मांजर..... -The Horror Cat Story
अम्माच्या घरी पोचेपर्यंत खूप उशीर झाला मला. गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी त्यांचं घर आहे. गावात एस टी येते. पण पुढे साधारण अर्धा तास चालावं लागलं. जंगलाला संपूर्ण वळसा घातला तेव्हा कुठे त्यांची बंगली दिसली.
मी अर्चिस... वय वर्ष बावीस ... नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आहे. नोकरीसाठी शोध मोहीम चालू आहे. पण त्याच बरोबर मुंबईच्या आसपास ट्रेकिंग करायला मला खूप आवडतं. आज देखील महिषगड ट्रेक मोहिमेवर आलोय.
महिषगडावर जाण्यासाठी पहाटे पहिली गाडी पकडून कसारा स्टेशनपर्यंत पोचायचं. तिथून चाळीस एक किलोमीटर अंतरावर एक गाव आहे बिराजपूर. तिथपर्यंत एस टी सोडते. गावात आलं की चहा नाश्ता करून ट्रेकिंगला सुरुवात करायची. साधारण तीन तास लागतात गडावर पोचायला. गडावर पाहण्यासाठी पाण्याच्या तीन टाक्या, एक दोन तोफा आणि मोडकळीस आलेलं महाद्वार आहे. जेवण वगैरे आटोपून परत खाली येईपर्यंत संध्याकाळ होते. रात्री उशिरापर्यंत मुंबईला रिटर्न जाता येतं. सर्व साधारण ट्रेकर्सचा हाच प्लॅन असतो.
मी पहाटेची गाडी पकडण्याऐवजी संध्याकाळी सातच्या गाडीने मुंबई वरून निघालो. खरं तर मिहीर सोबत येणार होता. पण त्याच्या आजीने त्याला जाऊ दिलं नाही. आज अमावस्या आहे. मुद्दाम अनोळखी गावात जायचं नाही म्हणून त्याला मनाई होती. एकविसाव्या शतकात देखील लोकं अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात, मलाच नवल वाटतं. पण शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. मी अधिक काही बोलणं प्रशस्त ठरलं नसतं. म्हणून गप्प बसलो.
पण ह्या अवसेच्या रात्री असं एकटं चालायला काय थ्रीलिंग वाटतं माहितीये! मी गावात उतरलो तेव्हा साडे अकरा बारा तरी वाजले असतील. एस टी तून उतरल्यावर आजूबाजूला पाहिलं.... सगळीकडे किर्रर्र शांतता होती. यु ट्यूब वर आधी व्हिडीओ पाहिला होता इथला. एवढं डिटेलिंग असतं ना त्यात... म्हणजे गावात उतरलं की कुठल्या दिशेने चालत जायचं? कुठे वळायचं? किती चालावं लागणार? संपूर्ण शूट केलेलं होतं. त्याप्रमाणे एस टी स्टॅन्ड वर उतरलो. शूजच्या लेस बांधून घेतल्या. अंगात जॅकेट घातलं. थोडं पाणी प्यायलो. हेड टॉर्च चालू केला आणि स्टॅन्डला डाव्या बाजूने चालायला बाहेर पडलो.
बाहेर पाऊल टाकलं नाही की एक काळं मांजर आडवं आलं आणि पायात घुटमळू लागलं. मला चटकन मिहीरची आजी आठवली. समजा ती आमच्या बरोबर आली असती तर लगेच बोलली असती, काळ्या मांजराने रस्ता अडवणं चांगलं नाही. खूप मोठा अपशकून आहे हा. परत मागे फिरा वगैरे वगैरे. नुसता विचार करूनच मला हसू आलं.
मी चालत होतो पण ते मांजर अजून देखील माझ्या वाटेत येत होतं. मला वाटलं कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून मी बॅगेतली दोन बिस्कीट काढून त्याला खाऊ घातली. दोन मिनिट त्याला जवळ घेऊन गोंजारलं. व चालायला सुरुवात केली. अजून देखील ते मांजर म्याव म्याव करत माझ्या पाठी पाठी होतं. मी दिलेल्या बिस्कीटाला जागत मला सोबत करत होतं बहुदा. थोडया वेळाने एका जागी थांबून म्याव म्याव करत राहिलं. त्याची हद्द संपली असावी आणि मला बाय बाय करतोय असा मी सोईस्कर अर्थ काढला.
