खुमखुमी १४ - Marathi Bhaykatha Special Stories
डाॅ. डिजुसांना अचानक परदेशात जावं लागल्याने त्यांच्या साऱ्या ठिकाणच्या अपाॅईंटमेंट पंधरा दिवसासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं डाॅं. इंगळेकडून कळताच भैय्यासाहेबानं बालाला घेत सतोन्याला जायचं तात्पुरत स्थगीत केलं. एव्हाना येत्या शनिवारी तो बालाला घेत लल्लाची भेट घ्यायला व दवाखान्यात दिपाला घेऊन जाण्यासाठी सतोन्याला जाणारच होता.
बाळासाहेब गुणवंतरावाकडून भेटण्यासाठी सारखा तगादा लागला होता. पण सर्जेराव आमदार व आपल्या घराण्यातील नात्यावरुन असलेलं पूर्ववैमनस्य माहीत असल्यानं भैय्यासाहेब कानाडोळा करत होते. पण संध्या व बालाचं नविनच प्रकरण उकरतंय म्हटल्यावर दिपा व लल्लाचं नेमकं काय हे माहीत होत नाही व त्यांची वासलात लावेपर्यंत बाला व बाळासाहेब दोघांना झुलवत ठेवायचं त्यांनी ठरवलं. पण अकादमीतली भागीदारी टिकवून ठेवायची असेल तर बाळासाहेबांना पुन्हा झुलवत ठेवण्यासाठी भेट घ्यावीच लागेल.म्हणून भैय्यासाहेबानं जळगावला जात बाळासाहेबाची भेट घेतलीच.
" या भैय्यासाहेब! खूपच प्रतिक्षा करावी लागते आम्हास तुमच्या भेटीसाठी? कधी कधी आम्हाला शंका येते की आम्ही आमदार पुत्र आहोत की तुम्ही! "
" बाळासाहेब ,तसं काही नाही पण दिपाच्या आजारपणात अडकल्यानं इच्छा असुनही भेट घेता आली नाही. बाकी दुसरं काही नाही."
" ठिक आहे. हल्ली क्रिकेट जगतात खूपच वेगवान हालचाली सुरू होत आहेत. क्रिकेट नियामक मंडळ लवकरच मर्यादित षटकाच्या वेगळ्या स्पर्धा घेणार असून त्यासाठी प्रिमीयम लीग सुरु करतेय!"
" हो बाळासाहेब संध्या बोलली त्या संदर्भात!"
संध्याचं नाव ऐकताच बाळासाहेबांचे डोळे फडफडले.
" भैय्यासाहेब तुम्ही व संध्यानं मनावर घेत सहकार्य केलं तर विविध फ्रंचायशीमार्फत आपल्या अकादमीतल्या बाला मोरे, गुळवे, सोलकर यासारखे खेळाडू नक्कीच निवडले जातील!"
" बाळासाहेब,आमचं सहकार्य राहीलच.का नाही राहणार?"
" भैय्यासाहेब,त्यासाठीच आमदार साहेब बोलणी करण्यासाठी तुम्हास बोलवत होते" बाळासाहेब आता मुद्द्यावर येऊ लागले.
" म्हणजे? मी समजलो नाही?"
" वडिलांशीच बोला कळेल सारं भेटी अंती!"
" तरी बाळासाहेब नेमकं कशाबाबत म्सणताय थोडी तरी कल्पना द्या" भैय्यासाहेब वेड पांघरू लागले तर बाळासाहेब मनात खूष होत लाजेनं चूर होऊ लागले.
बाळासाहेबांचे गाल लाल होऊ लागले.
" भैय्यासाहेब, संध्याबाबत......दोन्ही घरात नातं झालं तर...."
भैय्यासाहेब सावध झाले व त्यांनी तावावर घाव मारला.
" भैय्यासाहेब, तसं सांगा ना मग!मी किती घाबरलो. संध्या व तुमच्याबाबत माझी हरकत नव्हती व नाहीच. पण तुमचा आवडता खेळाडू म्हणून तुम्ही ज्यास डोक्यावर घेतलंय तोच आडवा येतोय! "
" आवडता खेळाडू? कोण बाला? त्याचा काय संबंध?" बाळासाहेब एकदम धक्का लागावा तसे विचारते झाले.
