खुमखुमी- १2- Marathi Bhaykatha Special Stories
पहिला पाऊस अन् तो ही भल्या पहाटे पहाटेच झडीच्या स्वरुपात पाहून थकलेल्या गोटन बाबास आश्चर्याचा थक्काच बसला. त्यांनी उठत पांडुरंगाचा धावा केला.
" बा विठ्ठला काय हे नियतीचं चलिंतर! मिरीग बरसला तो ही भल्या पहाटेच!"
त्यांनी खंडलेल्या बऱ्याच आंब्यांची झाडे आता उलगत आलेली होती. सातपुड्यातली व गावातील काही झाडे बाकी होती जी पसाद येत असल्यानं 'एक दोन पाऊस पडल्यावर थंडावा झाला की लोणचं घालू ' अशा लोकांसाठी त्यांनी ठेवलेली. अमळनेर बाजारात आता लोणच्याची कैरी वधारेल म्हणून ते आज उद्या गावातल्या बाबू सोनाराच्या मळ्यातलं झाडं उतवणार होते तोच पावसानं थैमान घातलं. वाऱ्यानं कैऱ्या खाली पडून ठोकल्या गेल्या की नुकसानच म्हणून ते काळजीनं धावा करू लागले. उठलेल्या लल्लास त्यांनी दुपारपर्यंत बाबू सोनाराचा आंबा उतरावयास सांगितलं.
लल्लानं रूकार भरला.लल्लाकडं पाहताच गोटण बाबांच्या आतड्यास पीळ पडला. साऱ्या कामात वाघाची झडप असलेलं, घरातलं कर्त पोर एका वर्षात कोणत्या घोरानं पछाडलं कोण जाणे पण काही तरी बिघडलंय हे निश्चीत. मागच्या वर्षी जळगावचं
एम्. ए. चं अॅडमिशन रद्द करत देठे सर व माईनं बी. एड्.ला अमळनेरला टाकलं सारी फी त्यांनीच भरली. काॅलेज नियमीत सुरू झालं नी लतेच्या लग्नाचं कर्ज, बाला खेळात व शिक्षणात अडकलेला म्हणून लल्लावर सारी भिस्त असतांना नेमका लल्लाही नियमीत बी. एड्. करु लागल्यावर आपली लाथातांगड सुरू झाली. पण माई व देठे सरांमुळे आपणास काहीच बोलता येईना. एका वर्षात लता, शंकर मिनेच्या पोरांना घेत आपण सारा जोजार ओढला पण निदान आता तरी लल्लाची मदत मिळाली तर बरं असा मनात विचार करत गोटण बाबा आन्हीक उरकू लागले.
लल्ला मिना मावशीच्या - रमा व निलूला घेत बाबू सोनाराच्या मळ्याकडं टेम्पोने निघाला. पहाटेचा पाऊस चिक्कार बरसून आभाळ आता गुरगुरत अभ्रं छाटत होतं. ढग रिते होतं पुन्हा इर्षेने पाणी भरून आणण्यासाठी सागराकडं जणू पळत होते. तापीकाठाच्या शिवारात जिकडे तिकडे पाण्याचे तलाव साचत मशागत केलेली शेतं पाण्याखाली बुडाली होती. वातावरणात रमणीय, प्रासादिक सुंदरता पसरत दरवळत होती. पण लल्लाच्या आत हीच प्रसन्नता काळीज पोखरत होती व तो काहीतरी हरवलेलं शोधण्यात गर्क होता.
नानजी नानाचा मळा येताच पुढं चिखलातून टेम्पो पुढं जाणं शक्यच नव्हतं तरी तल्लीन लल्ला टेम्पो पुढं नेऊ पाहत होता. पुढं बसलेल्ला रमानं डोक्याला हात मारत टेम्पो थांबवत
" निलू उतर! दादाचं काही खरं नाही समाधी लागली पुन्हा दादाची!" म्हणत टेम्पो उभा करत बारदान काढलं व नानजी नानाच्या मळ्यातून बाबू सोनाराच्या मळ्यातील आंब्याकडं निघाले. मागोमाग सुन्न पणे लल्ला ही निघाला. नानजी नानाच्या विहीरीवरील शेवग्याच्या झाडावर मागच्या वर्षाच्या सुकलेल्या वेलींवर घोसाळी, भोपळे सुकत लटकत होती तर काही पहाटेच्या पावसानं गळून पडलेली होती. लल्ला मटकन थांबला. त्यानं तुटून पडलेली घोसाळी उचलली ती खुळखुळ सुळचुळ वाजू लागली.
