मध्यंतर (भाग दुसरा आणि शेवटचा )
मी -मला माहितीये की तुझा अश्या गोष्टींमधे विश्वास नाहीए पण तरीही तुझ्यासोबत असं काही अतार्किक घडलंय का ?म्हंजे एखादी अशी घटना ज्याबद्दल तुझा मेंदू ठामपणे तर्क लावू शकला नाही.अनुत्तरित असं.शुभांकर गंभीर पणे विचार करत मेंदू पोखरत पोखरत एक आठवण सांगू लागला.
शुभांकर-होय...अशी एक घटना आहे .म्हंजे आजही माझा त्या घटनेवर विश्वास नसला तरी त्या अविश्वासावर मी ठाम नाहीए.त्याचं झाल असं की .....पाच वर्षांपूर्वी मी ऑफीसच्या कामानिमित्त खालापूरला गेलो होतो.कामं उरकता उरकता अकरा वाजले होते.म्हटलं एवढ्या उशिरा गिरगावात जाणं शक्य नाहीए,म्हणून म्हटलं खोपोलीवरून शेवटच्या लोकलने डोंबिवलीला मावशीकडे जाऊन थांबूया.खोपोली वरून शेवटची ठाणे लोकल पकडली.शेवटची लोकल असली तरी डब्यात बरीच लोकं होती.त्यांची बडबड आणि डब्यातल्या पंख्याचा आवाज ऎकत मी खिडकीत बसलो.दिवसभर कामं करून थकल्यामुळे डोळा कधी लागला कळलंच नाही.जाग आली ती एका सुन्न शांततेने.होय ...मी अशी सुन्न आणि थंड शांतता कधीच अनुभवली नव्हती.डोळे उघडले तर डब्यात संपूर्ण अंधार ..पण बाहेर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सर्व सृष्टीवर पसरला होता.सारी सृष्टी दुधारी चंद्रप्रकाशात चित्रा सारखी स्तब्ध झाली होती. तिथे स्थळ , काळ , वेळ यांना काहीच अर्थ नव्हता.एका जड थंड वातावरणात चंद्राचा दुधारी प्रकाश सृष्टीवर चादरी सारखा पसरला होता.समोरच्या माळरानात कसलीच हालचाल होत नव्हती.असं वाटत होतं समोरचा डोंगर कुठल्यातरी दडपणाखाली त्या चंद्र प्रकाशात निमूटपणे फक्त उभा आहे. चंद्रप्रकाशात सुस्त पडलेले रेल्वे रूळ चमकत होते.सर्व परिसर कशाने तरी भारलेला दिसत होता.मी भान हरपून बाहेरील दृश्य बघत होतो.आणि तितक्यात ...तितक्यात कानावर एक आवाज ऐकू आला.कुणीतरी खूप विक्षिप्त कण्ह्त मुसमुसत रडत होतं.उपचाराविना कुजलेल्या जखमेला ठणके बसल्यावर ज्या यातनेने एखादा जीव रडतो तसं.डब्यात संपूर्ण काळोख होता आणि तो आवाज डब्यातल्या दुसऱ्या दरवाजाच्या पलीकडच्या कोपऱ्यातून आला होता.मी उठलो आणि आवाजाच्या दिशेनं चालत चालत जावू लागलो.मी दुसऱ्या दरवाज्या जवळ पोचलो तसा तो आवाज बंद झाला.एक विचित्र प्रकार मला कळत नव्हता तो म्हंजे बाहेर पडलेल्या चंद्रप्रकाशाचा एक कणही डब्यात येत नव्हता.डब्यात संपूर्ण काळोख होता.आणि त्यात पोटात खड्डा पाडणारी शांतता.खरं सांगायचं तर मला त्यावेळी तशी भीती वाटत नव्हती.पण फक्त त्या क्षणापर्यंतच.कारण पुढे जे झालं ते फारच विचित्र आणि भयानक होतं.कुणी डब्यात दिसतंय का म्हणून बघण्यासाठी कळोखात शक्य तेवढी नजर फिरवताना डब्यातल्या शेवटच्या टोकाला एकदम कोपऱ्यातल्या सीटवर खिडकीत डोकं टेकवून बसलेली एक पाठमोरी आकृती दिसली.