खुमखुमी- 3- Marathi Bhaykatha Special Stories
लल्लानं बालाच्या मदतीनं खाचण्याला जात एकनाथ भटाकडनं सारा माल आणला. बस स्टॅण्डवरील लिंबाच्या खाली टपरीवजा दुकानात मुरमुरे, फुटाणे, बत्तासे, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, वाफवलेल्या शेंगा , सारं मांडत दुकानात बाला किंवा लता मावशी बसू लागले. स्टॅण्डसमोरील हायस्कूल व काॅलेज जवळ लाॅरी लावत गोटण बाबा कटलरी, वह्या, पुस्तके, चाॅकलेट विकू लागले. मोठ्या मिनामावशीची मुलं ही शाळेव्यतिरिक वेळेत स्टॅण्डच्या दुकानात थांबत गाडी आली की लगेच बिया शेंगदाणे घेऊन गाडीत चढत. लल्ला स्टॅण्डच्या जवळच पश्चिमेला विठ्ठल मंदिराच्या रस्त्यावर फुलांच, फळांचं व नारळाचं दुकान मांडी. तो व गोटण बाबा साऱ्या धंद्यांवर घारीसारखं लक्ष ही ठेवत. गोटण बाबानं वीस पंचवीस वर्षांपासून एक एक धंदा वाढवत आणलेला. घरातल्या प्रत्येकास काही ना काही करायला लावत. कुणालाच रिकामं बसू देत नसत. घरात व्यक्ती वाढत हाताशी आले तसे काही ना काही धंदा वाढवतच राहिले. आधी फक्त मंदिरासमोर नारळ विकत पण आता बस स्टॅण्डवरील सारे धंदेच त्यांनी अडकवले. मोठा नातू लल्लानंही आजोबाचं कसब शिकत धंद्यात डोकं घातलं नी गोटण बाबा मग नवनवीन धंदे जोडत गेले. पाऊस पडला की बाकी धंदे बंद होत. मग गोटण बाबा शेतमजुरीलाही जाई. एकदाची
धनत्रयोदशी आली व परिसरातल्या यात्रा सुरू झाल्या की मग त्यांची फिरस्ती सुरू होई. दूरदूच्या यात्रेत मुक्काम पडे. कधी सिताफळ, कधी आवळे ,कधी संत्री,कधी भाजीपाला तर कधी झेंडूची फुलंही. गोटण बाबास विकायला वस्तू हवी मग कोणतीही असो. धंद्याची अजिबात लाज ठेवत नसत. कष्ट करण्यातच हयात चाललेला माणूस.सतोना पंधरा हजार लोकवस्तीचं गाव. तालुक्यातील शेवटच्या टोकाचं आडवळणी गाव. पण आजुबाजुच्या बऱ्याच गावांची बाजारपेठच जणू. सतोन्याहुन नदीपल्याड अमळनेर जवळ पडायचं व सुरत भुसावळ लोहमार्ग म्हणून इथले छोटे मोठे व्यापारी अमळनेरहूनच माल भरत. पूर्वापार संबंध अमळनेर कडुनच असल्यानं जुन्या जहागीरदाराचं हे गाव तटबंदीनं बंदिस्त करत मुख्य दरवाजा तापी नदीकडंच ठेवलेला. गढीगत वसलेल्या गावात मोठमोठे वाडे बांधलेले. गावापासून दहा पंधरा किमीवर पुल झाला नी वाहतूक वाढली. त्यात गावाच्या उत्तरेकडं स्टॅण्ड मंजूर झालं. गढीच्या तटबंदी व गोकर्णी नाला यामध्ये तालुक्याला लाजवेल असं मोठं सुसज्ज स्टॅण्ड बांधलं जाऊ लागलं. गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटू लागलं. जुनं स्टॅण्ड असतांना नवीन स्टॅण्ड व ते ही भव्य. पण प्रशासनाचा अजबगजब कारभाराचा तो एक चमत्कार असावा. दुसऱ्या कुठल्या तरी सतोन्याचं स्टॅण्ड या सतोन्याला बांधलं गेलं. नी मग लक्षात आलं.
