महालगड भाग 15
तीन दिवस असेच गेले. नित्य तसं राजरोस सुरू होतं. वृंदा आपल्या खोलीत आली. शहरात असलेल्या मित्र-मैत्रिणींशी पत्र-व्यवहार सुरू होते. घडलेलं सगळं ती तिच्या डायरीत लिहून ठेवायची. एका दिव्याच्या मंद वातेला साक्षी ठेऊन ती सगळं लिहून काढायची. मेजावर बसून ती लिहीत होती. आई केव्हाच झोपली होती. खिडकी आज उघडी राहिली होती. अचानक मागच्या बागेत काहीतरी हालचाल झाली. कुणीतरी उडी मारल्याचा आवाज आला.
"कोण आहे ?" त्या आवाजाला कुणीच दाद न दिल्याने वृंदा स्वतः उठली. खाली पाहिलं तेव्हा कुणीही दिसलं नाही. खाली बराच अंधार होता. एखादं जनावर असावं समजून ती खिडकी ओढू लागली. अचानक ती थांबली. तिला दरदरून घाम फुटला. खाली लावलेल्या मशालीच्या उजेडात तिला एक सावली आकार घेताना दिसू लागली. मध्यम बांध्याची एक पुरुषी सावली. ती त्याच्याकडे पहात उभी राहिली. तिचा घसा कोरडा पडत चालला होता. आवाजही देऊ शकत नव्हती. ती सावली हेवलीकडे सरकत होती. तिची गती अत्यंत संथ होती.
'खाली जाऊन पहावं का ?' तिच्या मनात आलं. 'काही अघोरी असेल तर...?' विचार सारखे बदलत होते. सावलीवर नजर खिळून होती. शेवटी हिंमत करून तिने हाताशी असलेल्या मेजावरून एक मोठी मेणबत्ती उचलली. काडेपेटी घेऊन ती बाहेर जाण्यासाठी वळली आणि मान फिरवातच तिच्या काळजाचा थरकाप उडाला. ती सावली आता तिच्या खऱ्या रुपात तिच्या समोर येऊन उभी होती. किरकोळ उजेडात त्याच भेसूर रूप अधिकच भेसूर वाटत होतं. वृंदा त्याच्याकडे पहात राहिली. एखाद्याने साक्षात काळाचे वर्णन केले सतेज तर ते असेच असते. धारदार शस्त्राने जागो-जागी फाटलेला चेहरा, त्यावरच्या वाळलेल्या जखमा ! खोल जाऊन, जवळ-जवळ नाहिशे झालेले डोळे. डोक्यावर झालेल्या वारामुळे तिथे असलेली मोठी भेग. हे सगळं वृंदाला स्पष्ट दिसत होतं.
ओरडून आईला जागं करण्याचा तिचा प्रयत्न निश्फळ होता. त्याने आईला वश करून अधिच झोपवलं होतं. त्याचा रोख आता वृंदाकडे होता. वृंदा ओरडू लागली, वण तिचा आवाज कुणालाही ऐकू जात नव्हता. तो साधारण दहा फुटाच्या अंतरावर मागे सरकला. दोन्ही हात वर केले आणि छताकडे पाहू लागला. छताला लागलेली झुंबरं घाबरून जोर-जोरात डोलू लागली. काचेचे तुकडे खाली पडून उडू लागले. काही तुकडे वृंदाच्या हाता-पायात घुसले. तिचा श्वास वाढू लागला. काचा अंगात घुसल्या खऱ्या, पण रक्त आत गोठलं होतं. वृंदाची नजर त्याच्यावरून हलत नव्हतीच. तो तसाच गोल फिरू लागला. खोलीतल्या किरकोळ वस्तू त्याच्या इशाऱ्यावर फिरू लागल्या. दिवे, मेजावर ठेवलेले कागद, शाईची दौत, सगळं-सगळं हवेत उडू लागलं. खोलीभर पसारा होऊ लागला.सगळं विस्कटू लागलं. वृंदाचे हात-पाय एकाच भिंतीला जखडले गेले होते. तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. आता तिच्या अंगात भीती आणि शोक दाटून आला होता. त्याचे भयानक स्वरूप आता अधिकच भयानक होऊ लागले होते. तो अधिक विक्राळ होत होता. एक-एक पाऊल आता तो वृंदाच्या दिशेने टाकत होता. त्याचे जड पाय आणि खालच्या शहाबाद फरशीला घासत असलेले गंजलेले साखळदंडाचं आवाज अक्षरशः कानाचे पडदे जळत येत होता.
