महालगड भाग 14
सकाळ झाली. सगळं काही आलबेल होतं. सृष्टीतला नियमितपणा नित्यनियमाने सुरू झाला होता. कशातच काही विशेष बदल नव्हता. बदलली होती, ती वृंदाची दृष्टी !या भल्यामोठ्या वास्तूचं, गच्चीवरून दिसणाऱ्या त्या किल्ल्याचं, प्रत्येक सजीव-निर्जीव तत्वाचं खरं स्वरूप तिला कळलं होतं. माणसाच्या हीनतेची न्यूनतम पातळी तिने काल पहिली. माणसाच्या क्रौर्याची उंची तिने पाहिली होती. सत्तेचा आणि सामर्थ्याचा उसळत जाणारा दुरुपयोग, माणुसकीचा सरेआम झालेला माणुसकीचा विध्वंस तिने पाहिला. निष्कारण गेलेल्या जीवांची, मृत्यूनंतर होत असलेली दैना तिच्या जिव्हारी लागली होती. कोणाचाही काही दोष नसताना, केवळ अकाली मृत्यू आल्याने त्यांचे आत्मे या वास्तूत अडकून राहिले होते. ऐन उमेदीच्या भरात काळाने त्यांना आपल्या आप्तांपासून दूर नेले. त्यांच्या शरीराची झालेली विटंबना सुद्धा त्यांच्या मुक्तीमार्गात अडसर होती. इतका भयानक मृत्यू त्यांना अपेक्षित नव्हता.
आता सगळी कोडी हळू-हळू सुटत आल्यासारखी वाटत होती. इथे मृत्यू पावलेल्या त्या असंख्य जीवांनी या वास्तूतची क्रूरता जपूजलन ठेवली होती. एका-मागून एक होत असलेले अकालमृत्यूने इथे तळतळाट आणि द्वेषाचं जळमट वाढत चाललं होतं. पाठोपाठ वाढत असलेले अतृप्त आत्मे या द्वेषाच्या आगीत तेलाचे काम करत होते. हवेलीच्या प्रत्येक खोलीत आणि प्रत्येक कोपऱ्यात कुणाची तरी हत्या झाली होती. एकही कोपरा जिवंत आणि शुभ नव्हता. याचा परिणाम खूप भयंकर होता. इथे जन्माला येताना प्रत्येक अर्भकास याची लागण होत होती. या प्रेतांची अशुभ सावली त्याच्यावर अगदी पहिल्या क्षणापासून पडत होती. या वंशात जन्मला , त्याच्यावर नियतीनेच हे काळे बोट ठेवले होते. त्यावर होणारे शुभ-संस्कार लागू पडत नव्हते. कोणतेही शुभ कार्य विनाविघ्न पार पडले नव्हते. या वास्तूत, नवीन सुनेची उमटणारी पाऊलं कुंकवाची होती खरी, पण त्यालादेखील एक भयाची एक बारीक कड होती. रात्री-बेरात्री बेभान होऊन हवेलीभर धावणाऱ्या या सावल्या डोळ्यांना दिसत नव्हत्या, पण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नवीन माणसाला घाबरवून सोडत होत्या. अचानक होणारी खिडक्यांची आदळआपट, कधीही न उघडलेल्या कुलुपांचं अचानक निखळून पडणं, दारांच्या जुनाट चौकटीवर रुधिराची धार, हे सगळं नित्य होतं. भुकेने त्रासलेला एखादा कोवळा जीव अर्ध्यारात्री टाहो फोडायचा. मुक्तीची वाट पहात असलेला एखादा आत्मा अचानक बेभान होऊन ओरडत सुटायचा. कुणाची पैंजण हवेलीच्या बंद खोल्यांत नाचत सुटायची. साखळदंडाची जखड हळू-हळू सरकत बंद दारापर्यँत यायची. सुटका व्हावी म्हणून आतून विनवण्या करायची. आपल्या तान्हुल्यासाठी ताडफडणारी आई, त्याच्या आठवणीत रात्र-रात्र रडायची. पण या सगळ्याची फक्त जाणीव होत होती. उघड्या डोळ्यांनी काहीही दिसत नव्हतं. सगळी पापं, सगळा द्वेष, सगळे प्रतिशोध ,सगळ्या वेदना अदृश्य होत्या.
