Marathi horror story -Kasara Ghat,Maharashtra

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला... दिवसा निसर्गसौंदर्याने नटलेला कसारा घाट... रात्रीच्या वेळी मात्र एखाद्या अजस्त्र अजगरा समान भासतो...
संपूर्ण आयुष्यात एकदाच अनुभवलेली ती रात्र आठवली की आज पण माझ्या मनात धडकी भरते..
शुक्रवारचा संपूर्ण दिवस ऑफिसच्या कामात घालवल्यानंतर, शनिवार आणि रविवार गोव्यात मनसोक्त आनंद लुटण्याचे आम्ही निश्चित केले होते.... रात्रीचा प्रवास करून पहाटेपर्यंत गोव्यात पोहोचलो, तर मजामस्तीसाठी पूर्ण दोन दिवस आणि एक रात्र मिळणार होती.... सर्व मित्र गोळा होता होता रात्रीचे दहा वाजून गेले... ट्रिप साठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी आटोपल्यानंतर, मी, राजेश, किरण आणि संदेश हे आम्ही चार जिवलग मित्र ३१ डिसेंबरचा उत्सव गोव्यात साजरा करण्याच्या इराद्याने टाटा नेक्सॉन मधून गोव्याच्या दिशेने रवाना झालो...
आकाशात ढगांची दाटी झालेली होती, त्यामुळे चंद्राचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता...
आम्ही गोव्याच्या स्वप्नात दंग होतो.. गाडीच्या काचा बंद होत्या, आत गाणी सुरू होती आणि बाहेर घनघोर अंधार आपले साम्राज्य पसरवत होता...
गाडीचे Steering माझ्या हातात होते... रात्रीचे बारा होते.. आणि आम्ही इगतपुरी मागे टाकून घाटाच्या त्या सर्पाकृती वळणांना भिडलो... तो रस्ता म्हणजे जणू मृत्यूशी चाललेला लपाछपीचा खेळच...
डाव्या हाताला आकाशाला भिडणारे अक्राळविक्राळ पहाड आणि उजव्या बाजूला काळजाचा ठोका चुकवणारी पाताळा पर्यंत जाणारी खोल दरी...
एक गोष्ट मात्र मनाला अस्वस्थ करत होती.. घाटातील तो संपूर्ण रस्ता धुक्याच्या एका गूढ, धूसर आणि थंडगार आच्छादनाने वेढलेला होता... ते धुके केवळ निसर्गाचा भाग वाटत नव्हते, तर जणू एखाद्या अमानवी शक्तीने संपूर्ण परिसराला कवेत घेण्यासाठी पसरवलेले जाळे भासत होते...
हेडलाईटचा प्रकाश त्या धुक्याला छेदत वेगाने पुढे सरकत होता..
आम्ही अर्ध्याहून अधिक घाट ओलांडला असेल..
अचानक, एका तीव्र वळणावर गाडीच्या मागच्या बाजूला एक आवाज झाला आणि गाडी एकाएकी व्हायबल झाली....
स्टिअरिंग माझ्या हातातून निसटता निसटता राहिले...
"अरे बापरे! काय झालं?" संदेश ओरडला...
"काही नाही, टायर बर्स्ट झालंय वाटतं," मी वैतागून म्हणालो...
मी अत्यंत सावधगिरीने गाडी रस्त्याच्या डाव्या कडेला उभी केली. मध्यरात्रीचे साडेबारा वाजून गेले होते... गाडीतून खाली उतरताच आजूबाजूचा निबीड अंधार आणि रातकिड्यांचा कर्कश आवाज जणू अंगावर धावून येत असल्याचा भास होऊ लागला... वातावरणात एक अनामिक भीती दाटलेली होती... दरम्यान, टायर बदलण्यासाठी माझ्या तिन्ही मित्रांनी पुढाकार घेतला आणि ते कामाला लागले...
"ठीक आहे, तुम्ही बघा टायरचं... माझं डोकं फिरलंय," मी म्हणालो...
ट्रिपच्या सुरुवातीलाच असे काही घडल्यामुळे मी चिडलो होतो... मला कशाची तरी ओढ लागली होती....
