खुमखुमी- 8- Marathi Bhaykatha Special Stories
संध्याकाळ झाली व यात्रेतली गर्दी पांगू लागली. दिपालीला परतावं वाटेचना. ही जत्रा अशीच भरलेली असावी व आपण लल्लाच्या दुकानाच्या आजुबाजुला असंच फिरत रहावं याच धुंदीत ती नाईलाजानं परतली. मैत्रिणींनी काहीबाही खरेदी केलं. पण तिला काहीच घ्यावंसं वाटलं नाही. फक्त हे सोनेरी क्षण काळजाच्या कोंदणात ऊर भरून साठवावेत एवढंच.
सायंकाळी गोटण बाबा घरी लवकर परतले. परततांना त्यांच्या सोबत लल्लाजवळच दुकान थाटणारा माखनलाल ही गेला. माखनलाल हा सोन्या चांदीच्या दुकानात दागिने बनवायचं काम करायचा. पण मालकाशी बिघडलं व पाच सहा वर्षांपासून तो सतोन्यालाच राहत कटलरीचं दुकान थाटू लागला. आता बरीच स्थीर स्थावरता झाल्यावर तो गावाकडेच परतत दुकान थाटणार होता. त्याचं व गोटण बाबाचं चांगलं जमायचं. यात्रेत ही तो लल्लाजवळच दुकान मांडायचा.
लताला पाहण्यासाठी दुपारी आलेले खिरणीचे पाहुणे यात्रा पाहून परतत होते. ते नातेवाईकाकडं मुक्कामाला होते. 'त्यांना लताचं स्थळ पसंद पडावं' असं गोटण बाबा लल्लाला सांगत सतोन्याला परतले.
लतामावशी चार बहिणीत लहान. लल्लापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी. लहानपणी सतोन्याला तो आला तेव्हापासून लतामावशीसोबतच वाढलेला. अतिशय साधी भोळी मावशी दिसायला जेमतेमच. काळी सावळी, नाक फेफरं, ओठ बाबरे. पण कामाला पुरुषालाही लाजवेल अशी. गोटण बाबाच्या घराला लहानपणापासून मिळेल ते काम करत हातभार लावत आलेली. तिला कसलीच हौस नाही. ना नटण्याची,ना खाण्याची ना मिरवण्याची! पहाटेपासून सारा जोजार आवरत सकाळीच दुकानावर हजर राहणारी.
आजही दुपारी दुकानावरून परतत मावशी तशीच वधु परीक्षेला सामोरी गेली असेल! गोटण बाबा आपल्या लहान्या पोरीला उजवलं की मोकळा म्हणून दोन वर्षांपासून पै पै जोडत होते व मुलगा ही शोधत होते.पण पाहणारा नावं ठेवत निघून जाई. नकार पचवतांना लता मावशीच्या चेहऱ्यावर कसलीच घालमेल, दु:ख जाणवेना. काही माणसं कुठून एवढी ताकद आणत असतील? का निसर्गच काही उणीव देतांना असले गुण बहाल करत असेल. निदान या पाहुण्यांनी तरी मावशीस पसंद करावं.लल्लानं मंदिराच्या कळसाकडं पाहत मनोमन विनवलं.
बाहेर अंधार दाटू लागला. थंडी केव्हाच उतरत तिनंही यात्रेत आपला डेरा टाकला होता म्हणून सारे धंदेवाले आपला माल मध्ये ठेवत दुकानाच्या कनाती बंद करत होते. कुणी दगडं मांडून चुलीवर स्वयंपाक करत होते. लल्लास उशीरा घरून माखनकडेच डबा आला. लल्लानं माखनलाही जेवणाचा आग्रह केला. माखननं पाहुण्यांनी होकार दिल्याचं कळवताच लल्लाला आनंद झाला. त्याची नजर जेवतांनाही मंदिराच्या कळसावरील लाईटकडं गेली.
