ते कब्रस्थान ......
सदर गोष्ट हि साधारण पाच- सहा वर्षां पुर्वी कोकणातील एका नगरीत घडलेली आहे. हि नगरी म्हणजे तळ कोकणास लाभलेलं गोड गुपित. अतीव सुंदर अश्या कोकणात ह्या नगरी च आपलं अस रेखीव सौंदर्य काही औरच. गोव्या च्या सीमेवर वसलेली हि नगरी म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेल मिनी गोवा म्ह्टलं तरी चालेल. ह्या नगरीत अजुन ही डच, इंग्रज तसेच पोर्तुगीजांची छाप दिसुन येते. साधारण २५० -३०० वर्षांपुर्वी सर्व प्रथम डचां नी ह्या भुमीत समुद्र मार्गे प्रवेश केला व आपलेसे करुन टाकले. त्या काळी हि नगरी व्यापाराचे मुख्य ठिकाण होते. डच व त्या नंतर इंग्रजां नी हे नगर विकसित केले. त्या काळी सुनियोजित रित्या बांधलेल्या शासकिय इमारती, बाजार पेठा, ड्रेनेज व्यवस्था, बंदर आज ही जश्यास तश्या उपयोगात आहेत. १३० वर्षांहून जुनी नगर पालिका महाराष्ट्रातील जुन्या पालिकांतील एक अशी आहे. सुंदर अश्या अथांग सागरातील लाईट हाऊस आज ही दिमाखात उभा आहे. डच- इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वा च्या खुणा मागेच सोडुन गेले. डच वखार ही अशी च एक मुख्य आकर्षण असलेली वास्तु. भव्य दिव्य अशी ही इमारत डच संस्कृतीची साक्ष देते. असे म्हटले जाते की डचांनी ह्या वखारी त कुठे तरी एक गुपित भुयारी मार्ग देखील बनविला होता, जो थेट गोव्या पर्यंत जातो. ह्या पुरातन वास्तु विषयी सुद्धा काही भयानक असे अनुभव सांगितले जातात. असो. पण आपली आज ची गोष्ट ही ह्याच वखारी शेजारी लागून असलेल्या पोलीस वसाहती मधील सावंत कुटुंबीयां बद्दल ची आहे. वैभव व मधु ही सावंत दाम्पत्याची दोन मुलं. वैभव ने तेव्हा सातवी ची परिक्षा दिली होती व तो मे महिन्या च्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होता. शेजार ची अनेक मुले त्याला समवयीन होती त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी होती. दररोज मित्रांसोबत मैदाना त क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळ्ण्यात वेळ जाई. मुला च्या हट्टा खातर आज सावंत काकां नी नवी कोरी सायकल आणली होती. वैभव भलताच खुश होता. सकाळ होताच तो सायकल घेऊन मित्रांना दाखवायला गेला. सर्व मित्रांनी जुना प्रलंबित असा प्लान आता पुर्ण करायचा बेत केला. दुसर्या दिवशी सर्व जण आप आपल्या सायकली घेऊन लांब वर फिरायला जाणार होते.
सकाळी ठरल्या वेळेला वैभव व त्याचे इतर ४ मित्र सायकली घेऊन भेटले आणि प्रवास सुरु झाला. कोकणातील लाल मातीच्या चिंचोळ्या गल्ल्यांतुन सायकली वेग धरत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा काजु-आंबा तसेच फणसा च्या बागा सुगंधित होऊन मागे सरकत होत्या. सर्व जण ह्या अप्रतिम अश्या दृष्या चे दर्शन घेऊन पुढे होत होते. आता दुर वर माडा ची झाडे दिसत होती. किनारा जवळ येत होता. लाटांचे आवाज दूर हुन कानाचे पारणे फेडत होते. सर्वांनी सर्वप्रथम लाईट हाऊस गाठले आणि मग उंच बंदरा वर जाऊन समोरील मनोरम्य दृष्य पाहत बसले. समुद्रा वरुन येणारी हवा आल्हाद दायक वाटत होती. मजा मस्ती सुरु होती. जेम- तेम १२-१३ वर्षांची ऊनाड वयं. दुपार चे एक वाजले होते. भुक बळावली. पालकांनी दिलेल्या खाऊ च्या पैश्यांतून सर्वांनी बंदरा शेजारी ल एका छोट्याश्या हॉटेल मध्ये मिसळ पाव पार्टी केली. आता परतीचा प्रवास सुरु होणार होता. पण एवढ्या दुर येवून सरळ घरी जातील अशी मुलं ती काय. घरी जाताना वाटे वरील इंग्रजांच्या कब्रस्थाना त जाण्या ची साहसी वजा कल्पक बुद्धि त्यातील एकाला सुचली आणि बाकिच्यां नी शेवट चा घास चघळत मोठ्या खुशी ने माना हलवल्या. सायकली वर पैंडल मारुन सर्व जण निघाले.
