A real horror marathi story
फ्लॅट भाग 20
फ्लॅट भाग २०_०१...
"नमस्कार!... मी विनायक काळे... तुम्ही मला काळे काकाच म्हणा... चालेल..."
आहाहाहा!... काय जादू होती त्या आवाजात... एका क्षणात समोरचा फक्त आवाजावर काळे काकांकडे खेचला जावा... माझ्या दोन्ही मुलांना तर त्यांनी स्वतःच्या प्रेमळ वाणीने आपलंसं करून टाकलं काही वेळात... त्यांनी आणलेल्या केडबरी ने तर मुलं खुश... खरंतर किती वेगळ्या कामाला आले होते ते आमच्या कडे, काय परिस्थिती होती थोड्या वेळा पूर्वी, काय टेन्शन मध्ये होतो आम्ही आणि काळे काका आल्यावर किंवा त्यांच्या येण्याने म्हणा वातावरणच एकदम बदलून गेलं... गडद काळ्या ढगांनी आकाशाला झाकाळून टाकलेलं असताना जशी वातावरणात एक उदासीनता येते आणि तेवढ्यात त्या ढगांना न जुमानता सूर्यनारायणाने आपलं मुखदर्शन देऊन वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करावं, ती सर्व उदासीनता एका क्षणात नष्ट करून टाकावी असच काहीतरी काळे काका आल्या पासून झालं होतं... माझ्या सासू सासऱ्यांना तर त्यांना कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं होतं... माझ्या सासऱ्यांनी तर काळे काकांना विनायकपंत करून टाकलं... आई बाबा वयाने मोठे असले तरी काळे काकांशी अदबीने बोलत होते... कारण काळे काकांच्या साधनेच तेज त्यांच्या चेहऱ्यात, बोलण्यात, हालचालीत स्पष्ट जाणवत होतं... ह्या सगळ्यात कुठेही मी पणा, हेकेखोर पणा, कर्मठ पणा, स्वतः कोणीतरी वेगळं आहोत किंवा मी तुमच्याहून कोणी वेगळा आहे हे अज्जीबात जाणवून नाही दिलं त्यांनी... खूप मिसळून गेले ते सगळ्यांत, जसं काही आमची खूप वर्षांची ओळख असावी... सध्याच्या कली युगात एक तर सात्विक शक्ती ने परीपूर्ण मनुष्य मिळणं अवघड आणि काकांकडे बघून आणि त्यांच्या पेहेरावाकडे बघून कोणीही म्हणणार नाही की हे कोणी अध्यात्मिक गुरु वगैरे असतील... आईनी त्यांना पाणी चहा विचारला पण त्यांनी सध्या काहीही खायला नकार दिला... काळे काका आल्या पासून मी फक्त त्यांच्याच विचारात होते... काकांच्या डोळ्यात मला त्या हॉस्पिटल मधल्या स्वामींच्या फोटोतली जरब दिसली पण तेवढीच ती नजर प्रेमळ होती... मी विचारच करत होते की...
"अगं ताई!... कसला विचार कारतीयेस इतका?..."
"माझा"... काका म्हणाले...
"नाही ओ काका तसं काही नाही..."
"माझ्या बद्दल जेवढा विचार करशील तेवढं समजायला अवघड आहे, ,आणि तेच तुम्ही करता... मी सामान्य माणूस आहे गं, तुमच्या सारखा... मी काही मंगळावर नाही जन्माला आलो... हां फक्त तुम्ही जेवढा देव करता त्या पेक्षा काही टक्के मी जास्त केला... पण भगवंताच्या जवळ कोणीही जाऊ शकत... तो आपल्या मुलांमध्ये फरक करत नाही कधी... जो त्याला भक्ती ने प्रसन्न करतो त्याच्या जवळ तो नक्की असतो... आणि भक्ती ला साधनेच बळ मिळालं की भगवंत फक्त जवळ राहत नाही तर तो अनुभवता ही येतो... ज्याची जितकी भक्ती जितकी साधना तेवढं त्याला भगवंताचं सानिध्य... चिंता करू नका, चिंतन करा... मार्ग आपल्या आपण मोकळे होतात... कारण तो आपल्या भक्ताची काळजी नक्की घेतो..."
"काका आता आपण पुढे काय करायचंय?... ते धनाजी आणि चंदी..."
"काही काळजी करू नकात तुम्ही प्रीती... आता नाही तुम्हाला काही करणार ती दोघं... मी आलोय ना... होईल सगळं ठिक... जुनी खोडं आहेत, त्रास तर देणार... मोडतील पण वाकणार नाहीत... पण अशक्य ही शक्य करतात स्वामी... बघू कसं काय ते... पण त्या आधी मला सगळं नीट जाणून घ्यायचंय... दुर्गा माझ्याकडे आली आणि तिची अवस्था बघितली तसं एक दिवस तिला फक्त थोडा आराम करायला देऊन आम्ही निघालो... मला सगळं नीट सविस्तर सांगा..."
मी आणि दुर्गा ने काकांना सगळं सांगितलं... काका सगळं शांत आणि गंभीर पणे ऐकून घेत होते... आमचं सगळं ऐकून घेतल्यावर काका एकटेच आमच्या अख्ख्या घरात फिरून आले... त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली... मी जरा खाली जाऊन आलो म्हणाले आणि खाली गेलेपण... वैभव येतो म्हणाला त्यांच्या बरोबर तर नको म्हणाले, मी आलो जाऊन...
"काहीतरी क्ल्यू मिळालेला दिसतोय..."
"काय झालं दुर्गा?..."
"काही नाही गं ताई... आणि कसला विचार करत होतीस गं इतका?..."
"अगं काही नाही... काकांकडे बघून एकदम भरून आलं... त्यांचं तेज त्यांच्या बद्दल विचार करायला भाग पाडतं... आता कुठे गेले असतील गं काका?..."
"अगं ताई!... उद्या अमावास्या आहे... मग आपल्याला तयार असायला हवं... चंदी आणि धनाजी ची शक्ती आत्ता खूप जास्त ए... त्या साठीच सगळी अनुकूल परिस्थिती आहे ना ते बघायला गेलेत.,."
"तू कशी काय ओळखतेस गं यांना?... म्हणजे तुझ्या अध्यात्मिक शिक्षणाचं ज्ञान घ्यायला हे कसे भेटले तुला?..."
"अगं ताई!... मला माझ्या आज्जी कडून यांच्याकडे जाण्याची आज्ञा झाली... माझ्या आज्जी ला स्वामींचा अनुग्रह होता, म मला ते कार्य माझ्या आज्जी कडून मिळालं... माझी आज्जी ही काकांच्या गुरूंची गुरूभगिनी... काकांना ती ओळखत होती..."
"आता पुढे काय करायचं आपण?... या चंदी आणि धनाजी या प्रकरणातून बाहेर पडू ना गं?..."
"बघुया!... आता काका आले कीचं आपल्याला कळेल... आता फक्त काकाच आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवू शकतात... आणि तू नको करूस काळजी... काका येतील आणि तेच सांगतील पुढे काय ते..."
थोड्यावेळाने काका वरती आले... त्यांच्या प्रकारे ते आमची सोसायटी पूर्णपणे फिरून आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी काही कमी झालेली दिसली नाही... मला तर खूप टेन्शन आलं होतं... काका खूप विचारमग्न झाले होते...
"काय झालं काका?... कसला एवढा विचार करताय?..."
" ते तुमच्या सोसायटीमध्ये चिंचेच्या झाडाखाली एक मंदिर आहे ते कसलं आहे... त्याच्याबद्दल काही माहिती आहे का?..."
