किरदुर्ग..
(यशवर्धनचा भूतकाळ आणि त्याच्या आध्यात्मिक आयुष्याची सुरुवात..)
©® लेखक: रूद्रदमन
8265077252
सकाळच्या कोवळ्या उन्हाने सृष्टीला स्पर्श केला होता... पानापानांवर साचलेले दव त्या प्रकाशात मोत्यांसारखे चमकत होते....
वातावरणात एक विलक्षण स्तब्धता होती... आठ वाजले तरी शहराच्या धावपळीचा आवाज त्या परिसरात अजून पोहोचला नव्हता...
आणि अचानक...
“ट्रर्रर्र… ट्रर्रर्र…!”
दारावरच्या बेलने त्या शांततेचा भंग केला...
तो आवाज इतका कर्कश होता की पहाटेच एका महत्त्वाच्या बातमीचे रिपोर्टिंग उरकून गाढ झोपलेला यशवर्धन राजे दचकून जागा झाला... त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या... रात्रभर केलेल्या त्या धावपळीनंतर शरीराला विश्रांतीची नितांत गरज होती, पण त्या आवाजाने त्याच्या झोपेला पूर्ण चक्काचूर केले होते....
“या वेळी कोण आले असेल?”
विचार करत त्याने कूस बदलून खिडकीबाहेर पाहिले..
तेवढ्यात पुन्हा एकदा बेल वाजली...
आता मात्र न राहवून तो अनिच्छेने अंथरुणातून उठला...
दाराकडे जाताना मनात धाकधूक आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या...
यशवर्धनने सावकाश दरवाजा उघडला....
समोर पोस्टमन उभा होता... पण त्याचा नेहमीचा हसरा चेहरा आज कुठेतरी हरवला होता... कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर एक विचित्र ताण स्पष्ट जाणवत होता... तो अस्वस्थपणे इकडे-तिकडे बघत होता...
“साहेब… हे घ्या, लवकर सही करा बघू. मला आज अर्जेन्ट बाहेर जायचंय, म्हणून तर एवढ्या सकाळी आलोय,”
तो घाईघाईत रजिस्टर पुढे करत म्हणाला...
यशवर्धनने काहीही न बोलता रजिस्टरवर पटकन सही केली आणि पोस्टमनच्या हातातून लिफाफा घेतला...
पोस्टमन निघून गेल्यावर यशवर्धन लिफाफा घेऊन पलंगावर येऊन बसला...
लिफाफ्याला न्याहाळत असताना त्यावर असलेल्या शिक्क्याकडे त्याची नजर गेली..
“किरदुर्ग”
ते नाव वाचताच त्याच्या मनात आठवणींचा बांध फुटला... कॉलेजचे ते आनंदी दिवस पुन्हा डोळ्यासमोर तरळले…
आणि त्या आठवणींच्या गर्दीतून एक चेहरा स्पष्टपणे नजरेसमोर उभा राहिला...
सुधाकरचा....
एक जिवलग मित्र, ज्याच्याशी जोडलेल्या काही आठवणी आजवर यशवर्धनला विसरता आल्या नव्हत्या... सुधाकरचे गाव होते किरदुर्ग... सुट्टीमध्ये त्याच्याबरोबर एक दोन वेळा किरदुर्गची सहल झालेली होती....
त्याने हळुवार लिफाफा फोडला.... आत एक कागद होता... त्यावर सुधाकरने लिहिलेला मजकूर स्पष्ट दिसत होता... एवढ्या वर्षांनंतर आलेले ते पत्र… सुधाकरची हॅण्ड रायटिंग पाहून यशवर्धनला गहिवरून आले... ते पत्र उलगडून समोर धरताच यशवर्धनच्या मनात दोन विरुद्ध भावना एकाच वेळी उसळल्या..
आश्चर्य… आणि आनंद...
पण त्या आनंदाच्या पृष्ठभागाखाली कुठेतरी एक सूक्ष्म, अनामिक भीती हालचाल करू लागली होती... जणू एखादी सावली प्रकाशात लपण्याचा प्रयत्न करत होती...
तो क्षणभर स्तब्ध राहिला... मग सावकाश, जपून…
त्याने पत्र वाचण्यास सुरुवात केली....
पत्रातील अक्षराअक्षरांतून सुधाकरची अस्वस्थता जाणवत होती... किरदुर्ग गावाविषयी त्याने तीव्र चिंता व्यक्त केली होती...
