सोनमूस
🔖 भाग::--दुसरा
गाडी आमोनीकडं निघाली.सुराला आपल्या सावत्र भावांनी व त्यांच्या मामानं घरातून हाकललं तो दिवस आठवला...
जशी गाडी पुढे धावत होती तशी त्याची विचाराची गाडीही मागे मागेच धावू लागली...स्वत: भोगलेलं व काही स्व जाणीव आल्यावर आइकडंनं ऐकलेलं त्याला आठवू लागला..
.
.
आर्णीच्या लग्नाला एक वर्ष झालं नी पोटी मुलगा जन्माला आला. नवरा पक्का बेवडा. निराधार पण कायम पिऊन आर्णीला मारणारा. पण तो जसा निराधार तशीच ही पण. आई क्षयानं पछाडलेली.
आर्णीच्या जिवनात सूर्यदेव उगवला म्हणून मुलाचं नाव तिनं सुरेश ठेवलं. नवरा बेवडा असला तरी पोरगा झाला म्हणून सासरवाडीला यायला निघाला. मनमाडला खुशीत भरपूर ढोसला व अड्ड्यावरच पडून राहिला. पाऊस सुरू झाला. थंड वाऱ्यानं उतरू लागली. म्हणून पुन्हा मारली व ट्रक पकडत बाराच्या सुमारास मालेगावला उतरला. पण वाहनाच्या प्रकाशात व फुल टल्ली यानं भर पावसात ट्रकखाली आला. रात्रीची वेळ, मरणाचा पाऊस.कोण थांबेल!काही वाहनं टाळत निघत तर काही वाहनं बेदरकार चालत राहिली. पहाटपर्यंत रस्त्यावरच रक्त पावसात वाहून पापडागत रस्त्याला चिपकलेलं प्रेत सरकारी दवाखान्यात गेलं. ओळखीचा तपास नाही. परस्पर विल्हेवाट लागली. महिन्यानंतर शोधाशोध नंतर त्याच्या मित्रांकडून मनमाडला अड्ड्यावर बसलेलं माहित पडलं मग बाराला ट्रकवर नी नंतर अपघात व स्टेशनात जमा दूर फेकलेल्या पिशवीतले कपडे यावरून ओळख.पण तो पावेतो कुठलीच विधी ना क्रिया. गेला व आर्णीस विधवा करून गेला. आधार कुणीच नाही. आई क्षयानं मरणाला टेकलेली. आर्णी एक वर्ष मुलाला सांभाळत मोलमजुरी करत मालेगावात राहिली.
आमोनीतल्या नथ्थूची ही तीच गत. बाई वारून चारेक वर्ष झालेली. दोन मुलं टाकून गेलीली. ओळखीकडनं कळालं. नथ्थूनं मध्यस्थी येडा बाप्पा या पुढाऱ्यास टाकत मालेगाव गाठलं. मोठा मुलगा सातेक वर्षाचा तर लहाना पाचेक वर्षाचा. आर्णीच्या आईनं सुरासहीत आर्णीला स्विकारायची अट घातली. तरूण आर्णी व आपल्या लहान पोरांना आई म्हणून नथ्थूनं खुशीनं मान्य करत आर्णीला आमोनीत आणलं. तिघा मुलासहीत ते राबत आनंदात राहू लागले. पण पाच-सहा वर्ष होत नाही तोच नथ्थू वारंवार आजारी पडत ढासळायला लागला. एका वर्षात त्याच्या देहाची झीज सुरू झाली. तोच कित्ता आर्णी ही गिरवू लागली की काय ती पण आजारी राहू लागली. मालेगावला चाचण्या झाल्या. दोन्ही एड्सबाधीत निघाले. दोघांचं नव्यानं उभं राहू पाहणारं सारं विश्वच उध्वंस्त झालं. तिघा मुलांच्या ही चाचण्या झाल्या.पण तिन्हही पोरं निगेटिव्ह निघाली. म्हणजे लग्नानंतरच लागण झाली असावी पण लग्नाला नऊ वर्ष होत नाही तोच पंधरा दिवसाच्या अंतरानं नथ्थू पाठोपाठ आर्णीही खंगत खंगत गेली. नथ्थू गेला तेव्हा त्याच्या पहिल्या मुलांचा मामा आला व त्यानं त्यांच्या भाच्याला पाणी द्यायला लावलं. पंधरा दिवसानंतर आर्णी गेली तेव्हा तो आला व तिलाही त्यानं त्याच्या सख्ख्या भाच्यानांच पाणी द्यायला लावलं. पाच दिवस तो थांबला व पाच दिवसातच सारा विधी आटोपला. पुढे पोराचं काय म्हणून आमोनीतली जाणती माणसं जमली. नथ्थूचं शेत गयभू अप्पाच्या शेताला लागूनच होतं म्हणून अप्पाचं नथ्थूशी व आर्णीशी जिव्हाळ्याचे संबंध होतेच.नथ्थूचं सहा एकर रान होतं. त्याची पहिल्या बाईची दोन मुलं व आर्णीचा पहिल्या घरचा एक अशी तीन मुलं. मोठा मुलगा आता सोळा वर्षाचा झालेला .दुसरा चौदाचा. पण सुरा! तो तर जेम तेम दहा वर्षाचा.तीन ही पोरं चमन गोटा करत बसलेली. गावातल्या येडा बाप्पानं कोंडी फोडली.
