खुमखुमी- १0- Marathi Bhaykatha Special Stories
" ये दिल और उनकी निगाहो के
साये,
मुझे घेर लेते है बाहो के
साये!"
.
.
" माई पायातल्या साखळ्या शेवटी खंडल्याच गं! सुंदराचं मयुर गोंदण ही उडवत उडवत जाणारे गेलेच! " लल्ला जिवाच्या आकांताने माईच्या मांडीवर डोकं खुपसत हंबरला. देठे सरांना या एका महिन्यातील नानजी नानाच्या घरच्या साकीकडच्या साऱ्या हालचाली कळल्या होत्या व लल्ला दिपाबाबतही मॅडमकडून समजलं होतं. पण तरी त्यांना लल्लास सांगण्याची वा सावध करण्याची हिम्मत झालीच नव्हती माई व सरांना मनात अजुनही कुठं तरी अंधूक आशा होती की काही तरी मधला मार्ग निघत जिजाच्या दिराचं व दिपाचं लग्न टळेल व दिपा परत येईल. पण कुठून तरी जिजा व संदेशरावांना जाऊन एक महिना होत नाही तोच दिपा व भैय्यासाहेब यांचा विवाह अगदी साध्या पद्धतीनं व मोजक्या लोकांच्या हजेरीत पार पडला हे लल्लाला माहीत पडताच आपल्या काळजातलं काहूर शांत होण्याचं ठिकाण त्याला आपली आईसमान माई मॅडमच आठवली. म्हणून तो माईकडं येतं आर्त टाहो फोडत होता.
" लल्ला, त्या शेवग्याच्या झाडाकडं बघ! त्याला बहर आला की राघू भोवती मैना येतेच पण तीच मैना कायम न राहता उडून गेली तरी राघू जिणं सोडत नाही. कालांतराने दुज्या गडणी सोबत तो आपला रैनबसेरा करतोच.तीच बात वडचणीतल्या पारव्याची! तीच गत त्या तारेवर बसलेल्या व्हलाची! कुण्या उडत्या सायंकासाठी तो झुरत आपलं जिणं दुस्वर करत नाही. या संसारात साऱ्यांनाच आपल्या मनासारखं घडावं असंच वाटतं रे! पण शेवटी माणुस नियतीच्या हातचं बाहुलंच. नियती खेळवेल त्याच हालचाली या संसाराच्या रंगमंचावर घडत असतात. जाणारी गेली ती कदाचित सुखानं कधीच गेली नसणार.पण स्त्री जन्मच मुळी एक आव्हानाचा दर्या असतो. कोणतीच स्त्री सर्वथा स्वत:साठी जगत नाही. ती वडिलांसाठी तर कधी पतीसाठी तर कधी मुलासाठी जगते! पायातल्या साखळ्या कुणासाठी खंडल्या तरी दिलातलं गोंदण तुझ्यासाठी कायम शाबूत राहील. म्हणून आईच्या मायेनं सांगतेय लल्ला घडलं त्याचा विचार सोड व पुढच्या पुढ्यात मांडलेल्या आयुष्याकडं बघ!"
लल्लानं मनात उसळणारा ढवंढाय महत प्रयासानं दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आलंच नाही.
लल्लाचं खुळ्यागत बघत राहणं, चित्त थाऱ्यावर नसणं यानं सरू आजी गोटनबाबास त्याचं बदलणारं चलिंतर शांत बसू देईना पण घडलं काय हे त्यांना काहीच माहीत नव्हतं व लल्लाही काही सांगेना. गोटण बाबांनी माईस गाठलं व लल्लाच्या एकाएकी बदलणाऱ्या वागणुकीबाबत विचारणा केली. पण माई व देठे सरांनी अवाक्षर न सांगता. गोटन बाबास होईल सारं सुरळीत सांगत धीर दिला.
साकीत जे घडत होतं ते ही
काळीज कुडतडणारंच.
लग्नाआधी राधाताईनं जिजाच्या लग्नाचे व खानदानी सारे दागिने दिपाकडे सोपवले. त्यांना पाहताच दिपाचा संयम सुटला. आपली आक्का आपणास खोड्यात टाकून या दागिन्यासाठी आपणास कोणत्या जन्माचा भार टाकून गेली हे तिला कळेना.ती राधाताईला गच्च मिठी मारत रडू लागली.