इंग्रजांच कब्रस्थान ही जागा त्या सर्वांसाठी लहान पणी चा मोठ्या कुतूहला चा विषय होती. शाळा आणि घर ह्यांच्या मध्य भागी असलेलं कब्रस्थान दररोज सर्वांना वाटेवर एका बाजुस लागे. जुना असा अवाढव्य लोखंडी गेट निदान गेले शतक भर तरी उघडला गेला नसेल. येता जाता त्या गेट कडे ढुंकुण पाहण्यास ही पालकांची सक्त मनाई असे. त्या मुळे आत एवढ्या मोठ्या जागेत काय काय असेल आपण एक दिवस तरी जाऊन पाहू, अशी सर्वांची इच्छा असे. ऊनाड मुलांना कब्रस्थान ची भिती ती काय. आज तर पुर्ण सुट ही होती. आत मध्ये फेर फटका मारु आणि जाऊ मग घरी. घरी कोणास काय समझतय अशी वेडी समजुत. शाळा सुरु झाली की मित्रांना काही तरी चटपटीत सांगावयास मिळेल हा उद्देश. सर्व जण येऊन कब्रस्थान पाशी पोहचले, रस्त्या च्या दोहो बाजुस कटाक्ष टाकून कोणी नसल्या ची खात्री करत सर्व जण हळू हळू उंच गजांच्या अवाढव्य लोखंडी गेट जवळ येऊन उभे राहिले. एवढ्या वर्षांत गेट च्या इतक्या जवळ येण्याची ही त्यांची पहिली च वेळ. गेट वर उंचा वर खुप जुने गंजलेले बोर्ड लावलेले होते. नोटीस, प्रॉपर्टी आणि असेच काही पुसट से अस्पष्ट इंग्रजी शब्द त्यावर दिसत होते. दोन गजांमधुन आत मान घालुन सर्व मुले चौफेर निरखु लागली. पण येथून फक्त दाट झाडे झुडुपे च दिसत होती. तेवढ्यात कब्रस्थाना मागील ठेंगण्या भिंती ची कल्पना कोणी तरी सुचवली आणि सर्व जणां नी आप आपल्या सायकली मागील बाजुस पळवल्या. भिंती च्या कडेला सायकली लावून त्यावर चढुन एक एक करुन सर्वांनी आत उड्या टाकल्या. सर्वत्र सुकलेल्या पाला पाचोळ्या चा ढिग पसरला होता. उड्यांची चाहुल लागताच त्यांतून सरपटणारे प्राणी सर सर करुन पळाले. सर्वांच्या अंगातून भिती ची एक लहर चर्रर्र करुन गेली. सर्वांनी एक मेकांकडे पाहिले आणि सावरण्याचा इशारा करीत समोर पाहू लागले. सर्वत्र दाट झाडी होती. आतला परिसर पूर्णपणे महाकाय अश्या वृक्षांनी व्यापला होता. वृक्षांच्या फांद्या चौ बाजूस पसरल्या होत्या. आणि त्याच फांद्यांचा आधार घेत अनेक वेलींचे जाळे तयार झाले होते. त्या दाट झाडीची व्याप्ती एवढी होती की, सूर्यप्रकाश नावापुरताच जमिनी पर्यंत पोहचू शकत होता. कदाचित बराच काळ ही जागा निर्मनुष्य राहिल्याने अशी स्थिती झाली असावी. वैभव आणि मित्र त्या सुकलेल्या पाला पाचोळ्याच्या थरातून अंदाज घेत घेत पुढे होते. ते सर्व जागेचे निरीक्षण करत होते. झाडां वरती अनेक ठिकाणी पक्ष्यांची घरटी तसेच उंच ठिकाणी उलट्या अवस्थेत लटकलेली निद्राधीन वटवाघुळे दिसत होती. हि निर्मनुष्य दाट झाडी पक्ष्यांसाठी योग्य अभयस्थान बनले होते. एवढ्यात एकाचे लक्ष कोपऱ्यातील करवंदाच्या झुडुपाकडे गेले. लहानस पण ते काटेरी झुडूप काळ्या चमकदार टपोऱ्या करवंदांनी भरले होते. सर्वांच्या तोंडास पाणी सुटले. झुडुपाकडे कूच करून करवंदांवर ताव मारण्याची स्पर्धा सुरु झाली. वैभव ची जिज्ञासू बुद्धी मात्र त्या सर्वांपासून दूर इकडे चौ बाजूचे निरीक्षण करण्यात व्यग्र होती. वैभव हळू हळू सुकलेल्या पानांतून पुढे आत जाऊ लागला. त्याच्या चारही बाजुंना