कलावंतीण - भाग ४
पुढे असेच तीन-चार दिवस उलटून गेले, यशवंतला नेमके काय करावे हे सुचत नव्हते, रात्री व्यवस्थित झोप सुद्धा लागत नव्हती; आबासाहेबांनी त्याच्याशी बोलणे बंद केले होते, रत्नाची आठवण पण पिच्छा सोडत नव्हती, तीची मनस्थिती कशी झाली असेल याचा तो अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता. जे काही झाले ते योग्य नव्हते, एवढेच त्याला समजत होते, आणि आपली चूक दुरुस्त करण्याची गरज आता त्याला वाटू लागली होती.
'प्रिय रत्ने! घडलेल्या परसंगामुळ तु नाराज झालीस हे खरं आहे, पण मी माझ्यापरीन जेवढे करता येणे शक्य होतं; ते समद केले. अजूनबी जेवढे काही करता येईल ते समद करील, पण तु राग धरू नगस. पिरेम होणं किती सोपं असते ना? पण तितकेच अवघड ते टिकवणं असतं, हे आता समजत आहे.
आपल्या भवतालची परिस्थिती आपल्याला सहजपणे एकत्र येवू देणार नाही. आपल्या पिरमासाठी अनेक बाबतीत तु त्याग केलेला आहे, याची जाणीव मला आहे. आता काही बाबतीत मलाही त्याग करावा लागणार आहे. कदाचित माझ्या घरा दाराचा आणि प्रियजनांचा सुद्धा!
मला माहित आहे, गेले तीन रात्री तु सुध्दा माझ्यासारख्याच जागून काढल्या असतील, आणि तु माझी वाट सुद्धा पाहत असशील. लवकरच तुला समक्ष भेटून मी तुझे समदे गैरसमज दुर करेल, तु सुध्दा थोडा धीर धर, आपण दोघं मिळून ह्या संकटातून बाहेर पडायचा मार्ग नक्कीच शोधून काढू, आणि मग नंतर आपले सुद्धा चांगले दिस नक्की येतील बघं.'
त्यादिवशी बराच वेळ विचार करून एका वेगळ्या उत्साहाने यशवंत घराबाहेर पडून तमाशाच्या फडाच्या दिशेने गेला. रामालाही त्याने सोबत घेतले होते. आज तो आपल्या प्रेम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या निर्धाराने निघाला होता, रत्नाला अडचणीच्या वाटणार्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वाटेल ते करायचे; ह्याचा निश्चय त्याने केला होता.
पण नियतीला ते मान्य नव्हते. ते दोघे फडा जवळ पोहोचण्याच्या आधीच काही अंतरावर त्यांना तमासगीर बायकांचा घोळका दिसला. त्या सगळ्या जणी घाईने कुठेतरी निघाल्या होत्या, त्या जवळून जात असताना काही विशेष शब्द यशवंतच्या कानावर पडले, कानामध्ये गरम शिसे ओतल्या सारखे ते शब्द यशवंतच्या काळजाला यातना देऊ लागले.
रामाला तेथेच सोडून तो रस्त्याने धावत त्या सर्व महिलांच्या आधी वेगाने नदी किनार्याच्या दिशेने गेला.
तो डेरेदार महावृक्ष, जेथे नेहमीच येसू आणि रत्ना एकांतात भेटत असायचे, त्या वृक्षाच्या जवळ जाऊन तो थांबला. समोरील दृश्य त्याच्या मनाच्या चिंधड्या उडवणारे होते. त्याच्या मागोमाग फडावरील महिलांचा घोळका तेथे गोळा झाला, त्या झाडाच्या एका उंच फांदीला घट्ट बांधलेल्या साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या रत्नाचा निष्प्राण देह तेथे लटकत होता.
जमलेल्या बायकांचा आरडाओरडा सुरु झाला, काही जणी रडू लागल्या, तर काही जणी शिव्याशाप देऊ लागल्या.
त्या सर्वांपासून काही अंतर राखून यशवंत त्याच्या जागेवर स्तब्धपणे उभा होता. एवढ्यात रामासूद्धा धापा टाकत तेथे पोहोचला, समोरील प्रसंग पाहून त्याचाही थरकाप उडाला.