" ताई या कचऱ्यास मी काय करू? माझी सोन्यासारखी बहीण गेली!"
" दिपा त्या बहिणीची आठवण म्हणून तरी ठेव.निदान त्यानं तरी जाणारा आत्मा मुलासाठी घुटमळणार नाही!"
दिपानं त्याकडं ढुंकुनही पाहिलं नाही. राधाताई काय ते समजायचं ते समजली. दिपास कदाचित जिजाचे दागिने नको वाटत असतील. राधाताई,
भैय्यासाहेब व संध्या साऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दिपास जळगावला नेलं. दिपा जवळपास वीस-पंचवीस दिवसानंतर प्रथमच घराबाहेर पडत होती. शशांकला छातीशी लावत ती गाडीत बसली. सोनाराच्या दुकानात सौभाग्याचं लेणं मंगळसुत्र, जोडवी, डूल, साखळ्या कंठा ,हार वज्रटिका बाजुबंद, कमरबंद अशी विविध आभुषणे तिच्यासमोर काढण्यात आली पण आपणास यासाठी इथं आणलंय हे कळताच तिच्या ह्रदयात आगडोंब उसळला. जाणाऱ्यांना एक महिना होत नाही तोच यांना इतकी घाई! याचं दुःख उमडत शशांकला घेत बाहेर उभ्या गाडीत येऊन बसणंच तिनं पसंद केलं. राधाबाईला योग्य वाटले ते दागिने त्या काढू लागल्या.
गाडीत येताच ओझरत्या नजरेस दुकानात दिसलेल्या डुलावरून लल्ला आठवत ती धाय मोकलून रडू लागली. राधाताईनं तिच्या मागेच संध्याला गाडीकडं पाठवलं होतं गाडीत वहिणीस रडतांना पाहून संध्या धीर देऊ लागली.
" वहिणी तुझी बहिण गेली पण सोबत आमचाही दादा गेला ना गं!"
" मग तरी एवढी घाई
का?" दिपाच्या सवालाने संध्या ही घायाळ झाली.
पण हे रडणं बहिणी, दाजीसाठी तर होतंच सोबत आणखी कुणासाठी हे दिपालाच माहीत होतं.
" जोडीचं कानात दिसलं नाही म्हणून विचारलं नाही!" हे लल्लाचं बोलणं आठवलं व ती कानातल्या आपल्या डुलाला हात लावत जोरजोरात हमसून रडू लागली. तोच पायातल्या साखळ्यावर तिचं लक्ष गेलं. पैंजण व त्याखालील गोंदण पाहून लल्लाची काय स्थिती झाली असेल यानं ती जास्तच रडू लागली. बहिणीच्या दु:खाच्या आवेगात तिला लल्ला आठवलाच नव्हता पण आज डूल व पैंजण पाहताच काळजाच्या कपारीत कुणीतरी खिळा ठोकतंय या वेदनेनं बेभान होत तिची सुध जाऊ लागली. सध्यानं शशांकला घेत तिच्या तोंडावर बाटलीतलं पाणी शिंपडलं. छपक्यानं तिनं खाडकन डोळे उघडळे.संध्यानं जबरीनं पाण्याची बाटली तोंडाला लावत तिला पाणी पाजलं.
राधाताई बाहेर येत तिला मध्ये घेऊन गेली. दुकानामधल्या कारागिरानं येत पायातल्या जुन्या साखळ्या तोडण्या साठी पाय पुढे करायला लावत तोडण्याची तयारी केली तोच ती वाघिणीगत किंचाळली.
" ताई, नाही सांगितलं ना! " राधाताईनं कारागिरास मना करत पायातल्या साखळ्या तशाच राहू दिल्या व सारे परतू लागले.
" माई पायातल्या या साखळ्या मी कधीच उतरवणार नाही !" हे माईस दिलेलं वचन तिनं पाळलं होतं पण आता त्या साखळ्याच्या नादात कुणाचा नामोल्लेख होणार होता या विचारानं काळीज कपारीत ठोकला जाणारा खिळा रक्ताचा टुसार न निघताही खोल खोल रूतू लागला.
