खुमखुमी- 2- Marathi Bhaykatha Special Stories
रात्री साडे आठच्या सुमारास पावसाच्या झडीत झोपण्याच्या तयारीत असलेल्या नानजी नानानं कुणीतरी दरवाजा ठोठावला म्हणून लाईट लावत दरवाजा उघडला. दारात दिपा व प्रभाकरला पाहताच
" पोरांनो तुम्ही! या वेळेस? आणि एकटे?" चक्रावत सवालावर सवाल केले. तोच गोताबाईही 'कोण आलं' म्हणून पहायला आल्या. आपल्या एकुलत्या एक भावाच्या पाखरांना पाहताच आत्यानं प्रेमानं कुरवाळत घरात घेतलं.
" पोरांनो, अरे काय ही अवस्था? नी असं कुणासोबत आलात?"
पोरांनी थंडीतही घटाघटा पाणी घोटलं. तेवढ्यात पोरांच्या अवताराकडं पाहत गोताबाईनं गरम पाणी ठेवलं. पण त्यांना बदलण्यासाठी कपडे होतेच कुठे! आत्यानं कपाट खोललं .त्यात लग्न झालेल्या लहान्या सुनिताचे कपडे तसेच होते ते काढले व दिपाला दिले. दिपानं अंघोळ केली. तिच्या अंगावरील कुडत्याची फाटलेली बाही पाहताच तिला सकाळचा मळ्यातील प्रसंग आठवला व ती लाल झाली.
" कुत्र्या भैय्या! तुला पाहीन म्हणजे पाहीनच!"
आत्यानं शेजारच्या मुलाचे कपडे आणत प्रभाकरला दिले. नंतर स्वयंपाक करत पोटभर जेऊ घातलं. काल रात्रीची जेवलेली पोरं भरपेट जेवली. आज दिवसभर पोटात फक्त सकाळचा चहाच होता.
जेवण आटोपताच नानजीनं सरबत्ती सुरू केली.
" दिपा एकटे कसे आलात?"
दिपा व प्रभाकर आत्याला बिलगत रडू लागले. भाऊ गेला. भरलं घर, सारी सुखं टाकून गेला. पण लेकरं बापाविना पोरकीच. गोताबाईनं मायेनं दोघांना आवळलं.
" आत्या आता आम्ही त्या साकीला शिकायला जाणारच नाहीत!" प्रभाकर रडतच आत्याला विनवू लागला.
" प्रभू, नको जाऊ.पण नेमकं काय झालं ते तर सांग!" गोताबाई विचारू लागली.
नानजी नानाही अधिरतेनं त्यांच्याकडं पाहू लागले.
मोठ्या जिजास साकीस दिलेली. व तिच्याकडंच ( बहिणीकडंच) ही पोरं शिकतात हे त्यांना माहीत होतं. पण सात आठ वर्षांपासून ती कधीच आली नाहीत. गोता सुटीत इस्लामपूरला माहेरीच त्यांना भेटून यायची. पण मग साकीहून ही पोरं अचानक का आली?
" दिपा, बेटा तू सांग बरं काय घडलं!"
" आत्या,...आत्या आक्का व दाजीचं काहीच म्हणणं नाही पण तो....ते ( जीभ आवरत) भैय्यासाहेब त्रास देतात आम्हास! आता ..आता आम्ही नाही जाणार तिथं!"
गोताबाई व नानजीनं त्यांना शांत झोपवलं. सकाळी इस्लामपूरला नवीनच सुरू झालेल्या लॅन्डलाईन वरुन पोष्टात फोन करत इंदूबाईस पोरं आल्याची खबर देत बोलवून घेतलं. नानजी नानानं पोरांना गावातल्या रेडीमेड स्टोअर्सवर नेत कपडे घेतले.
दुसऱ्या दिवशी इंदुबाई आल्या. आधी त्या मुलांवर संताप करू लागल्या. कारण कालच सायंकाळी पोरं नसल्याचा जिजाचा फोन असल्यानं ते ही काळजीत होते. रात्रभर शोधत होते. पण सकाळीच नानजी नानाचा फोन जाताच साऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. पण न सांगता ही पोरं पळून का आली यानंच इंदुबाई संतापत होत्या. त्यांनी दिपालाच जाब विचारला.
