शेवटची इच्छा....
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०३.०६.२०२४
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
......खूप वर्षांपूर्वी मी लहान असताना माझ्या एक आजोबांचे निधन झाले होते, त्यांचे १०, ११,१२ आणि १३ व्याचे कार्य व्यवस्थित पार पडले, परंतु पिंडाला कावळा काही शिवाला नाही, म्हणून शेवटी कंटाळून पूजा करणाऱ्या ब्राम्हणाने दर्भाचा कावळा केला आणि तो पिंडांवर ठेवला तरीही खरा कावळा पिंडाना शिवाला नाही. त्यामुळे माझ्या आजोबांची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिली असणार असे सर्व नातेवाईक बोलत होते. ज्यावेळी खरा कावळा पिंडाला शिवत नाही त्यावेळी प्रतिकात्मक दर्भाचा कावळा केला जातो, आणि त्या कावळारूपी दर्भाच्या साहाय्याने पितरांना सांगितले जाते की आता जर का तुम्ही पिंडाला स्पर्श केला नाही तरी काहीच फरक पडणार नाही कारण आता दर्भाचा कावळा पिंड ग्रहण करणार आहे, म्हणून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या नाहीतर नका येऊ अशी चेतावणी दिलेली असते, आणि ते केल्यानंतर कावळे लगेच पिंडाला शिवतात असे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी कावळ्याना वरदान दिले होते की ज्यावेळी तुम्ही मृत माणसाच्या पिंडाला स्पर्श कराल त्यावेळी ते पिंड अन्न म्हणून त्या मृतात्म्याने ग्रहण केले असून त्याची क्षुधा शांती होऊन तो परलोकी तृप्त, समाधानी झाला आहे असे समजेल. परंतु तशी परवानगी त्या मृताम्याने त्या कावळ्यांना देणे आवश्यक राहील. म्हणजे तो मृतात्मा खरच समाधानी असेल तरच तो कावळ्याला पिंडाला शिवण्याची परवानगी देईल, अन्यथा घास घेण्याची परवानगी नाकारून तो असे दर्शवेल की मी अजून असमाधानी आहे किंवा माझी काहीतरी इच्छा अजूनही अपूर्णच आहे तर ती पूर्ण करा हा संदेश त्या कावळ्याच्या माध्यमातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच पिंडाला कावळा शिवणे अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहे. काही लोक ह्या गोष्टी थोतांड आहे असे मानतात, कावळ्यांना शिकवलेले असते असेही काही हुशार लोक मानतात किंवा कावळ्यांचा तो सहज स्वभाव आहे असे देखील काही लोकांना वाटते. काही काळापूर्वी मला सुद्धा ह्या सर्व गोष्टींमध्ये तथ्य वाटत नसे. परंतु ज्यावेळी हा कावळ्यांचा प्रकार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला त्यावेळेपासून आज पर्यंत मी ह्या सर्व प्रकारचा अभ्यास करण्यासाठी खूप भटकंती केली, कित्येक समाजातील, जाती जमातींतील घटकांचा, प्रथांचा अभ्यास केला, आणि हे करत असताना मला जे काही अनुभव आले अनुभव मी आज ह्या लेखात मांडणार आहे.
