खुमखुमी- १३- Marathi Bhaykatha Special Stories
'याद सोलणं' हे किती किती सोईचं असतं हे याद सोलणाऱ्यासच कळतं. केव्हाही मनाच्या गाभाऱ्यात सहज डोकावून येता जाता आपल्याला हव्या त्या आठवणी बाहेर काढत आठवणी मांडणं व हव्या तेव्हा गुंडाळत पुन्हा मनाच्या गाभाऱ्यात ठेवणं खूपच सोईचं असतं. आठवणी कशा त्यावरुन कधी सुखाचा गारवा तर कधी दु:खाचे चटके जे हवे हवे वाटतात ते कुणालाच तोशीश न लागता अनुभवता येतात.
दिपाला सतोन्यात येऊन बरेच दिवस झाले तरी लल्ला भेटावयास गेलाच नाही. एवढ्या दिवसात दिपाला निदान एका वेळेसही भेटावं वाटू नये याचा त्याला राहून राहून विषाद वाटत होता. दिड वर्षांपासून जिच्या आठवणीनं आपण होरपळतोय ती न सांगता लग्न करत निघून गेली. बहिणीच्या मुलासाठी मजबुरी म्हणून आपण ते ही स्विकारत तिच्या आठवणीत जगायचं ठरवत दिवस काढतोय पण गावात येऊन ही भेटू नये यानं तो खचलाच. म्हणून त्यानं कदाचित ती तिच्या संसारात सुखी झाली असावी म्हणून पुन्हा तो लळा नकोच. त्यापेक्षा पूर्वीसारखंच जुन्या मृण्मयी सोनसळी आठवणीत जगणंच बरं असं ठरवत तो दिवसा शाळेत रमू लागला . सायंकाळी बाबांना धंद्यासाठी लागणारा साऱ्या वस्तूची जमवाजमव करु लागला. शाळेत लागल्यापासून त्याचं पूर्वीचं वागणं बदललं होतं. पण तरी गावात येऊनही दिपा भेटत नाही म्हणून त्याला दिवसा नाही पण रातीला झोप येईना. अंधारात तो डोळे टांगत आठवणीचा गोतावळा मांडत खेळत राही.
गोता आत्याला दिपाची स्मृती गेली तरी लल्लाचा जप जपतेय तो नेमका गोटनबाबाचाच लल्ला का? हे जाणून घ्यायचं होतं. लल्ला व दिपाचे काही संबंध आहेत की स्मृती जातांना ओघाओघानं लल्ला नाव सहज लक्षात राहिलं असावं हे शोधण्यासाठी गोता आत्यानं दिपा आली तरी तिला बरेच दिवस बाहेर निघूच दिलं नाही. डाॅक्टरांनी दिलेल्या गोळ्या देत आत्या तिला घरातच सांभाळी. लल्लाला कळताच यांच्यात काही असेल तर तो भेटायला येईल किंवा ही तरी प्रयत्न करेल म्हणून आत्या लक्ष ठेवून होती. पण बरेच दिवस होऊनही ना लल्ला आला ना दिपानं कधी गोटण बाबाचं घर गाठलं. मग गोताबाईनं दिपाला हळूहळू बाहेर फिरावयास सुरुवात केली.
दिपा औषधाच्या गुंगीत झोपूनच राही. जाग आली की ती आढ्या कडं, शून्यात पाहत राही. जर कुणी जवळ आलंच तर केवळ ' लल्ला' हा एकच शब्द . मग प्रभाकर असो, नानजी नाना असो की आत्या. साऱ्यांनाच 'लल्ला' हे एकच नाव. तिच्या असल्या हालातीनं गोताबाईच्या काळजात पीळ पडू लागला.
आषाढी एकादशी जवळ आली तशी सतोन्याच्या विठ्ठल मंदिरात तयारी सुरू झाली.
" लल्ला पोरा! पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुला नोकरी लागली ,उद्या एकादशीचं मंदिरात नारळ फोडून ये पोरा!" सरू आजी भरल्या काळजानं लल्लास म्हणाली.
लल्ला आपल्याच तंद्रीत जेवत होता.