" नाही हो एवढी माहिती... आम्ही राहायला आल्यापासून हे मंदिर तसंच आहे... गावातली लोक येऊन दर्शन घेऊन जातात... बिल्डर कडून समजल होतं की ते मंदिर पहिल्यापासून तिथेच आहे आणि सोसायटी साठी जागा देताना जागा मालकाने त्या मंदिराला हात लावायचा नाही या अटीवरच ही जागा बिल्डरला विकली होती..."
"काका मला माहिती आहे ते मंदिर कोणाचं आहे ते..."
"कोणाच आहे?..."
"आईने सांगितलं होतं ते मंदिर धावजी पाटलांचं आहे..."
"कोणाचं???..." काकांनी चमकून दुर्गा कडे बघीतल...
"धावजी पाटील म्हणून कोणाच तरी..."
"आता कदाचित ही गुथ्थी सुटेल अस दिसतय..." अस म्हणत काकांनी पहिलवाना सारखा शड्डूच ठोकला आणि "मी आलोच" अस म्हणत परत खाली गेले...
काका नक्की परत खाली का गेले? हे बघण्यासाठी मी दुर्गा आणि वैभव आमच्या बाल्कनीमध्ये गेलो... काका खाली उतरून सरळ त्या चिंचेच्या खालच्या छोट्याश्या मंदिरा कडे गेले... मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार करून काका तिथेच चौथऱ्यावर थोडावेळ ध्यानस्थ बसले आणि परत वर आले...
"दुर्गा चल... आपण जरा फ्रेश होऊन येऊया... कारण आपल्याला उद्याची खूप तयारी करायची आहे..."
"तुम्ही निघालात?... आणि तुम्ही दोघं नसताना ते धनाजी आणि चंदी परत आले तर?... तुम्ही दोघं थांबा ना प्लीज इथे... तुम्हाला काय लागेल त्याची सोय मी इथे करते पण प्लीज तुम्ही जाऊ नकात..."
"प्रीती तुम्ही काहीही काळजी करू नकात... मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, आता धनाजी आणि चंदी तुम्हाला त्रास देणार नाहीत म्हणून... मी आहे ना! काहीही काळजी करू नकात... फक्त मला उद्यासाठी काय तयारी करायची आहे? त्याकरता थोडसं सुचिरभूत व्हावं लागेल... तुमच्या घरी मला आत्ता पाणी पण घेता येणार नाही... मी आणि दुर्गा अर्ध्या तासात परत येतो, काळजी करू नकात..."
असं म्हणून काकांनी डोळे मिटले आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आपला उजवा हात कोपरात दुमडून उजव्या हाताचे मनगट हवेतल्या हवेत गोल फिरवून तळहातावर एक फुंकर मारली आणि...
" आलोच... सगळे इथेच बसून रहा... मी येईपर्यंत, या खोलीतून कोणीही हलू नका..." म्हणत दुर्गा आणि काळेकाका आले तसे निघूनही गेले... काळेकाका परत येण्यासाठी निघून गेले खरं! पण आमच्या सगळ्यांच्याच मनात धडकी भरली... त्यांनी काही होणार नाही असं आश्वासन दिलेलं असलं, तरी गेल्या काही दिवसांमध्ये धनाजी आणि चंदीने आमच्याजवळ पोहोचण्यासाठी जे जे काही म्हणून प्रयत्न केले होते ते बघता आमच्या मनात भीती निर्माण होणं सहाजिक होतं... पण आता काही पर्यायही नव्हता... काका आणि दुर्गा परत येईपर्यंत आम्हाला स्वस्थ बसून राहणं भाग होतं... काकांनी धीर दिला असला तरी आम्ही सगळे बाहेरच्या खोलीत शांत बसून होतो... इथून काहीही झालं तरी हलायचं नव्हतं... पाच दहा मिनिटं झाली असतील की बाथरूम मध्ये पाणी सोडल्या सारखा नळ सुरू झाला... अचानक झालेल्या आवाजाने आम्ही सगळेच चरकलो... सवयीप्रमाणे आई नळ बंद करायला उठणारच होत्या, की बाबांनी त्यांना अडवलं आणि नजरेनेच नको जाऊस इथेच बसून रहा अशी खूण केली... ते होत नाही तोपर्यंत
"बाबा रुद्र बघा बाल्कनीतून वाकून बघतोय खाली..."
असा तन्मय चा आवाज आला... वैभव ला वाटल तन्मय ने आपल्याला आवाज दिला... तो उठणारच होता की मी त्याला परत बसतं केलं आणि तन्मय त्याच्या आणि बाबांच्या मध्ये बसलाय आणि रुद्र त्याच्या मांडीवरच आहे हे दाखवलं… या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन झाल्या आणि ते आवाजही इतके खरे होते की आईना आणि वैभव ला हे भानच राहिलं नाही की ते सर्व भास आहेत... हॉल मधून आम्ही बाहेर पडावं याकरता धनाजी आणि चंदीने केलेले ते प्रयत्न होते… साधारण अर्ध्या तासाचा वेळ गेला आणि दुर्गा ने मी दिलेल्या चावीने आमच्या घराचं दार उघडलं… ती आणि काका घरात प्रवेश करते झाले... काका आणि दुर्गा घरात आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते… सगळ्यांना खूप आनंद झाल्यासारखा दिसत होता… सहाजिकच आहे म्हणा इतके दिवस दुर्गा आमच्यासाठी आशे धनाजी यांनी आत्तापर्यंत दिलेला जो काही म्हणून त्रास होता, सॉरी त्रास नाही चंदी आणि धनाजी या दोघांनी मिळून आमच्या संपूर्ण परिवाराचा जो काही शारीरिक आणि मानसिक छळ मांडला होता त्यातून आता काकाच आम्हाला बाहेर काढतील असा प्रत्येकाला विश्वास होता... काकांनी घरात प्रवेश केल्यानंतर दुर्गा सहित आम्हा सगळ्यांना हॉलमध्येच बसून राहायला सांगितलं… काका फ्रेश होऊन आले खरं त्यांच्या पेहरावात कोणत्याही प्रकारचा बदल नव्हता फक्त आता जीन्स आणि टी शर्ट च्या जागी कॉटन जीन्स आणि शर्ट होता… काका तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आमच्या आख्ख्या घरातून फिरून आले, येताना त्यांनी घराची सर्व दारवाजे आणि खिडक्या बंद केल्या व म्हणाले...
