नमस्कार

#राखण….
लग्न झाल्यावर काही वर्षातच तिचा नवरा मेला… पदरात 3 मुलं… ती खूप खमकी…. माहेरी गेली नाही की कुणासमोर हात पसरले नाहीत….ती तिच्या मुलांच्या भवितव्यासाठी राब राब राबली…पडेल ते काम केले… तिने पै पै साठवला… घर बांधल… घरामागची मोठी जागा विकत घेऊन आमराई केली…मुलांना चांगल शिक्षण दिले… मुलं मोठी होत होती…पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेली… आणि तिकडचीच झाली…. ती खमकी असल्यामुळे एकटी त्या गावात काबाड कष्ट करत राहिली… बरीच संपत्ती साठवली… भरपूर सोन केलं……. जेव्हा परिस्थिती न्हवती तेव्हा खूप मन मारून जगली होती…. त्यामुळे जेव्हा परिस्थिती पालटली तेव्हा तिने स्वतःच्या हौसेसाठी पैसा खर्च केला… चांगल्या भारीतल्या जरी काठाच्या साड्या घेतल्या….. सोन्याने स्वतः ला मढवून घेतलं…. ती कायम अंगावर जरी काठाची भारी साडी आणि अंगावर सोन्याचे दागिने….घालून असायची…. मुलांना आईच्या सोन्या बद्दल आधीच माहिती होती…. आणि जागेच्या वाढत्या किमती बद्दल त्यांना कल्पना होतीच…. आईचे सर्व सोन… आमराई ची जागा…हे सर्व विकून ते रातोरात मालामाल व्हायची स्वप्ने बघत होते…..आईच वय झालाय.. ती कधी पण स्वर्गवासी होईल त्या आधी वाटणी करून घेऊ असा विचार करून तिन्ही मुलं गावाकडे आली… एकाने पण तिच्या तब्येतीची चौकशी केली नाही किंवा चार दिवस माझ्या कडे राहायला ये म्हणून बोलावले नाही… तिला मुलांचे वागणे समजले… मोठया मुलाने तर वाटाघाटिचेच बोलणे चालू केले… तीला समजलं मुलं प्रेमा पोटी नाही तर संप्पतीच्या हव्यासा पोटी इथं आली आहेत… त्या दिवसापासून पूर्ण ठरवलं की जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या एकाही स्वार्थी मुलाला आपली संपत्ती द्यायची नाही,.. मुलांना त्यांची व्यवस्थित लायकी दाखवून तिने घराबाहेर काढले… माझ्या कष्टाची संपत्ती माझ्या मरणानंतर तुमचीच होती… पण तुम्ही तर मला जिवंतपणीच मारायला निघालाय… एकाला पण आईची काळजी वाटली नाही की आईसाठी प्रेम वाटलं नाही… इकडे आलात ते सुद्धा या संपत्ती पायी… आईच्या प्रेमासाठी नाही… माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या कष्टाची कमाई तुमच्यासारख्या स्वार्थी मुलांच्या घशात उतरून देणार नाही… मुलांना आईचा प्रचंड राग आला… मुले निघून गेली…. त्यानंतर न मुलांनी आईशी संपर्क साधला आईने मुलांशी… ती एकटी तिच्या संपत्तीची राखण करत राहिली… वयोमानाप्रमाणे थकल्यानंतर सुद्धा तिने मुलांना बोलवले नाही… शेवटी तिला देवाज्ञा झालीच…. गावकऱ्यांनी मुलांना फोन करून सांगितले असता एक सुद्धा मुलगा तिच्या अंत्य दर्शनासाठी आला नाही… अंत्यविधी सुद्धा गावकऱ्यांनीच केले… दिवस कार्य संपल्यानंतर तिन्ही मुलं संपत्तीचा हक्क सांगण्यासाठी गावाकडे आली… हे सगळं विकायचं समान वाटणी करायची आणि आपापला गाव गाठायचं… ठरलं होतं त्यांचं… गावच्या घरात…. अंगणात पाऊल टाकायच्या आधीच समोर ती उभी होती….जरी काठाची साडी आणि अंगभर सोन्याच्या दागिन्यानी मढलेली त्यांची मेलेली आई…..