" विठोबाला फोडलेलं नारळ पावलं बरं!,
लल्ला हल्ली देव मलाच ओरबाळायला लागला असंच घडतंय!" त्याला दिपाची वाक्ये आठवली.
" लल्ला काय झालं एवढं विचारात पडायला? मी विठोबाला मनात नवस केला होता पोरा, तुझ्या नोकरीचा! नोकरी लागली तर नवस फेडावा लागेल ना?" सरू आजी त्याला म्हणाली.
देवाचंही काही खरं नाही. कधी कुणाच्या मागच्या मागण्या तशाच बाकी ठेवतो तर कुणाच्या वेळेआधी पूर्ण करतो.
" आजी एकादशी उगवू तर दे. फोडेन नारळ,त्यात काय एवढं." लल्लानं जेवण आटोपतं घेत बस स्टॅण्डवरील दुकानात झोपायला जाणं पसंत केलं. पंधरा दिवसांपासून तो नदीवर झिंगाबाबाकडं फिरकलाच नव्हता. घरात लता मावशी शंकर काका, रमा निलू सारी गर्दी असल्यानं जागाच नसे मग तो दुकानावरच झोपत होता.
आपण एक वेळ दिपाला निदान पहायला तरी जायला हवं होतं. आजी व लता मावशी सांगत होत्या की तिला मागचं काहीच आठवत नाही. वेड लागलंय तिला. पण ती फक्त लल्ला लल्ला का करतेय हे कळत नाही या लता मावशीच्या प्रश्नानं आपणास थडकीच भरली होती. आपण भेटावयास गेलो नाही ते एका अर्थानं बरंच झालं. कारण आपण गेलो असतो व तिनं साऱ्यासमोर 'लल्ला' म्हणून हाक मारली असती तर पंचायतच. शिवाय कोणत्या कारणानं नानजी नानाकडं जावं.
'दिपाला पहायला आलो' हे सांगण्या इतपत हिम्मत नाहीच. लल्ला पडून पडून याद सोलू लागला.
गोता आत्यानं एकादशीचं दिपाला पांडुरंगाच्या दर्शनाला न्यायचं ठरवलं. निदान देवदर्शन वा तिथं दुकानात लल्ला असेलच त्याला पाहताच दिपाला काही आठवतं का हे तरी पहावं असा विचार करत प्रभाकरच्या मदतीनं पावसाची झडी थांबताच आत्या दिपाला घेत दहाच्या सुमारास निघाली. एका हातात छत्री, पुजेचं सामान घेत प्रभाकर व आत्या दिपाला आधार देत हळूहळू गडीच्या पायऱ्या उतरू लागले. दिपा शेवग्याचं झाडं, गोटणबाबाचं घर, पायऱ्या व तेथून खाली दिसणारं स्टॅण्ड, नाला, शाळा सारं सारं विचीत्र नजरेनं न्याहाळत पुढे पुढे सरकू लागली. दुकानावर शाळेला सुट्टी असल्यानं रमा व निलू होता. तिथं ती क्षणभर थबकली. प्रभाकर तिला पुढे नेऊ लागला. पण आत्याला आशा वाटू लागली. ती प्रभाकरला खुणेनंच शांत करत दिपाकडंच पाहू लागली. दुकानाकडं बऱ्याच वेळ पाहत ती पुढं सरकली. मंदिराबाहेर नारळाच्या दुकानावर लता मावशी व शंकर काका होता. लता मावशी आरोळ्या मारुन मारून गिऱ्हाईकांना नारळ विकत होती. दिपा पुन्हा तिथं थबकली. आता गोता आत्याला खात्री झाली व आपण इतके दिवस दिपास बाहेर काढलं नाही याचा पश्चात्तापही वाटू लागला.
दिपा दुकानाकडं निश्चल टक लावत पाहत 'लल्ला' बोलली व मंदिराकडं सरकू लागली.
लल्ला दिपाच्या आधीच लता मावशीजवळून नुकताच हलत मंदिरात नारळ फोडण्यासाठी निघून गेला होता. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊस नुकताच थांबला होता म्हणून अजुन म्हणावी तशी गर्दी नव्हतीच. लल्लानं देवापुढं हात जोडले व त्याची समाधी लागली.