" बाळासाहेब ,राजकारणात, व्यवहारात तुम्ही खूपच हुशार असले तरी याबाबतीत तुम्ही दुधखुळेच राहिलात!"
" भैय्यासाहेब, काय म्हणायचं ते खुलं करुन सांगा?"
" बाला व संध्या केव्हाच माझ्याकडं आले होते या संदर्भात!"
" त्या भिकारी बाल्याची ही हिंमत......!"
बाळासाहेब चवताळले.
" बाळासाहेब, संतापू नका.मी तुमच्यासाठी त्याला पाचर मारलीच. आधी संघात निवड होऊ द्या,स्थीरस्थावर व्हा मग लग्नाबाबत ठरवू! आता बालाला संघात न घेता वाट कशी लावता येईल त्यावर तुमचं व आमचं नविन नात अवलंबून आहे, असं समजा!" भैय्यासाहेब आमदारपुत्राचा चेहरा न्याहाळू लागले.
" भैय्यासाहेब, संध्या एक नादान पण तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मला. आता पहाच त्या बाल्याला कसा हाकलतो मी!"
" बाळासाहेब मग मी आज आमदार साहेबांची भेट घेत नाही. संध्याला न समजू देता त्या बाल्यास संघनिवडीतून डच्च्यू कसा देणार ते तुम्ही पहा.मग संध्याबाबत मी निर्णय घेईल."
भैय्यानं तावावर घाव मारत बाल्याप्रमाणच बाळासाहेबाला मधाचं बोट चाखवत झुलवत ठेवत त्यांचाही बाल्याच करत परतले व डाॅ. डिसुजाची वाट पाहू लागले.
एकादशीनंतर दिपा आता बरीच हिरू(डू)फिरु लागली. ती केव्हाही घरातून बाहेर ओसरीवर तर कधी ओसरीवरुन गल्लीत तर गल्लीतून कधी गढीच्या पायऱ्या उतरत डोहाचा तळ उतरू लागे. पण प्रभाकर व आत्याचं लक्ष गेलं की ते तिला हात धरुन पुन्हा घरात परत नेत.
आषाढ पौर्णिमा संपली व घडीची रात सुरु होत चंद्र कले कलेने कमी होऊ लागला तसा आषाढ अधिकच झडू लागला. रात्रंदिवस झडीनं सतोना चिंबाड होत भिजू, पाझरू लागलं. तसं तळाच्या शोधात डोहात उतरणाऱ्या दिपाला काहीतरी गवसू पाहत होतं व त्यासाठी पडत्या पावसात झडी अंगावर घेत ती बाहेर निघू लागली.
जेवण आटोपून नानजी नाना, प्रभाकर झडकनानं झोपले. आत्या ही शशांकला घेत दिपाला गोळ्या देत झोपली. रात ओली होत होत भिजत भिजत चढू लागली. आढ्याकडं- कड्याकडं पाहणारी दिपा उठली व तिनं कुणालाच सासूल लागू न देता दार उघडलं व ती बाहेर पडली.
झडीचा जोर कमी होऊ लागला.पण आधीच्या सरीनं गल्लीत पणीच पाणी वाहत होतं. शेवग्याचं झाड अंधारात भिजत मलूलपणे पाने मिटत कुडकुडत असावं बहुतेक. त्याकडं पाहताच दिपा थबकत डोहात उतरू लागली. त्याच धुंदीत ती पुढं सरकली. वाटेतलं दार ठोठावलं.
" कोण?" झोपेच्या धुंदीत शंकर काकानं आवाज ऐकताच विचारलं.
" लल्ला...!"
" एवढ्या रात्री काय काम आहे लल्लाशी? झोपूही देत नाही.तो स्टॅण्डच्या दुकानात झोपलाय!" शंकर काका त्रागा करत उत्तरला व धुंदीतच झडकनाचं गोधडी पांघरत झोपला.
