खुमखुमी- 9- Marathi Bhaykatha Special Stories
मृगाची वरसाड सतोन्याला मनमुराद झोडपू लागली. सातपुडा पाझरत तापीकडं जणू सरकू लागला. तापीतलं रोखलेलं पाणी वाहत नव्या दमाचं पाणी नदीत वाहत काठावर वगळू लागलं.
लता मावशीच्या लग्नामुळं सारी जमापुंजी खर्च होतं गोटन बाबा कफल्लक झाले होते. बाला विशेष श्रेणीत उत्तीर्ण होत अकादमी मार्फत जळगावला काॅलेजला प्रवेशित झाला. लल्लानं जळगावलाच एम.ए.ला बहिस्थ प्रवेश घेतला. पावसाळ्यात सारे धंदे ठप्प पडताच गोटनबाबा व लल्लानं शेतीकाम सुरू केलं. आता लता मावशी नसल्यानं मिना मावशीची मुलं व सरू आजीच बस स्टॅण्डवरच दुकान सांभाळू लागले.
आज लल्लाला नानजी नानाच्या शेतात उडीद पेरण्यासाठी जायचं होतं. मृगाच्या पावसानं उसंत घेतल्यावर आज जेमतेम वाफसा मिळाला होता. नानानं बाकी शेतात ऊस लावलेला. जुलैत झेंडू लावण्यासाठी काही शेत सोडलेलं. व दिवाळीनंतर केळी लावायची असल्यानं त्यात खरिपाचे उडीद पेरले जात होते. शेताच्या आजुबाजूला मऊ लुसलुशीत गवताचा गालीचा अंग धरत होता. लिंबाच्या झाडांनी अंघोळ केल्यागत तकाकी धरली होती. आभाळात पावशा,व्हले, साळुंख्या झेपावत होत्या. खालच्या लोण्यागत मऊ ओल्या मातीत तर नाना प्रकारचे रंगाचे कृमी, किटक अचानक प्रकट होत स्पर्धा लागल्यागत धावत होते. आभाळातून पाखरे त्यांच्यावर झडप मारत होते.
लल्लानं उडदाची मूठ धरत औतामागनं चालू लागला. काकरीत तिफन डागा मारत चालू लागली. वातावरणात एक प्रकारचा उत्साह संचारला होता.
दुपारी सतोन्याला इंदुबाई आल्या व आल्या आल्या त्यांनी जिजेच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची बातमी दिली. दिपाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या. कारण जिजाक्कास इतक्या वर्षांनी आशा सुटत चालली असतांना आता जिजा आक्काला कसलीच भिती नव्हती. शिवाय आपल्यामागचं संदेशरावाचं लग्नाचं लचांड ही जाईलं याचा तिला मनस्वी आनंद झाला होता. इंदुबाईंना लगेच साकीला जायचं होतं. नाना माणसाचा तुटवडा असल्यानं शेतात तिफनीमागं खत पेरीत होते. आत्यानं प्रभाकर घरी नसल्यानं नानांना बोलवायला दिपालाच शेतात पाठवलं.
दिपा शेतात येताच खत पेरण्याचं काम थांबेल म्हणून दिपालाच खताची मूठ कशी धरावी सांगत उभं केलं. दिपाला शेतातल्या कामाची अजिबात सवय नव्हती पण लल्ला सोबत म्हटल्यावर ती एका पायावर तयार झाली. नाना घरी परतताच ईंदुबाई व नाना साकीस गेले.
लल्लामागं अंतर राखत खताची मूठ धरत चालतांना दिपाची धांदल उडू लागली पण उल्हसीत वातावरण, आभाळ मायेची मृगछाया, खालून तिफनीनं माती चाळवून उठणारा मृद् गंध व त्यात आपल्या माणसाचा सहवास सारंच अद्भुत बेनझीर वाटत होतं. लल्लाला हा सुवर्णक्षण युगायुगापर्यंत चालावा, ही साथीची वाट संपूच नये असंच वाटत होतं. तोच मातीत दडलेला बाभळीचा काटा दिपाच्या पायात खोलवर रुतत मातीत रक्त निथळू लागलं. दिपा खालीच बसली. पाय हातात घेत तिला भोवळ आल्यागत सारं गरगर फिरू लागलं. औत हाकणाऱ्या नारूनं औत थांबवलं. नारू समोर लल्ला घाबरू लागला. " लल्ला सुंभासारखा काय पाहतोय ! पोरीतल्या पायातला काटा काढ आधी! नानालाही नाही सांगत होतो.पण पोरीचं सांगणं नी नानाचं ऐकणं! सवय नसतांना पोर काय खत पेरेल!" नारु संताप करू लागला.
