गूढ
कातरवेळ सरून गेली होती, चांगलाच अंधार झाला होता, पडणाऱ्या पावसाने त्याला नकोसं केलं होतं, कधी एकदा कामाच्या ठिकाणी पोहचेन असं झालं होतं, पाठ अवघडली होती, बसून बसून असेल,असं लांब लांब जायचं ,फिरतीचं हे असलं काम,ऊन,पाऊस कसलीच तमा नाही,फक्त नवीन गावं पाहायला मिळतात एवढंच, कामाचा कंटाळा करून तरी कसं चालेल,पोटाचा प्रश्न आहे, जॉब बदलावा का? तसं पण एकाच पोटाचा प्रश्न आहे त्याचं त्यालाच हसू आलं, पाठीत बारीकशी कळ आली, तो कळवळला गाडी पण हलली, निर्मनुष्य रस्ता,दूर कुठेतरी येणारा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, मधूनच बाजूने पाण्याचे तुषार उडवत जाणारा एखादा भरधाव ट्रक, पावसाने गारठा वाढला होता, हवेत एक वेगळा गुढपणा होता, एकदा करून झालं होतं तरी निसर्गनियमा नुसार परत गाडी बाजूला घ्यावी लागणारच होती, याने गाडीचा वेग कमी केला, का कोण जाणे इथे नको थोडं पुढे थांबू म्हणून पुन्हा वेग वाढवला, गाडी बाजूला लावून, थोडं पुढे तो निघाला, आड बाजूला एका मोठ्या झाडाखाली, अंधारात झाड कोणतं ते ही कळत नव्हतं, पण ते त्या मिट्ट काळोखात त्याला फारच गूढ भासत होत,आपलं काम उरकून तो निघाला. आता हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला होता,गाडीचा वेग वाढवत तो निघाला, आणि त्याच्या कामाच्या गावची पाटी एकदाची दिसली त्याला तेव्हा कुठं हायस वाटलं, गावात आला तेंव्हा निरव शांतता होती, कुठे एखाद्या दूर ओरडणाऱ्या कुत्र्याचा भेसूर आवाज येत होता, बहुतेक जेवणं झालेली असावीत लोकांची, बाहेर पाऊस असल्याने बाहेर माणसं दिसत नव्हतीच, याला उगाच चलबिचल झालं, त्या गावात नेमून दिलेल्या याच्या कामाच्या माणसाला याने फोन लावला, रेंज खूप कमी होती, कसतरी फोन लागला, आणि हा त्याची वाट बघत थांबला, आताशा याच डोकं कमालीचं ठणकायला लागलं होतं, खूप थकवा जाणवत होता, लांबून काहीतरी बारीक चमकत होतं, याने डोळे किलकिले करत पाहिलं, ते जवळपास च दिसत होतं, याला वाटलं कामाचा माणूस येत असावा,तेवढ्यात डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून याने डोळे चोळले आणि याला मागून कोणतरी हात लावला, याने दचकून मागे पाहिलं, साहेब मीच आहे, सखाराम, तुम्ही मला कसं ओळखलत याने चमकून विचारलं, सखाराम हसला, अहो इकडं आजूबाजूला कोण दिसतंय काय? आणि एवढी छान गाडी, रेनकोट, माग बॅग मग कस नाही ओळखणार? तो हसला.
गावातल्या छोट्या शाळेची एक रूम सखाराम ने त्याला उघडून दिली, पिवळ्या बल्ब च्या प्रकाशात ती चमकली, तिकडे दोन खुर्च्या ,पाण्याचा एक मग, आणि गुंडाळलेली गादी ठेवलेलीच होती, पण खोलीभर कुबट वास होता, एक बंद खिडकी, आणि बाजूला छोटी मोरी होती, मी जेवण आणतो म्हणून सखाराम निघाला, नको जेवण नको, मला एक कप चहा मिळेल का? याने विचारलं बरं आणतो म्हणून तो गेला, याने दार लावलं, भिजलेले कपडे बदलून ,तो मोरीजवळ गेला, तिकडे पाण्याची बादली ठेवलेलीच होती, तोंडावर पाण्याचा हबका मारल्यावर त्याला बरं वाटलं, आता अंग खूप दुखत होतं, बाहेर पावसाचा जोर वाढला होता, याने ती बंद खिडकी उघडली आणि तेव्हाच मोठा आवाज होऊन वीज गेली, उगाच एक भीतीची अनामिक कळ याच्या छातीतून गेली, त्या खिडकीतून चमकत्या विजांच्या प्रकाशात मागे मोठं मैदान दिसत होतं , लांबलचक, बाहेर झोंबणारा वारा, सोसाट्याच्या पाऊस, तेवढ्यात जोरात दार वाजलं, हा दचकला, मोबाईल च्या उजेडात दार उघडलं तर समोर सखाराम, साहेब चहा घ्या बिस्कीट आहे, मी जातो, मला लवकर जायला हवं, सखाराम आवाज कसला आला? आणि लाईट कधी येतील, अहो ते डी पी फुटला आता माहिती नाही लाईटच काय, ही एक तिकडं कोनाड्यात एक मेणबत्ती आणि माचीस हाय मी जातो म्हणून गडबडीत सखाराम निघाला सुद्धा, याला उगाच हसू आलं, नशीब मोबाईल ची बॅटरी थोडी शिल्लक होती, त्या उजेडात याने कसतरी सगळं शोधून मेणबत्ती पेटवली, किटली तुन चहा कपात ओतून घेतला, चहा पोटात गेल्यावर याला जरा बरं वाटलं, आधीच अर्धी झालेली मेणबत्ती आता नामनेश व्हायच्या मार्गावर होती, पाणी आत येत असल्याने खिडकी सुद्धा लावावी लागली, आता त्या कुबट खोलीत याला कसंच व्हायला लागलं, त्यात बाहेर प्रचंड पडणारा पाऊस..
