फ्युरीओसा

भाग क्र :- १

तस तर तिचं नाव अंजली होतं पण सोशल मीडियावर,बाईकवर तिने आपलं नाव फ्युरीओसा कुंभार असं लिहल होतं.....प्रथमदर्शनी हे नाव विचित्र वाटत असलं तरी अंजलीला ह्या सगळ्या गोष्टींची आणि लोकांची घंटा फिकीर नव्हती....तिचं स्वतःच एक वेगळं जग होतं आणि तिथेच ती खुश होती....आता फ्युरीओसा नावाबद्दल सांगायचं झालं तर अंजलीला हॉलिवूड मुव्हीज जाम आवडायच्या...त्यातल्या त्यात mad max मुव्ही मधील "फ्युरीओसा" हे स्त्री पात्र अंजलीला खूप आवडतं असे....स्वाभिमानी,कुठल्याही संकटाला न घाबरणारी फ्युरीओसा नावाची मुलगी काल्पनिक पात्र असली तरी अंजलीला आदर्श होती...फ्युरीओसाचा एक गुण अंजलीला जाम आवडायचा तो म्हणजे ती कधीही हार मानत नव्हती....mad max मधील विलन डीमंटसने जेव्हा फ्युरीओसाला पकडले होते आणि एका हाताला बांधून लटकावले होते तेव्हा ह्या जिगरबाज फ्युरीओसाने आपला बांधलेला हात कापला होता आणि सुटका केली होती पण ती कधी शत्रूला शरण गेली नव्हती....नंतर तिने डीमंटसला ठार करून आपला बदला पूर्ण केला होता.....अशी ही फ्युरीओसा काल्पनिक पात्र असली तरी अंजलीची फेव्हरेट होती....अंजलीबद्दल सांगायचं झालं तर ती कमालीची introvert होती....प्रत्येक शब्द मोजूनमापून आणि कमी बोलणे....मित्र कमी ठेवणे गर्दीचा एक भाग म्हणून जगण्यात तिने लहानपणापासून रस घेतला नाही....बाकी तिचा हा "स्वभाव बदल" अस सांगायचं धाडस तिच्या आईडिलांच्यात सुद्धा नव्हतं....बाकी अंजली एक sculptor होती....मातीच्या वेगवेगळ्या कलात्मक मूर्ती बनवण्यात तिचा हात कुणीच धरू शकत नव्हतं एव्हाना तिच्या कलेला अगदी परदेशातून मागणी होती...मोठ्या मोठ्या कलाकारांना तिने मागे सोडलं होत..काही क्षणात ती मातीला जिवंत करून मूर्ती बनवत असे.....तिचं स्वतःच वर्कशॉप होतं त्यातून तिने स्वतःला सेटल केलं होतं.....इतर मुलींच्या सारखं नटने,मेकअप वैगेरे गोष्टी तिला एकदम फालतू वाटायच्या टीशर्ट,जीन्स मागे बांधलेले केस असा काय तो एकच तिचा कायमस्वरूपी युनिफॉर्म असायचा.....अंजली ह्यासोबत सर्पमित्र,ट्रेकर आणि बरेच काही कलागुण बाळगून होती.....तिचा राग जरा वरच्या टप्प्याचा होता....मागच्याच आठवड्यात तिने वाईट कमेंट्स केल्यामुळे रस्त्यावरून जाताजाता दोन मुलांची ठोसे मारून नाकं फोडली होती....केस बसणार होती थोडक्यात वाचली होती.......
