#लाईट_हाऊस- Light house the horror story
पूर्ण कथा
'रोजचं हिची कटकट…..कसली शांतता म्हणून नाही……एकतर ऑफिसात राब-राब राबायचं……गेंड्याचं तोंड असणाऱ्या त्या बॉसची बोलणी खायची अन घरी आलं कि हि सुरु…….किती समजावलं, पण हि जैसे थे…..!!! लोकं रोज दारू पिऊन घरी येतात अन बायकां-पोरांना मारतात…..धिंगाणा घालतात……घरी सासू - सासऱ्यांच करावं लागतं……..हिला एका गोष्टीचा त्रास नाही…..पण हिचं तोंड मात्र लोहाराच्या भात्याप्रमाणं सदैव चालूच…….हीच प्रॉब्लम काय आहे, तेच समजत नाही…….कुठनं बुद्धी सुचली अन लग्न केलं…….ब्रह्मचारी राहिलो असतो, तर जास्त सुखी झालो असतो…..!!!’
वेदांत साने- अंदाजे तिशीचा एक नवविवाहित युवक……लग्नाला जेमतेम वर्ष झालं असावं……त्याची पत्नी आरती जरा कटकट करणारी……प्रत्येक गोष्टीत तिला स्वतःच खरं करायची सवय……त्यात तिचा पझेसिव्ह स्वभाव……भरीस भर म्हणजे घरी दुसरं कुणी जाणतं माणूस नाही……हे दोघेही काहीशे अल्लड स्वभावाचे……..त्यामुळे ‘काय बरोबर’ ऐवजी ‘कोण बरोबर’ हे ठरवण्याच्या नादात सुरू झालेला संवाद हळूहळू वादाकडे सरकत असे…….याच कारणानं हल्ली सुखी संसारातलं ‘सुख’ कुठेतरी गायब झालं होतं……उरला होता फक्त ‘संसार’…….!!!
आजही अशाच एखाद्या फालतू कारणावरून खटका उडाला असावा……रात्री दहाच्या सुमारास वेदांत घरातून बाहेर पडला होता……रस्त्यानं पाऊलं उचलत असला तरी त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं…… त्याच्या डोक्यात वणवा पेटला होता…..त्याच अन त्याच्या पत्नीचं – आरतीचं भांडण झालं होतं……म्हणजे तसं हे काही नवं नव्हतं……भांडणं हि रोजचीच होती…..पण आज जरा जास्तच वाद झाला असावा…..त्यामुळेच डोकं फिरल्याने वेदांत घरातून बाहेर पडला होता…..तो रस्त्याने तरातरा चालत असला तरी त्याला काही दिशा नव्हती…..कुठं जायचं असं काही ठरलं नव्हतं…….तो खरंतर या भांडणांपासून दूर जाण्यासाठी निघाला होता…. पण भांडण हे त्याच्या डोक्यात होतं, हे कदाचित त्याला कळालं नसावं……..त्यामुळे घरापासून चांगला किलोमीटरभर लांब येऊनही तो अजूनही मेंटली तिथेच होता…… तोंडाने अस्पष्ट बडबडत तो त्या निर्जन रस्त्याने चालला होता……आता हवेत किंचित गारवा जाणवू लागला होता…….रस्त्यावर येणारे तुरळक वाहन सोडून रस्ता निर्जन होता……. पण या साऱ्याकडे लक्ष द्यायला वेदांत भानावर कुठे होता…??? आपल्याच तंद्रीत तो चालत होता…….घरापासून तो चांगला दीड-दोन किलोमीटर दूर आला असेल……शहराच्या वस्तीपासून दूर होत आता त्याची पाऊले समुद्रकिनाऱ्याकडे वळली…….रस्ता सोडून तो अनावधानाने किनाऱ्याकडे वळला……तिथे असणारा उंच वर्तुळाकार दिवा फक्त एक मिणमिणता उजेड फेकत होता……बहुदा तो बिघडला असावा…….त्यामुळे रस्ता सोडून किनाऱ्याकडे सरकताना अंधार अधिकच गहिरा झाल्याचा भास होत होता……. फेसाळत्या लाटा जरी दिसत नसल्या तरी लाटांचा खळखळाट मात्र पुढे-पुढे सरकताना अधिक तीव्र वाटत होता अन इतक्यात तो थांबला…….त्याच्या डोक्यातील मघापासून सुरु असलेलं विचाराचं चक्र थांबलं अन त्याची जागा भयाने घेतली……आपण रागाच्या भरात एका चुकीच्या ठिकाणी आलोय, हे त्याच्या लक्षात आलं……तो जरी या शहरात वर्षभरापूर्वी आला असला तरी या किनाऱ्याबद्दल तो ऐकून होता…….