लल्लानं पडत्या फळाची आज्ञा मानत दिपाजवळ बसत त्यानं हातात पाय घेतला. काटा खोलवर रुतला होता. तो चिमटीत धरत काटा काढू लागला तर दिपा वेदनेनं रडू लागली. चिमटीच्या घट्ट पकडीनं काटा निघताच दिपानं लल्लाचे खांदे पकडत गच्च मिठी मारली. लल्ला नारूकडं पाहू लागला. पण मिठीच्या आवेगानं त्यानं नारूचं अस्तित्व झिडकारलं. नारू पाणी पिण्याच्या बहाण्यानं विहीरीकडं निघाला. औताच्या बैलांनी जागेवरच फतकलं मा़ंडत रवंथ करायला सुरुवात केली. खालच्या मऊ मातीची ऊब सुखावत होती.
" लल्ला लोकं या कंटकास शिव्या घालतात पण याची वेदना ही मला आज सुखावून गेली बघ!"
नानजी नानाची पेरणी तशीच राहिली. नारूनं विहीरीवरून परतत औत सोडत बैलांना तापी काठावर चरायला सोडलं. विहीरीवरच्या लिंबाच्या झाडावर राघू व मैना बराच वेळ बसत पावसाची वाट पाहत किलकारत होते. पावसाची चिन्हे दिसताच नारूनं बैल धरत गाडीस जुंपले. तिफन धावेवर ठेवत उरलेलं खत व बियाणं झोपडीत पाणी लागणार नाही असं ठेवलं. गाडीत पाऊस झेलत आभाळ पेलत दिपा परतत होती. असलं आभाळ रोज पेलायला कोण आनंद येईल!
" नारू मामा, शेतात राबणारे किती भाग्यवान असतात ना!" वर पाहत पाणी हातात झेलत लल्लावर उडवत दिपा विचारू लागली.
" कसं गं दिपाताई?"
" हा लाखमोलाचा पाऊस, मृण्मयी वारा, धुंधाळ मृदगंध सारं सारं ताजंतवानं अलगद पणे मिळतं सहज!"
" पोरी, हे सारं तुमच्यासारख्या कधीमधी येणाऱ्यांसाठी ठिक! पण रोज रोज ही अस्मान सुलतानी झेलतांना आमची होणारी ऊरफोड कुणास दिसत नाही! अर्धपोटी राबतांना, काळजात रोजच्या कटकटी दाबत खपतांना, झडी झडकनाशी खेटतांना, अंधारी रात्र अंगावर घेतांना हे सारं सोप्प नसतं पोरी!"
नारू आतल्या वेदनेचा हुंकार मांडत होता पण उल्हसीत वातावरणात तिला तो कळालाच नाही.
इंदुबाई व नाना साकीला पोहोचता पोहोचता रात्र झाली. जिजाचं गरवार पणानं खुललेलं रूप पाहताच इंदुबाईचं काळीज सुपाएवढं झालं.
" आई, दिपा या घरात सून म्हणून आल्याशिवाय आमची नाराजी जाणार नाही गं!" जिजानं आईस मागचा ह्रदयात दडपून ठेवलेला आतला कढ मोकळा केला.
" जिजा, जावयांना म्हणावं भैय्यासाहेबासाठी दिपालीस माझी ना नाहीच! देव उठताच दारी मंडपाची तयारी करा हवं तर! पण येणं जाणं बंद करू नका"
इंदुबाईनं सारी रीतभात करत जिजास इस्लामपूरला नेण्याचं सांगितलं. पण जिजाचं बाळंतपण इथंच होईल सांगत इंगळे वाड्यानं त्यांना परत पाठवलं. त्या सतोन्याला व तेथून इस्लामपूरला परतल्या. त्यांनी गोता वन्ससमोर विषय काढला. पण दिपानं तिकडं दुर्लक्ष केलं. पावसाळा संपेल मग तेव्हाचं तेव्हा पाहू.
पुरा पावसाळा अंगावर घेत सतोना न्हावू लागलं.रान फुलू लागलं. माणसं राबत शेती फुलवू लागले. जिजास मुलगा झाला.