" पांडुरंगा! जे मागितलं ते दिलंच नाही ?" बंद डोळ्यात आसवांनी पापण्यांना दूर लोटत कडा व गाल भिजवले. तो बराच वेळ तसाच उभा राहिला. येणारे जाणारे त्याकडं पाहत दर्शन घेत निघू लागले. त्यानं डोळे उघडत तसाच मागं मागं सरकत तो गाभाऱ्याच्या बाहेर सभा मंडपात आला. पुन्हा हात जोडत डोळे मिटले. तोच कुणाचा तरी धक्का लागला पण तिकडं दुर्लक्ष करत तो तसाच वळला व हातातलं सोललेलं नारळ बाहेर येत फोडू लागला.नारळाचा प्रसाद ठेवण्यासाठी तो मंदिरात पुन्हा जाणार तोच ....तोच....समोर पाहताच तो थरथरला. त्याच्या सर्वांगातून वीज गेली. दिड वर्षानंतर तो समोर दिपाला पाहत होता. गालाची चिपाडं झालेली, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, शुक्ल काष्ठागत. गोता आत्या हात जोडून उभीय व प्रभाकर नारळ फोडायला बाहेर गेलाय तोच धक्का लागला तेव्हापासून ती मागेच सरकत उभी राहत लल्लाकडं पाहत होती. लल्ला गेला, नारळ फोडलं व परत मंदिरात आला तरी ती एकाच जागी स्थीर. खोल खोल डोहाचा ठाव घेण्यासाठी एखाद्याने दम रोखत डोहात शिरावं,खोल खोल जात समोर तळ दिसू लागावा आता बस्स हातात ठाव येणार तोच कोंडलेल्या श्वासानं दगा द्यावा व जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने ठाव तसाच राहू देत माघारी फिरावं तसंच दिपाच्या मेंदूत हालचाली झाल्या. मी कोण? हा कोण? हे शोधण्यासाठी ती मेंदूच्या वळ्यात, घळ्यात खोल खोल शिरू लागली. तिची स्मृती चाळवली जाऊ लागली. हाताशी काही लागतंय, ओळख पटतेय तोच प्रचंड ताण पडताच तिच्या स्मृतीनं दगा दिला व तिची शुद्ध हरपली. ती माघारत जिथं होती तिथंच परतली.
लल्ला,प्रभाकरनं तिला आधार देत सावरलं. तो पावेतो लोक ही जमले. साऱ्यांनी उचलत तिला घरी आणलं. गोता आत्यास आता पुरती आशा वाटू लागली. घरी आणताच ती शुद्धीवर आली पण लल्लाला पाहूनही डोहात उतरत ठाव शोधण्यासाठी दम कोंडला जातोय म्हणून ती आता डोहात शिरायला घाबरू लागली व काठावरच थांबली. जवळ प्रभाकर होता. त्याकडं पाहत ती ' लल्ला, लल्ला' बोलू लागली. लल्लानं मनात उचंबळणारा सागर महत्प्रयासानं थांबवला पण त्याला तिथं थांबणं जड होऊ लागलं.
" लल्ला, आमच्या दिपानं कुणाचं काय वाईट केलं होतं कळत नाही पोरा की तिला हे दिवस यावेत! तिला काहीच आठवत नाही. पण तुझं नाव का घेतेय ते मात्र कळत नाही?" गोताताईच्या सवालानं लल्लाच्या पायाखालची जमीन सरकू लागली. तरी त्यानं मौन पाळलं.
" लल्ला दिपानं तुला पाहिलं नी तिची शुद्ध हरपली.बघ तिची स्मृती परत येईल यासाठी काही तरी कर पोरा!"
" ताई, दिपा लवकर चांगली होवो पण मी काय करणार?"
" ते ही खरंच! पण तरी तुला पाहताच तिला काही तरी जाणवलं. म्हणून निदान अधुन मधुन येत तरी रहा! बघूयात काय होतंय"
आता दिपाजवळ शशांक होता. त्याच्याकडे पाहत ती लल्ला लल्ला बोलत होती.