गेल्या काही काळापासून गावात विचित्र, भयावह घटना घडत आहेत...
काही लोक अचानक बेपत्ता झाले आहेत... ना शोध, ना मागमूस.
काहींना वेड लागले आहे....
ते लोक रात्री अंधारात गावभर भटकत असतात... अस्पष्ट शब्द पुटपुटत, एखाद्या हालचाल करणाऱ्या जिवंत पुतळ्यासारखे...
आणि दिवसा… तेच लोक किरदुर्ग डोंगराच्या दाट, काळोख असलेल्या झाडीत शिरून गायब होतात....
पत्रात अधूनमधून जुन्या आठवणींचे उल्लेख होते...
कॉलेजचे दिवस, हसरे क्षण.... पण त्या ओळीही भयावह काळजीच्या सावलीखाली दबलेल्या जाणवत होत्या....
शेवटच्या ओळीत भीती स्पष्ट जाणवत होती....
ती विनंती नव्हती…
ती होती आर्त साद...
“यश… प्लीज तू गावात ये… परिस्थिती हाताबाहेर जात आहे…”
यशवर्धनने पत्र वाचून पूर्ण होताच ते घडी करून बेडवर ठेवले...
तो उठला आणि किचनकडे गेला....
कॉफी बनवताना उकळणाऱ्या पाण्याचा आवाजसुद्धा वेगळाच वाटत होता.... कॉफीचा कप हातात घेऊन तो खिडकीजवळ उभा राहिला.... घोटाघोटाने कॉफी पीत असताना त्याचे मन मात्र किरदुर्गमध्ये अडकले होते..... त्या बेपत्ता लोकांत… त्या वेडसर भटक्यांत… आणि त्या दाट, भयाण जंगलात…
कॉफी थंड होत होती, पण यशवर्धनच्या मनात काहीतरी गरम होऊ लागले होते....
त्याला आता खात्री झाली होती... ते पत्र म्हणजे फक्त आमंत्रण नव्हते... ते होते अंधाराकडून आलेले एक आव्हान...
खिडकीतून बाहेर पाहत तो मनातल्या मनात किरदुर्ग आठवू लागला...
किरदुर्ग…
घनदाट, काळसर जंगलांनी वेढलेल्या किरदुर्ग डोंगराच्या पायथ्याशी शांतपणे विसावलेले छोटेसे गाव... त्यामुळेच त्याचे नाव किरदुर्ग पडले होते… किंवा ज्या राजा-महाराजाने ते वसवले असेल त्याने ठेवले होते...
जवळून वाहणारी तुपगंगा नदी...
स्वच्छ, शांत, निसर्गाची अनमोल देणगी... जिच्या पाण्याचा खळखळाट गावाला जिवंतपणा देत असे...
चार-पाच हजारांची लोकवस्ती...
लहानसे पण आपुलकीने वागणारे गावकरी, एक निसर्गसंपन्न गाव...
सुधाकरने लिहिल्याप्रमाणे अलीकडच्या काळात त्या गावाच्या वातावरणात काहीतरी बदल झालेला होता....
तो बदल दिसणारा नव्हता... तो जाणवणारा होता...हवेतील दडपण… रात्रीची वाढलेली अमानवी वर्दळ…
आणि लोकांच्या डोळ्यांत दडलेली न बोलली जाणारी भीती…
काय घडत होते तिथे?
नेमके काय चालू होते किरदुर्गमध्ये?
हे प्रश्न फक्त विचार करून सुटणारे नव्हते... तिथे गेल्याशिवाय त्या रहस्याच्या गर्भात घुसता येणार नव्हते... त्या मातीला हात लावल्याशिवाय, त्यात मिसळलेल्या भीषणतेची व्याप्ती कळणार नव्हती... त्या जंगलाच्या गाभ्यात हात घातल्याशिवाय तिथे नक्की काय अमानवी घडते आहे याची माहिती समजणार नाही...
किरदुर्ग वर विचार करतानाच यशवर्धनला याची पूर्ण जाणीव झाली होती...
तसेही, अलीकडच्या काळात त्याला रोजच्या त्याच त्याच रिपोर्टिंगचा कंटाळा आला होता...