" बोला किसनभाऊ पुढचं कसं करायचं पोरांचं?" नथ्थूच्या शालकास विचारलं.
" मी माझ्या दोन्ही भाच्यांना माझ्या गावी नेतो! वागेन मी त्यांना!"
सारे जमलेली कचकच करायला लागले. आपापसात कुजबुजू लागले.
" किसनराव, तुम्ही तुमच्या भाच्यांना आधार देणार हे पुण्याचंच काम! पण मग सुरा ही मावं चा का असेना पण भाचाच समजा नी त्याला ही न्या सोबत!"
" बाप्पा, मी पोटावरचा माणूस . कुणाकुणाला सांभाळू!"
" तुमचं ही बरोबर आहे.पण नथ्थूची सहा एकर जमीन आहे तर त्यावर होईल ना गुजराण! करा एवढं .निपंखी पोरगं आहे! त्याला आता तुमच्या शिवाय कुणाचा आसरा!"
पण किसनरावानं पत्नीचं नाव पुढे करत सुरास सांभाळण्यास साफ नाकारलं. ज्या आर्णीनं त्याच्या भाच्यांना आठ नऊ वर्षे पोटच्या पोरागत माया दिली.त्याच आर्णीच्या पोरास आज किसनराव नाकारत होता. गाव ही काय करेल? पेचिदा मामला बनला होता.सुरा तर मोठ्या भावांच्या आड उभा राहत कावराबावरा होत बसलेला.
" मग एक उपाय आहे.त्या पोराचं दोन एकर कुणी तरी करावं व त्या बदल्यात त्या मुलास आसरा द्यावा!" येडा बाप्पानं तोड काढली. गर्दीत पुन्हा कुजबुज वाढली.
" बाप्पा,आपण दोन एकर कोणती जमीन सांगत आहात?" किसनराव कपाळावर आठी आणत विचारू लागले.
" कोणती म्हणजे! नथ्थूच्या सहा एकर रानातली!" येडा बाप्पानं खुलासा केला.
" नथ्थूच्या सहा एकरात सुराचा काय संबंध? आर्तीणीस लग्नानंतर पोरगा झाला असता तर दावा मान्य केला ही असता!पण लग्नाआधीच्या घरचा मुलगा तो; त्याचा कसला आला दावा! जमीन माझ्या भाच्यांचीच आहे."
" किसनराव! नथ्थूनं आर्णीला आणलं तेव्हा तिच्या आईला जबान दिलीय! मी होतो सोबत! स्वर्गाच्या दारात गेलेल्या माणसाच्या जबानीला बट्टा लावू नका!" येडा बाप्पा संतापात तिरमिरले.
" बाप्पा! नथ्थुरावांनी यास वागण्याची जबान दिली होती.ते हयात होते तो पावेतो वागलं त्यांनी! हयात असते तर वागलं ही असतं पुढे. पण याचा अर्थ स्वत:ची जमीन त्यास कशी दिली असती? आणि माझे भाचे पण एक चासदेखील देणार नाहीत त्याला! हवंतर त्यांनाच विचारा!"
" " लाला ,इकडे ये बाळा! बोल ,हा ही तुझाच भाऊ आहे.याला नाही का देणार जमीन?" सोळा वर्षाचा लाला पुढे सरसावला तसा लहान्या व त्या पाठोपाठ सुराही हात धरत उठला.पण लालानं त्याचा हात झिडकारला.
" माझा मामा सांगेल तेच आमचं ही मत आहे!" नुकतचं मिसरूड फुटू पाहणारा व आर्णीच्या मायेस विसरत मामानं पढवलेलं तेवढंच लाला बोलला.