तो वृंदाच्या अगदी जवळ आला. एकसारखं तिच्या डोळ्यात पाहण्याचा त्याचा प्रयत्न फसत चालला होता. लालबुंद डोळ्यात रक्त उतरलं होतं. कुठलाही प्रतिशोध अथवा हिंस्त्रपणा त्यात दिसत नव्हता. पण निर्दयी असल्याच्या खुणा होत्या. चेहऱ्यावरची बरीच कातडी , हाताने ओढून काढल्यासारखी जागच्याजागी बाहेर आली होती. अंधारामुळे त्याचा नीटसा रंग कळत नव्हता.
" कशाला जायचंय तुला किल्ल्यात ? काय बघणार आहेस तिथे?" त्याचा तो आवाज वृंदाच्या कानात पडताच त्यातून ओघळू. तिच्या डोक्यात कंपनं होऊ लागली. कुणीतरी कानातून डोक्यात शिरलंय आणि मेंदू पोखरत जातंय. बुबुळं वर जाऊन डोळ्यांच्या खाचा पूर्ण पांढऱ्या झाल्यात. शरीरातला रक्तप्रवाह क्षणा-क्षणाने वाढत होता. नसा वर येत होत्या. रक्त उसळून शरीरातुन बाहेर यायच्या वाटेवर होतं. हृदय उडू लागलं होतं. त्याला काही विचारण्याच्या मनःस्थितीत ती अजिबात नव्हती. तो मात्र एकाच जागी उभं राहून वृंदाच्या शरीराचा-मनाचा ताबा घेत होता.
वृंदा आता त्याच्याकडे एकसारखं बघत होती. त्याचे लालबुंद डोळे आणि तिचे पांढरे पडलेले डोळे, एकाच ओळीत आले. वृंदाच्या हाव-भाव बदलू लागले. तिच्यातील ती नाहीशी होत आता त्याच्यात मिसळू लागली होती. त्याच्या राठ, काळ्या-कुट्ट हाताने त्याने तिचा चेहरा धरून ठेवला. गालाला हाताचा स्पर्श होताच तिथली कातडी जळू लागली. वृंदाचं शरीर तिच्या ताब्यातून जात होतं. पण वेदना मात्र होत होत्या. शरीराचा एक-एक भाग फाटत होता. जागो-जागी आग होऊन अंगाची लाही होत चालली होती. वृंदाच्या मनाचा एक भाग , जो हळू-हळू त्याच्याकडे ओढला जात होता, तो विभत्स हसत होता आणि शरीर मात्र वेदनेने कण्हत होतं. आतील अवयव आकाराने अवास्तव वाढल्याची जाणीव तिला होत होती. हे थांबलं नाही, तर आपल्या शरीराच्या चिंध्या होतील हे ही तिला कळत होतं.
मागच्या भिंतीला तडे जायला लागले. वृंदाने वळून पाहिले. भिंतीत एक भगदाड तयार होत होतं. तिचं शरीर त्यात ओढलं जात होतं. तो तिला आत ढकलत होता. त्याच्या क्रौर्याची अघोषित सत्ता हवेलीच्या प्रत्येक सजीव-निर्जिवावर होती. वृंदाचे अर्धभाग भिंतीत ,खिळा ठोकावा तसा ठोकला जात होता. एकएक वीट , चुना, मातीचा ढीग तयार व्हायला लागला होता.