तिने स्व कष्टाने कमावलेल्या संपत्तीची राखण करत उभी होती… 15 दिवसापूर्वी वारलेल्या स्वतःच्या आईला अंगणात असे उभे राहिलेले पहिल्यानंतर कुठल्याही मुलाचे अंगणातून आत जायचे धाडस झाले नाही… मुले दोन-तीन दिवस गावातच राहिले… पण जेव्हा जेव्हा स्वतःच्या घराकडे गेली तेव्हा तेव्हा त्यांना त्यांची आई तिथे राखण करताना आढळली… मुलांनी नाद सोडून दिला… ते घर…ती आमराई… ती जागा.. घरात असलेल्या सामान…..सोन…सर्व काही …..असच ओसाड पडून आहे….तिच्या आमराई मधील आंबा…तिच्या घरातील एक वस्तू चोरायची कुणाची टाप नाहीये…. कारण…. अजून ही ती स्वतः च्या संप्पतीची राखण करत आहे…
--------------------------------------------
( कथेची गरज म्हणून नॉन व्हेज बद्दल लिहले आहे कुणाला आवडलं नसल्यास सॉरी 
)


सुशीला बाईंची खानावळ… अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध… कितीबी मोट हॉटेल असू द्या… आमच्या सुशीला बाईंच्या हाताची चव यायची नाही…सातवी पिढी हाय त्यांची ह्या धंद्यात…. खोटं कशाला बोलायचं मी स्वतःच आमच्या गावात खानावळ टाकली होती… शहरातनी जाऊन आचारी आणले…. त्या पट्ट्यांच्या हाताला पण चव होती… पण माझ्या खानावळीत जास्त गिर्हाईक आलं नाही…. शेवटी खानावळ बंद केली… मीच नाही तर असं किती तर जण आहेत ज्यानी सुशीला बाईंना हरवायचं ठरवलं.. पण आम्हीच खड्ड्यात गेलो… सगळ्यांच्या खानावळी बंद पडल्या… हे मात्र खरं हाय की त्यांच्यासारख्या जेवणाची चव कुठे चाखायला मिळणार नाही…. कधी बघेल तेव्हा रात्री खानावळ गर्दी हायच… हा आता खानावळ जरा आडवळणाला हाय… दूर दूर पर्यंत नुसतं माळरान… कडेला जरा झाडी… झाडी जवळ विहीर… खानावळ फक्त रात्रीच चालू असते…. तिथे फक्त मटण आणि चिकन मिळतं म्हणजे तुमचं व्हेज जेवन नाय तिथं….. मोठ्या हॉलमध्ये लोक जेवायला असतात… काय मोठा तामझाम नाय…. नुसतं टेबल आणि खुर्च्या…. गावाबाहेर असल्याने मस्त उनाड वारा…. थंडीच्या दिवसात तर गार वारा…थंडीत मटन खायला असली मजा येते राव… आणि मटणाची चव तर काय विचारू नका…. मी स्वतःच महिन्यातनं दहा ते बारा वेळा तिथे जेवायला जातो… लोक लई लांबून लांबून जेवायला येतात… आज अमावस्या… खिशात जास्त पैसे पण नाही… नॉनव्हेज खायची जाम इच्छा झाली…. मटन थाळी परवडणार नाही पण चिकन तर नक्कीच खाऊन यायचं… थोडी दारू पिली…. गाडी थेट सुशीला बाईंच्या खानावळ जवळ येऊन थांबली…. आज बरोबर किश्या नाही… खानावळीत नेहमी प्रमाणे गर्दी… माझा नंबर यायला 11 वाजले…. मी नेहमीचा गिराहीक असल्यामुळे सुशीलाबाई पण आग्रहाने जेवण वाढवत होत्या… माझ्या तांबडा रस्सा च्या वाटीत कोंबड्याची मुंडी आली…. मी लगेच सुशीला बाईंना सांगितलं.. त्यांनी लगेच माफी मागितली… आजच्या जेवणाचे पैसे देऊ नका असं पण सांगितलं… मी स्वतः या धंद्यात काही वेळ असल्यामुळे मला कल्पना आहे गडबडीच्या वेळी काहीतरी चुका होतात… तसच झालं असेल… गडबडीत होतं असं कधी तर… चुकून कोंबड्याची मुंडी आली असेल… आजचा दिवस भारी फुकट मध्ये जेवण