खुमखुमी- 4- Marathi Bhaykatha Special Stories
येत्या जानेवारीत जिल्हा परिषदेची निवडणूक असल्यानं त्याची चाचपणी व नवरात्र महोत्सवाच्या क्रिकेट स्पर्धाबाबत आज साऱ्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आलं होतं. सर्जेराव म्हणजे जिल्ह्याचे विकास पुरूषच. राज्याच्या मंत्रीमंडळात दोन टर्म मंत्रीपद मिळवणारे ते जिल्ह्यातील एकमेव नेते होते. आज जिल्ह्यात त्यांच्या पक्षाला विरोध नावालाच उरला होता.
जिल्ह्यातील साऱ्या गटाचे उमेदवार हे जवळ जवळ निश्चीत झाल्यासारखेच होते. सर्जेराव ही पायाबांधणी निवडणुकीच्या दोन तीन वर्षाआधीच करुन ठेवत. फक्त पाच सहा गट असे होते की तिथे कुणाला तिकीट द्यावं हे निश्चीत होत नव्हतं. सतोना हा गट तर दर पंचवार्षिकला डोकेदुखी ठरत असे. मागच्या वेळी या गटातील अप्पा कोळंबे यांना पक्षानं उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव निश्चीत होता पण सतोना गणातील कृष्णा रायते यांना सर्जेरावांनी पुढची उमेदवारी तुमचीच असं आश्वासन देत ऐनवेळी खेळी करत ती जागा जिंकली होती. पाच वर्षात अप्पा कोळंबेनं बरीच माया जमवत आपलाच गल्ला भरत गटात विकास कामाचे तीन तेरा वाजवले होते. पण अप्पा कोळंबेची दहशत व त्यांच्या गणातील पाठिंबा यामुळं सर्जेरावांचाही नाईलाज होई. आजच्या बैठकीत अप्पा कोळंबे आपली मोठी फळी घेऊन हजर होते तर कृष्णा रायते ही मागच्या वेळी आपण आमदारांच्या शब्दांना मान देत अप्पास सपोर्ट केला. यावेळेस आश्वासनाप्रमाणं आमदार त्यांच्या पक्षातर्फे आपल्यालाच तिकीट देतील या आशेवर आलेले.
आमदार सर्जेरावाकडं युवाकल्याण व क्रिडा खात्याचं मंत्रीपद होतं तेव्हापासून त्यांनी राज्यात काही स्पर्धा सुरू केल्या होत्या. खातं बदललं पण जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा तशाच सुरू ठेवल्या होत्या. त्याला कारण बाळासाहेबांना लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. राजकारणाला सुरुवात करण्या आधीच त्यांनी स्वत:ची क्रिकेट अकादमी सुरू केली होती. या क्रिकेट अकादमीत राज्यातले अनेक क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाई. त्यात जिल्ह्यातील काही होतकरू मुलांसाठी काही जागा राखून ठेवत मोफत प्रशिक्षण दिलं जाई. त्यांच्या निवडीसाठीच नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधत ते आपल्या मतदार संघात व जिल्ह्यातही क्रिकेट स्पर्धा आयोजित करत. तरुण मतदाराला स्पर्धाच्या माध्यमातून आपल्या पक्षाशी जोडण्याचाही हेतू असायचा.
सभेच्या सुरुवातीलाच क्रिकेट स्पर्धाच्या आयोजनाबाबत स्वीय सहायक भंडारीनं स्वरूप स्पष्ट केलं. आधी गटावर मग चार विभागात व नंतर जिल्ह्यावर फायनल असं नियोजन होतं.
जिल्ह्यातील एक एक गट जुनी गणितं नवीन समीकरणं नुसार बाळासाहेब उमेदवार फिक्स करू लागले.
सतोना गटासाठी अप्पा कोळंबे व कृष्णा रायते दोघेही दावेदारी करू लागले.
" साहेब, मागच्या वेळी आपण आश्वासन दिलंय. म्हणून सतोना गटातून यावेळी मलाच उमेदवारी मिळावी" कृष्णा रायते पोटतिडकीनं विनवणी करू लागले.
आमदार सर्जेराव मान डोलवणार तोच अप्पा कोळंबे चवताळून उठले.
