फ्युरीओसा
भाग क्र :- ४
तिसऱ्या भागाची लिंक 





ते दोन धिप्पाड बॉडीगार्ड अक्षरशः धावतच अंजलीच्या दिशेने येत होते....सोबत मागे आरामात चालत सोनली येत होती....त्या दोन बॉडीगार्डनी त्या धिप्पाड नंदी सोबत लढावे आणि सोनालीने अंजलीला बळी साठी घेऊन यावे....अशी एकूण योजना चंद्रकांतरावांनी मनी योजली होती आणि मनोमन दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी हे राखेतून जन्माला आलेले गुलाम निघाले होते....अंजलीला धक्का लागायला नको म्हणून नंदी अंजलीच्या पुढे आला तसे ते दोन्ही बॉडीगार्ड नंदी वर तुटून पडले....ते दोघे जरी 6-6 फुटी धिप्पाड देह असले तरी इकडे नंदी 8 फुटाचा जाड कातडीचा प्राणी होता ते दोघे धावून येत होते तसा नंदी इकडून धावत निघाला आणि दोघांना आपल्या शिंगांनी जोराची टक्कर मारली तसे ते दोघे बॉडीगार्ड खाली कोसळले...पण त्यांच्या तोंडावर वेदनेचे एकही भाव नव्हते....मुळात ते हाडामासाचे बनलेच नव्हते त्यामुळे वेदना वैगेरे त्यांना काही माहीत नसाव्यात....अंजलीच्या दिशेने चालत जाणाऱ्या सोनालीला नंदीने गळ्याला पकडले आणि आपली अफाट ताकत एकवटून समोरच्या एका खांबावर दूर फेकून दिले....ती सुद्धा लगेच उठली आणि परत अंजलीच्या दिशेने चालू लागली.....त्यांचं सगळं यांत्रिक पद्धतीने सुरू होतं.....बुद्धिबळातले दोन राजे चंद्रकांतराव आणि अंजली एका बाजूला सगळं काही बघत होते.....त्यातला एक जण नंदीच्या जवळ आला तसा नंदी त्याला ठोसे मारून दूर घालवण्यावचा प्रयत्न करत होता....पण तो बॉडीगार्ड थोडा चपळ होता त्याने आपल्या जवळ असलेल्या छोट्या चाकूने नंदीवर वार करायला सुरुवात केली....नंदी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता पण तो बॉडीगार्ड मोठ्या चपळाईने नंदिवर चाकूने वार करून आजूबाजूला पळायचा....नंदीची कातडी जाड होती पण तरीही वर्मी घाव लागल्याने त्यातून रक्त वाहू लागले....पण हे रक्त लाल नव्हतं....एक पाण्यासारखा चिकट द्रव त्याच्या जखमेतून वाहत होता तेच त्या राखेपासून बनलेल्या पाच जणांचे रक्त होते.....तोपर्यंत दुसऱ्या बॉडीगार्डने कुठून तरी जाड दोरखंड आणली आणि तो नंदीला बांधण्याचा प्रयत्न करू लागला....इकडे सोनाली अंजली जवळ जात होती....अंजली आपला तुटलेला हात पुढे करून हातातली तलवार उगारून सोनालीच्या स्वागतासाठी उभी होती....तिकडे त्या दोघांनी नंदीला दोरखंडात जखडायला सुरवात केली नंदी प्रतिकार करत होता पण काही फरक पडत नव्हता दोरखंड जखडला गेला आणि अखेर नंदी खाली कोसळला आणि ते दोघे बॉडीगार्ड उड्या मारून नंदिवर चढून बसले इकडे सोनाली अंजलीच्या जवळ येत होती.....इतक्यात अचानक एक हुंकार झाला....नंदीचे जोरात ओरडणे....बैलाचा तो आवाज पूर्ण महल हादरवून सोडणारा होता....नंदीने आपल्या सर्व ताकतीने त्या दोघांना बाजूला भिरकटले आणि आपले दोरखंड बाजूला करून तो धडधड पाय आपटीत सोनाली जवळ आला....ह्यावेळी मात्र त्याने नाजूक सोनलीला हाताला धरून लांब भिरकावले....इतकं की ती दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीमध्ये जाऊन कोसळली....तसा एक गार्ड नंदी वर तुटून पडला....आता मात्र नंदीने रागाने त्याच्या पाय पकडून त्याला धुणे बडवावे तसे जमिनीवर आपटायला सुरवात केली....आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या तोंडावर शरीरावर ओरबाडायला सुरवात केली.....त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता पण त्याच्या शरीरातून तो रक्तरूपी चिकट द्रव वाहू लागला होता.....