झोपडी... -Jhopadi -Marathi horror story
©® लेखक: रूद्रदमन
8265077252आज जी कथा मी तुमच्या समोर सादर करत आहे... ही गोष्ट आहे शिवापूर गावाची..
ब्रिटिश काळा मध्ये गावा जवळून वाहणाऱ्या नदीवर मातीचे मोठे धरण बांधले गेले होते.. धरण क्षेत्रात येत असल्यामुळे गाव स्थलांतरीत करण्यात आले.. पहिल्या जागे पासून जवळच असलेल्या पडीक जमिनीवर गाव पुन्हा वसवले गेले होते.. त्याच गावातील ही एक घटना आहे..
नवीन गावा तून शहरात जायचे असेल तर धरणा वरून जावे लागत असे.. धरणा वरून दोन गाड्या जातील असा रस्ता होता..
धरण ओलांडले की एक किलोमीटर पडीक जमीन होती.. कायम च्या दलदली मुळे त्या परिसरात काटेरी झाडा चे जंगल माजले होते..... रस्त्याच्या कडेने काही जुनी झाडे होती... तो जुन्या गावाच्या बाजूचा परिसर होता.. ते काटवन ओलांडले की लगेच स्टेट हायवे लागत होता.. तिथून शहर फक्त तीन किलोमीटर होते....
"अहो उठा आता, दिवस उजाडला आहे केव्हाच.. तुम्हाला आज गहू घेऊन मार्केट ला जायचय.." समाधानची बायको त्याला हलवत बोलत होती..
रात्री उशिरा पर्यंत कांद्याला पाणी भरून आलेला समाधान,"थांब उठतो ग, तसाही धान्याचा लिलाव पार एक वाजता सुरू होतो.."
म्हणत परत अंगावर गोदढी ओढून झोपला होता..
"कालच सोनू च्या शाळेतून निरोप आला आहे, परवा पर्यंत फी भरा नाही तर सोनूला परीक्षेला नाही बसू देणार, एव्हढे लक्षात ठेवा फक्त," म्हणत समाधान ची बायको घर कामात मग्न झाली..
सूर्य बराच वर आल्यावर समाधान ने उठून सकाळचे कार्यक्रम उरकून घेतले.. आणि चहा घेत, " स्वयंपाक आवर पटकन अजून गाडीत गोण्या टाकायच्या आहेत.. मी बैलांना अजून एक वैरण टाकून येतो." असे म्हणत गोठया कडे निघून गेला..
बरोबर दहा वाजता न्याहारी करून समाधान शहराच्या दिशेने धाण्याने भरलेली बैलगाडी घेऊन निघायच्या तयारीतच होता, की समोरून जाणारा एक टमटम वाला त्याला बघून म्हणाला," कोणत्या तरी व्यापाऱ्याच्या घरी मयत झाले आहे.. मार्केट सकाळी बंद आहे, दुपारी चार नंतर सुरू होईल.. आता जाऊन काही फायदा नाही उगाच अडकून पडशील.."
शहर काही जास्त दूर नव्हते.. मोजून सहा किलोमीटर चा रस्ता.. धरण ओलांडले की चार किलोमीटर.. दुपारून जायचे निश्चित करून त्याने बैल सोडले...
दुपारी तीन च्या दरम्यान त्याने गाडी गळा घातली आणि निघाला.. चार च्या आस पास तो मार्केट ला पोहोचला.. मार्केट पूर्ण भरलेले होते.. मुंगी घुसायला जागा शिल्लक नव्हती.... सकाळी बंद चा परिणाम..
बैलगाडीच्या लाईनीत सर्वात शेवटी कशी तरी जागा करून त्याने गाडी लावली.... बैलं सोडून गाडीत बरोबर आणलेली वैरण बैलांना टाकली आणि लिलाव काय संध्याकाळ शिवाय येत नाही म्हणून घोंगडी आंथरून गाडी खालीच पडला..
