ROLEX

भाग क्र :- १

(ह्या कथेचे एकुण दोन भाग आहेत....दोन्ही एकत्र पोस्ट करत आहे....दुसऱ्या भागाची लिंक हा भाग वाचून झाल्यावर मिळेल)
शिळ्या भाकरीचा तुकडा मोडत चव नसलेल्या पातळ भाजीत बुडवत मोबाईल वर स्क्रोलिंग करत राहुल जेवत होता.....त्याचे आईवडील दोघेही लागोपाठ त्याला टोमणे देत होते....रस्ता बांधताना रस्त्यावर खडी फोडण्याचे काम करणारे त्याचे आईवडील दोघेही अक्षरशः राहुलला झापत होते....त्यांचे शब्द एखाद्या हातोडी सारखे राहुलच्या मनाला बडवत होते...तरीही तो शांत होता...12 वी चे शिक्षण संपवून राहुल काहीतरी शेअर मार्केटचा कोर्स करत होता....दुपारी एक छोटा अकौंटिंगचा जॉब करून स्वतःचा खर्च स्वतः भागवत होता.....त्याच्या वयाच्या पोरांचा कष्टाचा पैसा घरात पोहचत होता पण राहुल ने कमाई म्हणून 1 रुपया देखील आईवडिलांच्या हातात ठेवला नव्हता....त्याचा सगळा खर्च त्या कोर्स मध्ये जाई पैसे कमी पडल्यामुळे त्याने थोडी उधारी सुद्धा केली होती.....त्याच उधारी वसूल करणाऱ्यांच्या घिरट्या राहुलच्या घरासमोर वाढू लागल्याने आज राहुलचा बाप दोन पेग जास्तीचे लावून आज राहुलला त्याच्या आईसमोर झापत होता....एखादी घाणेरडी शिवी बापाच्या तोंडून ऐकून राहुलची मूठ आवळली जाई पण "आता ही वेळ नाही" असा मनाला दिलासा देऊन तो शांत बसत असे....रस्त्यावर घामाच्या धारात भिजून शरीराचा सापळा झालेला बाप बघून त्याने ठरवलं होतं की आपलं आयुष्य असे असता कामा नये....म्हणून त्याची स्वप्ने मोठी होती.....आपल्या अडाणी आईवडिलांना आपली स्वप्ने कधीच कळणार नाहीत म्हणून राहुल शांत होता....घरातले नावडते जेवण आणि ते गिळताना आईवडिलांच्या शिव्या सगळं काही तो नाईलाजास्तव पचवत होता.....जेवून झाल्यावर त्याने आपल्या घराच्या अंगणात बसून त्याचे प्रोफाइल उघडलं.....जून महिना असल्याने थोडं मान्सून वारे वेगाने वाहत होते त्यात त्याच्या घरचा भिंतवजा पत्रा कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र आवाज करत वाजत होता....राहुलने एक नजर आपल्या घरावर मारली पत्र्याचे ते सो कोल्ड घर कधीही एका मोठ्या वादळाने गायब व्हायच्या तयारीत होतं....त्या घराकडे दुर्लक्ष करून त्याने "रोलेक्स प्रधान" ही त्याची आवडती id उघडली......तो राहुलसाठी रोलमॉडेल होता
रोलेक्स ह्या टोपण नावाने धुमाकूळ घालणारे अनिल प्रधान हे नाव अगदी अल्पावधीत म्हणजे 10 ते 15 वर्षात पूर्ण जगभर प्रसिद्ध झालं होतं...जगप्रसिद्ध रोलेक्स ह्या घड्याळाचे वेड आणि मोठं कलेक्शन असलेला अनिल स्वतःला रोलेक्स म्हणवून घेत होता...रोलेक्स उर्फ अनिल प्रधान एक 50 वर्षीय टॉपचा बिझनेसमन होता.....15 वर्षांपूर्वी एक साधा कामगार ते भारतातील टॉपचा बिझनेसमन हा रोलेक्सचा प्रवास थक्क करणारा होता.....कोणत्याही क्षेत्रात हात घालताच त्याला फक्त आणि फक्त यशच हाती लागत होतं.....भारतात तो एक "अघोरी बिझनेसमन" म्हणून फेमस होता......