.....साधारणतः 20 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. जन्म पत्रिकेत पितृदोष किंवा श्रापीत योग नावाचे ग्रहयोग असल्याने तूम्हाला संसारात त्रास सहन करावे लागताता, कुठलीही कामे होत नाहीत, मुलांची लग्ने जमत नाहीत, शिक्षणात नीट यश येत नाही, उसने दिलेले पैसे परत मिळत नाहीत, नको नको ती दुर्लभ आजारपणे निर्माण होतात, घरात नेहमी अशांतता राहते, किंवा सर्व काही असूनही एक प्रकारचे असमाधान राहते, कर्ज होते, काही लोकांना व्यसने लागतात, 10-10 वर्षे संतती होत नाही, अशा अनेक गोष्टी घडतात. कारण आपले अतृप्त असलेले पितरच आपल्या ह्या कामात अडथळे आणत असतात किंवा ती कामे होऊन देत नाहीत, जेणेकरून आपण ह्याचा शोध घेऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल असे काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा असते. माझ्या मते पितृदोष हा दोष नसून ती आपल्याला मिळालेली एक संधी असते, आपल्या पूर्वजांनी त्यांच्या शांतीसाठी आपली निवड केलेली असते हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. कित्येक लोक ह्या विधीसाठी पैसे जास्त लागतात म्हणून नाके मुरडतात. असे व्यक्तिगत चैनी साठी लोक कितीही पैसे खर्च करायला होतात, पण त्यांना पितृदोष शांती करा असे सांगितले की पैशाची अडचण दिसायला लागते, आणि मग ते काहीही न करता तसेच बसून वेळ फुकट घालवतात, आणि परत वाईट वेळ आल्यावर ज्योतिषाकडे धाव घेत राहतात. घराण्यात 2 गोष्टीना अत्यंत महत्त्व आहे, त्या म्हणजे आपले पूर्वज किंवा पितर आणि आपले कुलदैवत. ह्यांना आपण खुश ठेवले तरी आपली सर्व कामे व्यवस्थित पार पडू शकतात. परंतु कित्येक लोक चार चार वर्ष आपल्या कुलदैवताला भेटायला जात नाहीत, आणि मग रडत बसतात. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर, आमच्या घराण्यात पितृदोष आहे असे माझ्या वडिलांना कोण्या ज्योतिषाने सांगितल्या मुळे त्या दोषाचे निराकरण करण्यासाठी म्हणूंन आम्हाला नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राध्द हा विधी करावा लागेल असे सांगितल्यामुळे मी, माझे वडील, आई, भाऊ आणि हे कार्य करणारा आमचा ब्राम्हण, असे आम्ही ५ जण नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध हा विधी करण्याकरिता एक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो होतो. त्या विधिमूळे आमच्या कुटुंबातील 3 पिढ्यांमधील कोण्या पिताराचे वर्ष श्राध्द नीट झाले नसेल आणि जर त्यामुळे त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहुन त्याला मुक्ती मिळाली नसेल तर ती मिळेल आणि आमची अडलेली, अडकलेली सर्व कामे होतील असे आम्हाला सांगण्यात आले होते. तो तीन दिवसांचा विधी होता. त्याविधीच्या समाप्तीच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी पिंडदान करण्यात येणार होते. त्याकरिता शिजवलेल्या भाताचे पिंड बनवण्यात आलेले होते. हा विधी जिथे चालला होता तिकडे समोरच नारळाची काही झाडे होती आणि त्यावर भरपूर कावळे बसलेले होते आणि ते इकडून तिकडे झाडावरच उड बस करत होते. जसे पानावर पिंड ठेवले आणि मंत्र उच्चारण चालू झाले तसे झाडावरचे कावळे खाली उतरून त्या पिंडांच्या अवती भोवती उडू लागले परंतु कोणीही कावळा त्या पिंडांना शिवत नव्हता. बराच वेळ वाट बघून शेवटी ब्राम्हण आम्हाला म्हणाला की नक्कीच तुमच्या पितरांची काहीतरी इच्छा अपूर्ण असल्याने ते पितर कावळ्यांना पिंड शिवण्याची परवानगी नाकारत आहेत, त्याना जर पिंडाला शिवायचे असेल तर तुम्ही त्या पिंडांसमोर असे काहीतरी बोला की त्यांची इच्छा पूर्ण होईल अशी त्यांची खात्री होईल, म्हणजे ह्यावेळी तुमच्या कुटुंबात कोणी असाहायय असेल तर कावळा शिवणार नाही, त्यासाठी तुम्हाला जर असे काही माहीत असेल तर तुम्ही ते बोला, तरच ते कावळ्यांना पिंड शिवायला परवानगी देतील, अर्थातच ते सुखी आहेत असे तुमच्या निदर्शनास येईल, तरीही काहीच नाही झाले तर मग मात्र आपल्याला दर्भाचा कावळा करावा लागेल. त्यावेळी आमच्या घरात माझ्या एक अत्याचे लग्न मोडले होते आणि तिला एक मुलगा असून ते दोघे निराधार झालेले होते, माझ्या वडिलांना वाटले की कदाचित तेच कारण असावे म्हणूंन कावळे पिंडाचा घास घेत नसावेत, म्हणून माझे वडील पिंडासमोर म्हणाले की मी माझ्या बहिणीचा, तिचा मुलगा कमावता होई पर्यन्त सांभाळ करीन, इतके बोलताचक्षणी काय आश्चर्य की इतकावेळ पिंडाला अजिबात स्पर्शही न करणाऱ्या कावळ्यांनी पिंडांवर अक्षरशः झेप घेतली आणि पटापट चोची मारून ते सर्व पिंड फस्त केले. हे सर्व दृश्य आम्ही एकटक पणे पहातच राहिलो आणि त्याच दिवसांनंतर माझा ह्यावर पक्का विश्वास बसला की ह्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे, कारण इतका वेळ पिंडाभोवती घुटमळणारे कावळे असे वचन सोडतक्षणी कसे काय पिंडाला शिवले असावेत. त्या घटने पासून दोनच महिन्यांनी माझ्या भावाला चांगला जॉब लागला आणि काही महिन्याने त्याचे लग्नही झाले.