"आता तुम्ही सर्वांनी फ्रेश होऊन घ्या, अंघोळी वगैरे उरकून घ्या… आपल्याला लवकरात लवकर पुढची तयारी करायला हवी, वेळ कमी आहे…"
काकांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द इतका आश्वासक होता की मुलांसकट प्रत्येक जण काहीही भीती नसल्यासारखा आंघोळ करून फ्रेश व्हायच्या तयारीला लागला… आम्ही ही सर्व सुचिरभूत होऊन परत हॉल मध्ये आलो… तोपर्यंत काकांनी त्यांच्या सॅग मधून त्यांची बैठक काढली आणि पूर्वाभिमुख बसले…
"काका आजोबा आता तुम्ही काय करणारे? आपण बाहेर जाणार आहोत कुठे? तुम्ही इथे खाली का बसलात? वर बसा ना आमच्या बरोबर
"रुद्र तू आईजवळ जाऊन बस, काकांना नको त्रास देऊस…"
"नाही मी आणि दादू, काका आजोबां बरोबरच रहाणार आहोत… आम्ही मगाशीच डिसाईड केलय, होना रे दादू?…"
काय करावं या मुलाचं? आमचा नोटंकी कुठेही सुरू होतो… काळे काकांना तर त्याने काकाआजोबाच करून टाकलं… पण काकांनीही त्याचं ते निरागस पणे काकाआजोबा हाक मारण तेवढ्याच निरागस पणे स्वीकारलं ही… कारण ते त्याला म्हणत होते…
"बस हं!… तू आणि तुझा दादा माझ्याच बाजूला बसा…"
"काकाआजोबा!… तुम्ही पण दादूच म्हणा ना!…"
"बर बाबा!… तू आणि दादू बसाल ना माझ्या बाजूला?… घाबरणार नाही ना अजिबात?…"
"मुळीच नाही घाबरणार!… मला आणि दादूला सर्व माहिती आहे, आम्ही सर्व सर्च मारलाय… हो ना रे दादू?… पण आपण इथे बसून काय करणार आहोत?…"
"सांगतो!… आपण आता सर्व ह्या हॉल मध्ये बसणार आहोत… तुम्ही दोघं माझ्यामागे बसायचं, तुमच्याबरोबर दुर्गाताई पण बसणारे हं! आणि तुम्ही सगळ्यांनी मनातल्या मनात ||श्री स्वामी समर्थ|| असं म्हणत राहायचं… जोपर्यंत मी 'म्हणायचं थांबा' असं म्हणत नाही तोपर्यंत ||श्री स्वामी समर्थ|| असं म्हणत राहायचं…
"मग तुम्ही काय म्हणणार?… तुम्ही पण ||श्री स्वामी समर्थ|| म्हणणार?…"
"मी नाही म्हणणार!… तुम्ही सगळे म्हणत असाल ना, त्यावेळी मी तुम्हाला सगळ्यांना जे त्रास देतात ना त्यांच्याशी बोलणारे… म मी बोलत असताना मला प्रोटेक्शन हवं ना? म्हणून तुम्ही ||श्री स्वामी समर्थ|| म्हणत राहायचं, नाहीतर ते मलाही त्रास देतील…"
"तुम्हालाही त्रास देतील?… दादू ये चल! काकाआजोबांच्या मागे बस… आपण काकाआजोबांना प्रोटेक्शन देऊ… काकाआजोबा मी आणि दादू त्यांना अजिबात नाही घाबरत, तुम्ही बोला त्यांच्याशी… आम्ही बसतो तुमच्या मागे…
खरंतर माझी दोन्ही मुलं सहजासहजी कोणामध्ये मिक्स होत नाहीत… पण काळे काकांना इतक्या कमी वेळात त्यांनी आपलं केलं होतं, कदाचित मी बोलायला चुकत असेन… काळे काकांनीच आम्हाला सगळ्यांना आपलंसं केलं होतं… काळे काकांनी सांगितलं तसं आम्ही सर्वजण हॉलमध्ये बसलो मुलं आणि दुर्गा काकांच्या मागे बसले सर्वांनी मनातल्या मनात ||श्री स्वामी समर्थ|| हा जप म्हणायला कधीच सुरुवात केली होती…
"जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडणार नाही… ||श्री स्वामी समर्थ|| हा जप सोडून कोणी काहीही बोलणार नाही… सगळ्यांचे डोळे बंद राहतील, कोणीही डोळे उघडणार नाही… कोणतेही आवाज येवोत कोणिही प्रत्युत्तर देणार नाही… चिंतन करा चिंता करू नका, सर्व ठीक होईल… करुया सुरुवात?…"
काकांसोबत आम्ही सर्वांनी ध्यान लावले… थोडा वेळ गेला असेल आणि आजूबाजूचं वातावरण एकदम थंड झालं… वातावरणात तसा गारवा होता पण हे जे शरीराभोवती च वातावरण एसी पेक्षा थंड झालं ते काही वेगळंच होतं… शरीराबरोबर मनालाही हुडहुडी भरवणाऱ्या, चिल्ड झालेल्या आमच्या त्या हॉलमध्ये थोड्या वेळातच चित्रविचित्र आवाज यायला लागले… माझा स्वामी नामाचा जप सतत चालूच होता… मनातल्या मनात… पण ते चित्रविचित्र आवाज कानाला असह्य आणि कर्कश्श होते… कोणीतरी जोरात ओरडतय, विव्हळतय, रडतंय असं वाटत होतं… थोड्या वेळात ते आवाज येणं शांत झालं, पण अगदी थोडाच वेळ गेला आणि भांडी आणि वस्तूंची आदळा आपट केल्याचा आवाज येऊ लागले… कोणीतरी गुरगुरत आपल्या आजूबाजूला फेऱ्या मारतय, आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतय, असं वाटायला लागलं… आजूबाजूच्या हवेत थंडी प्रचंड वाढली होती, वातावरण बर्फासारख थंड झाल होतं… या सगळ्यातही काकांनी सांगितल्याप्रमाणे मी तरी फक्त स्वामी नामाचा जपच करत होते, इतर व्यक्तींची ही तशीच अवस्था असावी… या सगळ्या ज्या आजुबाजुला घडत होत्या त्यात मात्र माझ्या गळ्यात असलेली माईंनी दिलेली रुद्राक्षाची माळ मला गरम जाणवत होती… वातावरण एवढं थंड होऊन सुद्धा रुद्राक्षाच्या माळेचे उब माझ्या शरीराला स्पष्ट जाणवत होती… परत थोडा वेळ गेला असेल की आजुबाजूच थंड वातावरण हळूहळू पुन्हा गरम होऊ लागलं… थोड्याच वेळात आजूबाजूचं वातावरण रूम टेम्परेचर ला आलय असं जाणवायला लागलं… स्वामी नामाचा जप करत असताना आता काकांचा ही काही तरी मंत्र पुटपुटल्याचा आवाज येत होता… मला जे जाणवत होतं तेच आमच्या घरातल्या इतर व्यक्तींनाही जाणवत असेल का? त्यांना काही झालं तर नसेल ना अशी भिती मनात दाटून येत होती?… पण त्यावेळी काकांचे शब्द आठवले, चिंतन करा चिंता करू नका त्यामुळे सर्व काकांवर सोडून मी स्वामी नामाचा जप तसाच सुरू ठेवला… बदललेल्या वातावरणामध्ये मी ज्या वेळेला स्वामी नामाचा जप करत होते त्या वेळी आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी यावा तसं संपूर्ण वातावरणात स्वामी नामाचा जप ऐकायला येत होता… मी किती वेळ ध्यानाला बसले माहिती नाही पण माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हां मला रूद्र हलवून उठवत होता…
"आई उठ ना काकांनी कधीच थांबा म्हणून सांगितलय…"
माझे डोळे उघडले तेव्हा सगळे आपापल्या जागी बसून माझ्याकडेच बघत होते…
"अरे वा!… प्रीतीजी छान ध्यान लागलं होतं की तुमचं… चला आता मला तुमच्या सगळ्यांशी काही बोलायचंय…"
आता काका नक्की काय बोलणार या कडे आमच्या सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं होतं… प्रत्येकाच्या मनात विचारांचं तसं काहूर माजलं होतं… काळे काका शांत होते, काहीतरी विचार करत होते, मनाशी काहीतरी पक्क करून काकांनी आमच्या सगळ्यांची बोलायला सुरुवात केली…