भव्य स्टॅण्ड होताच व तापीवरील नवीन पुल म्हणून तालुक्याकडनं व अमळनेरकडचीही वाहतूक वाढली.पण जुनी सवय अंगवळणी पडलेली असल्यानं खाचण्याकडन अजुनही वाहतूक व झिंगा बाबाची नाव चालायचीच.
आधीच्या आजुबाजुच्या गावाची बाजारपेठ होतीच त्यात ही भर पडताच गावास उर्जितावस्था येऊ लागली. गोटण बाबांनी हाताशी येऊ पाहणाऱ्या नातवाच्या साथीनं धंद्यावर धंदे वाढवले.
गढीची तटबंदी फोडत वाड्यातील लोकांनी उत्तरेकडचा वापर वाढवण्यासाठी पायऱ्या बांधत स्टण्डकडं उतरु लागले. स्टॅण्डच्या पूर्वेस मराठी शाळा, पश्चिमेस विठ्ठल मंदीर अंतर राखून. समोर गोकर्णी नाला. व त्या पलीकडे हायस्कूल व काॅलेज. गढीच्या खाली असलेला मागचा हा भाग आता मेन ठिकाण होऊ लागला.
हरतालीका, गणेश चतुर्थी, ऋषीमंचमीची महिलाची गर्दी दाटणार म्हणून गोटण बाबा व लल्लानं परीसरातील मळ्यातील बेल, मोगरा, रातराणी, जाई, जुईची फुलं खरेदी करत हार गजरे बनवत मंदिराजवळ मांडले. लता मावशीला नारळ व पुजेचं साहित्य देत मंदिराजवळ बसवलं.
गोताबाई सोबत आज नवीन पैठणी नेसत दिपालीही गढीतल्या बाया व मैत्रिणी सोबत आली. तिला येऊन महिना होत आलेला. इथल्याच काॅलेजला अॅडमिशन झालेलं. गल्लीतल्या गायत्री, शुभांगी या मैत्रिणीही झालेल्या.
साऱ्या बाया गजरा, हार, वेण्या घेण्यासाठी लल्लाकडं गर्दी करू लागलेल्या. लल्लाचं लक्ष दिपाली वर गेलं. त्याच्या उरात धडधड वाढली. नावेवर सोबत आलेली दिपाली त्याच्याच काॅलेजमध्ये असली तरी तो काॅलेजमध्ये पंधरा वीस दिवसात कामापुरती चक्कर मारे. म्हणून काॅलेजमध्ये भेट होतच नसे. पण ती गढीत त्याच्या मागच्या बाजुलाच तिरकस नानजी नानाच्या घरी राहत असे व तिचा वावर त्याच्या घराजवळूनच होता. सकाळी तो मागे निघाला की ओझरती कधी मधी त्याच्या नजरेसही पडे. पण सकाळी सर्वांना वस्तू,माल देणं, पोहोचवणं व इतर कामाची धांदल. त्याला सवड मिळेचना.
ती दिसली की त्याला डुलाबाबत विचारुन तिचा असेल तर द्यावा हे वाटे.पण त्याला तिच्या कानात जोडीतला डूल दिसेना म्हणून कदाचित तिचा नसला व आपण विचारलं तर नाहक वाद! त्यापेक्षा तो ते टाळू लागला. त्यानं तो तसाच पाॅकीटात सुरक्षित जपून ठेवलेला.
दिपालीनं हार ,गजरा घेतला. गोता आत्यानं दुकानासमोरच तिच्या केसात माळला. लल्लाचं अजाणतेपणी तिच्या कानाकडं लक्ष गेलं नी मनात एकदम डूलाबाबत विचारावं असं आलं. पण गर्दीत विचारणं उचीत नाही म्हणून त्यानं तिकडं कानाडोळा केला. सामान घेत बाया नदीकडं निघू लागल्या व नवीन गर्दी येऊ लागली. एक दिड तासानं नदीवर पूजा आटोपून परतत बाया विठ्ठल मंदिरात जाऊ लागल्या. पायातल्या वहाणा, चप्पल लल्लाच्या दुकानाजवळ काढू लागल्या. आता सारी गर्दी नदीवर दाटली होती. आधीच गेलेल्या दिपाली व काही बाया आल्या व चप्पल लल्लाच्या दुकानामागं काढत मंदिरात गेल्या.