असं वाटत होतं की जे कुणी होतं ते मान वर करून बाहेर चंद्राकडे एकटक पाहत होतं. मी दोनदा आवाज दिला "कुणी आहे का तिकडे" पण तिथे कसलीच हालचाल होत नव्हती म्हणून पुढे जायला एक पाऊल टाकणार तोच पुन्हा कण्ह्त विव्हळण्याचा आवाज आला तसा मी जागच्या जागी थिजलो.मला पुढं पाऊल टाकताच येईना.कारण त्या विव्हळण्यात एक भेसूर भकासपणा होता.भीतीची एक तीक्ष्ण लहर शरीरातून सर्रकन गेली.तो आवाज स्त्री की पुरुषाचा याचा अंदाज येत नव्हता पण कुठलातरी जीव तिथं बसून विव्हळतोय एवढ मात्र दिसत होतं.आपण घाबरतोय हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा स्वतःवर खूप चीड आली.तसं एका क्षणांत भीतीला झटकून टाकत मी तिथं जावू लागलो.खिडकीजवळ बसलेल वर चंद्राकडे बघत मुसमुसत फक्त विव्हळत होतं.मी सीटच्या जवळ गेलो तरी तिथे खिडकीत कोण आहे याचा अंदाज येत नव्हता.म्हंजे स्त्री की पुरुष ? काहीच कळत नव्हतं.मी अजुन पुढे गेलो.खरं तर त्यावेळी मी माझ्या मनात भीतीचा एक लवलेशही शिल्लक ठेवला नव्हता.पण आजही कधीकधी माझा हा निडरपणा आठवला तरी आतून पूर्ण शरीर, मन शहारुन उठतं....
मी खिडकीजवळ पोचलो होतो.तिथं विव्हळण अजूनही चालू होतं.मी नक्की काय करायचंय ते ठरवलं नव्हतं पण एका विचित्र प्रकारामुळे माझ्या मेंदूची विचारशक्ती खुंटत होती.विचारांचा चोथा होऊन मेंदू ठामपणे कुठला तर्क लावू शकत नव्हता.कारण डब्यात संपूर्ण काळोख होता आणि चंद्रप्रकाश खिडकीत स्थिरावला होता.मी अगदी सूक्ष्म अंतरात त्या आकृतीच्या जवळच उभा होतो.होय , माझ्यासाठी ती एक आकृतीच होती.कारण मला चेहरा स्पष्ट दिसत नव्हता म्हंजे त्या आकृतीच्या चेहऱ्याचा बाह्य भाग चंद्रप्रकाशात उजळत होता.आणि चेहऱ्याचा आतील बाजूस गडद काळोख..पण तिथं कोणतरी बसलं होतं.एकंदरीत तिथं आकृती नव्हती तर खरंच तिथं कुणीतरी होतं.असह्य वेदनेने विव्हळत वर आकाशात चंद्राकडे बघत बसलं होतं.ते भकास , बेसूर विव्हळण मला आता असह्य होत होतं.मी ठरवलं ...ठरवलं आपण जवळ जावून त्या जीवाची विचारपूस करावी.आणि मी न डगमगता त्या जीवाच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी पुढे नेला.आणि..आणि,मी जसा खांद्यावर हात ठेवला तसं तो जीव मागे वळून बघणार तोच एक गर्रगर्र पंख्याच्या आवाज होऊन डब्यातले लाईट पंखे चालू झाले..
काहीच कळत नव्हतं कारण मी जेव्हा गाडीत बसलो तेव्हा जे वातावरण होतं अगदी होतं तसं होतं. डब्यातली लोकं,बोलण्याचा आवाज,पंख्याचा आवाज.फक्त सोडून....कारण मी माझ्या सीटवर नव्हतो.तर मी दुसऱ्या दरवाजाच्या पलीकडे शेवटच्या कोपऱ्यातल्या सीटजवळ घामाघूम उभा होतो.आणि माझ्या समोर खिडकीजवळ बसलेला एक माणूस भयग्रस्त होत माझ्याकडे विस्फारत पाहत होता.त्याच्या चेहऱ्यावर जो संभ्रम होता तोच संभ्रम माझ्या मनात होता म्हणून तो माझ्या चेहऱ्यावर दिसत होता.काहीतरी खूप विचित्र घडलं होत जे फक्त आम्हांला जाणवलं होतं.फक्त ते आम्हांला मान्य करता येत नव्हतं ..