लता मावशीच्या लग्नास दोन महिने होत नाही तोच लता मावशी शंकर काकास घेत सतोन्याला परतली. शंकर काकाचं कुटुंब पाच भावांचं. शंकर काका सर्वात लहान. आई वडील गेले व भावांनी जेमतेम शंकरचं लग्न उरकलं. तेही गोटनबाबाच्या पैशावरच. शंकरला सारे भाऊ ढोरासारखे राबवून घेत. दोन महिन्यातच लता मावशीच्या लक्षात आलं. तरी भरलेलं घर फोडण्याचं पाप नको म्हणून लता मावशी साऱ्या जावा व दिरचं करू लागली. पण त्यांनीच मोकळं करत शंकरला उघड्यावर पाडत आपापली व्यवस्था केली.
" लते! आता आपण कुठं जायचं गं? ना घर ना दार? ना आपलं कुणी?" शंकर असहायपणे विचारु लागला. लतामावशीनं नवऱ्यास घेत सतोन्याची वाट धरली.
गोटन बाबास वाईट वाटलं पण आपली लता पोर उपाशी मरणार नाही व कुणास बोझ ही वाटणार नाही. बाबांनी शाळेजवळची कटलरीची लाॅरी लतास सोपवली. शंकर काका पडेल ते काम करु लागला. बाबानं दोघांच्या संसाराची गाडी रूळावर आणली.
बालाची महाराष्ट्राच्या रणजी संघात अकादमीकडून निवड झाली. संध्या त्याच्यासोबतच फिरू लागली.मध्यंतरी तो घरी आला भेटायला.
" बाला, तू पेस बाॅलींग खेळतो पण फिरकी बाॅलींग खेळतांना अडचण येते. त्यावर लक्ष दे! आता खरी स्पर्धा आहे. त्यासाठी स्वत:ही फिरकी गोलंदाजी करण्याचा सराव कर!" लल्लानं सल्ला दिला.
" दादा माझी संघात फलंदाज म्हणून निवड झाली असतांना फिरकीची मला गरज काय?"
" बाला पुढे संघात जागा पटकावण्यासाठी, टिकवण्यासाठी या गोष्टीची तुला भविष्यात गरज पडेल. त्याची तयारी आताच हवी! प्रतिस्पर्धी संघ तुझी मर्यादा अभ्यासतील व फिरकीच्या जाळ्यात तुला अलगद टिपतील म्हणून सांगतोय. फिरकीवर फलंदाजीचा सराव कर व फिरकी गोलंदाजीही शिक!"
पण बालानं हो म्हणत तिकडं लक्ष दिलं नाही.
इंगळे वाड्यात मुलगा झाला. मुलगा चार महिन्याचा झाला तरी संदेशरावांनी त्याचं मुखदर्शन केलं नव्हतं. त्याच सुमारास भैय्यासाहेबांनी अकादमी सोबतच शैक्षणिक संस्थाही हव्यात म्हणून नविन संस्था काढूयात वा विकत घेऊयात म्हणून गिरणा काठची उरलेली संदेशरावांच्या नावावरील लिंबू - पेरूच्या बागा असलेली जमीन विकायला लावली.
" संदेश मागे अकादमीच्या वेळी ही गिरणा काठच्या बागाच विकल्या व आताही त्याच विकल्या तर तुझ्या नावावर काहीच राहणार नाहीत .याचा विचार केला का तू?" राधाताई संदेशरावाला समजावू लागल्या.
" ताई ,इथली जमीन तर आहेच ना, मग?"
" अरे इथली जमीन तर भैय्या व संध्याच्या नावावर आहे ना!"
" भैय्याच्या नावावर काय नी माझ्या नावावर काय! काय फरक पडणार ताई?"
" अरे पण मागच्या वेळी तुझ्या नावावरची जमीन विकून अकादमीत हिस्सा त्यांच्या नावानं विकत घेतला. नी आताही जर शाळा त्याच्याच नावावर घेतल्या तर?"
" ताई आपला भैय्या तसा वाटतो का?"
" संदेश तुला आपल्या वाड्याची अजुन पुरती जाण नाही!"
" ताई, बघ आता त्याच्यासाठी दिपालीचा हात मागायला जिजा व त्याला पाठवतो मग धडाक्यात उरकवू लग्न! दिपा आली की दोन्ही बहिणी एकाच घरात असल्यावर जमीन कोणत्याही भावाच्या नावावर असू दे!"