मिळालं… सुशीला बाईंचा मुलगा विकास पण माझी माफी मागायला आला… सुशिलाबाई ची मुलगी कविता पण येऊन माफी मागून गेली… कविता लय भारी हाय… मला जाम आवडते… सुशिलाबाईंच्या खानावळीमध्ये सारखं सारखं घ्यायचं हे पण एक कारण आहे… कविता…. दारूची धुंदी… चिकनची चव… बोचणारी थंडी… गाडी काढायला गेलो कविता माझ्या जवळ आली… परत एकदा माफी मागत होती… माफी मागताना तिने माझा हात हातात घेऊन माफी मागितली… मी तर ढगात… त्याच धुंदीत… घड्याळात पाहिलं तर 12 वाजत आले होते… जरा साईड ला जाऊन बाथरूम करून येऊ आणि तिच्या शी जरा गप्पा मारू असं ठरवून विहिरी जवळ आलो.,... गार वारा… विहरीजवळ अंधार… वाऱ्यामुळे हलणारी झाडी… मला जरा गरगरू लागले… दारू मुळे असेल असं वाटल… इतक्यात मागून कुणी तरी मला धरलं… माझ्या तोंडात कसली तरी मुळी घातली आणि तोंडात रुमाल कोंबला…. माझे हातपाय बांधले…. विकास होता… मागून कविता कसले तरी ताट आणि कंदील घेऊन आली…. ती मुळी जशी जशी खाली उतरत होती तशी तशी शुद्ध हरपत होती… “ चेटक्यासाठी ओवाळून टाकलेल्या कोंबड्याची मुंडी ह्या कुत्र्याला आली होय… बरं झालं ह्या ह****** ची लय दिवसापासून माझ्यावर वाईट नजर होती…बर झालं ह्याचच नंबर लागला…. ” कविता विकास ला म्हणत होती….
“ चेटक्या, सालाबादप्रमाणे यावर्षीचा बळी देत आहे, कबूल करून घे आणि यावर्षी धंद्यात अशीच बरकत राहू दे… ” विकास म्हणाला…. विहरीमधून आवाज येऊ लागले… काहीतरी वर येत होतं.,... विकास आणि कविताने मला विहिरीच्या काठावर उभं केलं…. हळूहळू शुद्ध हरपत होती…. आणि समोर ते ध्यान दिसलं… विहिरीतून बाहेर आलेल…. सडकी हिरवी त्वचा…. अंगावर चिकटलेले शेवाळ… तोंडात बाहेर आलेले सुळे… आता समजलं गावातील काही माणसं अचानक कशी गायब झाली होती….आणि सुशीला बाईंच्या धंद्यात एवढी बरकत कशी आली… त्या धुडाने माझ्या मानेत त्याचे सुळे घुसवले… उरली सुरली शुद्ध पण कायमची हरवली…..आता वर्ष भर खानावळ तेजीत चालणार होती…
--------------------------------------------
संध्याकाळ ची वेळ…. तो माणूस विचारात दिसत होता … कधी बस स्टॅन्ड वर येऊन पोहोचले त्याच त्यालाच कळलं नाही… कोणी पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकेल की हा माणूस कसल्यातरी संकटात आहे…. बस स्टॅन्ड वर येऊन तो त्या झाडाजवळ बसला …. गहन विचार चालू होता… मी पण या शहरात नवीनच… मी पण दुपार पासून बस स्टॅन्ड च्या बकाड्या वर बसलो होतो….माझे पण विचार चालू होते…. स्वतःचं गाव सोडून या नवीन गावात पोटापाण्यासाठी नोकरी शोधायला आलो होतो ……ह्या गावात स्वतःच नशीब आजमावायला आलो होतो… आता तुम्ही विचारणार आधीच गाव का सोडलं… खरं सांगू का मला चोरी करायची सवय आहे… आधीच्या गावात ज्या घरी काम करत होतो तिथून भरपूर पैसे चोरले… आणि त्या गावापासून लांब या गावात येऊन पोहोचलो… कस आहे मला झटपट श्रीमंत बनायचं आहे… त्यासाठी चांगली नोकरी??? किंवा श्रीमंत माणसाच्या घरी मला काम हव आहे… जेणेकरून मला झटपट श्रीमंत होता येईल( चोरी करून )… मला