तेच अपघात, तेच राजकारण, तीच खोटी विधाने…
आयुष्यात काहीतरी बदल हवा होता.... खराखुरा… धोकादायक…
कॉफीचा शेवटचा घोट घेताना त्याने मनाशी निर्णय घेतला...
“किरदुर्गला जायचं.”
तो निर्णय अचानक घेतलेला नव्हता... तो हळूहळू, आत खोल मनातून आलेला होता... खाजगी रिपोर्टर असल्यामुळे त्याला कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नव्हती...
त्या पूर्ण दिवसात त्याने आपली सगळी कामे आवरून घेतली... अर्धवट गोष्टी पूर्ण केल्या, काही फाइल्स कंप्लीट करून बाजूला ठेवल्या...
जणू काही परतीची खात्रीच नव्हती... आणि दुसऱ्या दिवशी सकाळी... थोडेसे जुजबी सामान, त्याचा कॅमेरा, परवानाधारक बंदूक, आणि एक छोटीशी लाकडी पेटी... हे सगळे एका बॅग मध्ये भरून त्याने घराच्या बाहेर पाऊल टाकले...
घराचे दार बंद करून गेट बाहेर पाऊल टाकताना यशवर्धन क्षणभर थांबला... त्याने मागे वळून पाहिले..
आणि मग...
तो निघाला... किरदुर्गच्या दिशेने… जिथे निसर्ग सौंदर्याचा मुखवटा लेवून उभा होता... पण त्या झाडाझुडपांच्या सावलीत अन् काळोखाच्या गर्भात काहीतरी भयंकर शिजत होते... तिथे अंधार शांत नव्हता, तो भयाने गच्च भरलेला होता...
यशवर्धनने पांढऱ्या जिप्सीचा दरवाजा उघडला... सीटवर बसताच त्याने गुगल मॅपवर बोट फिरवली आणि नाव टाकले...
‘किरदुर्ग’...
क्षणार्धात स्क्रीनवर आकडा उमटला, ६०० किलोमीटर...
यशवर्धन राजे: एक गूढ व्यक्तिमत्त्व...
व्यवसायाने एक फ्रीलान्स रिपोर्टर, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात सामान्य पत्रकाराचा साधेपणा नसून एका योद्ध्याची शिस्त होती... उंच पुरा देह, तीक्ष्ण नजर असलेले टपोरे डोळे आणि चेहऱ्यावर कायमची वसलेली एक गूढ, गंभीर शांतता ही त्याच्या व्यक्तिमत्वाला अजूनच भारदस्त बनवत होती..
दैनंदिन धावपळीच्या आणि अनिश्चिततेच्या या क्षेत्रात असूनही, त्याने स्वत:च्या शरीराबाबत कधीही तडजोड केली नव्हती... काटेकोर आहारनियंत्रण आणि कठोर व्यायामाच्या जोरावर त्याने कमावलेला पिळदार, बांधेसूद बांधा पहिल्याच नजरेत कोणाचेही लक्ष वेधून घेई... एखाद्या नामांकित मॉडेललाही लाजवेल असे त्याचे बाह्यरूप असले, तरी त्या देखण्या चेहऱ्यामागे एक कसलेला आणि धाडसी वार्ताहर दडलेला होता, जो सत्याचा शोध घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास सज्ज असे...
त्याचे आई-वडील गावात राहत होते, पण यशवर्धन मात्र कामानिमित्त शहरात एकटाच... या एकाकीपणातच त्याच्या विचारांना धार येत गेली...
अत्यंत आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या यशवर्धनला लहानपणापासूनच धार्मिक आणि गूढ ग्रंथांची ओढ होती... वयाच्या लहानशा टप्प्यातच त्याने वेद, उपनिषदं, तंत्रग्रंथ आणि अगदी निषिद्ध समजले जाणारे ग्रंथही वाचून काढले.
जसजसा तो मोठा होत गेला, तसतसे त्याचे विचार अधिकच खोल, अधिकच भेदक होत गेले... त्याचा देवावर ठाम विश्वास होता… पण त्याचा तर्कही तितकाच धारदार होता...
“जर या पृथ्वीवर ईश्वरी चैतन्य आणि प्रकाश अस्तित्वात असेल, तर अंधाराचे अस्तित्व नाकारता येणार नाही. जिथे देव आहेत, तिथे भुते, अतृप्त शक्ती आणि अपशक्तीही असायलाच हव्यात.”
