A real horror marathi story
फ्लॅट भाग १9
(दरवेळेला वैयक्तिक अडचणी सांगत बसत नाही... काय प्रॉब्लेम झालाय हे सर्वज्ञात आहे... त्यामुळे क्षमा कराल ही विनंती...)
फ्लॅट भाग १९...
जर ह्या मावशींनी आम्हाला वाढलं नाही तर त्या मगाशी येऊन आम्हाला आग्रहाने वाढून गेल्या त्या कोण होत्या?...
माझ्या अंगावर काटा आला एकदम... आम्ही एकमेकांकडे बघतंच राहिलो... भीतीची एक लहर प्रत्येकाच्या अंगावरून गेली ज्यात माझी मुलं पण होती... कारण मुलांच्याही लक्षात आलं की काहीतरी वेगळं घडलं... रुद्र तर माझ्या जवळ येऊन बसला... आईंनी पदर डोळ्याला लावला... बाबा तिथेच चिंतेने येरझाऱ्या मारायला लागले... वैभव ने खाली मान घातली... आता या सगळ्यांना मलाच उभारी देऊन, यांची हिम्मत वाढवावी लागणार होती... मान्य होतं की चंदी आणि धनाजी यांची शक्ती अमावस्या जवळ आल्याने वाढली होती, पण म्हणून हारून चालणार नव्हतं... दुर्गा ने सांगितलं तसं आमची कमकुवत बाजूच त्यांना हवी होती, जेणेकरून ते त्यांचं अस्तित्व प्रकट पणे दाखवू शकतील आणि आम्हाला त्यातून फक्त त्रास देतील आणि या सगळ्यांमध्ये ती उमेद, ती लढायची ताकद मलाच निर्माण करणं भाग होतं...
"आई-बाबा, तन्मय-रुद्र आणि वैभव... जरा बसा इथे सगळे..." मी काहीतरी बोलणार हे तर नक्की होतं, म्हणून ते माझ्या समोरच बसले... पण त्याहूनही ते माझ्या समोर या साठी बसले कारणं संध्याकाळी वैभव बरोबर जे काही झालं त्या वेळी माझ्या जवळच्या रुद्राक्ष माळेने जे करून दाखवलं होतं, त्या मुळे सध्या मीच अशी एक होते जिला चंदी आणि धनाजी हात लावू शकणार नव्हते... दुर्गा येई पर्यंत मीच अशी होते जी वेळप्रसंगी आमच्या सगळ्यांना वाचवू शकणार होते, कदाचित हे सगळ्यांना कळून चुकलं होतं... हा मोठेपणा नव्हता, तर मला कळलं होतं की माझी जबाबदारी दसपटीने वाढली होती...
"मला बोलायचं सगळ्यांशीच... आपण गेले काही दिवस खूप दिव्यातून जातोय ना?... असंख्य प्रोब्लेमनी आपल्या सगळ्यांनाच घेरलंय... आपण जस काही चंदी आणि धनाजीच्या अजगर मिठीत अडकून पडलोय... आपण काही हालचाल करो अथवा न करो, आपल्या भोवतीची त्यांची पकड अजून घट्ट करतायत ते... पण अजून फक्त दोन दिवस, की आपण सगळेच त्यांच्या या पकडीतून कायमचे मुक्त होऊ..."
"काय बोलतीयेस तू हे प्रीती?... कळतंय तुला?... तू जे बोलतीयेस ते ऐकून असं वाटतंय की..."
"वाटत नाहीये वैभव हे नक्की ए, की आपण अजून दोन दिवसांनी मरणार आहोत... चंदी आणि धनाजी त्यांच्या बरोबर आपल्याला नक्की न्हेणार..."
"पण का?... असा का विचार करतीयेस तू?... दुर्गा येणार आहे ना?... ती म्हणाली ना आज सकाळी फोने वर की ती येतीये उद्या म्हणून... म का तू धीर सोडतीयेस?..."
"कारणं तुम्ही सर्वांनी तो सोडलायत वैभव... चेहरे बघा तुम्हा सगळ्यांचे... मुलांच सोड एक वेळ, लहान आहेत ती अजून?... पण आपल्या सगळ्यांच काय?... आणि कोण रे दुर्गा?... का येईल ती आपल्या मदतीला धावून?... कोण ती?... ती नसती आज तर काय करणार होतो आपण?... कुठे जाणार होतो?... कोण येणार होतं आपल्याला यातून सोडवायला? बोल ना?... आज कोणताही अर्थार्थी संबंध नसताना ती पोरगी आपल्यात आणि त्या चंदी-धनाजी च्या मध्ये उभी आहे!... म्हणून आपण आपला सगळाच भार तिच्यावरच सोडलाय का?...