वास्तूला आलेली कळा सर्वश्रुत होती. इथे काम करणाऱ्या जुन्या लोकांनी पाहिलं नसलं, तरी या भयावह जाणिवा होत होत्या. सूर्यास्त झाला की, जो-तो आप-आपल्या घरी निघून जाई. रखवालदार त्या मोठ्या लोखंडी दारास कधी सोडत नव्हते. त्यांना देखील बऱ्याचदा ,गच्चीवरून कुणीतरी खाली पडलेलं दिसायचं. एखाद्या दोरीला कुणीतरी लोंबतय , तडफडत जीव सोडतंय, हे ही दिसत होतं. पण त्याकडे ते सहज काना-डोळा करायला शिकले होते. आत रहाणारी मोजकी माणसं या सगळ्याची सवय करून बसली होती. भय सरावाचा झाला होता.
वृंदाला वरून बागेत फुलं तोडणारी दुर्गा दिसली.हळू-हळू मोठी होत होती. काहीही नातं-गोतं नसताना काकूने तिला उराशी धरलं होतं. दिवसभर हेवलीच्या अंगणात बागडणारं एकमेव जिवंत फुल होतं. तिची आई कदाचित तिला आठवतही नसावी. भयाच्या छायेत ती तिचं बालपण कुरवाळत होती. तिची मातीची खेळणी, यमाबाईने विणलेल्या जुन्या कापडाच्या बाहुल्या या सगळ्यात ती दिवसभर दंग असायची. आत येणं-जाणं होतं, पण यमाबाई तिला क्षणभर एकटं सोडत नसे. आतली कामं झाली, कि तिचा पदर धरून ही डोलत बाहेर निघून जाई.
"इतर पोरांना आईबापांच्या खांद्यावर बघत असते. तिचे प्रश्न जीवाला घोर लावून जातात. "माझे आई-बा नसतात का ? मला जत्रेत न्यायला यायचं नाही का ?" वृंदा तिला खेळताना पाहून खाली आली. तिचे मातीने माखलेले हात-पाय पाहून तिला बरं वाटलं.
"येशील माझ्यासोबत, तुला वाड्यात खेळायला आवडतं ना ?" वृंदाने विचारलेल्या या प्रश्नावर तिने यमाबाईकडे वळून पाहिलं. हवेलीची सावली दुर्गावर पडू पहात होती. वृंदाने तिला बाजूला केलं. तिचा हात झटकून दुर्गा पळून गेली. तिच्याकडे बघताना मात्र वृंदाच्या काळजाचा ठोक चुकला. तिची सावलीच पडत नव्हती. तसुभर देखील नाही ! वृंदाने यमाबाईकडे पाहिलं.
"इथे सगळ्यात पाहिले सावलीचा घात होतो ! पोरी, तिची आई तिची सावली केव्हाच घेऊन गेलीय."
"म्हणजे...?" वृंदाला काहीच कळलं नाही.
" सावली, पायाची माती, यावर त्यांची नजर असते."
"तुम्हाला माहिती आहे...बरीच !" वृंदा थोडी सावरून बसली.
"नाही...मला नाही माहीत काही !" यमाबाई तोंड लपवून बसली.
" मग...हे सगळं कसं ?"
" हे सगळं फक्त त्या पोरीसाठीच करावं लागतं. कुणी नाहीये हिच्या मागेपुढे. हिची आई गेली, बरोबर पहिल्या अमावास्येलाआली होती. पोरीच्या मायेत जीव आजही अडकून राहिलाय."