"काका काय झालं सांगा ना? काही प्रॉब्लेम नाही ना?…"
"सांगतो! सांगतो! प्रीतीजी तुम्ही आणि दुर्गा ने मला जी चंदी आणि धनाजी यांची सर्व हकीकत सांगितलीत, त्यावरून मी तुमच्या घराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतला… परिस्थिती खूपच बिकट आहे, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी चंदीनी बऱ्याच लोकांचा बळी घेतला आणि तिला मदत झाली ती धनाजीची… कोणाच्यातरी हव्यासापोटी आपल्या नातीचा जो बळी गेला त्यामुळेच धनाजी ही चंदीची मदत करतोय… तुम्ही सगळ्यांनी काळुबाई या देवी बद्दल ऐकलं असेल… तुमच्या सोसायटीमध्ये चिंचेच्या झाडाखाली जे छोटेसे देऊळ आहे ते धावजी पाटलांच आहे… काळुबाई हे एक जागृत देवस्थान आहे आणि धावजी पाटील हा देव काळूबाईच्या सैन्याचा सेनापती मानला जातो… काळुबाई ही धनाजी आणि चंदी यांच कुलदैवत आहे… धनाजी आणि चंदीचा मृत्यू ज्या प्रकारे झाला तो एक घातपातच होता… चंदीने आबा पाटला बरोबर काही स्वप्न रंगवली होती… तसेच धनाजी ने आबा पाटलाकडून आपल्या नातिला नांदवण्याचा शब्द घेतला होता… पण त्याआधीच त्यांचा निर्दयी पणे खून केला गेला… मरताना त्या दोघांची जी इच्छा अपूर्ण राहिली त्यामुळे ते अजूनही या मृत्युलोकात अडकलेले आहेत…"
"पण चंदीने आणि धनाजीने आबा पाटील, सर्जेराव पाटील आणि बर्याच जणांचे बळी घेतलेत ना? मं अजूनही ते का या मृत्युलोकात अडकून आहेत? आणि आम्हाला त्रास द्यायचं काय कारण?…"
"कसा ए ना प्रीतीजी, भले ही त्यांनी पाटलांच्या घरातील भरपूर लोकांचा बळी घेतलाय, इतकंच नाही तर त्यांचा आत्मा ज्या परिसरात घुटमळतोय त्या एरियात येणाऱ्या प्रत्येक माणसाचा त्यांनी बळी घेतलाय… पण अजूनही पाटील घराण्यातील सगळ्या व्यक्तींचा बळी त्यांना घेता आलेला नाही… एखाद्या आत्म्याची अत्रुप्त राहिलेली इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो या मृत्युलोकात अडकून राहतो… जोपर्यंत त्याला आपली इच्छा पूर्ण झालेले नाही असं वाटत नाही तोपर्यंत तो अतृप्तच असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हां इथे राहायला आलात तेव्हांपासून तुम्हा सगळ्यांना यांचा त्रास सुरू झाला… हातात भेटलेलं सावजाचा जोपर्यंत अंत करत नाही तोपर्यंत असे आत्मे त्यांना सोडत नाहीत…"
"पण सोसायटीत भरपूर लोक राहतात मग आम्हालाच या सगळ्याचा का त्रास?…"
"असं तुम्हाला वाटतंय… प्रत्येक चांगल्या आणि वाईट आत्म्यांचा एक एरिया ठरलेला असतो… त्या एरियाच्या बाहेर जाऊन ते मनुष्यप्राण्याच नुकसान करू शकतात, पण त्यांच्या एरिया मधेच ते जास्ती शक्तिशाली असतात आणि एरिया म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला ज्या काही दाही दिशा आहेत म्हणजेच चार मुख्य दिशा चार उपदिशा आणि वर आकाशापर्यंत गेलेली एक दिशा आणि खाली जमिनीत गेलेली एक दिशा अशा मिळून दहा दिशा ह्या प्रत्येक दिशेला त्यांची एक बॉर्डर ठरलेली आहे… तुम्हाला वाटतंय की याचा त्रास फक्त तुम्हालाच होतोय, पण तुमच्या आजूबाजूला राहणारे तुमच्या वरच्या मजल्यांवर राहणारे प्रत्येक जण काही ना काही अडचणीत नक्की असणार… पण मुख्य केंद्र तुमचं घर असल्याने या घरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याचा जास्ती त्रास होतोय…"
"मं हे सगळं कसं थांबणार का? याच्यावर काहीच का उपाय नाही?…"
"उपाय आहे… अवघड आहे पण अशक्य नाही आणि अशक्य जरी असलं तरी 'अशक्य ही शक्य करतील स्वामी'… माझा जसा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तसाच तुमचाही आहे हे कळालय मला… चंदी आणि धनाजी यांना या मृत्युलोका तुन मुक्ती देण्यासाठी आपल्याला काही वैदिक पद्धतीने हवन कराव लागेल, तेही उद्याच… त्याच बरोबर तुम्हाला काळुबाईच्या नावाने एक जागरण गोंधळ घालावा लागेल…"
"काळुबाईचा नावाने? आणि जागरण गोंधळ? ते का?…"
"कसं आहे ना प्रीतीजी, देव आपल्या प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून जातो… धनाजी आणि चंदी यांच कुलदैवत काळुबाई आहे… मृत्यूपश्चात या दोन आत्म्यानी आपल्या देवाला साकडे घातल्याने धावजी पाटील या आपल्या देवीच्या भक्तांच्या मदतीला धावून आला… ह्या दोन आत्म्यांचा हेतू जरी बदला घेण्याचा असला तरी यांनी बऱ्याच निष्पाप लोकांना ही आपल्या या बदलण्याचा शिकार बनवलंय… आपण उद्या जे काही यांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी हवन करू त्यात आपल्याला काळुबाईची मदत लागेल… आणि धावजी पाटील काळुबाईचा सेनापति असल्याने आपण जर काळुबाई ना साकडं घातलं तर आपल्याला ते त्रास देणार नाहीत किंवा आपल्या कार्यात अडचण अथवा विघ्न येऊ देणार नाहीत…"
"मी आणि वैभवजी आता बाहेर जाऊन उद्याच्या हवनासाठी लागणारी सामुग्री घेऊन येतो… अज्जिबात घाबरून जाऊ नका… आता कोणीही तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास देणार नाही… पूर्वी जसे वावरत होतात घरात तसेच वावरा… चला वैभवजी, आपण जरा बाहेर जाऊन येऊ दुर्गा तू इथेच थांब…"
"काका तुम्ही आल्यापासून काहीच खाल्लं नाहीत… पाणीही प्यायला नाहीत… जेवणासाठी काय बनवू? आत्ता थोडा नाश्ता करून बाहेर पडा…"
"नको! मी बाहेर काही खात नाही, फक्त थोडा फलाहार करेन… पण तेही आम्ही येताना घेऊन येऊ, तुम्ही माझी काळजी नकाकरू… पोरं भुकेली असतील, तुम्हीही काही खाल्लेलं दिसत नाहीये… दुर्गा प्रीतीजींचा हात फ्रॅक्चर आहे, तर आईंना थोडी स्वयंपाकात मदत करशील!…"
"हो काका नक्कीच! तुम्ही या पटकन जाऊन, मी आहे इथेच आज… तुमच्या सगळ्यांबरोबर इथेच थांबणार आहे… उद्याचं कार्य पूर्ण करूनच घरी जाईन, तसं मी सांगितलय आई ला…"