लल्लानं जेवण आटोपून माखनला सोबत घेत मंदिराकडं फेरफटका मारला. तमाशाच्या तंबूकडं चिक्कार गर्दी दाटली होती. मटका, जुगारकडंही गॅसबत्तीच्या उजेडात नशीब अजमावलं जात होतं. त्याला या बेगडी झगमगाटाची चीड वाटे. तिकडे दुर्लक्ष करत तो मंदिराकडं निघाला. मंदिराच्या मागे भलंमोठं वडाचं झाडं होतं. त्यांच्या दुकानाजवळील वडाएवढंच जुनं. आता त्या झाडाखाली बरीच लोकं पथिरी टाकून झोपलेले. त्याला मंदिराच्या कळसावरील लाईटच्या उजेडात ते झाड वेगळंच भासू लागलं.
" माखनभैय्या यह बरगद का पेड हमेशा मुझे औरत सा महसूस होता है!
" लल्ला कैसे रे?"
" एखादी जोगिणीनं आपला केस संभार पसरावा तसच हे झाड आपल्या पारंब्या पसरत पहुडलंय बघ. दिवसाही अंधाराला कवटाळत .जोगिणीच्या उरातल्या कढासारखं. पण रात्रीच्या अंधारानं तरी त्याला घेरलंच!"
" लल्ला ये क्या बैरागी की तरह बोल रहा है!"
" काही नाही जाऊ दे! तू तेरी सुना!"
" लल्ला, अब जल्दही अपने घर लौटुंगा .गाव मे अपनी खुद की दुकान होगी!बस देवी माॅ का आशिष चाहिए!"
" माखन भैय्या सब ठिक होगा,देखना! देवी माॅ सबका भला ही चाहती है!"
लल्लाला दुपारीचं दिपालीचं बोलणं आठवत होतं! '' देव मला ओरबाळत आलाय!' काय असावं! दिपाली किती किती साधी! नानजी नानाची भाची म्हणजे श्रीमंतच.तिच्या राहणीमान वा अंगावरील दागिन्यानं ही कळतं पण तरी त्या श्रीमंतीतही कसलीच ऐट नाही.
' साधेपणात सौंदर्य असतं!' किती उदात्त विचार. अंगावर सोन्याचे दागिने तरी साधे पैंजण( साखळ्या) पाहणारी. आज देवीकडनं काय मागितलं असावं तिनं? आयुष्यभराची आठवण राहिल असं! या मंदिरातील देवीकडं अशी कोणती ताकद असावी की प्रत्येक भक्त भक्तीभावानं माथा टेकवतो! सायंकाळी आपण कळसाकडं पाहिलं नी माखनभैय्यानं
' पाहुण्यांनी लतामावशीस होकार दिल्याचा' निरोप आणला. पंधरा वीस गावातील लोक येतात,नारळ फोडत माथा टेकवल्या शिवाय कोणतीच खरेदी नाही. माणूस आशेवर जगतांनाही भविष्याचे किती आराखडे मांडतो, स्वप्न रंगवतो! व त्यासाठीच देवीकडं साकडं घालत असावा का! आपल्या मनातही दुपारी मंदिराकडं निघालेल्या दिपाला पाहतांना सहज मनात साकडं आलंच! लल्ला दुकानाकडं परतला.
धन त्रयोदशीची यात्रा जास्तच दाटली. आजही दिपाली शुभांगी,गायत्री, आत्या, नानजी नाना सोबत आलेली. देवदर्शन होताच मुली आत्या व नानांना खरेदी करायला लावत मोकळ्या झाल्या. माखनच्या दुकानावर बरीच गर्दी होती. माखनची पत्नी मयुरी पैंजण,जोडवी, अंगठ्या, नुपूर, नथी, फुल्या दाखवत होती. खेड्यावरुन आलेल्या मुली, बाया विविध वस्तू घेत होत्या. एकीकडं लल्लाचं दुकान तर पलीकडे गोंदणारी बाई बसलेली. दिपाली शुभांगी व गायत्री सोडत नव्हत्या म्हणून माखनच्या दुकानावरच रेंगाळली. जवळच लल्ला नारळ कटलरी विकत दाखवत होता. दिपाली कधी त्यांच्याकडं तर कधी माखनच्या दुकानातील वस्तू निरखीत होती.
