खुमखुमी- 7- Marathi Bhaykatha Special Stories
साकीतल्या इंगळे पट्टीतील संदेशरावाच्या वाड्यावर गेल्या महिन्यापासून नुसती धूसफूस चालू होती. भिती, धास्ती व संशयाचं वातावरण होतं. संदेशराव व जिजाबाईच्या लग्नास पाच- सहा वर्ष उलटूनही घरात अजुन पाळणा काही हालत नव्हता. वर्षाची पानं पलटू लागली तशी राधाताई काळजीनं तुटू लागल्या. तिला आपल्या भाच्यापेक्षा जिजाचाच जास्त घोर वाटू लागला. कारण इंगळे घराण्याचा इतिहास तिलाच जास्त माहित होता. वडील प्रतापराव, भाऊ बाळासाहेब यांची करणी ती जाणून होती व फळंही भोगत आलेली होती. आता भाचे तिची रेघ ओलांडत नव्हते असं साकीकरांना वाटायचं ,संदेशराव तसा होता ही पण छोटा भाचा भैय्यासाहेब? अगदी तेच रक्त! तीच उसळी! तोच उन्माद! तशीच खुमखुमी! आपला सावत्र भाऊ संदेशरावाच काय करेल हे फक्त राधाबाईच जाणत होत्या. म्हणून पुण्या मुंबईतल्या गायनालाॅजिष्ट्नी नकार देताच राधाबाईंनी जिजाकडंनं आशा सोडली व त्या संदेशराव व जिजास लवकर निर्णय घ्यायचा आग्रह करू लागल्या. पण त्याच वेळी भैय्यासाहेब व संध्या आमदार सर्जेराव काळेच्या मुलासोबत क्रिकेट अकादमीत पार्टनर होण्यासाठी संदेशरावांना घाई करत होते. संदेशरावांनी आजोबांच्या गिरणा काठावरील लिंबू - पेरुच्या काही बागा विक्रीला काढल्या होत्या. त्याच गडबडीत ते फिरत होते. जिजाला घेऊन दवाखाना, जमीन विक्रीसाठी जळगाव भडगाव फिरणं; यात गुंतले असतांनाच आत्या राधाताई त्यांच्या मागं दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावत होत्या. जिजा घरात सुन्न होती. त्यात दुसऱ्या लग्नाचं ऐकून तिनं तर जेवणच कमी केलं.
" आबा! तुझ्या नावावर असलेली जमीन विकून तू खाली होण्या आधी दुसऱ्या लग्नाचं आधी ठरव!"
" ताई, लग्नाला पाच सहा वर्ष ही होत नाही तोच तू इतक्यात का घाई करतेय?"
" आबा, डाॅक्टरांनी नाही म्हटल्यावर
कितीही वाट पाहिली तरी उपयोग होणार नसेल तर मग जो निर्णय कधी तरी घ्यावाच लागेल,तर उशीर का करायचा?"
" ताई, तसं नाही ,पण दुसरं लग्न म्हटलं की जिजाला किती वेदना होतात! तिच्या मनाचाही आपण विचार करावा!" संदेशराव जिजाकडं तिरकस पाहत सांगू लागले. तिकडे जिजाच्या डोळ्यात तापी, गिरणेचा पूर सुरु झाला.
" जिजा पोरी! वंश वाढवण्यासाठी कठोर असला तरी निर्णय घ्यावाच लागेल.मग उशीर करून काय हाशील होईल?"
" आत्या,मी कधी नकार दिला? आणि माझं कोण ऐकणार?" जिजा आतला कढ उघड करू लागली.
" जिजे! नकोय मला मूल! भले मी वांझोटा राहीन! मलाही दुसरं लग्न नकोच आहे!" संदेशराव जिजेच्या दु:खावर फुंकर घालू लागले.
" आत्या एक विनंती होती? दुसरा पाट मांडणार असतील तर आपली दिपा....."