......ज्याप्रमाणे काही लोकांमध्ये अशाप्रकारे मृत्यूनंतर १०, ११, १२ किंवा १३ व्या दिवशी मृतात्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते, किंवा नारायण नागबळी सारखी श्राध्द केली जातात त्याच प्रमाणे काही जमातींमध्ये ११ व्या आणि १२ व्या च्या दिवशी एक वेगळ्या प्रकारचा विधी, किंवा जागरण करून मेलेल्या माणसाला कोणाच्यातरी शरीरात येण्यासाठी आवाहन केले जाते आणि त्यायोगे त्याची काही इच्छा राहिली असेल तर ती त्याला विचारून तिचे निराकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. ते करणारी खास माणसे असतात, ती माणसे एक विशिष्ठ प्रकारचे वाद्य रात्रभर वाजवतात आणि ते वाजवत असताना त्यांच्यातिल एखादा माणूस एक कथा सांगत असतो. ती कथा खूप ऐकण्यासारखी असून त्यात पांडवांच्या काळापासून माणसाचा सर्व इतिहास संगीतला जात असतो. त्या कथेत माणसाचा जन्म होऊन तो कसा वाढतो, त्यानंतर अंतिम काळ येता मृत्यू पंथाला कसा लागतो ह्याचे सुरेख वर्णन असते. त्यावेळी ज्या घरात मृत्यू झालेला आहे त्या घरातील त्या मृत व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाला त्या वाद्यच्या तालावर नाचण्यास सांगण्यात येते. हे करत असताना त्या माणसाला एक प्रकारची ग्लानी येऊ लागते आणि त्याच वेळी त्या मृत माणसाला आवाहन केले जाते की जर तुझी काही इच्छा असेल तर तू ह्या तुझ्या नातेवाईकाच्या अंगात प्रवेश करून सर्वाना तुला काय सांगायचे असेल ते सांग किंवा दाखवून दे.
......मला ह्या सर्व गोष्टीमध्ये विशेष रस आणि आकर्षण असल्यामुळे मी त्याबद्दल खूप माहिती घेतली होती, त्यावर रिसर्च केला होता. त्यातील काही पद्धतींचा अभ्यास केला होता, त्यानंतर कित्येक लोकांसाठी त्याचा उपयोगही केला होता. ह्या सर्व गोष्टी गुप्त रूपाने होत असतात, कारण कोणासाठी ती श्रद्धा आहे तर कोणासाठी अंधश्रद्धा. असेच एकदा माझ्या एक माहितीतल्या माणसाच्या ओळखितील एक माणसाचा आत्महत्येने मृत्यू झाल्याने त्यांनी मला बोलावले होते. त्यांना कुठूनतरी कळले होते की मला हे सर्व करणे अवगत आहे. तिथे पोहोचल्यावर मी त्या गेलेल्या माणसाच्या अत्यंत जवळ असलेल्या एक मित्राला आणि एक नातेवाईकाला एक जागेवर शांत बसायला सांगून, माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी माणसाला एक वाद्यावर एक विशिष्ठ प्रकारची धून वाजवायला सांगितली. ह्या सर्व गोष्टींवर रिसर्च करत असताना ती धून मला एका साधू टाईप माणसाने शिकविली होती. ह्या धून मुळे आपल्याला इच्छित असे मृतात्मे अपल्यालाकडे खेचले जाऊ शकतात. हे दरवेळी होईलच असे नाही, कारण हे त्या मृतात्म्याच्या फ्री विल वर पण अवलंबून असते. उगीच आपण कोणालाही अशा पद्धतीने बोलावणे चुकीचे आहे. जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हाच अशा पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे, नाहीतर त्याला त्रास दिला तर पुढे जाऊन आपल्यालाच प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे मी हे सर्व आता करत नाही. त्या साधू टाईप व्यक्तींना परत एकदा भेटून