आज अंजलीला एक राजकारण्याच्या मोठ्या पुतळ्यासाठी एक छोटं मॉडेल बनवायची ऑर्डर आली होती त्यानुसार ती त्या राजकारण्याचे खेचलेले जुने फोटो घ्यायला निघाली होती आपल्या बुलेटला किक मारून चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे गंभीर भाव आणून ती निघाली होती.... 50 km अंतर जायचं होतं त्यामुळे तिची बुलेट रस्त्यावर सुसाट धावत होती.....शहर संपले होते हायवे लागला होता.....सरळ रेषेतला हायवे....अगदी 4,5 किलोमीटर वरच स्पष्ट दिसत होतं......अंजलीचा पाय अचानक ब्रेक वर पडला....त्या हायवेच्या रिकाम्या रस्त्यावर अचानक एक स्त्री कुठून आली काय माहित.....पण हात दाखवून अंजलीची बाईक थांबवू पाहत होती....ती बाई अचानक तिथे एक प्रकारे प्रकटच झाली होती हे मात्र खरं होतं.....न जाणो का पण अंजलीने बाईक थांबवली.....लोकांशी न बोलणाऱ्या अंजलीला न जाणो आता गाडी थांबवावीशी वाटली.....तिने त्या स्त्री समोर बाईक थांबवली.....स्मितहास्य करत एक सुंदर स्त्री उभी होती....दिसायला तर ती एकदम मोठ्या श्रीमंत घरातली वाटत होती.....असली सुंदर सोनेरी कांती असलेली स्त्री अंजली आज पहिल्यांदा बघत होती.....अंजलीने तिच्याकडे बघितले काही बोलायच्या आतच ती स्त्री म्हणाली
"मला जरा पुढच्या गावापर्यंत सोडशील??"
तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य बघून न जाणो अंजलीवर अशी काय जादू केली की ती स्त्री कधी अंजलीच्या बुलेटमागे येऊन बसली हे तिला कळलं सुद्धा नाही.....ती स्त्री एकदम शांत होती सुसाट धावणाऱ्या बाईक बरोबर जो उलट वारा वाहत होता त्या वाऱ्याने त्या सुंदर स्त्रीच्या शरीरातून येणारा मंद सुवास अंजलीलाही येत होता....अचानक अंजलीला हालचाल जाणवली ती स्त्री पुढे सरकली होती....ती अंजलीच्या कानाजवळ आली आणि काहीसे विचित्र मंत्र पुटपुटू लागली....त्या मंत्राचा पहिला शब्द कानावर पडताच अंजली बाईक चालवता चालवता स्तब्ध झाली होती.....त्या बाईचे मंत्र तिच्या कानावर पडत होते तसे तिचे डोळे जडजड होऊ लागले.....अचानक अंजलीला झोप येऊ लागली त्या स्त्री ने अंजलीला पुढे हात घालून पकडले होते आणि ती अंजलीच्या कानात ते मंत्र म्हणत होती.........
थोड्या वेळाने अंजलीला जाग आली.....ती एका सिमेंटच्या बेंच वर झोपली होती..थोडासा डोंगराळ आणि हिरवागार भाग वाटत होता....तिथले वातावरण अगदीच प्रसन्न होते झाडे उंच आणि गुलाबी पानांनी सजली होती....आल्हाददायक हवा....पक्ष्यांचा किलबिलाट बाजूलाच एक मोठा तलाव..शांतता इतकी की नक्की हा भाग पृथ्वीचाच आहे की अजून कुठला असा प्रश्न येणं स्वाभाविक होत..अस एकूण स्वर्गीय वातावरण होतं तिथलं......जाग येताच अंजलीने आजूबाजूला बघितले.....रस्त्यावर बाईक चालवता चालवता ती डायरेक्ट इथे कशी आली??? प्रश्न मोठा होता.....पण ह्याचं उत्तर काहीच नव्हतं.....हो अगदी काहीच नव्हतं.....आपलं नाव अंजली कुंभार आहे....आपला पत्ता,आपले आईवडील आपलं काम ह्यातलं काहीच अंजलीला आठवत नव्हतं.....एवढंच नव्हे तर तिला तिचं नाव ही आठवत नव्हतं.....आपलं एका शहरात एक आयुष्य आहे हे अंजली जणू विसरलीच होती.....त्या स्त्रीच्या मंत्रामुळे ती आता पूर्णपणे कोरी पाटी झाली होती इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर पूर्णपणे blank झाली होती.....