मी-इंटरेस्टिंग ..खरंच खूपच विचित्र प्रकार होता.शुभांकर स्थळ, काळ आणि वेळेची काही प्रमाण असतात.जेव्हा त्यांत जरासा तरी काही बदल झाला तर त्याचा सृष्टीवरआणि आपल्या वेळेवर थोडासा परिणाम होऊ शकतो.तुमच्या दोघांच्या बाबतीत ही शक्यता असू शकते.
शुभांकर-म्हंजे तुला असं म्हणायचंय की त्या माणसाला
माझ्यासारखाच विचित्र भास झाला?
मी- hmअसेलही कदाचित .म्हंजे बघ वेळ एकच पण स्थळ आणि काळ वेगवेगळे.तुझ्याबाबत ती आकृती खिडकीजवळ बसली होती तर त्याच्या बाबतीत तीच आकृती किंवा तो जीव सीट जवळ उभा असेल ...
शुभांकर-हम्म..पण मला नाही वाटत की ते तसं काही असू शकेल. कदाचित मी ड्रिंक केल्यामुळं मला तसा भास झाला असेल.
मी - तू ड्रिंक करतोस ?
शुभांकर- का?गोगटे आडनावाची व्यक्ती दारू पिऊ शकत नाही का?
मी -नै तसं नाही.पण तुझ्याकडे पाहून वाटत नाही
शुभांकर -की मी बेवडाय ते haaa haaa अरे राघव मी
काही अट्टल पिणारा नाहीए.कधीतरी मूड झाला तर सात, आठ महिन्यातून एकदा.पण त्यादिवशी जरा जास्तच ड्रिंक केलं होतं.
मी- अच्छा.
शुभांकर-तो काय प्रकार होता ते माहित नाही पण मी भूत, प्रेत,अतृप्त आत्मा वगैरे असले भंपक प्रकार मानत नाही.माणूस श्वासोच्छ्वासाची क्रिया करत असतो.जेव्हा माणसाच्या अंतर्गत शरीरात बिघाड होतो तेव्हा ही क्रिया थांबते आणि माणूस मरतो.तो परत कधीच उठत नाही.त्यामुळं त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्याने तो अतृप्तपणे भटकत फिरतो हे मी अजिबात मानत नाही.
एकंदरीत शुभांकर स्वतःच्या मतांवर ठाम होता.त्याच्या मते भूत, प्रेत, अतृप्त आत्मा असं काही नसतंच.शुभांकर जागेवरुन उठत दरवाज्या जवळ जाऊन उभा राहिला आणि खिशातून सिगारेट काढून ओठाला लावली.
मी-अरे शुभांकर तू सिगारेट पण...
शुभांकर -हो.गोगटे आडनावाचा माणूस सिगारेटही ओढु शकतो.कळलं ?
मी-बरं...पण बाहेर जावून ओढ.
शुभांकर-व्यसनं करत नाहीस वाटतं.कमाल आहे तुझी.
शुभांकर हसत हसत बाहेर गेला तसं माझी मानदुखी आणखी वाढू लागली.शुभांकर बाहेर उभा राहून सिगारेट ओढत बोलू लागला.
शुभांकर-अरे राघव तिथे मोटरमनच्या डब्याजवळ लोकांचा जमाव दिसतोय रे.कुणीतरी गाडीखाली आला बहुतेक.चल जावून बघुयात.
मी- नको रे मला तो चिरडलेला मृतदेह बघवणार नाही.आणि माझी मान ही खूप दुखतेय.मी नाही येत.
शुभांकरला तो चिरडलेला मृतदेह बघायची खूपच घाई झाली होती.तो झपाझप पावलं टाकत पुढे गेला.
माझ्या मानेला असह्य वेदना होऊ लागल्या तसं मी दोन्ही हातांनी मान गच्च पकडून बसून राहिलो आणि तेवढ्यात शुभांकरचा ओरडण्याचा आवाज आला. राघव .........
मी ताडकन उठत बाहेर आलो आणि धावत धावत जमावाकडे जाऊ लागलो.वीस पंचवीस लोकांच्या घोळकाच्या मागे शुभांकर संभ्रमावस्थेत गुडघ्यावर खाली बसला होता.त्याच्या संपूर्ण शरीरातून पाण्यासारखा घाम निघत होता आणि डोळे भयाने विस्फारले होते.मी माझी मान सावरत त्याला विचारलं.
मी-अरे शुभांकर काय झालं?