तो चिकट द्रव जस जसा त्याच्या अंगातून वाहू लागला तसा तो अशक्त होऊ लागला....तरीही तो उठू लागला पण शरीरातून चिकट जास्त वाहून गेल्याने त्याला उठता येत नव्हते तिकडे सोनाली परत दुसऱ्या मजल्यावरून खाली येत होती आता मात्र तिच्या हातात दोन तलवारी होत्या.....खाली पडलेला गार्ड जवळपास संपला होता त्याची हालचाल जवळपास बंद झाली होती.....नंदीने त्याला पायाखाली चिरडून उरले सुरले रक्त म्हणजे चिकट द्रव बाहेर काढला....आता नंदी समोर होते दोघे....सोनालीने वरच्या कुठल्यातरी खोलीतून दोन तलवारी आणल्या होत्या एक तलवार तिने त्या धिप्पाड गार्डकडे फेकली....नंदी सुद्धा आपली तीक्ष्ण नखे दाखवत त्यांना आव्हान देत होता.....आधी तो गार्ड चपळाईने धावत आला....त्याने चपळाईने नंदीच्या हातापायापासून लांब राहत तलवारीचे वार करायला सुरुवात केली....तिकडून मायराने हॉल मधील भिंतीला अडकवलेली शॉट गन चंद्रकांतरावाला दिली....ती गन लोड करून ते सुद्धा आपल्या जागेवरून नंदिवर शूट करू लागले...गोळ्या संपल्या पण अंजलीने नंदीची कातडी जाड साकारली होती त्यामुळे जास्त फरक पडत नव्हता...नंदी थोडा धिप्पाड असल्याने त्याला ह्या दोघांसारखे चपळपणे लढता येत नव्हतं एक दोन वर्मी घाव लागल्याने त्याच्या घावामधून चिकट द्रव निघू लागले.....आता नंदी थोडाफार थकला होता..सोनाली आणि गार्ड दोन्ही कडून त्याच्या पायावर जास्त वार करत होते.......त्याच्या अंगातून तो चिकट द्रव वाहू लागला नंदी थोडा बारीक आणि अशक्त होऊ लागला.....तिकडे गार्ड आणि सोनाली कमालीचे खुश झाले नंदी जसा जसा अशक्त होऊ लागला तसे ते अजून जवळ जाऊन वेगवेगळ्या दिशेने त्याच्यावर तलवार चालवू लागले.. नंदी त्या क्षणाची वाट बघू लागला जेव्हा ते जवळ येतील....त्याच्या अंगातून रक्तरुपी जो चिकट द्रव संगमरवरी फरशीवर पाझरत होता त्यातून पाय घसरून अचानक तो गार्ड खाली कोसळला.....विजेच्या वेगाने नंदीचा एक जोराचा ठोसा त्याच्या तोंडावर पडला.....तो ठोसा इतका भयानक होता की गार्डच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला....त्यातून चिकट द्रवाच्या चिळकांड्या उडू लागल्या....तरीही तो गार्ड हवेत तलवार फिरवत होता....त्यातले एक दोन वार नंदीच्या छातीवर लागले....नंदी प्रचंड चिडला त्याने त्या गार्डच्या पायाला पकडले आणि जोरात डाव्या बाजूने धावत येणाऱ्या सोनालीच्या अंगावर फेकून दिले सोनाली खाली कोसळली....तसा नंदी धावत सोनाली जवळ पोहोचला....तिला खालीच दाबून तिला जोराचा ठोसा मारणार इतक्यात मोठ्या चलाखीने सोनालीने ती धारदार तलवार नंदीच्या पोटात उतरवली....नंदीच्या पोटातून तो चिकट द्रव पाझरून त्याला अशक्त करू लागला....पण नंदीने आपल्या तीक्ष्ण नखानीं.....सोनालीचा गळा पकडला...आणि आवळू लागला.तीक्ष्ण नखे तिच्या गळ्याभोवती रुतत होती....नंदीने सर्व ताकत एकवटली आणि धारदार नखांनी दाबून सोनालीचे शीर धडापासून ओढून वेगळे केले....शीर नसल्याने मानेतून रक्त वाहत होतं....शीर नसलेली सोनाली थोडावेळ इकडे तिकडे चालू लागली....तिच्या अंगातील चिकट द्रवरुपी रक्त संपताच ती एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे खाली कोसळली.....तिकडे नंदी सुद्धा घायाळ झाला होता.....त्याच्या पोटातून रक्तात्राव होत होता.....अखेर नंदीसुद्धा खाली कोसळला.....धुमसत असलेलं वातावरण अखेर शांत झालं.....चंद्रकांतरावाने मोठ्या मेहनतीने घडवलेल्या तीन रचना नष्ट झाल्या होत्या....
