राक्षस भाग 1
लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न काही चुकलं तर माफी असावी...
रात्रीचे 1 वाजले सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. इन्स्पेक्टर ऋषिकेश शिंदे आपल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यां बरोबर काल बेपत्ता झालेल्या दहा पर्यटकांचा शोध घेत होते. गेल्या महिन्यभरपासून ह्या जंगलात अनेक जण बेपत्ता झाले. पण कोणीही सापडले नाही. इन्स्पेक्टर शिंदे आणि कॉन्स्टेबल गजानन खाडे हे पुढे होते. खूप वेळ शोधाशोध करूनही काही हाती आले नाही. शेवटी थकून शिंदे साहेब खाडे यांना म्हणाले, "खाडे या जंगलात गेल्या पाच वर्षांपासून 90 जण बेपत्ता झाले, नंतर त्यांचा काहीही पत्ता लागला नाही.
खाडे:- अहो साहेब जिवंत तर सोडा त्यांचे मृतदेह ही नाही सापडले. अन नवल म्हणजे प्रत्येक जणांची गाडी त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या वडाच्या झाडाखाली सापडते. ह्या केस मधेही असच झालं.
शिंदे :- हो आणि त्यांचे सामान, मोबाईल, पैसे, वगैरे तसेच गाडीत असतात. ह्यावरून हे दरोडेखोरांचे काम तर नाही वाटत.
खाडे :- हो साहेब मला तर हे वेगळाच काहीतरी वाटतंय.
शिंदे :- काय म्हणायचंय खाडे तुम्हाला, शिंदे साहेब आचार्यचकित होऊन म्हणाले.
खाडे :- साहेब गावातील लोक म्हणतात हे जंगल शापित आहे, येथे म्हणे भूतबाधा वगैरे आहे.
शिंदे :- ( ओठातील सिगारेट चा झूरका घेत, आणि गालात हसत म्हणतात) काय खाडे, लोक चंद्रावर गेले आणि तुम्ही अजून ह्या गोष्टींवर विश्वास ठेवता, खाडे हे जंगल खुप घनदाट आहे, येथे खूप जंगली जनावरांचा वावर आहे. शासनाने हा रस्ता रात्री 8 नंतर वापरण्यास बंदी घातली, तरीही बुडाला खाज असणारे काही लोक शॉर्टकट म्हणून रात्री हा रस्ता वापरतात आणि असेच बेपत्ता होतात. शिंदे रागाने बोलले व आपल्या तोंडातुन सिगारेट फेकत एक शिवी हडसली...
रात्र खुप झाली अंधारामुळे काहीही स्पष्ट दिसत नव्हते. म्हणून सर्व जण तेथून निघाले, पण जंगलात शिरतांना ते ज्या पाऊल वाटेने आले ती वाट आता त्यांना सापडत नव्हती.ते जंगलात अडकले.
सगळीकडे अंधार, सगळ्यांच्या हातातील टॉर्च अंधाराला चिरत ते रस्ता शोधत होते. अचानक सगळ्याच्या टॉर्च एकसाथ चालू-बंद होऊन बंद झाल्या कायमच्याच. आता मात्र शिंदे वैतागले, एकतर एवढ्या रात्री ते जंगलात आले त्यात रस्ता विसरून ह्या जंगलात हरवले अन त्यात ह्या टॉर्च बंद.
खाडे :- साहेब हे काहीतरी विचित्र आहे, बघा ना सगळ्यांच्या टॉर्च एकसाथ बंद झाल्या.
शिंदे :- शट अप खाडे तुम्ही जरा तोंड बंद करा.