" जिजा? तुझ्या जिभेला काही हाड? दिपालीला मी मुलीप्रमाणं मानतो नी तू?" संदेशराव गरजले पण आत खोल खोल डोह तळाशी ढवळत होता.
पण राधाताईच्या डोळ्यात चमक आली. दुसरी मुलगी आणली तर काही वर्षांनी जिजाचे हाल कुत्रंही खाणार नाही. जर दिपाली आली तर निदान सख्खी बहिण म्हणून जिजाची काळजी घेईन.
" जिजा! अगदी मनातलं बोललीस पोरी! पण तुझी आई तयार व्हायला हवी?"
" ताई, जिजे! काहीही बरळू नका!" संदेशराव डोहातली ढवळाढवळ महतप्रयासानं दाबत खवळले.
" अहो, या घरात मला सवत म्हणून नकोच! पण केवळ संतती साठी मी होकार देतेय. पण घरात माझी बहीण दिपाच येईन!" जिजा संदेशरावांना समजावू लागली. संदेशराव नाटकी रागानं बाहेर निघून गेले.
जिजा दुसऱ्या दिवशी खाचण्याकडून झिंगा बाबाच्या नावेनं सतोन्याला पहिल्या माळेलाच आली. गोता आत्याला भेटत तिनं दिपालीला घेत इस्लामपूर गाठलं. गोता आत्या, नानजी नाना वा दिपालीस काहीच सांगितलं नाही.दिपाली रस्त्यात जिजाक्काला पुन्हा पुन्हा विचारू लागली. पण "आधी इस्लामपुरला चल मग सांगते!" सांगत जिजाक्का दिपालीला घेत आईजवळ आली.
इंदुबाईस जिजाक्का का आली? दिपाली का आली? कळेना.
" आई! नियतीनं माझ्यावर अन्याय केला गं! माझ्या भाळी स्त्रीत्व देतांना पदरात संतती सुख घालायला नियती विसरलीच!" जिजानं भरल्या गळ्यानं बोलताच लग्नाला सहा वर्ष उलटून जिजाची कुस उजळली नाही यानं इंदुबाईच्या डोळ्यात महापूर लागला.
" जिजा पोरी! नियती देईल गं ! हिम्मत ठेव व सबुरी धर!"
" आई मी आख्खं आयुष्य वाट पाहील गं! पण इंगळे वाड्याला तेवढा धीर हवा ना! त्यांना सवत आणायची घाई झालीय!" जिजा आता आईच्या गळ्यास बिलगली. आईला व जिजाला हंबरतांना पाहताच दिपालीही रडू लागली.
भर ओसरला. जिजा गंभीर होत म्हणाली.
" आई, माझ्या घरात दुसरी कोणी सवत आली तर मी जीवच ठेवणार नाही. म्हणून मी दिपालीलाच घेऊन जायचं ठरवलंय!बहीण सवत परवडली!"
इंदुबाईला आपल्या कानावर प्रथम विश्वासच बसेना.
" जिजा, काय म्हणतेय तू?"
" आई, ते दुसरा पाट मांडत आहेत तर मग दिपालीशीच त्यांचं दुसरं लग्न...."
" जिजा! असलं काही बोलण्या आधी एक वेळ तुझ्या नवऱ्याचं वय व माझ्या दिपाचं वय तरी विचारात घेतलं असतं!"
" आई, पोर नी बोर! हे काही तुला मी सांगायची गरज नाही!"
" जिजा मुळीच नाही! इंगळ्याच्या वाड्यात मी माझी एक मुलगी दिलीय!! तिलाच पुत्रसुख नसल्यानं सुखी होणार नसेल तर मी माझी दुसरी नादान पोर का पुन्हा द्यावी! मोठ्या मुलीचं मला अंतरातून हयातभर दु:खं राहिलच पण तरी माझी दिपाली मी देणार नाही!"
आईनं साफ नकार देताच जिजा धाय मोकलून रडू लागली.
" आई ,सवत म्हणून दिपाली जर आली नाही तर ते दुसरी कोणी तरी आणतील गं! नी मग माझं आयुष्यच नरक होईल! तुला समजत कसं नाही गं आई?" जिजा टाहो फोडत आईला विनवू लागली.