मी त्यावर पूर्णपणे बंधन घालून घेतले आहे, म्हणजे माझ्या स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत गोष्टीसाठी मी ह्याचा उपयोग करणार नाही असे ते बंधन ते नको नको सांगत असताना मी स्वतःहून घालून घेतले. साधना क्षेत्रात अशा खूप गोष्ठी अज्ञातात आहेत ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाहीत. जसजसे त्या वाद्यावर ती धून वाजू लागली तसतसे त्या मृत माणसाचा तो जवळचा मित्र अचानक डोलू लागला. म्हणजे त्याच्या शरीराचा ताबा त्या मृत व्यक्तीने घेतला होता. खरेतर त्यांना अशी आशा होती की त्याचा आत्मा त्या नातेवाईकच्या अंगात येईल पण तसे न होता त्याचा तो मित्र डोलू लागला. अचानक डोलता डोलता तो खाली पडला आणी त्याचे हात पाय कडक झाले, बुबुळ वर गेली. जसे शेवटच्या क्षणी त्या मृत शरीराचे हात पाय कडक झाले होते तसेच ते होऊ लागले होते. हा सिग्नल मिळाल्यावर मला समजले की त्या व्यक्तीत त्या मृत व्यक्तीचा आत्मा आलेला आहे. परंतु तरीही त्याची टेस्ट घेणे आवश्यक होते, कारण कधी कधी वेगळे आत्मे पण असे संचार करू शकतात. म्हणून मी त्याला म्हटले ही बघ तुझी मुलगी तुझी वाट पाहत आहे. हे ऐकल्यानंतर काही वेळ शांत असलेल्या त्या मित्राने त्या मुलीला तिच्या खास नावाने हाक मारली जसे तो मृत व्यक्ती तिला जिवंत असताना मारायचा, त्यावेळी त्याच्या आवाजाची लय एकदम त्या मृत माणसा सारखी झाली होती. ती हाक ऐकून ती लहान मुलगी त्या माणसाला येऊन बिलगली, तिला वाटलं की हे आपले बाबाच आहेत. तिला पाहून तो मित्र रडू लागला आणि म्हणाला पोरी मला माफ कर, मी निराशेत येऊन हे पाऊल उचलले, त्यावेळी मला तुमची कोणाचीच पर्वा वाटली नाही. पण मला हे करायचं नव्हत, हे माझ्याकडून आपोआप घडत गेलं. पण आता वेळ निघून गेलेली आहे. हे सर्व संभाषण चालू असताना त्या मुलीने पण आपल्या बाबांचा आवाज आणि स्पर्श ओळखावा तशी त्याला बिलगून होती. त्याने रडत रडत सर्वांची माफी मगितली. त्याचे बोलणे ऐकून घरातील सर्व बायका मंडळींनी परत हंबरडा फोडला. अशावेळी काय करावं हे कोणालाही सुचत नसते. त्यानंतर मी त्यांच्यातल्या एक नातेवाईकाला त्या मृतत्मा आलेल्या व्यक्तीला त्याची काही ईछा असेल तर विचारा असे सांगितले. त्यांनी विचारल्यावर तो म्हणाला की माझी काही ईछा नाही, पण नंतर अचानक तो इथे तिथे पाहून हातवारे करू लागला. त्याला नीट बोलायला जमत नव्हते तरी एक आवंढा गिळून तो कसेबसे म्हणाला की माझी उशी आणि बिछाना कुठे आहे. त्यावर त्याची आई म्हणाली की ती तर आम्ही स्मशानाच्या बाजूला कचऱ्यात टाकून दिली. त्यावर तो खूप रागावला, त्याने अगदी अकांत्तांडव केला आणि म्हणाला की मला न विचारता तुम्ही असे कसे काय केले. मला आताच्या आता ती माझी उशी आणि माझा बिछाना पाहिजे. त्याची समजूत काढली तरी तो ऐकायलाच तयार नाही असे पाहून त्याच्या आईने एकाला ती उशी आणि बिछाना आणायला सांगितला. त्या वस्तू आणे पर्यंत त्याला धीर नव्हता, तो काही न काही बरळत होता. तो बिछाना आणि उशी त्याची अत्यंत आवडती होती. जेव्हा तो माणूस त्याच्या वस्तू घेऊन आला त्यावेळी