मी सांगतोय तो मंत्र नीट ऐक आणि लिहून घे. हा मंत्र येत्या अमावस्येच्या रात्री बरोबर बारा वाजता म्हणायला सुरुवात कर. आणि एकदा मंत्रजाप सुरु झाला की न थांबता तो शंभरवेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असतांना तुला कदाचित काही अडचणी येऊ शकतील जेणेकरून जपात खंड पडेल, पण लक्षात घे कुठल्याही परिस्थितीत तुला मध्ये थांबता येणार नाही.गावाबाहेरच्या स्मशानात राहणाऱ्या मंगूबाबाने अभयला मंत्र लिहून घ्यायला सांगितलं आणि आवश्यक सुचना दिल्या. आठ ओळींचा तो मंत्र मंगूबाबाने सांगितला तसा अभयने मोबाईलवर झरझर टाईप करून घेतला. तो लिहून घेतांनाच अभयची दमछाक होत होती, प्रत्यक्ष उच्चारताना खरा कस लागणार होता.
अभय एका बँकेत चांगल्या पदावर काम करत होता. त्याची बायको मानसी सरकारी नोकरी करत होती. अभयची एकुलती एक मुलगी नुपूर डॉक्टरकीचा अभ्यास करत होती. अभयचे आई वडील तो दहावीला असतांनाच गेले. पण पुढे त्याचं शिक्षण, लग्न वगैरे सर्व गोष्टी त्याच्या मोठया भावाने म्हणजे चंदु दादाने केल्या. चंदु दादा आणि अभय मध्ये तब्बल बारा वर्षाचं अंतर होतं. दादा फार काही शिकलेला नव्हता. त्यामुळे त्याची नोकरी सुद्धा साधारण दर्जाची होती. असं असलं तरी त्याने अभयचं सगळं व्यवस्थित केलं.
त्यांचं राहतं घर दादाच्या एकट्याच्या नावावर होतं. शिवाय त्यांची वडिलोपार्जित संपत्ती, बँक डिपॉजिट मोठा मुलगा म्हणून दादाच्या ताब्यात होते. ते आपल्या नवऱ्याच्या नावावर व्हावं, किमान आपल्याला हिस्सा तरी मिळायला हवा म्हणून मानसी धुसफूस करत असे. पण दादाकडे असा विषय काढायला अभयला जमत नव्हतं. चंदु दादाने लग्न केलं नाही त्यामुळे त्याच्यानंतर आपसूक ते सर्व आपल्याला मिळणार आहे म्हणूनसुद्धा अभय बिनधास्त होता.
दोन वर्षांपूर्वी दादा बाथरूममध्ये घसरून पडला. कमरेजवळ हाड मोडल्यामुळे त्याला घरातल्या घरात फिरणं सुद्धा अशक्य होऊन बसलं होतं. अलीकडे तो भ्रम झाल्यासारखी बडबड करत असतो. घरच्यांना शिव्या देणं, जुनं एखादं भांडण उकरून काढणं सुरु असतं. मोठा भाऊ त्यात आजारी म्हणून अभय दुर्लक्ष करतो त्याच्याकडे, पण नाही म्हटलं तरी करवादुन जायला होतंच.
त्याचं सगळं करायला म्हणजे त्याला जेवण भरवणं, स्पंजिंग करणं, डायपर बदलणं ह्यासाठी दोन माणसं ठेवलेली अभयने. बारा तासाचे हजार रुपये द्यावे लागतात एकाला. दिवसाकाठी दोन हजाराचा खर्च त्या माणसांसाठी करावा लागतो, पण अभयकडे दुसरा पर्याय नाही.