काका वैभव ला घेऊन उद्याची तयारी करण्यासाठी बाहेर गेले… सगळ्यांच्या मनात नाही म्हणायला एक भीती होतीच… आईंनी आणि दुर्गाने मला काहीच काम करू दिलं नाही… आमच्या या संकट काळात देवाने दुर्गा आणि काका यांना मदतीला पाठवलं होतं… कोण कुठले दोघं पण आमच्या या अडचणीत आमच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते… आम्हाला या सर्व अडचणींमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आले होते… या दोघांचे आभार कसे मानायचे हे कळत नव्हतं मला, पण देवाने या दोघांना आमच्या मदतीसाठी पाठवलं यासाठी मी देवाचे अगणित वेळा आभार मानून झाले… तासा-दोन तासांनी काका आणि वैभव भरपूर सामानासह परत आले… काकांनी उद्याच्या हवनासाठी जोरदार तयारी केलेली होती… काहीतरी निश्चित ठरवूनच काका वावरत होते… त्यादिवशी दुपारी आणि रात्री काकांनी फलाहारच केला होता… या आमच्या घरातला हॉल प्रशस्त असल्याने रात्री सगळ्यांची झोपण्याची सोय वैभवने हॉलमध्येच केली होती… खूप दिवसांनी आम्हा सगळ्यांना रात्रीची शांत झोप लागली… पहाटे साधारण चार सव्वाचार वाजता माझी थोडीशी झोप चाळवली… उशाशी ठेवलेलं पाणी पिण्यासाठी म्हणून उठले, तर काका बसलेले दिसले… इतक्या सकाळी का उठले असतील? म्हणून मीही माझ्या जागेवर उठून बसले… काका पूर्वाभिमुख तोंड करून ध्यानस्थ बसले होते आणि आमची दुर्गा सुद्धा त्यांच्याबरोबरच ध्यान लावून बसली होती… दोघांचे चेहरे डिम लाईटच्या प्रकाशात सुद्धा इतके तेजस्वी दिसत होते की काय सांगू… मला माहिती नाही किती वेळ पण मी या गुरू-शिष्याच्या जोडीला भान हरपून बघत बसले होते… बराच वेळ दोघांचं ध्यान लावून झाल्यानंतर दोघांनी डोळे उघडले… मला उठलेलं बघून दोघांनाही आश्चर्य वाटलं…
"ताई तू कधी जागी झालीस? झोपायचं ना! आत्ताशी पाच वाजतायत…"
"अगं तुम्ही मगाशी ध्यान लावून बसला होतात, तेव्हांच मला जाग आली होती… तुम्हाला दोघांना असं ध्यानाला बसलेलं बघून मला बघत राहावं असं वाटलं…"
"काही तरीच बाई तुझं!…"
"चला! आता आपण उठलाच आहात, तर जरा खाली फेरफटका मारून येऊ…"
मी, दुर्गा आणि काका आम्ही थोडावेळ खाली जाऊन फिरून आलो… सोसायटीच्या गेट मध्ये आत शिरताना मला बागेतल्या बाकड्यावर माई बसलेल्या दिसल्या… कित्ती दिवसांनी बघत होते मी त्यांना… मला त्यांना भेटल्या वाचून रहावलच नाही…
"दुर्गा! काका! दोन मिनिटं थांबा मि आलेच…"
असं म्हणून मी माईंन कडे धावले…
असं म्हणून मी माईंन कडे धावले…
"माई! माई किती दिवसांनी दिसताय! बरं वाटलं तुम्हाला बघून! तुमची खूप आठवण येत होती…"
असं म्हणून माझे डोळे भरून आले, माईही लगबगीने बाकड्यावरून उठल्या…
असं म्हणून माझे डोळे भरून आले, माईही लगबगीने बाकड्यावरून उठल्या…
"प्रीती बाळा! कशी आहेस गं? खूप दिवस झाले गं तुला बघून… बरी आहेस नां? तूझी खूप काळजी वाटत होती गं… तुझा हात बरा आहे का आता?… तू काही काळजी करू नकोस बाळा… सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे…"
पाच मिनिटं मी माईंच्या ऊबदार कुशी मध्ये विसावले होते… माझ्या आईने थोपटावी तशी माझी पाठ थोपटत मला धीर देत होत्या माई…
"माई चला ना चहा करते पटकन…"
"अगं! देवळात जायची वेळ झालीये… मला जायला हवं… आजचा दिवस तुमच्या सगळ्यांची परीक्षा बघणारा आहे… सांभाळून राहा… काळजी घे… जोपर्यंत तू भक्कम आहेस तोपर्यंत तुझ्या कुटुंबाला कोणी काहीही त्रास देणार नाही… माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत… विकास आणि दुर्गा जे सांगतील ते कर, या सगळ्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल… येते मी!…"
असं म्हणून माई जाण्यासाठी वळल्या… त्या नजरेआड होईपर्यंत मी त्यांची पाठमोरी आकृती न्याहाळत होते… आकाशी रंगाची साडी माईंना किती उठून दिसायची… मी कधीच सांगितलं नाही त्यांना, की या साडीत त्या खूप गोड दिसतात… मला जेव्हां जेव्हां माई भेटल्या, तेव्हां त्यांच्या अंगावर नेमकी आकाशी रंगाचीच साडी असते… खूप छान दिसतात त्यात… असो! पुढच्यावेळी सांगेन, असं म्हणत मी परत काका आणि दुर्गा उभे होते तिथे आले… दोघंही मिश्कीलपणे माझ्याकडे बघून हसत होते…
"आता तुम्हां दोघांना काय झालं हसायला?…"
"काही नाही ताई!… चल उठतील आता सगळे…"
घरी आलो… थोड्यावेळात सगळेच उठले… सगळ्यांसाठी चहा आणि नाष्टा केला… काकांनी मात्र काहीच घेतलं नाही… आज दिवसभर त्यांनी हवनाला सुरुवात होईपर्यंत आम्हा सगळ्यांना ||श्री स्वामी समर्थ|| नामाचा जप करायला सांगितला… सगळ्यांचं आवरून झाल्यावर आम्ही स्वामींचा जप करायला बसलो… दुर्गा आणि काका हवनासाठी लागणारी तयारी करायला लागले… स्वामी नामाचा जप चालू असताना मी काका आणि दुर्गा करत असलेली हवना ची तयारी बघत होते… काकांनी आणलेल हवन कुंड दुर्गा ने पूर्वाभिमुख ठेवलं, त्याच्या आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी काढली… हवनासाठी काका आणि दुर्गा बसणार होते… त्यांना बसण्यासाठी पाट रचून त्यांच्या भोवतीही सुंदर अशी रांगोळी काढली… दोघांच्या पाटाच्या विरुद्ध बाजूला हवन कुंडाच्या पलीकडे दोन मोठी मंडलं रांगोळी ने काढली… अमावस्येच्या दिवशी पहाटे तीन वाजता अमावस्या सुरू झाली होती, जी दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता संपणार होती… संध्याकाळी साधारण 7:40 चा मुहूर्त काकांनी हवन सुरु करण्यासाठी काढला होता… या संपूर्ण कार्यात सात्विक शक्ती वापरली जाणार होती… त्यामुळे ही जी काही हवनासाठी तयारी केली होती त्याची कुठेही भीती वाटत नव्हती… सर्वांच्या स्वामी नामाच्या जपामुळे वातावरण शांत पण प्रसन्न होतं…
साधारण साडेसात वाजले असतील, तेव्हां काका मला आणि वैभवला घेऊन खालच्या त्या चिंचेच्या झाडा कडच्या देवळाकडे गेले आणि आम्हा दोघा नवरा-बायको ना आमच्यावर जे काही संकट आलंय ते देवीला सांगून त्यातून बाहेर काढण्यासाठी जे काही करतोय त्या सर्व विधींमध्ये आमच्या पाठीशी राहायला सांगितलं आणि या सर्वातून तुझ्या आशीर्वादाने सुखरूप बाहेर पडलो तर तुझ्या नावाचा जागरण गोंधळ घालू असा नवस बोलायला सांगितला… धावजी पाटलांच्या त्या देवळात एक नारळ ठेवून आम्ही वर आलो… आम्ही घरात एंट्री केली तश्या आई कडाडल्या…
"काय चालवली हायेत ही थ्येर?… बंद करा ह्यो समदा तमाशा, न्हाईतर जित्ती सोडायची न्हाय म्या क्वनाला..."