तेवढ्यात माखनच्या हातात तिला पैंजणाची जोडी दिसली. तशीच जोडी तिला मयुरीच्या पायातही दिसली. दिपालीनं माखनकडं तीच पैंजणं पहायला मागितली.
" बहना, कोई और देख लो, ये बेचना नही है!"
" माखन भैय्या दिखावो तो सही!"
" भले देख लो पर बेचना नही!"
दिपाली निरखून पाहू लागली. पैंजनाची डिझाईन एकदम युनिक होती. पैंजणाच्या कड्यांवर बदामी आकाराच्या चांदीच्याच टिकल्या जडवल्या होत्या त्यावर रंगीत खडे. ती मयुरीच्या पायातील पैंजणाकडं पाहू लागली. अगदी तशीच डिजाईन पण तिच्या पायातील पैंजणाच्या बदामी टिकल्यातील खड्यावर एम एम लिहीलेलं व मधल्या टिकलीवर मोराचं छोटंसं तोंड. कारागिरी पाहून ती थक्क झाली.
" माखनभैय्या काहीही कर मला हीच घ्यायचीय!"
" बहना ,माफ करना .यह मै किसी को दे चुका हू! यह कारागरी मेरे पिताजी की है! उन्होने अपने बहू के लिए शादी के वक्त खुद बनाई थी! दुसरी भी वे ही बनाकर रख गये थे ताकी उनको देखकर मै सिख सकू.पर मै बना ही नही पाया." माखन बोलला व लल्लाकडं गेला.
" लल्ला इसे देखकर मै बना नही सकता. यह मै अपनी लताबहन को देना चाहता था! लेकीन पायल तो लडकेवाले देते है! इसिलिए मैने कल लडकेवालोसे मामुली पैसे लेकर उनको बेची है और लतादिदीको देने की बिनती की है! ताकी उनकी तरफसे सही लेकीन यह पायल मेरी लता बहन के पावो मे सजनी चाहिए!"
माखन लतामावशीस देतोय म्हटल्यावर दिपाली काहीच बोलली नाही. लल्लाला तर काहीच सांगता येईना. एरवी माखननं ती विकली असती तरी ती चांदीची असल्यानं लल्लाला विकत घेणं म्हणजे दुकानातून एक महिना कसरत करावी लागली असती. लल्लाला अनाठायी खर्च करतांना त्याला गिऱ्हाईकाशी एक दोन रुपयासाठी घासाघीस करणारा गोटण बाबाचा चेहरा आठवे!
दिपा लल्लाकडं,लल्ला पैंजणकडं पाहत होता. कोडं सुटेना.
" दिपालीला गोंदणारी बाई दिसली. तिचा चेहरा उजळला.
" माखनभैय्या लता मावशीस देणार तर अवश्य द्या पण मला फक्त थोडा वेळ दाखवा!" म्हणत दिपानं लल्लाच्या हातातून साखळ्या घेतल्या व ती गोंदणाऱ्या बाईच्या समोर खाली बसली.
" अगदी अशाच साखळ्या पायावर गोंदशील?"
" गोंदणार ताई! पण वेळ खूप लागेल व मजुरी मी मागेल ती द्यावी लागेल!"
" ती चिंता नको करु तू. तुला हवे तेवढे पैसे घे! पण अगदी अशीच डिजाईन!"
गोंदणाऱ्या बाईसमोर पाय पुढे करत दिपानं फतकल मांडलं. गायत्री व शुभांगी कपाळाला हात मारत यात्रेत निघून गेल्या. मयुरी भाभी तिच्याजवळ बसली.
" दिदी, मेरे ससुरजीने हमारे नामसे एम. एम. और मोरनी निकाली थी. तुम किसका नाम निकोलोगी?"
" डी. एल. और बीच मे मोरनी ही !"
" मतलब नही समजी दिदी?"