महाकाय वृक्ष आपल्या वयाची ची साक्ष देत उभी होती. वैभवच लक्ष समोरील वृक्षा च्या खोल ढोली वर गेले. थोड्या वर उंची वरील ढोलीत दोन मोठे डोळे चमकत होते आणि वैभव च्या दिशेने निरखून पाहत होते. ते काय आहे हे पाहण्या साठी वैभव त्या दिशेने चालू लागला. थोड चालल्या वर त्याचा पाय कुठल्या तरी अवघड गोष्टीस अडकला आणि तो धडपडुन खाली जमिनी वर पडला. सुकेलेल्या पानांत काही तरी पडल्या चा आवाज येताच वैभव चे मित्र धावत त्या दिशेने पळाले व वैभव ची विचारपुस करु लागले. वैभव चा गुडघ्याला कशास तरी जोरात आपटल्याने छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. पानांचा थर बाजुस केल्यावर लक्षात आले की तिथे एक कबर होती आणि त्या कबरी च्या जाडश्या फरशी वर अडकून तो पडला होता. वैभव चे लक्ष अजून ही त्या ढोली कडे होते. तो बसल्या जागेवरुन ढोलीकडे पाहू लागला. त्याचे मित्र ही वर ढोली कडे पाहत होते. ढोली च्या आत एक मोठ म्हातारं घुबड स्तब्ध बसलं होत व ते ही या सर्वांकडे एक टक आपल्या मोठ्याश्या डोळ्यांतून पाहत होतं. त्याची तीक्ष्ण नजर खुपच भयावह वाटत होती असली तरी गरीब स्वभावाचा निरुपद्रवी पक्षी असल्याची जाणीव सर्वांस होती. घुबड अश्या ऐटित बसले होते जणू गेले कित्येक वर्षे या गर्द झाडीत त्याचे राज्य असावे व या सर्व जागे वर तो लक्ष ठेऊन असावा. कदाचित त्याच्या धारदार नजरेस जास्त वेळ नजर मिळवण्या ची हिम्मत नसल्याने सर्वांनी आपल्या नजरा खाली वळवल्या व वैभव ची विचारपूस करु लागले. वैभव च्या जखमेतून रक्तस्त्राव थांबला होता मात्र त्याचा पाय दुखावला गेला होता. एवढ्यात कुठल्याश्या घाणेरड्या वासाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. कुठून तरी जळकट कुसकट वास येत होता. सर्व जण वासा ची दिशा शोधु लागले. कदाचित पक्ष्यांच्या सर्वत्र पसरलेल्या विष्ठेचा दुर्गंध असावा. सुरुवातीस थोडा हलका येणारा वास हळू हळू वाढत चालला होता. एवढ्यात एकाचे लक्ष मनगटावरील घड्याळात गेले; ३:३० वाजून गेले होते. फार उशिर झाला आहे आणि अजुन जास्त उशिर झाला तर घरी पोचल्यावर काही खैर नाही हे लक्षात येताच सर्व जण पटापट उठून मागील भिंतीच्या बाजूस भराभर चालू लागले. मागून तो वास अजुन च दाट होऊ लागला होता. भिंती मागे सायकली तश्याच लावलेल्या अवस्थेत होत्या. वैभव चा पाय अजुन ही दुखतच होता. मित्राच्या मदतीने तो कसा बसा भिंतीवर चढला व सायकली वर पाय ठेऊन खाली उतरला. सर्वजण आता कब्रस्थाना च्या बाहेर पडले होते. तरीही एव्हाना आतील वासाची तीव्रता एवढी वाढली होती की, सर्वांच्या नाका मध्ये झिणझिण्या जाणवू लागल्या. पण या सर्व प्रकारा पेक्षा आता त्यांना घरी लवकर पोचण्याची घाई जास्त होती. प्रत्येकाने आप आपल्या सायकली वर सवार होऊन पैंडल मारण्यास सुरुवात केली. वैभव ला मात्र सायकल जड वाटू लागली होती. तो जोर लावून पैंडल मारत होता तशी सायकल हळू हळू पुढे होत होती. त्याला सर्व मित्र वेग धरण्यास सांगू लागले पण त्याच्या ने सायकल वेगाने चालवणे जमेना. मागचे चाक जॅम झाल्या सारखे वाटू