खुमखुमी- 5-6- Marathi Bhaykatha Special Stories
बी. आर. रायते महाविद्यालयात दुपारी दोनच्या सुमारास 'काॅलेज विरुद्ध सतोना' सामना सुरू झाला. दहा षटकाचा सामना जो संघ जिंकेल तोच पुढे खेळणार हे निश्चीत होतं. गावातील बबन्या व त्याच्या सहकाऱ्यांनी काल रात्रीच गोटण बाबाला घरी जात धमकावलं होतं.
" गोटणबाबा धंदा करायचा असेल तर उद्या बाल्या व लल्लानं सामन्यात वांदा करायला नको! जर सामन्यात खेळले तर तुमच्या साऱ्या धंद्याचाच गोटा करू आम्ही! समजलात का?"
गोटणबाबा ही पहाडपट्टी खेटलेला माणूस. अंगात ताकद होतीच पण जावई गेला, मुलगी गेली व साऱ्या कबिल्याचा भार यानं अंगातली ताकद विसरलाच होता. आज मात्र त्याच्या गात्रागात्रात स्फुरण आलं.
" बबन्या! कोण खेळतंय? कोण जिंकणार? कोण हरणार? याच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण हे आठ दिवस माझा लल्ला व बाला खेळणारच. कारण आमच्या उपकार कर्त्यांना मी शब्द दिलाय. बाकी राहिला धंद्याचा प्रश्न तर त्याचा गोटा झाला वा चमन झाला तरी माझं घर उपाशी मरणार नाही! या गावात शेर नसेल तर गाव सोडू हवं तर!"
" बाबा मग तर उद्या पाहतोच आम्ही तुझी नातरं कशी जिंकतात?"
गोटण बाबांनं दोन मुलांना रोजंदारीनं लावत लता, मिनाची मुलं, सरी, व स्वत: उभे राहत लल्ला व बालास पाठवलंच. बाबाची परवानगी मिळाल्यावर व स्वत: माई आली म्हटल्यावर लल्ला खेळायला तयार झाला.
नाणेफेक जिंकत सतोन्याच्या संघानं क्षेत्ररक्षण घेतलं.
सलामीला बाला व काशीद आला. बबन्याच्या टिममधले सर्व खेळाडू अंगानं व वयानं थोराड. बारावीतला बाला त्या मानानं एकदम कोवळं पोरं दिसत होतं.
बबन्यानं गोली गायकरकडं चेंडू दिला. गायकर १४०किमी प्रति तास भन्नाट वेगानं बाॅलिंग करायचा.
" गायकर पहिल्याच षटकात गोटा फोड" बबन्या मांडीला बाॅल घासत त्याच्याकडं देत बोलला.
गायकरनं बाॅल टाकला पण बालानं लाॅंग आॅनला षटकार ठोकला. पाच बाॅलवर लगातर पाच षटकार ठोकत बालानं गायकरच्या बाॅलिंगची पिसं काढत हवाच गुल केली. आख्खं मैदान काॅलेजच्या मुलांनी डोक्यावर घेतलं. दिपाली शुभांगी,गायत्रीसोबत काॅलेज टिमच्या खेळाडूच्या जवळच बसलेली. पण बालाच्या षटकारापेक्षा तिचं लक्ष वेगळीच कडं होतं. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन बाला षटक बदलताच स्ट्राईकवर आला. पहिल्याच षटकात काॅलेज संघाच्या ३१ धावा फलकावर लागल्या. बबन्यानं स्वत: चेंडू हातात घेत दुसरं षटक घेतलं. तो ही पेसर बाॅलर . गायकरला सांगितलं ते त्यानं केलंच नाही उलट ३१ धावा देऊन आला म्हणून तो संतापला होता.
बबन्यानं पहिलाच चेंडू तिखट बाऊंसर टाकत बाल्याच्या अंगावर टाकला. चेंडूनं उसळी घेतली. बालानं बॅट फिरवली पण त्या आधीच चेंडू पोटात बसला. बाला मैदानात कोसळला. पोटातून असह्य कळ मस्तकात गेली. बाला गडबळा लोळू लागला. पोटाचे स्नायू फरफर सुजून आले
खेळ थांबला. बालाला उचलून बाहेर नेत गावात डाॅक्टरकडं नेलं.