"प्रीती मं तूच सांग?... कोण आहे सध्या आपल्याला या सगळ्यातून वाचवणारं?... काही वेगळा पर्याय आहे का तुझ्या कडे?..."
"हो आहे!... आपल्या सगळ्यांकडे आहे... आपलं एकमेकां बरोबर असणं... कोणत्याही स्थितीत खचून न जाणं... एक मेकाला एक मेकांच्या असण्याची सतत जाणीव करून देणं... देव नावाच्या एका अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणं... त्यांचं नामस्मरण करणं... कोणत्याही परिस्थितीत हार न मानणं... हे तर आहे ना रे आपल्या हातात?... आपण जेवढे एकजूट असू, जेवढे एकमेकांना आधार देऊ, त्या असलेल्या वाईट शक्तींना कमी घाबरू तेवढा त्यांनी दिलेला त्रास आपल्याला कमी जाणवेल... आपल्याला चंदी आणि धनाजी ने अमावास्येचा दिवस दिलाय... मला माहिती नाही की त्या दिवशी काय होणार ए?... हा काही कुठला मुव्ही नाहीये की शेवटी याचा एन्ड चांगलाच होईल... हे आपण खरंखुरं जगत असलेलं आयुष्य आहे... जिथे आपली एक चूक आणि सगळं खेळ खल्लास... यातून वाईटच होईल असं नाही, पण चांगलं ही होऊ शकेल असं ही नाही... आणि मला ही मान्य आहे की आपल्या सोबत दुर्गा आहे, पण सगळी जबाबदारी त्या एकटीच्या खांद्यावर टाकून कसं चालेल?... थोडी आपणही वाटून घेऊ!... थोडेसे स्ट्रॉंग बनू... लढायचं ठरवलं ना?... मं कापेल, लागेल, दुखेल याची भीती का?... आणि सगळ्यात महत्वाचं... वाघ म्हणून ही खाणारे, वाघोजी/वाघोबा म्हणून ही खाणार ए आणि वाघ्या म्हंटल तरी खाणारच ए, मं म्हणा ना वाघ्या... मी खूप बोलले असेन कदाचित, पण मला वाटत की हे आत्ता बोलायची गरज होती... आता रडायचं नाही आता उभं राहायचं... आपला शत्रू खूप ताकदवान आहे, आपल्याला एक क्षणात बाजूला फेकून देईल पण तरी आपण जिद्द नाही सोडायची... शेवट पर्यंत लढायचं..."
"खरं आहे पोरी तुझं... आम्ही म्हातारे आता या वयात काय करता येणार या विचाराने हतबल झालो... खरंतर आम्ही हे बोलायला हवं... पण आज तू बोललीस... आहो मुलांना आपली गरज आहे... आपण खचलो तर मुलं तरी कोणाकडे बघणार... इतक्या कष्टाने आपण वैभव ला वाढवलं, त्याचा हा संसार उभा राहताना बघितला तो काय असं त्या चंदी ने उध्वस्त करायला? आणि आपण काय फक्त बघत राहणार?... प्रीती आता पुढचे दोन दिवस कोणी तुला चिंतेत आणि उदास नाही दिसणार... आपण सगळे एकत्र लढूया, बघतेच माझ्या या भरल्या घराच्या वाटेल कोण येत ते... देव आहे आपल्या पाठीशी..."
माझ्या बोलण्या नंतर आईंना जी उमेद आली त्याने वातावरणच बदलून गेलं... बरेच दिवसांनी आम्ही घरी असल्या सारख्या गप्पा मारल्या... वातावरणाचा नूरच पालटून गेला... बोलता बोलता रात्र झाली हे विसरलोच... प्रत्येकाच्या डोळ्यावर झोप तरळत होती... पण कितीही सगळ्यांच्या मनात उमेद निर्माण केली तरी शेवटी भीती ही भीतीच... मी कोणालातरी सांगायचं की घाबरू नकोस काही होत नाही, पण स्वतःच्या मनातल्या भीती च काय?... स्वतःच्या मनाला कसं समजावणार?... काल रात्री जे काही घडलं त्या नंतर परत सगळे निवांत झोपतील असं होणार नव्हतं... आई बाबा आणि वैभव "आपण आळी पाळीनें झोपू" असा हट्ट करत होते... पण वैभव ला धरल्या मुळे हे कळलं होत की आता चंदी आणि धनाजी यांची ताकद वाढली होती आणि दुर्गा ने दिलेल्या दोऱ्यांचा आता तसा त्यांच्यावर परिणाम होणार नव्हता... आता फक्त माझ्या कडच्या रुद्राक्ष माळेनेच आम्ही वाचणार होतो, निदान तात्पुरतं तरी... म्हणून बाकी सगळ्यांनी झोपायचं आणि मी जागं राहायचं असा निर्णय आम्ही घेतला...