लिलाव त्याच्या गाडी पर्यंत येण्यात संध्याकाळ झाली.. भाव पण चांगला भेटला म्हणून तो खूश होता.. व्यापाऱ्याला माल मोजून द्यायला आणि पैसे घ्यायला नऊ वाजले होते... पैसे आणि सोनू साठी खायला घेऊन त्याने बैलांना गावाच्या दिशेला हाकले... मार्केट च्या बाहेर आल्यावर अंधार अजूनच जाणवू लागला होता.. बैलांना रस्ता ओळखीचा असल्या मुळे अंधारात ही ते त्यांच्या गतीने पळत होते.. त्या शांत वातावरणात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज चहुदिशेला जात होता...
"अजून चंद्र कसा निघाला नाही" , स्वतःशीच बोलत आजूबाजूला बघत समाधान लवकरात लवकर घरी पोहोचण्या साठी बैलांना अजून हाकायला लागला.. म्हणता म्हणता हाइवे संपला आणि सवयी प्रमाणे बैल काट वणा मधल्या रस्त्याला लागले होते..
"सोनू मी खायला घेऊन येईल ही वाट बघत जागीच असल, ती झोपण्याच्या आत घरी पोहोचले पाहिजे" याच विचारात तो गाडी हाकत होता.. काटवनाचा अर्धा रस्ता त्याने पार केला होता तेव्हढ्यात बैल कशाला तरी दचकले आणि जागेवर थांबले.. काही साप वगैरे असेल असा विचार करून त्याने परत बैलांना दटवण्याचा प्रयत्न केला.. पण बैल काही हालत नव्हते.. पुढे जू धरून त्यांना पुढे ओढण्यासाठी तो खाली उतरला आणि गाडीच्या पुढच्या बाजूला निघाला. तोच त्याची नजर.. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा जवळ गेली.. तिथे एक जुनाट झोपडी सारखे काही तरी दिसत होते..
" अरे ही झोपडी इथे कधी उभी राहिली.. माझ्या पाहण्यात तर इथे कधीच झोपडी नाही आली" स्वतः शिच बोलत त्याने अजून निरखून बघितले... तर त्याला झोपडी च्या शेजारी कोणी तरी बसलेले दिसले... कोण आहे हे बघण्यासाठी तो अजून थोडासा पुढे गेला.. त्याने बघितले की ती एक म्हातारी असल्यासारखी दिसत होती..अंधार खूप असल्यामुळे तिचा चेहेरा दिसत नव्हता.. फक्त खाली बसून गुढग्यावर हनुवटी टेकवून ती तिचे लालसर डोळे त्याच्यावरच रोखून बघत होती.. तेव्हढ्यात धरणाच्या दिशेने एक मरतुकडे कुत्रे धावत आले आणि त्या झोपडी कडे बघून भयंकर भुंकायला लागले होते... समाधान च्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती..तो गाडीच्या पुढे गेला आणि बैलांना ओढू लागला.. मालक पुढे आल्याने बैलांना धीर आला ते पण चालू लागले.. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज अजूनच वाढला होता.. त्याचे मन अस्वस्थ झाले होते.. त्याला लवकरात लवकर तिथून दूर जायचे होते.. ती म्हातारी आणि झोपडी ओलांडून थोडा पुढे गेल्यावर त्याला हायसे वाटले.. पण त्याचे ते समाधान जास्त वेळ टिकले नाही.. पुढच्या क्षणात त्याला त्याच्या मागे पाय खरकत कोणी तरी चालत असल्याचा आवाज यायला लागला.. त्याची जवळ पास बोबडीच वळली होती..त्याचे हृदय जोरात धडधडत होते, आता त्याच्या पावलांचा वेग वाढला होता...
"थांब, मागे ये.. इथे माझ्या समोर." मागून ती म्हातारी घोगऱ्या आवाजात त्याला म्हणाली .. तिचा आवाज इतका थंड होता की समाधान च्या अंगावर काटा आला होता.. त्याचे पाय जागेवरच थिजले.. प्रयत्न करून ही तो पुढे जाऊ शकत नव्हता..
" कोण आहे तू नक्की आणि इथे काय करते आहेस?" समाधान मोठ्या मेहनतीने उसने आवसान आणत बोलला..