" बाळासाहेब, पक्षाच्या धोरणानुसार जिंकलेल्या जागेवर उमेदवार बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत. म्हणून पक्षाचं तिकीट मलाच मिळायला हवं!"
" अप्पा, मागच्या वेळी आमच्या मदतीनं निवडलात तर दिलेल्या शब्दाला जागत आता आम्हास संधी देत मदत करा! इमान दाखवा!" कृष्णा रायते कळवळले.
" कृष्णराव, राजकारणात दररोज आश्वासने वचने दिली जातात पण ती पाळणं बंधनकारकच असतं असं नाही."
" अप्पा, तू परस्पर राजकारण शिकवू नको! शांत बैस ! आम्ही आहोत ना!" सर्जेराव अप्पावर कातावले.
" आमदार साहेब, पण मी निवडून येण्याआधी कृष्णरावांना संधी दिलीच होती ना? परिणाम काय व्हायचा? मग पुन्हा ती रीस्क का?"
" अप्पा, त्यावेळी आम्ही मदत केली तशी मदत आपण केलीच नाही. उलट पक्षात राहून विरोधात प्रचार केला होता तुम्ही ! मग कसे निवडून येणार आम्ही?" कृष्णरावांनी मागची कुंडलीच उघडली.
" आमदार साहेब, मागचं काय त्यापेक्षा कृष्णरावांनी चालू स्थितीत वारे कुठे वाहतायेत त्यावर बोलावं!" अप्पा तिरकसपणे बोलले.
गुंता सुटेना.सर्जेरावांनी बाळासाहेबाकडं पाहिलं. सर्जेरावांना या वेळी कृष्णा रायतेलाच उमेदवारी द्यायची होती. पण बाळासाहेबांचा कल अप्पाकडं होता.
" कृष्णा काका तुमास मी इतर ठिकाणी न्याय देईन पण या वेळेस माघार घेतली तर बरं होईल" बाळासाहेब कृष्णरावांना म्हणाले.
" बाळासाहेब, आमदार साहेबांच्या शब्दाखातर मी मागच्या वेळी माघार घेतली. जुन्या माणसाच्या निष्ठेचं हेच का फळ?" कृष्णराव म्हणाले.
" अप्पा तुम्ही माघार घ्या मग?"
" बाळासाहेब, आम्ही माघार घेऊ पण दुसरी वाट चोखंदळू मग!" अप्पा थेट दमकीच देऊ लागले.
" अप्पा, दुसऱ्या वाटेवर जाऊन निवडशील ही पण विरोधातच बसशील पाच वर्षे! म्हणून ही धमकी कुणाला देतो रे!" सर्जेराव अप्पा कोळंबेवर संतापले.
" आमदार साहेब, नुसत्या संस्था असल्या म्हणजे राजकारण जमत नाही! दोन पंचवार्षिक लढवल्या यांनी तरी निवडून आले नाहीत हे! निवडणूकीचंच काय साधी क्रिकेटची स्पर्धा यांचा गण सलग चार वर्ष हारला. हे काय निवडणूक लढवणार! यांना म्हणावं क्रिकेटची स्पर्धा तरी आधी जिंका मग उमेदवारी मागा! नी अशांना उमेदवारी मिळत असेल तर मग आम्ही वेगळी वाट धरणारच!" अप्पा सुसाट सुटला.
" कोळंबे, खेळ नी राजकारण यांची सरमिसळ का करता? " कृष्णराव तरी समजूतदार पणा दाखवू लागले.
पण बाळासाहेबांनी हाच धागा पकडत सतोन्याचा वाद तात्पुरता तसाच लांबवत ठेवण्याचं मनात ठरवलं.
" अप्पा, आपण खेळाच्या स्पर्धा या नव मतदारांना पक्षात आकर्षण्यासाठी घेत असतो. खेळातून राजकीय फायदा घेत असतो. पण समजा कृष्णा काकाचा गण जर या नवरात्रीची स्पर्धा जिंकला तर?"
" बाळासाहेब , सतोन्याच्या संघाने जर फायनल जिंकत पुढे गेला तर मी माघार घेईन! मंजुर आहे मला! नी आमच्या विटवा गणाचा संघ जिंकला तर त्यांनी माघार घ्यावी!"