" लल्ला एवढी गिलकी तोडून देरे!" आठवताच त्याच्या डोळ्यात थांबलेला मृग बरसू लागला. तो तसाच खाली बसला. शेवग्याच्या झाडावर आभाळाकडं पाहत थंड पावसात सापडलेला राघू बसला होता.शेवग्यावर उरलेली सुकलेली घोसाळी वाहणाऱ्या वाऱ्यानं हालली. लल्लाच्या कानात साखळ्याचा आवाज घुमला. नानाच्या शेतातला फुललेला झेंडूचा बहर झडत कुठं गायब झाला हे त्याला कळेना. मळा त्याला प्रासादिक वातावरणातही उजाड भकास वाटू लागला.
पुढं गेलेल्या रमाचं लक्ष जाताच तो पळत माघारी आला लल्लाचा हात धरत उठवत
" लल्ला दादा चल पटकन दुपारपर्यंत कैऱ्या तोडत बाजार सापडावा लागेल" विनवू लागला.
" रमा, बाजार तर केव्हाच उठला रे! आता फक्त पांगलेला बाजार सावरायचाय!"
आंब्याच्या झाडाखाली वाऱ्यानं बऱ्याच कैऱ्या पडल्या होत्या. रमा व निलू पटापट झाडावरील कैऱ्या उतरवू लागले. लल्ला बारदानमध्ये भरत त्या टेम्पोकडे वाहू लागला. धुंदीतच तो खेपा टाकत होता. नानजी नानाच्या मळ्यात नारू केळीतली पीलपत्ती करत होता. वाफसा मिळाला की लगेच पेरणीसाठी मूठ धरण्यासाठी बाकीचं शेत त्यांनं नांगरून, वखरून तयार ठेवलं होतं.
साऱ्या कैऱ्या तोडून होताच शेवटची खेप बाकी होती. रमा निलूनं बाकी घेतल्या व लल्लानं ही डोक्यावर बारदान घेतलं. नानजी नानाच्या केळीच्या बांधावरून एकापाठोपाठ ते चालू लागले. बांधावरून पाय निसटत बाजुच्या शेतात लल्लाचा तोल गेला. तो तसाच त्या तयार शेतातून चालू लागला. पूर्ण पाय चिखलात फसत आवाज उठत होता. तोच चिखलात त्याचा पाय काट्यावर पडला व पायात टचाटचा काटे घुसले. तो तसाच चालू लागला. पायातून रक्त निघत चिखल लाल होऊ लागला. केळीच्या शेतातून नारू आडवा आला.
" लल्ला थांब ...थांब..पायात काय घुसलं रे?"
लल्लानं नारुकडं पाहत क्षणभर उभं राहत पुन्हा ओझ्यासहीत चाल पकडली. पण तो पावेतो रमानंही वळून पाहिलं. त्याला रक्त दिसताच त्यानं आपलं ओझं बांधावर कडक जागेत उतरवत लल्लादादाकडून ओझं घेत टेम्पोकडं निघाला.
खाली बसत लल्ला कधी पायाकडं तर कधी नारुकडं पाहू लागला.
" आरे वेड्यागत काय पाहतोय! पायात काय घुसलंय ते तर पहा?" नारू जवळ येत पाहू लागला. काटे पायातच रुतत मुडले होते.
लल्ला खाली बसलेल्या जागेकडं पाहू लागला. तीच जागा होती. काटा रुतल्यावर नाही पण आता मात्र वेदनेने पुन्हा त्याच्या पापणकाठात मृग वरसडू लागला..त्याला आपणास कोणी तरी गच्च झखडल्याचा भास जाणवला.
" नारुदा, पेरणीची मूठ खोळंबलीच ना?" जिवाच्या आकांतानं लल्ला बोलला पण नारूस सारं समजूनही काय करावं ते कळेनाच. पण त्याच वेळी जिच्यामुळं पेरणीची मूठ खोळंबली होती तीच सतोन्यात लवकर परतणार होती.
रमानं परत येत ओझं व लल्लास घेत घर गाठलं. दुपारून लल्ला व गोटण बाबानं झिंगाबाच्या नावेवरून कैऱ्या अमळनेरला नेत बाजार गाठला.