" देठे सर काय हे! संघ उभारला तो ही चुरमुरे, फुटाण्याचा! एका फुंकरीनं उडाला! टक्कर घेण्याआधी चांगली पोरं तरी पहायची ना!" बबन्या हसतच म्हणाला. 'चूरमुरे, फुटाणे' ऐकताच लल्ला बिथरला. त्यानं लगेच नयनला पाठवलंं. पण बालाची हालत पाहून नयन व काशीदनं धसकाच घेतला. पुढचे पाचही चेंडू एक ही धाव निघाली नाही. तिसऱ्या षटकात गायकरनं काशीद व नयन दोघांना बाद केलं. सुरेश व टिलानं तीन षटक क्रिझवर तग धरत एक दोन एक दोन धाव घेत धावफलक हलता ठेवला. सहा षटक ३/४१ . काॅलेजच्या तंबूत निराशा पसरली. सातव्या षटकात टिला धावबाद झाला.
लल्ला फलंदाजीस आला. तीन षटकात लल्लानं असं काही चित्र पालटलं की काॅलेजच्या तंबूतलं वातावरण पुन्हा बदललं.
षटकार, चौकार ठोकत दहा षटकात १२१ धावा फलकावर लागल्या.
लल्लानं नाबाद पन्नाशी केली. त्याच्या टोलेजंग फटक्यावर दिपाचे कानातले डूल डोलू लागले.
बबन्याच्या संघास दहा षटकात १२२ धावा बनवायच्या होत्या.
गावाच्या संघास तरी हे आव्हान आपण पार करू ही आशा होतीच.
लल्लानं पहिलं षटक स्वप्नील शिंदेला दिलं. शिंदेच्या या षटकात बारा धावा गेल्या. दुसऱ्या षटकात लल्लानं सीम, स्वींग बाॅलींग करत तीन विकेट काढल्या.१५२किमी प्रति तास या तुफानी वेगानं बबन्याचे तीन फलंदाज आपली मधली यष्टी सांभाळूच शकले नाहीत. काॅलेजचा बॅण्ड तडतडू लागला.
तिसऱ्या षटकात बबन्याच्या टिमनं प्रतिहल्ला करत वीस धावा चोपल्या.
सात षटक ८७ धावा जिंकायला हव्या होत्या.
पुन्हा लल्लानं च्या इनस्विंगरनं दोन बळी मिळवले. त्या षटकात दहा धावा निघाल्या.
पण आता लल्लाचं एकच षटक उरलं. त्यानं ते शेवटी राखून ठेवलं. मधल्या पाच षटकात बबन्याच्या टिमनं
६२ धावा चोपून काढल्या. आता शेवटच्या एका षटकात पंधरा धावा लागणार होत्या.
बबन्याच्या टिमचे सहाव्या सातव्या क्रमांकांचे फलंदाज ही चांगले फलंदाज होते व ते स्थिरावले होते. पण लल्लानं तडकलेल्या विकेटवर सीम टाकत बाॅल झपकन वळवत दांडी गूल करत दोन विकेट घेतल्या. तिसऱ्या बालवर षटकार ठोकला गेला. चौथा पाचव्या बाॅलवर धावच निघाली नाही. शेवटचा टोलवलेला बाॅल थर्डमॅननं टिपला व कृष्णा बापू आनंदानं उठत घरी परतले. पहिली लढाई जिंकल्याचा सर्वात जास्त आनंद देठे सरांना झाला. आता त्यांना गणातील इतर सामन्याचं टेन्शन नव्हतं.पण शेवटचा विटाव्याच्या सामन्याचीच चिंता वाटू लागली.
काॅलेजच्या बॅण्डवर मुलांनी संघाला फिरवलं. तरी लल्ला शांतच होता. त्याला बालास किती लागलंय हीच चिंता सतावत होती.तो तसाच घराकडं परतला.
...............................................
*खुमखुमी*
६
उद्या नवरात्रीची पहिली माळ व गणातील सामन्यांनाही सुरूवात होणार होती. लल्लानं मिना मावशीच्या व रोजंदारीच्या मुलांना सोबत घेत झेंडूची फुलं आणण्यासाठी महिन्यांपूर्वीच गोटण बाबांनी गावातूनच विकत घेतलेला जुना खटारा टेम्पो काढला. सामने सुरू झाले म्हणजे धावपळ होईल म्हणून तो फुलं आणून ठेवणार होता. म्हणजे बाकी माळा ही आजच करता येतील.