रोलेक्सवर अनेक उलटसुलट टीका झाल्या होत्या की तो एखाद्या बिझनेस मध्ये येताच बाकीचे प्रतिस्पर्धी बरबाद व्हायला सुरू होतात आणि इकडे रोलेक्स मोठा होऊ लागतो....त्याच्याकडे कोणतीतरी अमानवी शक्ती आहे ज्याने तो समोरच्याला शोषून घेऊन मोठा बनतो.....त्याच्यावर अश्या अनेक टीका झाल्या होत्या...आता ह्या टीका करणारे तेच भविष्य सांगणारे वैगेरे होते त्यामुळे त्यांचे कुणी मनावर घेतलंच नाही...रोलेक्स इतका घातकी आहे इतका सनकी आहे की त्याचे स्वतःचे कुटुंब त्याच्यापासून दूर राहून मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहे...असंही काहींचं म्हणणं होतं..अरबपती माणसाची बायका मुले काम करून आपलं पोट भरतात पण रोलेक्स त्यांचा जराही विचार करत नाही......तो एका वेगळ्याच दुनियेत होता एक अशी भोगविलासी दुनिया ज्यामध्ये त्याला कुणाचीही फिकीर नव्हती.....त्यांच्या आसपासच्या म्हणजे त्याच्या गरिबीत साथ असणाऱ्या लोकांचे असे म्हणणे होते की जेव्हापासून त्याच्याकडे पैसा आला आहे तेव्हापासून तो खूप बदलला आहे.....
रोलेक्सची शरीरयष्टी सामान्य होती.....त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे होती ती झाकण्यासाठी तो नेहमी काळे गॉगल्स वापरायचा......एकदम लक्झरी लाईफ....सगळ्या महागड्या वस्तू,गाड्या पण त्याची खरी ओळख होती ती म्हणजे त्याच्या दोन्ही हातात असलेली दोन रोलेक्स घड्याळे.....उजव्या हातात जे सोन्याचे रोलेक्स होते तो ते कधीही काढत नव्हता पण डाव्या हातातली घड्याळे तो रोज रोज चेंज करत असायचा......रोलेक्स घड्याळाची किंमत सुद्धा करोडो मध्ये होती पण एक मोठे कलेक्शन त्याने आपल्या जवळ ठेवले होते.....जस रोलेक्स प्रधान आपल्या श्रीमंती आणि चढत्या आलेखामुळे भारतात नेहमी चर्चेत होता तसा तो खूप वादग्रस्त सुद्धा होता.....जस की दारू पिऊन गाडी चालवणे....एक दोघांना गाडीने उडवणे दोन तीन महिलांनी सुद्धा त्याच्यावर बलात्काराच्या केसेस टाकल्या होत्या.....पण पण पण दोषी असून सुद्धा ह्या सगळ्यातून तो सहीसलामत बाहेर पडला होता....ह्याचे कारण?? माहीत नाही.....त्यात साक्षीदार फिरले,फिर्यादिनी केसेस मागे घेतल्या....कश्या?? काहीच माहीत नाही.....असा हा बेदरकार रोलेक्स प्रधान....बाई,बाटली सोबत अनेक ऐशोआराम भोगून आरामात आपले जीवन जगत होता.....त्याचे वागणे थोडे विक्षिप्त होते.....त्याच्या डोळ्यात बघितलं तर एवढी सुखं आजूबाजूला असूनही तो नेहमी अतृप्त वाटे...त्याच्या हातावर ब्लेडने मारल्यासारख्या खुणा होत्या...नेहमी उदास भकास चेहरा कधी कधी तो खुश आहे दाखवण्यासाठी हसण्याचा केलेला प्रयत्न खोटा वाटे.....रोलेक्स दर आठवडी परदेशी मौज मज्जा करायला जायचा तिथे जाऊन महागड्या दारू,मुली ह्यातच तो कोट्यवधी रुपये उडवत असे.... आपण केलेली मज्जा जगाला दाखवण्यासाठी तो इन्स्टाग्राम वर पोस्ट करायचा.....तिथे अनेक लोक त्याला शिव्या द्यायचे पण राहुल मात्र नेहमी त्याची तारीफ करायचा......4,5 अर्धनग्न रशियन मुलींच्या घोळक्यात बसलेला रोलेक्स त्याला आदर्श वाटत होता......जिंदगी अशीच पाहिजे असं त्याचं स्पष्ट मत होतं