" अरे बाबांनो! पण त्या निराधार पोराचा तरी विचार करा! त्याला तुमच्या शिवाय कोण आहे! भले जमीन नका देऊ पण जाण येईपर्यंत तरी सांभाळा!" येडा बाप्पा व गावकरी नमतं घेत विनवू लागले.कारण जमीन तर नथ्थूच्या नावावरच होती.
" मी माझ्या भाच्यांना घेऊन जातोय.त्याचं त्यानं बघावं!"
" किसनराव! बऱ्या बोलानं सांगितलेलं तुम्हास पटत नाही वाटतं. तुम्हाला जर त्याची पडली नसेल तर आमचा गाव ही त्याकडं पाहणार नाही. चला उठा रे! आणि लक्षात ठेवा त्या पोराला कोर तुकडा ही द्यायचा नाही .आप उपाशी राहिला तर हाच किसनराव त्याला घेऊन जाईन" सारे संताप करत उठले व घराला निघून गेले. जुन्या जाणत्यांना वाटत होतं की एक दोन दिवस पोरगं उपाशी राहिलं की यांनाच दया येईल व घेऊन जातील.पण झालं उलटच.मामा मामीनं गाव उठताच दोन्ही भाच्यांना घेतलं नी निघाले.सुरा लाला व शामाला बिलगत " दादा,दादा! मी पण येतो तुमच्या सोबत! मी इथं कसा राहू? " टाहो फोडत विनवू लागला. पण मामा मामीनं त्यांना पक्कं पढवून ठेवलं होतं.
" सुरा, आता आमच्या सोबत नाही यायचं! " म्हणत ते त्याला माघारी फिरवू लागले. तो मात्र रडत त्यांच्या मागं जाऊ लागला. बस स्टॅण्डवर गाडी आली नी मामा मामी सोबत लाला ,शामा चढताच सुरा त्यांना रडतच बिलगत गाडीत चढू लागला.
" दादा, मी एकटा कुठं राहू रे! ऐक ना मला पण येऊ दे ना! "
बेल वाजताच गाडी धकली नी सुरा आक्रोश करत गाडीमागं धाव धाव धावू लागला.
लोकांना वाटलं हे पुढं जाऊन नक्कीच परततील. पण मामा ही पक्का होता.आज जर याला स्विकारलं तर याला कायमच वागावं लागेल व जमीन ही... म्हणून मामा फिरलाच नाही. सुरा रडत राहिला. लोकांना सुराकडं पाहून दया येऊ लागली.पण करणार काय! कोण वागेल.
सुरा रडत घरी आला. व घराच्या ओट्यावर बसत रडत राहिला.नंतर तो तसाच झोपी गेला. सायंकाळी गयभू अप्पानं ओट्यावर झोपलेलं निपंखी सुरास हात लावत उठवलं. सुरा उठला . अप्पाकडं भेसूर भकास पाहत रडू लागला पण अप्पाकडं जाण्याची त्यास भिती वाटू लागली. कारण भाऊ घेऊन गेले नाहीत तर अप्पा कसं नेतील!
" उठ पोरा! मी वागवेन तुला!" म्हणत अप्पानं त्याचा हात धरला नी सुराचा बांध फुटला.तो झरकन अप्पाच्या पायात मिठी मारत रडू लागला.अप्पानं त्याला घरी नेलं
सुराला पाहताच गोजर मोठमाईनं त्याला छातीस लावलं.
" गोजर ! सुरा आता आपल्याकडंच राहील आजपासून!"
अप्पाची दोन्ही पोरं बाहेर शिकत होती. अप्पानं त्याची शाळा सुरुच ठेवली. सुरा वय वाढत गेलं तसा शाळा करत अप्पाच्या गोठ्यात, शेतात मदत करत राहिला,राबत राहिला. मामानं आख्खं सहा एकर रान लगेच विकलं व भाच्यांना त्याच्याच गावी शेती घेऊन दिली. सुराला एक चास ही दिली नाही. शेती नाही मिळाली पण सुरास अप्पा व मोठमाईच्या रूपात आई-वडील मिळाले यातच सुरा खुश होता. दहावीनंतर त्यानं शाळा सोडलीच.तो अप्पाच्या शेतातच राबू लागला. अप्पांची पोरं बाहेर शिकतच होती.