लवकरच लग्न झालं. इंदुबाईनं तू लग्नास होकार दिला नाही तर तुझं तोंड पाहणार नाही हे शब्द तोंड पाहूनही सत्यात उतरत होते. पण भैय्यासाहेबास माला टाकताच दिपानं मनात संकल्प केला;
'आई जाणाऱ्या बहिणीच्या मुलासाठी मी ही तडजोड स्विकारते पण आजपासून मरेपर्यंत मी माहेर- इस्लामपूरात पाय ठेवणार नाही.' लल्ला तुझी तहहयात मी अपराधी झाली.
या लग्नाचा सर्वात जास्त आनंद झाला तो भैय्यासाहेबास!
खुमखुमी! इंगळेच्या खानदाणी रक्तात तांबड्या, पांढऱ्या पेशी असतील नसतील देवाला माहित पण खुमखुमीच्या पेशी ठासून भरल्यात! त्याच खुमखुमी तून दोन वर्षापासुन लाथ मारून पळालेल्या सावजास गळाला लग्नाचं चाखणं लावूनआपण बसलो होतो. पण सावज हाती लागत नव्हतं. शेवटी ममतेची घुटीच कामास आली. शशांकसाठी! आपल्या जाणाऱ्या बहिणीच्या मुलाची काकू होत सावज आपल्या नख्यात अडकली. आता हिला ही आपल्या आबासाहेब व वहिणीसारखीच वाटेला तर लावायचीच पण सहसासहजी नाही! खेळवत खेळवत जीव लावून जीव घेत घेत ......!
लग्नाच्या दोन महिन्यापर्यंत भैय्यासाहेब दिपालीस एका शब्दानं बोलले नाहीत. कारण संदेशरावाचं प्रकरण पूर्ण शांत होणं गरजेचं होतं. म्हणून लगेच नवीन लचांड उभं नको रहायला.यासाठी ते मौन पाळत घरात शांत राहत होते. दिपाली तर शशांकला घेत राधाताईजवळच एकदम निश्चल, तटस्थ, व्रतस्थ झाल्यागत दिवस रात्र ढकलणं एवढंच. दोघामधली ही दरी राधाताईस सहन होईना. त्यांना सुरुवातीस वाटलं दिपाली आधी या लग्नास तयार नव्हती व बहिणीचं दु:खं यामुळे त्यातून सावरायला वेळ लागेल. पण भैय्याचं काय! तो तर दिपाशी लग्नासाठी पायाला घुंगरू बांधून तयार होता.मग आताशी ही वागणूक का? राधाबाई चक्रावल्या. त्यांनी संध्याकाळी त्याबाबत भेय्याकडं विचारणा केलीच.
" भैय्या ,बस बाबा! आता घरचा कर्ता सवरता तुच! आबा.....गेला नी तुझ्यावर भार टाकून गेला!"
" ताई.....आबा साहेबांची जागा मला कशी घेता येईल? सारं कसं आबासाहेब अंगावर घेत! मला कसलीच तोशीश देत नसत! आता मला त्याचं महत्व कळतंय गं!"नाटकी अश्रू गळू लागले.
" भैय्या आबा देव माणूस होता रे!"
'देवमाणूस' हा शब्द ऐकताच भैय्याच्या डोळ्यात लालिमा पसरू लागली. पण झापड पडत असल्यानं व ताईंचा चष्मा ही नसल्यानं ताईला ती रुधीर नसांची लाली दिसलीच नाही.
" भैय्या झालं ते वाईटच. ती,सल, उणीव आयुष्यभर टोचत राहीलच. पण जाणाऱ्याच्या दु:खात इतकाही बुडू नको बाबा की घरात तुझ्याच भरोशावर कुणीतरी दिठीची दोन फुलं लावून तुझी प्रतिक्षा करतंय!" राधाबाई थेट मुद्द्यावर येऊ पाहत होत्या.
" ताई ,कळतंय मला! वहिणी आबांची तीच तर इच्छा होती. पण आबांचं वहिणीचं दु:खं मला कसलाच विचार करू देत नाही."
" जाणाऱ्या जिवांचा आटापिटा ज्यासाठी होता त्यांच्यासाठी तरी दिपाचा विचार कर! दोन तीन महिन्यांपासून पोर एकटी झुरतेय! बहिणीच्या दु:खात! निदान कर्ता पुरुष म्हणून तरी!"
" ताई , ती नं पण एकटी झुरण्यापेक्षा माझ्या दु:खावर फुंकर मारली तर? "
" सुख दु:खाची दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवावी पण आपण ही त्या गोष्टी साठी देणं लागतो हे ही विसरू नको! नी अबोला सोड! तिला धीर दे!"