" जिजे दुसरी कशी येईल हे येणारी वेळ ठरवेल पण माझ्या होकारानं माझ्या दिपाला मी आजच नरकात ढकलेल त्याचं काय?"
इंदुबाई जिजाला कवेत घेत रडू लागल्या. शेवटी जिजाच्या आकांताने इंदुबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या
" जिजा एका मुलीसाठी मी आई म्हणून होकार ही देईल पण दुसऱ्या मुलीसाठी मला गोता वन्स व नानांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. शिवाय संदेशरावांशीही मला बोलावं लागेल. म्हणून परवा तू त्यांना सतोन्यालाच बोलव.आपणही तिथेच जाऊ.
आईनं नाराजीनं का असेना होकार देताच दिपालीच्या पायाखालची जमीन थरथरली. पण तरी आताच काही बोलण्या आधी मोठ्यांनाच ठरवू देत आधी. आपल्या विरोधात निर्णय जाताच आपण दाजीस नकार कळवू. ते आपल्या मर्जीशिवाय आपणाशी लग्न लावणारच नाहीत.
दुसऱ्या दिवशी सारे सतोन्याला परतले. तिकडनं एका दिवसानंतर संदेशराव घोटीव दाढी करत केश कलप करत नवे उंची कपडे घालत साकीहून निघाले. प्रवासात त्यांच्या नजरेसमोर आपल्या जुन्या कपड्यांना आपण अडगळीत टाकलं तसंच जिजाचं होईल व नवीन कपडे.......त्यांच्या नजरेसमोर सुकुमार दिपाली फेर धरू लागली. ते त्या खुशीतच नदीपल्याड आले.
शेवग्याच्या मागच्या झाडावर दररोज धुडगूस घालणारी मैना आज शांत बसली होती पण नेहमीच्या राघूच्या जागी एक नवीनच काकातू हौशेनं, आनंदानं मिठू मिठूची किलकारी भरत होता.
इंदुबाईनं गोता वन्स व नानांना जिजाचं म्हणणं आटोपशीरपणे कथन करत सल्ला मागितला.
" जिजा, इंदु तुम्ही काय म्हणताय त्यापेक्षा संदेशराव व दिपाली काय म्हणताय ते महत्वाचं आहे! आधी त्यांनाच विचारू. कारण त्या दोघांनाच जिजाला सोबत वागवत आयुष्य कंठायचंय." गोता आत्या व नानजी नाना दोघांचं म्हणणं एकच पडलं.
" संदेशराव बोला! तुम्हास दुसरं लग्न करायचंच का?" नानजी नानानं शांतपणे विचारले.
" नाना, मी तर लग्नाला तयारच नव्हतो.पण राधाताई व जिजाच मुलासाठी लग्नाचा घाट घालत आहेत! जिजानं दिपालीचं नाव सांगितलं म्हणून कुठे मी तयार झालो!" संदेशराव बोलले आणि दिपालीला भूकंप झाल्यागतच वाटलं.
" जिजा, संदेशराव पण पोरीचा विचार......" गोता आत्याचं बोलणं मध्येच थांबवत नानांनी दिपालीलाच विचारलं.
" दिपाली तू संदेशरावासोबत विवाहास तयार आहे का?"
" नाना, मुळीच नाही. खरं तर जिजाक्काची इच्छा होणं मी समजू शकते पण दाजीनं या गोष्टीस होकार देतांना शंभर वेळा विचार करावयास हवा होता. मला ते दाजीपेक्षा वडील जास्त वाटतात. त्यांना मला मागणी घालतांना लाज वाटायला हवी होती...." दिपाली संतापानं कडाडली.
" दिपे तोंड आवर! त्यांना मीच राजी केलं!"
" आक्का जर तुला मुल होत नसेल तर मला का बळी बनवतेस! असला जरठ विवाह मी कसा मान्य करेल! "
" दिपा! बस! मला वाटलं जिजा सांगतेय तर तुझा होकार असावा! पण तुझी इच्छा नसेल तर नकोच!"