हा किनारा "हॉन्टेड बीच” म्हणून प्रसिद्ध होता……इथं बऱ्याचजणांनी आत्महत्या केल्या असल्याचं त्याच्या ऐकिवात होतं…….असल्या भुताटकीच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसला तरी त्या मिट्ट अंधारात मनाच्या एका कोपऱ्यात भीती घर करू लागली होती…….इतक्यात त्याच लक्ष किनाऱ्यालगत तो उभा असलेल्या ठिकाणापासून अंदाजे दोन किलोमीटर दूर असलेल्या लाईट हाऊसकडे गेलं……..एव्हडं दूर असूनही ते लाईट हाऊस अस्पष्ट का असेना पण दिसत होतं.....त्याच्या वरच्या टोकाशी असलेला प्रकाशझोताचा दिवा सुस्थितीत होता अन् तो तीव्र प्रकाश टाकत फिरत होता......तो लाईट हाऊस वापरात असेल याची वेदांतला कल्पनाच नव्हती.....तसा तो दिवसा या किनाऱ्यावर बऱ्याचदा आला होता, पण रात्री येण्याची ही पहिलीच वेळ होती......त्या लाईट हाऊसचा तीव्र प्रकाश गोल फिरत वेदांत बसलेल्या जागेवरून पुढे सरकत जात होता......पण दूरवरून येत असल्याने त्याची तीव्रता मात्र कमी वाटत होती......किनारा अन् काहीसं समुद्राचं पाणी यांच्यावरून फिरत तो लाईट हाऊसचा प्रकाश वेगाने पुढं जात होता.......पूर्ण गिरकी मारून परत वेदांतकडे परत यायला त्या प्रकाशाला अंदाजे तीनेक मिनिटे लागत होती......हा अंधार - उजेडाचा खेळ पहात वेदांत तिथेच बसून राहिला......त्याला याची गंमत वाटत असावी.......त्याच्या मनातील भीतीही काहीशी कमी झाली होती......तो लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून फिरून जाताना त्याने एकवार किनारा न्याहाळला...... तिथं चिटपाखरूही नव्हते......वेदांत आता त्या भयानक वातावरणाला काहीसा सरावला होता.....कारण तिथं एक शांतता होती......जी त्याला घरी मिळत नव्हती... अन् हे "हाँटेड बीच" वगैरे फक्त अफवाच असाव्या, त्याला आता खात्री वाटू लागली होती......मंद वाहणारा थंडगार वारा त्याला मोहित करत होता......बऱ्याच दिवसानंतर तो असा एकटा होता......त्याला जणू स्वतःची सोबत आवडू लागली होती.....आकाशातील ताऱ्यांची मैफिल बघत, थंडगार वाऱ्यात तो बसून होता.....समुद्राच्या लाटांशिवाय बाकी कसलाही आवाज येत नव्हता...... अन् इतक्यात समुद्राकडे तोंड करून बसलेल्या वेदांतला रस्त्याकडील बाजूकडून अचानक एक पुरुषी आवाज आला-
"कोण आहे.....?? कोण आहे तिथं....??"
मागील अंधारात काहीही स्पष्ट दिसत नसले तरी अंदाजे वीस फूट अंतरावर उंचीपुरी मानव, आकृती उभी होती.....वेदांत त्या प्रकरणे काहीसा दचकला अन् जवळजवळ ओरडलाच-
"तुम्ही कोण....??"
त्यावर त्या आकृतीचा आवाज आला -
"मी रिक्षावाला.....ती बघा तिथं माझी रिक्षा उभी आहे....पण तुम्ही एकटेच अंधारात का बसलाय...... ?? मी रिक्षा उभी करून लघवी करायला उतरलो अन् त्या लाईट हाऊसच्या उजेडात तुम्ही दिसलात......कशाला थांबलाय इथं....?? हा किनारा चांगला नाही, माहिती नाही वाटत तुम्हाला...!! उगी थांबू नका, निघा घराकडं.....!!"
त्या रिक्षावाल्याला उद्देश चांगला होता.....पण वेदांतला त्याची तंद्री भंग झाल्यानं राग आला असावा.... त्यानं काहीश्या उद्धट सुरात उत्तर दिलं -
"हे बघा.....मी आधीच वैतागलोय....!! जरा एकांत हवा म्हणून मी इथं बसलोय, तुम्ही इथून गेलात तर फार बरं होईल......अन् बरं- वाईट माझ मी बघून घेईन, तुम्ही काळजी करू नका....!!"