"ये..येसुदादा! चल ना लवकर माघारी" त्याने यशवंतच्या हाताला पकडून विनंती केली. यशवंतची नजर अजूनही समोरच रोखलेली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर निराशा, उद्वेग आणि पश्चात्ताप दाटुन आला होता, त्याने मान खाली घातली, त्या दिवसानंतर यशवंत परत कोणाला कधीही ताठ मानेने वावरताना किंवा हसताना दिसलाच नाही.
★★★★★★★★★★★★★★★
"काय सांगता! म्हणजे ह्याच झाडाला लटकून रत्नाने सुसाईड केले होते का?" हिमांशू आता घाबरला असावा.
"हंम्म..! जे व्हायला नको होतं ते झालं. रत्ना आणि यशवंतच्या भोवतालची न सुधारता येणारी परिस्थिती आणि त्यांच्यामधील काही समज-गैरसमज यामुळे रत्नाने ते पाऊल उचलले असावे, यशवंतने ही त्याच्या वडीलधाऱ्यांच्या विरोधापुढे वेळेवर योग्य हालचाली केल्या असत्या तरी त्याला हे रोखता आले असते. असं व्हायला नको होतं; पण जाऊदे; नियती पुढे कोणाचा काही इलाज चालत नाही.
ही घटना घडली आणि थोड्याच दिवसात मी अण्णांसोबत गाव सोडून शहरामध्ये राहायला आलो. सुरुवातीला गावाकडची आठवण येत असली तरी इकडे येणे क्वचित प्रसंगीच व्हायचे.
सुमारे तीन वर्षांनंतर जेव्हा काही कामानिमित्त परत आलो होतो तेव्हा मला आमच्या शेजारच्या वाड्यामध्ये यशवंत भेटला नव्हता, चौकशी केल्यावर समजले तो वाडा सोडून शेतामध्ये राहायला गेलेला होता. मी एका जोडीदाराला सोबत घेऊन त्याला भेटायला गेलो. शेतात एक छोटे घर बांधून तो एकटाच तेथे राहत होता.
रात्रंदिवस त्याने स्वताला कामात गुंतवून ठेवलेले होते. व्यायाम आणि तालिम सोडुन दिल्याचे त्याच्या उतरलेल्या शरीरयष्टी वरून समजत होते. मला तेथे आल्याचे पाहून त्याला आनंद झाला. बराचवेळ गप्पा गोष्टी करत आम्ही त्या दिवशी तेथे बसलो होतो. आम्ही तेथून निघालो तेव्हा त्याचा चेहरा उतरला होता.
त्यानंतरही काही वर्षांनी पुन्हा गावाकडे गेलो, तेव्हाही तो एकटाच राहत होता. घरातील सगळ्यांचा आग्रह असला तरी त्याने अखेरपर्यंत लग्न केले नव्हते; त्याबाबतित रत्नाला दिलेले वचन त्याने अखेरपर्यंत पाळले.
त्यानंतर यशवंतची अखेरची भेट झाली ती त्याच्या अंतयात्रेलाच.
बातमी समजताच लगेचच मी गावाकडे आलो होतो.
यशवंतच्या आयुष्या सारखे त्याच्या अकाली मृत्युचे कारणही अस्पष्टच राहिले. कोणी म्हणत होते, त्याने त्याच झाडाखाली आत्महत्या केली जेथे रत्नाने केली होती, तर कोणी म्हणत होते त्याला पोर्णिमेच्या रात्री रत्नाच्या आत्म्याने झपाटले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. खरे काय आणि खोटे काय हे त्याचे त्यालाच माहिती. पण तो रात्रीच्या वेळी त्या झाडाजवळ जायला नको होता, यावर मात्र मी आजही ठाम आहे." मी माझी कथा पुर्ण केली.
"नाना! अंधार पडत चाललाय, लवकर येथून चला, मला थोडी भिती वाटायला लागलीय" हिमांशू घाबरला होता.