" संदेश वेळ निघून गेली की पस्ताव्याशिवाय काहीच उरत नाही मग! पहा !"
कार्तिकी एकादशी झाली काळ जाऊ लागला मग संदेश रावांना खुमखुमी शांत बसू देईना. त्यांना दिपाला कसं ही करूनआपल्या वाड्यातच आणायची होती. त्यांनी जिजास सतोन्याला पाठवलं. सोबत मुलगा राहिल म्हणून भैय्यालाच जिजासोबत पाठवलं.
भैय्याच्या डोळ्यात आग उतरत होती. स्वत: पायाला तोडऱ्या बांधत संदेश दिपाचा हात मागायला गेला होता अन् तिनं धुडकावलं तर आता मला पाठवतोय! पण तरी मी जाईनच. कारण छाताडात सॅण्डल सहीत बसलेल्या लाथेचे , मुस्काटात बसलेल्या सॅण्डलचे हिशोब घ्यायचेत! पण त्या ही आधी खानदानी खुमखुमी चं काय? ती जिरवण्याची वेळ ही आलीय. गिरणा काठचा सारा मळा विकत पैसा हाती आलाय मग संदेशचं काम काय आता? पण याच्या करवी आधी दिपाला तर वाड्यात आणू.
आईला इस्लामपूरला निरोप देत जिजानं सतोन्याला बोलवून घेतलं. जिजा छोट्या शशांकला घेत भैय्यासाहेब सोबत कार नं चोपड्या कडनं सतोन्याला आली.
सव्वा दिड वर्षानंतर जिजा पहिल्यांदाच सतोन्याला आली होती.
इंदुबाई ही धावाधाव करत सतोन्यात आली.
दिपानं छोट्या शशांकला आपल्याकडं घेतलं. पण भैय्यासाहेबाला पाहताच तिची नस तडकली.
" नाना, आत्या, आई माझी सवत म्हणून मी दिपाचा हात मागायला आली होती. पण तुम्ही साऱ्यांनी ते नाकारलं ते एका अर्थानं चांगलंच झालं. नियतीनं माझ्यावर उपकार केले व पुत्रलाभ झाला. त्या कटू आठवणी विसरूयात. आज मी इंगळ्याच्या वाड्यामार्फत दिपाचा हात माझ्या दिरासाठी मागायला आलेय!"
" जिजा पोरी आम्हाला आनंदच आहे पण तरी तुझ्या आईला व दिपालाही विचार!"
" आई...दिपा....?" जिजानं आळीपाळीने दोघीकडं उत्तराच्या अपेक्षेनं पाहिलं.
दिपाचे बाळाला खेळवणारे हात थांबले. तिच्या छातीस धस्स झालं. पोटात भितीने गोळा आला.
" जिजा माझी काहीच हरकत नाही! " इंदुबाईनं अनुमती दिली.
" दिपा तयार आहेस ना भैय्यासाहेबाशी लग्नास?" होकार शिवाय दुसरं काहीच येऊ शकत नाही अशा अविर्भावात जिजा विचारती झाली.
" नाही! माझा नकार आहे!" दिपाच्या शांत सयंमी बोलानं घरातलं वातावरण क्षणात बदललं.
" दिपा , तुझ्या दाजीसोबत लग्नास नकार दिला तो एकवेळ वयामुळं ठिक. पण भैय्यासाहेबांशी नकार का?" जिजाचा दाबलेला राग उफाळू लागला.
" आक्का का ते माहीत नाही पण मला नाही करायचं!"
" दिपे, तोंड आवर! संदेशरावाशी लग्नास मीच विरोध केला होता .पण आता भैय्यासाहेबाशी लग्नास विरोध का?" इंदुबाई रागानं विचारू लागल्या.
" ........."
" आई माझा नवरा चार पाच महिन्यांपासून मुलाचं मुखदर्शन करत नाही. निदान याचा तरी विचार व्हावा. मागचा सारा राग विसरत मी पुन्हा आलेय. नी आमच्या भैय्यासाहेबात उणीव तरी काय नकार द्यायला?"
" आक्का कुत्रं केळ्याच्या बागेत फिरत पिकलेली केळी मिळावीत म्हणून केळ्यास नखांनी ओरबाडतांना पक्की केळी असेल तिलाच नख लावतो. पण तुमच्या या भैय्यासाहेबांनं....." दिपा रडतच संतापली.
