कुल्फी वाला-Marathi story
सुंदर निळसर पाणी असलेला समुद्र. मैलभर सपाट पसरलेली शुभ्र वाळू. गावाजवळच पण जरा दूर. ते गावही सुंदर होत. हमरस्त्यावर पण लहानसे गाव. रस्त्यावरून भरपूर वहातुक सुरु असायची. पण जरा आतल्या गल्ल्यांमध्ये गेले की मस्त झाडी आणि शांतता! लहान लहान गोंडस घरे, सभोवती छोटीशी बाग. जवळपास प्रत्येक घरात एक विहीर. समुद्राच्या इतक्या जवळ असूनही विहिरींचे पाणी मात्र गोड!
गाव प्रसिध्द होते ते खव्याच्या पदार्थांसाठी. तिथल्या दुधाची चवच न्यारी. टेकडीभर पसरलेला हिरवा चारा, झऱ्याचे गोडे पाणी. मग काय, दुधाला चव येणारच! गवळ्यांचा गाव म्हणून त्या गावाची ख्यातीच होती.
बाबुरावची बायको मस्त कुल्फी करत असे. मलईदार, बेताची गोड, कडक कुल्फी! संध्याकाळ झाली की बाबुराव कुल्फीची टोपली घेऊन निघत असे. त्याच्या दोन फेऱ्या ठरलेल्या होत्या. एक गावातून आणि दुसरी, संधिप्रकाश लांबवर पसरला की, समुद्र किनाऱ्यावर. बाबुरावच्या कुल्फीचे नाव गावात भरपूर गाजलेले होते. पहिल्या फेरीतल्या कुल्फ्या लगेच संपून जात. दुसरी फेरी समुद्रावरची! ती बरीच लांबत असे. समुद्रावर कधी गर्दी असे कधी नसे. रात्रीचे अकराही वाजत कधीकधी. बाजाराजवळ असलेल्या
किनाऱ्यावर गर्दी असायची. पण किनाऱ्यावरून जसे पुढे पुढे गावाच्या स्मशानाच्या दिशेने जावे तशी तशी गर्दी कमी होत जायची. मुख्य किनाऱ्यावर कुटुंबवत्सल मंडळी असायची. तिथे कुल्फी पटापट खपायची. पुढे गावापासून दूर गेले की प्रेम प्रकरणवाली जोडपी बसलेली असायची. एक कुल्फी घेवून दोघात मिळून खाणारी, खिलवणारी! त्याला मजा वाटायची या जोडप्यांची. सुरीने कापून कुल्फी पानावर ठेऊन त्यांच्या हातात दिली की तो पटकन दूर जात असे. उगाच त्यांना संकोच वाटायला नको!
त्या दिवशीही बाबुराव मुख्य किनाऱ्यावरची विक्री झाल्यावर स्मशानाच्या दिशेने निघाला. डोक्यावरची टोपली सांभाळत कोरड्या वाळूतून चालताना बाबूरावला जरा कठीणच जात असे. पण सगळा किनारा त्याच्या पायाखालचाच झालेला असल्याने त्याला झपाझप चालता येत असे. आधी एक नारळीची बाग लागायची मग काही बंगल्या होत्या. त्यानंतर स्मशान. तिथे गावाची हद्द संपायची.
बाबुराव फिरत फिरत स्मशानापर्यंत आला. फक्त तीन गिऱ्हाईके मिळाली होती. उदास! शेवटी तो थकून तिथेच बसला. डोक्यावरची टोपली खाली उतरवून घाम पुसत त्याने चौफेर नजर फिरवली. भिंतीच्या आडोश्याने कोणीही बसलेले नव्हते. त्याने दूर समुद्राकडे नजर फिरवली. अमावास्या होती. काळोख माजलेला होता. ओहोटी होती. समुद्राची गाज येत होती पण चमचमणारे पाणी दिसत नव्हते. डोळे ताणून त्याने पाण्याकडे पाहिले. पांढरी किनार असलेल्या लाटा मंदपणे झुलत होत्या.