" दिपा, एक वेळा विचार कर.तुझ्या होकारानं दोन्ही घरांचं कल्याण होईल!" जिजा विनवू लागली.
" जिजा पुरे आता! एक वेळ भैय्यासाहेबासाठी मागणी घातली असती तर मी दिपालीला मनवलंही असतं पण!... दिपा नाही म्हणते तर विषय इथंच संपव.नी आबासाहेब दुसऱ्या लग्नाची का इतकी घाई? " इंदुबाई त्रागा करत संतापल्या.
संदेशरावांची तळपायाची आग मस्तकात गेली. डोहाच्या तळाशी खोलखोल जी ढवळाढवळ होती ती ज्वालामुखीच्या उद्रेकाची त्यांना वाटू लागली.
जिजा व संदेशराव संतापात निघून गेले.
इंदुबाईही परतल्या पण त्यांना जिजाचं कसं होणार याची काळजी वाटूच लागली.
संदेशराव ज्या स्वप्नात तरंगत आले होते त्यांचा चुराडा झालेला पाहताच संतापले पण त्यांनी वर काहीच दाखवलं नाही. आपणास नकार! प्रतापराव इंगळेच्या नातूस नकार! रक्तातली खुमखुमी जागृत झाली. भले भैय्यापेक्षा कमी असेल पण रक्तात नकार न पचवण्याची व डूख धरण्याची खुमखुमी होतीच. दिपा ! तुला तर इंगळ्याच्या वाड्यात आणेनच. त्यांनी संतापात साकीला न जाता परस्पर भुसावळ गाठलं.
दिपालीला साकीचा इंगळे वाडा आपला पिच्छा सोडतच नाही याची भिती वाटू लागली. भैय्या, अन आता तर दाजीही! आपला घास गिळायला टपून बसलेत .त्या आधी आपण खंबीरपणे निर्णय घेतलाच पाहिजे. आई होती म्हणून आपण वाचलो.
दुसऱ्या दिवशी ती सतोना व विटवा संघाची फायनल पहायला निघून गेली.
भैय्याला फोन करत कल्पना देत संदेशरावांनी भुसावळहून परस्पर सरळ रेल्वेने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली करत पंधरा दिवस जिजास उत्तर भारतात फिरवलं. जिजानं आपल्यासाठी स्वत: ची बहिण सवत स्विकारावी व नवऱ्याचा बहिणीनं व आईनं नकार देत पाण उतारा करावा हाच स्पार्क दोघांना जवळ करून गेला.
पंधरा दिवसानंतर दोघे परतले ते ज्या दानासाठी आसुसले होते ते आपसूकपणे मिळवूनच. त्याची त्यांनाही कल्पना नव्हती.
भैय्या साहेबास दिपालीनं संदेशरावास नकार दिला हे कळताच त्यांचा आनंद गगनात मावेना. पारध हातातून निसटत डोक्यावर बसू पाहत होती पण नकार दिल्यानं आता आपला मार्ग मोकळा म्हणून एकवेळ शिकारीस पाहून तरी यावं म्हणून गुणवंतरावानं अकादमीसाठी गुणवंत खेळाडू शोधमोहिमेत आयोजित सामने नेमके सतोन्यास होत होते.हे कळताच ते गुणवंतरावासोबत एका पायावर तयार होत सतोन्यास आले.
मैदानावरील स्टेजवर भैय्याला पाहताच दिपालीचा लल्लाचा खेळ पहायचा हुरुपच हरवला.
सामना संपला व ती घरी परतली. तिला वाटलं नाग घरी येईल पण दिपालीला काॅलेज मैदानात पाहून नाग खुशीत परभारेच परतला.
पुढचे सामने जळगावला होणार होते. देठे सर व कृष्णराव बापूंचं ईर्सिप्त साध्य झाल्यानं आता संघ हारला तरी देणंघेणं नव्हतं. म्हणून देठे सरांनी लल्लास संघातून सुटी दिली. कारण गोटण बाबांनी आपल्या शब्दास मान दिला हेच खूप होतं.