एखाद्या दिवशी त्या दोन पैकी एक माणूस अचानक सुट्टी घेतो तेव्हा खरा प्रॉब्लेम येतो. अभय किंवा मानसीला ऑफिसला दांडी मारावी लागते, नेमकी त्याच वेळी ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग असते किंवा ऑडिट असतं आणि मग नुसती चिडचिड होते. आजकाल हे वरचेवर होऊ लागलेलं त्यामुळे सुट्टी घेऊन घरी कोण थांबणार ह्यावरून अभय आणि मानसीमध्ये खटके उडू लागले होते. घरी कुणी पाहुणे आले असतील त्यांच्या पुढ्यात सुद्धा दादा शिवीगाळ करत असे. अभय मानसीला अद्वातद्वा बोलत असे. अभय पार वैतागून गेला होता. शिवाय वेळीच सगळ्या गोष्टी आपण आपल्या नावावर करून न घेतल्याचा अभयला पश्चाताप होत होता.
चंदुदादाचा आजार गंभीर स्वरूपाचा नव्हता. पण त्याच्यात कसली रिकव्हरी सुद्धा दिसत नव्हती. नक्की काय करावं कळत नव्हतं. कितीही जवळची व्यक्ती असली तरी एका ठराविक लेव्हलनंतर ती अडचणच बनून राहते. अभय मानसीला दादाची अडचण वाटू लागली होती. बेडरीडन असल्यामुळे त्याला वृद्धाश्रमात सुद्धा कुणी ठेवून घेण्यास तयार नव्हतं. डॉक्टरना तर असं सांगणं शक्य नव्हतं की काही तरी करा पण दादाची सुटका होऊ दे.
सगळे वैध मार्ग संपल्यावर माणूस आडवाटेला वळतो. अभयचं देखील तसंच झालं. कुठल्या औषधाने दादा बरं होणं, पहिल्यासारखं बोलू चालू लागणं तर अशक्य होतं. पण त्याचा लवकरात लवकर निकाल लागला तर सगळ्या इस्टेटीचा मालक अभय होणार होता.
त्याला कुठूनतरी स्मशानात वास्तव्य करणाऱ्या मंगूबाबाबद्दल माहिती मिळाली. मंगूबाबाला काळी विद्या अवगत आहे आणि काही पैशाच्या मोबदल्यात तो तुमचं कुठलंही काम मार्गी लावू शकतो हे समजल्यामुळे त्याला भेटायला अभय आला होता. अपेक्षेपेक्षा अधिक पैसे मोजल्यावर तो अभयला मंत्र देण्यास तयार झाला. हा मंत्र अमावस्येच्या रात्री बारा वाजता म्हणायला सुरुवात करायची, सलग शंभरवेळा म्हणताना कुठलीही अडचण आली तरी थांबायचं नाही. असं झालं तरंच अभयच्या मनासारखं होणार होतं. त्याचा दादा जो अगोदरच बेडवर पडून वेदना सहन करत होता, इतरांना ज्याचा त्रास होत होता, त्याला मुक्ती मिळणार होती.
अमावस्या काहीच दिवसात होती. पण ते तीन चार दिवस अभयसाठी एकेक युगासारखे होते. फायनली ती रात्र आली. ठरवल्याप्रमाणे अभयने रात्री येणाऱ्या केअर टेकरला आज सुट्टी दिली. तो दादाच्या रूममध्ये येऊन बसला. दरवाजाला आतून कडी घातली. बारा वाजायला एक दोन मिनिटच बाकी होती. त्याने एकवार चेक करून पाहिलं दादाचा श्वास सुरु आहे ना असं. दादा कधी नाही तो आज शांत झोपला होता. प्रत्येक श्वासासोबत त्याची छाती वर खाली होत होती.
बरोबर बाराच्या ठोक्याला अभयने मंत्रोच्चार सुरु केले. शब्द अवघड होते त्यामुळे उच्चारताना अभयला त्रास होत होता. तरी तो जबरदस्तीने एकेक आवर्तन करू लागला. साधारण दहा वेळा मंत्र म्हणून झाला असेल आणि अभयला बाजूला काही आवाज जाणवू लागला. त्याने मंत्र म्हणताना वळून पाहिलं, दादा जोराजोरात श्वास घेत होता पण त्याला कदाचित त्रास होत असावा. आपला उपाय वर्क होतोय ह्याने अभय सुखावला. त्याने घाईघाईने मंत्र म्हणायला सुरुवात केली. कधी एकदा शंभर आवर्तन पूर्ण होतील आणि केव्हा एकदा दादा शेवटचा श्वास घेऊन आपल्याला मोकळं करेल असं अभयला झालं होतं.