हा विचारच त्याच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन गेला.
फक्त विश्वास ठेवून थांबायचे नाही...
त्याने त्या अदृश्य शक्तींचा मागोवा घ्यायचे ठरवले...
संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून त्याने संशोधन सुरू केले...
ग्रंथांमागून ग्रंथ, मंत्रांमागून मंत्र…
आणि अखेरीस तो पोहोचला त्या मार्गावर..
जिथे सामान्य माणूस पाऊल ठेवायलाही घाबरतो...
मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने थेट हिमालय गाठला... तिथे एका अघोरी साधूंच्या मठात त्याने मोठ्या मुश्किलीने प्रवेश मिळविला...
अघोरी साधू…
साक्षात काळ्या शक्तींशी खेळणारे, समाजापासून खूप दूर, पण सत्याच्या अत्यंत जवळ असलेले...
महिनो महिने तो त्यांच्या सहवासात राहिला...
राखेने माखलेली शरीरे, मृत्यूची उपासना आणि भयालाही भय वाटेल अशा साधना...
त्यांच्यातीलच एका अघोरीने यशवर्धनमध्ये काहीतरी वेगळे असल्याचे ओळखले... त्याने त्याला शिष्य करून घेतले आणि काळ्या शक्तींना सामोरे जाण्याचे, त्यांच्याशी झुंज देण्याचे अनेक गूढ मार्ग शिकवले...
घनदाट जंगले, भयाण डोंगर, स्मशानभूमींच्या छायेत घालवलेले दिवस रात्र…
कधी मृत्यू अगदी जवळ येऊन परत गेला, पण त्याने कधी योजलेले लक्ष्य दूर जाऊ दिले नाही... तो कधीही मागे हटला नाही..
तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही काही काळ यशवर्धनने आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली... त्या काळात त्याने संयम, मौन आणि भयावर विजय मिळवण्याचे धडे गिरवले...
कालांतराने त्याचे स्वच्छंदी, अस्वस्थ मन पुन्हा शहराकडे ओढ घेऊ लागले होते... जणू अघोरींच्या सहवासात शिकलेले ज्ञान आता प्रत्यक्षात उतरवायची वेळ आलेली होती...
अखेरीस तो शहरात परतला...
आधीच मिळवलेल्या जर्नालिझमच्या पदवीमुळे त्याला एका नामांकित वृत्तपत्रात काम मिळाले...
पण यशवर्धनचा स्वभाव
स्वच्छंदी, निर्भीड आणि प्रश्न विचारणारा होता...
तो एका विशिष्ट चौकटीत अडकून राहू शकणार नव्हता... सत्तेला प्रश्न विचारणे, लपवलेली सत्ये बाहेर काढणे, आणि जे दिसत नाही तेही शोधण्याची त्याची वृत्ती…
यामुळे तो फार काळ नोकरीत टिकू शकला नाही.
आणि मग…
तो झाला खाजगी रिपोर्टर...
पण यशवर्धनसाठी पत्रकारिता म्हणजे फक्त एक काम नव्हते... त्याच्यासाठी ती होती सत्य शोधण्याची साधना... आपल्या कामासोबतच त्याने अध्यात्मिक कार्यही अखंड सुरू ठेवले...
जिथे-जिथे काळ्या शक्तींचा वास येई, जिथे लोक भीतीने भेदरलेले असत...
तिथे यशवर्धन उभा राहत असे... निर्भयपणे...
त्याने अनेक लोकांवर आलेले अमानवी संकट दूर केले, पण कधीच कोणाकडून मोबदला मागितला नाही... कारण पैशाला त्याच्या आयुष्यात कधीच महत्त्व नव्हते...
न मागता ही त्याला संपत्ती मिळत होती… आणि तीही तो उदार मनाने सामाजिक कार्यासाठी दान करत होता...
त्याच्या या शक्तीची तसेच कार्याची माहिती जवळपास त्याच्या सर्वच आप्तेष्टांना होती.. त्यामुळेच कदाचित सुधाकर ने त्याला किरदुर्ग मध्ये येण्याचे पाचारण केले होते..
आणि सुधाकरच्या आमंत्रनाला स्वीकारून यशवर्धन तातडीने निघाला होता..
क्रमशः...
©® लेखक: रूद्रदमन
8265077252