सगळे एकमेकां जवळ दाटीवाटीने झोपले... मी माझा मोबाईल घेऊन टाईमपास करत बसले... दमणूक माझी ही झालीच होती पण काही पर्याय नव्हता... मला झोप लागली तर आम्हा सगळ्यांवर परत काही ना काही संकट येईल अशी भिती होती मनात... मागे एकदा गुगल वर वाचल त्या नुसार ह्या निगेटिव्ह पॉवर रात्री १२.०० ते ०३.३० जास्त ऍक्टिव्ह असतात... मी मला जास्तीतजास्त जागं ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते... रात्रीचे साधारण १.३० वाजले असतील... सगळे निवांत झोपले होते... किती भोगी असतो ना माणूस... प्रत्येक गोष्टीची आसक्ती असते त्याला... प्रत्येकाच्या मागे इतके व्याप असतात, इतक्या अडचणी असतात, इतकी दुःख असतात, पण मनुष्य भोग घेणं काही सोडत नाही... म खाण्याचा असेल, झोपण्याचा असेल अथवा जगण्याचा असेल... आता हेच बघा ना... चंदी आणि धनाजी डोक्यावर मृत्यू म्हणून उभे आहेत पण मी सोडून सगळे निवांत झोपलेत... मी काही कोणी वेगळी नाही, माझ्या जागी कोणी जागत बसणारं असत तर मी ही झोपलेच असते... असाच काहीसा विचार करत आणि मोबाईल वर टाईमपास करत बसले होते... रात्रीची ती भयाण शांतता नको वाटत होती... अख्या हॉस्पिटल मध्ये फक्त आम्हीच आहोत असं वाटत होतं... कसलाच आवाज नाही...
रात्रीचे ०२.३० वाजले... मला थोडावेळ विश्रांती मिळावी म्हणून वैभव उठणार होता... वैभव कडे रुद्राक्ष माळ देऊन मी थोडावेळ आराम करणार होते... मी वैभव ला उठवलं आणि मी वॉशरूम ला गेले... मी उठवल्यावर वैभव लगेच उठून बसला, जसा काही तो जागाच होता... कदाचित आमच्या बरोबर जे काही चालू आहे त्या मुळे झोप लागली नसेल असं वाटलं मला... मी वॉशरूम ला जाऊन आले... वैभव उठून मी ज्या खुर्चीत बसले होते तिथे बसला होता, डोळे बंद होते... मी वैभव ला रुद्राक्षमाळ द्यायला गेले...
"वैभव!... ही माळ घे!..."
"ह्म्म्म!... ठेव घ्येतो!..."
हाताची घडी घालून डोकं मागे भिंतीला टेकवून वैभव मागे रेलून बसला होता... झोपेतून उठवल्यामुळे डोळ्यातली झोप गेली नसेल अजून, या विचाराने मी ही खुर्ची बाजूच्या टेबल वर माळ ठेवली आणि मी झोपायला गेले... या सगळ्यात वैभव च लगेच उठून बसणं, माळ हातात न घेणं, आवाजात आलेला जड पणा मला नाही लक्षात आला, आणि जेंव्हा आला तेंव्हा उशीर झाला होता...
झालं असं की... मी झोपायला गेले... वैभव ने माळेला हातही नव्हता लावलेला... पण घेईल तो माळ स्वतः कडे, म्हणून मी ही झोपले... मला डोळा लागलाच असेल, की मला गाडी जोरात वळवून स्पीड मध्ये बाहेर काढली की ब्रेक चा आवाज येतो तसा आवाज ऐकू आला... इतक्या रात्री कोण एवढ्या जोरात गाडी चालवत असेल? कदाचित कोणी पेशंट आणला असेल इमर्जन्सी मध्ये असं मला वाटलं... ऐकलेल्या आवाजाने जागी झालेली मी परत झोपण्यासाठी तोंड वळवलं तर समोरच्या खुर्चीत वैभव नव्हता... वॉशरूम ला गेला असेल म्हणून ५ मिनिट वाट बघितली त्याची पण वॉशरूम मधून काहीच हलचाल नाही जाणवली... उठून बघितलं तर मी दिलेली रुद्राक्ष माळ टेबल वरच होती... मनात शंकेची पाल चुकचुकली... मी जाऊन वॉशरूम मध्ये चेक केलं पण वैभव नव्हता... वैभव ला बघून मी मागे वाळलेच होते की समोरच दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली... हॉस्पिटल च्या अख्या रूम मध्ये मी एकटीच होते... आई-बाबा तन्मय रुद्र कोणाचं नव्हते तिथे... मी एकटीच होते त्या रूम मध्ये... कुठे गेले होते सगळे?... मी एकटीच काय करत होते त्या रूम मध्ये?... मला एकटीला सोडून कुठे गेले सगळे?... मला काहीच समजत नव्हते... मी टेबल वरची रुद्राक्षाची माळ उचलली आणि तशीच धावत रूम च्या बाहेर आले, तर रूम च्या बाहेर जिन्यातून मावशी लगबगीने वर येत होत्या...