फ्लॅट भाग २०_०२...
"खामोश!… खबरदार!… सोड आधी तिला, गाठ माझ्याशी ए ध्यानात ठेव…"
असं म्हणत काकांनी त्यांच्या हातातील अक्षतांवर तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटून फुंकर मारली आणि त्या आईंच्या अंगावर फेकल्या… अक्षता अंगावर पडताच झटका लागावा तशा आई जागेवर उडाल्या आणि आईच्या शरीरात शिरलेली चंदी निघून गेली…
"त्यांना एकंदरीत सगळा अंदाज आलाय… आपल्याला आता घाई करण्याची गरज आहे… आजच्या दिवशी त्यांची शक्ती एकदम शिगेला पोचलेली असते… आपण जर लवकर हालचाल केली नाही तर आपल्यावर या वाईट शक्ती हावी होऊ शकतात… आजच्या दिवशी मी थोड्यावेळासाठी त्यांच्या त्रासातून तुम्हाला सोडवू शकतो, पण त्यांच्यावर काबू करायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर हवन सुरु करावे लागेल… पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी तुमची मनस्थिती डळमळू देऊ नका… देवावर विश्वास ठेवा… स्वामींवर विश्वास ठेवा… चिंतन करा चिंता करू नका… जेवढी तुम्हा सगळ्यांची इच्छाशक्ती पॉझिटिव्ह असेल, प्रबळ असेल तेवढच ह्या वाईट शक्तीनां तुमच्यावर काबु करणे अवघड जाईल… जिथे तुम्ही कोलमडाल तिथे या शक्ती तुमचा ताबा घेऊ शकतात… फक्त माझ्या इच्छेने काही होणार नाही, तुमची इच्छाशक्ती ही प्रबळ असली पाहिजे… स्वामी नामाचा जप मनापासून करा… डोक्यात कुठलेही वाईट विचार आणू नकात, बाकी स्वामी आहेतच आपल्या पाठीशी… चला लवकरात लवकर सुरुवात करू…"
असं म्हणत काका आणि दुर्गा हवन कुंडाच्या बाजूला मांडलेल्या पाटावर बसले… हवन वेदीवर काका प्रमुख होते, दुर्गा त्यांना सहाय्यक म्हणून बसली होती… आम्ही सगळे काकांच्या मागे बसलो होतो… हवनाला सुरुवात करण्याआधी काकांनी गणपती पूजन हवन कुंड पूजन आणि कुलदेवतांचे पूजन करून त्यांना या कार्यात पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले… हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करून अग्नीची पूजा केली… आम्ही सगळे तोंडातल्या तोंडात अखंड स्वामी नामाचा जप करत होतो… आत्तापर्यंत चंदी आणि धनाजी हे जास्ती करून वैभव आणि आई यांच्या शरीराचाच वापर करत आले होते, त्यामुळे वैभव आणि आई खूपच मनापासून स्वामींचे नाव घेत होते… माझी दोन्ही बाळं थोडी सैरभैर झाल्यासारखी वाटत होती, त्या दोघांनाही मी माझ्याबरोबरच घेऊन बसले होते… हवन कुंडात काकांनी अग्नी प्रज्वलित केल्यानंतर काकांनी मंत्र पठणाला सुरुवात केली… याचा परिणाम जो व्हायचा होता तोच झाला… आमच्या आजूबाजूचं वातावरण अचानक भरपूर थंड झालं… हुडहुडी भरावी एवढ थंड… शिवाय हवन कुंडात प्रज्वलित केलेला अग्नी विझवण्याच्या दृष्टीने चंदी आणि धनाजी चे प्रयत्न चालू होते… पण काका पूर्ण तयारीनिशी आणि आपली सर्व शक्ती पणाला लावून बसलेत असेच दिसत होतं… त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्रज्वलित केलेला अग्नी काकांनी काही शांत होऊ दिला नाही… काकांचं मंत्रपठण भरपूर वेळ चालू होतं… काका म्हणाले होते तसं ही जुनी खोडं होती, मोडली असती पण यांना वाकवण फार अवघड होतं पण अशक्य नव्हतं… भरपूर वेळा नंतर हवन वेदीच्या पलीकडच्या बाजूला जी दोन मंडलं केली गेली होती ज्याच्यावर हवन सुरु व्हायच्या आधी काकांनी काही अक्षता मंत्रून त्या मंडला भोवती फिरवल्या होत्या जणू काही त्या मंडला भोवती ते कवच होतं त्या मंडलां मध्ये दोन पांढऱ्या धुरकट आकृत्या प्रवेश करत्या झाल्या… एक होती चंदी आणि एक होता धनाजी… त्या दोन पांढऱ्या आकृत्या त्या मंडलामध्ये शिरल्यावर त्या मंडळातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होत्या, पण त्यांना मंडलाबाहेर पडता येत नव्हतं… आता हवन कुंडामध्ये दुर्गाला समिधा टाकायला सांगून काका चंदी आणि धनाजी यांच्याशी संवाद साधू लागले…
"काय हवय तुम्हांला?… का या सगळ्यांच्या जिवावर उठलायत?…
"जिवच तर घ्यायचा ना!... जित्ती नाय सोडायची म्या कोनास्नी भी... मला माझी शिकार द्ये... न्हायतर तुला बी उलटा गाडला त्या मांत्रिका वानी..."
"खामोश!... जास्त बोलू नकोस..."
"एsss गैबान्या!... लै बोल्ला... माज्या पोरीस्नी त्रास दिलात नव्हं?... मं समद्यास्नी त्रास व्हनार... या पाटलांच्या खानदानाला सजा मिळस तोवर गप न्हाई बसनार म्या...