लल्ला तेथून निघाला. घरी येताच त्यानं दार लोटलं. घरात कुणीच नव्हतं. तो हंबरू लागला. दिपाची अवस्था पाहून त्याच्या उरात आग होऊ लागली. आपण समजत होतो की दिपा सुखी असावी. पण दिड वर्षानंतर शुक्लकाष्ठासारखी तिची अवस्था पाहून तो तडफडू लागला. आपण तिला आधीच भेटायला हवं होतं याचा त्याला पश्चात्ताप होऊ लागला.
गोता आत्या आता दिपाला दररोज मंदिरात नेऊ लागली. कधी शाळेच्या मोकळ्या पटांगणात फिरवू लागली. येता जाता दुकान व गोटण बाबाच्या घराजवळ थांबू लागली. लल्ला जिथं असेल तिथं गोता आत्या मुद्दाम नेऊ लागली. शेवग्याचं झाडं, गोटण बाबाचं घर, दुकान, शाळेचं पटांगण व लल्लाला पाहताच दिपा डोहात उतरू लागली. पण थेट तळ न गाठता. तळापर्यंत दम टिकवण्याचा सराव करू लागली. मेंदूत हालचाली होत, घड्या चाळवल्या जात विस्कटू लागल्या व दररोज काही तरी जाणवू लागलं. लल्लाला अजुनही ओळखत नसली तरी दिपा जे पाहत होती त्यात तिला ओळखीचं काही तरी जाणवू लागलं. लल्लाही पटांगणावर दिपा दिसली की काही तरी निमीत्त काढत वर्गातून पटांगणांकडे येई. सुटी असली की दुकानात थांबत दिपाच्या रस्त्यावर वाट पाहत राही. आपण जे करतोय त्यानं काहीच हासील होणार नाही. जे करतोय ते चुकीचंच. पण स्मृती जाऊनही आपलं नाव तेवढं आठवणीत राहिलं हा योगायोग नसून कुठ तरी भिज ओल शिल्लक आहे. जी आपणास काहीच कामाची नाही. पण तरी दिपाची स्मृती परत येईल तर ती केवळ आपल्यामुळेच. कारण मंदिरात आपणास पाहूनच ती बेशुद्ध पडली. मग स्मृती येईपर्यत तरी आपण मदत करायलाच हवीच. त्यानं विठ्ठलाकडं मनातल्या मनात पुन्हा धावा केला.
" बा पांडुरंगा ,माझ्या दिपाची स्मृती लवकर परत येऊ दे. एकदाची स्मृती परत आली की मी स्वत: बाजूला होईन. मला ती सुखी असणं यातच सारं आलं. तिच्या आठवणीत मी सारं आयुष्य काढेन पण तिच्या संसारात अडथळा नाही होणार."
भैय्यासाहेबानं फाईल घेत जळगावला डाॅक्टराची भेट घेतली.
" मि. इंगळे या. पंधरा दिवसांनी मुंबई च्या डाॅक्टराची तारीख मिळालीय. डाॅ डिसुजा हे विख्यात न्युरोसर्जन आहेत. त्यांनी आपली सारी फाईल पाहिलीय. दिलेल्या तारखेला ते इथंच येणार.पेशंटला आणा .चेक अप करुन पुढचा निर्णय डाॅ.डिसुजा घेतील"
डाॅ. भोळेंनी सांगताच भैय्यासाहेब बाहेर पडत परतले. त्यांना अकादमीत जायचं होतं. पण त्यांनी ते टाळलं व ते तडक साकीस निघाले.
अकादमीत संध्या भैय्या साहेब येणार म्हणून सकाळपासुन तयार होती. सकाळी नऊ वाजता सराव थांबवत बालाला ऑफीसमध्ये बोलवलं.
" बाला! सराव कसा चाललाय?" संध्या खुर्चीत बसुन गाॅगल्समधून बालावर नजर रोखत विचारत होती.