कष्ट करायचा प्रचंड कंटाळा आहे…. सो मी कायम शॉर्टकट हुडकत असतो… हे चोरलेले पैसे मला जास्त दिवस पुरणार नाहीत त्यामुळे नवीन नोकरी हुडकलीच पाहिजे…. हे गाव नवीन या गावातील माणसे नवीन… नवीन बकरा हुडकलाच पाहिजे… मी मगासपासून त्या झाडाजवळ बसलेल्या माणसाकडे बघत आहे तो कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसत आहे…. जाऊन विचारून येतो म्हणजे माझ्या नोकरीसाठी काहीतरी हात पाय मारता येतील…. त्यांना जाऊन विचारलं… ते गुणा मोहिते… गावातील बड प्रस्थ….भरपूर शेतीवाडी….भरपूर उद्योग एकूण एक काय मला हवा तसाच बकरा… भरपूर पैसे आहेत त्यांच्या कडे… त्यांच्याकडे कामाला असलेला माणूस अचानक गायब झाला… माझ्यासारखाच असेल बहुदा…. त्यांना सांगितलं मला ही नोकरीची गरज आहे मी तुमच्याकडे आजपासून कामाला येतो… डोळ्यात पाणी तरळल त्यांच्या… माझ्या पाया पडू लागले…. माझ्या डोक्यात प्लॅन शिजू लागला थोडे दिवस प्रामाणिक पणे काम करायचं.. त्यांना व्यवस्थित विश्वासात घ्यायचं…. त्यांच्या एकूण एक संपत्तीचा अंदाज घ्यायचा यांच्या इथे डल्ला मारायचा आणि नवीन गाव गाठायच…. त्यांनी मला सांगितलं इथून पुढच्या रस्त्यावर चालायला लाग ते दहा मिनिटात ते त्यांची राहिलेली काम करून येतील … मी त्या रस्त्यावर चालायला लागलो थोड्या वेळातच ते गाडीत बसून आले… गाडीतून जाताना त्यांच्या सगळ्या संपत्तीचा अंदाज मला देत होते…त्यांची किती शेती वाडी…. कुठले कुठले धंदे…. त्या धंद्यांचे किती इन्कम ते सर्व मला बोलता बोलता सांगत होते… माझ्या डोक्यात प्लॅन चालू होता कशी चोरी करायची किती दिवसांनी चोरी करायची…. पण आधी यांचा विश्वास संपादन केला पाहिजे…. त्यांचं घर मूळ गावापासून बरंच लांब… घरी जास्त पर्यंत जवळजवळ रात्रच झाली…. घर आल त्यांचं…. घर काय मोठाचा मोठा वाडा…. आज त्यांच्या पाहुण्यांकडे काहीतरी फंक्शन असल्यामुळे घरातली माणसे तिकडे गेली होती असं त्यानी मला सांगितलं …. बरं झालं मला वाडा नीट बघता आला असता… आत्तापासूनच अंदाज घ्यायला चालू करतो…. आत वाड्यात गेलो…. अचानक मनावर मळभ दाटून आले… जणू मन सांगत होतं तिथे थांबू नकोस परत जा परत जा…. मोहिते वाडा दाखवत होते…. झोपळ्यावर मोहिते बाई रागानं माझ्या कडे बघत मान हलवत होत्या…. जणू त्या मला कशा साठी तरी नकार देत असल्यासारखा वाटल्या…. काहीतरी वेगळं जाणवलं… पण समजत नव्हतं नक्की काय वेगळे आहे… काहीतरी नक्कीच खटकलं होतं…. तोपर्यंत मोहिते माझ्याजवळ आले…. काहीतरी सांगत होते… माझ्या डोक्यात मोहिते बाईंचा विचार चालू होता. काहीतरी वेगळ जाणवत होतं… पण काय ते समजत नव्हतं…. बहुतेक बायकांना पुरुषाची नियत पहिल्या नजरेत कळते… एखाद्या वेळेस त्यांना माझ्याबद्दल तसंच जाणवलं असेल… मी जास्त विचार केला नाही आणि मोहित्यांच्या मागून आत घरात गेलो…. मोहितेंनी येताना मोठी दारूची बाटली आणि चिकन ताट घेतले होते….