महालगड भाग 13
त्या जागी एकेकाळी ताराची झोपडी होती. अचानक अंधार झाला. वृंदाला सूक्ष्मरुपात तारा दिसली. तिच्या पोटात एखाद-दीड महिन्याचं अर्भक होतं. ती आनंदी होती. जवळ शांता बसला होता. त्या रात्री जे काही घडलं, ते सगळं वृंदाला दिसलं. त्या रात्री तिथे असलेल्या प्रत्येकाची उद्विग्नता तिला दिसली. प्रत्येकाच्या मनात काय सुरू आहे, हे कळलं. तिचे डोळे वाहू लागले. तिला पिसाळलेला चंद्राजी दिसला. अत्याचार होत असताना आतून तुटत असलेली तारा दिसली. तिला आणि होणाऱ्या बाळाला वाचवण्यात हतबल झालेला शांता दिसला. तारेचे उदरात हालचाल करणारं बाळ दिसलं. आईच्या उदरात त्याला त्या रात्री असंख्य वेदना झाल्या होत्या. त्या वेदना सहन न झाल्याने त्याने आईच्या उदरात आपला कोवळा जीव सोडला. त्यांच्या जळणाऱ्या झोपडीकडे पाहून जोरजोरात हसणारा चंद्राजी दिसला. तो राक्षसासारखा दिसत होता. मोठे दात, सुजलेला जबडा, एखाद्या विखारी अजगरासारखी बाहेर येणारी, रक्तरंजित जीभ ! आतून पूर्ण उध्वस्त झालेल्या ताराचा आत्मा आपल्या बाळाला घेऊन बाहेर येत होता.
" माझं सगळं उध्वस्त केलं तू...!" तारेचा आत्मा बोलू लागला.
"भोग, लालच, व्यसनं, वासना, याचं मूर्तिमंत आगार झाला आहेस तू." तिचं आत्मरुप अतिशय उग्र होत चाललं होतं.
"माज आहे तुला, तुझ्या शक्तीचा, तुझ्या स्थानाचा. पण एक लक्षात ठेव. एका आईच्या मायेला तू जन्माला यायच्या आधीच , उदरात तू मारलं आहेस. या पुढे तुझ्या मूळ-कुळात जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला हा शाप लागेल. उदरात वाढत असलेल्या माझ्या मुलाचा बळी तू निर्दयीपणे घेतलास. तो तुझ्या मूळ-कुळात जन्माला येणाऱ्या बालकाचा बळी तर नाही घेणार, पण त्याला नराधम करून सोडेल. तो एक नर-पिशाच्च म्हणून जन्माला येईल. तो एक भोगी म्हणून जन्माला येईल. तो एक राक्षस म्हणून जन्माला येईल. आणि त्याचे रक्षण करशील तू...!"
वृंदा सगळं काही ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळ-घळ पाणी वहात होते.
" तुला मुक्ती नाही. तुझ्या दुष्कृत्यातून जन्माला आलेला हा शाप, तुला तुझ्या आत्म्यावर एक भार म्हणून वागवावा लागेल."
काही वेळाने सगळी राख झाली. वृंदा आणि तो देवदूत, एकटेच उरले.
" तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील !" ती काहीच बोलली नाही.
"चल...!"
" आता कुठे ? हेच ते मूळ, ज्याची सावली आजही त्या हवेलीवर आहे."
"नाही ! हे मूळ असलं, तरी तिथे काहीतरी वेगळं आहे."
दोघांनी हेवलीचा रस्ता धरला. त्या घटनेनंतर चंद्राजीने गावात जागोजागी अत्याचारांचा सुळसुळाट लावला. घरातील पोरी-बाळी, जनावरं उचलली जाऊ लागली. तरुणांचे , त्याला आडवं जाणाऱ्यांची प्रेतं पडू लागली. वृंदा हे सगळं बघत होती. गावातला एकही रस्ता असा उरला नव्हता, जिथे रक्ताचे पाट वाहिले नसतील. गावातील एकही घर असं नव्हतं ज्याच्या अंगणात आक्रोश नव्हता. प्रत्येक घरातून स्त्रियांचे, लहान मुलांचे रडण्याचे विदारक आवाज येत होते. वृंदास एक-एक पाऊल टाकणे अवघड जात होते.