" मॅम पावसानं व्यत्यय येतो पण तरी रोजचा सराव पूर्ण होतोच." बाला नजर कधी वर तर कधी खाली करत सांगत होता.
या मूर्खास खेळातलं सारं कळतं, पण आपल्या मनात काय चाललंय हे का ओळखता येत नाही? या विचारात संध्यानं खालचा ओठ दातात धरत जोरात दाबला. गोलंदाजाचं मन ओळखत प्रत्येक चेंडू ओळखत हा नजाकतीनं सहज सुंदर फटके मारतो पण आपण दिड दोन वर्षापासुन जे सांगू पाहतोय ते का ओळखत नाही हा? का ओळखून ही प्रकट करत नसावा? संध्याचा खालचा ओठ आता लालेलाल झाला होता.
" बाला , क्रिकेट क्षेत्रात जबरदस्त उलथापालथ होत आहे. लवकरच क्रिकेट, क्रिकेटपटूंना व अकादमीस चांगले दिवस येतील"
" हो मॅम ,ऐकलंय मी . बाळासाहैब मागच्या भेटीत आले तेव्हा सांगत होते"
बाळासाहेबाचा ( गुणवंतरावाचा) उल्लेख होताच ओठातून रक्त बाहेर आलंच. ती मनात संतापली.
" काय सांगत होते बाळासाहेब?"
" हेच की क्रिकेट नियामक मंडळ कमी षटकाच्या स्पर्धेसाठी प्रिमीयर लीग सुरू करणार असुन त्यासाठी फ्रंचायची खेळाडूचा लिलाव लावत विकत घेणार.म्हणून खेळाडूंना खूपच संधी मिळणार." बाला एका दमात बोलला.
संध्या जागेवरून उठली व बाला जवळ येत बोलू लागली.
" बाला, अकादमीतून कुणाची निवड होवो ना होवो पण तुझी निवड नक्कीच व्हावी !"
" मॅम तसं सर्वच चांगले खेळतात!"
" बाला कुणी नसलं की फक्त 'संध्या' बोलत जा!" संध्या बोलली पण बालाच्या मनात मोरपीस फुलले.
संध्या एवढ्या खेळाडूत आपल्यालाच का पुन्हा पुन्हा बोलवते,सोबत फिरवते याबाबत आपली शंका बरोबर आहे. आपणासही संध्या कायम सोबत रहावी असंच वाटतंय.पण ती अकादमीची मालक तर आपण..? शिवाय आपली परिस्थिती? म्हणून तो शांत राहत आलेला. पण संध्याच्या आजच्या एका वाक्यानं त्याच्या मनातील साऱ्या शंका दूर झाल्या.
" बाला, आज भैय्यासाहेब येत आहेत. तुझा होकार असेल तर .....त्यांना विचारतेच आज!" संध्याच्या हातात बालाचे हात केव्हा गेले हे बालाला कळालंच नाही.
वाट पाहून भैय्यासाहेब आलेच नाही म्हणून संध्यानं नुकताच घेतलेला मोबाईल लावला. भैय्यासाहेब सरळ घरी निघून गेल्याचं तिला कळालं. भैय्यासाहेबानं नंतर भेटण्याचं आश्वासन देत फोन ठेवला. पण पुढच्या रविवारी ही भैय्यासाहेब आलेच नाही म्हणून संध्यानं बालाला घेत साकीलाच निघायचं ठरवलं.
" संध्या ऐक! निदान संघात निवड होईपर्यंत तरी आपण थांबायला हवं. कारण जर का भैय्यासाहेबानं नकार दिला तर... शिवाय घरीही अजुन मोठा भाऊ लग्नाचा बाकी."
" बाल्या मुकाट बैस! मला लग्नाची घाई नाही रे.पण तो गुणवंतराव काय करेल याचा नेम नाही. नी भैय्यासाहेब त्याला होकार देऊन बसतील . त्यापेक्षा भैय्यासाहेब व राधाताईंना स्पष्ट सांगीतलेलं बरं. राहिला प्रश्न लग्नाचा तर ते संघात निवडीनंतरच होईल. नी संघात तुझी निवड तर कुणीच रोखू शकत नाही" संध्या गाडी तुफान वेगान साकीकडं नेत सांगू लागली.