लागल्या ने त्याने एकदा थांबुन सर्व काही ठिक असल्याची खातर जमा केली. चाकात काहीच समस्या नव्हती मग सायकल एवढी जड का वाटत होती. ? वैभव एवढी ताकद लावुन पैंडल मारत होता की आता त्याचे दोन्ही पाय शीणु लागले होते. एका मित्राने वैभव ला सायकली वरुन उतरण्यास सांगितले व तो स्वत: त्या वर स्वार होऊन एक दोन पैंडल मारुन पाहीले. सायकल अगदी व्यवस्थित भर भर पळत होती. ह्या प्रकाराने वैभव चक्रावून गेला. "अरे काय वैभव, जीव नाही तुझ्यात की मस्करी करतोस आमची" अस म्हणून त्या मित्राने सायकल पुन्हा वैभव कडे दिली. सर्व जण पुन्हा निघाले. वैभव ची परिस्थिती मात्र अजुन ही तशीच होती. कोवळ्या वयातील तो मुलगा एखादा ट्रक खेचावा तेवढ्या ताकदीने सायकल खेचत होता. त्याची अवस्था अगदी च दयनीय झाली होती. तो पुर्णपणे घामाने डगमगलेला तर होताच पण आता त्याचे पुर्ण शरीरात असह्य वेदना होत होत्या. अगदी चालत गेलो तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागावा असा तो रस्ता; आज मात्र त्यांचा एक तास उलटून गेला होता. वसाहतीत पोहचताच सर्व जण आप आपल्या घरी निघुन गेले. वैभव कसा बसा घराच्या मागील दारा पर्यंत जाऊन पोहचला. तेथील छोट्याश्या बाग वजा कुंपणात सायकल लावली व तो आत जाऊन पलंगावर विसावला. शरीरातील ताकद पुर्ण संपलेली होती व ते असह्य वेदनांनी कण्हत होता.
संध्याकाळ होऊन गेली होती. साडे सात वाजले होते. वैभव च्या उश्यावर आई बाबा तीव्र चिंतेच्या छायेत उभे होते. डॉक्टर दोन वेळा येऊन गेले तरी वैभव च्या आजाराचे मूळ व निदान गवसत नव्हते. तो तापाने फणफणला होता व त्याची शुध्द हरपल्यात जमा होती. त्याच्या कण्हण्यावरुन त्याच्या भयंकर देहवेदनेची कल्पना येत होती. बातमी वसाहतीत पसरल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. थोड्याच वेळात शेजार चे डिसोजा आले. सावंत काका आणि ते सह कर्मचारी देखील होते. त्यांचा मुलगा आज वैभव सोबत होता. त्याने घाबरुन आपल्या घरी सर्व कबुली दिली होती. कब्रस्थाना तील गुपित फेरी पासुन ते घरी पोहचे पर्यंत वैभव च्या सायकली च्या कसरती चे कथावदन त्याने केले. घडला सारा प्रकार ऐकुन सावंत काकां ना सध्य परिस्थितीच्या कारणा ची पुसट शी कल्पना आली होती. तोवर घड्याळ दहाचे टोले देउ लागले. इलाज तातडीने होणे गरजे चे होते. सावंत काकां ना काही सुचत च नव्हते. डिसोजांनी त्वरित त्यांना काहीसे सुचवले व त्यांचा होकार मिळताच डिसोजांनी स्वत: जवळील चर्च गाठले.
थोड्याच वेळात डिसोजा फादर परेरां ना घेऊन परतले. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले फादर परेरा आज ही त्यांच्या उंचपुऱ्या व तरतरीत देहयष्टी मुळे तरुण वाटत होते. आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य गोव्यातील चर्च मध्ये व्यतित केल्यानंतर उतार वयात ते आपल्या पुर्वजांच्या मुळ गावी परतले होते. अश्या प्रकार च्या अनेक प्रकरणांचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता आणि त्यामुळेच त्यांचे नाव कोणे एके काळी गोव्यामध्ये चर्चेचा विषय होते.
