आतली कुजबुज
माधवी तशी साधी गृहिणी होती. दिवसाचं काम आटपून संध्याकाळी गॅलरीमध्ये चहाचा कप घेऊन खिडकीजवळ बसणं तिला आवडायचं. बाहेर लोकांची वर्दळ, गाड्यांचे आवाज, पार्किंग मधील मुलांचा खेळण्याचा किलबिलाट - हे सगळं ऐकत ती दिवसभराचा थकवा विसरून जायची. भीती वगैरे गोष्टी तिच्या स्वभावात नव्हत्या. ती तशी व्यवहारी आणि शांत स्वभावाची होती. आजही ती चहा घेऊन बसली होती. बाहेर नेहमीसारखे आवाज येत होते. घरात शांतता होती. तिची मुलगी रिया शाळेत गेली होती आणि तिचा नवरा निलेश ऑफिसमध्ये होता. दोघेही घरी नव्हते.
अचानक... काहीही कारण नसताना, तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवली. जणू काहीतरी घडणार आहे, काहीतरी वाईट. एक अनामिक धाकधुक. तिने इकडे तिकडे पाहिले. घरात सगळं व्यवस्थित होतं. दरवाजा बंद होता, खिडक्या लावलेल्या होत्या. बाहेर नेहमीसारखे आवाज येत होते. तरीही ती अस्वस्थता वाढतच होती.
ती अस्वस्थता आता हळू हळू भीतीमध्ये बदलू लागली. हृदयाची धडधड वाढली. छातीत धडधड ऐकू येत होती. हातपाय थंड पडू लागले. जणू कोणीतरी थंड हातांनी तिला आतून स्पर्श केला होता. पण कोणीही नव्हतं. घरात ती एकटी होती.
तिला वाटलं, आपल्याला काहीतरी होतंय. कदाचित बीपी वाढला असेल, किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल. तिने उठून पाणी प्यायले. पण भीती कमी होण्याऐवजी वाढतच होती. ती आता भयामध्ये बदलली.
तिला स्पष्ट जाणवलं, की कोणीतरी तिच्याकडे आतून बघत आहे. अगदी तिच्या जवळ पण आतून. पण ती जिथे बघायची, तिथे कोणीही नसायचं. तिला कोणाची सावली दिसली नाही, कोणाचा आवाज ऐकू आला नाही. घरात वाऱ्याचा झोत नव्हता, तरीही तिला गारठा जाणवत होता, एक भयाण अंतर्बाह्य गारठा.
भीती वाढत गेली, वाढत गेली. तिला आता एका अदृश्य अस्तित्वाची जाणीव झाली. जणू काहीतरी तिच्या आत होतं, तिच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करत होतं. तिला वाटलं कोणीतरी तिच्या कानात कुजबुजत आहे, पण कोणताही आवाज नव्हता. ती कुजबुज तिच्या थेट मनात, विचारांमध्ये ऐकू येत होती. ती काय होती हे तिला कळत नव्हतं, पण ती अत्यंत भीतीदायक होती. जणू तिच्याच मनातली भीती बाहेर पडून तिच्याशी बोलत होती.
तिने डोळे गच्च मिटून घेतले, हातांनी कान दाबले. पण ती कुजबुज थांबेना, ती मनातून येत होती. तिचे अंग घामाने थबथबले. तिला वाटलं, आपण ओरडावं, मदत मागावी. पण आवाज बाहेर येईना. जणू भीती नावाच्या त्या अदृश्य अस्तित्वाने तिचा गळा दाबला होता.
वेळ थांबल्यासारखा वाटला. बाहेरचे आवाजही आता अस्पष्ट आणि दूर गेल्यासारखे वाटू लागले. जणू ती आणि तिच्या आतली भीती, आणि ती मनातील कुजबुज - एवढंच या जगात खरं होतं. बाकी सगळं दूर गेलं होतं. तिला वाटलं ती बेशुद्ध पडेल.
अचानक... जसजशी भीतीची तीव्रता वाढत गेली, तसतशी ती कुजबुज अधिक स्पष्ट झाली. 'तू... घाबरते आहेस... तू... माझी आहेस... मी तुला घेरले आहे...... मी सांगेन तसेच तू वाग..... नाहीतर.....'
माधवीला धक्का बसला. ही कुजबुज तिची स्वतःची भीती नव्हती. हे बाहेरचेही कुणी नव्हते. हे काहीतरी वेगळे होते. जे थेट तिच्या मनात शिरले होते. जे तिच्या भीतीवर पोसत होते, वाढत होते, परिणाम करत होते, तिचा ताबा घेत होते. जे तिच्या भीतीला स्वतःची ओळख देत होते. भीती... जी फक्त मनात जाणवते... जी दिसत नाही, ऐकू येत नाही... पण तुम्हाला आतून पूर्णपणे पोखरून काढते.
तिने आपली भीती बाहेर काढायचा खूप प्रयत्न केला. पण ज्याला काही स्वरूपच नाही ते आत मध्ये असल्यावर काढणार कसे ?
अचानक तिच्या इंद्रियांची क्षमता कमी होत गेली. तिला बाहेरून कोणतेही ज्ञान होईनासे झाले. हळूहळू तिच्या संज्ञा नष्ट होत चालल्या होत्या. तिने एकदा मनाचा ठाम निश्चय करून निकराचा प्रयत्न केला की जे काही आत आहे ते बाहेर ढकलून देऊ. आणि त्यानंतर पूर्ण अंधार झाला........
तिने डोळे उघडले. बाहेरचे आवाज पुन्हा स्पष्ट झाले. सूर्य मावळत होता. घरात सगळं शांत होतं. रिया व निलेश घरी यायचे होते.
पण माधवी अजूनही घाबरलेली होती. अंग घामाने थबथबले होते, हृदयाची धडधड चालू होती.
भीती कमी झाली होती, पण गेली नव्हती. तिला माहित होतं, ते अदृश्य अस्तित्व, ती मनातील कुजबुज... ती कधीही परत येऊ शकते... कोणताही आवाज, कोणताही स्पर्श, काहीही न होता... थेट आतून... मनामध्ये... आणि भीती निर्माण कशी होते... ती बाहेरून येत नाही... ती तुमच्या आत येते... आणि काही अनुभव तिला आतून बाहेर काढतात... किंवा आतच वाढवतात...