" ही पूर्ण जमीन शापित झालीय वृंदा ! एकेकाळी माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे, खुद्द नियतीने या जमिनीला शापित केलं. या लोकांचा तसा पहिला , काही दोष नाही. माणसाची दोन प्रारब्ध असतात. पहिलं त्याचं स्वप्रारब्ध असतं, दुसरं त्याच्या सभोवताली असलेल्या स्थावर-अस्थावर मातीशी निगडित असलेलं परप्रारब्ध. त्याच्या पूर्वजांनी केलेली कर्म , तो जन्माला आला त्या वास्तूतील गुण-दोष, तो चालतो ती माती, खातो ते अन्न, या सगळ्या बाह्य गोष्टीतून त्याला मिळत असलेली सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हे सगळं-सगळं घडवत असते. यांच्यापैकी अधिकांश जणांना याची बाधा आहे. ही शापित भूमी निमित्तमात्र आहे."
हवेलीच्या दारापाशी ते येऊन थांबले.
"माझी हद्द इथंपर्यँत ! आत तुला अजूनही काही अनुभव येतील. लक्षात असू दे, तू सूक्ष्मरुपात आहे. कोणासही तू दिसणार नाहीस. तुझा आवाज कुणाला ऐकू येणार नाही. तुला जे दिसेल, ते सत्य असेल. रात्री तू यातून मुक्त होशील...!" तिच्याकडे पाठ करून तो निघून गेला.
वृंदा मोठ्या लोखंडी फटकातून आत गेली. नेहमीपेक्षा सहाजिक तिला हवेली वेगळी भासली. रंग पूर्ण काळा झालेला आणि जागो-जागी मोठाली भगदाडं पडलेली होती. त्या भगदाडातून असंख्य अर्धवट जळालेली, छिन्न-विच्छिन्न झालेली प्रेतं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. हवेलीच्या भिंती यांच्या जीवावर उभ्या राहिल्या आहेत, हे कळायला वृंदाला वेळ लागला नाही. थोड्या-फार अंतराने ही प्रेतं दिसत होती. दिवाणखान्यात शिरल्यावर तिला धक्काच बसला. काही मुली वर छपराला लटकल्या होत्या. त्यांच्या सर्वांगातुन रक्त येत होतं. त्या वृंदाकडे एकटक बघून एकदम क्रूर हसत होत्या. हवेलीत झालेल्या अत्याचारांच्या बळी ठरलेल्या या मुलींचे आत्मे आजही तीथे होते. न्याय मिळावा, म्हणून वाट बघत होते. प्रत्येक खोलीत तिला असाच प्रकार दिसत होता. एकही खोली अशी नव्हती, ज्यात पीडित नसावा. देवघराच्या बाहेर वृंदा उभी राहिली. तिने आत वळून पाहिलं. आतून धुपाचा सुंदर सुगंध येत होता. चंदन आणि मोगऱ्याचा वास होता. तिने आत पाऊल टाकलं. देवासमोर कुणीतरी बसलं होतं. वृंदाने त्यांना पाहिलं. मोहनची आई होती. ती वृंदाकडे बघत हसू लागली. हे सज्जनतेचं लक्षण होतं. वृंदाचा जीव भांड्यात पडला.
देवाजवळ बसलेली ती माऊली अत्यंत शांत स्वभावाची भासत होती. देवाकडून काहीही मागत नसावी. कदाचित तिची सगळी इच्छाशक्ती पणाला लागली होती. ती अतृप्त नव्हती, तशी ती तृप्त ही नव्हती. वृंदा तिला लांबून पहात राहिली. यया खोलीत सात्विकता होती, पावित्र्य होतं. वृंदाला ही जागा सोडविशी वाटली नाही.
"तू आत येऊ शकतेस...!" देवाकडे पहातच ती बाई म्हणाली. "इथे तुला कशाचेही भय नाही. कसलीच भीती नाही." वृंदा आत आली.
"तुम्ही...!"
"आई त्याची...! "
वृंदाने हात जोडले. " पाहिलंस सगळं ?" त्यांनी तिला विचारलं. " हो ! सगळ्यांची खरी रूप दिसली. भयानक आहेत."
" हे सगळं तुला उघड्या डोळ्यांनी नसलं दिसलं. मोहनला जन्म देताना झालेल्या वेदना, या वेदनांपेक्षा थोड्या कमी होत्या." त्यांचा आवाज खोल गेला. " लहानपणी जवळ येऊन बसायचा. खूप रडायचा. त्याच्याशी खेळायला नव्हतं कुणी येत. भीती, तिरस्कार, अवहेलना हे सगळं वाट्याला आलं, तरीही तो खंबीरपणे उभा असायचा. आजही आहेच."
"हे सगळं कळतंय मला. पण तुम्ही या सगळ्याचा उपाय कधी शोधला नाही ? जे सुरू होतं, ते तसंच सुरू राहिलं. उलट जास्त भयावह होऊ लागलं."
" असं नको म्हणुस ! इलाज शोधणारे थकले होते. सगळं काही करून पाहिलं. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही."
" आणि तुमचे पती...?"
घनघोर शांतता पसरली. वृंदाने हा प्रश्न उगाच विचारल्यासारखा झाला.