त्या रात्री बिजलीच आली होती. अर्ध्यारात्री तीन वर्षांच्या दुर्गाला पोटाशी धरून मन मोकळं रडली. आपल्या खोलीत पहुडलेल्या मालिनीसुद्धा तिचं असं रडणं ऐकू आलं. यमाबाई खिन्न मुद्रेने सगळं बघत होती. एका आईच्या अतृप्त आत्म्याने सजीव लेकरास घट्ट धरून ठेवले होते.
"बाई, माझ्या लेकराला मायेचं न्हाई कुणी...!" यमाबाईच्या डोळ्यात पाणी आलं.
"हिला सांभाळाल नं...?"
"पण...!"
"काही नाही होणार हिला...!" जाताना बिजली आपल्या पोरीची सावली घेऊन गेली. कुणी दृष्ट लावायला नको, कुणी इजा करायला नको, कुणी त्रास द्यायला नको म्हणून. याचा विपरीत परिणाम दुर्गाला कळला नाही. पण यमाबाईला मात्र कळला. सावली नसल्याने दुर्गाला हवेलीसोडून इतर मुलांमध्ये मिसळता येत होतं...पण अंधार झाल्यावर !
संध्याकाळी मावळत्या सूर्याची कोवळी किरणं किल्ल्यावर पडत होती. किल्ल्याभवती असलेली वाळलेली पाती त्याने थोडीफार उजळून निघायची. त्याची चमक दूरपर्यंत दिसायची. जुनाट दगडांवर डोकं ठेवून ती सोनसळ आपले हातपाय पसरवून काही वेळ तिथे विसावायची. सूर्याच्या झुकत्या मापाचा अंदाज घेऊन आपला पसारा आवरत ती पसार व्हायची. किल्ल्याच्या डाव्या बाजूने सूर्य मावळायचा. शेवटी-शेवटी अंधारत जाणारी त्याची उजवी बाजू अधिकच भेसूर दिसायची. तटाची उंच भिंत आता ढासळत चालली होती. ही गत अर्ध्याहून अधिक भागाची होती.
"नका बघू इतकं त्याच्याकडे. प्रेमात पाडतो तो...!" मागून एकदम मोहन आल्याने वृंदा भानावर आली. थोडी सावरून उभी राहिली.
"निर्जीव असली, तरी वास्तू बोलते कधी-कधी." वृंदा किल्ल्याकडे बघत म्हणाली.
" कधी-कधी नाही, नेहमी. आत असलेल्या लोकांच्या मानसिकतेला सारखी प्रतिउत्तर देते वास्तू !" त्याची देखील नजर त्या किल्ल्यावर खिळली. " एक अंतरंग तिलाही असतो. आणि शोधलं तर एखादं मन सुद्धा सापडेल...!"
" कविता करता का तुम्ही ?" वृंदाने एकदम विषय बदलला.
" नाही, वेळ मिळत नाही."
" मग...?"
" छंद नाहीये मला काहीच." त्याने सरळ उत्तर दिलं.
" हवेत छंद माणसाला ! वेदनांना वाटा फुटतात...!"
" तुम्हाला आहेत ...?" वृंदा यावर काहीच बोलली नाही. क्षणभर शांत झालं सगळं.
" किल्ल्यावर जायची खूप इच्छा आहे माझी." मोहनचा चेहरा खिन्न झाला.
" एकेकाळी रात्रीचे दिवे लागल्यावर किती सुंदर दिसत असेल तो...? सततचा राबता असेल , तेव्हा किती प्रसन्न वाटलं असेल त्याला ! त्याचे महत्व ज्याला कळले त्याने त्याला जिंकण्यासाठी शर्थ केली असणार ?"
"हो , कित्येक बळी गेले असणार निष्कारण...? "
"इतिहास घडवायचा म्हणजे हे सगळं येतं त्यात. घरदार ओस पडतं, माणसं पंगतात, संसार उद्धवस्त होतात, उभ्या आयुष्याची राख-रांगोळी होते. हाती काही लागो-न-लागो, हातातून खूप काही निसटून जातं...!"
"तुम्हाला का जायचंय तिथे ?" मोहन ने चाचरत प्रश्न केला.