बालानं पुर्ण स्पर्धेत सर्वात जास्त धावा ठोकत स्पर्धा गाजवली म्हणून गुणवंतराव व भैय्यासाहेबांनी त्यावर लक्ष देत उचलायचं ठरवलं व तशा सुचना त्यांनी आपल्या लोकांना दिल्या.
जळगावचे आंतर गटातील सामनेही बाला गाजवू लागला. आंतर गटातील काही सामने पाहण्यास संध्या इंगळे ही भावासोबत येई. बालाचा खेळ तिला भुरळ घालू लागला. येथेच गतकाळात थांबलेलं युद्ध भविष्यात पुन्हा सुरू होण्याचा सुरूंग पेरला जाणार होता.
लल्ला आता गोटण बाबासोबत अमळनेर, चोपडा, धरणगाव अशा ठिकाणी झेंडूची खरेदी करत पाठवू लागला. सोबतच धन त्रयोदशीपासुन सुरू होणाऱ्या यात्रेसाठी मालही खरेदी करत आणू लागला. गावातील दुकानं लता मावशी ,तिची मुलंच सांभाळू लागले. लल्ला आला की तो ही बसे.
सतोन्यापासून जवळच धन त्रयोदशीला मोठी यात्रा भरे. गोटण बाबा व लल्ला त्या यात्रेत नारळ, सिताफळ,व झेंडू व कटलरीचं दुकान थाटत. यावर्षी बाला नसल्यानं कटलरी व नारळ लल्लानं सांभाळलं व झेंडूची फुलं, सिताफळ दुकान गोटण बाबानं सांभाळलं. यात्रा एकादशीपासून दाटायला लागली. पाळणे, हाॅटेल, खेळणी, भांड्यांची दुकानं, तमाशा मौत का कुवा रसवंती, वेगवेगळी दुकानं यानं यात्रा गजबजली.
कनाती टाकत दोन्ही जागेवर अंतरावर लल्लानं दुकान थाटत सारा माल रचला. एकादशी दुकान मांडण्यातच गेली. गोवसु बारसच्या दिवशी गर्दी वाढली तसा लल्लाचा कटलरीचा व नारळाचा धंदा सुरू झाला. दुपारी मैत्रिणींसोबत दिपाली यात्रेत आली. तिला लल्ला यात्रेत दुकान घेऊन आला हे माहित होतं पण जागा माहीत नव्हती. गर्दी तर चिक्कार लोटलेली. फुगे, बासरी, भोंग्याचे आवाज, मौत का कुवा,रसवंती तमाशाचे लाऊडस्पीकरचे आवाज, फेरीवाले, धंदेवाले यांचा आवाज, सारे आवाज एकमेकात मागेपुढे मिसळत एक अनोखा वेगळाच आवाज उठत कानात यात्रा ही यात्राच असते ही अनुभूती ठसवत होता. कनोली, भनोली, रायंगण, भादली, खाचणे विटवा सतोना अशा दहा बारा खेड्याची गर्दी .कोण काय खरेदी करत होतं, कोण काय पाहत होतं, कोण काय खात होतं, कोण पाळण्यात,कोणी मंदीरात तर कुणी तमाशाच्या रिकाम्या तंबूत फटका मारत रात्री यायचंच या बेतानं फिरत हळूच तंबूतली माणसं न्याहाळत होता.
दिपालीची नजर या साऱ्या साऱ्या गर्दीला टाळत फक्त नी फक्त लल्लास शोधत होती. माणुस खरच किती विचीत्र भावना असलेला प्राणी आहे. त्याला एकांत हवा असतो सोयीनुसार. तो एकांत तो गर्दीतही शोधतो. सारी गर्दी जेथल्या तेथे विरघळत नाहिशी होत जाते व त्याला हवं असलेलं ध्येय ठसठशीत, रेखीव होत उभारी घेतं.
