खुमखुमी- ११- Marathi Bhaykatha Special Stories
राधाताईनं मौन पाळत तूर्तास मागचं काही उकरून काढणं म्हणजे जर का भैय्यानं घातपात केला असेल तर तो गोत्यात येत वाड्याला वालीच कोणी राहणार नाही .संध्याही लग्नाची होत आलेली व शशांकची ही जबाबदारी म्हणून राधाबाईनं दिपास काही सांगणं टाळलं. पण दिपास जिजाक्काचा घात हे सहन होईना. ती भैय्यासाहेबामागे लागली.
मे संपत आला तसा वारा सुटत तापमान कमी होऊ लागलं. शेतकरी मशागतपूर्व कामात दिवसभर राबत रात्री थकून लवकर झोपू लागले. पण दिपाची तर झोपच उडाली होती. दिपा शशांकला राधाताईकडं सोपवत वर आली. तांबारलेल्या डोळ्यात मस्ती धुंदाळत होती. तोल सुटू पाहत होता. दिपाच्या डोळ्यातही अंगार फुलला.
दिपा या चार सहा महिन्यात बरीच खालावली होती .तिच्याकडं पाहत मगरूर हास्य फुलवत भैय्या तिला डिवचू लागला.
" एकंदरीत आता सिताफळ काळं पडत सुकायला लागलं." दिपाकडं तुच्छतेनं पाहत भैय्या डिवचू लागला.
" ............" रागाचं रुपांतर अंतरात एकदम दु:खाचा डोंब उसळण्यात झालं.
" माझं काय होतंय ते जाऊ द्या पण आधी दाजी व माझ्या आक्काबाबत का असं वागलात ते सांगाल का?"
”मग सांगतो ना! ये समोर बैस! सगळं बयाजवार सांगतो! तुला तर कळायलाच हवं ना!"
" ......." ती जागची हालली नाही.पण तोच हातातला ग्लास हवेला चिरत मधलं मद्य उडत तिच्या कपाळाचा वेध घेत आला. दिपानं डोकं मागे घेतलं व ग्लास भिंतीवर फुटला.
" समोर यायला लावलं ना मी! ....... " भैय्यानं उठत जोरात बुटासहीत लाथ घातली.
" मला हवं तेवढं मारा पण का ते तर कळू देत!" दिपा रडतच विनवू लागली.
पुन्हा लाथेनं तुडवत दिपाच्या गालावर लाथेचा दाब वाढू लागला.
" छाताडावर बसलेल्या सॅंडलच्या खुमखुमी पेक्षा ही खानदानी खुमखुमी खूप खूप खोल व जुनी होती...मग काय? कोण संदेश? कोण आबा? कोण भाऊ? कोण वहिणी?"
भैय्याच्या डोळ्यात आता एकदम लाली उतरत होती. तो माघारला व आरामखुर्चीत बसला. दिपाली गालावर ओघळत असलेलं ओठाचं रक्त पदरानं पुसत भिंतीला रेलत रडू लागली.
" अय, दिपले! तू अशीच रडावी ही तर खुमखुमी आहे. जुन्या खुमखुमीच्या बदल्याचं सुख यात ही आहेच."
भैय्या आता ग्लास रिता करत भूतकाळात शिरू लागला. त्याला आपलं बालपण, आपली आई- नादरताई, तिला व त्याला मिळालेली वागणूक आठवू लागली.
" दिपले ऐक! का ...?.... का ही खुमखुमी?"
.
.