"अरे पण किती दिवस हा सुड घेणार आहात?… आज पर्यंत कित्ती निष्पाप लोकांचे जिव घेतलात... तुमच्यामुळे कित्ती लोकांचे हाकनाक बळी गेले आणि अजुनही तुम्ही बदल्यासाठी अडकलायत?… अजूनही तुमच मन भरल नाही?…"
"न्हाई भरलं!… आमच्या बाजून कोन हुब व्हत तवा?... का मन भरल आमचं तरी?…"
"पण या लोकांनी काय केलंय तुमच?… यांना सोडा… मी तुम्हा दोघांना या सगळ्यातून मुक्ती मिळवून देतो…"
"ये मांत्रिक!… तुला बोल्येलं कळत न्हाई व्हय?… चरचर बंद कर तुजी… या आदी बी एक मांत्रिक असाच धाडलाय म्या यमाकडं!… तुझं बी बस्तान बांधायला लागतंय आज!…"
"तुम्ही असे नाही ऐकणार!… तुम्हाला आता योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे!…"
असं म्हणून काकांनी हवन कुंडात परत समिधा टाकायला सुरुवात केली आणि काही मंत्र जोरजोरात म्हणायला लागले… काकांचा हा जो संवाद चालू होता त्याने आम्ही पुरते घाबरलो होतो, पण सर्वांच्या तोंडात स्वामी नामाचा जप सुरू होता… आम्ही जेवढे कमी घाबरणार होतो, तेवढे चंदी आणि धनाजी आम्हाला कमी त्रास देणार होते… आता काकांनी मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर, जणूकाही चंदी आणि धनाजी ला त्या मंडलामध्ये बसणं अशक्य होतं होत… थोड्यावेळापूर्वी काकांशी बोलताना त्यांचा जो भेसूर आवाज येत होता, तो आवाज आता आणखीनच भेसूर आणि कर्कश येत होता… जणूकाही त्यांना खूप वेदना होत होत्या…
"अजूनही सांगतो!… मुक्त व्हा!… मी तुम्हाला मुक्त व्हायला मदत करतो… नका त्रास देऊ निष्पाप लोकांना… तुमच्या मृत्यूचा बदला तुम्ही घेतलेला आहे, ज्यांचा तुमच्या मृत्यूशी; तुमच्या खुनाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना नका त्रास देऊ… मुक्त व्हा!…"
"मांत्रिक!… लय पस्तावनार तू!… तुला म्हाईत न्हाई माझी ताकद?… लय येऊन गेले तुझ्यासारखे… कोणी बी माझं काय बी वाकडं करू शकलं न्हाई…"
"माझ्यासारखे असतील खूप जण… पण मी नाही तसा जसा तू समजतोयस… मीच आहे जो तुम्हा दोघांना मुक्त करू शकतो… अजुनही सांगतो ऐका!… माझ्या स्वामींना शरण या… सर्व अपराध माफ होतील… मुक्ती मिळेल…"
"कोण स्वामी?… कोणता स्वामी?… आम्हास्नी कोणत्या स्वामी ला घाबरायची काय बी गरज न्हाई… आज पातूर कोनी काय बी वाकड केलं न्हाई तर तुजा स्वामी काय वाकड करायचा तवा?…"
"खबरदार!… आता ईथून पुढे एक शब्दही नाही बोलणार तुम्ही वाकडा… जेवढी पापं करायची होती तेवढी केलीत आता भरला तुमचा घडा… आता कोणतच पाप होणार नाही तुमच्या कडून… आता फक्त शिक्षा आणि मुक्ती… आता माझ्या हातातही काही नाही राहीलं…"
"अरे!… हअअअ… हअअअ… हअअअ…"
"घममम… घममम… घममम…"
"घममम… घममम… घममम…"
असे दोघांच्याही काणण्ह्याचे आवाज यायला लागले… बोलता काहीच येत नव्हतं दोघांना फक्त गुरगुरत होते… काकांनीही आता डोळे बंद केले… दुर्गाचं हवनकुंडात समिधा टाकणं चालूच होतं… थोडा वेळ गेला असेल आणि मंडला मध्ये अडकलेल्या चंदी आणि धनाजी यांच्या धुरकट आकृतीला एक आकार यायला सुरुवात झाली… आकृत्या धुरकट होत्या… त्या पोस्टमन काकांनी सांगितल्यानुसार चंदी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती… जणूकाही रूपाची खाण आणि धनाजी तेवढाच रांगडा… दोघांनाही त्या मंडलामध्ये होणारा त्रास आता स्पष्ट दिसत होता… जणूकाही त्यांच्या अंगाला चटके बसत असावेत, काहीतरी टोचत असावं असे दोघेही त्या मंडलामध्ये उड्या मारत होते… काका परत ध्यानातून जागे झाले… आम्हाला काकांचा चेहरा दिसत नसला तरी आता काका चंदी आणि धनाजी कडे एकटक बघत आहेत हे लक्षात आलं, कारण इतका वेळ ज्या मग्रुरीने चंदी आणि धनाजी काकांना जी उत्तरं देत होते, तेच चंदी आणि धनाजी आता काकांकडे बघू शकत नव्हते… आत्ता लावलेल्या ध्यानातून काका ज्यावेळेला परत पूर्वावस्थेत आले त्यावेळी मात्र दुर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळच हास्य होतं… जणूकाही आता पुढे काय घडणार आहे याची तिला कल्पना आली होती… अचानक मंडलात असलेले चंदी आणि धनाजी उलटे लटकले गेले… जणूकाही त्यांना त्या मंडलामध्ये कोणीतरी उलटं लटकवून ठेवल आहे… ते मंडल म्हणजे जमिनीपासून वरच्या हॉलच्या भिंतीपर्यंत एखादी काचेची नळी असावी असंच वाटत होतं… चंदी आणि धनाजी उलट्या लटकलेल्या अवस्थेत वरती पार छतापर्यंत गेले आणि कोणीतरी त्यांना फेकून द्यावं असे येऊन खालच्या जमिनीवर आदळले… बारा-पंधरा फुटाच्या अंतरावरून जरी पडले असले तरी त्यांना त्यातून प्रचंड वेदना झाल्या हे लक्षात येत होतं… परत दोघे तसेच उलट्या अवस्थेत छतापर्यंत गेले आणि परत त्यांना वरून कोणीतरी फेकून दिलं, असं जवळजवळ त्यांच्याबरोबर सात-आठ वेळा झालं असेल… आता खाली पडलेल्या चंदी आणि धनाजी यांना तशाच उलट्या अवस्थेत कोणीतरी त्या मंडलामध्ये खालपासून वरपर्यंत गोल गोल फिरवत होतं, खेचत होत… भरपूर वेळ त्या दोघांना असं फिरवून झाल्यावर परत वर छतापर्यंत नेऊन खाली टाकलं… चंदी आणि धनाजीला प्रचंड वेदना होत असल्यासारखे ते गुरगुरत होते… त्यांना काहीही बोलता येत नव्हतं… पांढऱ्या धुरकट दिसत असलेल्या त्या दोघांच्या शरीरावरही खूप साऱ्या जखमा झाल्यात असं वाटत होतं… आता धनाजी ला कोणीतरी गळ्याला धरून वर छतापर्यंत उचलल… तो धरलेला गळा सोडवण्याचा प्रयत्न करत होता… त्याच्या त्या पांढरा आकृतीचे डोळे आणि जीभ जणूकाही बाहेर आले होते… गळफास लागावा तसा तो हातपाय झाडत होता… तर चंदी चा हात मागे पिरगळून तिला कोणीतरी आडव उचलून छतापर्यंत नेलं होतं आणि जोरात तिला खाली आपटलं… खाली आदळल्यावर चंदी पिरळलेला हात हातात घेऊन धनाजी कडे मदतीसाठी बघत होती… पण धनाजी काही गळफासाच्या मगरमिठीतून मुक्त होत नव्हता… बराच वेळ चंदी आणि धनाजी ला उलटसुलट आपटून, त्यांना प्रचंड इजा करून, प्रचंड वेदना दिल्या नंतर काका परत दोघांशी बोलले…
"बताओ जल्दी क्या तय किया?… मुक्ती हवी?… या और सजा दूं?…"
"कोण आहेस तू?… तुझी इतकी हिंमत?… मला आणि माझ्या आज्जाला त्रास देतयस?…"
"मी?… ते तुला काय करायच?…"
"स्वड माझ्या आज्याला!..."
"हाहाहा!..."