मी चालायला सुरुवात केली. एक थंड वाऱ्याची झुळूक आली. मी नखशिखान्त शहारलो. जॅकेटची चेन लावून घेतली. हात जीन्सच्या खिशात घातले. तेव्हा थोडं ऊबदार वाटू लागलं. चालत राहिलो की बॉडी आपोआप गरम होते म्हणून थोडा स्पीड वाढवला. अजून देखील म्याव म्याव ऐकू येत होतं.. हळूहळू माझ्यात आणि त्या मांजरामधलं अंतर वाढू लागलं आणि मग आवाज येईनासा झाला.
आता एका बाजूला नदीचा काठ आणि दुसऱ्या बाजूला जंगल होतं. मधल्या पायवाटेवर मी चालत होतो. जंगल म्हणजे खूप घनदाट असं नव्हतं. त्यामुळे जंगली श्वापदांची भीती नव्हती. साप वगैरे असतील, पण रेग्युलर ट्रेकर्सना त्यांची सवय असते. नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. मस्त थंड हवा सुटली होती. एकंदरीत वातावरण आल्हाददायक वाटत होतं..
इतक्यात बाजूच्या जंगलातून एक दोन मांजरांचा आवाज ऐकू आला, रानमांजरं असावीत.. त्यांचं ओरडणं का कुणास ठाऊक मला रडण्यासारखं वाटत होतं.
असो... अजून थोडं चालल्यावर मला अम्माची बंगली दिसली. बंगली म्हणजे काय तीन खोल्यांचं एक बैठ घर होतं, वर गच्ची, पुढे छोटं अंगण. बंगलीत एक पिवळा बल्ब मिणमिणत होता.
मी बंगलीचं गेट ढकलून आत शिरलो आणि नजरेस पडलं ओसाड अंगण. गावातल्या घरात सहसा असं कुठे बघायला मिळत नाही. कसली ना कसली रोपं, फुलझाडं असतातच अंगणात. अगदीच काही नाही तरी निदान तेरडा तरी असतोच. पण इथे जरा म्हणून हिरवळ दिसत नव्हती. नाही म्हणायला अंगणात दोन मांजरी विसावल्या होत्या. माझी चाहूल लागल्यावर त्यांनी म्याव म्याव करून निषेध व्यक्त केला माझा. अवेळी येऊन त्याना मी डिस्टर्ब केलं असावं..
ह्या गावात जीथे तीथे मांजरीच दिसत आहेत. ह्या गावाचं नाव बदलून मांजरगाव ठेवायला हवं.
गेटचं आवाज ऐकून अम्मानी दार उघडलं. दार उघडल्या उघडल्या अजून चार पाच मांजरीनी म्याव म्याव करून माझं स्वागत केलं.
अम्मा म्हणजे नऊ वारी नेसणारी, कपाळावर रुपया एवढं कुंकू लावणारी मध्यम उंचीची साठीची एखादी बाई मला अपेक्षित होती. प्रत्यक्षात सडसडीत बांध्याची, फुलाफुलाचा फ्रॉक घातलेली, सहा फूट उंच, उग्र चेहऱ्याची सत्तरीची सावळी म्हातारी होती ही अम्मा म्हणजे. कपाळावर आठ्यांचं जाळं, तोंडाचं बोळकं तीच्याबद्दल निगेटिव्हीटी दाखवत होतं. तीच्या प्रथम दर्शनानेच मला वाटू लागलं आल्या पावली परतून जावं असं. पण प्रत्यक्षात असं वागणं नैतिकतेच्या विरुद्ध होतं. शिवाय अशा अवेळी जायचं कुठे हा प्रश्न होताच.