"कळेल सर्व कळेल, मागे बघ, इकडे ये, तू कितीही प्रयत्न केला तरी पुढे जाऊ शकत नाही." त्या म्हातारीने त्याला आदेश वजा सूचना केली होती....
समाधान कडे इतर कोणताच पर्याय नसल्याने बैलांच्या समोरून बाजूला होत तो मागे जाण्यासाठी वळला.. म्हातारी बैलगाडीच्या अगदी मागेच उभी होती..पाठीवर कुबड निघालेली ती म्हातारी वाकून भयानक नजरेने त्याच्या कडे बघत होती.. तिचे केस पूर्णपणे पांढरे होते, चेहेऱ्यावरील त्वचा थेट हाडांना चिकटलेली होती.. तिच्या चेहऱ्यावर असलेले भयानक भाव तिच्यातील अमानवी अस्तित्वाचे संकेत देत होते. तिच्या लालसर डोळ्यांतून एक प्रकारची क्रूरता आणि भय व्यक्त होत होते. तिने एक जीर्ण, फाटलेली साडी घातलेली होती.. तिच्या हातात एक मोठी लाकडी काठी होती.. जिच्यावर बरेच नक्षीकाम केले ले दिसत होते.. तिच्या भोवती पसरलेला धूर तिच्या अस्तित्वाचे भयानक रूप आणखी ठळक करत होता.
समाधान ची दातखिळी बसते की काय अशी परिस्थिती झाली होती.. इकडे बैल गाडी घेऊन गावाकडे पसार झाले होते.. तो घाबऱ्या नजरेने बैलगाडी गेलेल्या दिशेला बघत, इच्छा नसताना ही तिच्या समोर जाऊन उभा होता..
"विकले का धान्य?" ती घोगऱ्या आवाजात बोलली.. बोलता बोलता तिच्या तोंडातून लाळ उडून समाधानच्या चेहऱ्यापर्यंत आली होती..
ती हाताने पुसत तो कसा बसा बोलला,"होय विकले, मला घरी जाऊ दे माझी मुलगी माझी वाट पाहत असेल, अगोदरच मला खूप उशीर झाला आहे....."
"तुझे घर?" म्हातारीने हसत विचारले. त्या हसण्यात एक छद्मीपना होता.."तू तिथे परत कधीच जाणार नाहीस. आता तू कायम इथेच राहणार माझ्यासारखाच..."
समाधानला असे वाटले जणू त्याचे पाय जमिनीला घट्ट बांधले गेले आहेत. "मला जाऊ दे," त्याने विनवणी केली. "मला माझ्या कुटुंबाकडे जायचे आहे, तू आहेस कोण आणि मी काय केले आहे तुझे..."
त्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत म्हातारीने त्याचा हात पकडला आणि त्याला झोपडी कडे घेऊन निघाली...
"खूप दशकानंतर आज ही रात्र आली आहे.. तुला माझ्या देवानेच पाठवले आहे माझ्या सुटके साठी.. आता फक्त थोडा च वेळ, माझी जागा तू घेणार आणि मग मी मुक्त होवून अमर होणार.." म्हातारी चालता चालता भेसूर हास्य करत बोलत होती..
समाधान भीतीने गोठून गेला होता.. आजूबाजूला काळोख आणखी गडद झाला होता. पण त्याला म्हातारीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. "मला सोड मी तुझ्या पाया पडतो." असे म्हणत समाधान ने हाताला हिसका देत मागे पळायचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जड झाले होते. तो धावण्याचा प्रयत्न करत होता, पण जणू त्याच्या पायात बेड्या पडल्या होत्या. त्याच वेळी त्याच्या मनात त्याच्या कुटुंबाची आठवण आली. त्याच्या मुलीचा गोड हसरा चेहरा, त्याच्या बायकोचे प्रेमळ हास्य... हे सर्व तो गमावनार होता...
"नाही, नाही!" तो हताश होऊन ओरडत राहिला, पण त्या म्हातारीच्या हसण्याच्या आवाजा पुढे त्याचा आवाज दाबून गेला होता..
