फ्युरीओसा
भाग क्र :- ३
रात्रीचे 11 वाजत होते....त्यांचा मागचा बळी देण्याचा विधी रात्री 2 ते 3 ह्यावेळेत पार पडला होता....त्याच्या आधी अंजलीला आपले ठरवलेले काम करायचे होते....पायात काहीच न घालता अंजली दबक्या पावलांनी बाहेर आली तिने गॅलरी मधून बाहेर बघितलं....बाहेर कुणीच दिसत नव्हतं....हॉल मधील त्या रूमचा दरवाजा बंद होता....अंजलीला ही भीती होती की हा दरवाजा लॉक असला तर??....पण तस काहीच झालं नाही हँडल फिरवतात दरवाजा उघडला गेला...कदाचित बळी देणार्यापैकी कुणी इथे पोहचूच शकणार नाही ह्या विश्वासाने दाराला लॉक नव्हते..प्रशस्त रूम मधून अंधार पार करत करत अंजली त्या लाल उजेडाच्या दिशेने जाऊ लागली....हे अंतर खूप मोठं होत त्यामुळे अंजली त्या लाल उजेडाच्या दिशेने त्या अंधारात अक्षरशः धावत होती....तिला घाम फुटला होता....तिचा ग्रे टीशर्ट घामाने भिजला होता.....धावत धावत ती त्या गुहेजवळ पोहोचली....गुहेत परत ते नकारात्मक गंभीर वातावरण होते...लालसर रंग खायला येत होता....पण ही घाबरणारी थोडीच होती....गुहेत दगडी चढ उतार होते पण अंजली ट्रेकर असल्याने ती सहज काही मिनिटात ते चढ उतार पार करून तिथे पोहोचली जिथे ती राक्षसी लाल मूर्ती आहे.....लाल भडक दगडातून झिरपणारे रक्त खालची जागा लाल करत होते....कालचे बिपीनचे रक्त वाळले होते ज्या तलवारीने त्याचे मुंडके वेगळे केले होते ती तलवार बाजूलाच होती त्यावरचे रक्त वाळले होते....जबरदस्त धारदार तलवार वाटत होती ती त्या अंधाऱ्या गुहेत त्या तलवारीचे तेज वेगळेच होते...बाजूला आधुनिक हत्यारे सुद्धा दिसत होती जस की ड्रिल मशीन,चेनसॉ....एकप्रकारे कत्तलखाना वाटत होता.....त्या गुहेतील लाल दगड आणि झिरपणारे रक्त एका जिवंतपणाची साक्ष देत होते.....समोरची लाल भडक राक्षसी मूर्ती त्या गुहेचे हृदय वाटत होती....तिचे चांदीचे डोळे आणि चांदीचे चमकदार दात भयानक वाटत होते....कलियुगातला इच्छा पुरवणारा राक्षसी देव होता तो....त्याच्या पायाजवळ दोन मानवी पायांचे सांगाडे होते.....अंजली समजून चुकली होती की हे पायाचे सांगाडे चंद्रकांतरावांचे आहेत....त्याने आपल्या पायांचे बलिदान देऊन ह्या राक्षसाला प्रसन्न केलं असावं.....अच्छा....जेव्हा काल अंजली इथे चोरून आली होती तेव्हा तिच्या कानात कसला तरी मंद आवाज आला होता....तो तिला अस्पष्ट समजला होता म्हणून तर तिने इथे परत येण्याचे धाडस केले होते.....अजूनही एक मंद अशक्त आवाज त्या लाल भडक सैतानी मूर्तीतुन येत होता.....अंजलीच्या पायाला रक्त लागत होते ती कोणताही विचार न करता त्या रक्ताच्या घट्ट चिखलात बसली....ती मूर्ती समोर होती..कमालीची भयानक वाटत होती जणू कधीही धावून अंगावर येईल अशी..अंजली एकटक त्या मूर्तीकडे बघत होती....तिने डोळे बंद केले....त्या गुहेतील वातावरण थोडे गंभीर आणि गडद झाले होते.....कसले तरी आवाज अंजलीच्या कानात घुमत होते ते मंद आवाज ऐकण्यासाठी तिने डोळे घट्ट बंद केले....जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडे गंभीर भाव होते....