अप्पाची पोरं लागली.त्यांचं लग्न उरकलं. नी मग अप्पास सुराची चिंता वाटू लागली. कारण आजपावेतो सुरा राबत होता म्हणून अप्पाचा गोठा, दुधदुभतं, शेतीचा राबता सांभाळला जाऊन त्यात वाढ झाली होती. पोरं शिक्षणात अडकूनही त्यांचं चांगलंच झालं होतं. म्हणून अप्पांना आताशी सुराची घडी बसवणं गरजेचं वाटू लागलं. उद्या उठून गावातलं कुणी बोलायला नको की सुरास फक्त राबवून घेतलं.
सुरा लग्नाच्या वयाचा झाला. अप्पांना त्याच्यासाठी मुलगी शोधायची होती.
अप्पाकडं शेजारच्या निंभोणीचा लखा हा सालदार होता.अप्पाचा मळा हा आमोनी व निंभोणी यामध्ये नदीच्या बेचक्यात होता. म्हणून निंभोणीतलं मजूर अप्पाच्या मळ्यात कायम राबे. मळ्याच्या वर नदीकाठानं काही अंतर गेलं की विठ्ठल मंदीर लागे. अप्पा या मंदिरातच वर्षातून एकदा भंडारा देत व दोन्ही गावांना भंडाऱ्यास बोलवत.
लखा अप्पाकडं पाच सहा वर्षांपासून सालदार होता. पण पिण्याची लत होती त्यास. कामास लागला तर पहाड कानी करी. पण निसला की मग चार पाच दिवस पितच बसे. त्याची बाई व पोरगी शेवंता कायम अप्पाच्या मळ्यात कामाला येत. पोरगी शेवंता लग्नाची झाली. पोरगी कष्टाळू व गुणाची होती. ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण करणाऱ्या पायगुणाची होती.एक दुकानदार पोरगा सांगून आला. बाईनं मजुरी करून करून व लखा पासून वाचवलेले तीस हजार रूपये हुंडा दिला. पण मुलाचा बाप हावरट. त्यास दुकान वाढवण्यासाठी आणखी हुंडा हवा होता. लखानं दारूच्या नशेत बाकी नंतर देईन असं कबूल करत लग्न ठरवलं. लग्न विठ्ठल मंदिरातच साधं करण्याचं ठरवलं. ना जेवण ना काही.लग्नाचा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी मंदिरातच अप्पा भंडारा देणार असल्यानं ती तयारी ही चालू होती. सुरा ट्रॅक्टरवर लाकडं, भांडी, वस्तू आधीच पोहोचवत होता.अप्पाही लखाच्या शेवंताचं लग्न व भंडाऱ्याची ही तयारी म्हणून तिथंच होते.
नवरदेव आला. शेवंताला सजवून तयार केलं.वऱ्हाडी ठराविक आलेले. आल्यावर लग्नाआधी वर पित्यानं पैशाची मागणी केली. लखानं कोपऱ्यात नेत पाया पडत मी बाकी नंतर देतो म्हणून विनवलं. पण नवरदेवाचा बाप आत्ताच पैसे हवे म्हणून अडून बसला.
अप्पाच्या कानावर ही बातमी गेली. अप्पानं सारे खोळंबलेत म्हणून मी हमी घेतो.उद्या मी देतो पैसे पण लग्न उरकवा म्हणून मनवलं. पण मग नवरदेव मोटर सायकल साठी रूसला. आता मात्र सर्वांनी ओळखलं.यांना मिळतंय म्हणून यांच्या अपेक्षा वाढतायेत. अप्पांनी ओळखलं बाकी रक्कम आपण देऊ ती फेडता फेडताच लखा लंबा होईल. व आणखी मोटार सायकल? त्यांना पटेना. लखा व बाईनं तर साफ मना केलं. त्यांची एवढं देण्याची ऐपत नव्हतीच.नवरदेव व बाप परत फिरण्याची भाषा करू लागले.
अप्पानं लखास व त्याच्या बाईस बाजुला बोलवत सल्ला केला. हा पुढे ही पोरीला असाच त्रास देईल त्यापेक्षा मोडण्याचंच ठरलं .पण मग शेवंताचं पुढे काय? अप्पाच्या मनात एकदम सुरा आठवला. त्यांनी मग नवरदेवाच्या बापास स्पष्ट सुनावलं
" मोटार सायकल देणार नाहीत आम्ही.पटत असेल तर न्या पोरगी अन्यथा बघा!"
बापास व मुलास वाटलं एवढं झाल्यावर व हे आपणास जाऊच देणार नाहीत म्हणून ते उठण्याची तयारी करत दमकावू लागले.