प्रतापराव इंगळे वकिलांचे एकुलते चिरंजीव बाळासाहेब ! पत्नी आवळाबाईपासुन पहिला मुलगा संदेश तीन वर्षाचा होताच दुसऱ्या वेळी बाळंतपणासाठी व संदेशला सांभाळण्यासाठी आपली मामेबहीण नादरला साकीला घेऊन आली. नादरची घरची स्थिती हलाखीची असल्यानं लग्नाची होत आली असतांनाही मामा तिचं लग्न करू शकत नव्हता. आवळा बाईनं नादरला साकीला आणताच जात्याच हुशार व सुंदर नादरनं साऱ्या घराचा ताबा घेत आवळाबाईची नणंद राधाच्या संगतीनं साऱ्यांनाच आपली मोहिनी घालत आपल्या बाजूला वळतं केलं. आवळाबाईंना आरामाची सक्त गरज सांगत डाॅक्टरांनी दोन महिन्यांपासून हालचालच करावयास लावली नव्हती. नादर बाईंनी संदेशला या दोन महिन्यात पुर्ण आपल्या अंगावर केलं. ती प्रतापराव कधी घरी आलेच की त्यांचीही काळजी घेई. सर्वांना नादर आवडायला लागली. पण बाळासाहेबांना जास्तच. प्रतापरावांची वकिली, शेती, कुस्तीचा आखाडा सारं त्यावेळेस उर्जितावस्थेत असल्यानं घरात काय चाललंय हे पाहण्यास त्यांना सवड मिळेचना. कधी जळगाव, कधी गिरणा काठावरील फाॅर्म हाऊसवर तर कधी साकीत. याचा फायदा बाळासाहेबानं उठवला. आवळाबाई तर दिवस भरत आल्यानं बेडवरच होत्या. तर राधाबाई वेगळ्याच धुंदीत. बाळासाहेब व नादरचे सूर केव्हा जुळले कुणालाच कळलं नाही. कळलं त्यावेळेस खूप उशीर झाला होता. आवळाबाईला मुलगी झाली पण घरात फुलत असलेलं प्रकरण ,उध्वस्त होऊ पाहणारा संसार यानं आवळाबाईचं मनच उखळलं. मुलीसाठी त्यांना दूध उतरलंच नाही. मुलगी आजारी पडली व पंधरा दिवसात वारली. पण घरातला तिढा न सुटण्यासारखा.
प्रतापरावांनी बाळासाहेबास समजावण्याचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आवळास सोडत नादरला घेत गिरणाकाठी आले. यानं आवळा जास्तच चवताळली व आजारी पडली. सरतेशेवटी प्रतापरावांनी आवळालाच समजावत समजोता करावयास लावला. मामेबहिण सवत म्हणून घरात आली व लवकरच भैय्यासाहेबाचा जन्म झाला. व नंतर संध्याचा.
आवळाबाई मात्र साऱ्या घराला काबूत ठेवत नादरला खाऊ की गिळू करू लागल्या व सवत मत्सर सुरू झाला. पण नादरला फक्त घरात व बाळासाहेबाकडं जागा हवी होती. त्यासाठी ती आवळाबाईचा सारा जाच सहन करत सारं काम ओढू लागली व संदेशरावासही सांभाळू लागली. दोन्ही मुलं वाढतांना प्रत्येक बाब आधी संदेशरावास मिळे मग भैय्यास. पण नादर बाईला याचं काहीच वाटेना. ती त्यातही खूश होती. भैय्याला कळू लागलं व आवळाबाईची विखारी नजर सांपत्न वागणूक उमगू लागली. एकाच घरात दोन्ही भावांना मिळणारी वेगवेगळी वागणूक व आपल्या आईस मिळणारी खालची वागणूक यानं तो आवळामाय व संदेशचा मनात द्वेष करू लागला. कोणतीही वस्तू संदेशकडून वापरल्यावर वा त्यानं घेतल्यानंतर उरलेली आपणास मिळते म्हणून तो त्या आधीच चांगली वस्तू खेळणी तोडू लागला. जेणेकरून तोडलेली पण संदेशला मिळणारी वस्तू त्याला मिळू लागली. खाण्याबाबतही तो आधीच हिसकवत संदेशच्या हिश्श्यातली वस्तू आधीच मिळवू लागला. मनात एक अढीच निर्माण झाली की या संदेशनं आपली प्रत्येक वस्तू आधीच निवडली ना तर मग आपण याचीच वस्तू, याचं सुख आधीच लंपास करायचं. पोरांवरून आवळाबाई व बाळासाहेब यांच्यात वाद होऊ लागले. बाळासाहेबाचा कल व ओढा नादरकडं असल्यानं आवळाबाईनं तगादा लावत आधीच जमिनीची वाटणी नावावर करावयास लावली.
" आवळे! तू जे काही करतेय त्यानं बालमनावर वाईट परिणाम होत सख्खे भाऊ वैरी होतील ऐक" बाळासाहेब विनवू लागले.
" आणि जर मी माझ्या मुलाची सोय पाहिली नाही तर त्याला काहीच मिळणार नाही,त्याचं काय?"
" आवळे तोंड सांभाळून बोल. मी काही इतका तुमच्या जिवावर उठलो नाही किंवा नादर तशी नाही."