" बघायचंय, आतून किती भव्य-दिव्य असेल ना ? तुम्ही पाहिलं आहे न..?"
मोहन ला गेले काही दिवस वृंदात लक्षवेधी बदल दिसून आला होता. सुरवातीला त्याच्याबद्दल तसूभरही भान नसलेली वृंदा आता त्याच्यासमोर उभी राहून बोलू लागली होती. त्यांचं समोरा-समोर येणं फार क्वचित होतं. दोन-दोन दिवस दर्शन नव्हतं. आजही हा योगायोग होता. पण सुंदर होता. दोघांमध्ये एक भाव तयार होत होता. पण त्याला भयाची काजळी अगदी अधोरेखित असल्यासारखी दिसत होती. दोघांमध्ये एक बारीक अंतर होतं. वृंदाने आत्तापर्यँत काय-काय संशोधन केलं आहे, हे मोहनला ठाऊक नव्हतं असं नव्हतं ! त्याने कधी तिला याबद्दल मज्जाव नाही केला. प्रति-प्रश्नदेखील नाही. तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होता. कदाचित आयुष्यात पाहिल्यांदा त्याला बोलणारं आणि ऐकणारं कुणीतरी भेटलं होतं.
तिच्याकडे तो बघत उभा राहिला. तिचा चेहरा भोळा होता, लढाऊ होता. तिच्यात हिंमत होती. जिद्दीही होती ती ! अभ्यासू होती. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात होती. दिसायला देखील ती सुंदर होती. स्वतःच्या ठेवणीकडे तिचं काटेकोर लक्ष होतं. इतक्या दुर्गम भागात येऊन देखील तिच्या पेहरावात अजिबात बदल नव्हता. तो हे सगळं जाणून होता. कदाचित यामुळेच तो ही एक ठराविक जवळीक साधून होताच.
"तुम्ही तिथे न गेलेलं बरं..!" त्याने एकदम उत्तर दिलं.
" आम्ही देखील जात नाही. कुणीही तिकडे फिरकत नाही."
"का...?" इथून उत्तरं सुरू होणार होती.
" माहीत नाही. पण लोक म्हणतात ! ती जागा शापित आहे."
" जागा नसू शकते शापित. कदाचित तिथे जे काही आहे, ते अमानवी असावं."
" बरीच माहिती काढलेली दिसते तुम्ही...!"
" ऐकून मिळाली आहे."
"ऐकून मिळालेली माहिती आणि सत्य, यात बराच फरक असतो. ऐकलेल्या कथा आणि सत्य एखादी व्यथा ! तिथे कुणी जात नाही , तर तिथे काय घडतंय, हे कुणी कसं सांगू शकेल ?"
"तेच तर बघायचं आहे...!"
"तरीही...आपण तिथे न गेलेलं बरं. उगाच विषाचं परिक्षण नको."
कुणीतरी माणूस वर धावत आला. मोहनच्या कानात त्याने काहीतरी सांगितलं आणि निघुन गेला.
"मी येतो. जावं लागेल. अंधार होत आला आहे. तुम्हीही खाली जा." आणि तो वृंदाकडे पाठ फिरवून निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या सावलीकडे वृंदा बघत राहिली. कधीकाळी आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराची कल्पना इथे, अशी येऊन थांबेल हे तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मोहन दिसायला राजबिंडा होता. जवाबदार होता. त्याचा एक वेगळा रुबाब होता. दरारा होता. स्पष्ट बोलणारा, व्यवहार-चतुर देखील असावा. खूप लहान असल्या पासून तो हे सगळं सांभाळत होता. तो बालवयातच सावरला होता. त्यादिवशी शेतात झालेल्या पहिल्या भेटीत वृंदाने त्याची पारख अगदी योग्य केली होती. तिचे भय नाहिशे झाले होते खरे, पण संशय अजूनही भरून होता. मोहनवर विश्वास ठेवता आला असता. पण...त्याचात असलेल्या त्या पिशाच्चावर कसा ठेवणार ?
क्रमश...
लेखन : अनुराग वैद्य