पंचवीस आवर्तन पूर्ण झाल्यावर अभयच्या घशाला कोरड पडू लागली. पण पाणी प्यायला थांबलं तर मंत्राची साखळी तुटणार होती. शिवाय इकडे दादाचा श्वास अजूनच वाढला होता. त्याची घरघर अभयला स्पष्ट जाणवत होती. त्याने अभयला अजून उभारी आली. तो अविरत मंत्र जपत होता श्वाससुद्धा न घेता. साधारण चाळीसवेळा मंत्र म्हणून झाला असेल. खरं तर अभयलाच आता खूप त्रास होऊ लागलेला. तो कसंबसं आपलं काम रेटत होता.
इकडे दादाच्या श्वासाची गती वाढू लागली होती आणि अभयला त्रास होत होता. एकदा त्याला वाटलं थांबवावं हे सगळं. नाहीतर दादाचं वाईट करायला जायचो आणि आपलंच काही होऊन बसायचं. पण दादाचा मृत्यू, त्यानंतर मिळणाऱ्या संपत्तीची हाव त्याला थांबू देत नव्हती.
कसाबसा त्याने सत्तरचा टप्पा गाठला. लढाई जवळ जवळ जिंकत आल्यासारखं अभयला वाटू लागलं. त्याने आपलं काम सुरूच ठेवलं.
अचानक दादा बेडवर उठून बसला. हे अक्रित कसं घडलं ह्याचा अभयला उलगडा होत नव्हता. खरं तर किमान एक सेकंद थांबून श्वास घ्यायला हवा थोडं पाणी प्यायला हवं असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं. पण त्याने घोषा सुरूच ठेवला.
हळूहळू अभय शेवटाला पोचू लागला होता. आत्तापर्यंत कसंतरी निभावून नेलं आता केवळ काहीच सेकंद बाकी होती.
अभयला खरंच श्वास घेणं अवघड होऊ लागलं. अभय तुला काय होतं आहे? अचानक कानावर दादाचा आवाज पडला. म्हणजे दादा बरा झाला? असं होऊन चालणार नाही. अभयने जीव एकवटून मंत्र म्हणणं सुरु ठेवलं.
आता केवळ एकदाच मंत्र म्हटला की आपण जिंकलो. त्याने कसाबसा मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि आणि कदाचित त्याचेच काही श्वास कमी पडले. तो धाडकन जमिनीवर कोसळला.
अभय काय झालं तुला? ए अभय उठ ना! दादा स्वतःला सावरत खाली उतरले पण पायात कळ येऊन धपकन पडले. स्वतःला जमिनीवर रेटत त्यांनी आतून दरवाजा उघडला आणि मानसी, नुपूरला आवाज द्यायला सुरुवात केली.
आरडाओरड ऐकून दोघी धावत आल्या. मानसीने लाईट लावला. तीला दिसलं दादा खाली अस्ताव्यस्त पडलेत. पायावर भार पडल्याने त्यांना त्रास होत होता. आणि अभय त्यांच्या कॉटच्या बाजूला पडला होता. नुपूरने जवळ जाऊन पाहिलं, त्याचा चेहरा लालबुंद ओढलेला दिसत होता. तीने चेक करून पाहिलं त्याची नाडी लागत नव्हती. श्वास बंद झाला होता. हृदय देखील धडधड करत नव्हतं.
तो इथे खाली बसून काही तरी पुटपुटत होता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता पण तो थांबला नाही. मी त्याला विचारलं काय होतं आहे अभय? पण त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. वाघ मागे लागल्यासारखं तो काही जोराजोरात बोलत होता. दादांनी माहिती पुरवली.
अभय नक्की काय करत होता मानसीला ठाऊक होतं पण आता ती कुणाला बोलू शकणार नव्हती. पुढचे सोपस्कार आता तीलाच पार पाडायचे होते.