भुताची गोष्ट
.
.
लहान असताना मी अनेकदा माझ्या मामाकडे जायचो. त्यावेळेस तिकडे खुप वेळा भुताच्या गोष्टी (Ghost Stories) ऐकायचो. उलटे पाय असणारे, खोपडीसारखे डोके असणारे असं भूत असतं असा माझा त्यावेळेस समज होता. भूत, जखीण, हडळ, खवीस, वेताळ, आणि असे कितीतरी भूताचे प्रकार असतात असंही पुढे पुढे कळायला लागलं.
खरं खोटं सांगू शकत नाही. कारण, स्वतः पाहत नाही तोपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये म्हणून भूत खरं असं म्हणू शकत नाही. त्याचवेळेस, आजुबाजूला असणारे अनेक जण छातीठोकपणे आम्हाला भूताचा अनुभव कसा आला हे सांगतात त्यामुळे खोटं देखील म्हणता येत नाही. असो, मी आज तुम्हाला काही भूताच्या गोष्टी (Ghost Stories) सांगणार आहे. अर्थात, हा मला व्ह़ॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेला मेसेज आहे आणि मुळचा इंग्रजीत असणारा हा मेसेज कोणी तयार केला ते मला माहित नाही. पण ज्याने तयार केल्या आहेत त्याला माझा सलाम. या गोष्टी अर्थातच इथे मी मराठीत भाषांतर करून टाकतो आहे. आणि शक्यतो त्याच्यातील भिती कायम राहील अशी भाबडी आशा मी बाळगतोय. साधारणतः तीन-चार ओळीत असणाऱ्या गोष्टी (Ghost Stories) तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा.
१. आपल्या पाच वर्षाच्या झोपलेल्या मुलाच्या नकळत त्याने आपल्या बायकोला मारून टाकलं. चार दिवस झाले तरी मुल आईबद्दल विचारेना. शेवटी त्यानेच मुलाला विचारलं,’तुला काही विचारायचंय का’? मुलाने निरागसपणे विचारले, ‘बाबा, आई नेहमी तुमच्या मागे का उभी असते?’
२. रात्रीच्या शांततेमध्ये मी दचकुन उठलो. काचेवर टकटक होत होती. आधी मला वाटलं की, ही टकटक खिडकीची आहे. नंतर मला कळलं, तो आवाज आरशाच्या मागुन येतोय.
३. शेवटचे डोळे उघडून मी पहाण्याचा प्रयत्न केला तेव्हा घड्याळात रात्रीचे 12.07 झाले होते. तिची तीक्ष्ण नखं माझ्या गळ्यात रूतत होती आणि तिचा दुसरा हात माझ्या तोंडावर माझा आवाज दाबत होता. मी दचकुन उठलो. ते स्वप्न होतं तर… सहज घडाळ्यात नजर गेली तर रात्रीचे 12.06 वाजत होते. आणि कपाटाचा दरवाजा करकरत उघडत होता.
४. मी इतक्या काळापासून या घरात एकटा राहतोय. शपथेवर सांगू शकतो की, या घरात मी जितके दरवाजे उघडले आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त दरवाजे मी बंद केले आहेत.
५. वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत खेळत असणाऱ्या त्या छोटीला आपल्या आईची हाक खालच्या मजल्यावरून ऐकायला आली आणि ती पळतच खाली निघाली. पायऱ्या जवळच्या खोलीचा दरवाजा उघडला, तिच्या आईने तिला आत खेचून घेतलं आणि म्हणाली, ‘तुला मारलेली हाक मी पण ऐकली’.
६. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या त्याला त्याच्या बायकोने त्याला उठवलं आणि घरामध्ये कोणीतरी शिरल्याचं त्याला सांगू लागली. तो खडबडून जागा झाला. घरात शिरलेल्या आगंतुकाने त्याच्या बायकोची हत्या केली होती… दोन वर्षापुर्वी …. !
७. मला नेहमी वाटायचं की मी पाळलेल्या मांजराच्या नजरेत नक्की काहीतरी दोष आहे. ती एकटक माझ्या चेहऱ्याकडे बघत रहायची. आणि एक दिवस अचानक मला कळलं की, ती माझ्याकडे नाही.. माझ्या मागे काय आहे तिकडे बघतेय.
८. लहान मुलाच्या निरागस हसणं ऐकण्यासारखं दुसरं सुख नाही. फक्त ती वेळ रात्री एकची नसावी आणि घरात तुम्ही एकटे नसावे.
९. त्याला बिछान्यात अलगद ठेवलं आणि तो हळूच मला म्हणाला, बाबा पलंगाखाली असणाऱ्या राक्षसांना पळवता का? त्याचं मन मोडायला नको म्हणून हसतच मी खाली वाकुन बघितलं. खाली दुसरा तो होता. माझ्या कानात तो हळूच कुजबुजला, ‘बाबा, पलंगावर कोणीतरी राक्षस आहे.’
१०. दिवसभराच्या कामाने थकलेले तुम्ही घरी येता. आज आपण एकटेच आहोत आणि आजची रात्र मस्तपैकी आरामात काढायची या विचारातच तुम्ही घरातले दिवे लावण्यासाठी बटन दाबायला हात पुढे करतात आणि त्याचवेळेस लागणारे दिवे बंद करायला दुसरा हात त्या बटनावर येतो.'
११. आज सकाळी माझ्या फोनमध्ये मी स्वतःचा झोपलेल्या स्थितीतला फोटो पाहिला. मस्त वाटलं आणि अचानक मला आठवलं की, मी तर एकटाच राहतो.