तिला विचार करायला फक्त काही सेकंदच लागला......डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेऊन तिने स्वतःला ह्यासाठी तयार केलं....तिने आपला टी शर्ट काढला नंतर आपली ब्रा काढली आणि परत टी शर्ट घातला....ब्रा तिने मांडीवर ठेवली आणि तिने बाजूला असलेली झाडे कापायची छोटी चेनसॉ घेतली ह्याच चेनसॉ ने कधी चंद्रकांतरावांनी आपले पाय कापून बलिदान देऊन ह्या राक्षसाला खुश केलं असेल...कदाचित ह्याची आठवण म्हणून त्यांनी ही इलेक्ट्रिक चेनसॉ इथे ठेवली असावी...प्लग ऑन झाला आणि अंजलीने त्या चेनसॉचे ब्लेड आपल्या डाव्या हाताच्या खोपरापर्यंतच्या भागावर ठेवले.....घट्ट डोळे बंद करून तिने चेनसॉचे बटन ऑन केले.....तिच्या हातातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या....प्रचंड वेदना आक्रोश किंचाळीने पूर्ण गुहा शहारली होती...ती उजव्या हाताने चेनसॉ वर दाब देत होती..धारदार चेनसॉ मुळे अंजलीचा हात लगेचच खोपरापासून वेगळा झाला....तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते....अंग थरथरत होतं....तिने लगेच बाजूला जे मानवी राखेचं पोतं होय त्यातली राख मुठीने आपल्या हात तुटलेल्या जागी लावली त्या राखेच्या प्रभावाने तिचा रक्तस्त्राव कमी झाला...अंजलीने लगेच आपला तुटलेला हात उचलला आणि त्या मूर्तीवर धरला....त्यातले ओघळणारे रक्त जस जसे त्या राक्षसी मूर्तीवर गळत होते ती मूर्ती जणू तिचे रक्त शोधून घेत होती रक्त मूर्तीत मिसळत होत तशी एक वेगळी ऊर्जा अंजलीच्या अंगात संचारत होती....काही काही अनोळखी मंत्र आपोआप तिच्या तोंडात येऊ लागले....सैतानाची स्तुती गाणारे मंत्र ती सहज बोलू लागली....बहुतेक सैतान तिच्या ह्या बलिदानावर खुश झाला होता....तिचे डोळे आता निळेशार झाले होते....तिचा हात तिने स्वतःने कापून घेतला असला तरी तिला आता वेदना होणे बंद झाले होते....एक राक्षसी स्मितहास्य तिच्या चेहऱ्यावर फुलले....तुटलेल्या हातातून अजून थोडे थोडे रक्त गळत होते त्या तुटलेल्या जागेवर तिने आपली ब्रा बांधली आणि रक्तस्त्राव थांबवला.....सैतान तिच्यावर प्रसन्न होता....अंजलीने एकदा आपल्या एका हाताने त्याला नमस्कार करून त्याचे आभार मानले आणि तिने त्या राखेच्या पोत्यातली राख एका हाताने खाली ओतली.....आपल्या डाव्या खांद्यावर तिने एका चाकूने अजून एक घाव केला आणि तिथून गळणारे रक्त तिने त्या राखेत सांडले.....त्या जखमेवर परत ते राखेचे भस्म लावून तिथला रक्तस्त्राव बंद केला....बाजूला एका मडक्यात पाणी होत ते पाणी राखेत ओतून तिने मळायला सुरवात केली.....अंजली चंद्रकांतरावापेक्षा किंवा त्यांच्या हुन अधिक सरस शिल्पकार होती.....आत आपल्या एका हाताने त्या राखेच्या लुसलुशीत गोळ्याला तिने आकार द्यायला सुरुवात केली....तिने आपल्याला हवं तसं घडवायला सुरवात केली.....धिप्पाड देह,लांब नखे,मोठी टोकदार शिंगे असे एक भयानक दिसणारे शिल्प तिने तयार केले होते....त्यात जे काही हवं होतं ते ते ती मनात आठवून आठवून त्याला घडवत होती....कारण बाहेर 5 जण होते आणि त्यांच्याविरुद्ध एकजण म्हणजे.......