समोर होती हात मोडकी अंजली.....चंद्रकांतरावांनी आपल्या शेवटच्या रचनेला इशारा केला.....मायरा पुढे आली.....ती जवळपास नग्नच होती.....अंगावर अनेक मौल्यवान दागिने तिने परिधान केले होते....चंद्रकांतरावांनी सोनाली मध्ये ज्या शक्ती घातल्या होत्या त्याच मायरा मध्ये सिद्ध केल्या होत्या म्हणजे त्यांना तिच्याकडून शरीरसुख आणि स्वतःचे रक्षण करता येईल अश्या एकूण शक्ती त्यांनी मनोमन बोलून त्यांनी दोघींना घडवले होते म्हणजे एकूणच ती एक योद्धा होती..... मायराने सोनालीच्या हातातून पडलेली तलवार उचलली.....आणि अंजलीच्या दिशेने जाऊ लागली.....अंजली तयार होती....तिकडे नंदीची सुद्धा वाफ झाली होती.....आपला तुटलेला हात पुढे करून उजव्या हातात तलवार घेऊन अंजली उभी होती.....भीतीची एक रेषही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.....मायराने वार काढला आणि अंजलीने आपल्या तलवारीने तो आडवला....मोठ्या चपळाईने मायरा अंजलीवर चौफेर वार करत होती पण अंजली तिचा प्रत्येक वार आपल्या तलवारीवर पेलत होती....तलवारीच्या घर्षणाने ठिणग्या उडत होत्या.....आता अंजलीने मायरा वर हल्ला केला....ती मोठ्या चपळाईने मायरावर तलवार चालवत होती इतक्या शिताफीने चालवलेली तलवार बघून मायरा गोंधळली....अंजलीने तलवारीने बाजूच्या एका कोपऱ्यात ठेवलेला फ्लॉवरपॉट मायरावर उधळला गोंधळलेल्या मायराला वेगाने येणाऱ्या त्या फ्लॉवरपॉटचा अंदाज आला नाही तो चिनी मातीचा फ्लॉवर पॉट तिच्या तोंडावर आदळून फुटला......आणि मायरा चिडली आणि बाजूला उभ्या असलेल्या अंजलीवर वार करण्यासाठी सरसावली...पण समोर अंजली दिसत नव्हती...तिने इकडे तिकडे बघितलं..अंजली तिच्याकडे बघत स्मितहास्य करत बाजूला उभी होती..मायराचा वेग मंदावत होता....तश्या तिला वेदना होत नव्हत्या पण तिचा वेग का मंदावत आहे हे बघण्यासाठी तिने आपल्या शरीराकडे बघितलं....अंजलीचा एक वार तिच्या पोटाला वर्मी घाव देऊन गेला होता....मगाशी तो फ्लॉवर पॉट उडवून तिचे ध्यान भटकवून मोठ्या चपळाईने अंजलीने मायराचे पोट चिरले होते....मायराच्या पोटातून चिकट द्रव वाहू लागला तसा तिचा वेग मंदावत होता....ती लडखडत अंजलीच्या दिशेने येत होती.....अंजली एका विजयी मुद्रेने उभी होती.....बाजूला व्हीलचेअर वर बसलेल्या चंद्रकांतरावाकडे बघून ती म्हणाली
"तलवारबाजी गोल्ड मेडलिस्ट.....2019"
मायरचा वेग मंदावला होता तिच्या हातून तलवार गळून पडली अंजलीने तिच्याकडे रागाने बघत तलवारीने तिचा हात तोडला तशी ती खाली कोसळली....अशक्त होऊ लागली....काही वेळातच मायरा हवेत विरून गेली होती....लडखडत तलवार जमिनीवर घासत अंजली चंद्रकांतरावांच्या जवळ पोहोचली आणि म्हणाली
"मी सांगितलं नव्हतं.....चुकीच्या मुलीबरोबर पंगा घेतला तू"