"त्याने ते कमावले आहे ते तो कसं खर्च करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे....आणि जे लोक त्याच्यावर जळतात तेच त्याच्यावर टीका करतात" असा काहीसा बचाव राहुल रोलेक्सचा करत असे
त्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सच्या मध्ये राहुलची रोलेक्ससाठी पॉझिटिव्ह कमेंट असायची.....राहुल रोलेक्सला फक्त सोशल मीडियावर फोल्लो करत नव्हता तर रोलेक्सला राहुल अभ्यासत होता.....कमी वेळात तो एवढा यशस्वी कसा झाला?? पण काही केल्या ह्याचे उत्तर राहुलला सापडत नव्हते.....श्रीमंत होण्यात अनेक पिढ्या खर्ची घातल्यापेक्षा रोलेक्स सारख झटपट श्रीमंत कसं होता येईल हे तो शोधत होता.....पण काहीच पत्ता लागत नव्हता.......
राहुलचे दिवस रोलेक्सला असच ऑनलाइन बघण्यात आणि त्याचा हेवा वाटण्यात चालले होते.....प्रसंगी निघेटिव्ह कमेंट्सवर तो रोलेक्सच्या बाजूने वाद देखील घालत होता....सोबत रोलेक्सवर त्याची रिसर्च सुद्धा चालू होती....रोलेक्स काय आपलं सिक्रेट सांगणार नाही हे त्याला माहित होतं.....त्याची लाइफस्टाइल राहुलला आवडत होती....त्या लाइफस्टाइल मधून तो कुठे आपल्याकडे लक्ष देणार?? अशी स्वतःची समजूत काढून तो शांत राहत असे....एके दिवशी रोलेक्स ने एका अमेरिकन बिकिनी गर्ल सोबतचा फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केला होता त्यावर राहुलने कमेंट देखील केली होती...आणि प्रथमच स्वतः रोलेक्सने त्या कमेंटला लाईक केलं होतं....हे बघून राहुल अक्षरशः उडाला होता....
"तो एवढा मोठा माणूस....आपली कमेंट कश्याला लाईक करेल?? त्याच्या कुणी स्टाफने लाईक केली असेल माझी कमेंट"
असा विचार करून त्याने हा विषय तिथेच सोडला होता.....पण दुसऱ्या दिवशी एक DM त्याला दिसला.....खुद्द त्याचा रोलमॉडेल असलेल्या रोलेक्स प्रधानने त्याला मेसेज करून hiii केलं होतं.....तेव्हा मात्र राहुल उडालाच होता....त्याला विश्वासच बसत नव्हता की रोलेक्सने आपल्याला मेसेज केला आहे.....
hiii
hello sir.....मी राहुल
are ho mazya post khali tuzi comment aste
हो सर....तुम्ही माझे रोलमॉडेल आहात.....मला तुमच्यासारखं बनायचं आहे....मला विश्वासच बसत नाही की तुम्ही मला मेसेज केला
ho....i am impressed....tu kayam mazya post var positive comment kart asto....mazi tarif krt asto....nahitr bakiche madrxxx sale.....barobri karta yet nahi mhanun shivya ghaltat mla
हो सर...मला वाईट वाटत खूप....एवढ्या मोठ्या माणसाला हे लोक कसं काय नावं ठेवू शकतात....??.....हे अपयशी लोक आहेत सर तुम्ही लक्ष देऊ नका
nahi re....i don't fuxxing care....pan tuza swbhav aavdla mla....tula bhetaychi ichha aahe mazi.....
(हे वाचून राहुल थक्क झाला)
मला??....पण सर तुम्ही तर परदेशात आहात ना?
ohhh nahi mi yenar aahe mazya farm house var parva divshi rampur madhe....tithe bhetu shkshil ka?