तो अचानक थांबला. त्याची पाऊलं मागे सरकू लागली. तो अत्यंत हीन नजरेने वृंदाकडे पाहू लागला. ती एका क्रूर भोग्यची नजर होती. वासनांध नराधमाची नजर होती. मनुष्यवस्थेत राहून गेलेल्या अतृप्त इच्छा त्याच्या जिभल्यांतुन दिसत होती. त्याचे हातही शिवाशिवत होते. तो पिसाळत होता. पण त्याला मर्यादा होत्या. भोगायची इच्छा असूनही तो वृंदाला स्पर्शही करू शकत नव्हता. मानवी शरीर त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. त्याचा हात लागताच ते नष्ट होणार होते. त्याच्यातला असुरी ताप वृंदाच्या शरीरात सोडून, तिलाही त्याच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न तो करत होता. तिचे शारीरिक बळ त्याच्यासमोर पिंपळाच्या वाळक्या पर्णासारखे होते, जे पहिल्याच स्पर्शात छिन्न झाले असते. तिच्यात तसे बदलही होत होते.
मानवी सचेतातून वृंदा असुरी होत चालली होती. भेसूर होत चालली होती. ती कुठे आहे ? तिला काय होतंय ? या सगळ्या जाणिवा हळू-हळू कमी होत होत्या. तिची प्रवृत्तीदेखील बदलत चालली होती. आतील आत्मा मात्र धडपडत होता.
.....
सकाळ रोज सारखी झाली. तिने डोळे उघडले तेव्हा ती पलंगावर निपचित पडलेली होती. हातापायाच्या हालचाली थांबल्या होत्या. काहीच जाणीव नव्हती. आई, काकू, यमाबाई, दुर्गा बाजूला बसल्या होत्या. दोन-तीन नवीन माणसं होती. मानेखालच्या सगळ्याच संवेदना नाहीश्या झाल्या होत्या. वृंदाला कळून चुकले. त्याने वृंदाला अर्धवट जायबंदी करून सोडून दिले होते. जन्म-मृत्यूच्या चौकटीत तिला उभं करून तो पसार झाला होता. ढीगभर विचार, खंडीभर प्रश्न, वेदनेचा प्रचंड भार तिच्या मेंदूवर थोपवून, तिचे शरीर मात्र त्याने निकामी करून सोडले.
"मेंदूवर ताण पडल्याने त्यांना पक्षघाताचा झटका आलाय." बाजूच्या गावचे प्रख्यात वैद्य सकाळीच हवेलीत दाखल झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण होता. हे ऐकून वृंदाच्या आईने हंबरडाच फोडला. काकू त्यांच्याजवळ गेल्या खऱ्या , पण काय बोलावे हे सुचले नाही. तिथे कुणालाच काय बोलावे कळत नव्हते.
"शुद्ध आलीये त्यांना. जीव जाण्याचा धोका टळला. शुद्ध ही शरीर सचेत असल्याची खूण आहे. बेशुद्धावस्थेत शरीरातील एक-एक अवयव निकामी होऊन यांचा प्राण गेला असता, तरी कळलं नसतं !"
थोडीशी सुटका सगळ्यांची झाली.
"गुरुजी, याला काहीतरी इलाज...?"
" वेळ...काळ हाच इलाज !" त्यांनी बाजूच्या एका मातीच्या भांड्यातून वाटलेली एक हिरवी बुटी काढून तिच्या कपाळाला आणि हातापायाला लावली.
"हिची इच्छाशक्ती...! जगण्याची आणि बरं होण्याची ही !"
"माझं नाव विश्वनाथ ! बाजूच्या गावात रहातो आम्ही ! पिढ्यांपिढ्या आयुर्वेद हाच आमचा व्यवसाय आणि साधना...! तुम्हाला लवकर बरं वाटावं, म्हणून देवाकडे प्रार्थना करेल मी...!"
त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज होतं. चालण्यात एक खंबिरता आणि बोलण्यात गंभीरता होती. वृंदाची परिस्तिथी त्याला ठाऊक होती.
"यांच्याजवळ कुणीतरी सारखं थांबावं. यांना एकटं ठेऊ नका." तो बोलला.
" आपली व्यवस्था इथेच केली आहे. गावातल्या वाड्यात ! "
" हो, येताना मी न लागणारं साहित्य तिथेच ठेवून आलो. माझा टांगा तिथेच आहे."
आत आईला ठेवून काकू, यमाबाई आणि विश्वनाथ बाहेर आले.
"तुमचा हट्ट त्या मुलीच्या जीवावर उठला आहे." तो काकुवर रागावला. काकू खिन्न झाल्या.