डिकीमधून मी व्हिस्कीची बाटली आणि ग्लास बाहेर काढला...
मी गाडीपासून काही अंतरावर, रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दरीच्या जुन्या दगडी कठड्यावर जाऊन विसावलो... सभोवताली अथांग काळाकुट्ट अंधार साम्राज्य पसरवून होता... माझ्या अगदी लगत हजारो फूट खोल दरी आ वासून उभी होती.. तिथून येणारा वाऱ्याचा सुसाट आवाज एखाद्या रडणाऱ्या स्त्रीच्या आक्रोशासारखा भासत होता... चंद्र पूर्णपणे ढगांच्या आड दडल्यामुळे दृष्टीपथात काहीच येत नव्हते...
मी पुन्हा गाडीच्या दिशेने नजर वळवली... पार्किंग लाईटचा तो मंद प्रकाश आजूबाजूला पसरलेल्या दाट धुक्याला अधिकच रहस्यमय बनवत होता... गाडीच्या मागील बाजूस मोबाईलच्या प्रकाशात त्या तिघांची टायर बदलण्याची घाई सुरू होती... त्यांच्या हसण्या खिदळण्याचे आवाज शांतता भेदत माझ्या कानावर पडत होते...
अंगाला टोचणारा गार वारा झोंबू लागला, तसे मी बाटलीचे टोपण उघडले.... स्कॉचचा तो हवाहवासा वाटणारा सुगंध वातावरणात दरवळला.... मी घाईघाईने पहिला पेग तयार करून त्याचा एक घोट घेतला.... दारूचा तो घोट घशाखाली उतरताच शरीरात उबदारपणा जाणवू लागला आणि मनाला थोडा आधार मिळाला... एक एक घोट घेत मी सभोवतालचा कानोसा घेऊ लागलो.... मधूनच एखादा अवजड ट्रक रस्त्यावरून धडधडत निघून जात होता, मात्र तो गेल्यानंतर पुन्हा तोच भयाण सन्नाटा सर्वत्र पसरत होता....
पाहता पाहता मी दुसरा पेग संपवून तिसरा भरला... इतक्यात दरीच्या बाजूने खालून काहीतरी आवाज आल्याचा मला भास झाला.... मी लगेच मोबाईलचा फ्लॅश सुरू करून त्या दिशेने प्रकाश टाकला, परंतु त्या अंधुक प्रकाशात काहीच दिसणे शक्य नव्हते.... कदाचित निसर्गानेच माझ्या मनातील अस्वस्थता ओळखली असावी... कारण त्याच क्षणी चंद्राला झाकणाऱ्या ढगांनी आपली जागा सोडली आणि चंद्र पुन्हा लख्ख प्रकाशाने उजळून निघाला...
त्या शीतल चांदण्यात आता खालील दरी स्पष्ट दिसू लागली होती. तिथे फक्त दाट झाडी पसरलेली होती.... मी वाकून खाली नीट न्याहाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात अचानक कोणातरी माझ्या खांद्यावर हात ठेवला...
मी दचकून मागे पाहिले, तर तो राजेश होता....
"काय रे, आटोपलं का काम?" मी स्वतःला सावरत हातातील ग्लास एका घोटात रिकामा केला आणि बाजूला ठेवत त्याला विचारले...
"चाललंय त्यांचं काम... मलाही मद्यपानाची तीव्र इच्छा झाली, म्हणून तुझ्याकडे आलो," तो माझ्या शेजारी बसला. त्याचा आवाज विलक्षण जड आणि थकलेला वाटत होता...
"काय? मद्यपानाची इच्छा झाली? हा हा हा... कुठून सुचतात तुला असे शब्द? अन् असा धापा का टाकतोयस? एका टायरच्या कामातच दमलास की काय?" टायरचे नट काढताना तो थकला असावा, असा तर्क करून मी हसत हसत त्याला विचारले...
"हम्म्म... लवकर एक पेग बनवून दे, घशाला कोरड पडली आहे," तो अतिशय कोरड्या आवाजात म्हणाला...
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत आम्हा दोघांसाठी एकेक पेग तयार केला. त्याने समोरचा पेग एका दमात रिकामा केला...