सोफ्यावर बसुन आता पर्यंत शांत बसलेल्या भैय्याचा सयंम सुटू लागला. हातातली कपबशी केव्हाही फुटेल इतका दाब सहन करु लागली.
" दिपे, मला काही माहित नाही! तुझा दाजी अजुनही पोराचं मुख पाहत नाही. आणखी किती दिवस त्यांना थांबवू! आई मी शशांकला इथंच ठेवते. जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तो पावेतो शशांक इथंच राहिल. मी चालले!" म्हणत जिजा उठली व भैय्यास उठवत निघायला लागली.
" जिजा पोरी ,असं नको करू! ती नादान आहे. समजवते मी तिला.पण बाळास सोबत ने!" हात जोडत इंदुबाई विनवू लागली.
" आई दिपालीला तयार कर नी बाळाला घेऊन ये! ती जर तयार होणार नसेल तर शशांकला इथंच ठेवा .पण आता माघार नाही."
" आक्का , शशांकला इथं का ठेवतेय!"
" मागच्या वेळेस आईनच शब्द दिला होता ना! भैय्यासाहेबासाठी एक वेळ मी दिपास तयार करेन पण संदेशरावास नाही! मग आता का शब्द फिरवत आहात. जोपर्यंत शब्दाला जागत नाही तो पावेतो शशांक इथंच राहीन."
जिजा व भैय्यासाहेब संतापात निघू लागले.
" जिजा ,पाया पडते.मी दिपाला समजावत तयार करते पण बाळास घेऊन जा. तान्हं पोर कसं राहिल?" इंदुबाई गयावया करू लागली.
" आई ,बाळाचा बाप लग्नाशिवाय त्याचं मुख पहायला तयार नाही तर दिपा अशी अडून बसली. मग मी काय करू? त्यापेक्षा त्याला इथंच ठेव .ती तयार झाली की त्याला घेऊन ये!"
भैय्या पुढच्या तयारीसाठी काहीच न बोलता शांतपणे निघाला. पण काळजात भाले खुपसले जात होते.
इंदुबाई दिपालीवर कडाडल्या.
" दिपे बऱ्या बोलानं लग्नास तयार हो! संदेशरावासाठी वयात तफावत असल्यानं मीच विरोध पत्करत नकार दिला होता. पण भैय्यासाहेबास नकाराचा सवालच नाही! तरी का नकार देतेय?"
" आई ,त्या त्या माकडाशी मी अजिबात लग्न करणार नाही! त्यानं प्रभाकर व मला काय छळलंय हे आम्हालाच माहीत!"
" अगं मागचं काही सांगू नको! आता हा तान्हा पोर इथं! ते काही नाही उद्या सकाळीच तू तयारी कर! होकार देत याला पोहाचतं करू! अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत!"
" आई तू मला हवं तर मारुन टाक पण त्या इंगळ्यांच्या वाड्यात मी पाय ठेवणार नाही!"
" मी पण पाहतेच तू कशी तयार होत नाही! सकाळी बऱ्या बोलानं तयार झालीस तर ठिक नाहीतर मरेपर्यंत तोंड दाखवू नको!" याचं असं भांडण चालू असतांना तान्हुलं टाहो फोडत रडत होतं. गोता आत्यानं त्यास बोटणी बाटलीला लावत वरचं दुध पाजलं.रात्र झाली.
परततांना चोपड्याहून यावलकडं निघतांना भैय्यानं एस. टी.डी बूथ वरून काॅल करत सारं रामायण संदेशरावास कथन करत आग पेटवली.
" भैय्या यांची ही मजाल की तुला ही नाकारावं? थांब तू मी इकडनं येतो. यांचा आज निकालच लावतो. पण भैय्यानं संदेशरावालाच थांबायला लावलं. घरी परतताच संदेशरावानं सायंकाळी तीच कार घेत जिजाला बसवलं.
" संदेश, जिजा सांजवेळेला शहाण्या सुरत्यांनी घर सोडायचं नसतं. रागात काही घडण्यापेक्षा सकाळी निघा!" राधाताई विनवू लागली. पण संदेशरावानं जिजाला घेत कार धानोऱ्यामार्गे यावलकडं काढली.