दिपा पुढं सरकत गढीच्या पायऱ्या उतरू लागली. आता झडीची सर थांबली होती व ढगही सैरावैरा धावत होते. मध्येच घडीच्या चंद्रास खुलं करत प्रकाश फेकू देत होते तर मध्येच काळा ढग अंधारी पांघरत सरीनं झोडपत होता. दिपा पूर्ण भिजली. ती अंधार उजेडाच्या व सरीच्या या खेळात गढीच्या पायरीवर बराच वेळ बसली व डोहात उतरत राहिली. ती जसजशी उतरत होती तसतशी लल्लाला शोधू लागली.
ती पायऱ्या उतरत बस स्टॅण्डच्या चौकात आली. चौकात एकदम सुन्नता होती. दुकानाच्या आडोशाला कोरड्या जागेत खड्डे कोरत कुत्री ऊब शोधत पहुडली होती. दिपाची चाहूल लागताच ती कान टवकारत जागेवरुनच गुरगुरली. पण पुन्हा पाऊस सुरू झाला म्हणून कुत्रीही शांत झाली. सर्दाळ वाऱ्यानं लिंबाची झाडं शहारत हलताचं पाण्याचे टपोरे थेंब व झाडावरील उरल्या सुरल्या पिकून आवठलेल्या लिंबोळ्या दुकानावरच्या पत्र्यावर पडू लागल्या. त्यानं दुकानात पडून असलेल्या लल्लानं कुस बदलवली.
दिपा स्टॅण्डवरील डबक्यातून चालत दुसऱ्या लिंबाखाली उभी राहिली. पण डबक्यातील चिबुकडिबूक आवाजानं लल्ला उठला व बाहेर कोण फिरतंय म्हणून पाहू लागला. तो बाहेर येताच लिंबाखाली कोण म्हणून पाहू लागला व त्याच वेळी थंडीनं कुडकुडणारी व डोहात उतरणाऱ्या दिपानं जोरात
"लल्ला" म्हणून आरोळी ठोकली. लल्ला पळतच लिंबाकडं गेला. एवढ्या रात्री व भर पावसात दिपाचा आवाज ओळखताच तो ही बेभान झाला. लल्लाला आपल्याकडं येतांना पाहताच डोहाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या दिपाला ठाव लागला म्हणून की वेडातच पण दिपा त्याला बिलगलीच.नाईलाजानं लल्लानं तिला गच्च धरत परत आणलं. दिपाच्या स्पर्शानं लल्ला विरघळलाच पण त्याच्या स्पर्शानंही डोहात पेरणीच्या प्रसंगाचा ठाव लागलाच.
" लल्ला ....लल्ला......हा पायातला काटा......."
बस्स.या एकाच वाक्यानं लल्ला ढासळला व डोळ्यात महापूर लोटला.
" दिपा.....दिपा......शुद्धीत ये! निदान जुन्या आठवणीच्या हिंदोळ्यावर बसुध का येत नाही पण शुद्धीवर ये!"
लल्लानं तिला घरी आणलं.
दार ठोठावताच आत्या ,नाना, प्रभू सारे भांबावून उठले.
दिपा व लल्लाला भिजल्या अवस्थेत पाहताच एकच गिल्ला करत काही विचारणार तोच लल्ला रडतच कडाडला.
" नाना, दिपा तर ठार वेडी झालीय पण आपण तर शुद्धीत आहात ना! मग कोणती ही झोप? स्टॅण्डवर भर पावसात ही आली तोवर.....?"
आत्यानं तिला मध्ये नेत कपडे बदलवले. पण दिपाचं कशा कशावरच लक्ष नव्हतं. पुढच्या खणात येताच ती लल्ला लल्ला करत लल्लाकडं धाव घेऊ लागली.
बऱ्याच वेळेनंतर लल्ला घरी निघाला पण ना त्याला परतावंस वाटत होतं,ना दिपाला त्याला जाऊ द्यावंस वाटत होतं.