वैभव चा ताबा आता फादर परेरांकडे होता. लांब झगेदार शुभ्र कोटातील फादर वैभव ला केसा पासून ते पायाच्या तळव्या पर्यंत निरखुन पाहत होते. त्यांच्या हातात एक अत्तरदाणी प्रमाणे पात्र होते. त्या पात्रामध्ये चर्च मधील पवित्र पाणी असावे. वैभव च्या कपाळावर हात ठेऊन फादर मिटल्या डोळ्यांनी ईश्वराचे स्मरण करु लागले. तापाची पातळी एवढी जास्त होती की फादरांच्या हातास चटके लागत होते.
फादरांच्या मागे सावंत काका-काकु, जमलेले काही शेजारी मोठ्या आशेने उभे होते. दोन ते तीन मिनिटांच्या अभ्यासात ही भूत बाधा असल्याची खात्री फादर ना झाली. त्यांनी आपला कान वैभव च्या ओठांजवळ नेला व त्याचे हळू आवाजा तील कण्हणे ते ऐकू लागले. त्या आवाजामध्ये ते कसलासा शोध घेत असावे. त्यांच्या चाणक्य बुध्दीने ते शब्द ओळखले. वैभव एक सारखा "सायकल, सायकल" जपत होता. फादरांनी सावंत काकां ना वैभव च्या सायकली बद्दल विचारले व त्वरित आपला मोर्चा घराच्या मागील दरवाजा कडे वळवला.
फादरनी दरवाजा हलकाच ढकलला. समोर काळाकुट्ट काळोख होता. फादरनी आपल्या कोटाच्या खिश्यातून टॉर्च काढली व ती चालू करुन त्याचा झोत डाव्या बाजूस टाकला. टॉर्च समोरुन सावकाश वळवत उजव्या बाजुस आणली. उजव्या कोपऱ्यात वैभव ची सायकल उभी होती. आता फादर च्या टॉर्च चा झोत सायकली वरून फिरु लागला. सायकली मागील कॅरिअर वर कोणी एक स्त्री बसलेली दिसत होती. पांढरा शुभ्र गाऊन घातलेली ती स्त्री निर्जीव असल्या सारखी स्तब्ध चित्ताने कॅरिअर वर बसली होती. फादर दरवाजात उभे राहुनच टॉर्च च्या प्रकाश झोतात तीचे निरिक्षण करु लागले. त्यांनी झोत सरळ तीच्या चेहऱ्यावर सोडला. तीचा चेहरा काहीसा खाली कललेल्या स्थितीत होता व ती एक टक जमिनी च्या दिशेने पाहत होती. टॉर्च च्या प्रकाशा मध्ये तीचे हिरवे घारे डोळे चमकत होते. तीच्या चेहऱ्याची तसेच शरिराची एक बाजु भाजल्या प्रमाणे भासत होती. गोरा पान रंग आणि सोनेरी कुरळे केस, या सर्व वर्णना वरुन फादर परेरांनी ओळखले; ते शेकडो वर्षांपूर्वी जळाल्या कारणाने मृत पावलेल्या एका ब्रिटिश महिलेचे पिशाच होते. कब्रस्थाना तून नको ती ब्याद सायकली च्या कॅरिवर बसुन वैभव सोबत घरा पर्यंत पोचली होती. फादर दरवाजा काहीसा आड करुन मागच्या पावली पुन्हा आत जिथे सर्व जमले होते तेथे आले. घड्याळ बारावा टोला देत होता. सावंत काकांना बाजुस घेऊन काहिशा गंभीर आवाजात फादर म्हणाले, "वैभव ची सायकल लवकरात लवकर कब्रस्थानात नेऊन सोडावी लागेल." बाकी जे दृष्य त्यांनी पाहिले होते त्यातील चकार सुद्धा सावंत काकांस सांगणे त्यांनी टाळले. बाकी सर्वांस वैभव सोबत च राहण्यास सांगून फादर सावंत काकांना घेऊन पुन्हा घरा मागील अंगणात आले. टॉर्च चा प्रकाश सायकली वर पडला; ती तशीच बसून होती. पण तीला पाहणे फक्त फादर परेरांच्या दृष्टीस शक्य होते. सावंत काकांना दिसत होती ती फक्त सायकल. काही न बोलण्याचा इशारा करत मूकपणानेच फादर नी सावंत काकां ना सायकल ढकलत चालण्या ची सुरुवात करण्यास