आणायला येते तवा कायतरी घेऊन येते पाय पुसायला तुझं ! थोडा वेळ थांबून तो म्हणाला न्हाय आलीस तर ? ती म्हणाली तर तू माझ्या घरी ये. बरं असं म्हणून त्यानं तिला जाऊ दिलं . वाऱ्याच्या वेगाने झपाझप पावलं टाकत ती गावाच्या दिशेने निघाली. गावकरी तिची वाटच पाहत होते. तिनं घडला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. आणि रात्री कुणीही कडी वाजवली तर दार उघडायचं नाही असं सांगितलं. सगळे गावकरी लगबगीने आपल्या घरी गेले.
इकडे ती अजून कशी आली नाही म्हणून तो खविस चांगलाच चिडला. रागाने तो गावाकडे आला. प्रत्येकाच्या दरवाजाच्या कड्या वाजवू लागला. पण प्रत्येक गावकऱ्यांना सूचित केल्यामुळे कुणीही घराचे दार उघडले नाही. या घटनेला ३५ वर्ष होऊन गेलीत. परंतु असं म्हणतात कि त्या खाविसाचे पाय अजूनही ओले आहेत आणि ते पुसण्यासाठी तो आजही अमावास्या - पौर्णिमेला आपले पाय पुसण्यासाठी प्रत्येक घराचे दार वाजवतो. आजही तो वाट पाहतोय त्याचे पाय कुणीतरी पुसण्याची.
मिलिंद जाधव...