तो विजेच्या चपळाईने झटकन उठला आणि त्याने त्या माणसावर झडप घालून ती उशी आणि बिछाना त्याच्या ताब्यात घेतला आणि खाली अंथरून त्यावर लोळत अजूनच रडू लागला. त्याचे हात पाय कडक झालेले असूनही त्याने जी चपळता दाखवली ती आश्चर्यकारक होती. थोड्यावेळाने शांत झाल्यावर त्याने त्या मृत व्यक्तीच्या बायकोला जसे तो मृत व्यक्ती जिवंत असताना तिला हाक मारायचा तशी हाक मारली आणि जवळ बोलावले, पण ती त्या मनस्थितीत नव्हती म्हणून शेवटी त्याची आई तिकडे त्याच्या छोट्या मुलाला घेऊन गेली असताना त्याने ती उशी त्यांच्यासमोर फाडली. ते दृश्य पासून सर्वानाच खूप आश्चर्य वाटले. कारण त्या फडलेल्या उशिमधून 100 च्या आणि इतर अशा कितीतरी नोटा निघाल्या, त्या उशीचा कापूस पूर्ण पिंजून काढे पर्यंत तो ते करत राहिला. त्यानंतर त्याचा मोर्चा त्या बीछान्याकडे वळविला. त्याने तो बिछाना पण फाडल आणि त्यातून पैशां बरोबर काही दागदागिने पण निघाले. ते सर्व दृष्टय पाहून सर्व अवाक झाले कारण त्या उशी आणि बीछान्यामध्ये इतके पैसे आणि दाग दागिने असतील हे त्याच्या घरच्यांनाही माहित नव्हते.
......त्यानंतर त्या माणसाच्या शरीरातील मृतत्मा परत रडू लागला आणि बोलला की हीच माझी शेवटची इच्छा होती, आता माझी जायची वेळ झालेली आहे, तो हे बोलता बोलता अचानक त्या माणसाच्या अंगाला झटका बसून तो जागेवरच कोलमडला. त्याचे अंग कडक झाले होते जसे शेवटच्या वेळी प्रेताचे झालेले होते. त्यानंतर त्याला सर्व अंगाला तेल लावून मालिश केल्यावर कुठे हळूहळू चालता येऊ लागले. ह्या प्रसंगविषयी त्याला काहीच आठवत नव्हते. आपले हात पाय का दुखत आहेत ह्याचा तो विचार करत असताना त्याला ती हकीकत सांगितली तेव्हा तो मित्र वियोगाने खूप रडू लागला. अशा कितीतरी अनाकलनीय गोष्ठी ह्या जगात आहेत. हे जे सर्व झाले ते कोणालाही खोटं किंवा एक प्रकारची अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी ते अंधश्रद्धा म्हणूनच घ्यावे, माझी त्यावर काहीही हरकत नाही, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्या लेखाच्या माध्यमातून मला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाही, एक काहीतरी नवीन रंजक माहिती वाचकांना मिळावी इतकाच शुध्द हेतू आहे. आता ह्या सर्व क्रियांपासून मी लांब असल्याने कृपया कोणीही मला ह्याविषयी काहीही विचारण्याचा प्रयत्न करून नका. आता ह्या सर्व गोष्टी मी करायच्या झाल्याचं तर शास्त्रशुध्द पद्धतीने म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून करतो, परंतु त्यातून काही फलित निघाले नाही तर त्याची जबाबदारी मी घेत नाही, म्हणजे झालेला खर्च इत्यादी परत दिला जात नाही. कोणाला खूपच गरज असेल तर हे इतरांच्या मदतीने केले जाते, पण शक्यतो नाहीच, कारण त्याला खूप खर्च येतो. गेलेल्या माणसाची शेवटची इच्छा काय होती हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते, परंतु खूपच गरज असेल तरच हे केले पाहिजे. कारण त्याला असे परत बोलवल्याने त्याला त्रास होऊ शकतो, तसेच त्याचे परिणाम आपल्यावर पण होऊ शकतात.