"जर मला वेळीच जाग आली नसती, तर हिचा जीव गेला असता." आपली थैली त्याने त्याच्यासोबत आलेल्या म्हाताऱ्याच्या हातात दिली.
"यात तिच्या कपाळाचा मळ आहे. त्यावर आपली अग्नीक्रिया करून बघा आणि मला सांगा." म्हातारा निघून गेला.
"या क्रियेचा फारसा उपयोग होईल की नाही, मला खात्री नाही. हिचे आणि तुमचे गोत्र वेगळे आहे. मी तुमचा ....!"
" गुरुजी, हिला काहीही होता कामा नये. काहीही करा ! "
बाजूला असलेल्या दगडी खांबाला टेकून तो विचार करू लागला.
"एक इलाज होऊ शकतो. पण तो कितपत योग्य आहे ? हिचे आणि मोहनचे लग्न पहिल्या मुहूर्तावर...!"
" नाही नाही...हे काय भलतं !"
"मग आमचे इलाज संपले...! मी माझ्या मुक्कामी जातोय. निरोप कळवा."
"ती हिचे लग्न मोहनशी इतक्या सहज ...?"
" याचा विचार तुम्ही यांना इथे बोलवण्याआधी करायला हवा होता." बोलता-बोलता तो पायऱ्या उतरून निघून गेला.
विचारांच्या कोलहालाने मालिनीच्या डोक्याचा भुगा झाला होता. वृंदाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जवाबदार आपणच ठरू, त्यापेक्षा जास्त, तिचा बळी जात असताना आपल्याला काहीच करता आले नाही, या विचाराने तिच्या दुःखाच्या बांधाला भेगा पडत होत्या. संध्याकाळी तिने यमाबाईला आपल्या खोलीत बोलावून घेतलं. घडलेलं सगळं यमाबाईला देखील माहिती होतं. इलाज तिच्याकडे देखील नव्हताच.
"थोडक्यात निभावलं !" काकू तिला सांगू लागल्या. "नाहीतर...!''
"गुरुजींनी सांगितले , ते वाटते तितके सोपे नाहीये."
"नकोच !" थोडा विचार करून यमाबाई म्हणाली. "ती नाही होऊ देणार !"
'ती' विक्षिप्त होती. क्रूर होती. तिच्यात अफाट असुरी शक्ती होती. कोणत्याही साधारण मानवाला ती तिच्या ताब्यात सहज घेऊ शकत होती. वासनेच्या आहारी जाऊन एखाद्या निष्पाप जीवाच्या आयुष्याची झालेली होळी तिला अजिबात सहन होत नसे. अत्यंत निर्घृणतेने ती याचा प्रतिशोध घेत असे. गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या विशाल , उजाड माळरानावर तीचा वावर होता. कुणी प्रत्यक्षात तिला पाहिलं नव्हतं. पण तिची जाणीव मात्र खूप लोकांना झाली होती. तिने मुद्दाम कुणाची वाट अडवली नाही. रात्री-बेरात्री परगावाहून येणाऱ्या , चुकलेल्या-थकलेल्या वाटसरुंना तिच्या कण्हण्याचा आवाज आला होता. मनात साठून असलेलं इतक्या वर्षांचं दुःख ! कुणाशी बोलणार ? कुणाला सांगणार ? अंधार पडल्यावर एकटी ती जंगलात रडत बसायची. सहसा गावात ती येत नसे. तिला कुणी पाहिलं नव्हतं. पण खूपदा हवेलीच्या मागच्या बाजूला ती हिंडायची. कधी-कधी तिच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा. यमाबाई, मालिनी, यांना तर खूप स्पष्ट ! इच्छा असूनही त्यांना काहीही करता आले नव्हते.
तिच्या दुर्दैवाने तिची पाठ सोडलीच नव्हती. उन्हाळे-पावसाळे वाढत होते, तसा तिचा आत्मा देखील अधिक बलशाली होत होता. व्याकुळ होऊन तिने हवेलीला दिलेला शाप मोठा भयानक होता. त्यांच्या प्रत्येक पिढीला तिने यात जखडून ठेवलं होतं. तिची असुरी सावली, हेवलीत होणाऱ्या प्रत्येक कार्यावर पडत असे.