दिपालीही साऱ्या गर्दीस स्तब्ध करत लल्लास हुडकत होती.साऱ्या गर्दीस सोबत घेत. भल्या मोठ्या वडाच्या झाडाच्या पसाऱ्यास कनातीनं वरचेवर बंद करत खाली लल्लाच दुकान. तो कुणाला नारळ,कुणाला पुजेचं साहित्य, कुणाला कटलरी देत होता. मध्येच गिऱ्हाईकाकडंनं पैसे घेत होता. एकच धांदल ,लगबग. लल्ला दिसताच नानजी नानाच्या शेतात बहरलेला डवरलेला झेंडू फुलावा तसाच दिपालीचा चेहरा फुलला. मात्र गुलाबी झेंडुगतच. शेतानंतर सामना खेळतांना लल्ला तिला दिसला होता. मधल्या दिवसात त्याची सारखी फिरफिर सुरु होती म्हणून तो नजरेस पडलाच नव्हता. समोर लल्ला दिसताच ती मैत्रिणींना माग टाकत झपझप दुकानाकडं चालू लागली. आता सोबत चालणारी गर्दी विरघळू लागली व हवं असलेलं ध्येय दिसू लागलं.
दिपाली समोर दिसताच गिऱ्हाईकाला आरोळ्या मारत बोलावणारा लल्ला एकदम लाजला व मुका झाला. ती हसतच जवळ आली. शेतात आपण गिलके तोडतांना थांबलो नाहीत म्हणून ती नाराज झाली असावी असं लल्लास वाटत होतं. तिला समोर पाहताच त्रयोदशीची यात्रा आजच भरली या आनंदानं त्याला आजची जत्रा भावत वेगळीच वाटू लागली.
"ते समोरचे कानातले डूल दाखव!"
दिपाली बोट दाखवत चेहऱ्यावर हास्याची मंद लकेर व गंभीरता एकाच वेळी खेळवत विचारू लागली.
" ते साधे डूल आहेत!"
" मला साधेच आवडतात, साध्यात असीम ,निस्तुला सौंदर्यता असते! तेच दाखव" विरलेल्या गर्दीत हळू आवाजही लल्लास मोठा वाटू लागला.
" हे नारळ घे व देवाला वाढव! त्यातही आराधनेचं सौंदर्य असतं!" आतली हूरहूर दडपत लल्लाला उमडत असलेल्या गर्दीची भिती होती म्हणून तो दिपास मंदिराकडं काढू लागला.
" दिपा काय घेतेय गं?" मागून शोधत येणाऱ्या शुभांगी व गायत्रीनं विचारलं.
" नारळ घेतलं फोडायला ते सोललं जातंय तोवर चला पुढं तुम्ही!" दिपा लल्लावरील नजर ढळू न देता बोलली.
" अगं हे बघ जवळच साखळ्याचं दुकान आहे. किती छान साखळ्या आहेत" शुभांगी बोलली.
" अग ही गोंदणारी बाई किती छान गोंदतेय बघ!" गायत्री.
" अगं गडणींनो! आधी देवदर्शन तर घेऊ देत!" दिपा आपल्या देवतेलाच निरखत बोलली.
मैत्रिणी पुढं सरकल्या.
" मी आराधना करून आलीच. ही जत्रा आयुष्यभर स्मरणात राहिल असं काहीतरी मागून! बघतेच देवात असलं काही तरी देण्याची ताकद आहे का!" दिपा बोलली व मंदिराकडं सरकू लागली.
" माणसानं हक्कानं व भावस्पर्शानं मांगितलं तर देव नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात देतोच.फक्त ते ओळखता आलं पाहिजे!" लल्ला दिपाकडं वा जमीन न धुंडाळता राऊळाच्या कळसाकडं पाहत बोलला.
" लल्ला हल्ली देव मलाच ओरबाळायला लागला असंच घडतंय! म्हणून तर आज पहायचच मला!"
दिपाली नारळ घेत गेली.
.
.
.
क्रमशः
✒. वा.....पा.....