" पण संध्या, भैय्यासाहेब तयार होतील?"
" आमचे भैय्यासाहेब माझ्या इच्छेस नकार देणारच नाही!" संध्या त्याच्या डोळ्यात पाहत त्याला धीर देऊ लागली. पण धीर देताना तिला तिचंच हसू येऊ लागलं. गुणवंतराव आमदाराचा मुलगा. भावी आमदारच. गडगंज संपत्ती. अकादमीतही भागीदारी.तर बाला कफल्लक .तरीही आपण बालाकडे का झुकलो?
बालाच्या खेळाच्या जादुनं या साऱ्या साऱ्या गोष्टी वर मात करत आपल्या मनाचा गाभारा बालाच्या प्रेमानंच व्यापला.
गाडी साकीत इंगळेच्या वाड्यासमोर उभी राहिली. संध्यासोबत बाला मोरे या खेळाडूस आलेलं पाहून भैय्यासाहेब चक्रावला. संध्यानं याला का सोबत आणलंय?
" बाला, काय म्हणतो खेळ, सराव?"
भैय्यासाहेब हल्ली दिवसाही धुंदीत राहत. आताही ते धुंदीतच विचारत होते.
" साहेब एकदम जोरात तयारी सुरू आहे" बाला घाबरत घाबरत बोलला.
रात्री जेवण झाल्यावर राधाताई, भैय्यासाहेब, बाला सारे बसले असतांनाच संध्यानं विषय छेडला.
" ताई ,हा बाला मोरे. दिपा वहिणीच्या गावाचाच,सतोन्याचा. आपल्या अकादमीत खेळतोय."
" अरे व्वा छान की!" राधाताई सहजतेनं म्हणाल्या.
" ताई, भैय्यासाहेब !.....…" संध्याची जीभ अडखळू लागली.
तोच भैय्याच्या डोक्यात एकदम विज चमकली. 'दिपा वहिणीच्या गावाचा' हे ऐकताच त्याच्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला. अडखळणाऱ्या संध्याचं बोलणं मध्येच कापत तेच विचारते झाले.
" बाला! तुमच्या सतोन्यात लल्ला कोण आहे रे?"
बाला संध्या काय नी कसं सांगतेय याच तंद्रीत असतांना भैय्यासाहेबाच्या प्रश्नानं भानावर आला.
" लल्ला माझाच भाऊ आहे साहेब! तसे त्या नावाचे इतर ही आहेत सतोन्यात! पण का साहेब ? काय झालं?"
भैय्याचे हात खुर्चीचे लाकडी हात दाबू पाहत होते. लाकडावर दाब असह्य होऊ लागला.
"काही नाही....." भैय्यासाहेबाच्या स्वरातला बदल राधाताईनं टिपला.
" भैय्यासाहेब, ताई ! मला या बालाशीच......ल..ग्..न...."
राधाताईंना कानात कुणीतरी सुरुंगाचाच स्फोट करतोय असंच वाटलं. पण त्या आधीच भैय्याच्या खुर्चीचा हात दाब सहन न झाल्याने दम तोडता झाला व खाली तुकडं पडलं.
' माझाच भाऊ' हे शब्द भैय्याच्या कानात शिश्याचा रस ओतत असतांनाच संध्याचे
'मला बालाशी लग्न..' हे शब्द आणखी त्यात भर पाडू लागले.
" संध्या बालाची घरची परिस्थीती कशी आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही .कारण तो गुणवान, धुरंधर खेळाडू आहे.म्हणूनच तू निवड केली असेल. पण तरी संघात निवड होईपर्यंत मी तुम्हास संमती देऊ शकत नाही" भैय्यासाहेब आतली आग दाबत बोलले.
" भैय्यासाहेब मलाही तेच हवंय. संघात निवड होईपर्यंत आम्ही थांबूच. पण तो पावेतो आपण इतरांना होकार देऊ नये म्हणूनच मी आपली संमती घ्यायला आलीय" संध्या आनंदानं म्हणाली व बालाकडं पाहू लागली.