ते आता झोपडीच्या समोर पोहोचले होते.. ती तसाच हात पकडुन त्याला ओढत झोपडीत शिरली, तिला कुबड असल्यामुळे ती विनासायास मध्ये गेली.. पण झोपडीच्या वरचा भाग समाधान च्या डोक्याला फटकन लागला होता.. तो त्या फटक्याने कळवळला....
झोपडीत प्रवेश करताच समाधानच्या हृदयाची धडधड वेगाने वाढू लागली होती. झोपडीच्या आतला अंधार त्याच्या भोवतालचा काळोख अधिक गडद करत होता. त्या अमानवी काळोखाला डोळे सरावले तेव्हा त्याने आजूबाजूला बघितले.. ती जुनी, पडीक झोपडी होती, जिच्या भिंतींवर शेवाळ पसरलेले होते आणि तिथे एक विचित्र उग्र वास पसरलेला होता, जो ओली माती आणि कुजलेल्या झाडांच्या मिश्रणासारखा होता.
"समोर बस इथे, आता तुझ्या आयुष्याची खरी सुरवात होणार आहे.. इतके दिवस मनुष्याचे व्यर्थ जिने जगलास.. इतके आयुष्य फुकट खर्ची घातले, आता तुझे नशीब पालटले आहे . आता तू अंधाराच्या राजाचा उपासक होणार आहेस.. तुला आता इथून पुढे इथेच राहून याला खुश ठेवायचे आहे.. हा जर तुझ्यावर खुश झाला तर.. परत तुझ्या सारखेच कोणाला तरी पाठवून देईल.. आणि मग तू पण माझ्यासरखा मुक्त होशील कायम स्वरुपी अमर होऊन.." म्हातारीने बोलत बोलत एका मूर्ती वरून कपडा हटवला आणि जोर जोरात हसायला लागली..
समाधान ने पाहिले, समोर एक जुनी काळया पाषाणात कोरलेली मूर्ती ठेवलेली होती. मूर्तीचे डोळे जणू काही थेट त्याच्यावरच रोखले होते, ती एक भयानक दृष्टि ने पाहणारी शैतानाची मूर्ती होती.. जिचे दात धारदार आणि चेहरा विकृत होता. त्या मूर्तीच्या भोवती विळखा मारून बसलेले साप दिसत होते, आणि तिच्या खाली रक्ताचे थिजलेले थारोळे जमा झालेले होते.
मूर्ती बघून समाधान ची पाचावर धारण बसली..
त्याने म्हातारी कडे बघितले..
म्हातारीच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा वेडेपणा झलक होती. ती अजूनही तेच भेसूर हसत होती, जणू तिच्या चेहऱ्यावरून एक भयानक सत्य प्रकट होत होते.
समाधान डोके गच्च पकडुन बसला , त्याला अजूनही वाटत होते की हे स्वप्न असावे... म्हातारीने तिच्या हातातील काठी त्या मूर्ती समोर ठेवली.. आणि एक हात त्याला लावत आणि दुसरा हात मूर्तीला लावत मंत्र म्हणायला सुरुवात केली होती ...तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दांत एक दुष्ट जादू दडलेली होती. झोपडीतील वातावरण थंडगार झाले होते, इतके की समाधानच्या अंगावर काटा आला होता. एका क्षणी म्हातारीचा आवाज अजून वाढला, तिने हात आकाशात उंचावले, आणि तेव्हा एक विचित्र प्रकाश मूर्तीभोवती दिसू लागला होता. झोपडीच्या कोपऱ्यां मध्ये इतका वेळ लपून बसलेल्या काळ्या सावल्या आता त्याच्या भोवती नाचू लागल्या होत्या..
त्याला थोडे थोडे समजत होते की आता जे काही म्हातारी करत आहे, ते सर्व त्याला इथे अडकवण्यासाठी होते.. पण मनात असूनही तो तिथून हालु शकत नव्हता..
म्हातारीचे मंत्र पठण चालू होते..