जाग आल्याबरोबर ती त्या स्वच्छ आणि रंगेबेरंगी फुलांचा सडा पडलेल्या रस्त्यावरून चालू लागली...सगळं अगदीच यांत्रिक पद्धतीने होत होतं.....त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिशादर्शक बाण लावले होते त्या चिन्हांचा पाठलाग करत करत अंजली त्या रस्त्यावर चालू लागली.....मंद असा सुवास पसरला होता आजूबाजूचे स्वर्गीय वातावरण बघून स्मितहास्य करत अंजली चालली होती अचानक तिला पुढे दोन तरुण चालत असल्याचे दिसले.....अंजली चालत चालत त्यांच्याजवळ गेली.....ते दोघे काहीतरी बोलत होते......अंजली त्यांच्या बाजूला चालू लागली पण त्या दोघांना काहीच फरक किंवा आश्चर्य वाटलं नाही ते दोघे आपल्या चालू विषयावर चर्चा करत चालले होते.....इथल्या आजूबाजूला जे वातावरण होते त्याची तारीफ चालली होती ते सुद्धा इशाऱ्यात बोलणं चालू होतं.....कारण दोघांना एकमेकांची भाषा समजत नव्हती एक केरळचा आणि दुसरा बंगाली.....त्यात अंजली मराठी.....तीन वेगवेगळ्या भाषा आणि तीन वेगवेगळ्या प्रांतातून हे तिघे तिथे आले होते.....आणि तिघेही एकदम blank.....तिघांना आपल्या पूर्वाआयुष्याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं तिघेही आरामात चर्चा करत चालले होते हातवारे करत अंजली सुद्धा त्यांच्यात सामील झाली ते फक्त इथल्या प्रसन्न वातावरणाबद्दल बोलत होते.....अखेर चालत चालत ते एका आलिशान दगडी घराजवळ पोहोचले......ते एखादे पॅलेस वाटत होते.....ते दगडी पॅलेस एका उंच टेकडीवर....गुलाबी फुलांनी सजलेली ती टेकडी आणि त्या पॅलेस च्या आवारात असलेली रंगेबेरंगी फुलांची बाग.....त्या बागेतून जो मंद सुगंध दरवळत होता त्यामुळे त्या तिघांची पाऊले आपोआप पुढे सरकत होती......राजवाड्याला जायला दगडी रस्त्या आणि मधोमध एक कारंजा पूर्ण क्षमतेने लयबद्ध रीतीने पाणी उडवत होता....पण ते पाणी साधेसुधे नव्हते.....ते वेगवेगळ्या रंगाचे पाणी लयबद्ध रीतीने उडत होते....आता मात्र त्या तिघांचा हातवाऱ्याचा संवाद सुद्धा बंद झाला होता कारण जिकडे नजर जाईल तिकडे नावीन्य होतं.....पृथ्वीवरचा स्वर्गच जणू......त्या तिघांची नजर अचानक एका गोष्टीवर स्थिरावली......पैंजनाचा मंद आवाज करत एक सुंदर स्त्री त्यांच्या दिशेने येत होती.....ती स्त्री एवढी सुंदर आणि मादक होती की त्या तिघांच्यातल्या दोघांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.....सोन्याचं पाणी दिल्यासारखं तीच चमकदार सोनेरी शरीर तिथल्या मंद प्रकाशात चमकत होते.....लाल रंगाची साडी....भरभरून परिधान केलेली दागिने....आणि स्मितहास्य करत स्वागत करणारा चेहरा.....
"चला आत या.....चंद्रकांतजी आपली वाट बघत आहेत"
ते तिचं एकच वाक्य त्या तिघांनी आपापल्या मातृ भाषेत ऐकू आलं....अंजली ने मराठीत आणि त्या बाकीच्या दोघांनी आपापल्या राज्यातल्या भाषेत म्हणजे मल्याळम आणि बंगाली मध्ये ऐकलं.....आणि हो तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून लिफ्ट लागून त्याच्या बाईकच्या मागे बसून मंत्र म्हणून त्या तिघांना इथे आणणारी हीच स्त्री होती.....पण इथे आल्यानंतर त्या तिघांना आपल्या पूर्वायुष्याचा विसर पडला होता.....त्या स्त्रीच्या मागे हे तिघे चालू लागले उंच दगडी चिरेबंदीचा तो पॅलेस होता त्याच्या मुख्य दरवाज्याजवळ येताच तिघेही थांबले समोर एका आधुनिक व्हीलचेअर वर बसलेला अंदाजे 50-55 वर्षाचा व्यक्ती ज्याचे निळेशार डोळे लांबूनच चमकदार वाटत होते...