"ओह; स्वॉरी बेटा; मी भुतकाळात रमल्यामुळे बोलण्याच्या ओघात तुला जे सांगायला नको होते, ते पण सांगितले. डोन्ट वरी, आपण लवकरच घरी पोहोचु" मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
आम्ही घराच्या दिशेने चालत होतो, दरम्यान नुकताच चंद्रोदय झाला होता. पोर्णिमेचा पुर्ण चंद्र आकाशात मोहक वाटत होता.
"नाना! आज सुद्धा पोर्णिमेची रात्र आहे वाटतेय, आपण आता त्या झाडाजवळ गेलो तर आपल्याला आज सुद्धा 'रत्ना कलावंती' तेथे दिसेल का ?" हिमांशूच्या प्रश्नाने आता मी भांबावलो होतो.
"गप रे! आणि जरी असली तरी तुला काय करायचंय तिला पाहून?"
"मला ते झाड जवळून बघायचय ; तुम्ही सोबत असल्यावर मला भिती वाटणार नाही. एकदा जाऊन यायला काय हरकत आहे नाना?"
"तु आता शांत बस! ज्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसती तिथे जास्त खोलात शिरायचं नसतं; आणि आता चार दिवस झालेत आपल्याला येथे येऊन, उद्या सकाळी लवकर उठून आवर; आपल्याला आपल्या शहरातल्या घरी जायचय उद्याच"
माझा आवाज चढलेला पाहून हिमांशू शांत बसला, पण त्याची वाढलेली चुळबुळ मला अस्वस्थ करणारी होती.
★★★★★★★★★★★★★
दिवसभर दमल्यामुळे त्या रात्री जेवण झाल्यावर आम्हाला जरा लवकरच झोप लागलेली होती पण काही वेळाने मध्यरात्रीच्या सुमारास मला अचानक पणे जाग आली, खोलीतल्या अंधुक प्रकाशात पाहिले तर, रात्री शेजारी झोपलेला हिमांशू त्याच्या अंथरूणावर नव्हता.
जरावेळ वाट पाहिली आणि मग खोलीबाहेर येवून पाहिले पण घरात आणि अंगणातही तो कुठे दिसत नव्हता. मी तसाच डोळे चोळत रस्त्यावर गेलो, अंधारात दुरवर त्याच्यासारखी एक आकृती दुर जाताना दिसत होती.
'हिमांशु? हो, तोच आहे; पण एवढ्या रात्री एकटाच तो चाललाय तरी कुठे?' मी घरातल्या लोकांना उठवण्यासाठी गेलो असतो तर ती आकृती नजरेआड झाली असती, मी आहे तसाच घाईघाईने त्याच्या मागे चालू लागलो. तो सुद्धा वेगाने पाऊले टाकत पुढे कुठेतरी निघाला होता. मारुती मंदीराच्या बाजुच्या रस्त्याने तो नदीच्या दिशेने वळाला, आणि माझी छाती धडधडायला लागली.
"बापरे! हा तिकडे तर चालला नाही ना?, दिवसा मी त्याला अनेक वेळा नकार दिला म्हणून एवढ्या रात्री एकटाच चाललाय"
मी त्याला आवाज देऊन थांबण्यास सांगितले, पण त्याला माझा आवाज ऐकू गेला नाही, किंवा गेला असला तरी ऐकुनही तो थांबला नाही आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावर माझा आवाज ऐकणारा त्यावेळी त्याच्याशिवाय दुसरे कोणी मला दिसत पण नव्हते.
अंधार्या रस्त्यावरून झपझप पाऊले टाकत तो काही वेळातच नदीच्या जवळ त्या मोठ्या पण शुष्क वृक्षाजवळ पोहोचला. मी धापा टाकत त्याच्या मागावरच होतो. जवळ येताच मी त्याच्या हाताला धरले,
"हिमांशू! कुठे चाललाय?" मी त्याला विचारले,पण तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हता. त्याने माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. हिमांशूच्या मागोमाग त्या शुष्क झाडाच्या जवळ जाताच मला काही तरी चित्र विचित्र आभास होत असल्यासारखे वाटले. एक क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली, मी समोरील अंधारात डोळे वासून पाहून लागलो.