भैय्यानं घरी थांबत डोळ्यात आग उतरवत सकाळीच तयार ठेवलेल्या माणसास लॅण्डलाईनवरनं सुचीत केलं.
संदेशरावाची गाडी अंधाराचं झापड पडतांना तापी पुलावर आली. संदेशराव अजुनही शांत झाले नव्हतेच. जिजाही तप्त होत मुलगा तिथं टाकल्यानं ती ही दु:खी होतीच. भैय्याची लावलेली लाईन काम करू लागली. कार अर्ध्या पुलावर आली. तोच समोरून येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला. दोन्ही गाड्या एकमेकांना हुलकाणी देता देताच पुलाचे कठडे तोडत एकमेकाच्या विरूद्ध दिसेला पुलावरून पात्रातील पाण्यात आदळल्या. ट्रक तर हुलकावणी देत पसार होणार होती. पण नियंत्रण चुकलंच. तरी भैय्याचं काम आणखीच सोप्प झालं. पाण्यात कारचा दरवाजा खोलता खोलताच संदेशरावाचा दम सुटला. दरवाजा खोलून वा काच फोडून जिजासहीत बाहेर निघताच आलं नाही. ट्रक खाली कोसळतांना उडी घेणारा ड्रायव्हरही ट्रकखालीच दाबला जात त्याचं तर जागेवर पाण्यात आमलेट झालं.
कर्णोपकर्णी बातमी गेली. पोलिसांनी यारी आणत रात्री बाराच्या सुमारास पाण्यातून गाड्या काढल्या. प्रेत काढली. नंबरवरून नाव कळलं. भैय्यास फोन गेला. इंगळ्याच्या वाड्यात एकच आकांत उडाला. पहाटे पर्यंत साऱ्या साकीत बातमी पसरली. पहाटे शशांकला घेत इंदुबाई आत्या,नाना, दिपा रवाना झाले.
शशांकला धरत दिपा व इंदुबाईंनी टाहो फोडला. प्रेतांना अग्नीडाग दिला. ' वाहनाच्या धडकेत समोरासमोर टक्कर' या कारणानं पोलीस फाईल बंद करू लागले. किंबहूना त्यांना फायदाच इतका झाला होता की त्यांना तोच पर्याय जवळचा वाटला.
दिपा व इंदुबाई तर चोरागतच झालेल्या. आपण नकार दिला व जिजा संतापानं निघाली व हे घडलं. आपण होकार दिला असता तर हे घडलंच नसतं.
दसवं आटोपलं नी साऱ्या नातेवाईकांनी इंदुबाई व दिपालीस विनवणी केली. निदान लहान पोराकडं पाहून तरी दिपानं आता होकार द्यावा! भैय्यास पोरीची ददात नाही पण दुसरी मुलगी घरात आली तर पोराची हेळसांड होईल"
आता मात्र शशांकसाठी नकार देणं दिपालाच शक्य नव्हतं. ती आपल्या आक्काच्या जाण्यानं एकदम अपराधीच झाली होती. आईही दहा दिवसांपासून आपलं तोंड पाहत नाही म्हणून शशांकला छातीशी लावत ती ना सतोन्याला परतली ना इस्लामपूरला.
संदेशराव व जिजाला महिना होत नाही तोच दोघांचा विवाह अगदी साध्या पद्धतीनं देवस्थानावर उरकवण्यात आला.
काही प्रश्न सुटले. काही गुंते सुटले. भैय्याची खानदानी खुमखुमी शांत झाली. पण भैय्यासाहेबानं छाताडावर खाल्लेल्या लाथेचं काय? दिपानं स्विकारलेल्या सुलुखाचं भवितव्य काय? नी सर्वात महत्वाचं लल्लाचं काय? नवीनच सवाल, गुंते, गाठी सोडतांना नवीन मारल्या गेलेल्या गाठीचं काय?
" माई हे पैंजण जन्मात उतरवणार नाही!"
या दिलेल्या वचनाचं काय?
" लल्ला ही पोर तुला आबाद करेल पण जर तू नाही मिळालास तर बरबादीच!" सुंदरा गोंदणारीच्या मताचं काय?
नवीन घट्ट बसू पाहणाऱ्या बाला व संध्याच्या गाठीचं काय? त्या आधीही किती तरी मागे......काळात मल्लेश्वर पहेलवान व बाळासाहेब इंगळे राधाबाई याचं काय?
?
?
?
क्रमशः
✒ वा.......पा......