"मावशी!... मी इथे एकटीच!... कुठे गेले सगळे?... तुम्ही काही बघितलत का?..."
"प्रीती!... शांत हो बाळा... वैभव तुझ्या मुलांना आणि सासू सासर्यांना घेऊन निघून गेलाय..."
"पण असं कस घेऊन गेला आणि कुठे गेले ते?..."
"तो वैभव नव्हता पोरी... वैभव च्या रूपात धनाजी होता... आणि घरी तर तो नक्कीच गेला नसेल... तू आता नको थांबूस इथे, तू ही निघ लगेच... मी आहे खाली..."
"आणि हो!... रुद्राक्ष माळ घ्यायला विसरू नकोस... ती तुझ्या जवळच ठेव..."
"आणि हो!... रुद्राक्ष माळ घ्यायला विसरू नकोस... ती तुझ्या जवळच ठेव..."
मी तशीच परत फिरले... रूम मधून माझा मोबाईल आणि पर्स घेतली आणि मी निघाले... हॉस्पिटल ला येताना बाबा माझी स्कुटी घेऊन आले होते ती पार्किंग मध्येच होती... मी आई बाबा वैभव सगळ्यांचे फोन लावले, पण कोणाचाच फोन लागला नाही... दुर्गाचा ही फोन ट्राय केला पण तो ही लागत नव्हता... जिना उतरून केज्युअल्टी मध्ये आले तर तिथे सगळ्या नर्स झोपल्या होत्या... त्यातल्या एकीला उठवून त्या मावशींबद्दल विचारल, कारण मला त्यांना सांगून जायच होतं... पण ते म्हणतात ना की एकदा का संकटं यायला लागली की सगळी कडून तुम्हाला बेजार करतात... मी मावशीं बद्दल तिथल्या नर्स ला विचारलं तेव्हा समजलं कि मावशी तर रात्रीच घरी गेल्या त्यांच्या नातवाची तब्येत बरी नव्हती म्हणून... माझ्या डोक्याचा भुगा व्हायचा बाकी होता फक्त... मावशी जर घरी गेल्या तर मग मगाशी माझ्याशी बोलल्या त्या कोण होत्या?... सगळे विचार करून डोकं फुटायची पाळी आली होती माझी... मी तशीच पार्किंग ला आले आणि माझी स्कुटी काढून हॉस्पिटल च्या मेनगेट वर आले... पण मी गाडी कशी चालवणार होते?... हाताच्या प्लास्टर मुळे खूप त्रास होत होता... तरी डॉक्टर नी गळ्यात बांधून ठेवलेला हात मी काढला कारण आता मलाच सगळ्यांना शोधायचा होतं, माझ्या माणसांच्या जवळ जायचं होतं... पण मी जाणार कुठे होते?... काहीच सुचत नव्हत... आणि माझा फोन वाजला... फोन आमच्या कोथरूड च्या घराच्या लँडलाईन वरून आला होता... आमच्या त्या घरी तर कोणीच नव्हते, म मला घरच्या लँडलाईन वरून कसा काय फोन आला होता?...
"हॅलो!..."
"आई!... मी तन्मय..." माझ्या तनू चा आवाज ऐकून मला माझ्या भावना नाही अनावर झाल्या... इतकावेळ मी रोखून धरलेले माझे अश्रू मला नाही रोखता आले... मला रडताना बघून...
"आई!... नको ना रडूस... प्लिज आपल्या कोथरूड च्या घरी ये ना लवकर... बाबा आज्जी आजोबांना घेऊन आपल्या घरी गेलेत... मला आणि रुद्र ला खूप मारलं बाबांनी आणि आपल्या बेडरूम मध्ये लॉक करून गेलेत... मी आणि रुद्र ने दार उघडलं कसतरी आणि तुला फोने लावला... इथे लाईट पण नाहीयेत... प्लिज ये ना लवकर..."