रामपूर??....ते कोकणात आहे तेच का??
ohhh yes yes.....mi tula address pathvto aani tuza mobile number de kahi paise sudha pathvto tuzya pravas kharcha sathi....
राहुलने घाईघाईने आपला मोबाईल नंबर सेंड केला.....त्याचे रोलेक्सला भेटायचे स्वप्न पूर्ण होणात होते....पुढच्या क्षणी त्याचे डोळे विस्फारले......रोलेक्सने तब्बल 1 लाख रुपये त्याच्या खात्यावर पाठवले होते....राहुलचे डोळे विस्फारले एवढी मोठी रक्कम त्याच्या खात्यावर बघून तो तर हवेतच होता....त्याच्या तोंडून मोठ्याने एक वाक्य बाहेर पडले
"ह्याला म्हणतात रॉयल माणूस"
रोलेक्स विषयी राहुलच्या मनात आदर अजून वाढला होता....त्याला कधी एकदा भेटतो अस त्याला झालं होतं....तो राहुल वर इम्प्रेस तर होताच कदाचित आपले आयुष्य सुद्धा मार्गी लावील ह्या आशेने राहुल बेचैन झाला होता अखेर भेटीचा दिवस उजाडला....राहुल ट्रेनने कोकणच्या दिशेने निघाला....तिथे पोहोचायला त्याला रात्र होणार होती......रामपूरच्या रेल्वे स्टेशनपासून ते ठिकाण 2 km अंतरावर होते....रोलेक्स मॅप सेंड केला होताच......ते रेल्वे स्टेशन अगदी समुद्र किनाऱ्याच्या जवळ होतं.....त्या स्टेशनवर कुणीच दिसत नव्हतं....थोडं फार अंधारून आलं होतं....रात्र होत होती आभाळ गच्च दाटून आलं होतं.....बारीक थेंब पडत होते पाऊस सुरू व्हायच्या आत रोलेक्सच्या फार्म हाऊस वर पोहोचायचं राहुलने पक्क केलं होतं.....स्टेशन बाहेर येताच राहुल थोडा थबकला.....शहरात वाढलेला तो....स्टेशन बाहेर चिटपाखरूही नव्हतं....एक लाईट ती ही मर्यादित प्रकाश देत होती......आजूबाजूला मिट्ट काळोख पडला होता.....त्याने मोबाईल चेक केला रोलेक्सने दिलेले गुगल मॅप लोकेशन 1.8 km दाखवत होतं पण इथे रिक्षा वैगेरे कसलीच भानगड नव्हती....आजूबाजूला माणूस सुद्धा दिसत नव्हता.....पावसाळा असल्याने पानांची सळसळ टीप टीप पडणाऱ्या पाण्याचा आवाज वातावरण अजून गंभीर करत होत.....त्या स्टेशनवर काही वेळ थांबून शेवटी वैतागून राहुलने चालत जाण्याचा निर्णय घेतला.....8 वाजत आले होते.....ठीक 9 वाजता रोलेक्सने बोलवले होते त्यामुळे वेळ घालवणे ठीक नव्हते....त्यात रोलेक्स कुणी सामान्य माणूस नव्हता......मॅपचा आधार घेत एक छोटा रस्ता तुडवत राहुल चालू लागला.....लाईटीच्या बल्बने आता साथ सोडली होती गर्द अंधारात वाट काढून पुढे जायचं होतं राहुलने मोबाईलची टॉर्च ऑन केली....डांबरी रस्त्याने साथ कधी सोडली हे राहुल तेव्हा कळलं जेव्हा त्याचे पाय चिखलात रुतत चालले होते.....दोन्ही बाजूला गर्द झाडी.....थोडासा आवाज आणि राहुलच्या मोबाईलचा टॉर्च तिकडे फिरलाच.....पाऊस हळूहळू वाढत चालला होता उतारावरून येणारे पाणी राहुलच्या पायाला स्पर्श करून खाली जात होते.....पानांची सळसळ थोडी अमानवी वाटत होती जणू कुणी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहुलचा पाठलाग करत आहे....राहुल थोडा घाबरला होता कारण ह्या अश्या वातावरणाचा तो पहिल्यांदाच सामना करत होता......