मागच्या रविवारी संध्याचे काॅल आले तेव्हा त्यास संध्या गुणवंतरावाबाबत विचारण्यासाठी बोलवत असावी असंच वाटलं होतं. पण गुणवंतराव, सर्जेराव, रामोजीराव यांचे आपल्या आजोबांशी व वडिलांशी असलेलं बहुत सलोख्याचे संबंध तो ऐकून- ओळखून होता. पण तरी संध्यास नकार देता येणार नाही म्हणून दवाखान्यातून अकादमीत जाणं त्यानं टाळलं होतं. पण संध्या तर गुणवंत रावाऐवजी या भिकार बाल्यास घेऊन आली. आपल्या बहिणीची निवड एवढी भिकार असुच कशी शकते,त्याच्या मेंदूस मुंग्या डचू लागल्या. पण केवळ आपली लहान बहिण म्हणून व समोर राधाताई होती म्हणून त्यानं खूप खूपच संयमानं घेतलं.
" संध्या मी होकार देतोय. पण बालाची संघात निवड झाली तरच विचार करेन.अन्यथा कदापि ही नाही!" भैय्यासाहेबानं हळू पण नेटानं सांगितलं.
पण बालाची निवड होईलच हे संध्या जाणून होती व गुणवंतरावास भैय्यानं होकार देऊ नये म्हणून तिला भावाचं म्हणणं मान्यच होतं.
" संध्या, पोराचं नाव काय?" राधाताई झटक्यातून बाहेर आल्यावर विचारती झाली.
" बाला मल्लेश्वर मोरे" संध्या उत्तरली.
राधाताई थरथरली.
" पोरा नाव नवीन सांग"
" बाला मल्लेश्वर मोरे हेच!" बालानं नाव उच्चारलं.
राधाबाई 'मल्लेश्वर, सतोना, यांनी आणखीच थरथरल्या.
" तुझे वडील पहेलवान होते का? तुझं मूळगाव कोणतं?" राधाबाई आता सावध होत विचारू लागल्या.
" हो .मला आठवत नाही वडील.पण बाबा सांगतात. 'लौकी' गावाचे होते ते पहेलवान !"
राधाबाईचं ह्रदय धडधडायला लागत तव्यावर तळलं जाऊ लागलं.
" हे अलक्षा! तुझ्या मनात कोणता खेळ आहे? पुन्हा तेच चक्र का तू फिरवू पाहतोय?" राधाबाई मनातल्या मनात बडबडत ईश्वराचा धावा करू लागल्या तर भैय्यासाहेबांना 'मल्लेश्वर' नावापेक्षाही 'लल्ला माझाच भाऊ आहे!' हेच गरगर फिरू लागलं. ते राधाताई काय विचारतेय? संध्या कुणाशी लग्न करू इच्छीते याबाबी पेक्षाही त्यांना सतोन्यातील नवरात्रीच्या स्पर्धेतला सामना आठवला. ज्यात चीफ गेस्ट बनत तो गुणवंतरावासोबत गेला होता.ज्यात बाला पेक्षाही सरस खेळणाऱ्या मुलाच्या प्रत्येक फटक्यावर दिपा जल्लोष का करत होती. तोच तोच लल्ला असावा. त्या शिवाय का ती सारं विसरुन लल्ला लल्लाच बोलतेय.
.
.
लल्लाचा शोध लागला. त्यात त्याचाच भाऊ आपला मेव्हणा होऊ पाहतोय! त्यांच्या डोळ्यात उतरणारी लाली, अंतरातला अग्नी रोखण्यासाठी ते तडक उठत वरच्या मजल्यावर निघाले. धुंदी तर खर्रकन केव्हाच उतरली होती.
दिपे ,तुला आता लवकर बरं व्हावंच लागेल. कारण तुला मरता मरता लल्लाचं मरणंही पहायचंय!"
.
.
तिकडे राधाताईंना आपण उभी हयात काढली.पण संध्या, दिपा त्याच चक्रात अडकतील की काय? या सवालातीत झोप आलीच नाही.
.
. क्रमशः
वा.......पा.......