गेले काही दिवस जो वृक्ष दुरून सुकलेला, फांद्यांचा सांगाडा असल्यासारखा वाटत होता, पण जवळ आल्यानंतर तो आज वेगळाच वाटत होता. सगळ्या फांद्या दाट हिरव्या पानांनी बहरलेल्या होत्या, वरुन लोंबणार्या पारंब्या हवेत झुलत होत्या.
वातावरणात कमालीची शांतता होती, रात्र फुलांचा मंद सुवास मनाला धुंद करणारा होता.
हिमांशू अखेर झाडाखाली पोहोचलाच, आणि त्याच्या सोबत मी पण. वर आकाशात पाहिले असता,चंद्र आणि चांदण्याचा मंद प्रकाश झाडाच्या फांद्या आणि पानां मधून झिरपत जमीनीपर्यंत येत होता. तो प्रकाश माझ्याही अंगावर पडला होता, माझे लक्ष स्वतःकडे गेले आणि.. काय आश्चर्य!!
वार्धक्याने थकलेल्या माझ्या शरीरात अचानक उर्जेचा संचार झाला, मी स्वतालाच निरखत होतो. मी पुन्हा बालवयात प्रवेश केला होता. साठी ओलांडलेल्या माझे वय जेमतेम बारा असल्यासारखेच वाटत होते. मी आनंदाने फक्त उड्या मारायच्याच बाकी राहिलो होतो.
तेवढ्यात माझे लक्ष झाडाच्या खोडाजवळ गेले. ती निवांतपणे तिथे बसलेली होती. होय तीच. फिक्कट लाल रंगाची नऊवारी, पायात पैंजण, अंगावर विविध दागदागिने, डोळ्यात काजळ, नाकात नथ, केसात गजरा, ओठांवर मधूर हास्य. तिची नजर पण आमच्या कडेच होती.
"कलावंतीण" माझ्या तोंडातून अस्पष्ट पणे निघाले.
"रामा! लई वरसानं आलास की, पण बरं झालं! आधीपण तु माज्याकडं येसुला सोबत घेवून यायचासं, आज पण घेवून आलास"
"येसु! कुठे?" मी चमकून बाजुला उभ्या असणाऱ्या हिमांशू कडे बघितले, पण तेथे हिमांशू नव्हताच, तिथे चक्क यशवंत उभा होता. अंगावर सफेद सदरा, डोक्यावर फेटा बांधलेला, मिशीवर ताव देणारा तरणाबांड गडी.
"येसू दादा!!" माझे डोळे विस्फारले होते.
"व्हयं रामा! कुणाला सांगणार तर न्हाईस ना? आपण हित रत्नाला भेटायला आलोय म्हणून " तो हसत म्हणाला.
माझे डोके गरगरायला लागले होते.
त्याने पुढे होऊन रत्नाला हात देऊन उठवले, एकमेकांच्या घट्ट बाहुपाशात बराच वेळ हरवलेले होते ते प्रेमीयुगुल; त्यांच्या शेजारी असणाऱ्या माझी उपस्थिती विसरून गेले होते.
त्या अंधुक प्रकाशात बालवयीन मी त्यांच्या अवतीभवती बागडत होतो, पारंब्याना लटकून झोके घेत होतो, झाडाच्या खोडाभोवती गिरक्या मारत होतो, त्यां दोघांचे काय चालले होते, त्याच्याशी मला काय देणे घेणे?
"रत्ने! येवढ्या वर्षांनी भेटलो आपण; आता तुला सोडून हितून जायची अजिबात इच्छा होत नाही बघ" यशवंत तिला म्हणाला.
"असं कसं? मगं काय हिथंच राहणार हायेस व्हंय? तसीबी मी आज रातीला हाये, उद्या सकाळी नसेल तर मगं? आणि तुझ्यासोबत रामाबी हाये; तुला घेतल्याबिगर एकटा माघारी कसा जाईल तो?"
"मगं आता मी काय करु म्हणतेस?"