त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून गायब होते...त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते....कदाचित तो ह्या सगळ्याच मालक असावा....तो स्मितहास्य करत होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला एकसारखे दिसणारे दोन धिप्पाड बॉडीगार्ड टाइप लोक....ते दोघेही एकटक रोखून ह्या तिघांच्याकडे बघत होते....आणि व्हीलचेअर वरचे चंद्रकांत स्मितहास्य करत तिघांच्याकडे बघत होते....त्यांना बघून ती सुंदर अप्सरेसारखी दिसणारी स्त्री चंद्रकांत ह्यांच्या बाजूला उभी राहिली.....चंद्रकांतनी तिच्या नाजूक कंबरेत हात घालून ओढून तिला आपल्या मांडीवर बसवलं.....आणि तिघांच्याकडे बघत हसत म्हणाले
"या....या वेलकम.....स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या छोट्याश्या घरामध्ये.....पुढचे काही दिवस तुम्ही इथेच राहणार आहात.....इथे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो"
अस बोलत एक सिगार पेटवून तिचा झुरका घेत ते त्या तिघांना आत येण्याचे आवाहन करू लागले.....पण ह्या तिघांना इथे का आणले होते??....तिघांना हे जाणून घ्यावयाची गरज भासली नाही.....ती एखाद्या संमोहित व्यक्ती सारखे त्यांच्या मागे चालू लागली......समोर एक डिनर टेबल खचाखच भरला होता हर एक नामुन्याचे पदार्थ त्या डायनिंग टेबलावर ठेवले होते......चंद्रकांत रावांनी त्या टेबलाकडे हात दाखवत त्या तिघांना ते सगळे पदार्थ खाण्याची जणू ऑर्डरच दिली.....दुपार झाली होती....चालून चालून तिघांना जाम भूक लागली होती.....तिघांनीही जेवणावर ताव मारायला सुरुवात केली....चंद्रकांतराव ते दोन बॉडीगार्ड आणि ती सुंदर स्त्री सोनाली त्या तिघांच्याकडे एकटक बघत होते.....त्या तिघांनी त्या टेबलावरचे जवळपास सगळेच पदार्थ खाऊन टाकले.....जेवण झाल्यावर चंद्रकांतराव सोनालीला म्हणाले
"सोनाली आपल्या पाहुण्यांना त्यांच्या त्यांच्या रूम दाखव बर"
तशी सोनाली त्या साऊथ इंडियन मुलगा ज्याचे नाव राजाराव होते त्याच्याकडे मादक नजरेने बघत पुढे चालू लागली....राजाराव तो बंगाली मुलगा बिपीन आणि अंजली सोनालीच्या मागे चालू लागले....तो आलिशान राजवाडा प्रशस्त होता....महागड्या संगमरवरी दगडांनी तो राजवाडा मोत्यासारखा चमकत होता......जिकडे तिकडे आलिशान खोल्या....काचेचे उंची झुंबर...मंद प्रकाश ह्यांनी वातावरण आलिशान वाटत होतं.....प्रथम सोनालीने बिपीनला रूम दाखवली तो रूम मध्ये गेला....नंतर अंजलीला रूम दाखवली ती आपले शूज बाहेर काढू लागली.....तिकडे राजाराव आणि सोनाली एकत्र त्या आलिशान खोलीत शिरले अंजली सगळं बघत होती.....अंजली रूम मध्ये जाताच तिने सर्व खोली नजरेखालून घालायला सुरवात केली ती खोली म्हणजे एक प्रकारचे म्युझियम वाटत होते....वेगवेगळ्या पेंटिंग,सुबक मुर्त्या ह्यांनी ती खोली अतिशय आकर्षक वाटत होती.....भटपेट जेवल्यामुळे अंजलीला गाढ झोप लागली.....तिचे डोळे 6 वाजताच उघडले ती दार उघडून बाहेर आली आणि काय आश्चर्य.....तिन्ही खोलीचे दरवाजे एकदम उघडले गेले आणि ते तिघे एकत्र बाहेर पडले..तिघांना एकत्र जाग आली होती...तिघेजण चालत चालत खाली हॉल मध्ये जाऊ लागले...राजारावच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मितहास्य होते....त्याला सोनालीचा एकांतात सहवास लाभला होता ज्याची त्याने कल्पना सुद्धा केली नव्हती..हॉल मध्ये येताच खाली चंद्रकांतराव आणि सोनाली त्यांची जणू वाटच बघत होते.....
"कशी झाली झोप??"