गावातील तापी काठाला लागून भुराट बरड असलेल्या खोऱ्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी झेंडू फुलपीक लावायला सुरुवात केली होती. वर्षातून फुलांचे दोन हंगाम तरी गावातले बरेच शेतकरी घेत. जुलै महिन्यात लागवड केलेला झेंडू नवरात्रीच्या सुमारास निघे तर फेब्रुवारीत लागवड केलेला झेंडू पाडव्यानंतर निघू लागे. संपत काणे, व्यंकट कोल्हे, बना इंगळे, नानजी नाना, प्रभू कासार हे शेतकरी दरवर्षी यलो बाॅय, हार्मोनी बाॅय, लिटल डेव्हील, अर्ली यलो, अर्ली आॅरेंज, बटर स्काॅच, गियाना गोल्ड, आफ्रिकन टाॅल, स्पॅन गोल्ड अशा बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी लागवड करत.
लल्लानं प्रभू कासाराच्या शेतातून मुलामार्फत काही फुलं तोडली व वजन करून घेत दुपारनंतर नानजी नानाच्या मळ्यात निघाला. पोरांना मळ्यात फुलं तोडायला लावले व तो फुलं उपसायला घरी परतला.
टेम्पो खाली करत तो मळ्यात परतला.
नवरात्रीच्या माळा, हार, तोरण करण्यासाठी फुलं घेण्यासाठी प्रभू, दिपाली गायत्री मळ्यात आलेल्या. लल्लाचा टेम्पो पाहताच नानजी नानाच्या शेतातला फुललेला झेंडू तरतरी धरत अधिक फुलला. फुलावर पिवळा, नारंगी, केशरी रंग चढला.
प्रभू आपल्या मित्रासोबत ( मिना मावशीची मुलं) फुलं तोडू लागला. दिपाली व गायत्री विहीरीवर पाणी प्यायला आल्या. धावेवर टेम्पो उभा करत मुलांनी तोडून ठेवलेले फुलं लल्ला विहीरीकडं आणू लागला. दिपालीनं गायत्रीला फुलं तोडायला काढलं. ती धावेवर शेवग्याच्या झाडाच्या आधारानं वाढलेल्या भोपळे, घोसाळे व वालच्या वेलीवरून घोसाळे भोपळे तोडू लागली. तिचा हात पुरणं शक्यच नव्हतं. तरी ती प्रयत्न करीत होती. लल्ला नजर खाली ठेवत मुकाट्यानं फुलं आणू लागला.
" ललित, एवढी गिलकी तोडतोस का?" दिपालीनं लल्लाकडं पाहत खुणवलं.
त्यानं नाराजीनंच येत फांदी खाली लववत गिलकी तोडली.
" लल्ला परवा विठोबाला फोडलेलं नारळ पावलं बरं!" दिपाली त्याच्या नजरेत खोल खोल नजर देत उद्गारली.
' लल्ला!' हा शब्द त्याच्या कानात मधुर घंटानादासारखा प्रतिध्वनीत होऊ लागला. त्याची इकडे तिकडे वर खाली होणारी नजर स्थीर होऊ लागली.
" अय बया! काहीही काय! माई मॅडमांनी आमच्या बाबांना सांगितलं म्हणून काल खेळायला आलो! बाकी काही नाही!"
' अय बया' ऐकताच दिपालीला हसू फुटलं . ते दाबत ती बोलू लागली.
" काहीही असो पण आम्हास नाव वल्हवणारे हात, नारळ सोलून देणारे हात क्रिकेटही खेळू शकतात हे विठ्ठलानं दाखवलं. व पुढे ही असंच जिंकतांना पहायचंय!"
लल्लानं तिच्या बडबडीकडं दुर्लक्ष करत गिलके खाली फेकत तो झपाट्यानं मुलांकडे निघाला.
" ललित ऐक! थांब! मी काय सांगतेय....." पण लल्ला त्या आधीच निघून गेला.
नानजी नाना पाच वाजता मळ्यात आले. बहरलेल्या मळ्यावरून पक्षी नदीकडं झेपावत होते. तर काही नदीकडून परतत मळ्यातील हिरव्यागार लिंबाच्या झाडावर बसत होते. फुलशेतात हिरव्या झाडांवर पिवळ्या नारंगी, केशरी रंगाची फुलं अजुनही डोलत होती.लिंबाच्या झाडावर मैनानं धुडगूस घातला होता.
नाना येताच लल्लानं धावेवर येत फुलं मोजली व मुलांना घेत त्यानं टेम्पो काढला. दिपालीचे फुगलेले गाल, लाल झालेलं नाक त्याच्या चोरट्या नजरेस दिसलं.ती खुणेनं संतापात काही तरी सांगत होती. लल्ला त्याकडं दुर्लक्ष करत नानजी नानासोबत गायत्री व दिपास मळ्यात टाकत निघाला.