मी अर्चिस... काल फोन केला होता ना तुम्हाला.. मला आजची रात्र इथे राहायचं आहे. पहाटे चहा नाश्ता करून निघेन मी... मी माझी ओळख करून देत होतो अम्माला.
तुम्ही दोघे येणार म्हणाला होतात... दरवाजातून बाहेर बघत ती बोलली. बोलताना तीचा आवाज किती विचित्र वाटत होता... एखादं श्वापद गुरुगूरत असल्यासारखं वाटत होतं ऐकताना..
हो माझ्या सोबत मित्र येणार होता, पण त्याचं कॅन्सल झालं आयत्या वेळी... मी सफाई दिली..
बरं तीथे बाजूला खाटेवर झोप. मला झोपायची जागा दाखवून म्हातारीने दार लावून घेतलं आणि आत मध्ये निघून गेली.
मी खाटेवर अंग टाकलं. एक तर बरीच रात्र झालेली त्यात प्रवास आणि पायपीट ह्यामुळे मला लगेच झोप लागली. आजूबाजूला मांजरी म्याव म्याव करत होत्याच...
पहाटे साडेचारला जाग आली. तीन चार तास शांत झोप मला पुरेशी होती. खूप फ्रेश वाटत होतं. पाच मिनिट पडू मग उठू म्हणून परत डोळे मिटून घेतले.
इतक्यात कोणी तरी माझ्या बाजूला बसून बोलत असल्याचं मला स्पष्ट जाणवलं. वास्तविक रात्री मी आलो तेव्हा इथे त्या अम्मा शिवाय कोणीच नव्हतं आणि नंतर देखील कोणी आलं असतं तर मला समजलंच असतं. माझी झोप खूप जागृत आहे. परक्या ठिकाणी अजून जास्त सावध असतो मी. पण म्हटलं असेना का कोणीही... आपल्याला काय फरक पडतोय? उलट बरंच झालं...ट्रेकिंग साठी सोबत होईल. मी डोळे मिटून त्यांचं बोलणं ऐकू लागलो...
हा कसा आला अचानक? (माझ्या बद्दल बोलत होते का ते?)
हो ना... गावात शिरल्यावर त्याला कोणी वॉर्न केलं नाही का?
असं तर शक्यच नाही.. बसस्टॅन्डवर आहे ना ती काळी मांजर, तीने ह्याचा रस्ता अडवला असेलच. तो बंगलीत शिरला तेव्हा आम्ही देखील सावध केलं पण आमच्याकडे ह्याने सपशेल दुर्लक्ष केलं...
हे लोकं नक्की काय बोलत आहेत? मला खरंच काही टोटल लागत नव्हती. बसस्टँड मधून बाहेर पडलो तेव्हा एक मांजर आडवं आलं आणि नंतर काही काळ माझ्या सोबत होतं. पण त्याबद्दल ह्यांना कसं ठाऊक?
मला आता अजून पडून राहणं खरंच अशक्य होतं. मी उठून बसलो आणि आजूबाजूला नजर टाकली... मला वाटलं कोणी माणसं बोलत आहेत.. पण माझ्या शेजारी तीन चार मांजरं बसली होती... म्हणजे आपल्या बाजूला बसून कोणी बोलत आहेत हा भास होता ....हुश्श.
मी तयार होण्यासाठी उठून बसलो.
कुठे जातोय आता? मला कुणीतरी प्रश्न विचारत होतं..
पण आजूबाजूला मांजरा व्यतिरिक्त कोणीच नव्हतं.
इकडे तिकडे काय पाहतोय? आम्हीच बोलतोय तुझ्याशी....
चक्क एक मांजर बोलत होतं माझ्याशी... आणि नवल म्हणजे मला त्यांची भाषा समजत होती...
आता मला देखील ह्या प्रकाराची मजा वाटत होती.. मी आता प्राण्यांसोबत बोलू शकतो.. वोव
अरे कुठे चाललोय काय विचारत आहात? मी ट्रेकिंग साठी आलोय इथे.. आता आटपलं की पंधरा मिनिटात निघेन इथून. तुम्हाला कुणाला यायचं तर चला... मला तेवढीच सोबत... मी बोलत होतो.