" मयुरी भाभी हर बात का मतलब नही होता! समजनेवाले समज जाते है!" दिपानं लल्लाकडं पाहत सांगितलं.
"......."मयूरी गडबडली.
" भाभी मेरा नाम दिपाली है ना डी. पी एल. डी व एल मध्ये मोराचा तुरा चितारला की तुऱ्यात पी होईल बरोबर."
दिपालीनं स्पष्टीकरण देतांना 'एल' उच्चारतांना लल्लाकडं असं काही पाहिलं की मधला मोर लल्लाच्या नजरेत थुईथुई नाचू लागला. सायंकाळ पर्यंत आत्या, नाना शुभांगी गायत्री सारी यात्रा फिरून तिच्याजवळ येत बसले. गोंदणारी सुंदराबाई ही हाडाची कलाकार निघाली. तिनंही एकाच बैठकीत समाधी लागल्यागत दोन्ही पायावर साखळ्या अशा काही चितारल्या की पाहणाऱ्याची नजर खिळवून राहील! बाईनं डि. व एल च्या मध्ये बदामी टिकलीवर मोराचं तोंड काढत त्याच्या तुऱ्यात पी बरोबर चितारला पण खरा उठाव डी. व एल या अक्षरांनाच दिला. काढून होताच दिपाली एकटक पाहत खूश झाली. तिच्या नजरेतली खुशी ओळखत ते सारे परतल्यावर गोंदणारी बाई लल्लाकडं गेली.
" लल्ला मी आयुष्याच्या कोंदणात गोंदणानं नाव कोरलं. तुझ्याकडून ही बिदागी हवीय मला!"
" सुंदरा, काय सांगतेय मला नाही कळालं."
" लल्ला आमचं आयुष्य जत्रेत फिरण्यात जातं.आम्ही माणसापेक्षा माणसांची मनं वाचतो! खुळा नको बनू! चार तास दिपा बसली असतांना तिच्या नजरेतला भाव या सुंदरानं ओळखला. ही पोरगी तुझं जीवन आबाद करेल पण जर तू नाही मिळाला तर बरबादीच समज.चल मी जीव तोंडुन दोघांची नावं वेधकपणे गोंदली त्याची बिदागी दे मला!"
" सुंदरा ,काय देणार मी कुणाला! मीच फाटक्या प्रारब्धाचा!"
" लल्ला मला नको देऊ बिदागी पण माझं बोलणं पक्कं लक्षात ठेव!" सुंदरा म्हणाली व निघून गेली.
आज गोटन बाबाच मुक्कामाला थांबला म्हणून लल्ला रात्री सतोन्याला परतला. सतोन्याला जिकडे तिकडे धनाची पुजा होत होती. दिवे चढत होते. दिवाळी पर्वाची रोशनाई होत होती.लल्ला घरात आला तेव्हा सरु आजी गोटण बाबा नव्हते तरी घरातल्या तोडक्या मोडक्या धनाची पुजा करत होती. लल्ला जेवण आटोपून मागच्या दारी निघाला तर नानजी नानाच्या घरात गोता माय दिपाच्या पायाला गोंदल्या जागी सूज आल्यानं दिव्याच्या उजेडात तेल लावत होती.
झेंडूच्या फुलासाठी तो नानाकडं गेला.
" नाना, उद्या माणसं सांगून फुलं तोडली तर बरं होईल. आमच्या कडनं तोडायला माणसं येणं शक्य नाही.!"
" लल्ला ठिक आहे .पण दिवाळ सणाचं मजुर मिळणं शक्य नाही.तरी पाहतो!"
" लल्ला बस रे! बऱ्याच दिवसातून आलाय घरी!" गोतामाय म्हणाली.
लल्ला बसला पण त्याची नजर दिपाच्या पायावर जाताच त्याला वेदना होऊ लागल्या. तिच्या पायास गोंदण्याच्या सुईमुळं सुज आली होती.