अचानक त्याला पाण्याच्या रेषेजवळ काहीतरी पडलेले दिसले. त्याने निरखून पहिले. पण काही खूण पटत नव्हती. विचित्र आकाराची काहीतरी वस्तू त्याला दिसत होती. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो उठला आणि हळूहळू पाण्याकडे जायला लागला. नजर एकटक त्या अजब दिसणाऱ्या आकाराकडे होती. रंगीत काहीतरी होते. त्याला कळेना, की पुढे जाऊन काय आहे ते बघावे की चुपचाप परत जावे. त्या आकाराकडे पाहताना अंगावर थंडगार शहारे येत होते. जसजसा तो जवळ जात होता तसतसे त्याला दिसायला लागले की तो लांबट आकार म्हणजे माणसाचा देह होता. त्याचे पाय थबकले. मन त्याला सांगत होते की तिथून पळून जावे. पण पाय थिजल्यासारखे झाले होते. त्याला पळून जाताच येत नव्हते. एकेक पाऊल ओढत तो त्या प्रेताजवळ गेला.
बाई होती. पाण्याच्या जोरामुळे अंगावरचे कपडे पार विस्कटलेले होते. अंगावर लाल परकर आणि पोलका दिसत होता. साडीचा पत्ताच नव्हता. परकर लाटेबरोबर हलत होता. बाई मेलेली पण कपडे जिवंत वाटत होते. खून असेल की आत्महत्या? त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत होते. हाताला कंप सुटला. मोठ्या कष्टाने त्याने जोरात बोंब ठोकली. अगदी बेंबीच्या देठापासून तो बोंबलत होता. पण त्याचे ओरडणे ऐकायलाही तिथे कोणी नव्हते. प्रेत तसेच टाकून पळून जावे हे त्याच्या मनाला पटत नव्हते. त्याने इकडे तिकडे बघितले. जवळात जवळ म्हणजे स्मशान. तिथे वखारवाला म्हातारा नक्कीच असणार असे म्हणत तो पळत स्मशानात घुसला.
जळून संपत आलेल्या चितेकडे एकटक बघत बाकावर बसलेला म्हातारा त्याला दिसला आणि त्याच्या जिवात जीव आला. धापा टाकत बाबुरावाने त्याला सगळी कथा सांगितली आणि म्हणाला जरा माणसे बोलवा, पोलीसात कळवा. ते प्रेत ओढून बाहेर आणायला हवे नाहीतर पाणी वाढले की काही ते परत मिळणार नाही.
म्हाताऱ्याने आधी काहीच हालचाल केली नाही. कसल्या तरी विचारात असल्यासारखा तो बसून राहिला. मग हळू उठला. म्हणाला, ‘बाबुराव, जरा बस इथे. बाईचे प्रेत होते न? लाल साडीतले?’ बाबूरावला धक्काच बसला. याला कसे कळले? आणि मग त्याने आधीच काही धावपळ का नाही केली?
‘बाबुराव, तू त्या प्रेताला हात नाही ना लावलास?’
‘नाही. हिम्मतच नाही झाली.’
‘लावला असतास तर तुला लगेच कळले असते की तो निव्वळ भास होता. अमावास्येला असा भास होतो कोणाकोणाला. घरी जा निवांत.’
‘बाबा, भास कसला? मी पाहिले ना ते लाल कपड्यातले प्रेत प्रत्यक्ष!’
‘होय? मग बघ बर आता तुला किनाऱ्यावर काही दिसतंय का ते!’
किनाऱ्यावर फक्त लाल फडके गुंडाळलेली त्याची कुल्फीची टोपली दिसत होती. समा संपून भरतीच्या लाटा संथपणे पुढे पुढे येत होत्या. पाण्याजवळ काहीच नव्हते. तो कुल्फीच्या टोपलीपाशी गेला. पण त्याला टोपलीला हातसुद्धा लावायची हिम्मत होत नव्हती.
टोपलीला बांधलेले लाल फडके जिवंत असल्यासारखे वाऱ्यावर हलत होते.
अरुण गाडगीळ, २४ जुलाई २०१९.