प्रस्तावना-
स्वप्नं नेहमीच माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहेत.
लहानपणापासूनच, मी रात्रींच्या अंधारात विचित्र, भयभीत करणारे, आणि थरारक आणि कधी कधी अध्यात्मिक स्वप्नं अनुभवली आहेत. ही स्वप्नं फक्त एका रात्रीची घटना नसून, ती माझ्या आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकणारी होती. त्या स्वप्नांनी माझ्या मनावर, विचारांवर, आणि भावनांवर एक ठसा उमटवला आहे. प्रत्येक स्वप्नाने मला एका नवीन जगात नेले, जिथे वास्तव आणि अवास्तव यांच्यातील सीमा हरवत गेली. काही स्वप्नं इतकी भयानक होती की मी जागे झाल्यावरही त्यांची छाया माझ्या मनावर राहिली, तर काही इतकी गूढ आणि आकर्षक होती की त्यातील रहस्ये उलगडण्याची माझी तीव्र इच्छा होती. ह्या सर्व अनुभवांनी मला एक लेखक बनवण्याची प्रेरणा दिली.
आज मी तुम्हाला लघुकथांच्या माध्यमातून त्या स्वप्नांच्या दुनियेत नेऊ इच्छितो. प्रत्येक स्वप्नाला एक कथा आहे, आणि या कथांना शब्दांमध्ये गुंफून मी तुम्हाला त्या अद्भुत आणि भयानक जगाचा अनुभव देऊ इच्छितो. माझ्या लहानपणापासून अनुभवलेल्या या स्वप्नांना मी लघुकथांच्या रूपात साकारत आहे, ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या भावनांचे स्पर्श आणि गूढतेचे पदर अनुभवता येतील.या संग्रहात तुम्हाला भय, थरार, आणि गूढतेने भरलेल्या कथांचा आनंद मिळेल. माझ्या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला त्या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात डोकावता येईल. चला, या अज्ञाताच्या प्रवासात माझ्यासोबत सहभागी व्हा, आणि स्वप्नांच्या या अद्भुत जगाचा आनंद घ्या! 

__________
"अमानवी बाळ"
तारीख - ८ जुलै २०१२
वेळ - ०२:१६ ते ३:०० अंदाजे
-----
मला हे स्वप्न पडून एक दशक उलटले असले तरीही ते अजूनपण अगदी काल अनुभवल्यासारखे ठळक आठवते. आणि एकदा नाही तर काही महिन्यांच्या अंतराने २-३ वेळा पडून गेल्यामुळे त्याचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला.
तरी मी अजून विलंब न करता स्वप्न सांगायला सुरूवात करतो.
तर घडले असे की-
रात्री चे नऊ वाजून गेले होते.
मी आजोळी होतो.
मी जरी खऱ्या आयुष्यात नवीन बांधलेल्या घरात राहात असलो तरी मी स्वप्नात जुन्या कौलारू घरात च होतो.
दिवसभर मामाला शेतकामात मदत करून संध्याकाळी घरी आल्यावर अंघोळ करण्याची गरज वाटू लागली.
त्यामुळे मी टॉवेल घेतला, कपाटातून वाळलेले कपडे बाजूला काढून ठेवले आणि बाथरूम मध्ये प्रवेश केला.
त्या बाथरूम चे वर्णन करायचे झाले तर ते खूप जुन्या आणि साध्या पद्धतीचे होते!!
प्रवेशद्वार मोठे आणि लाकडी होते.
आत प्रवेश केल्यावर एक मोठी दगडी बांधकाम असलेली खोली होती, छत हे जाड लाकडी फळ्यांचे होते. आत प्रकाशासाठी एक च साधा बल्ब होता ज्याचा पूर्ण खोलीमध्ये जेमतेम प्रकाश पडायचा.
डाव्या बाजूला जमिनीपासून जरा उंचावर कोपऱ्यात बाथरूम होते ज्याला एका काटकोनी आकाराच्या कमी उंचीच्या भिंतीने इतर खोलीपासून वेगळे ठेवलेले.
बाथरूम पासून पुढे गेल्यावर डाव्या भिंतीला भिंतीतले विना दरवाज्याचे कपाट होते ज्यात बरीच जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रांची रद्दी धूळ खात पडलेली होती.
उजव्या भिंतीला पत्र्याचे जुने डबे एकावर एक रचून ठेवलेले आणि जुन्या लाकडी खुर्च्या आणि इतर छोटे छोटे फर्निचर पडलेले.
वर एक पोटमाळा होता आणि तो किती लांब आहे त्याचा अंदाज न लागण्या इतका तो मोठा आणि अंधकारमय होता.