अगदी रेखीव पण भयानक दिसणारे शिल्प अंजलीने अर्ध्या तासात तयार केले एकवार नजर मारून ती सुखावली.....तिने ते शिल्प हिंसक क्रूर बनवलं होतं....आता त्याला आपल्या मंत्रांचा प्रभावाने जिवंत करायची वेळ आली होती त्या शिल्पाच्या कानाजवळ जाऊन ती बोलली
"नंदी sssssss"
ह्याच वाक्याने त्या शिल्पातून धूर येऊ लागला...गुहेतील छोटे छोटे दगड थरथरू लागले.....वरून ओघनळणारे रक्ताचा वेग वाढू लागला...अंजलीची मान वर वर बघू लागली....तिने 8 फुटाचा एक अमानवी जीव बनवला होता.....तो धिप्पाड काळाकुट्ट मानवी देह त्याची नखे लांब आणि धारदार होती त्याचे शीर बैलाचे होते..पायाचे खुर मजबूत आणि दगडी वाटत होते..शिंगे मोठी आणि टोकदार होती.....दिसायला तो एक भयानक राक्षस दिसत होता पण अंजली त्याच्याकडे बघून खुश होती कारण ती त्याची मालकीण होती.....आपल्याला एकदा नीट न्याहाळून आपले हात पाय मुठ्या आवळून नंदीने अंजलीला नमस्कार केला....तिकडे अंजलीने लगेच आपल्या हातात ती बाजूची धारदार तलवार उचलली.....आता ती पूर्णपणे तयार होती......आता तिचा एक हात तिने गमावला असला तरी तिने स्वतःच्या कल्पनेने एक नंदीरुपी राक्षस तयार केला होता.....चंद्रकांतरावांने आपले शौक पूर्ण करायला ज्या चार रचना घडवल्या होत्या त्याच्यामानाने नंदी हा अधिकच भयानक होता....रात्रीचे 2 वाजत आले होते अंजली तयार होती.....तिला जे फ्युरीओसा नावाचे फिल्मी काल्पनिक पात्र आदर्श वाटत होते त्या फ्युरीओसाची अंजलीला आठवण झाली त्याप्रमाणे तिने बाजूला अविरत जळणाऱ्या मशालीची काजळी आपल्या हातात घेतली आणि ती काजळी कपाळाला फासली.....तिने एकदा स्वतःच्या तुटलेल्या हाताकडे बघितलं आणि वरती बघून हसू लागली....जे फ्युरीओसा नावाचे पात्र तिला मनापासून आवडत होतं त्याच प्रमाणे आज तिचा डावा हात सुद्धा कट झाला होता..तो तिने फ्युरीओसा प्रमाणे कापून घेतला होता...कमालीचा योगायोग जुळून आला होता हा...ह्या गुहेत दोन वेळा ती घाबरत घाबरत धावत आली होती पण आता अंजली ताठ मानेने लांबलचक तलवार दगडावर आपटत बाहेर येत होती..अंजली आता अंधाऱ्या हॉल मधून मुख्य दरवाज्याजवळ आली होती....तिला बाहेरचा आलिशान हॉल दिसत होता..तिने नंदीला बाहेर म्हणजे त्या अंधाऱ्या रूम मध्ये थांबायला सांगितलं.....आणि स्वतः त्या हॉल मध्ये पोहोचली.....2 वाजले होते सोनाली आणि ते दोन गार्ड अंजलीला शोधत होते....आणि चंद्रकांतराव हॉल मधील व्हीलचेअरवर बसून आपल्या काळ्या शक्तींनी अंजलीला शोधण्याच्या प्रयत्नात होते.....