सांगितले. त्या प्रमाणे सावंत काकांनी पायाने स्टॅंड वर केले व दोन्ही हॅंडल धरुन पहिल पाऊल उचलण्याचा प्रयत्न करु लागले. सायकल काही जागची हलेना. कोणती तरी खुप अवजड वस्तू वर ठेवल्या प्रमाणे ती वाटू लागली. काकांनी फादर कडे पाहीले. फादर नी डोळे मिटुन काहीतरी पुटपुटले आणि हातातील पाणीपात्रा तून काहीसे पाणी सायकली च्या कॅरिअर वर शिंपडले. सायकलीची चाके आता भरभर फिरु लागली. कब्रस्थानाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. वसाहती मागील बोळ सोडुन फादर व सावंत काका मुख्य पण चिंचोळ्या रस्त्यास येऊन मिळाले. पुढे सावंत काका सायकल घेऊन आणि त्यांच्या मागून फादर टॉर्च घेऊन चालत होते. सायकली चा वेग कमी होताच फादर सायकली वर पात्रातील पाणी शिंपडत व काहीतरी पुटपुटत. सायकल पुन्हा भर भर चालु लागे. सर्वत्र गाढ अंधार होता. वातावरणात गारवा जाणवत होता. ती रात्र कमालीची शांत होती. आज रातकिड्यांचा किर्रर्र देखील नव्हता. फक्त गूढ शांतता मनामध्ये गोंगाट करत होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मागे सरकत होती आणि ते तीघे पुढे पुढे होत होते. सावंत काका, फादर आणि फादरांना दिसणारी ती; अजुन ही त्याच अवस्थेत स्तब्ध निष्प्राण डोळ्यांनी बसली होती. आता निम्मे अंतर पार झाले होते. किनाऱ्या वर येऊन आपटणाऱ्या लाटांचा आवाज आता दूर वरुन ह्या धीरगंभीर शांततेत मिसळत होता. सायकली वरील भार आता हळू हळू वाढु लागला होता तसेच पात्रातील पाणी देखील तळ गाठू लागले होते. सावंत काका खुप मेहनतीने सायकल खेचत होते; त्यांचा डोळ्यासमोर फक्त वैभव चे विव्हळणारे चित्र दिसत होते. एक बाप आपल्या लेकरावरील संकट दूर लोटुन नेत होता. पाणी पात्र आता रिकामे झाले होते. कब्रस्थान जेम तेम १०० मीटर अंतरा वर राहीले असताना सायकल जागच्या जागी स्थितप्रज्ञ झाली. फादर नी सावंत काकांना जोर लावण्याचा इशार केला. त्याप्रमाणे काकांनी अंगातील सर्व बळ एकवटले व सायकल ओढू लागले. चाके अजिबात फिरत नव्हती पण एवढ्या ताकदीने सायकल इंच इंच फरफटत पुढे होत होती. गारवा असुनही काकांच्या गालांवर घाम उतरु लागला. उरलेले छोटेसे अंतर पार करण्यासाठी अंदाजे अर्धा तास तरी लागला होता. आता ते कब्रस्थानाच्या गेट पाशी येऊन पोचले होते. त्यावेळी गेले कित्येक वर्षे बंद असणारे ते भारी भरकम गेट काहीसे उघडे असल्याचे दिसले. हे पाहुन सावंत काका चरकले. 'काही ठराविक रात्री बारा वाजल्यानंतर कब्रस्थान चा गेट आपोआप उघडला जातो', असे पुर्वी कधीतरी त्यांच्या ऐकिवात आले होते व त्याची प्रचिती त्यांना आज होत होती. फादर परेरांसाठी मात्र हे सर्व काही नवे नव्हते. ह्या क्षणी त्यांच्या मनात इथवर पोहचल्याचे समाधान जास्त होते. ते सावंत काकांच्या जवळ गेले व हळूच कानात काहितरी सांगितले. त्यांनी काकां ना सायकल गेट पाशी सोडून मागे फिरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे काकां नी सायकल गेट च्या तोंडाशी टेकून उभी केली व ते