जर त्या साखळ्या माखननं लतामावशीसाठी दिल्याचं सांगितलं नसतं तर आपण घासाघीस करणाऱ्या गोटणबाबाच्या चेहऱ्याचा विचार न करता नक्कीच घेतल्या असत्या. कारण माखन देत नाही म्हटल्यावर दिपानं लगेच तसंच गोंदून घेतलं. त्याही स्थितीत दुपारी सुंदरासमोर पाय धरत बसलेली दिपा त्याच्या नजरेसमोर दिसू लागली. गोता आत्या घरात लल्लासाठी दूध गरम करू लागली तर नाना अंगणातल्या दिव्याची विझू पाहणारी वात मोठी करण्यासाठी अंगणात पुढे गेले.
" कुठल्या विश्वास गुंग झालाय?" चुटकी वाजवत हसत दिपा विचारू लागली.
लल्ला चुटकीच्या आवाजानं भानावर आला. माणसाचं मन किती भुल्लकड ! स्वर्ग समोर असतांनाही स्वर्गाच्याच स्वप्नात रमायला करतो! त्याला हसू आलं.
"काही नाही. का उगाच त्याच पैंजनाच्या नादी लागलीस! दुसऱ्या घेऊन मोकळं व्हायचं ना!"
" अरे दुसऱ्या घेतल्याही असत्या पण त्या आयुष्यभर टिकल्या नसत्या ना! नी मी तुला कालच बोलले होते की मला आयुष्यभर पुरेल असं काही तरी हवं! आता बघ या मनातली जत्रा गोंजारत आयुष्यभर आपणास साथ देतील!"
"आपणास....?" लल्ला विचारु लागला तोच नाना आत आले व गोतामाय ही दुधाचा कप घेऊन आली.
दुध घेत लल्ला उठला. दिपाच्या दिठीच्या दोन फुलातील दिव्यांना तो उठूच नये असंच वाटत होतं. ती सुजलेल्या पायांनी उठली.पण तो पावेतो तो निघून मागच्या दारातून घरी परतला.
बालानं गटाच्या स्पर्धाही गाजवल्या. सतोन्याचा संघ उपांत्य फेरीत हारला पण बालाचा खेळ साऱ्यांनाच खुणावू लागला. सध्या इंगळेनं त्याला अकादमीत घेतलंच. दिवाळीसाठी तो सतोन्यात परतला.
कार्तिकी एकादशी होताच लता मावशीचं गोटण बाबांनी लग्न उरकलं. लग्न खिरणीला झालं.
लग्न उरकताच गोटण बाबा व लल्ला यात्रा करू लागले.
उत्तर भारतातून परतायला तीन महिने होताच जिजाची शंका सत्यात उतरत साऱ्यांची हूरहूर वाढली. नवरात्रीनंतर संदेशरावानं एका वर्षासाठी तरी लग्नाचा निर्णय तहकुब केला होता. दिपाचा बाण खोल जिव्हारी रुतल्यानं त्यांनी लग्नाचा घरातील विषयच बंद केला होता. आता तर तो कायमाचाच बंद होणार होता. कारण साऱ्या वैद्यकीय चाचण्या व निदान यांना फाटा देत नियतीनं जिजावर उपकारच केले. जिजास दिवस गेले होते. राधाताई हर्षल्या जिजास तर आभाळ ठेंगणं वाटू लागलं. संदेशराव आता खुमखुमी वेगळ्या मार्गाने प्रत्यक्षात आणावयाचे ठरवू लागले.
अकादमीत प्रवेश देत बालाचा बारावीतला प्रवेश सतोन्यात ठेवत त्याला जळगावला बोलवण्यात आलं. बोर्डाचा फाॅर्म भरला गेल्यानं आगामी वर्षांपासून त्याचा प्रवेश जळगावला होणार होता . तरी आताच तो जळगावलाच काॅलेजला जात त्याची सोय करण्यात आली. अकादमीत सरावाची त्याला गरज नव्हतीच. तरी व्यायामासाठी व सरावासाठी संध्या त्याला अकादमीत बोलवू लागली.
लल्लाच्या आता यात्रा व गावातलं दुकान सुरू झालं. बी. ए. च्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास ही सुरुच होता.