त्या ओलसर गादीवर अंग टाकल्यावर याला थोडं बरं वाटलं, डोळे मिटले जात होते, डोळ्यासमोर प्रवास करून आलेला रस्ता, बाजूने जाणारी वाहने, पाऊस सगळं दिसत होतं आणि सगळ्यात शेवटी ते झाड, गोल फिरणारं, गूढ, मोठं, जणू काही कोणाला आपल्यात सामावून घेण्यासाठी पसरलेलं, याने पटकन डोळे उघडले, तर वरती,अढ्यावर त्याला काहीतरी चमकल्या सारखं दिसलं, लालसर, दोन बटणं आजूबाजूला ठेवलेली लाल, की डोळे आहेत कोणाचे, आता ते हळूहळू मोठे होत होते, याला उठण्याची हिम्मत होत नव्हती, तेवढ्यात आभाळ गरजलं,आणि कडकडाट करत जवळपास कुठेतरी वीज पडली, आता मात्र याला प्रचंड भीती वाटत होती, आता तसेच डोळे शेजारच्या भिंतीवर, दिसत होते, भिंतीवरून पुन्हा नजर वरती जाईपर्यंत काहीतरी विचित्र असं, सरकत बाजूला गेलं, आता मात्र याला दरदरून घाम फुटला, आणि पट्कन दार वाजल्याचा आवाज आला, त्याने हळूच आपलं रेडियम वालं घड्याळ पाहिलं, पाऊण वाजत आला होता, अंतर्मन सांगत होतं दार उघडू नकोस, त्याने वरती पाहिलं आता डोळे दिसत नव्हते, याला जरा हायसं वाटलं, याने थरथरत्या आवाजात विचारलं कोण? मी सखाराम साहेब, याला खूप बरं वाटलं, घाईघाईने हा उठला, आणि याने दार उघडलं, बाहेर एक मोठी वीज चमकली, एक प्रचंड मोठं धूड बाहेर उभं होतं, ओंगळवाण, हातापायचा चेंदामेंदा झालेलं, नुसतं धड.... याच्या छातीत बारीक कळ उमटली, काही कळायच्या आत ते धूड त्याच्यावर कोसळले... आता याचे श्वास मंद झाले होते, भीती, दुःख, याचं मिश्रण आता याच्या शरीरात पसरत चाललं होतं, ते शरीर शांत करण्यासाठी...
चिखलातून ऍम्ब्युलन्स ला वाट काढून दिली जात होती, बाहेर गावकरी होते, सखाराम चा चेहरा रडवेला होता,गावचे पाटील डोक्याला हात लावून बसले होते, डॉक्टर म्हणाले अटॅक आलाय रात्री, सगळं घेऊन ऍम्ब्युलन्स गेली, जाता जाता कोणीतरी दोघे बोलत चालले होते येताना झाडाखाली थांबलेला वाटतं,तोडत का नाहीत ते झाड, हा हिम्मत आहे का कोणाची , पाटील आणि सखाराम चमकून एकमेकांकडे पाहत होते...
"याने गाडीचा वेग कमी केला, का कोण जाणे इथे नको थोडं पुढे थांबू म्हणून पुन्हा वेग वाढवला, गाडी बाजूला लावून, थोडं पुढे तो निघाला, आड बाजूला एका मोठ्या झाडाखाली"

PC: Google