" कृष्णा काका मंजूर आहे का?" बाळासाहेब मनात हसत विचारू लागले.
कृष्णरावांना अप्पाच्या व बाळासाहेबाच्या खोडात ,पेचात आपण अडकतोय हे दिसू लागले. कारण मागील चार वर्षांपासून विटवाचाच संघ जिंकत आलेला. पण तरी त्यांनी दुःखी अंत:करणाने होकार दिला. कारण त्यात तरी त्यांना धूसर संधी दिसत होती. अन्यथा बाळासाहेब अप्पालाच तिकीट देईल हे ते जाणून होते.
पोराच्या तोडीनं सर्जेरावांना आनंद झालाच पण सर्जेरावांचा संघ हारला तर जुन्या माणसावर अन्यायच होईल याची भिती ही त्यांना वाटू लागली. पक्षश्रेष्ठींनी तिकीट वाटपाचे सारे अधिकार त्यांना दिले असले तरी स्थानिक पातळीवर ही कसरत जीवघेणी ठरे.
कृष्णा रायतेचे वडील जळगाव न्यायालयात जज्ज होते. त्यांनी कृष्णरावांना काही शैक्षणिक संस्था काढून दिलेल्या होत्या. कृष्णराव त्याच चालवत राजकारणात येऊ पाहत होते. पण सरपंच पद सोडलं तर जि. प. निवडणुकीत त्यांना दोनदा अपयश आलेलं. मागच्या वेळी माघार घेतलेली. आता जर तिकीट मिळालं नाही तर पुढे राजकीय कारकिर्दच संपेल. सर्जेराव काळेंच्या पक्षाचं तिकीट मिळणं म्हणजे जिंकण्याची शंभर टक्के हमी .
कृष्णराव सतोन्याला परतले. गावातील प्राथमिक, माध्यमिक, काॅलेज साऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी सभा घेतली. गावात दरवर्षी आमदाराच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ नवरात्रीत क्रिकेट स्पर्धा होई. सतोना गणातील पाच गावं व विटावा गणातील पाच गावं साऱ्या स्पर्धा त्यांच्याच काॅलेजच्या आयोजनात पार पडत. पण पुढे कायम विटाव्याचाच संघ जाई.
कृष्णरावांनी साऱ्यांना जिल्ह्यातील आमदाराच्या सभेतील वृतांत कथन करत तिकीट मिळवायचं असेल तर आपल्या गावाचा संघ जिंकणं आवश्यक असल्याचं सांगताच साऱ्यांच्या आशा मावळल्या. कारण गावाच्या संघाची निवड ही गावातील पक्षाचे कार्यकर्तेच करत. काॅलेजकडून दोन तीन खेळाडूंचीच निवड होई व तेही त्यांना राखीव खेळाडू म्हणूनच बसवलं जाई.
" आपणास उमेदवारी मिळायला हवी असेल तर आपल्या गावाचा संघ जिंकायला हवा! बोला काय करता येईल. क्रिडा विभागाचे एच ओ.डी, क्रिडा शिक्षक सारा ताफा असुनही वेगवेगळ्या स्पर्धा गाजवतांना गावातील या स्पर्धेत अपयश का येतंय?" कृष्णराव विचारू लागले. आजपर्यंत ही स्पर्धा शुभारंभला आमदाराकडंचं कुणीतरी प्रतिनिधी येई म्हणून ते हजर राहत पण कोण जिंकलं कोण हरलं याकडं त्यांनी लक्षच दिलं नव्हतं. पण तीच स्पर्धा आपलं राजकीय अस्तित्व ठरवतेय याचा त्यांना मनातल्या मनात विषाद वाटला. पण आमदार पुत्राची अकादमी व आवड म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज होता.
देठे हे क्रिडाशिक्षक होते. व मागच्या वर्षी त्यांना माध्यमिक विभागात मुख्याध्यापकपद सेवा जेष्ठतेनं मिळणार होतं . पण 'पीटी नी शिटी!' अशी टर उडवत कृष्णरावाच्याच नातलगानं दबाव आणत त्यांच्याकडून ना हरकतचं पत्र लिहून घेत ते पद हडपलं होतं. ते देठे उठले.