तन्मय ने जे सांगितलं ते ऐकून मी गाडीला जी किक मारली ती थेट आमच्या कोथरूड च्या घरीच न्हेऊन थांबवली... घरा बाहेरचा फ्युज का खटका बंद होता तो आधी चालू केला... मुलांचा आई आई असा आवाज आतून येत होता... मी दार उघडलं तशी माझी दोन्ही पिल्लं मला येऊन बिलगली... दोघांची हि तशी वाईट अवस्था होती... दोघांच्याही गालावर, पाठीवर मारल्याचे वळ होते... पहाटेचे ०३.४५ झाले होते... मी तन्मय आणि रुद्र ला ते इथे कसे आले ते विचारलं...
"आई मला जाग आली ना तेंव्हा बाबा आज्जी आणि आजोबा सांगत होते की... दुर्गा मावशी चा त्यांना फोने आला होता आणि आमच्या सगळ्यांना तुझ्या पासून धोका आहे तर तुला एकटीला हॉस्पिटल ला सोडूनच आपल्या घरी सगळ्यांना घेऊन या म्हणून... बाबा तर आज्जी आजोबाना म्हणाले की ती चंदी तूच आहेस जी आमच्या बरोबर राहतिये आणि त्रास देतीये... बाबानी गाडी कोथरूड कडे घेतली तर आज्जी म्हणाली बाबाना की... 'अरे इथे का घेतोयस?'... तर बाबा म्हणाले की मुलांना सेफ ठिकाणी राहू द्या म्हणाली दुर्गा म्हणून कोथरूड च्या घरी ठेऊ, नाहीतर प्रीती मुलांना आधी त्रास देईल..."
हे सगळं ऐकून मला काय करावं तेच काळे ना... "मं!... पुढे काय झालं?..."
"आम्ही कोथरूड ला पोचलो तर बाबा नी आज्जी आजोबांना खाली गाडीतच बसवलं... मला आणि रुद्र ला घेऊन वर आले आणि बेडरूम मध्ये बसवलं... रुद्र ने विचारलं की 'बाबा!... आई कधी येणार?...' तर त्याच्या जोरात कानाखाली मारली बाबांनी... आपला रुद्र जोरात खाली पडला... मी त्याला उठवायला गेलो तर मला ही खूप कानाखाली मारल्या... आई ते आपले बाबा नव्हते... आम्हाला बाबांनी कधीच नाही मारलं...खूप मारून झाल्यावर ते वेगळ्याच आवाजात म्हणाले... 'आदी त्या द्वान म्हाताऱ्यासनी संपिवतो, मग तुम्हास्नी आणि शेवटी तुमच्या त्या आईस्नी.. लय ताकद दाखिवते व्हय?... दावतोच माझा हिसका...' आई ते आपल्या आज्जी आजोबांना आपल्या घरी घेऊन गेले... चल ना आपण पण जाऊ..."
"हो आई आपण आपल्या घरी जाऊ... मगाशी आम्हाला बेडरूम मध्ये सोडलं ना बाबांनी तर जाताना माझ्या पाठीत जोरात गुद्दा मारला... इतक्या जोरात मी पुढे पडलो ना असं वाटलं की माझा जीव माझ्या चेस्ट मधून बाहेरच येईल... पण मी स्ट्रॉंग ए, मं मी सांभाळलं स्वतःला..." इतकं होऊनही आमचा नौटंकी आपली डायलॉगबाजी काही सोडत नाही...
मी फक्त पाणी प्यायले आणि आम्ही निघालो... मुलांना बाबांनी आपल्याला खूप मारलं याच वाईट वाटलं होता पण मारणारा हा आपला बाबा नाही हे ही समजलं होतं... मी गाडी शक्य तितक्या जोरात पळवत होते, जाताना हायवे असल्याने जरा सांभाळून गाडी चालवावी लागत होती आणि माझ्या हाताचं प्लास्टर ही होतंच... निघताना मी दुर्गा ला ही फोन केला होता जो लागला... दुर्गा ही थोड्याचवेळात घरी पोचणार होती... मी झाला प्रकार सगळा दुर्गा ला सांगितला... ती डायरेक्ट आमच्या घरीच येईल असं म्हणाली आणि फोन ठेवला... जसजसं घर जवळ येत होतं तसतसं मला टेंशन येत होतं... मी मुलांना ही माझ्या बरोबर न्हेत होते पण त्यांना बाहेर कुठे ठेऊन ही फायदा नव्हता... माझ्या बरोबर असतील तर निदान जवळ असण्याची खात्री राहील... मी घाबरतच आमच्या फ्लॅट चा जिना चढले... मी दारात उभे राहिले तसा आमच्या फ्लॅट चा दरवाजा आपल्या आपण उघडला... घरात शांतता होती... बाहेर हॉल मध्ये सगळं व्यवस्थित होतं... मी आणि मुलं आत गेलो... स्वयंपाक घराच्या दारात बाबा अस्ताव्यस्त पडले होते... त्यांचा श्वास जोरजोरात सुरु होता... खूप दमल्या सारखे वाटत होते... मी आणि मुलं धावतच त्यांच्या जवळ गेलो... आम्हाला बघून त्यांच्या जीवात जीव आल्या सारखं वाटलं...