"त्या माणसाने केव्हाच संसार सोडला. हे घर सोडलं. या सगळ्याला कंटाळून ! आज त्यांचं समाजात नाव ए, सगळी सुखं आहेत. पण इथे जे काही सुरू आहे, याच्याशी त्यांचा संबंध फक्त व्यवहारापूर्ती ! मी अंथरुणाला खिळले. माझ्याकडून मिळणारं सुख संपलं. माय-लेकाला वाऱ्यावर सोडून ते निघून गेले."
हा इतिहास आपल्या बाबांनाही आपल्यापासून लपवून ठेवला, याचा वृंदाला राग आला.
"त्यात त्यांचा दोष नाही. प्रत्येकाला आपला जीव जवळचा असतो. मला देखील होता. त्याच्यावर जास्त भार आला, आणि मलाही जावं लागलं."
" पण याचा काहीतरी इलाज असेल न ? हे कुठवर असं सुरू राहणार. निष्पाप लोकांचे जीव जातायत. तुम्हाला मुक्ती मिळत नाहीये. या भिंतींच्या आत दडलेल्या लोकांना मुक्ती मिळत नाहीये. ते अनंतकाळापासून तिथे हाल भोगतायत !"
" आहे इलाज !"
रात्र पडू लागली. हवेलीत असलेल्या मशाली डोलून थकू लागल्या. इंचा-इंचाने त्यांची ज्वाला खाली बसू लागली. वृंदा देवघरातुल बाहेर आली. मोठा दिवाणखाना यावेळी मोकळा होता. सुक्ष्मरुपात तिला तो एखाद्या मोडक्या किल्ल्यासारखा दिसला. न वर झुंबरं, न खाली कालीन. अर्धवट जळालेल्या भिंती, भगदाडं उजेड कमी असल्याने खायला उठत होते. प्रत्येक वरचा कोपरा काळ्या सावल्यांनी राखून ठेवला होता. एकीचं डोकं नव्हतं, तर एकीचे हात खांद्याखाली निखळते झाले होते. काहींची शरीरं लक्तरं होऊन कमरेखालून लोम्बत होती. काहींच्या डोळ्यांच्या खाचा आता कोरड्या पडल्या होत्या, तर काहींच्या तोंडात जीभ नव्हती. प्रत्येकाला एक दारुण शिक्षा झाली होती. अशी शिक्षा, जी माणुसकीला सपशेल लाजवणारी होती. अधर्माला धरून होती. राक्षसी होती. अभद्र होती. स्वतःच्या स्वभावाने आणि मनःस्थितीने केलेल्या तथाकथित न्याय होता तो. स्वतःच्या मनातील सगळाच द्वेष, घृणा , प्रतिशोध आणि हैवनियत याची सांगड होती ती. माणसाच्या कातडीत छुप्या नराधमाची परिपूर्ण ओळख त्याने होत होती. दिवाणखान्याच्या मधोमध , छपरावरून काही फासावर टांगलेली प्रेतं खाली उतरून येत होती. अंगावर एकंही कपडा नाही. बेताने सोललेली कातडी, अडकीत्यांनी छाटलेली बोटं, पकडीने अगदी निर्घृणतेने काढलेले दात आणि दाढा ! काहींच्या डोक्यावरचे केस अर्धवट काढलेले होते. हे कोणते गुन्हे होते, ज्याची शिक्षा नरकाहुन भयानक होती ?
वृंदा सगळंकाही पहात होती. अचानक तिच्या पायाला काहीतरी लागलं. त्याकडे लक्ष जाताच तिचं काळीज फाटलं. ती जोरात किंचाळली. हेवलीच्या शहाबादी फरशीवर दहा-बारा लहान मुलं खेळत होती. त्यातील काही तर तीन-साडेतीन वर्षाची होती. अंगावर अर्धवट भाजल्याच्या खुणा होत्या. काहींची पाठ कोडाने सोलून काढली होती. काहींचे डोळे, तर काहींची जीभ जागेवर नव्हती. वृंदा सूक्ष्मस्वरूपात असल्याने तिला शारीरिक त्रास होणं शक्य नव्हतं. पण तिच्या मेंदूला आता मुंग्या येऊ लागल्या होत्या.
"कोण होते हे लोक..?" तिने स्वतःला प्रश्न केला.
"काय करशील उत्तरं ऐकून ?" एक मंजुळ आवाज तिच्या कानी आला. त्या आवाजात वेदना होत्या, कारुण्य होतं. तिच्या डाव्या बाजूने तो आवाज येत होता.
"कोण ?" ती पूढे सरकू लागली.
"तिथेच थांब..…!" आवाज येताच तिची सरकती पाऊल जागेवर थांबली.
