खेळ -The Horror Game
कुंदा हो ती कुंदाच होती अचानक दिसली आणि गर्दीत गायब झाली.किती वर्षांनी अस तिचं दर्शन जरा मला विस्मयचकित करून गेल कारण कुंदा ह्या जगात नाही असच समजत होतो.हल्ली दादरला मार्केट मधे जाण होत नाही,म्हणजे सगळच घरात येत त्यामुळे दादरची जुनी लक्षात राहण्यासाठी दुकानं विस्मृतीत गेलीत अशीच जाणीव होते दादरला गेल्यावर,त्या दिवशी असच झालं चिंचेचा गोळा चांगला मिळतो मार्केट मधे म्हणून हिने चार वेळा सांगून डोकं फिरवलं म्हणून गेलो होतो आणि कुंदा प्रधान दिसली मार्केटच्या फिश गल्लीत मी घाईघाईत पुढे आलो तिला बघायला ती गायब म्हणजे रानडे रोडवरच्या मार्केट exit मधून बाहेर येऊन वेड्यासारखं फिरत राहिलो स्टेशन परत मागे केव्हा तासभर झाला समजलच नाही घामाघुम झालो सकाळचे साडेअकरा झाले होते सप्टेंबरचा उकाड्याचा महिना.
कुंदा आमच्या बिल्डिंग पासून तिसऱ्या बिल्डिंगमध्ये राहायची म्हणजे अजूनही त्यांचं घर आहे पण कित्येक वर्ष बंद होत,आता टॉवर झालाय पण त्यांच्या जागेच काय झालं माहिती नाही.लहानपणी कुंदा यायची आमच्या घरी,तिचा मोठा भाऊ माझ्या भावा बरोबरचा,आई सदैव आजारी तिचे वडील म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधे पण काम स्मशानामधे आणि आमच्याच वॉर्ड मध्ये म्हणजे दादर स्मशानभूमी मध्ये त्यामुळे गल्लीतले लोकं गमतीने म्हणायचे आपली ओळख आहे तिकडे, कुंदा चे वडील दिसायचे नाहीत फारसे त्यामुळे त्यांचा चेहरा पुसटसा आठवतो.कुंदा डार्क सावळी पण नाक धारधार आणि पुढे थोडा बाक असणार,डोळे जरब बसवणारे,शरीर काटकुळ, आणि आवाज नेहमी कुजबुजल्यासारखा कानात बोलण्यासारखं दबका आवाज,केस लांब वेणी घालायची त्यावेळी,मितभाषी.
का कोणास ठाऊक कुंदा आमच्याकडे येऊन बसायची फार काही बोलायची नाही पण माझी आई म्हणायची ही का येते आपल्या घरी म्हणजे ती आली की नाराज असायची,कदाचित तिचे वडील स्मशानात काम करतात म्हणून घाबरायची तिला वाटायचं नको त्या सावल्या आपल्या घरावर नकोत,पण कुंदा मला आवडायची जवळ आली की बऱ्याचवेळा तिच्या शरीराला मच्छीचा वास यायचा कधी कधी तिची काटकुळी बोटं माझ्या नाकाला लावायची कांदा लसणाचा वास यायचा.आमच्याकडे शाकाहारी त्यामुळे मला तो वास वेगळाच हवा हवासा वाटायचा.कुंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी,त्यामुळे ती कमी बोलत असली तरी मला गूढ गोष्टी सांगायची.
मी असेन बारा तेरा वर्षांचा कुंदा आलेली घरी आई कुठेतरी गेलेली मी एकटाच होतो,काकी कुठे गेल्या अस तिने दबक्या आवाजात विचारलं मी बाहेर गेली म्हणालो,म्हणाली तुला आवडतो ना माझ्या हातचा वास म्हणून खूप चिटकून बसली आणि तिचा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवला मी गंगारलो काहीतरी विचित्र भावना जाणवली. दार वाजलं म्हणून कुंदा लांब सरकली कानात कुजबुजली सांगू नको कोणाला नाहीतर,मी घाबरलो तिच्याकडे बघत राहिलो,आई आत आली संशय आणि भीती अश्या नजरेने तिने आमच्याकडे बघितलं कुंदा नुसती भेदक हसली म्हणजे आत्ता ते हसणं त्या १४ वर्षांच्या मुलीच भयंकर होत अस जाणवलं.