" ताई तुझ्या शब्दापुढं नाही मी!"
" बरं एक राहिलंच. गिरणाकाठची बाग विकली आबांनी; त्या व्यवहाराचं काय?"
" तो व्यवहार पाहतो ना मी!" डोळ्यातली लालिमा कानाच्या पाळीत उतरत हाताच्या मुठी आवळल्या गेल्या.
" भैय्या तुच पहा पण झालं काय ते सांग!"
" आबांनी शेत विकलं ते पैसे पडलेत खात्यावर .पाहू पुढे शैक्ष. संस्था विकत घ्यायचीय पण मनाजोगती संस्था शोधतोय. संस्था गवसली की घेऊ!"
" भैय्या लवकर कशातही ती रक्कम गुंतवा! ज्यात गुंतवाल ती शशांकच्या नावावर घ्या. मागच्या गफलती पुन्हा नकोत. कारण कर्त्या पुरूषानं दोन्ही बाजू समसमान ठेवाव्यात".
भैय्याला गालावर सपाकदिशी थप्पड बसल्याच्या संवेदना जाणवू लागल्या. तो मनात संताप करत विचार करू लागला. या राधा आत्यानं लग्न केलं नाही तेच बरं केलं. अन्यथा या आत्याची महत्वाकांक्षा किती जबर राहिली असती. ज्यासाठी रस्त्यातला मी काटा काढला त्याच काट्याची अणकुची पुन्हा पायात भरत भरपुट करु पाहतेय!
राधाताई उठल्या व दुसऱ्या मजल्यावरील मागील मोकळ्या जागेत शशांकला धरत अंधारात फिरत असलेल्या दिपास त्यांनी खाली बोलवलं.
" दिपा ये बस! कातरवेळी वरती अंधारात फिरणं बरं नव्हे!"
" ताई कोणतीच वेळ सर्वार्थानं सर्वासाठी कातर नसते. लक्ष्मी येण्याची वेळ कातर कशी असेल? तर या शशांकच्या दृष्टीनं किती शुभ मुहूर्त शुभ कसा असेल!" दिपाच्या या धारदार शब्दांनी ताईच्या वेदना अधिकच तीव्र होऊ लागल्या.
" पोरी आलेल्या वेळेला सामोरं जात तिला आपल्या भल्यासाठी वापरणं हे स्त्रीचं कसब असतं!"
" कसब! कसब वापरुन मला काय करायचंय ताई!"
" दिपे, अख्खं आयुष्य पडलंय!" ताई समजावणीच्या सुरात बोलल्या.
" ताई, आख्खं आयुष्य पडलं हे मात्र खरं! आता ते उचलत पेलत जगणं हेच नशिबी!" दिपा बोलली पण या बोलानं राधाबाईस आपल्या उरातला खिळाच कुणीतरी हालवून उखडतंय याची तीव्र जाणीव झाली. व त्या गत वेदनेने विव्हळल्या. आपण देखील पडलेलं आयुष्य उचलत उचलत तर जगतोय! पण हे दु:खं या कोवळ्या पोरीच्या नशिबी नको. त्यांनी दिपास छातीशी घट्ट लावत आपल्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली.
" दिपा आता शशांकला माझी सवय होऊ देत! तो दिवसा भले तुझ्याकडे राहिल पण रात्री माझ्याकडेच!"
राधाताईच्या या वाक्यानं मात्र दिपास आपल्या पायातल्या साखळ्या आपण वाचवल्या तरी सुंदराचं गोंदणाचाच लिलाव निघतोय यानं ती झंझोळली गेली.
रात्री तापीत अडवलेल्या पाण्यावरून उन्हाळ वारा शीतल होत साकीत शिरण्याची तयारी करत होता. दिपाली वरच्या मजल्यावर शिसवीच्या लाकडाचा जिना चढत वर गेली. वासरूला खुट्यास ठेवत मालकाकडं पाहत पाहत गाईनं कसायाकडं जावं तसंच!