"प्रीती!... खूप मारलं गं या दोघांनी मला... ते वैभव आणि आई नाहीयेत गं..." असं म्हणत बाबा रडायला लागले... मी आणि मुलांनी बाबांना आधार देऊन उभं केलं...
"बाबा मं आता ती दोघं कुठे आहेत?..."
आणि बाबांनी स्वयंपाक घराच्या छता कडे बोट दाखवलं... मी छता कडे बघितलं आणि मला चक्कर येते की काय असं वाटायला लागलं... वैभव आणि आई स्वयंपाक घराच्या छताच्या कोपऱ्यात भिंतीला आधार घेऊन बसले होते... दोघांच्या ही डोळ्याची बुबुळं पांढरी पडली होती... दात दाखवून विचकट हसत होते दोघंही आणि त्यांच्या घशातून घुमला सारखं आवाज येत होता... दोघंही स्वयंपाक घराच्या सिलींगला एखाद्या वाघाने पिंजऱ्यात फेऱ्या माराव्या तशे फेऱ्या मारत होते... मला दुर्गा येई पर्यंत बाबांना आणि मुलांना घेऊन बाहेर जाणं गरजेचं होतं...
"तन्मय बाबा ना घेऊन लगेच निघा इथून... रुद्र पळ लवकर..." आम्ही चौघं धावत बाहेर निघालो तशी आईनी बाबांवर झडप घातली... स्वयंपाक घरातल्या कोपऱ्यातून बाबां पर्यंतच अंतर साधारण १५ फूट असेल जे आईंनी २ सेकंदात गाठलं... अमानवी शक्तींच्या ताकदीचा अंदाज बांधणं फार अवघड असत... बाबा रस्त्यातच कोसळले... मी आणि मुलं फ्लॅट च्या दारा पर्यंत पोहोचलोच होतो इतक्यात मेन दार आपल्या आपण लागलं... रुद्र दार उघडत होता पण नाही उघडलं ते त्याला... मी मुलांना घेऊन हॉल च्या कोपऱ्यात जाणारच इतक्यात मला जोराचा धक्का बसून मी कोपर्यातच जाऊन पडले... मी दोन्ही मुलांचे हात धरले होते पण या झटापटीत तन्मय चा हात सुटला आणि रुद्र माझ्याकडे राहिला...
"बाबा सोडा मला... मला आई कडे जायचंय... सोडा मला..."
"गपतो का भाड्या... क्वान बाबा... आलाय म्होटा बाबाचा ल्येक... तुझ्या बापास्नी नाय रडिवला ना तुज्या समोर तर नावाचा धनाजी न्हाय..."
"सोडा ओ माझ्या मुलाला... पाय पडते मी तुमच्या... तुम्ही आम्हाला काहीही करा पण माझ्या मुलाला सोडा ओ..."
स्वयंपाक घरातून आई बाबांना फरपटत आणत होत्या...
"ए गप्प्प... नको चरचर करू उगी... ए आज्जा ह्यास्नी आमवशेलाच मारायचा नियम हाय व्हय रं?... आजच कार्यक्रम उरकून जाऊदे..."
"पोरी!... दमानं घे... उद्याचा दिस थांब फकस्त... उद्या रातच्याला ह्यांचा मुडदाचं बशिवतो बघ... फकस्त उद्याची रात्र... पन आजच्याला ह्यांना उद्या रातीसाठी तयार करून ठेऊ... ह्यास्नी भी मरायची आदत पडलं..."
"चंदी!... तू तरी दया दाखव की... तुझं आम्ही काय वाकड केलंय... आमचा काहीतरी संबंध आहे का गं तुझ्या बरोबर जे झालं त्या मध्ये?..."