" कोण कसं याच्याशी मला काही घेणंदेणं नाही मी फक्त माझा हिस्सा मागतेय तो नावावर करा!"
" तुला जमीनच हवी ना ? ठिक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं!" बाळासाहेब संतापानं म्हणाले.
आवळाबाईनं गिरणाकाठच्या पेरू व लिंबाच्या बागा आपल्या नावावर करायला लावत संदेशला वारस लावायला लावलं. सारी जमीन दोन्ही मुलाच्या नावावर करत बाळासाहेबांनी एक आततायी निर्णय घेतला. आवळा राहिली तर हे विष जास्तच वाढेल. नादर कशी ही असली तरी तिच्या मनात संदेशबाबत कटुता नाही. त्यांनी नादरला काहीच कळू न देता संदेशवर लक्ष ठेवायचं वचन घेतलं. बाळासाहेबांनी कामानिमीत्त आवळाबाईस गिरणेकाठच्या मळ्यात नेलं. दोन दिवसांनी मळ्यात विष घेतल्या अवस्थेत दोघांची प्रेतं सापडली.
नादरबाईकडं संदेशला सोपवत आवळास घेत बाळासाहेब निघून गेले. या धक्क्यानं प्रतापरावांनी ही हाय खाल्ली व दोन महिन्यातच त्यांनी अंथरुण पकडलं. त्यातून ते उठलेच नाही.
नादर बाई राधाताईसोबत सारा गाडा ओढू लागल्या. पतीला दिलेल्या शब्दाखातर व आपण नाहक आवळाबाई व बाळासाहेब यांच्या संसारात आड आलो ही बोच म्हणून त्या संदेशरावाची आधी पेक्षा जास्त काळजी घेऊ लागल्या. भैय्याला हे पाहून जास्तच आग होऊ लागली. त्याला अंधारातलन आवळाआईचं वागणं आठवू लागलं. वटारलेले डोळे, ताणलेली खडी, पोटात घेतले जाणारे चिमटे आठवू लागले. तर कधी कधी एकांतात छातीवर चपलेसहीत ठेवलेली लाथ. तो आईकडं सारं सांगी पण आई त्याला छातीशी लावत तिकडं जायला नाकारी व दुर्लक्ष करायला लावी. पण बालमनावर तेच कोरलं गेलं. आता मात्र आवळाबाई गेल्यावर आईनं संदेशला तसाच त्रास द्यावा असं त्याला वाटू लागलं तर आई उलट त्याची काळजी घेतेय म्हटल्यावर तो बिथरला. नादरबाई त्याला प्रेमानं समजूत घाली. व संदेशरावाची काळजी घेत दोघांना वाढवू लागली.
आई व आत्या काहीच करत नाही म्हटल्यावर मनातला द्वेष खुमखुमी तो मनात तशीच दमन करु लागला तरी ती सुरुंगाचं रूप धारण करु लागली. त्या सुरुंगावर तो वरुन माया दाखवत आत तशीच ठसठसत ठेवू लागला. दोन्ही मुले मोठी झाली नी नादरबाई अचानक गेल्या. पण त्या जाण्याआधीच राधाताईचा पूर्ण ओढा संदेशरावाकडं झुकला होता. कारण घराचा मोठा वारसदार तो. शिवाय आई विना पोरका व त्याचा स्वभाव भैय्यासारखा उग्र नव्हता या गुणानं राधाबाई संदेशरावाकडंच झुकल्या.
संदेशरावाचं जिजा बरोबर लग्न झालं. भैय्या वरुन संदेशरावाशी कितीही प्रेमानं वागत असला तरी मनात संदेशराव व त्यांच्याशी निघडीत प्रत्येक व्यक्तीशी मनात खोल तेढ व खुमखुमी तशीच होती. म्हणून लग्नानंतर जिजासोबत दिपा व प्रभू शिकायला येताच यांच्याबाबत त्याच्या मनात अंगार फुललाच. आवळाबाईसारखाच यांना तो डोळे वटारणे, पोटात चिमटे घेणे, अंधारात एकटं सापडताच मजबूत चोपणं असले प्रकार तो करू लागला. जिजा वहिणीशी व संदेशरावांशी मात्र साळसूदपणे वागे.