वाड्याची रग, धुंदी ही बहुधा रात्री वाड्यातील वारसाच्या डोळ्यात उतरतच असावी. राधाताईसमोर न घेणारा भैय्या रात्री आपल्या खोलीत गळ्यात रिचवल्याशिवाय झोपत नसे. संदेशरावास हे सारं माहीत असुनही ते तिकडं सोईस्करपणे दुर्लक्ष करत. वयानुसार शौक असतात.जबाबदारी वाढली की त्यावर अंकुश येतोच,असा विचार करत तेवढी मुबा त्यांनी दिलेली होती. पण संदेशराव गेले नी आता सारी रात्रच धुंद होऊ लागली.
जिन्यावर पदरव व साखळ्याचा नाद उठला .चैतन्य मोहरावं तर खुमखुमीच थरथरली.
" या दिपाली बाजीराव कनोले मु. इस्लामपूर कर....." वाड्यात वरच्या मजल्यावर बोल घुमले.
आणलेला दुधाचा ग्लास कामाचा नाही हे ओळखत दिपालीनं ग्लास बाजुला ठेवत झाकला व ती समोर पलंगावर निमूटपणे बसली.
" दिपाली बाई... दिपा.....दिपली.... काय म्हणावं आम्ही? बरं ते आम्ही ठरवू ते जाऊ द्या.पण तुम्ही आम्हास काय म्हणणार?" धुंदाळ आंबट बोल थरथरत होते.
"................." असलं स्वागत तर मग लग्नाची घाई का होती? भयाण ऊर तोडणारी स्तब्धता सवाल उठवुन गेली.
" भैय्यासाहेब? नाही अब हम तो सैय्या हो गये! फिर भैय्यासाहेब कैसे? मग काय? कोणत्या नावानं हाक मारणार?" सवालातीच्या फैरी झडू लागल्या.
दिपालीनं आता शांत राहत सहन करणं यातच भलं आहे ओळखत नशेकडे दुर्लक्ष केलं.
" दिपले! बोल? काय म्हणाली होतीस? ' कुत्रा केळी पिकावी म्हणून परिपक्व केळीलाच नख्या मारत सोय करुन ठेवतो! कुठल्याही नाही! ' असंच ना? पण ऐक हा भैय्यासाहेब लहानपणापासूनच लहान पोरासारखा करत आलाय! आपल्या हिश्शातलं मिळणार हे ठाऊक असुनही याला घाईच फार! सिताफळ पिकणार व आपल्यालाच मिळणार.पण तरी हा काय करतो ते पक्कं होण्याआधीच तोडून पिकायला ठेवतो.नी मग पिकलं का? पिकलं का? पुन्हा पुन्हा पाहत राहतो. पण ते पिकण्या आधीच काळं पडतं व आवठून जातं. हे त्याला माहीत असून तो तसंच वागतो. त्याला तसं करण्याची खानदानी खुमखुमी रक्तात मिळालीय!" आता भैय्याच्या बोलात धार चढू लागली.डोळ्यातली धुंदाळ लालीत प्रतिशोधाची लाली उतरू लागली.
" जाणते-अजाणतेपणी जे काही घडलंय ते मी शशांकसाठी विसरत नवीन सुरुवात करु पाहतेय! आपणही...." दिपा नरमाई घेत बोलतेय तोच तिचं बोलणं भैय्या साहेबांनं तोडलं.
" दिपले,मी कुत्र्यासारखा पक्क्या केळीला नखानी ओरबाडत नाही तर सिताफळ पक्कं होण्याआधीच त्याला पिकायला घालत काळं करत आवठवणारा आहे!"
" तुटल्या सिताफळाला पिकाव की सडावं याची चिंता थोडीच असते!"
" दिपले, आमचे आबा खरच थोर होते गं. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीवर त्यांचा जन्मजात हक्क! पण मी त्यांच्याकडून तो हिरावत आलोय. तुझ्याबाबतीत मात्र उलटंच झालं! तुलाच हिरावयास निघाले होते! त्या वेळेस मला खूप वेदना झाल्या होत्या. पण नियतीनं माझ्या पारड्यात दान टाकलंच. शशांकची चाहूल लागली व त्यांनी माघार घेतली. नी मग माझा मार्ग सुरळीत झाला!" बाटली रिकामी झाली म्हणून भैय्यानं उठत कपाटातून नवीन बाटली काढत बूच खोललं.
" खरं तर मला कुणी टोकलेली वस्तू नकोच असते. कुणी टोकायच्या आधी मला सारं हवं असतं! पण तुला तरी मी हो म्हटलं! का माहितीय?"