शुभांकरच्या तोंडातून शब्द निघत नव्हते.तो अथक प्रयत्न करून बोलू लागला
शुभांकर-अरे राघव ...ते,ते, कसं..शक्य आहे....
मी-हा हा बोल शुभांकर ...
शुभांकरने जमावाच्या मधोमध ठेवलेल्या मृतदेहाकडे बोटाने इशारा केला तसं मागे वळून पाहतो तर एक शिर नसलेल मृतदेह होता.....जाडजूड शरीरयष्टीचा ....
मी पुन्हा शुभांकरकडे वळलो तसं शुभांकर अडकत अडकत बोलू लागला.
शुभांकर -राघव मी...मी...अरे ..माझं लग्न, सगळं.. सगळं.....आणि बोलता बोलता त्याच्या मानेतून रक्त येत अलगदपणे त्याचं शिर धडापासून वेगळं होतं गरंगळत खाली पडलं.........
असं म्हणतात की मृत्यूची चाहुल मरणार्याला आधीच लागते.पण शुभांकरच्या बाबतीत तसं नव्हतं.लग्नाच्या तीव्र इच्छेने पछाडलेला शुभांकर क्रॉसिंग करताना रेल्वेखाली कधी आला हे त्यालाही कळलं नव्हतं.खरंच....इच्छाशक्तीत
शुभांकर गेला तसं माझी मानदुखी ही नाहीशी झाली.त्यादिवशी सकाळपासून अचानक सुरू झालेली मानदुखी कसला तरी संकेत देत होती.तो संकेत चांगला की वाईट हे मला अजूनही ठरवता येत नाहीए.काळ हा नेहमी आपल्याला वेगवेगळ्या मार्गानं काही ना काही संकेत देत असतो.कधी कधी ते आपल्याला जाणवतात तर कधी एखादी घटना घडून गेल्यावर आपल्याला कळतं.या जगात फक्त एकच सत्य आणि शक्तिशाली आहे.तो म्हंजे काळ...त्याच्यासमोर कुणाचाच निभाव लागत नाही.अगदी नियती ही त्याच्यासमोर नतमस्तक होते.खरंतर काळाने आधीपासूनच डाव मांडलेला असतो.माझं शुभांकरला भेटणं योगायोग मुळीच नव्हता.तो काळान वेळेसोबत रचलेला डाव होता.आणि आम्ही दोघं प्यादी..शुभांकरसाठी वेळेन काटे उलटे फिरवले होते.आणि माझ्यासाठी ते बदलले होते.
चांगली नोकरी सोडून पूर्णवेळ लिखाण करण्याचा माझा निर्णय तेवढा सोप्पा नव्हता.छोटी मोठी लिखाणाची कामं मिळत होती पण हवा तसा पैसा येत नव्हता.एकदिवस दादरच्या मराठी साहित्य ग्रंथालयात गेलो आणि तिथं माझी नजरानजर एका स्त्रीशी झाली.तिला पाहताक्षणी आतून कुठंतरी तीव्रपणे जाणवलं की हिला मी ओळखतो.काहीतरी जुळलेले आहे हिच्याशी पण काय ते कळत नव्हतं.त्यानंतर मी रोज तिथं जायला लागलो.आणि मग एक दिवस तिला स्वतःबद्दल सगळं सांगितलं आणि मला तूम्ही खूप आवडता म्हणत सरळ लग्नाबद्दल बोललो.आपण उद्या संध्याकाळी सात वाजता शिवाजी पार्कला भेटून बोलू.असं बोलून निघून गेली.मला तिचं नाव ,गाव काही म्हंजे काहीच माहिती नव्हत पण ती मला खूप आवडली होती.दुसऱ्या दिवशी आम्ही शिवाजी पार्कला भेटलो.तिथं मला तिने तिच्याबद्दल जे काही सविस्तर सांगितलं ते असं होतं
माझं नाव संपदा जोगळेकर, माझं याआधी लग्न ठरलं होतं पण लग्नाच्या आदल्या दिवशी आडगाव रेल्वे स्टेशनवर त्यांचं अपघातात निधन झालं.....मी जे काही समजायचं होतं ते समजून गेलो आणि तुम्हीही......
आज आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत आणि आम्हांला एक छान गोंडस मुलगी आहे.मी तिचं नाव शुभा ठेवलंय.
लेखक -K sawool