चिखलामुळे त्याचे पाय जड झाले होते तरीही सर्व आपली सगळी शक्ती एकवटून वेगाने पाऊले टाकत होता सोबत त्याच्या मागे झाडातून येणारा तो आवाज सुद्धा झाडे बदलत त्याचा पाठलाग करत होता.....राहुलची धडधड वाढली होती.....पैशाचा श्रीमंतीचा लोभ ह्या वातावरणात तो क्षणभर विसरला होता.....अचानक त्याची नजर मोबाईल स्क्रीनवर गेली.....मोबाईलची रेंज पूर्णपणे गायब झाली होती.....95 टक्क्यावर असलेली त्याची बॅटरी फक्त 10 मिनिटात 30 टक्क्यावर आली होती.....पावसामुळे थंडी एवढी वाढली होती ती राहुलचे दातावर दात आपटत होते......तरीही तो चालत होता.....त्याच्या पायात काहीतरी अडखळत होते राहुल घाबरून चालत होता.....अचानक त्याचा वेग मंदावला कुणीतरी त्याचा पाय पकडल्यासारखे त्याला जाणवले.....राहुलची टॉर्च लगेच त्याच्या पायाकडे वळली एक काळं काहीतरी त्याच्या पायाभोवती गुंडाळले होते....एखाद्या काळ्या कापड्यासारखं ते काय होतं हे समजण्याच्या आतच त्या काळ्या गोष्टीने राहुलच्या पायाला हिसडा देऊन त्याला खाली पाडलं....राहुल धपकन खाली पडला....त्याचा मोबाईल खाली पडला त्याच्या उजेडात त्याला अंधुक काहीतरी दिसत होतं.....काहीतरी त्याच्या अंगावर चढत होतं....त्याचे लालसर डोळे अंधारात अस्पष्ट दिसत होते......धपकन चिखलात काहीतरी जोरात आपटलं जावं असा आवाज झाला काहीतरी जोरात त्याच्या मोबाईल वर आपटलं होत....कदाचित एखादा मोठा दगड किंवा....किंवा एक मोठा हात!!!.....कारण त्या उजेडात त्याला तसाच आकार दिसला होता अमानवी हाताचा.... त्या आघातानंतर त्याच्या मोबाईलचा उजेड अचानक गायब झाला होता....गायब झाला की केला?? काहीच कल्पना नव्हती.....एखादी चादर अंगावर ओढली जावी तस काहीसं चिकट राहुलच्या अंगभर पसरत होतं.....त्यातून हात पाय झटकून तो आपली सुटका करून घेत होता.....जोराने किंचाळत मदत मागत होता....पण तिथे पानांची सळसळ आणि पाण्याची खळखळ याशिवाय दुसरा आवाजच नव्हता....जिवाच्या आकांताने राहुल ती चिकट चादर दूर करत होता तो पूर्ण चिखलाने माखला होता.....अखेर त्याने आपल्या हाताने ओढून ओढून तो चिकट पदार्थ बाजूला केला आणि जिवाच्या आकांताने त्या काळ्या मिट्ट अंधारात पळत सुटला.....कुठं जावं त्याला काहीच सुचत नव्हतं....पायात येणारे दगड पाय सोलवटून काढत होते त्याच्या पायातील चप्पल कधीच त्या चिखलाने गिळंकृत केली होती......तो धावत होता तशी मागून येणारी सळसळ त्याचा पाठलाग करीत होती.....ते जे काही होतं त्याला आवाज नव्हता पण ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना त्याचे अस्तित्व स्पष्ट जाणवत होते.....एका खोचक दगडाने राहुलचा पाय रक्तबंबाळ केला होता पण त्याच्या डोक्यावर जे वावरत होतं त्याच्याभीतीने त्याची जखम राहुलच्या लक्षात सुद्धा आली नाही.....कुठे पळावे??.....काय करावे???......जे वरून घिरट्या घालत आहे त्याने झडप घेतली तर?? त्याच्याशी कसा सामना करावा??? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन राहुल चाचपडत पळत होता अचानक त्याला आकाशात दोन शार्प लाईट्स दिसल्या....