तेवढ्यात त्या मंत्रांच्या आवाजात हाकांचा आवाज यायला लागला.. हाका ऐकून समाधान ला शंका आली होती , कदाचित बैलगाडी रिकामी आलेली बघून सोनू च्या आई ने कोणाला तरी शोधायला पाठवले असेल.. म्हातारीने पण तो आवाज ऐकला होता.. तिने मंत्रांचा वेग वाढविला.... एक वेळ अशी आली की हाकांचा आवाज अगदी झोपडी जवळ आल्या सारखा वाटला.. आणि त्याच वेळी म्हातारीने मंत्र थांबवून समाधान ला खर्जातील आवाजात आदेश दिला,"उचल ती काठी.. आणि हो या अंधाराचा राजा.." बोलतांना तिच्या डोळ्यांतील क्रौर्य आणि खूनशीपणा स्पष्ट दिसत होता.
समाधान ला कळले होते की हा म्हातारीच्या विधी चा शेवटचा अंक होता.. एकदा का आपण ती काठी उचलली की सर्व संपणार होते.. तो उठायचा प्रयत्न करू लागला .. पण त्या म्हातारीची शक्ती त्याला उठू देत नव्हती.. समाधान चे हात हळूहळू काठीच्या दिशेने सरकू लागले होते, त्याचे त्यावर काहीच नियंत्रण राहिले नव्हते. त्याचे मन विरोध करण्याचा प्रयत्न करत होते.. त्यामुळे त्याच्या शरीरात अनपेक्षित थरकाप जाणवू लागला होता.. त्याच्या हाताच्या बोटांनी त्या काठीला स्पर्श करायचा अवकाश आणि धाडकन आवाज आला.. झोपडीची चौकट कसल्या तरी तीव्र धडकेने कोसळली होती.. झोपडी ने बाहेरून पेट घेतला होता.. त्यामुळे म्हातारीचे लक्ष विचलित झाले, तिची समाधान वरची पकड ढील्ली झाली.. त्याचा फायदा घेऊन समाधान उठून बाहेर पळाला..
काय घडले हे लक्षात आल्यावर म्हातारीने एक भेसूर किंचाळी मारली आणि ती समाधान ला पकडण्यासाठी धावली, क्षणात झोपडी ने भीषण पेट घेतला.. म्हातारी आगीच्या पलीकडे जाऊ शकत नव्हती..
समाधान तो पर्यंत त्याला शोधण्यास आलेल्या गावातील लोकां पर्यंत पोहोचला होता..
झोपडी पूर्णपणे आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली होती. समाधानच्या डोळ्यासमोरच ती म्हातारी अक्राळविक्राळ रूप धारण करत आगीच्या ज्वाळां मध्ये जळू लागली होती. तिच्या किंचाळण्याचा भयानक आवाज वातावरणाला भेदत होता, पण आता ती काहीच करू शकत नव्हती. समाधानची धडधड वाढली होती.. तो थरथरत्या हातांनी त्याच्या गावातील माणसांचा आधार घेत उभा होता...
"हे सगळे काय होते?" गावातील लोक घाबरलेल्या आवाजात विचारत होते..
समाधान ला स्वतःलाच त्या विषयी काहीच माहीत नव्हते.. तो थरथरत ढिम्म पने उभा होता .
समाधान कशाचाही उलगडा करू शकत नसला तरी तो जिवंत होता, हाच सर्वांसाठी मोठा दिलासा होता. त्याच्या डोळ्यासमोर अजूनही त्या म्हातारीची भयानक छबी, ती ज्वालामय झोपडी आणि अंधारात गडद झालेला काळोख होता..
ते नक्की काय होते? कुठून आले होते? आणि कुठे गेले? हे तिथे उपस्थित कोणालाच माहीत नव्हते.. ते समाधान वाचल्याच्या आनंदात त्याला घेऊन गावात आले..
रात्री घडलेली घटना सकाळी गावभर पसरली.. सर्व गाव काटवनात आता हे काय घातकी उपजले आहे म्हणून घाबरून गेले होते... सगळी कडे त्याचीच चर्चा सुरू होती.. कोणाला काहीच माहीत नव्हते...
त्या दिवसा पासून गावकऱ्यांचे रात्रीचे त्या रस्त्याने येणे जाणे पूर्ण बंद झाले....