मंदिरात देव दर्शन आटोपून दिपाली लगेच निघाली. तिथं उभं राहण्या ऐवजी ती चप्पल घेण्यासाठी इकडं आली. चप्पल घालत आत्याची वाट पाहत ती तिथंच थबकली. गर्दी तुरळक होताच लल्लानं पाॅकीटातलं डूल हळूच बाहेर काढलं. उभ्या असलेल्या दिपाली समोर धरत तो धडधडत्या छातीनं एकदम विचारता झाला.
" बघ नावेवर आलो त्या दिवशीच खिशात अडकलेलं मला घरी आल्यावर दिसलं. बहुतेक तुझं असावं. नी तुझं नसेल तर गैरसमज नको हा विषय इथंच विसर!"
डूल पाहताच दिपालीनं ओळखलं.पण याच्याकडं कसं? आपणास वाटलं होतं की साकीलाच पडलं असावं. पण नावेत चढतांना तोल जाऊन याच्या अंगावर पडलो होतो तेव्हाच अडकलं असावं.तिनं झपाट्यानं हातातून हिसकावलं.
" इतके दिवस का लपवून ठेवलं.आण माझंच आहे ते!"
" इतके दिवस ठेवणं चुकीचच. पण जोडीचं कानात दिसत नव्हतं म्हणून विचारण्याची हिम्मत होत नव्हती व ओझं वागवणंही जड जात होतं!"
दिपालीनं डोळे विस्फारत त्याच्याकडं गुस्स्यात पाहिलं. पण त्याची नजर जमीन धुंडाळत होती. अंग थरथरत होतं
" जोडीचं कानात पाहण्याऐवजी विचारून खात्री नाही का करता आली मग?" आता दिपाली त्याच्याकडंच नजर फेकत उत्तरासाठी प्रतिक्षा करू लागली.
" ज्याची वस्तू त्याला मिळाली. विठोबा पावला व मनावरील ताण हलका झाला. अभंगाच्या चरणाचं निरूपण झालं. मन हलकं झालं.तो तेथून लता मावशीकडं निघाला.त्याच्या त्या सात्विक भावानं तिचा राग कुठल्या कुठं विरला. लल्ला मावशीला 'नारळ, पुजेचं साहित्य आहे का?' चौकशी करू लागला.
" लल्ला संध्याकाळ पावेतो पुरेल इतकं आहे! इतक्यात कसं विकलं जाईल?" लता मावशी आश्चर्यानं सांगू लागली. तो तिथं घुटमळला. गोताबाई, गायत्री व शुभांगी मंदिरातून त्याच्या दुकानाजवळून चप्पल घेत हलल्याची खात्री झाल्यावरच तो तेथून हलला व दुकानात गेला.
घरी परतताच दिपालीनं ठेवलेला दुसरा डूल काढला व आरशात पाहत दोन्ही डूल कानात घातले.
अंगावर पैठणी, केसात गजरा, कानात डुलणारे डूल पाहताच ती आरशात पुन्हा पुन्हा पाहू लागली.
' जोडीचं कानात दिसत नव्हतं' याची सनई कानात घुमू लागली. आरशात कानातली जोडी दिसत होती.
सकाळी उठताच दररोज दूध घ्यायला जाणाऱ्या प्रभूला थांबवत ती मागच्या दारानं समोरच्या राधी आत्याकडं दूध घ्यायला निघाली. राधी आत्यानं म्हशीची धार काढलीच नव्हती. दिपाली तिथंच बसली. शेजारीच लल्ला दुकानावर घेऊन जायच्या सामानाची साऱ्यांना जुळवाजुळव करुन देतांना त्याच्या मागच्या दाराशी फेऱ्या होत होत्या. तो दिसताच दिपाली उगीचच कानातील डूल फिरवत होती. पण लल्ला आपल्या कामातच धुंद होता.
राधी आत्याच्या मागच्या अंगतात शेवग्याचं झाडं पावसानं डवरायला लागलं होतं. पांढरी जांभळट रंगाच्या उमलणाऱ्या फुलांसाठी मैना मिठू मिठूच्या आवाजानं गचबूच धुमाकूळ घालत होती. पण राघू मात्र शांत बसला होता.