..... कित्येक लोक गेलेल्या माणसांच्या आठवणी काढत राहतात, त्यांच्या आठवणीत रडत राहतात, त्यांचे फोटो घरात जागोजागी लावून ठेवतात, पण असे केल्याने त्यांना पण तुमची ओढ लागून त्यांच्या पुढच्या प्रवासात बाधा उत्पन्न होते. तसेच त्यांना पूर्ण मुक्ती न मिळाल्याने तुमच्या आयुष्यात पण पितृदोष सारखे योग निर्माण होत असतात. मृतत्म्यांचे जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळे असते. कित्येक लोक असे विचारतात की गेलेली व्यक्ती माझी अमुक नात्यात होती, जिवंत असताना माझ्यावर खूप प्रेम करायची मग त्याच्यापासून मला त्रास कसा होऊ शकतो. तर तो तसा प्रकार नाही, एखादी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा तिच्यावर तिच्या कित्येक जन्मात तिच्यावर झालेले संस्कार पण कमी अधिक प्रमाणात प्रकट होत असतात. म्हणजे आता ती फक्त तुमची नातेवाईक नसून अजून बरेच काही असू शकते. त्यात त्या व्यक्तीच्या वासना म्हणजे इच्छा शक्तिशाली असतील तर ती अजुनच बलशाली होत असते, त्यामुळे ती ना तुमची असते ना कोणाची. जिवंत माणसाला नाक हात डोळे तोंड सर्व पांचेंद्रिये असतात, त्यातून तो साधनांचा उपभोग घेऊ शकतो, परंतु मृतत्म्याच्या बाबतीत असे काही नसल्याने त्यांना त्याचा उपभोग न घेता आल्याने त्यांची चिडचिड होत राहते. जसे आपण पणी पिऊ शकतो, पाणी प्यायल्यावर आपल्या घशाला आराम पडतो, मनाला शांती लाभते. पण मृत्यत्म्यांच्या बाबतीत असे काही नसल्याने त्यांना वस्तूंचा कितीही उपभोग घेतला तरी त्यांची तहान भागत नाही. माझ्या एक बाभुळभुत नावाच्या लेखात मी ह्याचा उल्लेख केलेला आहे. की कित्येक आत्मे इतके तहानलेले असतात की बाभळीच्या काट्याच्या अग्रावरील पाण्याने पण त्यांची तहान काही क्षणासाठी भागते. आता बाभळीच्या काट्याच्या अग्रावर किती पाणी सामावेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. अशा अतृप्त आत्म्यांना काही तांत्रिक लोक खाण्यापिण्याचे आमिष दाखऊन त्यांच्याकडून नको ती कामे करऊन घेत असतात. त्यांचा पण नाईलाज असतो म्हणून ते करतात. ह्या माध्यमातून कोणाचेही अहित घडऊन आणले जाते. त्याच्या बदल्यात त्यांना काही काही वस्तू भोग म्हणून दिल्या जातात. काही आत्मे एखाद्याच्या शरीराचा भोग मागत असतात. ह्या क्रिया अत्यंत हीन दर्जाच्या असून असे करणारे तांत्रिक शेवटी त्याच योनीत जात असतात.
.... त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नात्यातील लोक गेल्यानंतर त्याच्या मुक्ती साठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे मला वाटते. जवळची व्यक्ती गेल्यावर काही लोक श्राद्धकर्म इत्यादी करतात, त्यावेळी गोरा गरिबांना मोठ्याप्रमाणावर यथाशक्ती अन्नदान केले गेले पाहिजे, परंतु ते अन्न बाहेरून मागवलेले असले पाहिजे. त्यामुळे ते अन्न भक्षण करणारे लोक अन्न भक्षण करताना अन्न देणाऱ्या व्यकीचे आभार मानत असल्याने त्यातून जे पुण्य बाहेर पडेल त्याचा फायदा त्या मृतत्म्याला मिळत असतो. काहीलोक ह्यासाठी त्रिपिंडी इत्यादी विधी करत असतात, काही लोक ह्या सर्वाला थोतांड मानत आलेले आहेत. पण मित्रांनो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण अत्यंत बरोबर आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला चांगली गती मिळावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने हे धर्माचारण केलेच पाहिजे, तुम्ही आता इतरांसाठी केले तर तुमच्या नंतर तुमच्यासाठी हे काम कोणीतरी करेल, बाकी तुमची इच्छा. मित्रांनो लेख कसा वाटला हे मेसेज करून नक्की कळवा. धन्यवाद.
अँड. अंकुश नवघरे.
(ज्योतिष विशारद)