" बापूसाहेब विटाव्याला हरवणं कठिण असलं तरी अशक्य नाही.फक्त संघ बांधणी व निवडीचे अधिकार मिळायला हवेत!"
देठेच्या या बोलण्यानं ' एक दोन वर्षात निवृत्त होतोय तरी शांत बसत नाही' या विचारानं साऱ्यांच्या भुवया वक्रावल्या.मात्र कृष्णरावांना आशेचा किरण दिसू लागला.
" देठे तुम्हास काय म्हणायचंय? कोणते बदल व अधिकार हवेत?" कृष्णराव विचारू लागले.
" बापुसाहेब दरवर्षाप्रमाणं गावातील संघच खेळला तर हे शक्य नाही. आपल्याच ज्युनिअर व सिनीअर काॅलेजचे अनेक चांगले खेळाडू आहेत .पण गावातल्या संघात त्यांना संधीच मिळत नाही." देठे सयंम ठेवत ठामपणे सांगू लागले.
" देठे काॅलेजचा संघ गावातल्या संघाला हरवू शकतो का?"
" तेच म्हणतोय बापूसाहेब, आपण स्पर्धेआधी गावातल्या संघाशीच काॅलेजचा संघ खेळवू व जो संघ जिंकेल तोच गणात उतरवू. मला खात्री आहे आपल्या संघास संधी मिळाली तर विटाव्याला हरवूच!" देठे बोलले पण इतर सारे मनात त्यांना कोसू लागले. कारण गावातील कार्यकर्त्यांशी व खेळाडूंशी टक्कर देतील असे काॅलेजमध्ये खेळाडू तयार करणं कमी दिवसात कसं शक्य आहे व गावाशीही वाईट होणं.
कृष्णरावांनी सभा संपवली. देठेला बसवून घेत साऱ्या बाबी विचारल्या.
" देठे ,तुमच्यावर अन्याय झाला! मागच्या वर्षी तुमचा हक्क असतांना नातं आडवं आलं व तुमच्यावर अन्याय झाला. अगदी तसाच अन्याय माझ्यावर आमदार साहेब करू पाहताय!"
" बापूसाहेब , आपल्याला उमेदवारी मिळत असेल तर मी जिवाचं रान करायला मागे पुढे पाहणार नाही!"
" देठे, विटाव्याच्या संघाला हरवाल त्याच दिवशी मुख्याध्यापक पदाचा आदेश मी तयार ठेवीलच!" कृष्णराव देठेला काही न सांगता मनातच म्हणाले.
रात्री भवानी चौकात गढीच्या पुढे सारी सतोनाकर जमली. कृष्णा बापूनं येणारी नवरात्र व क्रिकेट स्पर्धा तयारीबाबत आढावा घेतला.
" बापूसाहेब, क्रिकेटची काय तयारी करायची! पोरं कायम खेळत तर असतातच!" बबन्या बोलला.
" या वर्षी आपणास वेगळ्या पद्धतीनं भाग घ्यायचाय! कारण चार वर्षांपासून आपलं गाव विटाव्याशी हारतंय!"
" मग बापूसाहेब वेगळी तयारी कशी!"
" स्पर्धेआधी गावाच्या संघा सोबत काॅलेजचा संघ खेळवू! कारण गाव संघ तयार करू शकतो पण काॅलेजवाले तयार करू शकत नाही! त्यांनाही कामाला लावू जिंकणाऱ्या संघास माझ्याकडून पाच हजाराचं वेगळं बक्षिस राहील.!" गावकरी हसू लागले.
" बापूसाहेब खरच! त्यांनाही कामाला लावू! गावातल्या संघाचाही सराव होईल!" गावातले कायमचे कार्येकर्ते बोलले!"
सभेला उपस्थीत असलेले कार्यकर्ते व कर्मचारी गोंधळले. बापू जिल्ह्यातील सभेबाबत काहीच बोलत नाही म्हणून.पण बापूनं त्यांना खुणेनच शांत बसवलं.