" सरळ दिलेले पैसे ठेवा नी चालायला लागा!" अप्पा व गावातल्या लोकांनी त्यांना सांगताच बापानं एकाला पाठवत पैसे आणले. पैसे येताच गाववाल्यांनी नवरदेवास व बापास धो धो धुतला व हाकलून लावलं. पण शेवंता तर सुन्न बसली.
अप्पानं सुरास बोलावत शेवंतीसमोर उभं केलं.
" शेवंता पोरी दुकानदार गेला.सुरा पसंत आहे का तुला बघ? नी सुरा तुला शेवंता पसंत आहे का? बोला एकमेकांना पसंत असेल तर याच मंडपात उरकवतो!"
शेवंता ला समोर अंधार पसरला असतांनाच तेजोवलय दिसावं तसंच झालं. सुराच्या तर ध्यानी मनी काहीच नव्हतं.लखा मंदिरात चिंताग्रस्त असतांना अप्पाच्या रूपात देवमाणूस दिसू लागला. त्याच माळा ,तोच वाजा,तेच वऱ्हाडी फक्त नवरदेव बदलला.अक्षता पडल्या व शेवंताला घेऊन सुरा अप्पाच्या घरी आला.सुरातर स्वप्नात असल्यासारखाच वागू लागला. भावांनी एका क्षणात तोडलं तर आपल्या बाप माणसानं एका क्षणात आपलं आयुष्य उजळवत शेवंताचं दान आपल्या पदरात टाकलं. दुसऱ्या दिवशी अप्पानं सुराच्या लग्नाची पंगत भंडाऱ्यातच उरकवली.शेवंताच्या आईला सुरासारखा राबणारा व देखणा जावई मिळाला म्हणून आनंद झाला.व जाणारी इज्जत राखली म्हणून हुंड्याचे परत आलेले तीस हजार तिनं सुरालाच दिले.
अप्पानी सत्तर हजार व गोजर माईनं गाई म्हशीच्या दुधाचे तीस हजार असे एक लाख देत सुराला दुकान थाटून दिलं. सुरानं भांडवलात येणारा नफा जोडत जोडत एका वर्षातच भव्य किराणा दुकान, त्यातच ढेप, भाजीपाला व पुढे बी बीयाणं ,खत, किटक नाशकाचं ही दुकान थाटलं. मध्येच सिजनरी कांदे, धान्य खरेदी करत व्यापार करू लागला.तर कधी कापसाचा ट्रक भरत कापूस गुजरात, मध्यप्रदेश मध्ये पाठवू लागला. आता त्यानं दुकान शेवंताकडंच सोपवलं. पुढे अप्पाची शेती नफ्यानं मिळताच त्यानं सासऱ्याला व सासुला मदतीला घेत शेती सुरू केली. अशा रितीनं अप्पाच्या मदतीनं व सल्ल्यानं तो व्याप वाढवत गेला व अल्पावधीतच लाखोत खेळू लागला. लाखोचा माल क्रेडीटवर उचलत त्यानं व्याप पसरला.
अप्पाची साथ व शेवंताच्या रुपात घरात आलेली लक्ष्मी यानं त्याची चौफेर प्रगती होऊ लागली. आता अप्पांनी त्याला स्वतंत्र भाड्याचं घरच घ्यायला लावलं.
रामा व कृष्णानं शेत विक्रीला काढण्या आधीच ज्या अप्पाच्या वतनावर आपण जगलो ते दुसऱ्याकडं जाऊ द्यायचंच नाही हे पक्कं ठरवत ते त्यानं घेतलंच. मग त्यावरच पुन्हा प्रगती करत दुसरं चार एकर ही घेतलं. वतनास जिवापाड जपणाऱ्या अप्पाचं वतन जसंच्या तसं शाबुत ठेवलं..
.
.
. गाडी आमोनीजवळपास आली सुरानं आपल्या दैवताकडं गाडी चालवता चालवता वळून पाहिलं. मोठमाई गाढ निद्रेत होत्या. पण अप्पा उठले.
" सुरा! गाव आलं की लगेच मनास कसा उभारा वाटतो ना!" अप्पानं डोळे चोळतच म्हटलं.
" अप्पा आपलं रान, आपलं वतन ,आपली माणसं यांचा वास श्वासात दरवळत असतो! म्हणून लगेच कळतं!"
सुराचे डोळे पानावले होते आठवणीनं.
काही झालं तरी आपल्या या बाप माणसाच आपण जपलंच पाहीजे. भले आपल्या प्राण गेला तरी यांची परवड होता कामा नये!
.
.
गाडीनं गावात प्रवेश केला?

क्रमशः
✒ वासुदेव पाटील.
.
.
.