"अजूनही आठवतं मला ! सरदारांच्या बहिणीच्या लग्नात...!" मालिनीच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहीला. सरदारांच्या बहिणीचे लग्न हवेलीवर ठरले. नको-नको म्हणत असताना देखील ,केवळ विजयाच्या हट्टामुळे तोरणं वर चढवली गेली. एकुलती-एक बहीण ! सरदारांनी देखील होकार देत सगळी व्यवस्था केली. अगदी वास्तूशांती देखील करून घेतली. सगळी कडे पत्रिका देण्यासाठी घोडे दिमाखात दौडू लागले. दिवसभर हवेलीत कासार, सोनार गर्दी करू लागले. आप्तेष्टांच्या लेकी-बाळींच्या हाती बांगड्या किणकिणू लागल्या. बऱ्याच वर्षांनी हवेलीला नवा रंग देखील चढला. कामगार, कारागीर यांची गर्दी होऊ लागली. आश्चर्य म्हणजे, एकही कारागीर, कामगार गावातला नव्हता. गावातील कुणीही हवेलीची कामं करण्याचे धाडस नाही केले. वऱ्हाड हवेलीच्या दिशेने यायला निघालं. त्यांना येण्यास दीड दिवस लागणार होता. परवा सकाळचा मुहूर्त होता. शे-सवाशे बैलगाडी, पाच-पन्नास घोडे असावेत. रस्ता घाटाचा आणि धोकेदायक असल्याने विदेशी गाड्या त्यांनी आणायचे टाळले.
विजया आपल्या खोलीत येणाऱ्या दोन दिवसांची तयारी पहात होती. छाया आरशासमोर बसून स्वतःला नटवून पहात होती.
"दागिने उंची आहेत बाई तुझ्या सासरचे ! आम्हाला पण असं एखादं स्थळ सांगून येईल तर बरं होईल !!"
"नशिबी लागतं सगळं ! तुझंही खुलेलं. त्यात काय काळजी ?"
" कुंवर आहेत ही तसेच म्हणा ! सरदारांपेक्षा पाचपट तालेवार असुन कशाचा गर्व नाही."
"होय, तर मात्र खरं...!"
विजया दागिने नीट लावून ठेवत होती. बराच वेळ छाया काही बोलली नाही.
"तुला देखील आमच्याच गावी यायचं आहे. सरदार काही दिवसांनी तुझी पाठवणी देखील माझ्याच गावी करतील."
तिकडून काहीच उत्तर आले नाही. व्यस्त असलेल्या विजयाने देखील याची दखल घेतली नाही.
"हे बघ, ही नथ ! वहिनीसाहेबांनी तुझ्यासाठी खास बनवून घेतली आहे."
छाया मख्खा सारखी बसली होती. काहीच हालचाल नव्हती. विजयाने आधी फारसे लक्ष दिले नाही. पण वेळ गेला.
''छाया...?" काहीच उत्तर आले नाही.
"काय झाले...?" दुबार बोलावल्याने देखील काहीही हालचाल न झाल्याने विजया उठली. छाया खाली मान घालून बसली होती. तिचा चेहराही दिसत नव्हता.
"छाया...?" आता मात्र विजया घाबरू लागली. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी तिची मान खांद्यावरून निखळून पडली.
खांद्यावरून निखळून मान एखाद्या मोठ्या चेंडू सारखी फरशीवर गडबडत गेली. सुरवातीला काहीही न कळलेल्या विजयाने एकच हंबरडा फोडला. छायाच्या उर्वरित धडातून रक्त ओसंडून वाहू लागले. खांद्यावर हात ठेवलेल्या विजयाचे मेहंदीचे हात रक्ताने माखले. छायाचे कपडे देखील क्षणात ओले-लालबुंद. धड विजयावर कलंडले. अंगावर रक्ताचा पाट सांडला. विजया जोरजोरात किंचाळू लागली. शेजरच्या खोलीत असलेली मालिनी , यमाबाई आणि काही नोकर मंडळी या आवाजाने धावत आले. दारातुन घडलेला प्रकार त्यांनी पाहिला. छायाचं शीर जमिनीवर अजून डोलत होतं. ,तिचे डोळे तापलेल्या लोहासारखे लाल झाले होते. त्वचा पांढरी पडली होती. केस पिंजारलेल्या काळ्या मेंढीच्या लोकरी सारखे राठ झाले होते. धडापासून शिरापर्यंत रक्ताची धार लागली होती.