" भावांनो अट एकच राहील. स्पर्धेआधी काॅलेजच्या संघात व गावाच्या संघात एक सामना होईल .जो संघ जिंकेल तोच स्पर्धेत गावाचं नेतृत्व करेल. हारणारा संघ काॅलेजचा असो की गावाचा तो शांत राहत माघार घेईल." गावकऱ्यांना काहीच हरकत नव्हती.त्यांना पाच हजारचं बक्षिस खुणावू लागलं. दरवर्षीही काॅलेजच्या दोनतीन पोरांना संघात घेऊनही राखीवच ठेवलं जाई. म्हणून त्यांनी बापूस होकार दिला.
दहा दिवसांनी सामना ठरवत सभा संपवली.
नवरात्रीला पंधरा दिवस बाकी होते. देठे सरांना काॅलेजच्या एच ओ.डीनं झाप झाप झापलं. तुम्ही यापुढे बोलतांना तुमच्या माध्यमिक पुरत बोलत जा. महाविद्यालयाला गृहित का धरता? सभेत बोलला आहात तर तुम्हास हवे ते खेळाडू घ्या व करा तुम्हीच तयारी! आम्हाला आमचं हसू करून घ्यायचं नाही!"
" सरजी फक्त महाविद्यालयाचा मला हवा असलेला संघ द्या बाकी सारी मी जबाबदारी घेतो!" देठे सर बोलले.
काॅलेजच्या संघाचा दिवसभर सराव होऊ लागला. सराव पाहण्यासाठी काॅलेजमधली सारी मुले, गावातले रिकामे गर्दी करू लागले. पाच सहा दिवसातच आधीच तयार संघाची देठे व इतरसरांनी मस्त चाचपणी करत निवड फिक्स केली. पण ओपनर कोण खेळणार याबाबत देठेंनी अजुन स्पष्टच केलं नव्हतं.
नवरात्र जवळ येऊ लागली तशी नवरात्रीसाठी मळ्या - मळ्यात फिरत शेतकऱ्यांकडून लल्ला व गोटन बाबा झेंडूच्या फुलांसाठी आॅर्डर बुक करू लागले. नवरात्रीत दररोज ते क्विंटलोगणती फुलं विकत. तसेच लवकरच सिताफळला ही सुरुवात होणार म्हणून गोटन बाबानं सातपुडा चढत पाड्यावरील कायमच्या आदीवासींची भेट घेत त्यांना उचल देऊन आले. कारण उचल दिलेली असली की ते लोक गोटनबाबालाच चांगला माल विकत. गोटन बाबा कच्ची परिपक्व फळे आणत. सतोन्यात विक्रीचं दुकान मांडत. नवरात्र ते दिवाळी त्यांचा फुलविक्री व सिताफळ विक्रीचा फुल मोसम चाले. त्यात पोरांच्या परीक्षा नावालाच उरत .अभ्यासाला तर बुट्टीच असे. पण कायमची सवय असल्यानं लल्ला ,बाला पावसाळ्यापासुनच रात्र जागत अभ्यास आधीच करून ठेवत. मग दिवाळीला कशीबशी पेपरापुरती सवड मिळाली तरी त्यांचा पेपर चांगलाच जाई.
दुपारी देठे सरांनी लल्लाला काॅलेजला बोलवलं. तो लता मावशीला लक्ष ठेवायला लावत गेला.
देठे सर सराव घेण्यात मग्न असल्यानं त्यांनी लल्लास लायब्ररीत थांबायला लावलं. लल्लाची जिवावर येऊ लागली. लता मावशी कटलरी व दुकान दोन्हीकडं जास्त वेळ कशी सांभाळेल म्हणून त्याची तगमग होती. तो नाराजीनंच लायब्ररीत गेला. व पेपर चाळू लागला.
समोरच दिपाली काहीतरी वाचत होती. लल्लाला पाहताच तिची नजर त्याचा वेध घेऊ लागली. पण लल्लाचं लक्ष पेपर व देठे सर केव्हा येतील यावरच होतं. एका क्षणासाठी त्याची नजर अचानक दिपाली वर गेली.तोच दिपालीनं कानाजवळचे केस बाजुला करत कानातले डूल मुद्दाम बोटानं फिरवले. डुलाची जोडी दिसताच लल्लाची नजर थरथरली. डुलाच्या लयीत त्याच्या ह्रदयाची धडधड होऊ लागली. लगेच त्यानं आपली नजर व तोंडही फिरवलं. आपण कानात घातलेल्या डुलाच्या जोडीवर जमीन धुंडाळणारी नजर जाताच दिपाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर पसरत गालावर लालिमा अवतरली.