फुलं घरी आणताच त्यानं उतरवली. लगेच सारी माळा करायला लागली. उरलेली फुलं त्यांनं किरकोळ विक्रीवाल्याकडं पोहोचवली.
बी. आर रायते महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन मैदानं आखली होती. एकावर सतोना गटाचे १० सामने तर दुसऱ्यावर विटवा गटाचे दहा सामने होणार होते.
अप्पा कोळंबेच्या विटवा संघात त्यांनी बाहेरचे खेळाडू आणत भरती केलेले होते. देठे सारांना आपला संघ गणातील संघांशी सहज जिंकेल ही खात्री असल्यानं त्यांनी लल्लास राखीव बसवलं. बाला खेळण्यासाठी तयार असल्यानं त्यांनी सारी मदार बाला, नयन, काशीदवर सोपवली. देठे सरांनी इतर सरांना संघाची जबाबदारी सोपवत ते व लल्ला विटवा गणातील खेळाडूचा खेळ पाहू लागले. आपली स्पर्धा विटव्याशीच असल्यानं ते कसे खेळतात ? त्यांच्या मर्यादा, शक्तीस्थळे कोणती? देठे सर न्याहाळू लागले.
गणातील पहिलाच सामना बालानं एकहाती जिंकला. सतोन्यातील बबन्या संतापला. त्यानं अप्पा कोळंबेच्या संघातील कोच झानोरकर मार्फत अप्पा कोळंबेची भेट घेतली.
" अप्पा सतोन्यातील आम्ही काही मुलं तुम्हास जिंकवून देऊ! आम्हास तुमच्या संघात घ्या!" बबन्यानं विनवलं.
बबन्या दरवर्षी आपल्या संघाशी हरत आला. हा काय आपल्या संघास जिंकवून देणार! त्या पेक्षा सतोन्यातील नवीन संघास हरवण्यासाठीच याचा उपयोग केला तर? अप्पानं मनात विचार केला.
" बबन्या, तु आमच्या संघात खेळण्यापेक्षा तुमच्या गावातील संघातच तुझे दोन तीन खेळाडू खेळव. पण ते आमच्या संघासाठी खेळतील असं पहा. जर कृष्णरावाचा संघ तू हरवला तर माझं तिकीट पक्क. मग तू निवडणुकीत मदत कर! तुमच्या ग्रामपंचायतील सर्वात तरुण सरपंच म्हणून निवडून देण्याची जबाबदारी माझी. मी तुला वचन देतो!" अप्पानं बबन्यालाच मधाची बोटणी तोंडात चघळायला दिली.
बबन्या नंतर लगेच चार पाच पोरांना घेऊन कृष्णराव बापूस भेटला.
" बापुसाहेब आम्ही हरलो पण विटव्याला हरवायचं असेल तर आम्हास संघात घ्या.त्याशिवाय काॅलेजचा संघ जिंकणार नाही!"
" बबन्या ती चिंता तू आता सोड. देठे सर पाहतील बरोबर!"
" बापूसाहेब, तुम्ही एक गोष्ट विसरत आहात!"
" काय?" बापुंनी बबन्याकडं पाहत विचारलं.
" देठे सर सामना जिंकून देतील व तुम्हास तिकीट मिळेलही. पण निवडणूक जिंकण्यासाठी साऱ्या गावाच्या मतांची गरज पडेल हे विसरत आहात तुम्ही!"
" बबन्या काय म्हणायचंय तुम्हाला?"
" निदान विटव्याच्या संघाशी खेळतांना तरी आम्हास संघात घेतलं नाही तर आम्ही निवडणुकीत तुम्हास......" बबन्या तुरसटपणे म्हणताच
कृष्णराव बापूंनी सुकल्या तोंडात जीभ फिरवली.
" बबन्या ,बस! असलं काही करू नको. मी देठे सरांना सांगतो."
बबन्या कुत्सीत हसत निघाला.
बापूंनी देठे सरांना सारं सांगितलं.
व बबन्याच्या संघातील दोन तीन चांगल्या पोरांना काॅलेजच्या संघात घ्यायला लावलं. पण देठे सरांना माहित होतं की बबन्याच्या येण्यानं संघाची शक्ती वाढण्याऐवजी फूटच पडेल.