एक लाल एक पिवळी.....कदाचित रोलेक्सचे घर तिथे असावे.....त्या आकाशातील शार्प लाईट्सच्या दिशेने राहुल वेगाने धावत होता.....धापा टाकत टाकत पळत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलले......एक भली मोठी जवळपास 15 फूट पांढरी भिंत दिसत होती.....भिंतीच्या मागे काय आहे ह्याचा जराही अंदाज येत नव्हता.....त्या भिंतीबाहेर थोडा उजेड होता त्यामुळे ती स्पष्ट दिसत होती राहुल त्या भिंतीच्या दिशेने धावला....ओबडधोबड रस्त्याची जागा आता मैदानाने घेतली होती त्यावर धावत तो ह्या भिंतीजवळ पोहोचला एक गेट जे उघड होतं त्या गेटमधून राहुल सरळ आत घुसला.....समोरचं दृश्य बघून तो जागेवर थबकला.....त्या भयानक जीवघेण्या झाडीत एक आलिशान बंगला उभा होता.....शहरात राहून सुद्धा इतका आलिशान बंगला राहुलने कधी बघितला नव्हता.....बंगल्याच्या रंगीबेरंगी लाईट्स एकदम पॉश वाटत होत्या....आता तो बंगला रोलेक्सचा आहे हे सांगायची गरज नव्हती.....तो आलिशान बंगला आपला मालक किती मोठा आहे याची साक्ष देत होता......राहुल एकटक त्या बंगल्याकडे बघत राहिला....हेच त्याला पाहिजे होत.....श्रीमंती.....किती भारी असत ना ह्या श्रीमंत लोकांचं?? पाहिजे ते करता येतं......कधी परदेशात मौज तर इथला हा सुखवस्तू एकांत......असे अनेक विचार गेट वर उभं राहून घोळवत असताना समोरून एक मोठा आवाज आला
"अरे राहुल बाहेर काय करतोस?? आत ये"
रोलेक्सने दाराच्या बाहेर असलेल्या स्पीकरमधून राहुलला आवाज दिला....तसा तो दचकला आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागला....काचेच्या भिंती असलेलं हे घर बाहेरून आतलं सगळं वैभव स्पष्ट दिसत होतं.....दारात रोलेक्स उभा होता.....राहुल ज्याला केवळ सोशल मीडियावर बघत होता तो रोलेक्स प्रधान त्याच्या समोर उभा होता......राहुलने एकवार स्वतःकडे बघितले तो चिखलाने माखला होता.....पहिलं इम्प्रेशनच खराब पडणार होतं.....तिकडे रोलेक्स दाराला टेकून उभा होता.....त्याच्या दोन्ही हातातील सोन्याची रोलेक्स घड्याळे चमकत होती.....राहुलला त्याच्या घड्याळाचे आकर्षण होते.....त्या घड्याळाकडे बघत बघत राहुल रोलेक्स समोर उभा राहिला....त्याचा अवतार बघून त्याला कोणतेही कारण न विचारता रोलेक्स त्याला म्हणाला
"बाथरूम डावीकडे आहे....तिथे शॉवर घेऊन ये....आणि ऐक त्या कपाटात माझे काही कपडे आहेत ते घालून ये मी वेट करतो"
राहुल त्यावेळी काहीही न बोलता गपचूप बाथरूमच्या दिशेने गेला.....बाथरूम मध्ये जाताच आतले आलिशान बाथरूम बघण्यात त्याला 15 मिनिटे गेली.....अनेक वस्तू तर त्याने जन्मात बघितल्या नव्हत्या....तिथल्या मोठ्या आरश्यात तो स्वतःला न्याहाळत होता.....अंघोळ करून टॉवेल लावून तो बाहेर आला आणि रोलेक्सने दाखवलेल कपड्याचे कपाट उघडले.....राहुल थक्क झाला.....रोलेक्सची लाइफस्टाइल तो जवळून अभ्यासात होता तिथल्या एका एका शर्टाची किंमत एक एक लाख होती.....तेवढा त्याचा वर्षाचा इन्कम होता तेवढा....तिथले सगळे शर्टस महागडे होते त्यातला एक शर्ट अंगावर चढवून तो हॉल मध्ये आला.....रोलेक्स आपल्या आलिशान खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि त्याने राहुलला मिठी मारली तो काही बोलायच्या आतच रोलेक्स आपल्या खास अंदाजात म्हणाला