भैय्यासाहेब बहिणीचे दिर, गडगंज संपत्ती व नातंही! पण तरी मनात चीड येते. आपल्या मनाचा विचार न करता ' स्त्री एक वस्तू' ही जी घीण आणणारी वृत्ती त्यानंच चीड येत आपण छाताडात सॅण्डलसहीत लाथ घातली! मुस्काटावरही मारली. कुठून आली त्यावेळी एवढी हिम्मत आपल्यात! भैय्या कुत्र्याविषयी मनात फुलोरा फुललाच नाही कधी! उलट त्याला पाहताच अंगाची लाही लाही व्हायची! पण या मुलानंही सतोन्याला येतांना वाटेवर पाय घसरला तेव्हा हात धरला व नावेतही हातानं ओढलं तेव्हा संतापलोच आपण.पण गावात आल्यावर याची गरीबी पाहिली. गरीबीशी लढतांना पाहिलं. कामात बुडालेलं पाहिलं नी राग निमाला.तरी मनात कुठलाच भार नव्हता! ना आकर्षण ना प्रतिकर्षण. मात्र मंदिराजवळ यानं कानातला डूल नम्रतेनं परत केला नी भार झरझर बदलत गेला.' जोडीचं कानात दिसलं नाही म्हणून विचारण्याची हिम्मत होत नव्हती' या एका वाक्यानं मनातली पानगळ थांबवत वसंताची पालवी फुटायला लागली. याचं राबणं, जमीन धुंडाळणारी खाली झुकती नजर मनात शहारे उठवते. काहीही निमीत्त काढत आपण मागच्या दारीच घुटमळतो. हा दिसावा म्हणून. आताही हा अचानक लायब्ररीत येताच आपलं वाचनातलं लक्षच उडालं. याच्यात व आपल्यात नक्कीच कुठला तरी विजातीय चुंबकीय भार असावा म्हणूनच आकर्षण असावं का? सतोन्याला येतांना भैय्याचा प्रसंग घडलेला...नी याचं भेटणं....किंवा आपली श्रीमंती व याची गरीबी... आपलं याला धुंडाळणं व याचं नजर टाळणं....हाच विजातीय भार तर नसावा!
लल्ला उठणार तोच देठे सर आले.जवळच्याच बेंचवर बसवत त्यांनी लल्लाला विचारलं.
" ललित नवरात्रीत क्रिकेट स्पर्धा होणार; माहित आहे ना तुला?"
" हो सर !"
" मग तुम्ही दोघे भावंडे भाग घेणार ना?"
लल्लाच्या काळजात कळ उठली. तीन वर्ष गावाच्या संघात निवड होऊनही काॅलेजकडून आलाय म्हणून त्याला खेळणाऱ्या अकरात घेतच नव्हते.इकडे गोटन बाबाची सारी कुतर ओढ सांभाळत वेळ काढून आपण क्रिकेटसाठी जायचो पण हाती काहीच मिळेना. म्हणून मागच्या वर्षी त्यानं बालास पाठवलं पण तो गेलाच नव्हता. मागच्या वर्षी स्पर्धेत त्यानं मिना मावशीच्या मुलांना शेंगदाणे, फुटाणे, पाणी पाऊच, वा इतर पुड्या विकत छान धंदा केला होता व झेंडूच्या फुलांच्या विक्रीतही भरघोस नफा कमावला होता. यावर्षीही तो याच बेतात होता.म्हणून त्यानं देठे सरांना विनवत साफ नाकारलं.
" सर, नवरात्रीत बाबांची
फार ओढाताण होते, हवंतर मी बाबांना समजावून बालास अवश्य पाठवतो! पण मला नाही शक्य होणार सर!"
" लल्ला , मागचं सारं विसर! काहीही कर पण खेळायला येच! तुला सरावाला मुळीच बोलावणार नाही.फक्त सामन्यापुरते आठ दिवस सवड काढ ना?"