माघ उजाळला. माखन गावाकडं निघाला. जाण्याच्या दिवशी तो व मयुरीभाभी गोटणबाबा, लल्लास भेटले. मयुरी व माखननं लल्लास कोपऱ्यात बोलवत पैंजणाचा( साखळ्यांचा) जोड दिला. लल्लाच्या विनंतीवरुन माखननं मयुरीतल्या पायातल्या पायल पाहून त्या बनवल्या होत्या.
" भैय्या! तुम्हारे भैय्या अपने पिताजी के खातीर भले सीख न सके पर दिपा और तुम्हारे खातीर सीख ही गये! लगन से चाहो तो दुनिया मे कोई बात नामुमकीन नही!" मयुरी भाभी भरभरून बोलत होती. लल्लानं गोटन बाबाच्या पैशास तोशीश न लावता आपल्या माई मॅडमकडनं दिड हजार रुपये घेतले होते. पैंजण हातात येताच त्याला माई मॅडमकडे पैशासाठी गेलो होतो तो दिवस आठवला. त्याला ज्या ज्या वेळी स्वत:साठी काही गरज पडे; त्या त्या वेळी त्याला आईसमान माईच आठवे.ना गोटन बाबा!ना सरू आजी! ना लता मावशी! काही भावनिक नातीच अशी असतात! जी रक्ताच्या नात्यावरही मात करतात!
" माई! "
" लल्ला! काय बाळा!"
"..........!" लल्लाच्या डोळ्यात आसवे तरळली.
" लल्ला बोल ना रे ! रडतोस का?"
" माई मला दिड हजार हवेत!"
माई शांतपणे उठली.कपाटातून पैसे काढून देत डोक्यावर हात फिरवला.
हीच भावनिक गुंतवणूक! जर गोटन बाबाकडंनं एक रुपया ही मागितला असता तर बाबांनी आधी कशासाठी हवे हे विचारलं असतं. बाबांचा दोष नव्हताच.पण तरी...
" माई! कशासाठी हवेत? कधी परत करणार? हे विचारणार नाही!"
" लल्ला ! तुला हवेत ना? मग का चौकशी!"
त्यानं माईचा पाया पडत आशीर्वाद घेतला.
" मनातल्या आकांक्षा पूर्ण होवोत!" माईनं डबडबत्या डोळ्यानं भरल्या ह्रदयातून आशीर्वाद दिला.
आजही लल्लाला लहानपणी मायेनं भरवणारी तीच माई मॅडम आठवली.
त्यानं तेच पैसे लगेच माखनकडे देत
" लता मावशीला दिले तसेच पैंजण मला हवेत! तुला येत नसतील तर शीक पण हवेतच! भले दोन महिने, तीन महिने घे पण बनवच!"
माखन व मयुरीनं मेहनत घेत आधी साध्या बनवल्या व नंतर चांदीच्या. अगदी तशाच जशा सुंदरा बाईनं
दिपाच्या पायावर गोंदल्या होत्या! मयुरी भाभीनं बदामी टिकल्यावरील खड्यावर आपल्या हातानं डी. एल. नाव व मध्ये मोराचा पी आकाराचा तुरा काढला होता.
लल्लानं पैंजण पाहिले त्यात त्याला दिपाचे सुजलेले पाय आठवले. त्यानं माखन भैय्यास गळ्याशी लावलं. मयुरी भाभीस हात जोडले.
" लल्ला भैय्या अब हम तो अपने वतन चले लेकीन ये पायल वाले पैर देखते समय तुम्हरे भैय्या की याद जरूर करना!"
लल्लानं पैंजण ठेवून घेतले. आता द्यायचा प्रश्न होता. पण तो ही निकालात निघाला. गायत्रीचं भडगावला लग्न जमलं होतं व लग्नास दिपाली गेली होती. वऱ्हाड परतलं पण नवरी बरोबर करवली म्हणून दिपालीला एक दिवस थांबवलं. लग्नास गेलेला लल्लाही भडगावला नातेवाईकांना भेटण्यासाठी थांबला. दुसऱ्या दिवशी तो परततांना गायत्रीला भेटायला गेला तर गायत्री व सारं कुटुंब कुलदैवताच्या दर्शनासाठी निघाले होते. दिपाली गायत्रीची रजा घेत लल्लाबरोबर परतली.