ह्या चंद्रकांतरावांच्या प्रश्नाला सगळ्यांचे समाधानकारक उत्तर आलेलं बघून चंद्रकांत रावांनी त्यांना मागे मागे यायला सांगितलं.....ते तिघेही एखाद्या पाळीव प्राण्यासारखे चंद्रकांत रावांचे आदेश मानत होते.....चंद्रकांत रावांची व्हीलचेअर एका मोठ्या अश्या स्विमिंग पुलाजवळ येऊन थांबली......त्या स्विमिंग पूल मध्ये सोनाली आधीच बिकिनी मध्ये पोहत होती.....त्या तिघांच्या कडे बघून चंद्रकांत रावांनी पूलमध्ये एन्जॉय करण्याचा इशारा केला तसे राजाराव आणि बिपीन कपडे काढून पाण्यात उतरले राजाराव तर पोहत पोहत सोनाली जवळ पोहोचला सुद्धा तिला मिठीत घेऊन तिच्या अंगावर पाणी उडवू लागला.....तिकडे अंजली ला ह्या सगळ्या अश्या मजेशीर गोष्टीत इंटरेस्ट नव्हता....भले इथे येऊन ती आपलं सगळं पूर्वायुष्य विसरली असली तरीही एक गोष्ट मात्र सतत तिच्या सोबत होती ती म्हणजे तिचा स्वमग्न स्वभाव.....ती एका कोपऱ्यात त्या स्वामींग पुलाच्या पाण्यात पाय घालून बसली.....आजूबाजूची सुंदर फुले थंडगार वातावरण एन्जॉय करण्यात तिचा वेळ जात होता......तिघेही अश्या जगात वावरत होते जे कधीही त्यांचं नव्हतं.....एव्हाना ह्या सगळ्यांशी त्यांचा काही संबंध नव्हता....तिघेही ह्या वातावरणाशी एकरूप झाले होते
अंधार कधी पडला कळलंच नाही.....व्हीलचेअरवर बसलेले चंद्रकांतराव आणि त्यांचे बॉडीगार्ड स्विमिंग पुलाजवळ आले आणि त्यांनी सोनालीला आवाज दिला
"अरे सोनाली.....जेवणाची वेळ झाली....तिघां पाहुण्यांना घेऊन ये"
हा शब्द ऐकताच सोनाली चटकन पाण्याबाहेर पडली टॉवेलने अंग पुसत ती राजाराव ला मादक इशारे करत मादक चाल चालू लागली त्याच बरोबर तिघेही पूल मधून बाहेर पडले तिथे त्यांच्या मापाचे तयार कपडे चेंज करून हॉल कडे जाऊ लागले......हॉल मध्ये येताच परत एकदा डायनिंग टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी सजला होता.....बॉडीगार्डसनी तिघांसाठी तीन खुर्च्या बाहेर ओढल्या तसे ते तिघे जेवायला बसले.....समोरचे वेगवेगळे चटकदार पदार्थ बघून तिघांच्या तोंडाला पाणी सुटले पाण्यात खेळून आधीच त्यांना भूक लागली होती त्यामुळे त्या तिघांनी त्या आलिशान जेवणावर ताव मारायला सुरुवात केली.....चंद्रकांतराव ते दोन बॉडी गार्ड आणि सोनाली चौघेजण बाजूला उभे राहून फक्त बघत होते.....आणि कधीही आयुष्यात अस चटकदार जेवण न खायला मिळालेले ते उपाशी जीव जेवणावर ताव मारत होते..रात्र झाली होती..भरपेट जेवून ते तिघेही आपल्या रूम कडे वळले.....अंजली,बिपीन आणि राजाराव ह्यांना कधी झोप लागली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही......
सकाळी मात्र ह्यावेळी दोन दरवाजे एकदम उघडले गेले....होय....दोन दरवाजे.....राजारावचा दरवाजा उघडलाच नाही......पण बिपीन आणि अंजलीला जराही आश्चर्य वाटलं नाही.....एवढंच काय इथल्या कोणत्याही गोष्टीचे त्यांना नवल वाटत नव्हते....ते दोघे पायऱ्या उतरून खाली येत होते नेहमीप्रमाणे हॉल मध्ये चंद्रकांतराव मागे ते तीन बॉडी गार्ड आणि सोनाली हे तिथले सदस्य हसत त्या दोघांचे स्वागत करू लागले....अंजलीची नजर मागे मागे बघून काहीतरी शोधत होती...तिची ती नजर ओळखून चंद्रकांतराव म्हणाले
"काय झालं अंजली??"