" सर आपलं इतर काहीही काम सांगा त्यासाठी रात्र पहाट करू आम्ही! कारण माई मॅडम व तुमच्यामुळेच तर आम्हास सुखाचे हे दिवस पहायला मिळतायेत! पण गावाच्या राजकारणात नका ओढू आम्हास ! गोटण बाबाच्या साऱ्या धंद्याची वाट लावतील ते लोक! " लल्लाचा गळा भरुन आला.
" लल्ला! तुमचं नुकसान होईल हे आम्हीही सहन करणार नाहीत.पण यावेळची स्पर्धा ही अनेकांच्या निष्ठेवर व अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे म्हणून!"
" ह्या महिन्यावर आमच्या साऱ्या कुटुंबाची वर्षाच्या पोटापाण्याची गणितं अवलंबून असतात सर.तुम्हाला तर माहीत आहेच.तरीही वेळ काढत होतो .पण गावाच्या विरोधात गेलं की धंदाच बसवतील हे लोक.म्हणून माई मॅडम व तुमच्यासाठी माझी लाख इच्छा असुन ही मी फक्त बालालाच पाठवू शकतो.हात जोडतो समजून घ्या!"
" लल्ला माहित आहे रे पण तुमच्या दोघावरच मी मोठा जुगार लावत शब्द दिलाय. तरी बालाला पाठव. मी करतो काही तरी!"
दिपाली सारं ऐकत होती.
लल्ला उठला व दुकानावर निघून गेला. त्याला स्पर्धेच्या वेळी विकल्या जाणाऱ्या वस्तूंचीही खरेदी करावयाची होती. शिवाय बाला नसणार म्हणजे त्याच्या जागी सरी आजीला एक जागा सांभाळावी लागेल पण माई मॅडम व देठे सर या देवमाणसासाठी तेवढं तर आपणास करावंच लागेल.
संध्याकाळी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गोता आत्या सोबत दिपाली आली. गढीतून तिनं गोटण बाबाच्या घराकडं पाहिलं पण घरी सरी आजीच होती. ती पायऱ्या उतरत स्टॅण्डवर आली. त्या दुकानात बाला सामानाची आवरा आवर करत होता. ती हिरमुसली.पण मंदिराजवळच्या लाॅरीजवळ तिला लल्ला दिसला.
" आत्या नारळ फोडायचं का विठ्ठलाला? थांब मी आणते!" आत्याला मंदिराच्या बाकड्यावर बसवत ती परतली.
" एक नारळ व फुलं दे!"
लाॅरीत नारळ ठेवत आवरासावर करणाऱ्या लल्लानं नारळ देत वर पाहिलं. तो भांबावला.त्यानं फुलं अगरबत्ती ही दिली.
" एवढं नारळ सोलून दिलं तर बरं होईल!"
तो नारळ हूकनं सोलू लागला. दिपाली त्याच्याकडं एकटक पाहत होती.
" एक विचारू?" दिपाली नं हळूच विचारलं.
" .........." नारळ लवकरात लवकर सोलून दिपालीला काढू पाहणारा लल्ला काहीच बोलला नाही.
" नारळ सोलणारे हात, नाव वल्हवणारे हात बॅट चालवतात की यष्टी उडवतात हे पहायला मजा आली असती! पण एकटा बालाच खेळणार म्हटल्यावर पहायला मिळणार नाही. पण पाहू या नारळाच्या बदल्यात विठोबा काय जादू करतो ते!" दिपालीनं नारळ घेतलं व ती चालती झाली. चालतांना डूल थरथरले तसाच लल्लाही सर्वांगानं थरथरला. लायब्ररीत दुपारी हिनं सारं ऐकलं असावं.पण माझ्या खेळासाठी हीनं नारळ का फोडावं! तो विष्मयानं चक्रावला. काय बेरकी पोरगी आहे ही. काही संबंध नसतांना.....
त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं.