भडगाव, पारोळा, अमळनेर करत सातच्या गाडीनं ते दोघे खाचण्याला उतरले. झिंगा बाबा स्टॅण्डवर नव्हता. लल्ला व दिपा बुरूजाची कमान ओलांडून उतरत्या वाटेवर आले. हिवाळ्याचं सात वाजताच अंधारलं होतं व माघी पुनवेचा चंद्र आपलं हिव भरलं चांदणं ओतत होता. दिपानं वाट लागताच लल्लाचा हात हातात घेतला. थंडगार हातातून उबदार शहारा लल्लाच्या अंगात दौडला.
काठावर आला तर नाव खुंटीला बांधलेली. पलीकडे त्यानं जोरानं झिंगा बाबास पुकारा भरला.
" लल्ला बरं झालं तू आला. तिकडनं नाव घेऊन ये! कुणी तरी दुपारी मी नव्हतो तर नाव तिकडं नेत उभी केलीय. मी गावातून आताच आलो.पोहत येणार होतो तर तुझा पुकारा आला!"
झिंगा बाबाचा परतीचा पुकारा येताच त्यानं नाव सोडली व काठाला लावली.
" चल मार उडी!" दिपाकडं पाहत तो म्हणाला.
" अ हं! पहिल्या वेळेस त्या प्रभू कासाराकडं की कुणाकडं जाणाऱ्या म्हातारीला कसं अलगद उचललं होतंस तसंच ...." दिपा लल्ला हातानं ओढेल म्हणून काठावर मागं सरकत हसत होती.
तापी पात्रावरील पात्रे तीच होती पण जाणाऱ्या काळासोबत पात्रातून बरच पाणी निवळत वाहून गेलं होतं की मुरलेल्या पाण्यानं पात्रात ओल धरली होती पण अंतर नक्की कमी झालं होतं.
लल्ला हसला व काठावरून दिपाला धरत नावेवर आला. सारा नदीकाठ शहारला व पाण्यात लाटा रोमांचित होऊ लागल्या.
त्यानं नावेला वल्हवत गती दिली.
" लल्ला ही नाव अशीच रात्रभर फिरत रहावी. चंद्र हिवभरलं चांदणं शिंपत रहावा, वारा मंद वाहत रहावा नी...." दिपा स्वप्नात काकडू पाहत होती.
तोच चंद्राच्या प्रकाशात लल्ला वल्हं ठेवत जवळ आला. त्यानं खिशातून साखळ्या काढल्या व दिपाच्या हातावर ठेवल्या.
" वारा वाहत रहावा नी गोंदणावर पैंजणाची छुमछुम मंदमंद नादलहरी उठवत रहावी!" लल्लानं तिच्या पायात साखळ्या अडकवल्या. चंद्राच्या प्रकाशात यात्रेतल्या साखळ्या सारख्याच साखळ्या तिनं ओळखल्या.
" लल्ला या कशा आल्या! लतामावशी?????"
" खुळी आहेस का?"
" मग.....?"
" माखन व मयूरीभाभीनं बनवल्या"
" तू बनवायला लावल्यास?"
"......." लल्ला काहीच बोलला नाही
तिनं मौनाची भाषा जाणली. तापी माय नावेला आपल्या पात्राच्या कवेत गोंजारू पाहत होती तर माघी थंडी तापी लाच कवेत ओढू पाहत होती.
" दिपा! एक करशील! सकाळी मी माई मॅंडमकडं येतो तुही येशील का?"
" का?"
"........" लल्ला पुन्हा काहीच बोलला नाही.
दिपानं काठ जवळ येण्याआधी चंद्रास जेवढं साठवता येईल तेवढं साठवत ती नावेवरून खाली उतरली. झिंगा बाबानं नाव नांगरली व दोघांमागोमाग तो ही काठ चढत गावात आला.