दिपाला आता डोहाचा ठाव मिळाला की ती लल्ला ,आत्या, नाना, शशांकला ओळखू लागली. ओळखताच रडू लागे. आत्यानं ओळखलं की आपण व इंदुनं जिजाच्या जाण्यानंतर शशांककडं पाहत दिपावर अन्यायच केला. दिपा व लल्लाबाबत आपणास काहीच कळलं का नाही? आता कळून उपयोग नाही. पण दिपा पूर्ण बरी होईल केवळ लल्लामुळंच. म्हणून आत्यानं लल्लाला बोलवत मनातला कढ बाहेर काढत दिपाला काहीही करून या वेडातून बाहेर काढण्याबाबत विनवलं.
लल्ला शाळा करत वेळ मिळेल तसा प्रभाकरला घेत दिपास फिरवू लागला.
शाळेच्या आवारात दिपाला बसवत आत्या मंदिराकडं निघाली. प्रभाकर काॅलेजमध्ये व लल्लाही आहेच पाहून त्या बिनधास्त होत मंदिरात गेल्या. माई मॅडम व देठे सर काही कामानिमित्त नेमक्या त्याच वेळी शाळेत आले. माईनं आवारात बसलेल्या दिपाला पाहिलं नी त्यांच्या उरात आग भडकली. या दिपानं आ
पल्या लल्लास फसवलं म्हणूनच हिला वेड लागलं हे बरंच असंही त्यांना एकवेळ वाटलं. माई मॅडमनं तिच्याकडं दुर्लक्ष करत कार्यालय गाठलं. दोघांनी आपलं काम आटोपलं तोच तास संपवून लल्ला कार्यालयात आला. माई व सरांना पाहताच त्याला आनंद झाला.
देठे सर इतर सहकाऱ्याशी बोलण्यासाठी निघाले. तोच माईनं लल्लाकडं विषय काढलाच.
बोलता बोलता ते आवाराकडं आले.
" लल्ला, समोर बघ,. लोक किती बदलतात व त्याचा परिणाम ही भोगतात!" माई लल्लाप्रति असलेल्या पुत्रवत प्रेमापोठी बोलल्या.पण लल्लाच्या उरात डागणी बसली. तो काहीच बोलला नाही पण त्यानं माईस दिपा बसली होती तिथं नेलं. माईनं जवळपास दोन वर्षानंतर आप्रथमच दिपाला पाहिलं. लल्ला तिला घरी घेऊन आला होता त्यानंतर आजच त्या दिपाला पाहत होत्या.
लाकडाच्या बाहुलीगत झालेल्या दिपाला माई निरखू लागल्या.
कपाळावरचं कुंकू व गळ्यातलं मंगळसुत्र पाताचमाईला भडभडून आलं. यावर लल्लाचन नाव असतं तर.....! तोच त्यांच कानातल्या डुलावर लक्ष गेलं. दिपाच्या अंगावरकिती तरी नविन अलंकार चढले होते. तोच माईची नजर बसलेल्या दिपाच्या पायावर गेली. माई जागेवरच थरथरल्या. त्यांनी पायातल्या साखळ्या अचूक ओळखल्या. इतक्या बदललेल्या अलंकारातही वैशिष्ट्ये पूर्ण साखळ्या त्यांनी लगेच ओळखल्या. माई तशाच जवळ जात पायातल्या साखळ्यांना हात लावणार तोच....आतापर्यंत माईकडं अनोळखी नजरेनं पाहणारी दिपा ऊर चिरणाऱ्या वेदनेनं कळवळली.
" माई, यापुढं या साखळ्या कधीच पायातून उतरवणार नाही...." माईनं तिला रडतच मिठी मारली.
" माई...माई.....लल्लानं घातलेल्या त्या साखळ्या आहेत. मी मरेन तरी उतरवणार नाही!" दिपाला ठाव सापडला होता म्हणून ती माईला गच्च गच्च आवळू लागली.
" माई , एकवेळ साखळ्या तुटतील पण सुंदरानं गोंदलेलं मयुर गोंदण कोणीच काढू शकत नाही. त्या मयुर गोंदणासहीतच मला मरण यावं हेच आता त्या विठ्ठलाकडं व जवळच्या यात्रेतल्या देवीकडं मागणं..."
.
." दिपा ,मला माफ कर गं! लल्लाचं दु:ख पाहून मला तुला ओळखता आलं नाही!"