"nice to meet you mr rahul"
"लोकांना वाटत मी माझ्या पोस्टच्या कमेंट वाचत नाही पण तस नाही....मी नेहमी लोकांच्या कमेंट्स वाचतो.....त्यांना माझ्यावर जळताना बघून खुप मज्जा येते मला.....एवढ्या सगळ्या गाढवांच्या गर्दीत तूच माझी तारीफ करतोस"
रोलेक्सला थांबवत मधेच राहुल म्हणाला
"अरे सर....तारीफ कसली त्यात.....you are my rolemodal.....माझं एक स्वप्न आहे की तुमच्यासारखं मोठं काहीतरी करावं"
रोलेक्सने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला
"का नाही.....मी मदत करतो तुला मोठं होण्यासाठी.....पण ह्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील.....कोणत्याही थराला जावं लागेल....मी सुद्धा गेलो आहे"
ह्या वाक्यानंतर रोलेक्सच्या चेहऱ्यावर वेगळेच गंभीर भाव उमटले.....तो राहुलच्या डोळ्यात बघत बोलला
"एक कमालीचा लोभ तुझ्या डोळ्यात मला दिसत आहे.....पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी....बरोबर ना???"
अचानक बदललेली रोलेक्सची भाषा बघून राहुल थबकला..काय बोलावे त्याला समजेना..."अ.....हो.....हो"
एवढंच त्याच्या तोंडून बाहेर पडलं तसा रोलेक्स हसला
"अरे मग घाबरतोस काय एवढं......चल तुला माझ्या श्रीमंतीच रहस्य दाखवतो"
अस बोलून राहुलच्या खांद्यावर हात टाकून रोलेक्स त्याला घेऊन जाऊ लागला
"श्रीमंतीच रहस्य???"
हा काहीतरी वेगळा प्रकार राहुलला वाटत होता.....पण रोलेक्स सोबत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.....बंगल्याच्या एका कोपऱ्यात एक अंधार कोपरा होता..आलिशान बंगल्याचा तो भागच वाटत नव्हता..तिथल्या भिंतीला कलर नव्हता.....त्या कोपऱ्यातून एक जिना तळघरात जात होता.....एक एक पायरी उतरून रोलेक्स खाली जात होता......त्याच्या मागोमाग राहुलसुद्धा एक एक पायरी उतरत होता.....जस जस राहुल पायऱ्या उतरून खाली जात होता तसा तसा एक कुबट सडका वास त्याच्या नाकात शिरत होता......तो वास राहुलला थोडाफार परिचित असल्याने तो आता प्रचंड घाबरला....त्याच्या घराजवळ एक कत्तलखाना होता तिथून येणाऱ्या सडक्या मासाचा आणि रक्ताचा वास तसाच हा वास येत होता....काय असेल ह्या तळघरात???......काही घातपात???......राहुल तिथे एकटा आला होता....रोलेक्सने सांगितल्याप्रमाणे आपण इथे येत आहोत हे त्याने कुणालाही सांगितलं नव्हतं.....आणि मुख्य म्हणजे त्याचा मोबाईल??मोबाईल तर 2 किलोमीटर आधीच बंद पडला होता की पाडला होता??.....हा एक सापळा तर नसेल?? अनेक प्रश्न राहुलच्या मनात होते.....पण करोडोपती असलेला रोलेक्स आपल्याला काय करेल?? हा दिलासा तो स्वतःला देत होता पण त्या तळघराची एक एक पायरी उतरत असताना खालच्या अंधारातून येणारा तो कुबट वास राहुलला धडकी भरवत होता...........(क्रमशः)

दुसऱ्या भागाची लिंक