" बापुसाहेब, बबन्या कदाचित निवडणुकीत मदत करेल पण त्या आधीच संघ हारला तर निवडणुकीत उभंच राहता येणार नाही! म्हणून बबन्याच्या खेळाडूस न घेणं हाच चांगला पर्याय आहे.
" देठे सर पण संघ जिंकला तरी गाव एक राहणंही मतांसाठी तेवढंच गरजेच आहे.म्हणून नाईलाजानं का असेना पण घ्या. मात्र सर्व निर्णय तुम्हीच घ्यायचे. त्याला संघनायक करू नका."
गणातील चार सामन्यात बबन्या व त्याचे इतर दोन खेळाडू नुसते खेळलेच नाही तर भन्नाट खेळले. अंतिम सामन्यात खरा चमत्कार होणार होता. गणातील एकही सामन्यात लल्लाला देठे सरांनी खेळवलं नाही. लल्ला व देठे सर विटव्याचाच खेळ पाहत होते. तर विटवा संघाचे कोच झानोरकर सतोना संघाचा खेळ पाहत बाला, काशीद, तारू यांना कसं रोखायचं व गायकर, बबन्याची बाॅलिंग कशी फोडायची याचा आराखडा तयार करत होते.
दररोज दोन्ही गणात चार सामने होऊ लागले.
लल्लाची नजर चार पाच दिवसांपासून प्रेक्षकात कुणाचा तरी शोध घेत भिरभिरत होती पण त्याला हवं असलेलं सापडतच नव्हतं. तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत विटव्याचा खेळ पाही.पण आपलं काही तरी हरवलंय मात्र शोध शोध शोधूनही सापडत नाही; यानं त्याची घालमेल होई व तो निराश होई. जर देठे सरांनी आपणास खेळवलं असतं तर आपण ना धड गोलंदाजी करु शकलो असतो ना फलंदाजी. आपलं हरवलेलं शोधण्यातच राहिलो असतो.
याआधी तर कधी असं व्हायचं नाही मग आताच का असं?
आपण मळ्यात झेंडूची फुलं तोडायला गेलो तेव्हा दिपाली काही तरी सांगत होती.ऐकायला काय हरकत होती! पण आपण सरळ गिलके खाली टाकत तेथून निघालो. त्यामुळंच ती नाराज झाली व पाच दिवसांपासून येतच नाही. मळ्यातून निघतांना संतापात ती " मी येणारच नाही!" हेच सांगत होती वाटतं!
अरे पण यापूर्वी आपण खेळत आलो तेव्हा कुठं ती मैदानावर असायची! एक दोन दिवस तर थांबली असावी मैदानात मग का आपण तिचा शोध घेतोय? एक डूल! डुलाची जोडी!
अपेक्षे प्रमाणे फायनल विटवा व सतोना गावातच लागली. लल्ला मॅच संपली की लगेच गोटण बाबाकडं येत दुकान सांभाळी किंवा मळ्यात झेंडूची फुलं आणायला जाई. त्यामुळं या पाच दिवसात नानजी नानाकडं काय घडलं? दिपाली कुठं गेली? आली? या बाबत लल्लाला जाणून घ्यायला वेळच नव्हता.
फायनलला कृष्णराव व अप्पा कोळंबेनं बाळासाहेब गुणवंतरावांना आमंत्रीत केलं. गुणवंतरावांनी आपल्यासोबत साकीच्या कार्यकर्त्यास की अकादमीत पार्टनर होऊ पाहणाऱ्या भैय्यास देखील आणलं होतं.
देठे सरांनी बालास खेळतांना दोन षटकानंतर सहसा ग्राऊंड शाॅटच मारावयाच्या सुचना दिल्या. हवाई फटका मारायला मनाच केलं. लल्लाला सांगायची गरजच नव्हती.
विटवा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजी घेतली. बबन्यानं कप्तानं बालाचं न ऐकता सुरवातीला स्वत: व गायकरनच बाॅलींग घेतली. बबन्याला पहिल्याच षटकात विटव्याच्या संघानं झोडपत बावीस धावा वसुल केल्या. अप्पा मनात खूश होत बबन्याकडं पाहू लागला. बबन्यानं दुसरं षटक परस्पर गायकरला दिलं. गायकरलाही झोडपत २८ धावा वसुल केल्या.दोन षटकात पन्नास धावा होताच अप्पा बाळासाहेब कडं जोशात पाहू लागले. कृष्णराव बापूंची चुळबुळ वाढली. त्यांनी देठेकडं पाहिलं. पण बाला काय करतोय हे देठेलाही कळत नव्हत. लल्ला मात्र सारखं प्रेक्षकात पाहत डिप मिड आॅनला सिमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. आज अचानक दिपाली आलेली होती. तिचा चेहरा मलूल व डोळे सुजलेले होते. पण ती आली याचाच त्याला खूप आनंद झाला होता.