" माई... साखळ्या तुटोत, खंडोत, पण काळजात उठलेल्या मयुर गोंदणासाठी गोंदवणारी माणसं कायम सुखात राहोत हीच एक भाबळी आशा आता!" लल्ला उरात रूतणारा खिळा हलवू लागताच माई हंबरू लागल्या.
" विठ्ठला! कोण तो माखन? ज्यानं यांच्यासाठीसाखळ्या घडवल्या! कोण ती सुंदरा? जिनंमयुर गोंदण गोंदलं! दोघंही चालती झाली तशीच समाज रितीनं यांच्यात तटबंदी उभारली.तरी हे दोन जीव का हा पट पुन्हा मांडूपाहत आहेत? विध्वंशाशिवाय यांच्या हातात काय सापडणार? यांना हे कसं समजत नाही?"
" माई पुन्हा पट कोण मांडतंय? पण वाटेवर रेंगाळणाऱ्या नरदा ती वाट तुडवतांना सलतात. त्या नरदांना वाट तर दाखवावीच लागेल!"
माई व दिपाला लल्लाचं बोलणं उमगलंच नाही. पण दिपाला बरंच काही आठवायला लागलं हे लल्लाला मात्र पुरतं उमगलं.
तोच आत्या आली मग लल्लानं दिपास आत्यासोबत पाठवलं.
डाॅ. डिसुजा रविवारी येणार होते तो पावेतो दिपाला डोहाचा पुरता ठाव लागला व ती आता डोहात हवं तेव्हा शिरत ठाव घेत काठावर परतू लागली. प्रत्येक वेळी ती नवनवीन जुन्या आठवणी आणू लागली. पण त्यात आपणास जिन्यावर कुणी पाडलं व का पाडलं या आठवणीचा ठाव लागला नी भल्या रात्री किंचाळू लागली. आपल्या डोक्यात आपलेच घनाचा घाव घालत आपल्या कवठीच्या ठिकऱ्या उडवत मेंदूचा चेंदामेंदा करत आहेत असा तिला भास होत ती डोकं धरधरून किचाळू लागली. नाना, आत्या उठत तिला बिलगत शांत करू लागले. बऱ्याच अवधीनंतर ती थरथरत शांत झाली. पण नंतर शांतपणे विचार करत मनात तिनं काही तरी ठरवलं.
दिपानं पुरता ठाव लागूनही पुढे काय होणार हे ओळखून तूर्तास वेड पांघरूण ठेवण्यातच भलाई आहे असं ठरवत ती पुन्हा पूर्वीसारखीच अर्धवट सुध आल्यासारखीच दर्शवू लागली. आता तिला लल्लाची भेट घेत लवकरात लवकर लल्लास सारं सांगत शशांक व आपणासाठी काही निर्णय घेण्याची गरज भासू लागली. त्यासाठी ती तशीच लल्ला लल्ला करत वेड्याचं सोंग घेत लल्लाची भेट घेण्यासाठी संधी शोधू लागली.
साकीहून दोन दिवसात भैय्यासाहेब दिपाला घ्यायला येत असल्याचा फोन आला. त्याच रात्री दिपानं लल्लाची भेट घ्यायचं पक्कं केलं.
संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. तसा दिपाला जोराचा झटका आला. सारे जण पुन्हा चिंतेत गोळा झाले. दिपा तशीच झोपली मग कडूमडू करत साऱ्यांनी जेवणं उरकली व झोपले. बऱ्याच रात्री सामसूम होताच दिपा उठली. बाहेर आता पावसानं विसावा घेतला होता. ती वेड्याच्या भरात भटकत निघाली. स्टॅण्डवर येताच तिनं लल्लाला दुकानातून उठवलं व शाळेच्या आवाराकडं नेलं. लल्लास दिपाचं वेड चांगलं होतंय की त्यात आणखी भर पडतेय या बाबत शंका येऊ लागली.
आवारात येताच झाडाच्या पारावर ती बसली.
" लल्ला, ऐक मी जे सांगतेय ते पूर्ण शुद्धीत सांगतेय!"
" दिपा! पूर्ण शुद्धीत आहेस तर मग अशा रात्री इथं थांबणं उचीत नाही. आता घरी चल. उद्या सकाळी जे सांगायचं ते सांग!"
