खुमखुमी- १- Marathi Bhaykatha Special Stories
तालुक्यावरून निघालेला टेम्पो कनोली, भनोली, टुकी अशी एकेक गावं मागं टाकत पडत्या पावसात तापी काठावरील खाचणं जवळ करत होता. लल्ला टेम्पोत भरलेला आपला माल ओला होणार नाही म्हणून पांघरलेलं कल्तान उडालं तर नाही म्हणून नजर ठेवून होता. आषाढ सरी चांगल्याच झोडपत होत्या. पंधरा - वीस दिवसापूर्वीच पेरण्या आटोपल्या होत्या. हल्ली तापीवरून जो तो पाणी आणत बागाईत करत असल्यानं या काठावरही पेरणीचं क्षेत्र कमीच झालं होतं. तरी करडी शेतं हिरव्या पिवळट कोवळ्या पानाच्या रोपांनी झाकली गेली होती. मका, ज्वारी, तुवर, मूग, उडीद भुईतून वर येत झिरपणाऱ्या नभास कवेत घेण्यास सरसावत होती. नभही जणू त्या आनंदात सपाटून पाझरत शेतात पाणीच पाणी सांडत होतं. टेम्पो कच्ची सडक तुडवत तापी काठावरील खाचण्याच्या शिवारात आलं. सहा वाजताच अभ्राआड सूर्यनारायणानं गाशा गुंडाळलेलाच असावा. अंधारी दाटल्यागत भासू लागलं. सकाळीच पलिकडच्या सतोन्याहून निघत लल्लानं तालुक्याला महू फुलांची पोती व्यापाऱ्याकडं विकली होती. पंधरा दिवसांपासून तो, लता मावशी व लहान भावानं शेतमजुरी करत जमवलेले पैसेही होतेच. त्यातून त्यानं महिनाभर पुरेल एवढा बाजार दिवसभरात केला होता. चुरमुऱ्याची पोती, पिवळे फुटाणे, काळे फुटाणे, दाळ्या, शेव, बत्ताशे, सूर्यफुलाच्या बिया, शेगा, कटलरी, वह्या, कागद, पाट्या, पेन काही बाही खरेदी करत खाचण्यातील चमन्या चिंधाचं टेम्पो त्यानं ठरवत सामान तो आणत होता. खाचण्याहून त्याला हा सारा सामान झिंगा बाबाच्या नावेवरून पलिकडच्या सतोन्याला न्यावा लागणार होता. पण आज झडीनं तर झकूच लावला होता. बहुतेक बापूच्या सुचनेनुसार सारा सामान खाचण्यात एकनाथ भटाकडंच ठेवून कामापुरताच आज न्यावा लागणार होता. एकनाथ भट व आपल्या गोटण बापूचे किती घरोब्याचे संबंध! एकनाथ भट भिक्षुकीला सतोन्यात आला की दक्षिणेत मिळालेला दाळ दाणा, व वाण जिन्नस गोटण बापूकडंच ठेवत खाचण्याला परते. व निवांत चार सहा महिन्यात कधी तरी एकत्र नावेवरून ते खाचण्यात आणी. गोटण बापूही नदी पारच्या तालुक्यातुन काहीही सामान आणला की वा विकायला जायचं असेल तर हक्कानं एकनाथ भटाकडे ठेवे. दोघांचा विश्वास इतका की एकमेकाच्या काडीला ही हात लावणार नाहीत. वस्त सडून जाईल पण तशीच पडे. तापी नदी आडवी असून दोघांच्या व्यवहारात लबाडपण, दगा फटका कधीच आडवा आला नाही.
टेम्पो पिंपळाजवळच्या एस. टी. स्टॅन्डच्या पाराजवळ येताच चमन्या चिंधूनं लल्लास खुणावलं.
" लल्ला ,कुठ उतरवतो?"
" चिंधा दादा, एकनाथ महाराजांच्या घरीच ने, एवढ्या पावसात नावेवर न्यायला मालाचं नुकसान करायचं का?" चिंधानं गल्लीतलं पाणी उडवत चिखल तुडवत भट गल्लीत टेम्पो घुसवला.