त्यावर तो रिक्षावाला चिडक्या सुरात म्हणाला -
"चूक झाली......भल्याचा जमाना राहिला नाही राव...!! बसा रात्रभर इथेच.....!!" अन् तो हळूहळू चालत निघून गेला.... चालण्याच्या वेगावरून तो एक वृद्ध इसम असावा. हळूहळू चालत तो आपल्या रिक्षाजवळ पोहोचला. रस्त्यावर उभ्या आपल्या रिक्षात बसून त्यानं हॅण्डल ओढला अन् भरधाव वेगानं तो तिथून निघून गेला....मान मागे वळवून वेदांत हे सर्व पाहत होता.....अन् तो स्वतःशीच पुटपुटला...
"बघेल तो अक्कल वाटत सुटलाय.... एवढी हौस असेल तर जरा माझ्या बायकोला द्या म्हणावं अक्कल...!!"
काही क्षण विचलित झाल्यावर तो पुन्हा त्या गोल फिरणाऱ्या उजेडाचा मागोवा घेऊ लागला.....रात्रीचे बारा वाजून गेले होते....आता हवेत चांगलाच गारवा जाणवत होता..... रस्त्याकडे नजर टाकता आता तुरळक वाहन नजरेस पडत नव्हते.....सारे शहरच गाढ निद्रेत गेल्याचा भास होत होता....
वेदांत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता अन् इतक्यात हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून त्याच्याकडे येऊ लागला.....अनावधानाने त्याचे लक्ष त्या उजेडाकडे गेले......किनाऱ्यावरून झरझर सरकत तो उजेड त्याच्याकडे झेपावत होता अन् अचानक त्या उजेडात त्याला काहीतरी येत असल्याचा भास झाला......काहीतरी होतं....विचित्र आकारच.....अन् अचानक....अचानक ते गायबही झालं.... आपण नक्की काय पाहिलं.....?? नक्की काही होत का तरी, कि भास होता....?? वेदांत जणु बसल्या जागीच गोठला....त्याच डोकं बधिर झालं असावं....त्यानं मोबाईलचा टॉर्च सुरु केला अन त्या दिशेने पाहु लागला..... किनारा शांत होता...... आपल्याला भासच झाल्याची त्याला खात्री झाली.... अन इतक्यात पुढे सरकत गेलेल्या लाईट हाऊसच्या उजेडात त्याला पाण्यात कुणीतरी बुडताना दिसलं......
"वाचवा.... वाचवा....!!" असा आवाज येऊ लागला.... ओझरत्या उजेडात ती एक स्त्री असावी, असा अंदाज वेदांतने आधीच बांधला होता, अन आता या आवाजाने त्याची खात्री झाली होती.....!!
नक्की बाईच असावी कि आणखी कोणी....?? छे...छे...!!काहीतरीच काय विचार करतोय मी.....?? बाईच असेल ती, भुतं थोडी येणार....?? मघापासून निवांत बसलोय आपण, काहीही धोका नाहीये इथं....!!
नक्कीच ही बाई माझ्यासारखी कुणाशीतरी भांडून घरातून निघून आली असावी..... बिचारी हलक्या डोक्याची असेल, म्हणून असलं टोकाचं पाऊल उचललं असावं..... पण आता घाबरली असावी....!!
माणसाने जीव देण्याचा कितीही विचार केला तरी शरीर शेवटपर्यंत आपलं अस्तित्व राखायचा प्रयत्न करतंच...!!
इतक्यात त्या बाईचा आवाज तीव्र होऊ लागला.
"अरे यार.... आपण इथं वेळ घालवू अन ती बिचारी तिथं मारून जाईल....!!"
विचार करत वेदांत उठला अन तो त्या बाईच्या दिशेने झेपावला...... अंधाराला सरावलेल्या त्याचा डोळ्यांना त्या बाईची धडपड अस्पष्ट दिसत असावी..... तो आता पाण्यात उतरून पुढेपुढे सरकू लागला..... त्या बाईचा आवाज आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला....वेदांत आता छातीएवढ्या पाण्यात पोहोचला होता..... प्रत्येक लाटेसोबत तो चांगलाच हेलखावे खात होता.... ती बाई अंदाजे पाच फूट अंतरावर गटांगळ्या खात होती..... मदतीसाठी आकांत करत होती.....
अन इतक्यात लाईट हाऊसचा उजेड त्या दोघांवरून सरकू लागला अन समोरील दृश्य पाहून वेदांतच्या काळजात धस्स्स झालं.....!!
त्या पाच - सहा सेकंदाच्या प्रकाशझोतात त्याने पाहिलं..... त्याच्यासामोरं पाण्यात बुडणारी ती बाई आता त्याच्याकडे बघून हसत होती..... तिचं संपूर्ण शरीर हे शेवाळलेलं अन पाण्याने फुगलेलं वाटत होतं......त्या फुगून टम्म झालेल्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असाव्या.....अन आता ती बाई अंधारात त्या पाण्यात स्तब्ध उभी होती...... लाईट हाऊसचा उजेड केव्हाच निघून गेला होता.....हा बिभत्स नजारा पाहून वेदांतचं सारं शरीर त्या थंड पाण्यातही गरम झालं..... त्याचे कान तापू लागले...... कपाळावर घाम जमा झाला..... अन प्रसंगावधान राखून त्याने वेगाने पाऊले मागे वळवली.