" लल्ला, जिजाक्का गेली .शशांकसाठी मी साकीची वाट धरली. ती वाट धरतांना तुला ज्या वेदना झाल्या असतील त्याच्या कैक पट वेदना मला झाल्या. तरी शशांकसाठी मी साऱ्या वेदना सहन करत तुला विसरण्याचा प्रयत्न करत उरात सारं मयुर गोंदण थांबत तडजोड करण्याचा निर्णय घेतला."
" दिपा, ऐक. तु चांगली झाली. यातच मला सारं पावलं. आता चल घरी व लवकर साकीत परत सुखानं रहा.यातच मला....!"
" लल्ला......मला माहितीय रे! तू हे सारं का बोलतोय! पण.."
" दिपा... जुना विस्कटलेला पट आठवत नरदा मांडण्यापेक्षा शहाण्यांनी नवीन मांडलेल पटावरच लक्ष द्यावं!"
" लल्ला मला माहीत आहे की मी चांगली होईपर्यंतच तू जुन्या नरदेस वाट दाखवत होता. पण निदान एक वेळा तर ऐकून घे! अरे तू माझ्या ज्या सुखासाठी तू मला टाळतोय ते सुख कसं आहे ते तर जाणून घे!"
" दिपा ,तुझा संसार तो तुझा आहे. त्यात मी जाणून काय करणार?"
" लल्ला, माझा संसार! " ती एकदम भकासपणे हसू लागली.
"लल्ला, त्या भैय्यानं केवळ मागचा वचपा काढण्यासाठीच पट मांडलाय फक्त. त्या पटात माझ्यासाठी चाल नाहीच. केवळ बळीचा बकरा यासाठीच माझं पटावर वावरणं."
" दिपा तरी संसाराचा पट सांभाळता सांभाळता झिजणं हा ही संसारच!"
" लल्ला, साकीत परतणं म्हणजे माझा व शशांकचा मृत्यू अटळ आहे! मग मी का पुन्हा मृत्यूच्या कराल दाढेत परतावं?"
" मग नेमकं तू काय ठरवलंय?"
" लल्ला, त्यासाठीच मला तुझी साथ हवीय! मला शशांकसाठी त्या साकीला व त्या इंगळेच्या वाड्यापासून कायमची फारकत घ्यायचीय!"
लल्लानं हे ऐकलं नी त्याला पावसाळी थंडीतही दरदरून घाम फुटला.
" कायमची फारकत ते देतील का? आणि मग पुढे काय?"
" ते देणार नाहीतच. पण शशांकला घेत मला दूर दूर कुठंतरी तू ने!"
हे ऐकताच एकतर दिपा वेडातून पूर्ण सावरली नाही किंवा आपल्या प्रेमापोटी ही हे सारं बोलतेय हे ओळखत लल्ला तिला धीर देऊ लागला.
" दिपा, आपला पट नवीन मांडणं शक्य नाही. त्यात शशांकचं आयुष्य उमलण्याआधीच कोमजेल. निदान शशांकसाठी तरी तू हा आततायीपणा करु नको "
" लल्ला, ज्या शशांकसाठी मी तुला सोडत साकीत गेले,त्या शशांकसाठीच मला साकीत परतावंसं वाटत नाही. त्या कराल दाढेत केवळ माझं मरणच राहिलं असतं तर ते ही मी स्विकारलं असतं पण त्यासोबत शशांकच्या जिवीतास ही धोका आहे रे! समजून घे!"
" अगं हे कसं शक्य आहे. मरणं - मारणं वाटेवर पडलंय का? कुणी असं कसं वागू शकतो?" लल्ला अविश्वासानं दिपास सांगू लागला.
" लल्ला ज्यानं भावास व वहिणीस सोडलं नाही त्याला काय शक्य नाही? पण जाऊ दे! आता मला वेड्याचं सोंग पांघरतच शशांकचं रक्षण करावं लागेल. पण मला एक कळत नाही की या दिड दोन वर्षात तू इतका कसा बदललास? या दिपाशिवाय तू कसा जगू शकतोस?"