समोरच्या भिंतीत एक प्रवेशद्वारा इतका च मोठा पण जरासा जुनाट, थोडासा मोडकळीस आलेला दरवाजा होता जो मी आत्तापर्यंत फक्त एकदा च उघडलेला पाहिलेला आणि आत काही किरकोळ अडगळी सोबत एक पणजोबांच्या काळातील वाघाची कातडी ही जपून ठेवलेली होती. त्या दरवाज्याला बाबा आदम च्या जमान्यातील म्हणण्या इतके जुने टाळे लावलेले.
तर मी २ पायऱ्या चढून बाथरूम मध्ये प्रवेश केला. माझा टॉवेल बाजूच्या खुंटीला अडकवून मी अंघोळीला सुरुवात केली. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे त्या थंडगार पाण्याने अंघोळ केल्याने माझ्या शरीराला आणि मनाला खूप आराम वाटत होता. त्या बाथरूमच्या शांत वातावरणात काहीतरी विचित्र घडत असल्याचे मला जाणवत होते पण मी त्याकडे दुर्लक्ष केले.
अंघोळ करत असताना सुरुवातीला माझं लक्ष गेले नाही पण नंतर माझे लक्ष कोपऱ्यात गेले. तिथं एक टाकाऊ वस्तूंनी भरलेले पोते होते आणि त्यात सगळ्यात वर एक अशी वस्तू होती जिने माझं लक्ष वेधून घेतलं. एक फोटो फ्रेम होती ती....
बाळाची!!
फोटो फ्रेममध्ये एक नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे चित्र होते, ज्याचे डोळे बंद होते. त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती.
मी माझी नजर त्या फोटोवरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण का काय माहित माझे मन त्या फोटो फ्रेमकडे ओढले जात होते.
यापुढे जे काही घडले ते माझ्या कल्पनाशक्ती च्या बाहेरचे होते.
अचानक, बाळाने आपले डोळे उघडले.
ते डोळे रक्ताळलेले होते, जणू काही त्यातून रक्तच गळत होते. त्या लाल डोळ्यांमध्ये मला साक्षात माझा मृत्यू दिसत होता. ते माझ्याकडे एका तिरस्कारपूर्ण नजरेने बघत होते, त्याचे दात लांब आणि भयंकर होते. आणि हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र, कर्कश हसणे आले. ते बाळ एका घोगऱ्या आवाजात कर्कश्श हसू लागले. त्याचा आवाज त्या खोलीत घुमू लागल्यामुळे अजून च भयंकर आणि सुन्न करून टाकणारा होता.
ते दृश्य पाहून माझ्या अंगावर शहारा आला. माझं हृदय इतकं जोरात धडधडू लागले की तो आवाज मला माझ्या कानात ऐकू येऊ लागला. माझ्या अंगाला दरदरून घाम आला आणि मनात असंख्य विचारांची वादळं उठली.
ते बाळ हळूहळू माझ्याकडे पुढे येत होते, आणि त्याच्या प्रत्येक हालचालीने माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. एका क्षणी मला हे पण जाणवले की, या स्वप्नातून सुटणे माझ्यासाठी अशक्य आहे आणि हाच माझ्या आयुष्याचा शेवट आहे.
अचानक मी त्या धसक्यातून जागा झालो आणि अंघोळ तत्क्षणी थांबवून धडपडत दरवाज्याकडे धाव घेतली.
माझ्या मनात भीतीने एकच हलकल्लोळ माजला होता आणि मी जिवाच्या आकांताने दरवाजा जोरजोरात ठोठावू लागलो. माझे हात घसरत होते, पाय लटपटत होते.
त्याच्या पावलांचा, त्याच्या त्या घाणेरड्या हसण्याचा आवाज वाढतच चालला होता. त्याचे रक्ताळलेले डोळे अजूनही माझ्यावर खिळले होते. ते त्याचे तीक्ष्ण दात मला ते जीभ दातांमधून पुढं घेऊन एक हिंस्त्र मुद्रा करून दाखवत होते जसं काही एखादा रक्तपिपासू, एका घासत मला गिळून टाकण्याची इच्छा असलेला एक लांडगा च!!
मला बाहेरून आई, मामा आणि आजोबांच्या गप्पा मारण्याचा आवाज येत होता. मी त्यांना खूप हाका मारल्या पण असं वाटत होते की माझा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत च नव्हता.
माझे हृदय अशा वेगाने धडधडत होते की मला वाटले ते त्याच क्षणी माझ्या शरीरातून बाहेर पडेल.
मी अचानक त्या जगातून खेचला गेलो आणि जागा झालो.
माझे हृदय धडधडत होते आणि अंग घामाने भिजलेले होते.
मी किती वाजले हे पाहण्यासाठी माझा भ्रमणध्वनी उघडला तर रात्रीचे ३ वाजून ६ मिनिटे झालेले.
त्यानंतर मला सकाळपर्यंत अजिबात झोप लागली नाही.
त्या स्वप्नाच्या अनुभवानंतर मी त्या जुन्या घराजवळ जाणे बंद केले.
I can say that this nightmare really traumatized me for life!!
- अमोघ बेडेकर