लल्ला उतरला तसं एकनाथ भटानं रिकाम्या घराची किल्ली दिली.
" लल्ला, बराच माल आणलास रे!"
" महाराज पावसाळ्यात आता दुसरा काहीच उद्योग नसल्यानं स्टॅण्डवरील दुकानच आता.म्हणून बापूनं सारा माल आणायला पाठवलं होतं. पण मरणाची झडी ,मग कसा नेऊ? त्यापेक्षा गरजेपुरता नेतो व बाकी सवडीनं झिंगा बाबाही घेऊन येत जाईल."
लल्ला व चिंधूनं सारा माल उतरवला. त्यानं थोड्या थोड्या वस्तू काढून दोन डाग बनवले. प्लास्टीकच्या कचुकड्यात दोरीनं बांधले. तेवढ्यात लक्ष्मी ताईनं आणलेला गरमागरम चहा दोघांनी घेतला. चिंधू भाडं घेत निघाला. साडे सहा वाजण्यात आले. त्यानं डाग उचलले व पिंपळाच्या पारावर आला. पारावर अपेक्षेप्रमाणं झिंगा बाबा सातच्या गाडीची वाट पाहत बसलेलाच.
" बाबा, मी चालतो तेवढ्यात काठावर! लवकर ये!" लल्ला झिंगाबाबाला म्हणाला.
" लल्ला , काठावर जाऊन पडत्या पावसात थांबण्यापेक्षा इथंच पारावर थांब. आता गाडी येईलच. बाजाराचे चार दोन पॅसेंजर येतीलच. त्यांना घेतलं की निघूच! तो पावेतो तू इथंच थांब.मी आलोच तारीला भेटून! पॅसेंजर ला थांबव!"
" बाबा! उगामुगा इथंच थांब! कशाला तारीकडं जातोय? नदी दोन्ही काठ आहे नी नाव पण हाकायचीय तुला मग? नी गाडीही येईलच इतक्यात!"
" अरे लल्ला मी उगलो तेव्हाचा या तप्ती मायच्या महापुराशी खेळतोय! तू कशाला चिंता करतोस! यु गेलो नी एक ग्लास मारून आलो बघ! झडीची पोटात गेली की नाव हाकायला ताकद येईल!"
लल्ला जाणाऱ्या झिंगा बाबाला पाहतच राहिला. दोन दोन रुपयासाठी दोन तीन तास पॅसेंजर ची प्रतिक्षा करणारा झिंगा बाबा पाच दहा रुपयाची चालूच मारुन येईल. काय जीवन असतं एकेकाचं! तापीचा हा काठ ते तो काठ व खाचण्याचं बस स्टॅण्ड यातच हा गुरफटलाय. दुसरं जगच नाही. पण भर महापुरात उडी घेत कित्येकाला वाचवणारा! तरी गावानं त्यास नाव काय दिलं तर झामन झिंगा!
सातच्या आतच गाडी आली. गाडीतून आठ - दहा प्रवाशी उतरले. आवाज ऐकताच झिंगा बाबा तोंड पुसत व तोंड कडवट करत धावत पळतच आला.
" झिंगा बाबा या पोरांना नानजी नानाकडं जायचंय! व्यवस्थीत ने!" गाडीतून उतरत इतबार खान कन्डक्टरनं झिंगा बाबास खुणावलं.
सातची खाचणा बस नी इतबार खान कंडक्टर हे गणितही पक्कंच.
लल्लाच्याच वयाची एक तरुणी पंजाबी ड्रेस घातलेली व सोबत पंधरा सोळा वर्षाचा तिचा भाऊ गाडीतून झिंगाबाबाकडं आले. त्या सोबतच एक म्हातारीही उतरली. तिला प्रभू कासाराकडं जायचं होतं. झिंगा बाबानं साऱ्यांना घेतलं. लल्लानं डाग डोक्यावर चढवला. दुसरा डाग झिंगा बाबानं उचलला.