बाजारात कैऱ्या विकतांना लल्लाचं लक्ष नाही हे गोटण बाबांनी ओळखलं. एरवी लल्लाची धंद्यावरची तडफ जो तो पाहत राही. कदाचित एका वर्षापासून काॅलेज करत असल्यानं असेल असा विचार करत गोटणबाबा तिकडं दुर्लक्ष करत कैऱ्या विकू लागले.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते सतोन्याला परतू लागले. खाचण्यात येताच गोटण बाबा व लल्ला नावेकडं निघाले. झिंगा बाबानं दोघांना बसवत पलिकडे नेले.पण लल्लानं गोटण बाबास गावात परत पाठवत तो झिंगा बाबाजवळ नदी काठीच थांबला. उन्हाळ्यात दोन महिन्यात तो बऱ्याचदा नदीकाठी झिंगा बाबाजवळच झोपडीत मुक्कामाला थांबत होता. गोटण बाबानं नदीकाठी शेत करत कलिंगडं, काकडी व भाजीपाला लावला होता. त्या ठिकाणी रात्री लल्लाला थांबायला आयतंच कारण होतं. रमा- निलू झिंगा बाबाकडं सायंकाळचा डबा पाठवत.तो खाऊन शेतातच तो थांबे व दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येत अंघोळ करत काॅलेजला पुन्हा परते तर कधी कधी झिंगा बाबाच्याच झोपडीवरुन परस्पर परते. तिथं थांबला की रात्री तो पाणी उतरलेल्या पात्रात तर कधी झिंगा बाबाची नाव पात्रात टाकत रात्री नदीत फिरत राही.
झिंगा बाबाला जाग आली की ते लल्लास शोधत व त्याच्यामागं मागं फिरत तर कधी पोहत नाव गाठत परत काठावर आणत.
" लल्ला, पोरा असल्या वेडानं वाया जाशील. तुला कोणतं दु:खं आहे माहीत नाही मला पण काहीही असो हे ठिक नाही!"
" तेच बाबा! मलाही तेच वाटतंय! जे झालं ते ठिक नाहीच!"
लल्लाचं बोलणं झिरीच्या अड्ड्यातली घोटलेल्या झिंगा बाबास कळत नसलं तरी अनुभवाचे पूर पाहिलेल्या झिंगा बाबाच्या काळजात तप्त निखारा फिरवत.
नाव पाण्यावर तरंगत राही व लल्ला चंद्रप्रकाशात खाचणच्या किनाऱ्यावर नेत जीव तोडून वाट पाही.
कमानीतून नदीपात्रात उतरणाऱ्या वाटेवर दिठीची फुलं अंधारात वेध घेत कुणीतरी येतंय याच विवंचनेत पडून राहत. शांततेच्या गर्भात वाऱ्याच्या हेलकाव्यात डूल हेलकांडत तर कधी अंगावर कुणीतरी पडतंय व आपला तोल जातोय या भासानं लल्ला जिव तोडून आपला तोल सावरे. पण नावेला हेलकावा बसल्याशिवाय त्या शांततेत दुसरा कोणताच व्यत्यय नसे.
पोहत पोहत झिंगा बाबा येई.
" लल्ला कुणाची वाट पाहतोय एवढ्या रात्री?"
" बाबा, प्रभू कासाराकडं कुणी तरी म्हातारी येणार होती ना?"
" लल्ला कुठला प्रभू कासार अन् कुठली म्हातारी! चल पोरा! पात्रात वाहत जाणारं पाणी पुढचा पूर कितीही मोठा आला तरी परत येत नसतं कधी!" म्हणत झिंगा बाबा त्यास झोपडीत आणत झोपवत.
" बाबा, पात्रात वाहणारं पाणी परत येत नसलं तरी काठ युगे युगे झिजत पुराची वाट पाहत झिजत राहतातच ना!"
.
.
आजही लल्ला झिंगा बाबाजवळ झोपडीतच थांबला. गोटण बाबानं आग्रह केला पण तो परतलाच नाही .
रात्री मृगाच्या धारा जोरात सुरू झाल्या. पाचटाच्या झोपडीत थंड वाऱ्यानं झिंगा बाबा व लल्ला काकडू लागला. अंधारात वाऱ्यासोबत जलधारा झोड उठवत तापीस व काठांना झोडपू लागल्या. निसर्गाचा तो प्रकोप लल्लाचा आतला ढवंढाय झंझोडू लागला. झोपडीतला दिवा वाऱ्यानं केव्हाच विझला होता.