" दिपा ,प्रश्न बदलण्याचा नाही. माणसानं निष्ठा या दाखवण्यापेक्षा त्या वागण्यात भिनवल्या पाहिजेत!"
लल्ला अंधारात पाहत मनातल्या मनात
कळवळला.दिपा तुझ्या आठवणीत एक वेळा मरण पत्करेल पण तुझ्या इभ्रतीस बट्टा लागू देणं कसं मानवेल.
" दिपा , आता तू साकीत परतायला काहीच हरकत नाही. कोण काय करणार नाही. नी एक यापुढं तुला भेटणं वा तुही मला भेटणं आपण टाळलं पाहिजे!" लल्लानं तिला समजावलं व घरी सोडलं.
दिपा वेडातून सावरतेय व त्यामुळेच असं काही तरी बडबडतेय असंच लल्लास वाटलं व आता त्यानं माघार घ्यायचं ठरवत पूर्वीप्रमाणंच आठवणीत व कामात स्वत:ला झोकून द्यायचं ठरवलं.
दिपानं 'आपण लग्न केलं यामुळं लल्ला दुरावला व तो आता आपणास स्विकारणार नाही' हे ओळखलं. काही दिवसांपासून आपल्याला वेडातून बाहेर काढण्यासाठीच तो मदत करत होता. पण तो पुन्हा आपणास स्विकारणार नाही हे कळताच तिनं वेड्याचं सोंग तसंच सुरू ठेवत भैय्यासाहेब पुढं काय करतोय हे पाहण्याचं ठरवलं. शशांकचं रक्षण करणं ,त्याच्या रक्षणासाठी आपण जिवंत राहणं आवश्यक आहे हे तिनं पुरतं ठरवलं.
भैय्यासाहेब बालास घेत साकीत मुक्कामाला आले. नानजी नानाकडं येत त्यांनी शशांकला मांडीवर घेत दिपाची चाचपणी केली.
"नाना, काय म्हणते दिपा?"
" भैय्यासाहेब, बराच सुधार पडलाय दिपात!"
" अरे व्वा आनंदच!" भैय्यासाहेबांनी दिपाचा हात आपल्या हातात घेत तिच्या डोळ्यात पाहिलं.
" दिपा, लवकर बरी हो. त्यासाठी तर उद्या आपणास जळगावला जायचंय! तू बरी झाली की मग तू माझा सारा हिशोब घ्यायचा हवं तर!" दिपाला हातावरील दाब वाढतोय हे जाणवू लागलं व सोबत 'हिशोब' शब्द ऐकताच छातीवरही दाब जाणवू लागला.
" दिपा मागचं सारं विसरत मला नविन हिशोब दाखवायचाय गं तुला!" भैय्यासाहेब खोचक बोलले.ते नानास नाही पण दिपाला लगेच कळले.
" लल्ला ....लल्ला.....!" करत दिपा मुद्दाम भैय्याला बिलगू लागली.
' लल्ला' ऐकताच भैय्यासाहेबाच्या काळजात सुरी फिरली.
त्यांनी दिपाला जोरानं दाबत
" तेच म्हणतोय गं मी! तो तर हिशोब....." दिपाच्या काळजात मात्र धस्स झालं.
सकाळी भैय्यासाहेब जळगावला परतण्याआधी बाला मार्फत लल्लास भेटलेच.
कृष्णराव बापूंच्याच संस्थेत कृष्णरावांशी बऱ्याच गप्पा मारल्या.
" भैय्या, तुझे वडील चांगले मित्र होते रे! त्यांच्यानंतर तू सारं सांभाळलं पण तसं माझं सांभाळणारे कुणीच नाही. आता हयातीच्या उतरणीवर एवढी मोठी संस्था नाही सांभाळली जात. बघ कुणी घेणारं असेल तर हे सारं संकुल विकायचं आहे!"
बापू बोलले पण भैय्याला खेड्यात संस्था घेण्यात स्वारस्य नव्हतं. त्यांना जळगाव शहरात वा जवळपास हवी होती.
बापू, बघतो कुणी तयार असेल तर पंधरा वीस दिवसात कळवतो!" सांगत ते लल्लाची वाट पाहू लागले. बाला लल्लास घेऊन बापूकडंच आला.