"हसू नगस!…"
काकांच्या उत्तराने चंदी पुरती चवताळली होती… तिने काकांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून परत धनाजी कडे बघितलं, तर तिथे चित्र वेगळंच होतं… धनाजी हात जोडून विनंती करत होता, ते बघून चंदी काकांकडे बघायला लागली पण आता तिच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव होते…
"हाहाहा!… किधर गयी तुम्हारी ताकद? मी सांगतोय मुक्त करतो तुम्हाला, अजूनही मुक्त व्हायचं नसेल तर फक्त विनाश!…"
"आता चंदी ने ही काकांना हात जोडले… धनाजी सुटला…"
"माझ्या पोरीच्या बाबतीत जे झालं त्याचं काय?…"
"उसका बदला तुमने ले लिया… आता काय हवंय?… आणि तुझ्या पोरीचं प्रेम जडलं तेव्हां तिला माहित नव्हतं? आपण घरातल्या जावई माणसावर प्रेम करतोय ते? आपणही कोणाचातरी संसार उध्वस्त करतोय ते? आबा पाटील आणि सर्जेराव पाटील चुकले होते, त्यांची शिक्षा तुम्ही त्यांना दिलीत… पण त्याचबरोबर कितीतरी निष्पाप लोकांचे बळी घेतलेत… आता बस… मी तुम्हाला या सगळ्यांना मुक्ती देऊ शकतो…"
"महाराज चुकलं आमचं, आता तुम्हास्नी जस पटेल तसं… पाहिजेल तर या लेकराबाळां सकट सगळ्यांची माफी मागतो…"
"ठीक ए… हम अभी गया नही जिंदा हूं!…"
जसं काही काकांच्या तोंडून स्वामीच बोलत होते… स्वामी नामाचा जप करत मी पाठमोऱ्या काकांनाच हात जोडले… आता काका काही मंत्र म्हणत एकेक समिधा हवन कुंड टाकायला लागले… काकांनी उच्चारलेल्या एकेका मंत्रा बरोबर आणि टाकलेल्या समिधे बरोबर चंदी आणि धनाजी आणि त्यांच्या वस्तू एक एक करून हवामान कुंडात भस्म व्हायला लागल्या… हवन कुंडात भस्म होण्याआधी चंदी आणि धनाजी या दोघांनी काकांना हात जोडून नमस्कार केला… चांदी आणि धनाजी ला मुक्ती मिळाली होती… पहाटेचे तीन वाजले होते… चाललेला हा सर्व प्रकार अंगावर काटा आणणारा होता… चंदी आणि धनाजी यांना मुक्ती मिळाल्यावर काकांनी आणि दुर्गाने हवन कुंडात शेवटची आहूती दिली आणि परत काका ध्यानस्थ झाले… स्वामी नामाचा जप अजूनही चालूच होता… थोडा वेळ गेला असेल आणि काका झटका लागल्यासारखे ध्यानातून जागे झाले आणि जागेवरून उठले… आमच्या सगळ्यांच्या हातात थोड्या थोड्या अक्षता देऊन चंदी आणि धनाजी यांच्यामुळे इतके दिवस जो त्रास झाला तो सगळं विसरून त्यांच्या मुक्त झालेल्या आत्म्याला शांती द्यावी, मनात काहीही ठेवू नये, उदार मनाने त्यांना माफ करावं असं सांगून हातात दिलेल्या अक्षता हवन कुंडात सोडायला सांगितल्या…
" ही जी काही आपण पूजा मांडली, हवन केलं, चंदी आणि धनाजीला मुक्ती दिली हे सर्व साहित्य गोळा करा आणि जवळच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करून टाका…"
मी वैभव आणि दुर्गा आम्ही ती सगळी मांडलेली पूजा, सर्व सामान एकत्र करून आवरून घेतलं… पहाटेचे साडेपाच वाजत आले होते… मला आणि वैभव ला घेऊन दुर्गा समवेत आम्ही परत खालच्या त्या चिंचेच्या झाडा कडच्या धावजी पाटलांच्या देवळाकडे गेलो… काल संध्याकाळी आम्ही जे देवळा समोर उभा राहून काळुबाईला साकडं घातलं होतं त्यासाठी काळूबाईचे, धावजी पाटलांचे आभार मानले… यथाशक्ती काळूबाईच्या नावाने लवकरच जागरण गोंधळ घालू असं आश्वासनही दिलं… घरी जाण्यासाठी सगळे परत पार्कींग मध्ये आलो तेव्हा काकांना मागून कोणीतरी आवाज दिला…
"विकास!…"
आम्ही सगळ्यांनी चमकून मागे बघितलं तर त्या माई होत्या
" तुम्ही सगळे व्हा पुढे मी आलोच…"
असं म्हणून काका परत माईंच्या दिशेने जायला लागले
" कुठे गेले काका? कोणी आवाज दिला त्यांना?…"
"जिजू आपण जाऊया वरती… सांगेन मी तुम्हाला नंतर… येथील काका…"
चंदी आणि धनाजी यांच्या अस्तित्व नसलेल्या घरात आम्ही पुन्हा प्रवेश करत होतो… मनस्थिती खूप वेगळी होती… चंदी आणि धनाजी जरी त्या घरातून गेलेले असले तरी माहिती नाही का आपल असं ते घर वाटतच नव्हतं… सगळे फ्रेश झाले… मी सगळ्यांसाठी चहा बनवला एवढ्यात दुर्गाला फोन आला…
"हां काका बोला… हो देते एक मिनिट…"
फोनवर काका होते… त्यांना माझ्याशी बोलायचं होतं…
"नमस्कार प्रीतीजी… मी विकास काळे…"
"हां काका बोला ना… कुठे आहात तुम्ही?… मी चहा केला होता, आपल्या सगळ्यांसाठी… फोन का केलात? वर या ना…"
"प्रीतीजी मी आता वर नाही येऊ शकत… मी परत निघालोय… आम्हालाही काही नियम अटी असतात… मी येईन परत तुमच्या घरी, पण नवीन घरी… इथे नको… घरात प्रवेश करत असताना तुम्हाला तुमचं घर परकं वाटत होतं… माझा सल्ला घ्याल तर तुम्ही आता परत कोथरूडला शिफ्ट व्हा… हे घर काढून टाकायचं का ठेवायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल… परत भेटू आणि एक दिवस दुर्गा बरोबर आमच्या घरी या… आवडेल तुम्हाला तिथलं वातावरण… मुलांनाही सांगा काकाआजोबांनी बोलावलंय म्हणून… ठेवतो मी… स्वामी ओम…"
काकांनी फोन ठेवला आणि मी शांत झाले… कोण होते काका? का आले होते? आम्ही संकटात होतो म्हणून? एखाद्या वादळासारखे आले आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी निघून गेले… वादळासारखे जरी आले असले तरी कोणाचेही नुकसान न करता आम्हाला असलेल्या आमच्या सर्व संकटातून मुक्त करून निघून गेले… काकांच्या येऊन जाण्याने देव नावाची शक्ती आहे आणि ती वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येते हे मात्र खरं…
"चल ताई मी ही आता निघते… आई घरी वाट बघत असेल… तुम्हीही आता आवरून कोथरूड साठी निघा… येईन तुला भेटायला तिकडे…"
असं म्हणून दुर्गा ही निघून गेली… आता फक्त आम्ही आमचेच राहिलो त्या घरामध्ये… आम्ही आमचं सगळं पटापट आवरून कोथरूडला निघण्यासाठी बॅगा भरल्या आणि गाडीत बसण्यासाठी खाली उतरलो… सगळेजण गाडीत बसले होते, मी गाडी जवळ जाणार होते की मला लॉन मध्ये माई दिसल्या… मी धावतच त्यांच्याजवळ गेले…
"प्रीती… स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असतील, त्यांना कधीच विसरु नकोस… नीट जा… मुलांची काळजी घे आणि या माई विसरू नकोस…"
त्यावेळी माईंशी एका शब्दानेही बोलली नाही… फक्त त्यांना घट्ट मिठी मारून खूप रडले… माई ही मला मायेने गोंजारत होत्या… निरोप घेऊन मी परत गाडीकडे आले, गाडीत बसल्यावर वैभवने विचारलं ही…
"कुठे गेली होतीस?…"
"अरे त्या…"
पण मी काहीच बोलले नाही… वैभवने गाडी चालु केली आणि आमचा प्रवास कोथरूड कडे सुरु झाला…
पण म्हणतात ना…
"बिघडलेलं काम सुधारण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न ते काम अजून बिघडवत जातं…"
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html