"ए भावाने... मला क्वान आलं गं वाचवाय तवा?... माझ्या पोराचा बळी दिला त्या पाटलानं... लय जीव लावला व्हता म्या पाटलाला... माझं पोर बगुन सुदिक दिलं न्हाई त्या हराम्यान... मला तर बेसुद असतानाच मारली त्या पाटलानं... क्वान आलं गं त्या येळी माझ्या पोराला माझ्या आज्ज्या ला आणि मला वाचवाया?... क्वान नाय आलं... समदी मानूस जात झोपलिया... क्वनाला पडली न्हाय क्वान मेला आनी क्वान जित्ता हाय त्याचं... माझं प्वार माझा आज्जा आनी म्या मेले तसेच समदे मरनार... क्वानाला भी जित्ती नाय ठेवनार म्या..."
"तुला जे हवं ते कर गं आमच्या बरोबर, पण माझ्या पोरांना सोड... त्यांचा जीव नको घेऊस..."
"आंगाशी!... अत्ता बोल्ली बग तू... तुझ्या लेकरास्नी सोडू व्हय... मं त्या म्हातारीनं दिल्येली ती माळ तिथंच टाक आनी ये हित माज्या कड... न्हायतर या तुज्या पोरा पासूनच करते बग सुरवात..."
"माझ्या मुलाला आधी इथे पाठव... त्याला सोड मग मी लगेच येते तिथे... शब्द ए माझा..."
मी असं म्हणताच धनाजी ने तन्मय ला सोडलं... माझं बाळ धावतच माझ्या कुशीत शिरलं... मी माझ्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ तन्मय च्या हातात दिली... माझ्या दोन्ही पोरांना जवळ घेतलं... चंदी आनी धनाजी ला वाटलं मी त्यांना माझ्या छातीशी कवटाळलं पण तेंव्हा मी माझ्या मुलांच्या कानात सांगितलं...
"ही माळ तुमच्या जवळ ठेवा... मला आणि आजोबांना काहीही झालं तरी तुम्ही एकमेकांना सोडू नका आणि ही माळही सोडू नका... दुर्गा ताई येणार आहे लवकरच तो पर्यंत मला याना सांभाळू दे... मला आणि आपल्या सगळ्यांना काहीही होणार नाही... दुर्गा ताई च सगळं ऐका, ती सांगेल ते सगळं करा..."
माझं शेवटचं वाक्य ऐकलं आणि माझी मुलं मला घट्ट बिलगली... वेळ प्रसंगी आपली आई आपल्या पासून लांब जाईल का? याची पुसटशी कल्पना दोघांनाही आलेली जाणवली मला... मी मुलांना तिथे कोपऱ्यात सोडून वैभव आणि आई (धनाजी आणि चंदी) च्या जवळ गेले... मी जवळ आले तसं चंदी ने बाबांना जोरात लाथ मारली जी बाबांच्या पोटात जोरात लागली... त्या मुळे बाबा एवढ्या जोरात विव्हळले की मी बाबांना सावरायला धावले... वैभव ने मागून माझे केस पकडले आणि इतक्या जोरात समोरच्या भिंतीवर माझं डोकं आपटलं की माझ्या डोळ्या समोर काजवे चमकले... चंदी ने बेडरूम मधून वैभव चे पट्टे आणले आणि मला आणि बाबांना मारायला लागली... अमानवी ताकदीं कडून होणारा अमानुष छळ काय असतो हे मलातरी आज दुसऱ्यांदा कळत होतं... आम्ही एखाद जनावर विव्हळावं आणि ओरडावे तसं ओरडत होतो... पण आमचं हे ओरडणं, आम्हाला गुराढोरांना करत नसतील तशी केलेली मारहाण हे कोणालाच ऐकू जात नव्हतं... कारण त्या घरा बाहेर ते अत्याचार, ते आवाज, तो गोंगाट जाताच नव्हता... सकाळचे ०६.०० होऊन गेले तरी कोणाला आवाज गेले नाहीत, याचाच अर्थ आम्ही या अमानवी शक्तींच्या किती आमाला खाली होतो... आम्हीच नाही तर अख्ख घर... मला आणि बाबांना बेदम मारून आणि विचकट हसून झाल्यावर वैभव आणि आईंनी एकमेकांना मारायला सुरुवात केली... आमच्या पूर्ण शरीरावर जसे पट्याचे वळ उठले होते तसे आता वैभव आणि आईंच्या पण उठायला लागले... जसकाही चंदी आणि धनाजी त्यांच्या शरीराला इजा करत होते... त्यांना फक्त आम्हाला दमवायचं होतं... मी आणि बाबांनी तर इतका मार खाल्ला होता की आम्हाला उठता ही येत नव्हतं... मधेच दोघांना काय झालं माहिती नाही... पट्टे सोडले आणि आई स्वयंपाक घरात गेल्या... आई बाहेर आल्या तेंव्हा आईंच्या हातात २ सुऱ्या होत्या... आता हे दोघं आम्हाला कोणत्या प्रकारची इजा करणार आहेत हे माझ्या लगेच लक्षात आलं... मी तन्मय कडून रुद्राक्षाची माळ घेण्या साठी पुढे सरकले, माझा प्लास्टर वाला हात जमिनीवर होता... मी पुढे सरकतीये म्हंटल्यावर वैभव ने माझ्या प्लास्टर घातलेल्या हातावर जोरात पाय दीला... एक वेदनेची कळ माझ्या हातातून माझ्या मेंदू पर्यंत गेली आणि मी जिवाच्या आकांताने ओरडले... पण आम्हाला जितका त्रास होत होता तेवढेच चंदी आणि धनाजी जोर जोरात हसायचे... चांदीने आणलेल्या सुऱ्या बघून मला वाटलेलं की आता हे आम्हला शारीरिक इजा पोहोचवणार, पण झालं उलटंच...