" माहीत असो नसो त्या गोष्टीला आता अर्थ नाही!" दिपाली काळजातलं काहूर दाबत नरमाईच घेत होती. तिला जिजाक्काचा - आपला शशांक नजरेसमोर दिसत होता.
" खुमखुमी! मळ्यात छाताडावर लाथ घालत तू पळाली! मुस्काटावर सॅण्डल हाणत तू पळाली! ......" भैय्यानं खाली झालेला ग्लास जोरात भिंतीवर फेकला. साऱ्या जमिनीवर काचाच काचा....
दिपाली घाबरली. तिच्या डोळ्यात आसवे तरळली पण तरी ती जागेवरून हालली नाही.
" तुला परत आणून तुझ्या आयुष्याला त्याच खुमखुमीनं लाथाळण्यासाठीच मी पुन्हा लग्नास होकार दिला. छाताडावरच्या लाथेनं त्या दिवसापासून झोपूच दिलं नाही. इस्लामपुरला व सतोन्याला येत तुमच्या दोघाच्या, त्या पर्भ्या पंक्चर उंदराच्याही पेकाटात लाथ घालणं मला अशक्य होतं का? नाही ना? पण तसं करणं क्षणीक सुखाचं होतं.मला तुझ्या आयुष्याच्या छाताडावरच ही बुटासहीत लाथ घालायची होती. म्हणून लग्नाची घाई होती मला! आता सिताफळासारखं काळं पडत आवठून सुकणं हेच तुझ्या नशिबी!"
दिपाला भैय्याच्या मनातील खदखदणारा ज्वालामुखी बाहेर निघताच भोवळच आली. हा आपल्या वागणुकीनं रागावला असणार इतकं तिला ही कळत होतं पण मनानं इतकी नीच पातळी गाठली असेल तिला कल्पनेतही कल्पना नव्हती. पण तरी काळ लोटेल तसं हा नरम होईल व शशांकसाठी तरी आपण सहन करू असा विचार करत ती काही न बोलता उठली व झाडूनं काचा गोळा करत भरल्या.
" बघा घरात साऱ्या काचा विखुरल्या होत्या. त्या तशाच ठेवत चालणं म्हणजे रक्तबंबाळ होणं. शहाण्यांनी त्या गोळा करत फेकल्या की चालणं निर्धोक होतं. संसाराचंही तसंच. हे मी तुम्हास सांगणं योग्य नाही".
" अय दिपले. तुझा जिंदगाणीचा फालुदा तर मी करणारच....अगदी त्या संदेश.....!" त्यानं जीभ चावत ग्लास तोंडाला लावला व तो तिरक्या नजरेनं तिच्याकडं पाहू लागला. आपण काय बडबडणार होतो याची जाणीव त्याला झाली. पण दिपाली ला मनातला सयंम शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात संदेशरावाबाबत तो काय बोलतोय हे समजलंच नाही.
थोड्या वेळानं तो नशेत तऱ्हाट होतं गडबडला. दिपाली मात्र वरच्या मजल्यावर रिकाम्या जागेत येत आपलं जीवन कच्च्या सिताफळासारखंच काळं पडत आवठणार हे दिसू लागलं. समोर अंतरावर काही घरं टाकल्यावर नदीथय दिसत होती. भकास झालेला चंद्र कष्टानं प्रकाश फेकत असल्यासारखं भासू लागला. तापीच्या पात्रातील रोखलेल्या सडक्या पाण्याचा दर्प शीतल न झालेला वारा आणतोय याची तिला जाणीव झाली. आता मात्र तिचा सयंमाचा बांध फुटला. ती तिथंच बाजुला पडलेल्या आरामखुर्चीत बसत आक्रंदू लागली. तेच पात्र, तीच नदी, तेच आकाश, तोच चंद्रमा जो आपण सतोन्याला लल्लाच्या साथीत अनुभवला. पण ती पावित्र्यता,प्रसन्नता, सुचिर्भुतता कुठेय?