अकादमीसाठी गिरणाकाठच्या बाकी बागा विकून त्यानं अकादमीत आपल्या व संध्याच्या नावानं गुंतवणूक केली. पण तरी बाकी बागा संदेशरावाच्याच नावावर होत्या. तोच मुलबाळ होत नाही म्हणून दिपाशी लग्न करण्याचा घाट घरात सुरू झाला. तीच ..तीच खुमखुमी पुन्हा ठसठसू लागली. कारण छाताडावर सॅंडल मारून पळालेल्या दिपाला लग्न करून आणायची व बदला घ्यायचा हे पक्कं असतांना पुन्हा आपल्या हिश्श्यातलं दान संदेशच्याच पारड्यात जाऊ पाहतंय यानं जुनी खुमखुमी सणकू लागली. पण दिपानंच नकार दिल्यावर थोडी शांतता झाली. नंतर तर शशांकची चाहूल लागली नी मग शैक्ष. संस्थेसाठी बागा विकायला काढल्या. मग काय सारं मनासारखं होऊ लागलं. बागा विकल्या.संदेशरावाची सारी जमीन गेली. पण तोच दिपानं नकार देताच जे नंतर घडणार होतं ते तडकाफडकी घडवावं लागलं. कारण शशांकला आई वडील जर राहिले नाही तर मावशी आपोआप नांगी टाकत काकू होईलच .आणि म्हणूनच मग दिला बार उडवून....पुलावरच....... त्याच दिवशी..... नी मग मावशी शशांकला घेत आली नी एका महिन्यात....काकूही झाली....
.
.
भैय्यासाहेब सारं सारं बरळला.
" नीच! किती पापी आहात तुम्ही!" दिपा संतापानं आक्रोश करू लागली.
"संदेशराव आमचे बंधू...आमचे आबासाहेब गेले ते जुनी खानदानी खुमखुमीनं. कारण त्यांच्या आईनं आमच्या आई व वडिलांची सजा मला दिली. त्यात हे आमचे बंधू प्रत्येक बाब माझ्या आधी घेत हीच खुमखुमी घेऊन आम्ही वाढलो. एक दिवस यांचं सारं घेऊन हिशोब वसूल करूच असा चंगच बांधला होता. आणि त्यांच्या मरणानं सारा हिशोब चुकता केला. फक्त तुझ्या रूपानं फुटकळ हिशोब बाकी होता दिपे. आता तो ही पुरा करतो नी हे सारं खातं बंद करत मस्त अकादमी व शैक्षणिक संस्था विस्तारतो. संध्याचं लग्न उरकतो नी मग मनाप्रमाणं नवीन लग्न...
" भैय्या साहेब, माझा हिशोब चुकता करण्याआधी माझ्या बहिणीचा व दाजीचा हिशोब तर तुम्हास द्यावाच लागेल!"
" कोण घेणार हिशोब?"
" कोण म्हणजे ? मीच!"
"तू? " भैय्यासाहेब उठले व तिचे केस ओढत कमरेत लाथ घातली.
" दिपले तू हिशोब घ्यायला आधी राहायला तर हवी!"
" म्हणजे?" दिपा अविश्वासाने विचारत ती खाली उतरण्यासाठी सरकू लागली.
तोच भैय्यानं जिन्याकडं जात निसटू पाहणाऱ्या दिपाच्या पोटावर अशी काही लाथ घातली की दिपा जिन्यावर आदळत घरंगळत खाली कोसळली.खाली कोसळतांना
जिन्याच्या शिसवीच्या लाकडाच्या रेलींगला डोकं जोरानं आपटल्याने तिची कवटीच तडकली की काय. ती बेशुद्ध होत रक्ताच्या थारोळ्यात पडली. भैय्या खाली उतरत उरलं सुरलं काम तमाम करणार तोच आवाजानं राधाताई जाग्या झाल्या व दरवाजा ठोठावू लागल्या..
" दिपा! ..दिपा...? काय झालं गं? आवाज कसला आला? ..भैय्या?"
भैय्यानं ओळखलं आता दरवाजा उघडण्याशिवाय गत्यंतर नाही.
त्यानं दरवाजा उघडला व राधाताईनं रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध दिपाला पाहताच एकच कोघाट उठवला.