"अजून एक..." रिकामा ग्लास पुढे करत तो म्हणाला...
दुसरा पेग हातात घेताना त्याने चुकूनही माझ्या नजरेला नजर दिली नाही... ग्लास घेताना जेव्हा आमचे हात एकमेकांना स्पर्शले, तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आला... त्याचे हात बर्फासारखे थंडगार पडले होते.. तो एकटक दरीतील त्या गडद अंधाराकडे न्याहाळत होता... दरम्यान, चंद्राला ढगांनी पुन्हा एकदा आपल्या दाट आच्छादनाखाली घेतले होते... नशेत मी त्याच्या या विचित्र वागण्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही...
माझे चार पेग होत आले होते, त्याचे दोन....
अचानक गाडीकडून संदेशचा आवाज आला, "अरे निघायचं का? झालंय काम"
"चल राजेश... निघू आता.. उद्या आणि परवा गोव्यात हेच करायचे आहे.." बोलत मी चौथा पेग संपवून सर्व लवाजमा उचलला...
राजेश मात्र हातात रिकामा ग्लास पकडून दरीकडे बघत तिथेच बसून होता...
"राजेश आवर पटकन... गाडी तुलाच चालवायची आहे.. माझे चार पेग झालेत त्यामुळे मी आता मस्त झोपणार आहे.." बोलत मी त्याला गाडीकडे लवकर येण्याची खूण केली आणि स्वतः गाडीपाशी आलो...
किरण आणि संदेश मागच्या सीट वर बसून आमच्या येण्याचीच वाट बघत होते...
मी पुढच्या सीट वर जाऊन बसलो...
गाडीच्या आजूबाजूला धुके वाढायला लागले होते.. मी डोळे बंद करून डोके मागच्या बाजूला टेकवले आणि राजेशची वाट बघत पडून राहिलो..
"राजेश ची कशी मजा आली ना.. घोड्यावर बसवून सगळे काम त्याच्याकडूनच करून घेतले.." मागे दोघे जण एकमेकांच्या हातावर टाळ्या देत बोलत होते..
दोन मिनिट झाले असतील..
"राजेश ला आवाज द्या रे.. अजून का येत नाहीय.. एक तर आजूबाजूला सगळीकडे धुके दाटून आले आहे..काहीच दिसत नाहीय..." मी वैतागत बोललो...
"येईल रे लघवीला गेला आहे तो... त्याला घोड्यावर चढवून त्याची चांगली हौस केली आम्ही.." संदेश म्हणाला आणि किरण कडे बघत दात काढू लागला..
तेवढ्यात माझ्या शेजारच्या खिडकीवर टकटक झाली... बाहेर राजेश उभा होता...
"काय रे, तू नाही चालवणार का गाडी?" राजेशने विचारले...
"नाही रे, मला चढलीये थोडी... तुला बोललो होतो ना कि तूच बस ड्रायव्हिंगला," मी त्याच्याकडे बघत बोललो...
राजेश ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि त्याने गाडी सुरू केली...
थोड्याच वेळात आम्ही घाट उतरून खाली आलो, समोर काही अंतरावरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती...
चेकपोस्टवर पोलीस प्रत्येक गाडी थांबवून ब्रीथ अनालायझर ने तपासणी करत होते...
माझे धाबे दणाणले...
"राजेश, आता आपण गेलो.. चांगलाच फाईन लागणार आहे आज... मी तर फुल आहेच आणि तू पण दोन लार्ज पेग मारलेत.. त्यात मागच्या एकालाही गाडी चालवता येत नाही.. " मी घाबरून त्याला म्हणालो...
राजेशने माझ्याकडे वळून एक विचित्र स्मितहास्य केले...
त्याचे डोळे एकदम स्थिर होते...
"तू झोप आता.. तुला खरंच जास्त झाली आहे.." तो माझ्याकडे बघत म्हणाला..
तेवढ्यात गाडी बे्रिकेट्स जवळ पोहोचली होती...
पोलीस जवळ आले...
एका हवालदाराने राजेशच्या तोंडासमोर मशीन पकडले...
"फुंका यात," तो जरा कडक आवाजात बोलला...
राजेशने मशीनमध्ये जोरात फुंकर मारली... मी श्वास रोखून धरला होता....