फादरांपाशी आले. फादर व सावंत काका मागे फिरुन परतीच्या प्रवासास लागले. फादरां नी परत मागे वळून पाहण्यास मज्जाव केला होता. ते दहा- पंधरा पाऊले चालले असतील एवढ्यात पाठून एक आवाज आला. "ट्रिंग, ट्रिंग." कोणीतरी सायकची बेल वाजवली होती. फादर नी दुर्लक्ष करुन चालत राहण्याचा इशारा केला. दोघ भरभर पाऊले टाकत चालू लागले. थोडं चालल्यावर पुन्हा बेल वाजली. आता कमी कमी अंतराच्या वेळाने बेल वाजु लागली. हे दोघं दूर वर परतल्यावर सुद्धा बेल वाजण्याचा आवाज स्पष्ट पणे ऐकू येत होता. मघाची शांतता आता सायकली च्या एकसारख्या ट्रिंग-ट्रिंग मुळे भंग पावत होती. आता बऱ्यापैकी पुढे वसाहती जवळ पोहचल्यावर आवाज पुसट सा येत होता आणि अजुन थोड पुढ आल्यावर आवाज येईनासा झाला. सुखरुप घरी येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. वैभव आता सुरक्षित होता. त्याच्या तब्येतीमध्ये हळू हळू सुधारणा येत होती. फादरनी घडल्या हकिकती चे गांभीर्य व कल्पना सर्वांना पटवून दिले आणि त्यांनी निरोप घेतला. जाताना त्यांनी वैभव व वसाहतीतल्या इतर मुलांना कब्रस्थाना पासून दूर ठेवण्याचा सक्त ताकीद वजा इशारा दिला.
आज शाळेचा पहिला दिवस होता. घडल्या प्रकारास जवळ जवळ महिना झाला होता व परिस्थिती पुर्णपणे पूर्वपदावर होती. वैभव पायीच शाळेत पोचला होता. शाळेत इतर मित्रांच्या सायकली पाहिल्यावर त्यालाही आपल्या सायकली ची आठवण आली. सायकल आपल्या सोबत असली असती तर आज आपण ही ऐटित सायकल घेऊन आलो असतो. घडला प्रकार त्याच्या डोक्यात फिरु लागला. कब्रस्थानात सायकल सोडली हे समजल्यावर तो खुप रडला होता. वारंवार त्याच्या मनाला ही गोष्ट सलत होती. आज शाळेत बसल्या बसल्या तो सायकलीचाच विचार करीत होता. पहिला दिवस असल्याने शाळा अर्ध्या दिवसाने सुटली. अडिच वाजले होते. सगळे आप आपल्या सायकलींनी पटापट निघून गेले. वैभव चालत निघाला; विचारांत अजुनही त्याची ती सायकल. नकळत त्याची पाऊले आडवाटेने वळली. कब्रस्थान च्या गेट पाशी येताच न राहवून तो जवळ जाऊन गेट च्या गजांतून आत डोकावू लागला. आत तीच गर्द झाडी दिसत होती. नुकताच पाऊस पडून गेल्या मुळे सर्व झाडे-झुडुपे हिरवीगार दिसत होती. सर्वत्र हिरवळ पसरली होती. पण ह्या सर्वांपेक्षा वैभव ची नजर अजुन काहीतरी वेगळे शोधत होती. त्याची सायकल कुठेच दिसत नव्हती. एवढ्यात त्याची नजर दूरवरील त्याच मोठ्या उंच वृक्षावर गेली. ते पूर्णपणे दाट परावलंबी वेलींनी झाकले गेले होते. अधुन मधुन सुर्यकिरणाची तिरीप त्या वृक्षावर पडत होती व त्या कवडश्यात वेलीआंड काहितरी चमकत होते. वैभव ने ओळखले होते; त्याची सायकल वर उंचावर ओढली जाऊन वेलींनी गुंडाळली गेली होती. त्याची नजर अजुन थोड्याश्या वर असणाऱ्या ढोलीवर गेली. दोन मोठे तीक्ष्ण डोळे चमकत होते. तेच ते म्हातारे घुबड बसले होते. एका क्षणासाठी वैभव चे मन सारं काही आठवून चर्रर्र झाले. तो पाठ फिरवून भर भर चालू लागला. एवढ्यात पाठून एक आवाज आला. "ट्रिंग, ट्रिंग.."
समाप्त