तशी अंजली लगेच उतरली
"तो साऊथ इंडियन??....तो राजाराव?? तो कुठे दिसत नाहीय"
त्यावर चंद्रकांतराव हसले आणि म्हणाले
"अच्छा तो होय....तो पोहोचला पुढच्या स्टॉपला"
अस बोलून चंद्रकांतराव अंजलीकडे रोखून बघत ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटु लागले त्यानंतर मात्र अंजली शांत झाली तिने पुढे कोणताही प्रश्न विचारला नाही.....आता सोनालीची मादक नजर बिपीनवर खिळली....तिने बंगालीमध्ये आपल्या मादक स्वरात काहीतरी म्हंटल तसा तो लगोलग डायनिंग टेबलवर बसला पाठोपाठ अंजली सुद्धा बसली.....सकाळचा चहा नाष्टा आटोपून दोघेही तयार झाले....चंद्रकांतरावांनी त्यांना ती जागा फिरवण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार एक आलिशान गाडी दारात उभी होती....छत नसलेल्या गाडीत बसून चंद्रकांत राव आपल्या मालकीचा परिसर दाखवत होते.....ते पूर्ण बेट म्हणजे एक प्रकारचे स्वर्ग होते....चंद्रकांतराव दोघांना सगळं काही दाखवत होते....काहितास फिरून गाडी परत आलिशान पॅलेस समोर आली.....चंद्रकांतराव आपल्या आधुनिक आटोमॅटिक व्हीलचेअर वर बसून आरामात येत होते....डायनिंग टेबलवर जेवण तयार होते....खचाखच असा डायनिंग टेबल सजला होता....परत त्या स्वादिष्ट जेवणावर ताव मारून दोघेही दुपारच्या आरामसाठी निघाले......आता ह्यावेळी मात्र सोनाली बिपीन सोबत होती....त्याच्या सोबत ती त्याच्या रूम मध्ये गेली....अंजलीला पटकन झोप लागली......
संध्याकाळी परत दोघांना एकाच वेळी जाग आली....बिपीन आणि सोनाली एकत्र खोलीतून बाहेर पडले.....खाली परत चंद्रकांतराव दोघांचे स्वागत करत होते....आता ह्यावेळी सोनाली,बिपिन,अंजली आणि चंद्रकांतराव ह्यांच्यात पत्यांचा डाव रंगला....एकदम हसत खेळत रात्र झाली....दोन बॉडीगार्ड मधील एक बॉडीगार्ड चंद्रकांत रावांच्या जवळ आला आणि कानात काहीतरी सांगून गेला....तसे चंद्रकांत राव बोलले
"चला लवकर जेवण थंड होईल"
जेवणाचे नाव काढताच अंजली आणि बिपीन ताडकन उठले कारण इथले जेवण कमालीचे स्वादिष्ट होते.....परत एकदा डायनिंग टेबल सजला होता....अंजली आणि बिपीन त्या स्वादिष्ट जेवणावर अक्षरशः तुटून पडले....सोनाली आणि चंद्रकांतराव त्यांच्याकडे लांबूनच बघत होते.....भरपेट जेवल्यानंतर दोघांना जाम झोप आली सोनाली त्यांच्या सोबत होती....ती आणि बिपीन परत एकाच खोलीत शिरले....आणि अंजली आपल्या आलिशान रूममध्ये शिरली.....रूम खूप प्रशस्त होती....शिल्प,पेंटिंग ह्यांनी सजली होती....त्यातल्या एका शिल्पावर अंजलीची नजर खिळली आणि अंजली जागेवर स्तब्ध झाली........तिचं डोकं अचानक जडजड होऊ लागलं.....तिच्या डोळ्यात अचानक प्रचंड झोप आली होती पण ती झोप उडू लागली....अंजलीची नजर एकटक त्या दगडी शिल्पावर खिळली होती..........(क्रमशः)
दुसऱ्या भागाची लिंक
https://marathighoststories.blogspot.com/2024/12/blog-post_31.html