थोडया वेळानंतर अचानक एक जोरात ओरडन्याचा आवाज आला. अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हते.पण तेथील दोन कॉन्स्टेबल गायब झाले. शिंदे यांनी सर्वाना आवाज दिला, सगळे जण एकत्र जमले. तेव्हा त्यांना समजले कि दोन जण नाहीत.आता मात्र सर्व घाबरले. शिंदे यांना वाटत होते कि हे काम कोण्या हिंस्र श्वापदाच आहे. खाडे यांचा राम नामाचा जप चालू होता. अचानक कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने मागून आले, आणि परत जोराच्या किंकाळ्या फोडत आणखी दोघे जण घनदाट जंगलात गायब झाले. आता फक्त शिंदे आणि खाडे दोघेच उरले. ते पण खूप घाबरले व त्या घनदाट जंगलात प्राण वाचवण्यासाठी जिवाच्या एकांताने सैरावैरा धावत सुटले. शिंदे थकून एका झाडाच्या खोडाला टेकून बसले. त्यांना एक किंकाळी ऐकू आली, 'साहेब वाचवा' तो आवाज त्या घनदाट जंगलाने क्षणात गिळून टाकला. शिंदेनि तो आवाज ओळखला, तो आवाज कॉन्स्टेबल खाडे यांचा होता. शिंदे तडक उठून आवाजाच्या दिशेने चालू लागले. वातावरणात कमालीची शांतता होती, मध्येच घुबडांचा आवाज शांतता भंग करत होता. चालताना जमिनीवरील पालापाचोळ्यांचा आवाज घाबरवत होता. वातावरणात गारठा असूनही शिंदे घामाने भिजले होते.
शिंदेना वाटलं कोणीतरी पाठलाग करत आहे. ते जाग्यावर थांबले मागे वळून बघायची त्याची हिम्मत होत नव्हती. धाडस करून त्यांनी हळूच मान मागे वळवली, मागे कोणीही नव्हते. शिंदे यांना थोडं हायस वाटलं, पुढच्या क्षनी त्यांनी समोर बघताच ते जोरात ओरडले आणि त्यांचा आवाज जंगलात नाहीसा झाला.
एखाद्या अजगराने शिकार करून शांत बसावे तस जंगल आता शांत झाले, आणि एक राक्षसी हास्य पूर्ण जंगलात पसरले आणि आवाज घुमून लागला, आणखी पाच बळी.......
एका वर्षानंतर,
अमोल, विनोद, शुभम, स्वप्निल आणि शंकर हे पाचही लहानपापासूनचे जिवलग मित्र. शिक्षण पूर्ण करून सगळे आपापल्या कामात व्यस्त असतानाही रोज न चुकता भेटत असत. त्यांच्या मध्ये अमोल हा मेहनती व साधे राहणीमान उच्च विचार अस वक्तिमत्व. विनोद हा बळकट शरीरयष्टी व कवीमनाचा शांत मुलगा. शुभम हा हुशार, निडर व हजरजवाबी पणा असलेला.स्वप्निल, शरीराने तसेच बुद्धीनेही बळकट अस ऑलराऊंड वक्तिमत्व. आणि सर्व ग्रुप मध्ये एखादा तरी असतो जो काडीपहिलवान असला तरी दहा जणांना मारण्याची गोष्ट करतो तसा शंकर पण खूप मेहनती व प्रामाणिक मुलगा. पण हे पाचही जण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सगळं विसरून फक्त गोंधळ व एकमेकांची खेचन्यात वेळ घालवतात.
एका दिवशी शुभमने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला.सर्वांनी चर्चा करून स्पॉट फिक्स केला आणि तारीख नेमली. अमोल ने नेहमी प्रमाणे येण्यास नकार दिला. रागाने शुभम म्हणाला, "हे आमल्या चे दरवेळेस चे नाटक, मुलींसोबत फिरायला वेळ असतो पण आपल्या सोबत नाही.' शेवटी खूप भाव व शिव्या खाऊन अमोल तयार झाला. दोन दिवसांनी निघायचं ठरलं. पण काय माहित त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलय.....
इकडे जंगल मात्र कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत होते....
क्रमश....