खनन्नन.....खन्नननं.....खन्नननं
अंजली तलवार आपटीत त्या हॉल मध्ये पोहोचली.....तो आवाज ऐकून ते दोन गार्ड,सोनाली,मायरा सगळे जण हॉल मध्ये आले....समोर हातातली तलवार खांद्यावर ठेवून कपाळावर आठ्या आणून अंजली ऐटीत उभी होती.....एक हात तुटलेला त्यावर ब्रा गुंडाळलेली...टी शर्टवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते तिचे निळेशार चमकदार डोळे बघून चंद्रकांतराव समजून चुकले होते की हिने सुद्धा आपल्याप्रमाणे सैतानाला प्रसन्न केलं आहे....त्यामुळे जास्त काही न बोलता ते अंजलीकडे बघत म्हणाले
"बळी तर मी देणारच आहे"
हे ऐकून अंजली हसली....तलवारीची टोक चंद्रकांतरावांच्या दिशेने करत ती म्हणाली
"हे बघ चुकीच्या मुलीबरोबर पंगा घेतला तू....मी शिकार नाही तर शिकारी आहे....ती पण एकदम निर्दयी.....मला इथे आणण्याआधी माझ्याबद्दल जाणून घ्यायला हवं होतं तू"
आता मात्र चंद्रकांतराव जोरजोरात हसू लागले....हे हसू एवढं होत की त्यांची व्हीलचेअर हलू लागली
"फिल्मी डायलॉग....हा....हा...हा...हा.....हे मी बनवलेलं विश्व आहे....माझ्या मर्जीशिवाय इथे पान सुद्धा हलत नाही.....तू हे जे काही केलं आहेस ते कसं केलंस मला कल्पना नाही.....तुला कमी समजण्याची चूकच झाली माझी....पण ही चूक मी लवकरच सुधारीन"
अस बोलून चंद्रकांतरावांनी त्या दोन धिप्पाड बॉडीगार्डना इशारा केला तसे ते पुढे सरसावले....त्याला येताना बघून अंजली मिश्लीलपणे म्हणाली
"एक एक....एक मिनिटं.....एका साधारण आणि हात तुटलेल्या मुलीला पकडायला दोन सांड पाठवतो का??.....स्त्री पुरुष समानता काही आहे की नाही??"
अस बोलत अंजलीने आवाज दिला
"नंदी sssssss"
गुळगुळीत टाईल्सवर धडधड पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला....चंद्रकांतराव तो आवाज ऐकून बिथरले.....दारातून वाकून आपली लांब शिंगे सावरत नंदी बाहेर आला...तो अंजलीच्या मागे उभा होता...आता मात्र चंद्रकांतरावांची हवा टाईट झाली.....8 फुटाचा धिप्पाड काळाकुट्ट जाड गेंड्याच्या कातडीचा मानवी देह...त्याची लांबलचक नखे छोट्या छोट्या चाकूप्रमाणे धारदार होती....आणि त्या देहावर एका बैलाचे शीर..तो बैल रागाने बघत गुरगुरत होता...त्याचे लालसर चमकदार डोळे बघून चंद्रकांतराव अगदीच स्तब्ध झाले....अंजली अगदीच तयारीत आली होती....समोरचा धिप्पाड अमानवी दिसणारा नंदी बघून चंद्रकांतराव थोडे घाबरले...पुढे काय करावे त्यांना सुचेना....पण अंजलीला रोखायला तर पाहिजे.....अंजलीने नंदीला इशारा केला तसा नंदी पाय आपटत चंद्रकांतरावांच्या दिशेने जाऊ लागला.....चंद्रकांत रावांनी लगेच त्या दोन बॉडीगार्ड आणि सोनालीला इशारा केला....स्वतः मात्र व्हीलचेअर मागे सरकवून मागे राहिले.... अंजली नजर रोखून चंद्रकांतरावाकडे बघत होती.....(क्रमशः)

चौथ्या भागाची लिंक 