आता इथून कोणीच नाही जाऊ शकत बाहेर... एक मांजर बोललं.. ह्या संपूर्ण एरियात त्या अम्माचा अंमल चालतो.. एका मांजराने मला घाबरवायचा प्रयत्न केला..
कोण आहे ती अम्मा? चेटकीण आहे का? मी खुश होऊन विचारलं.. इथे आलो आणि प्राण्यांची भाषा समजू लागली आता साक्षात एका चेटकीणीला भेटल्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर जमा होणार... हे सगळं फनी वाटत होतं.. मी हसणं रोखू शकत नव्हतो..
घे मनसोक्त हसून घे... नंतर आयुष्यभर फक्त रडायचं आहे... एका मांजराने अभद्रवाणी केली..
मला अजून थोडा टाइमपास करायला आवडलं असतं.. पण उशीर होत होता. मी उठून तोंड धुवायला आत गेलो. अम्मा ओट्याजवळ काहीतरी करत होती. माझ्यासाठी चहा करत असावी.
गुड मॉर्निंग अम्मा... चहा, नाश्ता झाला असेल तर देता का? म्हणजे मला निघायला बरं... मी अम्माना बोललो आणि उत्तरादाखल अम्मानी मला लाथ मारली आणि मी दरवाजावर जाऊन आपटलो..
अम्मा काय झालं? असं का वागताय तुम्ही? आता मला थोडी भीती वाटू लागली होती अम्माची.
मला दोन तीन मांजरानी धरून नेलं.. थोडं लागल्यामुळे आणि जास्त घाबरल्यामुळे मला रडू येत होतं.
मला त्या अम्माने का मारलं? रडत रडत मी बोलत होतो.
आपल्या नशिबात आता हे रोजच असणार आहे... एक मांजर माझी समजूत काढत होतं.
म्हणजे काय? मी प्रतीप्रश्न केला...आणि मी का म्हणून ऐकून घेईन? एकतर मी काही इथे कायमचं राहायला आलेलो नाही... शिवाय कुणी अरेरावी केलेली मी खपवून घेणार नाही. बाई म्हणून काही गय नाही करणार त्या म्हातारडीची.
मग काय करणार तू? एका मांजराने मलाच प्रतीप्रश्न केला.
हो खरंच... त्या म्हातारीच्या जागी दुसरं कुणी असतं तर झगडा करता आला असता... बाईमाणसाच्या नादाला कुठे लागणार? गप गुमान इथून निघून जाऊ... परत परत कोण येणार आहे इथे तडफडायला? मी जायला निघालो..
जाण्याआधी एकदा आरशात बघ स्वतःला... एका मांजराने मला आरशासमोर उभं केलं..
पण आरशात फक्त मांजरंच दिसत होती... मी कुठे गेलो? मी आता खरंच धास्तावलो..
सर्वात पुढे उभं आहे ते मांजर म्हणजेच तू... दुसऱ्या मांजराने मला आरसा दाखवून वास्तवाची जाणीव करून दिली..
माझं मांजर कसं झालं? मी पुन्हा रडू लागलो.
ती अम्मा चेटकीण आहे, सांगितलं ना आम्ही तुला! अंधार पडल्यावर ह्या घरात जो कोणी येईल त्याचं अम्मा मांजर बनवते...
पण का असं? मी निरूपयोगी प्रश्न विचारला..
एका मांजराने सांगायला सुरुवात केली...आम्ही असं ऐकलं आहे ही अम्मा सुरुवातीपासूनच जादूटोणा, मंत्रतंत्र करण्यात पटाईत होती. म्हणून गाववाल्यांनी तीला गावाबाहेर काढलं. ती एकटी पडली. तीने अधिक साधना करून अजून नवीन शक्ती मिळवल्या. बदला घेण्यासाठी तीने तीच्या तावडीत सापडणाऱ्या निष्पाप माणसांना मांजर बनवायला सुरुवात केली.