तेवढ्यात ते शीर सरळ झाले. तापलेले डोळे स्थिर झाले. पापण्या हलू लागल्या. धडापासून थोड्या अंतरापासून असलेल्या विजयाचा श्वास कोंडू लागला. तिच्या गळ्यात असलेल्या गोफाने तिचा गळा आवळला जाऊ लागला. तिथून देखील रक्ताची धार लागली. हे पाहून मालिनी पूढे सरसावली. खोलीचे एक दार धाडकन बंद झाले. तो संकेत होता. कुणीही जागचे हलू नये म्हणून !
"लग्न करताय? तोरणं बांधताय ?" कानठळ्या बसतील इतक्या कर्कश्य आवाजात छायाचे शीर बोलू लागले. अधिच घाबरून गेलेल्या तिथल्या प्रत्येकाचे अंग आता भीतीने कापू लागले. समोर साक्षात काळ होता.
"मी बरी होऊ देईल...!" ती अतिशय क्रूरपणे हसू लागली. तिने अजूनही विजयाचा गळा सोडला नव्हता. विजयाला भूरळ येऊ लागली होती.
"तुम्हाला काही साजरं करण्याचा अधिकार नाहीये. तुमच्या नशिबी फक्त दुःख आणि वेदना आहेत ! सोहळे नाहीत..!"खोलीभर एक वेगळाच दुर्गंध पसरून तो सगळ्यांना झोम्बु लागला. विजयाच्या गळ्याच्या नसा गोफाने आवळून धरल्या होत्या. तिची बुबुळं लहान होऊ लागली होती. तिच्या कंठातून आवाज फुटेनासा झाला. शीर जोर-जोरात हसत होते. छाया केव्हाच गेली होती.
विजयाचा गळा सुटला. ती धाडकन जमिनीवर पडली. खोलीतील सगळयाच चिज-वस्तूवर रक्ताचे डाग होते. विजया जमिनीवर निपचित पडून होती. ती श्वास घेण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. तिची हालचाल हळू-हळू मंद होत होती. सरदार, मालिनी आणि जमलेले लोक एक जागी स्तंभ होऊन सगळं बघत होते. काहीही गत्यंतर नव्हतं.
फरशीवर निपचित पडलेल्या छायाचा देह फरफर ओढला जाऊ लागला. खिडकीच्या काचा ताड-ताड तुटल्या आणि तो खाली घातलेल्या मंडपावर जाऊन पडला. शिरातल्या खोल गेलेल्या डोळ्यातून काळे पडलेले रक्त धारेने वाहू लागले. मालिनीने खोलीत प्रवेश केला. चार जणांनी उचलून विजयास खोलीबाहेर नेले. मालिनीने खोलीचा अजस्त्र दरवाजा बाहेरून लावून घेतला. संध्याकाळी विश्वनाथच्या वडिलांनी एक कोहळा लाल फडक्यात बांधून त्या कुलपाला बांधला. छोटा विश्वनाथ बाबांकडे, तर कधी त्या लाल कोहळ्याकडे, तर कधी कुलुपाकडे बघत राहिला. काही दिवसांनी विजया अगदी साध्या पद्ध्तीने ,महादेवाच्या मंदिरात विवाहबद्ध झाली. हवेलीतले असे अनेक दरवाजे बंद होते. अनेको घटनांनी कोपरा-न-कोपरा ग्रासला होता.
"एकमेव उपाय आणि तो प्रत्यक्षात उतरवणं, दोन्ही अवघड आहे. आपल्यामुळे हकनाक त्या पोरीचा जीव....!"मालिनीला भरून आलं.
"त्यात तिचा तरी काय दोष ? आपलीच बाजू कमकुवत आहे." दोघी किल्ल्याकडे बघत तश्याच उभ्या राहिल्या.
.....
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य