चंद्रकांतरावांना कळलं होतं की पुढे काय होणार आहे त्यामुळे विरोध करणे निरर्थक होते अंजलीने व्हीलचेअरवर बसलेल्या चंद्रकांतरावांच्या छाताडावर पाय दिला आणि सगळी शक्ती एकवटून आपल्या हातातील धारदार तलवार चंद्रकांतरावांच्या छताडातून आरपार केली....चंद्रकांतरावांचे विव्हळणे बघून अंजली खुश होत होती.....त्याच्या तोंडातून रक्त निघत होतं....अंजली त्याच्या छातीत घुसलेली तलवार आडवी तिडवी फिरवून त्यांना अजून तडपवत होती....व्हीलचेअर खाली रक्ताचा ओघळ वाहून संगमरवरी फरशी लाल करत होत......चंद्रकांतरावाची हालचाल थंड झालेली बघून अंजलीने त्यांच्या छातीत घुसलेली तलवार ओढून बाहेर काढली.....अंजली आता कमालीची सुखावली होती एक आनंदाचा भाव तिच्या चेहऱ्यावर होता अंजली बाजूच्या सोफ्यावर बसली तिथेच तिला झोप लागली....तिला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती......अंजली उठली....चंद्रकांतरावांची बॉडी तशीच पडली होती.....तिने बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली....चंद्रकांतरावांच्या रक्ताने तिचा एक हात लालभडक झाले होते.....अंघोळ करून आल्यानंतर तिने त्या आलिशान महलाकडे बघितलं......
हे सगळं बनवणाऱ्या मालकाला ठार तर केलं पण इथून बाहेर कसं पडायचं???....चंद्रकांतरावाबरोबर इथून बाहेर पडण्याची किल्ली सुद्धा गेली होती....हे अंजलीला माहीत होतं...तरी तिने चंद्रकांतला मारून टाकले....कारण तिने मनोमन हेच ठरवलं होतं....आणि अंजलीचा नियम होता एकदा ठरलं की मागे सरायच नाही....पण इथून बाहेर कसं पडायचे?...मोठा प्रश्न होता....तिने जेव्हा आपला हात कापून घेतला होता तिथे तिला एक मंद आवाज आला होता की "मुक्ती....मुक्ती" असा.....कदाचित त्या गुहेतल्या सैतानाला चंद्रकांतरावाने प्रसन्न करून इथेच बांधून ठेवलं असेल आणि आता त्या सैतानाला मुक्ती हवी असेल.....पण द्यायची कशी??......अंजलीला काहीच सुचत नव्हतं..ती चंद्रकांत प्रमाणे तांत्रिक तर नव्हतीच...ती आता ह्या मायाजाळात अडकून होती.....कदाचित कायमची
तिने एक विचार केला बाहेर जाऊन थोडी माती आणली.....त्यात पाणी टाकून तिने आपलं काम सुरू केलं.....तिच्या घरात जशी गणपतीची मूर्ती तिने बनवली होती तशी तिने बनवायला सुरू केली....ती बनवताना नेहमीप्रमाणे अथर्वशीर्ष,गणेशस्तोत्र पठण तिचे चालूच होते.....एका हाताने तासाभरात गणपतीची एक छोटीशी सुबक मूर्ती तयार झाली....त्यावर तिने फुल आणि दुर्वा अर्पण केल्या.....तिला जाणवलं की गणपतीच्या पूजेने त्या महलातले कोंदट मळभ आणणारे वातावरण हटून थोडं प्रसन्न वातावरण तयार झाले आहे.....तिच्या डोक्यात एक कल्पना आली.....तिने ती छोटी दुपारपर्यंत सुकलेली मूर्ती घेऊन त्या अंधाऱ्या हॉल मध्ये प्रवेश केला.....ती अखंड गणपतीचे नाव घेत चालत होती....त्या गुहेजवळ ती आली आणि मूर्ती सोबत प्रवेश करताच तिथून लाल रक्त टपकने बंद झाले.....