पण..... पण हे काय....?? ती बाई आता त्याच्या मागेच.... अगदी.... अगदी..... एक फुटावर उभी होती.....वेदांतला काही समजायच्या आता तो त्या थंडगार पाण्यात खाली खेचला गेला....... त्या हैवानी ताकदीपुढे त्याचा प्रतिकार अगदीच फोल ठरत होता...... अन पुढील काही क्षणात वेदांतला चिरनिद्रा प्राप्त झाली.
*****
सकाळी बीचवर जॉगिंगला आलेल्या एका ग्रहस्थ्यांना किनाऱ्याला एक प्रेत आढळून आलं अन त्यांनी पोलिसांना पाचरण केलं. पोलीस आले, पंचनामा सुरु झाला.... बघताबघता चांगलीच गर्दी उसळली...... गर्दीतले लोक मेलेल्या व्यक्तीचं वय पाहून हळहळ व्यक्त करत होते.....त्या गर्दीत काल रात्रीचा तो रिक्षावालाही होता....
"काल माझ ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...."
तो स्वतःशीच पुटपुटला..... पण त्याची ती पुटपुट शेजारील कॉनस्टेबलने ऐकली अन त्या रिक्षावाल्याला सब- इन्स्पेक्टरसमोर हजर केले. सब- इन्स्पेक्टर आपल्या करड्या आवाजात विचारू लागला -
"काय माहिती आहे तुम्हाला.... खरं- खरं सांगा ....!!"
त्यावर तो रिक्षावाला म्हणाला -
" साहेब..... हा कोण आहे, मला माहिती नाही.... पण रात्री.......... "
अन त्याने रात्री घडलेला सर्व प्रकार सब- इन्स्पेक्टरला कथन केला. जबाब नोंदवायला डिव्हिजनला ये, असं सांगून ते प्रेत उचलून, ते ऍम्ब्युलन्समध्ये टाकून पोलीस निघून गेले....अन हे संपूर्ण संभाषण ऐकत उभी असलेली एक पत्रकार मुलगी लगबगने गर्दीतून पुढं झाली अन त्या रिक्षावाल्याला रात्री घडलेला प्रकार पुन्हा कथन करण्याची तिनं विनंती केली. रिक्षावाला पुन्हा रात्रीची कहाणी सांगू लागला. रिक्षावाल्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून मग ती पत्रकार विचारू लागली -
"भाऊ..... पण हा बीच... म्हणजेचं ही जागा चांगली नाहीये, असं तुम्हाला का वाटतं....?? लोकांनी इथं सुसाईड केल्या म्हणून....??"
त्यावर तो वयस्कर रिक्षावाला हसला अन म्हणाला -
"मॅडम...... तुम्हाला पटलं तर बघा.... पण ही जागा फक्त लोकांनी जीव दिल्यानं शापित नाहीये...... इथं एक जाळं आहे मृत्युंच, कित्येक वर्षांपासून..... कालचा तो तरुण या जाळ्यात अडकला..... अन याआधी अडकलेली एक विवाहित बाई काल सुटली असावी..... आता तो तरुण वाट पाहत बसेल आपल्या सुटकेची...... त्यासाठी त्याला शिकार करावीच लागेल.....शिकार केल्यावर त्या शिकार झालेल्या जीवाला इथे अडकवूनचं त्याला स्वतःची मुक्ती करता येईल...... त्यासाठी अशाच एका वाट चुकलेल्या,भटक्या जीवाची त्याला शिकार करावी लागेल...... सारं जग मात्र याला "आत्महत्या" असं गोंडस नाव देऊन मोकळं होईल......!!!"
त्यावर आश्चर्यान अन काहींश्या अविश्वासन ती पत्रकार विचारू लागली-
" अहो पण बाबा..... तुम्हाला हे सर्व कसं माहित.....?? "
त्याबरोबर तो रिक्षावाला किंचित हसत म्हणाला -
"पुनर्जन्मवार तुमचा विश्वास आहे का मॅडम.....??"
त्यावर ती पत्रकार मानेनेच "नाही" असं म्हणाली.
"मी भोगलयं हे सगळं...!!" असं म्हणत तो आपल्या रिक्षाकडे चालू लागला.... ती पत्रकार मुलगी त्याला आवाज देत होती, पण त्याला मात्र तिच्याशी बोलण्यात कसलेही स्वारस्य नव्हते...!!!
समाप्त
- दीपक पाटील