किती तरी दिवसांनी उंची दारू पिली…. पोटभर चिकन वर ताव मारला…. मोहिते वाडा दाखवू लागले.. .. आत आत बऱ्याच खोल्या होत्या… वाडा जणू रेल्वे असल्यासारखा वाटत होता… मोठ्या मोठ्या खोल्या आणि पिवळे पिवळे मंद दिवे…. ,.. जरा जरा कुबट… दमट हवा…. खोल्यांच्या खिडक्या बंद… अतिशय नकारात्मक वाटत होतं…. असं करता करता शेवटची खोली आली…. खोलीला बाहेरून एक कुलूप… मोहिते म्हणाले आमचा सर्व ऐवज सर्व पैसा अडका याच खोलीत आहे…. या सर्वाच्या हिशोबाचे काम मला देणार आहे…. त्यानी खिशातून एक मोठं पदक असलेली सोन्याची चेन मला घालायला दिली…. त्यांना जर माझं काम आवडलं तर मला एक घर पण बांधून देणार होते…. एकूण एक काय माझ्या साधेपणावर त्यांचा पूर्ण विश्वास बसला होता…. आम्ही परत आलो…. त्यांनी मला झोपायची खोली दाखवली…. आणि ते त्यांच्या झोपायच्या खोलीत निघून गेले…. माझा सगळ्या गोष्टींचा विचार चालू होता…. डोळ्यासमोर तो दरवाजा आणि त्याच्या पाठीमागची अमाप संपत्ती दिसत होती…. माझ्या डोळ्यात घातलेली चेनच जवळजवळ सहा ते सात तोळ्याची होती…. माझ्या डोक्यात विचार चालू झाले त्या दरवाज्याच्या पाठीमागे किती सोन असेल किती पैसा असेल याचा…. रात्री निजानिज झाली की मी त्या खोलीत जाणार होतो… किती संपत्ती आहे याचा अंदाज घेणार होतो… रात्र झाली…. मी हळूच उठून मोहित्यांच्या खोली जवळ गेलो…. कानोसा घेतला… ते झोपले होते…. आवाज न करता चोर पावलाने त्या खोल्यातून चालू लागलो..,.. त्या शेवटच्या दारापाशी आलो …. कुलूप तकलादुच होतं… पण दार भक्कम होते… हळूच दार उघडून आत गेलो…. आत फक्त अंधार होता…. तसाच पुढे चालू लागलो…. पाठीमागून दार लावल्याचा आवाज आला,.. काहीच समजलं नाही….. मी पळत दाराजवळ जाऊ लागलो… दार बडवू लागलो…. भिंत चाचपडताना दिव्याचे बटण सापडलं…. बटण चालू केल…. पिवळा उजेड पडला….अचानक तिकडच्या कोपऱ्यात लक्ष गेलं…. मोहिते बाई तिथे उभ्या होत्या…. आणि आत्ता लक्षात आलं की मला मोहिते बाईंच्या बद्दल काय खटकलं होत.. त्यांना पायच नव्हते… त्या अजूनही नकारार्थी मान हलवत होत्या….. “ तू इथं येऊन खूप मोठी चूक केली आहेस…. पण आता काही उपयोग नाही…. हा मोहिते पैशासाठी अतिशय हापापलेला माणूस आहे…अमाप पैसा संपत्ती आणि तारुण्य मिळवण्यासाठी त्याने सैतानाला ह्या खोलीत आणून ठेवले आहे…. . दरवर्षी सैतानाला एक नरबळी देतो… आणि सैतान त्याच्यावर खुश होऊन त्याला हवे ते देतो… एक वर्ष त्याला नरबळी देण्यासाठी कोणीच मिळाले नाही…. म्हणून त्यांनी माझा बळी दिला…. आज त्याला बळीसाठी कोणीच मिळत नव्हते म्हणूनच तो चिंतेत होता….आणि तू त्यांना भेटलास….त्यांनी ही खोली तुला मुद्दाम दाखवली…. तुझ्या गळ्यात असणारी सोन्याची चेन त्यांनी तुला मुद्दाम दिली… जेणेकरून तुला अधिक हाव सुटवी आणि तू ह्या खोलीत यावं…. पण आता काही उपयोग नाही मोहित्यांनी बाहेरून दार बंद करून घेतले आहे….” अचानक मानेजवळ कसलेसे गरम श्वास जाणवू लागले…. तो सैतान….ते हिडीस रूप नक्की काय आहे हे समजायच्या आधीच त्यांनी माझ्यावर झडप घडली होती
ही नोकरीं मला चांगलीच महागात पडली….
--------------------------------------------