अम्माची अपकीर्ती ऐकून गावातलं कोणी ह्या घराच्या आसपास येत नाही...आपण सर्व बाहेरची माणसं, अलगद तीच्या तावडीत सापडलो. आपलं नुकसान झालं तसं अजून कोणी फसू नये म्हणून गावात येणाऱ्या माणसाला पावलोपावली आम्ही रोखायचा प्रयत्न करतो. जसं तुला आम्ही सावध करत होतो... एस टी स्टॅन्डवर तुला मांजर भेटलं असेलच, वाटेतल्या रस्त्यावर देखील एक दोन मांजरांनी तुला सावध केलं असेल. तू बंगल्यात शिरलास तेव्हा आम्ही तुला परत परत जा सांगत होतो.. पण तुला समजलं नाही. एक मांजर व्यथित होऊन बोलत होतं.
पण इथे येणाऱ्या माणसाचं अम्मा मांजर बनवते.. मग मला माझ्या मित्राने ह्या अम्माचा रेफरन्स कसा काय दिला? ती म्हणे खूप चांगलं जेवण बनवते, पैसे देखील कमी घेते... आपल्यासारखा अनुभव त्या मित्राला कसा नाही आला? त्याचं मांजर कसं नाही झालं? मी रास्त शंका विचारली...
मी तुला सांगितलं तसं अम्माच्या शक्ती केवळ अंधार पडल्यावरच पॉवरफुल होत असतील किंवा अम्मा जाणूनबुजून काही लोकांना सहीसलामत जाऊ देत असेल... जेणेकरून नवीन माणसं इथे येत रहावी.... एका मांजराने माझं शंका निरसन केलं.
इतक्यात दार ढकलून अम्मा आतमध्ये आली. तीच्या हातात दुधाची थाळी होती. तीने थाळी खाली ठेवली तशा सर्व मांजरी गोल करून दुध पिऊ लागल्या. मी मात्र कोपऱ्यात अंग चोरून घेतलं आणि मुसमुसत राहिलो.
एक मांजर मला बोलवत होतं दुध प्यायला... पण मी नको नको करत होतो...
जास्त नखरे करायची काही गरज नाही, समजलं? प्यायचं तर पी मुकाट्यानं नाही तर मर... अम्माने परत एकदा माझ्या पेकाटात लाथ मारली. मी कळवळून कोपऱ्यात अंग चोरून बसलो.
थोडं सावरल्यावर मी त्या घरातून पळून जायला बघत होतो पण त्या गेटच्या बाहेर मला जाताच आलं नाही. त्या अम्माने करणी करून आम्हाला आत मध्ये जखडून टाकलं होतं जणू.
मी बरेच दिवस रडत राहिलो. शेवटी आपलं प्राक्तन म्हणून नाईलाजाने सगळं स्वीकारलं. नकोसं वाटणारं हे जीणंसुद्धा आता अंगवळणी पडू लागलं आहे. अम्मा देईल ते खायचं प्यायचं, आणि बाकी दिवसभर एका कोपऱ्यात पडून राहायचं. बस एवढंच आयुष्य होऊन बसलं आहे माझं.
बाहेर अंगणात कुणाची तरी चाहूल लागली... त्या सरशी आम्ही सर्व गोळा झालो. अम्मा मला आज रात्री पुरती झोपायला जागा मिळेल ना इथे? तो अम्मा बरोबर बोलत होता.
कोपऱ्यातल्या खाटेवर झोप जाऊन... अम्मानी त्याला जागा दाखवली.
तो आपलं सामान उशाशी घेऊन झोपत होता. अंगणात काय मस्त झोप लागणार आहे! चार तास झोप झाली तरी पहाटे एकदम फ्रेश वाटेल. मस्त गरम गरम चहा घेऊन ट्रेकला सुरुवात करू. तो उद्याची स्वप्नं रंगवत झोपेच्या अधीन झाला.
उद्या आपल्या नशिबात काय लिहिलं आहे हे त्या बिचाऱ्याला ठाऊक सुद्धा नव्हतं.