पण मशीनवर 0.00 रीडिंग आले.... हवालदाराने तीच कृती मशीन बदलून अजून दोनदा करण्यास सांगितले.. पण प्रत्येक वेळी रीडिंग झीरो च येत होते...
"आयला, मुलं मुलं निघालात.. काच खाली केल्या केल्या आतून दारूचा वास आला पण ड्राइवर मात्र नील... अरे अभिमन्यू कुठे या कौरवामध्ये अडकला आहेस..पुढे जाऊन तू पण पिऊ नकोस.. सगळीकडेच चेकिंग सुरू आहे..." पोलीस हवालदार राजेश कडे बघत हसत हसत बोलला आणि त्याने आम्हाला जाण्याची खूण केली...
गाडी थोडी पुढे गेल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण माझ्या डोक्यात चक्रावून टाकणारे विचार सुरू झाले...
"काय कमाल आहे... राजेश, तू आत्ता माझ्यासोबत बसून दोन लार्ज पेग प्यायलास, तरी मशीनमध्ये कसं काय आलं नाही? माझी तर आपण ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये पकडले जाणार या भीतीनेच उतरून गेली होती.." मी विचारले..
गाडीत शांतता पसरली. राजेशने गाडी अचानक रस्त्याच्या कडेला थांबवली... त्याने माझ्याकडे बघितले, त्याचा चेहरा पांढरा पडला होता..
"काय बोलतोयस तू? मी कधी पिलो तुझ्या बरोबर?" राजेशने विचारले...
माझे डोके सुन्न झाले होते...
"अरे, असे काय विचारतो आहेस... टायर बदलताना तू आला होतास ना माझ्याकडे कठड्यावर? आपण दोघं सोबत प्यायलो.."
माझे बोलणे ऐकून मागे बसलेले किरण आणि संदेशही चमकले....
संदेश ओरडला, "वेडा झालास का? आम्ही तिघे पण टायर बदलत होतो... राजेश आमच्यासोबतच होता.... खरे तर तोच टायर बदलत होता.. आम्ही फक्त उभे होतो.... त्यामुळे तो एकदाही गाडीपासून लांब जाण्याचा प्रश्नच नाही.."
"तुम्ही तिघे मिळून माझी टिंगल करत आहात का?" मी त्यांच्या वर चिडत विचारले...
"नाही रे.. खरंच सांगत आहोत.. तू बाटली घेऊन गेला आणि आम्ही राजेश ला तो कसा गाडी चालवण्यात तुझ्या पेक्षा जास्त हुशार आहे असे म्हणून हरभऱ्याच्या झाडावर बसवले... तेव्हा त्यानेच टायर बदलले.. आम्ही फक्त त्याला जे हवे ते देत होतो.." किरण दात काढत म्हणाला..
माझ्या पायाखालची जमीन सरकली... शरीरातून एक थंड लहर धावून गेली.... जर राजेश माझ्यासोबत नव्हता, तर मग तो कोण होता? तो हुबेहूब राजेशसारखाच दिसत होता, त्याचे कपडे, त्याची शरीरयष्टी... पण त्याचे हात बर्फासारखे गार होते...
मी ज्याला दारू पाजत होतो, जो माझ्या शेजारी बसून दरीकडे बघत होता, तो राजेश नव्हता... मग तो कोण होता? घाटातल्या त्या भीषण काळोखात माझ्यासोबत बसून कोणीतरी दुसरेच दारू पित होते....
खरेतर विचाराने माझे डोके सुन्न झाले होते.. मी राजेश ला निघण्याची खुण केली.. तिघेही मला जरा जास्तच झाली या आविर्भावात एकमेकांना टाळ्या देऊन हसत होते..
गाडी वेगाने गोव्याच्या दिशेने निघाली होती..
मी घाबरून मागे वळून पाहिले.. ज्या घाटातून आम्ही खाली आलो होतो, तिथे फक्त दाट धुके आणि भयाण शांतता होती...
त्या रात्री कसारा घाटाने मला त्याच्या एका अतृप्त रहिवाशाची ओळख करून दिली होती...
समाप्त...
©® लेखक: रूद्रदमन