" चला सारे! आता पोहोचवतो साऱ्यांना त्या काठावर!" बाबाची अंगातली किक देऊ लागली. खाचण्याच्या गल्लीतून पडत्या पावसात सारे चालू लागले. मुलगा व मुलगी भेदरल्यागतच चालत होती.
" पोरांनो, नानजी नाना कोण लागतात रे तुमचे?"
" आत्या आहेत गोताबाई!" मुलीनं चालता चालता भावाचा हात धरत सांगितलं.
" असं का? आरं पण नवख्या गावाला एवढ्या उशीरानं येऊ नये! लवकर निघावं पाणी पावसाचं! आणि कुठुन येत आहात?" झिंगा बाबानं त्यांना प्रेमानं सामजावत विचारलं.
" लवकरच निघालो होतो साखीहून! पण रस्त्यात गाडी फेल झाली व उशीर झाला!" पोरीनं सांगताच तिचा भाऊ तिच्याकडं चक्रावून पाहू लागला. पण तिनं हळूच त्याचा हात दाबत शांत केलं.
काळ्या पांढऱ्या ड्रेसवर असणाऱ्या पोरीवर लल्लाचं लक्ष गेलं. गोरीपान, लाल ओठाची मुलगी काही तरी दडवतेय हे त्यानं ओळखलं. दोघांच्या पायात काहीच नव्हतं व पिशवीही नव्हती.
खाचण्याची जुनी तटबंदीची
कमान ओलांडली व गावातले लाईट दिसेनासे होताच अंधार फोफावला. पाण्याचा जोर ही वाढला. गावातल्या पाण्याचा लोंढा कमानीतून वाटेवरून नदीकडं धावत होता. उतरत्या वाटेचा वरचा भाग निसरडा व खोल भागात पाण्याचा ओहोळ. खाचण्यातून नदीकडं उतरणारी ही एकमेव वाट! बाकी काठानं तटबंदी व काठही पन्नास साठ फूट तासीव कड्यागत. म्हणून सतोना व खाचण्याचे लोक याच वाटेनं ये जा करत.
बेडूक व रातकिडे कोकलत होते. लल्ला पुढे, मागं म्हातारी, मुलगी, मुलगा व शेवटी झिंगा बाबा! अंधारात पूर्ण ओल्या अंगानं काफीला वाटेवरच्या वळणावर आला व इथून ही वाट यु टर्न घेत पूर्वमुखी होत तिरकस पात्रात उतरु लागली. तोच मुलाचा पाय घसरला. त्याला सावरता सावरता मुलगीच घसरली व तोल जात वेगानं पात्राकडं घसरू लागली. म्हातारी हळूच अंग चोरत बाजुला झाली. लल्लानं घसरत जाणाऱ्या पोरीला एका हातानं डोक्यावरचा डाग सावरत दुसऱ्या हातानं पकडलं. पण पकडतांना तिचा केसाचा बुचडाच हातात आला. पोरगी उठली.तिनं झटक्यानं बुचडा सोडवत लल्लाचा हात रागानं झटकला. अंधारात काहीच दिसत नव्हतं पण ती रागावल्याचं लल्लानं ओळखलं. बहुतेक सारे कपडे चिखलानं माखले असावेत!