भल्या सकाळी अंघोळ करून लल्ला माईकडं गेला. त्याला धाकधूकच होती. पण तोच दिपा आली. लल्लाची चित्त पालवी खुलली.
" दिपाली ना तू! नानजी नानाची भाची का तू? कसं काय येणं केलंस एवढ्या सकाळी?" माईनं दिपालीस विचारलं
" माई सरांना प्रभाकरच्या अभ्यासाबाबत विचारायचं होतं!" दिपा प्रसंगावधान राखत बोलली.
पण तोच पायातल्या पैंजणावर लक्ष जाताच माईला आश्चर्याचा धक्का बसला. तीन दिवसापूर्वीच लल्लानं त्या दाखवल्या होत्या. माईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या क्षणात लल्लाकडं तर क्षणात दिपाकडं अविश्वासानं पाहू लागल्या. लल्लानं ओळखलं व त्यानं क्षणाचाही विलंब न करता माईचे पाय पकडले. तोच धागा पकडत दिपानंही पाय पकडले. माईनं दोघांना छातीशी लावत आलिंगन दिलं.
माईला आठवलं.
" माई ,पैंजण घेतलेत ! तु दिलेल्या पैशातून!"
" बाळा ! काय हे? कुणासाठी?"
माईला मुलबाळच नव्हतं .म्हणून त्या लल्ला व बालालाच आपली मुलं मानत. पण लल्लावर मायेची आसक्ती अधिक.
लल्ला काहीच बोलला नाही.
" माई एक वेळ पहा तर खरं! आवडतात का?"
लल्लानं दिलेले पैंजण माईनं निरखून पाहिले .डिजाईन एकदम अनोखी वाटली.
" लल्ला छान आहेत"
लल्ला काहीच बोलणार नाही पण मनातलं काही तरी उघडू पाहतोय हे माईनं ओळखलं व विचारणं सोडलं
लल्ला काहीच न बोलता निघून गेला.
तेच पैंजण दिपाच्या पायात पाहताच माईला सारा उलगडा झाला.
" दिपा! विचार कर. माझ्या गरीब लेकरूस फसवणार तर नाहीस ना?" माईनं मिठीतच रडत रडत दिपालीस सवाल केला.
" माई, पायातले पैंजण बदलणार नाही हे वचन !"
" बस! मला दुसरं काही नको!"
माईनं दोघांना चहा पाजला. तोच फिरायला गेलेले देठे सर परतले. दिपाली निघून गेली.
" लल्ला, बालाची अकादमीत निवड झाली. आता विविध स्पर्धेत व प्रथम श्रेणीत त्याची निवड पक्की समज! फक्त दु:ख एकच की तुलाही संघात पाठवलं असतं तर तुझीही निवड होतीच. पण गोटन बाबाचे हाल दिसले नी तुझं नाव कट केलं"
माईनं दिपा व लल्लाचा विषय अजुन तरी नको म्हणून देठे सरांजवळ काढला नाही. कारण माईनं दोघांना आधी ग्रॅज्युएशनवर लक्ष द्यायला सांगितलं होतं तो पावेतो माईनं कुठंच वाच्यता नको म्हणून मौन पाळलं.
पैंजणाची छूमछूम मनात रुंजी घालत होती मोर नृत्य करत होता
पण .....
पण.....
काळ पुढे सरकू लागला तसे चक्र फिरतांना फासे पलटू लागले
.
.
जिजास मुलगा झाला नी संदेशरावांनी इंगळेच्या वाड्यात गर्जना केली.
" जिजे, मला नाकारणारी तुझी बहिण याच घरात सून म्हणून यायला हवी. या मुलाची काकू म्हणून..... तो पावेतो मी या मुलाचं मुखदर्शन करणार नाही!"
.
.
फासे! नियतीनं जिजेच्या फाटक्या झोळीत दान टाकलं होतं त्याचा परतावा तर नियती मागत नव्हती ना?
.
.
क्रमश:
✒ वा.............पा.....................