Ranu Kaka -Marathi Horror stories
ही घटना घडली तेव्हा मी कॉलेजला होतो... उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी मामाच्या गावी गेलो होतो...
गाव लहान आणि शांत होते...
तिथे रात्री नऊनंतर रस्त्यावर सामसूम व्हायची, फक्त कुत्र्यांचे रडणे किंवा झाडातून येणारा रातकिड्यांचा आवाज ऐकू यायचा...
मामा गावाबाहेरील दूध संकलन केंद्रात कामाला होता...
त्याला पहाटे चारला उठावे लागायचे, त्यामुळे तो रात्री लवकर झोपायचा...
त्या दिवशी वीज गेलेली होती आणि उकाडा असह्य होता...
मी बाहेर झोपू असे म्हणत असतानाही, सुरक्षिततेची सवय म्हणून मामाने त्यास नकार दिला...
आम्ही हॉलमध्येच जमिनीवर अंथरुण टाकून झोपलो होतो...
रात्री साधारण अडीच च्या सुमारास कसल्या तरी आवाजाने मला अचानक जाग आली... मी डोळे उघडून कानोसा घेतला..
बाहेरून कोणीतरी अगदी स्पष्टपणे हाक मारत होते..
“अरे... ऐकतोयस का?”
तो आवाज मला ओळखीचा वाटत होता...
मी आवाज नक्की कोणाचा आहे ते आठवू लागलो..
अजून एकदा आवाज कानावर पडला तसे मला आठवले की तो आवाज नक्की कोणाचा आहे.. तो आवाज होता गणू काकांचा..
मामाचे शेजारी गणू काका...
मी उठून बसलो...
“काय झालं काका?” मी जागेवरूनच विचारले...
काही क्षण शांतता पसरली... पुन्हा आवाज आला, यावेळी थोडा अधिक काकुळतीला आलेला...
“अरे, जरा दार उघड रे... मदतीची गरज आहे.”
गणू काकांचे असे अवेळी येणे तसे माझ्या साठी नवीन नव्हते, पण मध्यरात्री अडीच वाजता? मनात शंका आली...
मी मामाला हलवून उठवत बाहेर कोणीतरी आवाज देत असल्याविषयी सांगितले.....
मामा झोपेतच पुटपुटला, “अरे, झोप आता. कुणीही असलं तरी सकाळी दार उघडू. उगाच मध्यरात्री दार उघडण्याच्या भानगडीत पडू नकोस.”
मी मामाकडे बघतच राहिलो..
मामा मात्र पुन्हा घोरायला लागला...
पण तेवढ्यात पुन्हा आवाज घुमला..
“दार उघड... आता फार वेळ नाहीये माझ्याकडे.”
आवाजात कमालीची घाई होती, पण तो आवाज घाबरलेला नव्हता; उलट त्यात एक प्रकारची आर्तता होती... मी टॉर्च घेऊन खिडकीपाशी गेलो आणि बाहेर उजेड टाकला...
अंगणात कोणीच दिसत नव्हते... कडुनिंबाच्या झाडाच्या सावल्या हलत होत्या, पण माणूस कुठेच नव्हता....
माझ्या अंगावर सरसरून काटा आला... मी परत अंथरुणावर येऊन बसलो.., तेवढ्यात अगदी दरवाजाला लागूनच आवाज आला...
“मी इथेच आहे रे, दरवाजापाशी....”
आता मात्र माझ्या छातीची धडधड वाढली... आवाज गणू काकांचाच होता, पण बोलण्याची ढब थोडी विस्कटलेली वाटत होती... काही वेळ मी पुन्हा मामाला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला..
शेवटी मी हिंमत करून उठलो आणि दिवा लावून घराचे मुख्य दार उघडले....
दरवाजात कुणीच नव्हते... मी बाहेरच्या दिशेने अंगणात टॉर्च फिरवला... कोणीही नव्हते...
पण मागे फिरताना जेव्हा मी पायरीजवळ टॉर्चचा प्रकाश टाकला, तेव्हा माझे पाय लटपटले... अंगणात मातीवर पायाचे ओले ठसे होते... जणू काही एखादा माणूस पाण्यातून चालत येऊन तिथे उभा राहिला असावा... ते ठसे घराच्या दिशेने आलेले होते, पण आत शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता...
मी घाबरून दरवाजा बंद केला आणि अंथरुणात येऊन पडलो..
सकाळी गावात बातमी समजली... गणू काका रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले असताना, पाय घसरून विहिरीत पडले... पडताना दगडावर डोके आपटल्यामुळे त्यांची काही वेळातच प्राणज्योत मालवली होती..
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या शेता कडून गावात येताना पाहिले घर मामाचे होते..
माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी मामाला रात्रीचा सगळा प्रकार सांगितला... मामा बराच वेळ गप्प बसला... शेवटी तो शांतपणे म्हणाला, “मनुष्याचा आत्मा देह सोडण्याआधी, कधी कधी त्याची ओढ किंवा चेतना ओळखीच्या माणसांकडे धाव घेते... तसेच काही तरी रात्री झाले असावे.. किंवा तुझा भास असावा.."
आजही मला माहित नाही की तो माझ्या मेंदूचा खेळ होता की खरोखर गणू काकांचा आत्मा मदत मागण्यासाठी आला होता... पण त्या दिवसापासून एक गोष्ट मात्र मी पाळतो... रात्री ओळखीचा आवाज आला, की अगोदर देवाचा दिवा लावतो..
पण दार मात्र उघडतोच. मग मी कुठे ही असलो तरी......
समाप्त..