" बाबा, हल्ली मला कानात सारखे साखळ्याचे आवाज घुमतात. शेकडो मोर नाचत झुरून झुरुन रडतात असलंच काही तरी आतून पेटून उठतं"
" लल्ला , पावसात सारं चराचर प्रफुल्लीत होतांना मोर आनंदानं नाचतात पोरा! झुरून झुरुन का रडतील?"
झिंगा बाबा त्याची समजूत घालत होते.
पण लल्लाला चमकणाऱ्या सौदामिनीच्या शिखी प्रपातात गोंदलेले पाय ,साखळ्या, डूल दिसू लागले व एक चेहरा आकार घेऊ लागला.
'लल्ला ही पोर तुला आबाद करेल.पण जर का मिळाली नाही तर....' सुंदराचं वाक्य आठवताच त्याच्या काळजात सुरी फिरू लागली. तो पडत्या पावसात बाहेर निघाला.
" लल्ला मागं फिर! पावसात नदीकाठानं फिरण्यात काहीच हासील नाही पोरा!"
" बाबा टिटवी पावसात एकसारखी ओरडतेय पहा!"
.
.
सकाळी लल्ला घरी परतला तर 'माई व देठे सरांनी भेटायला बोलावलंय!' असा रमानं व सरु आजीनं त्यास निरोप दिला. त्यानं भिजलेल्या अंगाला ऊब मिळावी म्हणून अंघोळ उरकली व तो माईस भेटावयास निघाला.
" लल्ला लवकरच तुझा बी.पी.एडचा निकाल लागेल ना?" आल्या आल्या देठे सरांनी त्यास विचारलं.
" होय सर. बहुतेक पुढच्या महिन्यात लागायला हवा. पण का? काय झालं."
" काही नाही. पण मागच्या वर्षी एम. ए. चं अॅडमिशन रद्द करत बी. एड. केल्याचा फायदा होऊ पाहतोय बघ" देठे सर आनंदानं बोलले.
लल्लाला काहीच कळेना. तो आळीपाळीनं देठे सर व माईकडं पाहू लागला.
" लल्ला कृष्णराव बापुंनी तुला लवकरच भेटायला बोलवलंय!" माई आनंदानं म्हणाल्या.
कृष्णराव जि. प. निवडणुकीत निवडून आले होते. त्यामागं देठे सर व लल्ला,बाला यांच्या क्रिकेट खेळाचा खूप मोठा वाटा होता. जर काॅलेजचा संघ जिंकला नसता तर त्यांना तिकीटच मिळालं नसतं. देठे सर व संस्थेतले चार शिक्षक पुढच्या सहा महिन्यात मागे पुढे निवृत्त होत होते . त्यांनी देठेसरांनी बापुंना विनंती करत लल्लास संस्थेत लावण्याची विनंती केली. बापूंनी देठे सर व लल्लाचं मागचं सहकार्य लक्षात ठेवलं होतं. व नाहीतरी आता ते संस्था विकणारच होते. त्या आधी या चार पाच जागा आपल्या गावातीलच लोकांना भरू ,असा विचार त्यांनी करत देठे सरास त्यांनी होकार देत लल्लास भेटायला बोलवलं होतं.
लल्ला व देठे सर भेटायला गेले. बापूंनी गोटण बाबासही बोलवलं.
" गोटण, तुझं कल्याणच करतो बघ. नातवासाठी खूप खस्ता खाल्ल्यास तू. आता तुझं कष्ट संपलं असंच समज. तुझ्या लल्लास उद्यापासून हायस्कुलात पाठव. शिक्षक म्हणून त्याचं काम पक्कं झालं समज! पण यात या देठे सरांचे ही उपकार मान.कारण त्यांच्या मुळंच लल्लाचं काम होतय हे लक्षात ठेव गोटण!"
गोटण बाबाचा अख्खा देह जागेवर थरथरु लागला. प्रथम आपण काय ऐकतो यावर त्यांचा विश्वास च बसेना. ध्यानीमनी नसतांना कोणतीही अपेक्षा नसतांना थेट नोकरी मिळतेय म्हटल्यावर आपल्यापेक्षा वयानं पाच दहा वर्षाचा लहान कृष्णराव बापुंचे पायच धरायला गोटण बाबा झुकू लागला.
" गोटण बा काय हे! " बापु मागं सरत गोटण बास छातीस कवटाळू लागले.
कृष्णराव बापुंनी लल्लाकडून एक छदाम न घेता त्याचं काम केलं. तीन महिन्यांनी खाली होणाऱ्या निकवाडे सरांच्या जागेवर देठे सरांनी पैशाचा व्यवहार करत आपल्या शालकाच्या मुलीसाठी जागा फिक्स केली.