भैय्यासाहेबांनी ताईला शांत करत
" पाणी पिण्यास उतरत असतांना तोल जाऊन जिन्यावरुन पडली " सांगत गाडी काढत दवाखान्यात न्यायची तयारी करू लागला. भैय्यासाहेब आरामशीर गाडी नेत होते. त्यांना एकच आशा होती की ही दवाखान्यात पोहोचण्याआधीच गचकावी. पण राधाताई व भाऊ बंदकीतले दोन जण सोबत असल्यानं त्याला काही करताही येत नव्हतं. दवाखान्यात दाखल करताच उपचार सुरू झाले. भैय्यासाहेबाचा इलाज खुंटला. दवाखान्यात त्याला काहीच करता येईना. ही जर शुद्धीवर आली तर सारं बरळेल व आपलं पितळ उघड होईल म्हणून त्यांची पाचावर धारण बसली. पण साऱ्यासमोर काही करताच येईना. त्यातल्या त्यात डाॅक्टरांनी 'पेशंट कोमातून बाहेर येतं की नाही आता काहीच सांगता येणार नाही' असं सांगताच त्याला थोडा धीर आला व शेवटी त्यानं पुढे काय होईल ते पाहू असं ठरवलं.
मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. चार पाच दिवसानंतर दिपा शुध्दीवर आली. समोर दिसणाऱ्या भैय्याकडं दिपानं पाहिलं.
" लल्ला! ......लल्ला ...." एवढंच ती बोलली.
भैय्यानं तिचा हात हातात घेतला.
" लल्ला, मला सोबत यायचंय!"
डाॅक्टरांना आनंद वाटला की पेशंट कोमातून बाहेर आला व आपल्या नातेवाईकांना ओळखतेय. पण तितक्यात राधाताई समोर आल्या.
" दिपा बेटा मला ओळखते?"
दिपानं राधाताईकडं पाहिलं.
खोल खोल पाहिलं. व भैय्याकडं तोंड फिरवलं.
" लल्ला ही सुंदराच ना!पायावर गोंदणारी!"
हे ऐकताच राधाबाई रडू लागल्या.
" भैय्या ! दिपा काय बडबडतेय रे असं काही तरी?"
भैय्यासाहेबांनी डाॅक्टराकडं पाहिलं डाॅक्टरांना जेव्हा समजलं की दिपा आपल्या नातेवाईकांना वेगळ्याच नावानं ओळखतेय त्यावेळेस त्यांना धक्काच बसला. त्यांनी परत उपचार सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला. भैय्यासाहेबांचा जीवात जीव आला. दिपा कोमातून बाहेर तर आली होती पण ती कुणालाच ओळखत नव्हती. फक्त लल्ला, सुंदरा, माखन, मयुरी, पैंजण, गोंदण, डूल असंच काहीबाही बोलत राही. भैय्यासाहेबांना ती बरी झाली नाही याचा मनात आनंद झाला.पण....
पण....
आपणास ती लल्ला म्हणून का हाक मारतेय? हे कोडं त्यांना उलगडेना. हा लल्ला कोण?
सुंदरा कोण? गोंदण काय? हे त्यांना कळेना. पंधरावीस दिवस दवाखान्यात ठेवल्यावर दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं. पुढची शस्त्रक्रिया महिन्यानंतर होणार होती. भैय्यानं मनात ठरवलं की त्या आधीच आपण हिचा कांड करू.
दिपा भैय्यासाहेबासोबतच घरी आली. तिला राधाताई , शशांक संध्या कोणीच आठवेना ना की गाव, घर. ती कुणालाही फक्त 'लल्ला' म्हणूनच पाहू लागली.
भैय्यानं तिच्या वेडसर पणाचाच फायदा उठवायचं पक्कं केलं. पण मरणाच्या दारातूनही परत येतांना ही सारं सारं विसरली. पण 'लल्ला' हा शब्द नाही विसरली. खोल खोल जखमेत लल्ला स्मरणात राहिला. हा लल्ला नेमका कोण? हिला असंच मारण्यात कसली आली खुमखुमी! आधी हा लल्ला कोण हे कळणं महत्वाचं. मरणाच्या दारात सारं विस्मरतांना हा आठवतोय म्हणजे गहजबच. मग आपण हिला संपवण्याची का इतकी घाई करतोय. आता दिपाला चांगलं करू मग खुमखुमी..... असल्या वेडेपणात हिला संपवण्यात कसली आली खुमखुमी?
भैय्यानं लल्लाचा शोध इस्लामपूर व सतोन्यात घ्यायचं ठरवलं......
.
.
क्रमश:
✒ वा......पा...
माझं जीवन उध्वस्त केलं हे एक वेळ सहन याचं मी सहन