तिसरं षटक टाकण्यासाठी बाला लल्लास बोलवू लागला. तोच पुन्हा बबन्या चेंडू हिसकावू लागला. बालानं बबन्यास साफ उडवत लल्लालाच बाॅल देऊ लागला. त्यांच्यात काही तरी वाद होतोय हे साऱ्यांना समजू लागताच लल्लानं बालास खूण करत बबन्यास बाॅलिंग दिली. याही षटकात बबन्यानं वीस धावा बहाल केल्या. विटवा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं दिसू लागलं. चौथं षटक महामुश्कीलीनं लल्लास मिळालं. लल्लानं चोरट्या नजरेनं डूल हलतांना दिसतात का ते पाहिलं.
पहिलाच बाॅल १५२च्या गतीनं मधली यष्टी उखडून गेला. सतोन्याच्या तंबूत एकदम जान आली. आरोळ्या, जल्लोस हंगामा बॅण्ड सारं सारं एकदम दणाणलं. लल्लानं स्वींग, इनस्वींग, सीम, यार्कर, वेगवेगळे बाॅल टाकत फक्त दोन धावा देऊन तीन गडी बाद करत चौथं षटक संपवलं. बाळासाहेबांचे हात आपसूक टाळ्या वाजवू लागले. अप्पा कोळंबे तव्यावर कटला, कोळंबी फ्राय व्हावी तसाच तळला जाऊ लागला.
नंतर स्पीनरनं एक षटक टाकलं.
विटवा संघानं दहा षटकात १३१ धावा केल्या. देठे सरांनी बबन्यास तंबूत शांत बसवत ओपनिंगला बालासोबत लल्लाला पाठवत साऱ्यांना धक्का दिला.
लल्लाची नजर उन्हात चमकणाऱ्या डूलाचा वेध घेत फलंदाजी करू पाहत होती. सरांच्या सूचनेनुसार बालानं पहिल्या षटकापासुनच ग्राऊंडशाॅट मारत बारा धावा केल्या.
दुसऱ्या षटकात लल्लानं तीन षटकार खेचत चेंडू प्रेक्षकात हवे तेथे फटकारले. लल्लाचा खेळ न पाहिलेले विटवा संघातील बाहेरुन आयात केलेले खेळाडू लल्लाची बाॅलींग व आता बॅटींग पाहून पाहून हडबडले. त्यांच्या बाॅलरची लाईन लेंथ बिघडली.
तिसऱ्या षटकानंतर सारे खेळाडू सिमारेषेजवळ तैनात. पण देठे सरांच्या मार्गदर्शनानुसार बालानं ग्राऊंडशाॅट तर लल्लाचे उत्तुंग दूरदूर जाणारे हवाई गगनचुंबी फटके. लल्ला व बालानं सात षटकातच विटवा संघाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. बाळासाहेबांनी कृष्णा काकांचं तिकीट फिक्स केलं. तर दुसऱ्या दिवशी कृष्णा बापूंनी देठे सरांचं प्रमोशन. बबन्याचं तरुण सरपंच होण्याचं व अप्पाचं जि. प. तिकीट मिळवण्याचं स्वप्न भंगलं.
पाच सहा दिवसांपासून जिजाक्का, संदेशराव इस्लामपूर व सतोना फेऱ्या घालत होते. संदेशराव अपत्य प्राप्तीसाठी दुसरा पाट मांडू पाहत होते. पण जिजाक्कास घरात दुसऱ्या सवतीपेक्षा आपली बहिण दिपाली काय वावगी? असं वाटत होतं. ते उभयता इस्लामपूर व सतोना फिरू लागले.
पण.....
पण.....
रक्तातली बदल्याची खुमखुमी?
खुमखुमी उसळली! भैय्यासाहेबाची खुमखुमी उफाळली! छाताडावरची लाथ! मुस्काटावरची सॅण्डल! याचा प्रतिशोध कसा घ्यावा? त्याही पेक्षा रक्तातली खुमखुमी? संदेशराव...? आबासाहेब? तसंच सोडू? कसं शक्य? भैय्या सामना पहायला आलेच सतोन्याला!
........................