लल्ला व गोटण बाबा देठे सराकडं परतताच गोटण बाबास भरून आलं.
" सर ,माई माझ्या नातवासाठी आई बापाचच कर्तव्य पार पाडलेत तुम्ही. हे उपकार मी जन्मात विसरणार नाही"
" बाबा, लल्लाला आम्ही परकं मानतच नाही म्हटल्यावर त्याचं सारं करणं हे आमचं कर्तव्यच होतं. आता झालं व्यवस्थीत. एकदाचा पगार सुरू झाला की तुम्हासही आता बाजार, यात्रा फिरणं यातून सुटका मिळेल पहा!"
" माई, जत्रा, बाजार, धंदा हे तर कधीच सुटणार नाही आमचं. पण नातवाचं सुटलं यातच मला सारं काही मिळालं. माझा मल्ला भाच्यास व मुलीस मी स्वर्गात सुखानं तोंड दाखवेन आता!"
लल्ला दुसऱ्या दिवसापासून हायस्कुलात रुजू झाला.
.
.
प्रभाकर, गोताबाई व इंदुबाईंनी साकीला जात राधाताईच्या सल्ल्यानं दिपा व शशांकला सतोन्याला आणण्याचं ठरवलं.
" प्रभ्या! पंक्चर तुझ्या बहिणीला सतोन्याला घेऊन जातोय ठिक आहे.पण काळजी घे! तिला सोडावंसं नाही वाटत रे! आमचा जीव पोपटासारखा अडकलाय तिच्यात! पण काय करावं; डाॅक्टरांचंही म्हणनं तेच पडलं की तिला जे आठवतं त्या वातावरणात तिला घेऊन जा! तिथंच तिची स्मृती परत येईल!" भैय्यासाहेब सांगत होता.पण प्रभाकरची तळपायाची आग मस्तकात जात होती. भैय्याचं नाटकी वागणं प्रभाकर जाणून होता पण तरी ही त्यानं मजबुरीनं मौन पाळलं.
" पंक्चर! बरं मला एक सांग! दिपा
'लल्ला' म्हणून बोलतेय तो ' लल्ला' कोण ?"
आता मात्र प्रभाकरची छाती धडधडू लागली. त्याला काय सांगावं काहीच कळेना. दिपाच्या लग्नानंतर तो वा आईनं साकीत पाय ठेवला नव्हता.फक्त दिपाला जळगावला अॅडमीट असतांना तो व आई दोन दिवस थांबले होते .पण त्यावेळेस दिपा कोमातच होती. व नंतर जेव्हा ती शुद्धीवर आली पण स्मृती गेल्याचं कळलं त्यानंतर ते आज आले होते. राधाताईकडून त्यांना सारं कळालं. दिपानं कोणालाच ओळखलं नाही. पण ती जी लल्ला लल्ला बोलतेय तो लल्ला कोण हे आत्या व त्याला माहीत असलं तरी त्यानं भैय्याला काहीच सांगितलं नाही. कारण दिपा लल्लाचं नाव का घेतेत याचं त्याला व आत्यालाही कोडं होतं. पण भैय्यासाहेबाचा स्वभाव प्रभाकर ओळखून असल्यानं तो त्याबाबत काहीच बोलेना.
" पंक्चर ,मी विचारतोय? कळत नाही का? हा लल्ला कोण? सतोन्यात वा इस्लामपुरला?"
" भैय्यासाहेब तसं तर कोणीच नाही. सतोन्यात त्या नावाची चार पाच व्यक्ती आहेत मग नेमकं कोण हे कसं सांगता येईल!"
" ठिक आहे, तिला न्या सतोन्याला. तिची स्मृती परत यायला हवी एवढंच!"
भैय्यनं मनातला त्वेष दाबत सांगितलं तरी या लल्लाचा लवकरच आपणालाच तपास करावा लागेल हे त्यांनं मनोमन ठरवलं.
दिपास घेत सारे सतोन्याला निघाले.जिजा गेली तेव्हापासून दिपा सतोन्याला आज परतत होती ती ही सुध नसणारी. आईला तर ती भेटायला ही गेली नव्हती. हाल भोगत होती पण मला तोंड दाखवू नको हे इंदुबाई विसरल्या होत्या पण दिपा नाही. मात्र आता सुधबुध विसरलेली मैना परत परतत होती.
.
.
क्रमशः
✒ वा.....पा.....