"आता तु परत माघारी जा येसु; परत कदी आठवण आली, वाटलंच तुला तर परत ये भेटायला ह्या झाडाखाली, तुला नक्की भेटनं मी"
"बरं ठिक हाये जातो, पण लई दिस झाले रातीला झोपच लागत न्हाई; आजची रात तुझ्या मांडीवर झोपु दे की"
यशवंत ने इच्छा व्यक्त केली. रत्ना झाडाच्या खोडाला टेकून बसली. यशवंत तिच्या मांडीवर अलगद डोके टेकवून खाली झोपला.
मी अजूनही माझ्या खेळात दंग होतो, रत्नाने हाताने इशारा करुन मला सुद्धा जवळ बोलावून घेतले. मी पण त्यांच्या शेजारी जाऊन खाली गवत मातीमध्येच अंग पसरुन झोपलो.
मंद चंद्रप्रकाश, गार वारा, पानांची सळसळ, बांगड्यांची किणकिण, अधूनमधून ऐकू येणारे त्या दोघांचे अस्पष्ट बोलणे या सगळ्यांच्या प्रभावामध्ये मला अगदी गाढ झोप कधी लागली हे समजलेच नाही..
सकाळी केव्हातरी डोळ्यांना उन्हाचा चटका बसल्याने जाग आली.
कसेबसे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण डोके भयानक ठणकत होते. पर्णविहीण सुकलेल्या फांद्या मधून उन्हाचा चटका बसु लागल्याने अजून जास्त वेळ झोपणे शक्य नव्हते.
मी उठून बसलो, मातीने मळलेले कपडे झटकत बाजूला झोपलेल्या हिमांशू कडे पाहिले. तो अजूनही गाढ झोपेत होता.
मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे शरीर तापाने फणफणलेले जाणवले, डोळे मिटलेल्या अवस्थेमध्येच तो वेदनेने कण्हत होता. उठून चालणे त्याला आता शक्य नाही हे समजल्याने मी त्याला उचलून नदीच्या कडेकडेने चालत गावात घेऊन आलो.
तेथे एका छोट्या दवाखान्यात ॲडमिट केले. डॉक्टरांनी एक दिवस सलाईन आणि औषध उपचार करुन त्याला काहीसे बरे केले.
मला लवकरात लवकर गाव सोडून शहरात जायचे असल्याने हिमांशूचा पुढील उपचार शहरात करायचे असे ठरवून माझ्या नातलगांचा आणि गावाचा निरोप घेतला.
कारमध्ये बसलेला हिमांशू मोठ्या आजारपणातून बाहेर आल्यासारखा खंगलेला वाटत होता. एव्हाना आमची गाडी नदीवरील पुल ओलांडून पुढे सरकत असताना, हिमांशूने किलकिल्या नजरेने त्या शुष्क झाडाकडे पाहिले. वाळलेल्या फांद्यांचा सांगाडा आज जास्तच भेसूर वाटत होता.
"नाना! तुम्ही मला सगळं गाव दाखवलं, पण ह्या झाडाच्या जवळ नेलच नाही, मला जवळून पाहायचं होतं, चला ना जाऊन येवू आपण आत्ता, लगेचच परत येऊ.'
हिमांशू त्याच्या बसलेल्या हळू आवाजात म्हणाला.
"आता नको रे, आपल्याला घरी पोहोचायला उशीर होईल. पुढच्या वेळेला गावाकडे आलो की नक्की जावू आपण तिकडे, ओके बेटा!" मी त्याची समजूत काढली आणि गाडीचा स्पीड वाढवला.
काही वेळातच कच्चा रस्ता संपून हायवे लागला आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला.
आमच्यासोबत नक्की काय झाले होते? कसे झाले होते? तो अनुभव आम्हालाच का आला? या प्रश्नांचे उत्तरे शोधण्यापेक्षा आम्ही त्या विचित्र प्रसंगातून सुखरूप बाहेर आलो होतो, याचा आनंद होत होता. आता यापुढे परत संग्रामपुरला येण्याची कधी वेळ आलीच तर मी एकटाच येणार हे नक्की . हिमांशूला परत कधीही गावाकडे आणणार नाही याचा ठाम निश्चय मनोमन केला होता.
समाप्त.
लेखक- Dnyanesh Waghunde