दुसऱ्या दिवशी बाला सरावाला गेला. बालाच्या फलंदाजीनं काॅलेज ग्राऊंड दणाणलं. गर्दी वाढली. नी गावातल्या संघाचं धाबं दणाणलं. बापूनं जिल्ह्याच्या सभेला तिकीट मिळावं म्हणून सामना जिंकण्याची अट मान्य केली. पण त्याचबरोबर आपणाशी काॅलेजचा संघ उतरवत आपणावर अविश्वास व्यक्त केला यानं ते चवताळले. भले चार वर्षांपासून आम्ही हरलो पण त्यावेळी तो एक खेळ असायचा म्हणून आपण सिरीअसली घेतलं नाही पण बापूचं राजकीय अस्तित्व पणाला असेल तर विटाव्याच्या संघाला हरवलंच असतं पण बापुंनी अविश्वास दाखवला ना तर मग आता काॅलेज संघाला उताणाच करायचं. व पुढे विटाव्यासोबत मुद्दाम हरत बापुला इंगाच दाखवायचा. असं ठरवत ते राजरोसपणे गावातही तसं बोलू लागले. त्याच बरोबर त्यांना बाला व लल्ला या वादळात काय ताकद आहे हे ही माहित होतं. म्हणून तर ते चार वर्षांपासून त्यांचं खच्चीकरण करत आलेले होते. लल्ला खेळणार नाही हे समजताच त्यांना हायसं वाटलं.
देठे सरांना गावातला संघ चवताळला हे कळलं. त्यांना लल्ला जो पर्यंत खेळत नाही तो पर्यंत भरवसा वाटेना. त्यांनी माईस सांगितलं.
" अगं, काही ही करून परवाच्या सामन्यात गोटणबाबाला सांगून लल्लास खेळायला पाठव ना!"
माईला आपले पती इमाने इतबारे सेवा करूनही संस्थेत अन्यायच झालाय व तरी ते संस्थेसाठी, संस्थाचालकांसाठी झटत आहेत म्हणून त्यांनी देठे सरांसोबत रात्री गोटण बाबाचं घर गाठलं.
लल्ला बाहेर गेला होता. माईनं गोटण बाबास सारं सविस्तर सांगत आठ दहा दिवस लल्लास पाठवण्याची विनंती केली.
खेळ स्पर्धा म्हटली की गोटण बाबाचा अंगाचा थरकाप उडे. आताही त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी दाटू लागली. त्यांना आपला जावई 'मल्लेश्वर - मल्ला' पहेलवान आठवला. आपली सखू पोर आठवली. तो कुस्तीचा आखाडा, तो रक्तपात..... संसाराची राखरांगोळी नी मग छोटे छोटे अनाथ पिल्लं लल्ला व बाला आठवले. त्यामुळं ते कुस्ती, खेळ, सामना, क्रिकेट, स्पर्धा या गोष्टी पासून नातवांना कायम दूर ठेवत आले होते. त्यांना या गोष्टीचं नाव काढलं तरी चिड वाटे. पण याचा परिणाम उलटच झाला. लहान पोराला
" दिव्याला हात नको लावू ,चटका लागेल. दूर हो!" म्हटलं की ते हटकून दिवा धरायला जातंच.तसंच गोटण बाबांनी विरोध करुनही वेळ मिळेल तसं वा काम करता करता लल्ला व बाला क्रिकेटचं हुनर शिकलेच. जे गोटण बाबास कळलंच नाही. व कळलं तेव्हा उशीर झाला होता. पण लल्लाला कळू लागलं तसं त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं. तरी कौशल्ये एकदाचं अंगी बाणलं की ते जातच नाही.
गोटण बाबांना लहानपणी नातवांना माया लावणारी, पोटच्या लेकरागत शिकवणारी माई मॅडम आठवली. आणि त्यांनी क्षणात देठे सरांना होकार दिला.
" माई, नवरात्रीस माझी खूप ओढाताण होते. घरातील सारेच दिवसभर उभे असतात. पण तरी माझं कितीही नुकसान झालं तरी लल्लाला पाठवतो.लल्ला खेळेल म्हणजे खेळेल. आमच्या देठे सरांसाठी व माई मॅडमसाठी!" गोटण बाबाचा उर दाटून आला. माई व देठे सर आनंदाने उठले. आता बापुचं तिकीट अप्पा कोळंबेचा बापही कापू शकत नाही याची देठे सरांना खात्री झाली.