अंजली आता गणपतीची मूर्ती घेऊन त्या लाल राक्षसी मूर्तीजवळ पोहोचली एकावर एक दगड रचून तिने राक्षसी मूर्तीच्या समांतर उंचीचा कट्टा बनवला आणि त्यावर ती गणपतीची मूर्ती राक्षसाच्या बरोबर समोर ठेवली.....काही होईल न होईल माहीत नव्हतं.....पण एक प्रयत्न म्हणून तिने हा प्रयोग केला शेवटी गणपती म्हणजे सगळ्या गणांचा अधिपती.....कदाचित काही चमत्कार होईल....असा विचार चालू असतानाच तिथली जमीन थरथरू लागली....एखादे चक्रीवादळ यावे आणि छोट्या झोपड्या त्यातून उडून जाव्यात तसे त्या गुहेचे दगड हवेत उडून वर जात होते....तीव्र उजेड पसरला होता अंजली त्या भूकंपात स्वतःला सावरत एका दगडाचा आधार घेऊन उभी होती तिने बघितलं की ती राक्षसी मूर्ती एखाद्या मेणबत्ती सारखी विरघळत आहे....त्यातून एक लख्ख प्रकाश बाहेर पडून ठराविक अंतरावर जमा होत आहे....त्या सगळ्या भयानक वातावरणात अंजली त्या प्रकाशाकडे बघत होती त्यात तिला एक मानवी आकार दिसला तो एका साधुसारखा दिसत होता अंजलीकडे बघत तो हात जोडून उभा होता....त्या साधूच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते....तो जणू अंजलीचे आभार मानत होत....त्याला इथून मुक्ती मिळाली होती....तिकडे अंजलीचे लक्ष आपल्या शरीराकडे गेलं....इथल्या दगड धोंड्या सोबत आणि त्या आलिशान महालासोबत ती सुद्धा हवेत विरघळत होती.....एखाद्या राखेच्या ढिगाऱ्याला जोराच्या वाऱ्याने उडवून आपल्यासोबत न्यावे तस काही होत होतं
अंजलीचे डोळे उघडले.....ती एका झाडाखाली होती वरून झाडांच्या फांद्यातून येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर आदळत होता....अंजली ताडकन उठून बसली....बाजूला एक हायवे होता तिथून गाड्यांची ये जा सुरू होती.....ती जिथून गायब झाली होती परत तिथेच आली होती....बाजूला तिची बुलेट उभी होती.....तिने आपल्या हाताकडे बघितलं.....तिचा तिने तिथे मायाजाळात कापलेला डावा हात तिला परत मिळाला होता....तिने दोन्ही हातांच्या हालचाली करून बघितल्या.... डावा हात तिला जड वाटत होता त्यावर त्या सैतानी मूर्तीची छोटी आकृती एखाद्या टॅटू प्रमाणे उमटली होती....तो हात त्या सैतानाने तिला परत दिला आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी असेल कदाचित.....पण अंजलीला आपल्या डाव्या हातात कमालीची ताकत जाणवू लागली.....जस की ती तिची भारी भरकम बुलेट गाडी त्या डाव्या हाताने सहज उचलेल.....अंजलीने बाजूचा एक मोठा तळहाता येवढा दगड उचलला आणि आपल्या डाव्या हाताने कुस्ककरू लागली....ताकत तर आली होती.....काळ्या मजबूत दगडाची तिने फक्त डाव्या हाताने कुस्करून पीठ केलं होतं....एक अमाप शक्ती तिच्या डाव्या हातात आली होती.....पण अंजली स्वतःला परत ह्या जगात पाहून खुश होत होती....तिने हात जोडून आकाशाकडे बघत गणपतीचे आभार मानले आणि बुलेट ला किक मारून घराकडे रवाना झाली.......(समाप्त)