' जोडीतलं कानात दिसलं नाही म्हणून विचारलं नाही!' सांगत जमीन धुंडाळणारी नजर काय करत असेल? पायातल्या गोंदणाच्या सुजेला पाहत कफल्लक असुनही माईकडून पैसे घेत माखनला शिकायला लावत पैंजण घडवणारा लल्ला कुठं असेल? अभंगाच्या अंतिम चरणाचं निरूपण झालं समजून किर्तनातून उठून तर गेला नसेल? लल्ला....... काळजातल्या कपारीतला खिळा आता मला जन्मभर रुतत राहणार जो कुणालाच दिसणार नाही.
तापीच्या काठावरच दोन्ही वाढलेली लल्ला व हा! किती फरक दोघात? तो दरिद्री तरी मनानं गुणानं नवकोट नारायण! तर हा नवकोट नारायण असुनही मनानं कफल्लक! त्याचं मन प्रेमानं ओजस्वतेनं कायम भरलेला सागर उचंबळायचा तर याच्या काळ्या काळजात खुमखुमी चं डबकं.
त्यानंतर दिवसा शशांक व राधाबाईसोबत खोटं हास्य मिरवत वावरणं व रात्री त्याच्या दररोज छाताडावर बुटासहीत बसणाऱ्या लाथा! त्या लाथाच्या वेदनेपेक्षा आपल्या आयुष्यावर यानं मारलेली खुमखुमी ची लाथ तिला जास्त वेदना देऊ लागली. पण तरी ती सहन करत इंगळेच्या खुमखुमीनं पछाडलेल्या वाड्यात बंदिस्त होत राहू लागली. समजोता, तडजोड, तडकलेली काच जुडवत जिवनाच्या आरशात निरखत! पण तिला रात्रीच्या बडबडीत संदेशराव व जिजाक्कास यानच घातपातानं मारलं हे समजताच तिच्या बंदिस्त जगण्याला हादरे बसू लागले. तिनं त्याबाबत राधाताईकडं हंबरडा फोडत जाब विचारलाच.
" ताई, का?..... का? असं का?" दिपा राधाताईला घट्ट बिलगत आक्रोश करू लागली.
" दिपा होईल सारं सुरळीत.... काळाबरोबर बदल होतीलच" राधाबाईंना भैय्या देत असलेला जाच कानावर पडत होता. त्या हिशोबानं त्या समजूत घालू लागल्या.
" ताई दाजी,....माझी आक्का ...खरं सांगा कशी गेलीत?" दिपाच्या या अनपेक्षित प्रश्नांनी राधाबाई एकदम सुरुंग पेटल्यागत झंझोळल्या.
" कशी म्हणजे गं? अपघाताने,!""
"नाही ताई. अपघात घडवलाय ..... घात पात......."
राधाताई तिचे खांदे पकडत एकदम बसलेल्या धक्क्याने अविश्वासानं व विष्मयानं पाहत विचारू लागल्या.
" अपघात....घातपात....शक्यच नाही.तुला कोणी सांगितलं? कसं कळलं?"
" त्यांनीच नशेत बडबडत.....सारं खुलं केलंय!" दिपाली रडतच सांगू लागली.
" पण कोणी घडवला?"
" दुसरं कोण! त्यांनीच..!"
' त्यांनीच' या एका शब्दानं राधाताईच्या कवठीचा स्फोट होतं साऱ्या साऱ्या मेंदुचा चियाबियाच झाला. त्यात कळा जाणवू लागल्या त्या आक्रंदू लागल्या. दोघी एकमेकींना बिलगत किती तरी वेळ आक्रंदू लागल्या. राधाबाईस विश्वासच बसेना. म्हणजे भैय्याचं सारं वागणं वय वाढलं तरी बदललं नाही. चाललेलं केवळ नाटक असेल तर वाड्याचा सत्यानाश अटळ आहे.त्या एकदम गंभीर होत म्हणाल्या.
" दिपाली ऐक! आजपासून मला जे सांगितलं ते कुणाकुणाकडंच सांगू नको.अगदी तुझ्या आत्या, आईला, संध्याला पण नाही. हे सारं इथंच विसर. तेच आपल्या शशांकच्या भवितव्यासाठी महत्वाचं आहे. मी पाहते काय नी कसं करायचं.....
दिपालीचा अश्रूचा आवेग कमी झाला पण तरी ती काहीच बोलली नाही.
राधाताई भुतकाळात शिरल्या.
.
.बाळासाहेब व आवळीमध्ये आलेली नादरबाई त्यांना आठवली......
.
.
.
क्रमशः
✒ वा.....पा.......