" आज्जा!... पाहिलं हिच्या नवऱ्याला आनी सासूवर हिच्या समोर वार करू... मंग हिला आनी हिच्या सासऱ्याला... चालतंय न्हवं?..."
"१०० हिश्यानी... ह्यास्नी बगु मग हयेतच ती प्वार..."
देव किती परीक्षा बघणार होता अजून माहित नाही... वैभव आणि आईंनी एकमेकांवर वार करायला सुरे उचललेच होते की... आमच्या घराचा मेन दरवाजा कोणीतरी लाथ मारून उघडावा तसा उघडला... कोणीतरी एक पुरुष आमच्या घरात येता झाला... त्याच्या मागोमाग दुर्गा पण आत आली... त्या आलेल्या व्यक्ती मध्ये कमालीचं तेज होतं... त्यांच्या येण्याने वातावरणाला जी एक प्रकारची मळभ आली होती ती नाहीशी झाली... आमच्या घरात जणूकाही एका दिव्य शक्तीची एंट्री व्हावी असं वातावरण निर्माण झालं... वैभव आणि आई (चंदी आणि धनाजी) त्या आलेल्या व्यक्ती कडे बघतच बसले... वैभव आणि आईंच्या हालचालीं वरून असं वाटत होता की यांना इथून लांब जायचंय... दोघांनाही ते तेज सहन होईना...
"भागजाव!... निकल जावं यहांसे!... माझ्याशी गाठ ए!... खबरदार!..." असं म्हणत दुर्गा बरोबर आलेल्या माणसाने आपला उजवा हात ओठांवरच्या मिशांवरून फिरवला... जसा काही त्याने आदेशच दीला चंदी आणि धनाजी ला...
"अत्ता जातंय... पन उद्या दावतो तुला भी आनी या तुझ्या पोरीला भी... चल गं..."
वैभव आणि आई जागच्या जागी कोसळले, पण माझ्यात आणि बाबांच्यात त्यांना उचलायची ताकद नव्हती... त्या आलेल्या व्यक्तीने आणि दुर्गा ने आम्हाला उठायला मदत केली... दुर्गा आलेली बघून माझ्या मुलांमध्ये ही उत्साह संचारला... आम्हा सगळ्यांना पाणी पाजून आणि स्थिर करून दुर्गा आणि ती आलेली व्यक्ती आमच्या समोर बसले...
"ताई!... हे विनायकराव काळे... माझे अध्यात्मातले गुरु... आमचे काळे काका..."
दुर्गा ने वर्णन केल्यावर मी काळे काकांकडे बघतच राहिले... कसलं तेज होतं त्या माणसाच्या चेहऱ्यावर... डोळे असे भेदक की एखाद्याला रागे भरले तर संपलाच समोरचा फक्त डोळ्यांच्या धाकाने... पण ओठांवरच हास्य अगदी आपलासा वाटणार... फक्त हसण्याने त्यांनी काही क्षणात आम्हाला आपलासा करून घेतलं... दुर्गाने जरी ओळख आध्यात्मिक गुरु म्हणून करून दिली तरी पेहराव वरून कुठेच वाटलं नाही की या माणसाला आध्यात्मिक जाण असेल... कारण काळे काकांची आमच्या घरातली एन्ट्री ही, जीन्स, टी-शर्ट, पायात सॅन्डल, रेबॅन चा गॉगल, डाव्या हाताला घड्याळ, उजव्या हातात चांदीचं कड, गळ्यात छोट्या रुद्राक्षांची माळ... अगदी मॉडन लूक, पण त्यांची साधना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती...
"नमस्कार!... मी विनायक काळे... तुम्ही मला काळे काकाच म्हणा... चालेल..."
क्रमशः.........
वेलिंग नाडकर्णी..
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html