मी आणि कुंदा गच्चीवर बसलो होतो मांजरीच छोट पिल्लू टेरेसच्या बांधावरून हळू हळू सावध फिरत होत त्या पिलाला सुद्धा जाणीव होती बिल्डींगच्या उंचीची तोंडातल्या तोंडात म्याँव म्याँव सुरू होत आईला शोधत असावं.आम्ही पिल्लाकडे बघत होती मला वाटल पिल्लाला उचलून खाली ठेवावं म्हणून मी उठलो अचानक कुंदा कानाजवळ येत म्हणाली थांब काही उपयोग नाही. मला काहीच समजल नाही कुंदा एकटक त्या पिल्लाकडे बघत होती जणू हिच्या नजरेने ते अडखळत होत मला भीती वाटत होती पडेल म्हणून कुंदा स्थिर बघत होती.
दुसऱ्या दिवशी कावळे काव काव करताना दिसले मी दचकलो म्हणजे काल कुंदा काय म्हणाली आपल्याला कानात ते आठवल.
दुपारी मी कुंदा कडे गेलो विचारायला,घरात शांतता आई पलंगावर झोपली होती घरात आजारपणाचा वास जाणवत होता,कुंदा आईच्या पलंगाजवळ खाली जमिनीवर बसली होती. ये म्हणाली, मी सांगायला लागलो मांजरीच्या पिल्लाबाबत, म्हणाली मेल ना? मला धक्काच बसला म्हणाली ते मरणारच होतं.मी म्हणालो तुला कस माहिती म्हणाली मीच त्याला उद्युक्त केलं म्हणजे मला जमत अस हा एक खेळ आहे.मी म्हणालो मी जातो घरी म्हणाली थांब आणि अचानक मला तिने ओढून गच्च धरले कानात कुजबुजली,"मी विचार करत राहिले तर ती व्यक्ती ,सजीव मरू शकते, आजारी पडू शकते"मला काहीच समजल नाही मी त्या कांद्यालसणाच्या वासाने गुदमरून गेलो होतो मी तिच्या पकडीतून सुटून घरी पळून आलो.
दोन दिवस कुंदा आली नाही मला चैन पडेना म्हणजे तो खेळ कुंदा ला जमतो तिला विचारावं काय आहे तो खेळ.कुंदा आली संध्याकाळच्या वेळेला, आई चिडली पुटपुटत होती, कुंदा च लक्ष नव्हतं, मी अधिरतेने विचारलं कुठे होतीस? आई कडे बघत होते अस म्हणाली,दिवसभर आईकडे बघत होतीस अस विचारल्यावर कानात एकच शब्द बोलली " खेळ".मला काहीच समजल नाही त्या दिवसानंतर कुंदा घरी आली नाही किंवा दिसली नाही तिची आई गेली अस बायका आईशी बोलताना ऐकलं. मला सारखं तो खेळ काय असेल ह्याबद्दल कुतूहल पण कुंदा दिसत नव्हती.
नंतर कुंदा तिचे वडील आणि भाऊ घर सोडून गेले कुठे गेले का गेले काहीही माहिती नाही नंतर एकदोनदा मुंबई सेंट्रल क्वार्टर्स मधे ते शिफ्ट झाले अस गल्लीतले बोलायचे.पण तो खेळ काय मला स्वस्थ बसून देत नव्हता हळू हळू मी विसरलो.
आणि त्या दिवशी कुंदा दिसली हो तीच होती काळी सावळी लांब केस, डोळे फारसे दिसले नाहीत पण तीच चाल फक्त केस पांढऱ्या छटा वागवत होते.
मी त्या दिवशी घरी आलो आणि हिने विचारले काय हो कसला विचार करताय? मी कुंदा बद्दल सांगितलं हिने सगळ हसण्यावारी नेलं, आई असती तर चिंतीत झाली असती कारण कुंदा ला ओळखल होत, कदाचित तिचा खेळ आईला तिच्या नजरेतून समजला होता.
अनिरुद्ध