" बया, सांभाळ! पुढं खोल डोह आहे म्हणून पकडलं!" लल्ला अंधारात बोलला व चालू लागला. खाचण्याचा किनारा एकदम दंतूर .झिंगा बाबानं दोरानं खुंटीला बांधलेली नाव एका हातानं दोर ओढत काठावर लावली. लल्लानं पुढचा लाकडी घोडा पकडत ओढत नावेवर डाग टाकला.व त्यानं पाण्यात उडी घेत दुसऱ्या बाजूनं नाव पूर्ण काठाला टेकवली.लगेच बाबानंही डाग ठेवत पाण्यात उडी घेतली. दोघांनी नाव स्थीर करत साऱ्यांना चढायला लावलं. पण भितीनं ना आजी चढे ना पोरं! बाबानं नावेला मधोमध पाठ लावली व लल्लाला खुणवलं. लल्ला नावेवर चढला . त्यानं मुलाला एका हातानं ओढत उचललं व नावेत घेतलं. पण आजी मागं सरकू लागली. लल्लानं काठावर जात आजीला अलगद उचलत नावेत आणलं. मुलगी बिथरली. लल्ला दुरुनच तिला नावेवर चढायला सांगू लागला. ती पुढं सरकली. तोच ढगाआडचा चंद्र बाहेर आला व तिला महापुराचं पाणी नजरेस दिसलं. पुन्हा ती माघारली. परतायला उशीर होतो म्हणून लल्लानं सरळ तिचा हात धरत नावेत ओढलं. अनपेक्षित प्रकारानं ती थरथरली व संतापानं तिनं पायाकडं हात नेले. पण पायात तिची सॅंडल होतीच कुठं. ती रागानं लल्लाकडं पाहू लागली. पण तो पावेतो लल्ला नाव वल्हवायला लागला होता. झिंगा बाबानं नावेत चढत मागे झोपडीगत केलेल्या भागातला मर्फी रेडीओ काढला व अंदाजानं बटण फिरवत स्टेशन लावलं. खळाळत्या घोंगावणाऱ्या महापुरात नाव सरकन सपासप पाणी कापत असतांनाच
वो सात दिन चित्रपटातलं
'प्यार किया नही जाता ,हो जाता है!' हे गाणं अंधारात मनामनात नाद उठवू पाहू लागलं.
" पोरी नाव काय तुझं!" झिंगा बाबानं गप्पा सुरू केल्या.
" दिपाली ! दिपा म्हणतात मला! नी हा माझा लहान भाऊ प्रभाकर!"
" पोरी तुमचा मामा नानजी नाना म्हणजे देवमाणूस! कधी कुणाला काडीचा त्रास नाही! उलट अडल्या नडल्यांना मदत करणारा!" झिंगा बाबाला मव्हाची किक भरत होती व तो जोर जोरानं गप्पा ठोकत होता.लल्ला जिवाच्या आकांताने नाव वल्हवत होता. वल्ही वल्हवतांना त्याच्या मेंदूतही विचार तरळत होते!
गावातली माणसं आपापसात कितीही लढतील पण बाहेरच्या लोकांकडं चांगलंच बोलतील. आपापसात मात्र वागणं एकदम इरसाल. नाव ठेवण्यात तर किती विविधता! झिंगाला झामण झिंगा, चिंधाला चमन्या चिंधा, नानाजीला नानजी नाना! चिंधा ड्रायव्हरचे टक्कल म्हणून चमन चिंधा! पण त्यातही चमनचं चमन्या.झिंगा बाबा नावेला पॅसेंजर मिळवण्यासाठी सतत फिराकमध्ये म्हणून झामलणे यावरुन झामन झिंगा! नाना मात्र देवमाणूस म्हणून नानाला जी लावून 'नानाजी नाना' केलं. पण तरी नानजी करुन खोच ठेवलीच. आपल्या आजोबाचं नावही लोटन. पण लोटनचा लो गोल करत गोटन केव्हा केलं हे खुद लोटन बाबालाही कळलं नाही व आपसुक गोटनच गळी उतरलं.
नाव सतोनाच्या काठावर लागली. लल्ला व झिंगा बाबानं डाग उचलले व चढाव चढू लागले. नानजी नानाचा वाढा ही लल्लाच्याच गढीत असल्यानं ती पोरं ही मागोमाग आली.
लल्लानं सरी आजीनं दिलेल्या गरम पाण्यानं अंघोळ करताच शिणवटा गेला. ओल्या कपड्यात खिशातून ओले हिशोबाचे कागद काढतांना त्याच्या हाताला कानातला डूल लागला. तो थरथरला. खिशात कानातला डूल कसा? तो चक्रावला.तोच काठावर त्या पोरीला नावेवर घेतांना ती आपल्यावर तोल जाऊन पडली होती.त्याच वेळी बहुतेक अडकला असावा. त्यानं हळूच कुणाला दिसणार नाही असा लपवला.
...............................................
✒वा......पा.....