" बाला, लल्ला या! काय चाललंय बाला तुझं!"
" बापूसाहेब, तुमच्या गावाचा बाला आता लवकरच मोठा क्रिकेटपटू होणार!" सोबत आलेल्या लल्लाकडं तिरकस पाहत बालाऐवजी भैय्यासाहेबच बोलू लागले.
" भैय्यासाहेब हाच तो माझा मोठा भाऊ, लल्ला!" बाला ओळख करून देत म्हणाला.
भैय्याच्या डोळ्यात खूप खवळाखवळ होऊ पाहत होती ती दाबत भैय्या बोलू लागला.
" अरे यालाही ओळखतो मी. नवरात्रीच्या स्पर्धेवेळी याचा खेळ पाहिला होता मी! हा पण खेळ खेळण्यात माहीरच दिसतोय.पण खेळाडूस मैदान मिळालं नाही की मग तो खेळाडू नको ते उद्योग करतो बघ!"
लल्लानं वर मान करत भैय्याकडं पाहिलं.
भैय्यासाहेबांनी उठत लल्लाच्या खांद्यावर हात ठेवत बोलता बोलता बाहेर पटांगणाकडं आणलं. बाला बापूंशी बोलत थांबला.
" लल्ला मोरे? बरोबर ना तुझं नावं? लल्ला तुझा भाऊ मोठा खेळाडू होऊ शकतो मग तू का नाही? तुला तर मोठा खेळाडू बनवतो मी. पण बदल्यात फक्त एक माहिती हवी मला?"
लल्ला एकदम बुचकळ्यात पडला. बालाच्या अकादमीचा मालक हा! दिपाचा नवरा ही ! त्याला काय बोलावं काहीच कळेना.
" लल्ला बोल. शांत का झाला?"
" का ..क्काय विचारायचं?"
" आमच्या सौभाग्यवती दिपाबाई वेड्या झाल्यात.त्या सारं विसरल्या. पण विसरता विसरता तुझं नाव मात्र स्मरणात ठेवलं. तुमच्या दोघात असं कोणतं सख्य आहे की तुझं नाव ती विसरली नाही एवढंच उत्तर हवंय मला? उत्तर तू द्यायचं व आम्ही बदल्यात नव्यानंयेऊ घातलेल्या आय. पी. एल. संघाचं दार तुला थेट उघडून देणार!"
भैय्यासाहेबानं आडफाट्यात न शिरता थेट फाट्यावरच लल्लास गाठलं.
" म्हणजे काय विचारायचं तुम्हाला?"
" शहाणपत्ती कराल तर सुवर्णसंधी गमवाल.त्यापेक्षा सरळ सरळ सगळं कथन कर नी ..."
आता लल्लानंही थेटच चेंडू टोलवला.
" अहो! दिपा का बोलतेय ते तिलाच माहीत. मला एवढंच माहीत की कुणाचा टेकू घेत संघाची दारं उघडत नसतात. आपल्यात खेळ जिवंत असेल तर ते आपोआप उघडतात!"
" बघ विचार कर! भले तू काहीच न सांगता जाशीलही पण मग बाला संघाचं दार कसं उघडतो त्याचं काय?"
" दिपा काॅलेजात होती व कदाचित खेळ पाहून तिच्या मनात माझं नाव कोरलं गेलं असेल एवढंच. या उपर बाकी मला माहीत नाही. बाकी राहिला प्रश्न बालाचा तर त्याचं तो पाहील!" म्हणत लल्ला निघू लागला.
भैय्या मनात चडफडला.
लल्लाला मात्र आपणास दिपासाठी पहिल्यांदाच खोटं बोलावं लागलं या गोष्टीचं वाईट वाटू लागलं.
भैय्यासाहेबानं संतापात बालाला सतोन्यातच ठेवत दुपारून दिपा,शशांकला जळगावला नेलं. दिपानं वेड्याचं सोंग पांघरलं होतं तरी ती कसायामागं गायीनं जावं तशीच निघाली. सोबत प्रभाकरही गेला.
.
.
क्रमशः....
. वा......पा.....