"तू पाहिलं ते सहन केलंस. झालं ते खूप झालं. तू आज जे काही पाहिलंस, ते कधीच कुणाला दिसलं नाहीये. कारण कुणी ते पहाण्याची इच्छा कधी बोलून नाही दाखवली." तो आवाज अंधारात फिरत होता. त्याच्या बोलण्यात तळमळ आणि हतबलता होती.
"कुणी कधीही विचारलं नाही , हे काय आहे, याला जवाबदार कोण किंवा याला कारण काय आहे ? फक्त पहात राहिले, सहन करत राहिले. लोक मरत होते आणि त्याची पापं इथल्या भिंती पोटात घेत होत्या. कोवळ्या, निष्पाप जीवांच्या हत्येवर रंग चढत गेले. दिवे लागले, मशाली लागल्या ! डाग धुतले गेले, पाप मात्र कुजत राहिलं. इतकं कुजलं, की या वास्तूलाही त्याची सवय झाली."
"किती शोक आहे...? किती वेदना आहेत...? किती तळतळाट आहे..? आश्चर्य आहे ! वाणीने कुणी दुखावलं, तरी त्याचा भार सोसत नाही. आणि तुम्ही प्रेतांच्या खचावर निर्भीडपणे श्वास घेता आहात."
"कुठे श्वास घेतोय...?" कदाचित वृंदाचं हे बोलणं आवडलं नसावं. "कुठे जगतोय ? एक चालतं-बोलतं प्रेत कपड्याने झाकून लोकांत फिरतंय. ही सगळी पापं रक्ताने रक्तात मिसळलेल्या प्रवृत्तीची आहेत. एका पिढीने पुढच्या पिढीला दिलेला हा घृणास्पद वारसा आहे. कितीही जीवावर आलं, तरी हे कृत्य ओढवं लागतंय. आता हे इतकं अवजड झालं आहे, की याला नरकात देखील शिक्षा नाहीये. याला इथेच, इहलोकात शिक्षा आहे...!"
"कोणती...!"
"इथेच रहाण्याची...!"
"म्हणजे ?"
"मृत्यू नंतरची सदगती आम्हाला नाहीये ! कर्मात आम्हाला स्थान नाही. आमच्या पूर्वजांच्या कोणत्याच पिंडाला काकस्पर्श झालेला नाही, होत नाही, आणि होणारही नाही ! स्त्री असो, पुरुष असो...!" त्याचा आवाज खिन्न होत होता. " आमचे कुणी दशक्रिय केले नाही. आमचा आत्मा कधीच आमच्या पूर्वजांच्या आत्म्याला भेटू शकत नाही. इहलोकीचा आमचा प्रवास कधी संपत नाही, कारण आमचे भोग कधी संपत नाहीत. आमचा छळ कधी संपत नाही....!" त्या आवाजातुन अनंतकाळापासून आत दबा धरून बसलेल्या भावना बाहेर येऊ पहात होत्या. कदाचीत त्याचं कुणी ऐकलं नसेल. अंगवळणी पडलेलं पाप , प्रारब्धात आलेले भोग, दैवाने मांडलेला छळ, नियतीने फिरवलेलं तोंड हे सगळं त्यातून आज बाहेर पडत होतं. वृंदा ऐकत होती म्हणून आज बोलणं तरी होत होतं. नाहीतर या डागाळलेल्या भिंतीव्यतिरिक्त कुणीही दुसरा साक्षीदार समोर नव्हता.
वृंदाला गहिवरून आलं. " आता ? यातून सुटका...!"
आवाज आला नाही. वृंदाने एक काळी मोठी पुरुषी सावली दिवाणखान्याच्या मुख्य दारातून बाहेर जाताना पहिली. तिने आजूबाजूला पाहिले. वर तिच्या खोलीकडे जाणारा जिना तिला दिसला. ती वर चढून गेली आणि तिच्या खोलीत तिने आत डोकावून पाहिलं. आत जे काही सुरू होतं, ते पाहून तिला रडूच कोसळलं. तिला आता भीती नव्हती वाटत. तिचं मन आता याहूनही भयानक काहीतरी होऊ शकतं, याची पूर्ण तयारी करून बसलं होतं.
तिचं शरीर नेहमीसारखं पलंगावर झोपून होतं. पलंगाखाली लाकडाचा मोठा खच रचून ठेवला होता. त्यातून लालबुंद ज्वाला निघत होत्या. त्यावर झोपलेली वृंदा भुरभुर जळत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलाही लवलेश नव्हता. आजूबाजूला काही अकृत्या उभ्या होत्या. ते सगळे या हवेलीचे पूर्वज होते...!
क्रमश..
लेखन :अनुराग वैद्य