दिपाच्या डोळ्यातून धारा टपकू लागल्या. साऱ्यांना काय सांगावं तेच सुचेना! सांगूनही आपल्यावर आई ,जिजाक्का, दाजी विश्वास ठेवणारच नाहीत.
" आई, हवंतर मारुन टाक! पण मी नाही जाणार परत!"
" परत जाणार नाही म्हणजे? सख्खी बहिण आहे जिजाक्का तुझी!"
" आक्काबाबत नाही गं!"
" मग? का जाणार नाही?"
" आई मी पण नाही जाणार परत! हवंतर इथंच आत्याकडं शिकतो पण तिथं नाहीच!" प्रभूही आता रडू लागला"
" अरे पण झालं काय?"
" ते भैय्यासाहेब मारतात ,केव्हाही. शिव्याही घालतात!"
" का? नी मग आक्का, दाजीसाहेबांना सांगायचं ना?" इंदुबाई लाल होत संतापू लागली.
" आई तुला माहीत नाही. पण आक्काकडं सांगुनही त्यांना खरं पटत नाही व भैय्यासाहेब त्यांच्यासमोर काहीच करत नाही. पण ते नसले की मग धमकावतात,मारतात!"
" मूर्खांनो , मेव्हणे आहेत ते तुमचे! मारत असतील तर शिस्त लावण्यासाठीच ना? तुमचं ही काही चुकत असेल म्हणून मारत असतील! पण मग का असं पळून यायचं शोभतं का तुम्हास!"
" आई, प्रश्न मारण्याचा नाही गं! कसं सांगू तुला!" दिपा कळकळून रडत सांगू लागली.
" काही सांगू नको शहाणी कुठली! परभ्या एक लहान त्याचं ठिक पण तुला अक्कल नव्हती का असं पळून यायला? उद्या परक्या घरी नांदायला गेली तर अशीच करशील का? इंदुबाई जास्तच संतापल्या.
" आई ,अक्कल होती व परक्या घरी जायचंय म्हणून तर निघून आली!" लाल डोळ्यानं दिपा बोलली व तेथून उठली.
इंदुबाई चवताळल्या. त्या उठून तिला धरणार तोच गोताबाईनं हात पकडत इंदुबाईला बसवलं.
त्यांनी ओळखलं की प्रकरण वेगळंच आहे.
" इंदू, जिजाकडं पाहतांना दिपाकडं दुलर्क्ष करू नको.ती नाही म्हणतेय ना! तर नको पाठवू. खुशाल घरी ने! आणि घरी न्यायचं नसेल तर माझ्या भावाची पोरं मला जड नाही.शिकतील इथं!"
वन्सबाईच्या शब्दानं इंदुबाई नरमली.
" पण माई, जिजा व जावयांना काय सांगू?"
" माझं नाव सांग! " गोताबाई ठामपणे बोलल्या.
इंदुबाई परत गेल्या त्या आधीच गोताबाईनं दिपास विश्वासात घेत सारा प्रकार जाणून घेतला.
.
.
जळगाव तालुक्यातील साकीचे प्रतापराव इंगळे वकील प्रसिद्ध.अख्ख्या जिल्ह्यात त्याचं नाव गाजलेलं. ते गेले,त्याचा मुलगा बळवंतरावही गेले. बळवंतरावाचीच संदेशराव व भैय्यासाहेब ही दोन मुलं व छोटी संध्या. संदेशरावासोबत इस्लामपूरच्या जिजा जाधवाचं लग्न झालं. एका वर्षातच जिजानं आपली लहान भावंडं दिपाली व प्रभूस शिकण्यासाठी साकीला आणलं.
तापीकाठावर केळीच्या बागा, ऊसाचे फड तर गिरणा काठावरही लिंबू, पेरूच्या बागा. आजोबांनीच घेतलेल्या. संदेशराव साकीत थांबत शेती सांभाळत तर भैय्यासाहेब लाॅ करू लागले. पण मळ्यात राबण्याची त्यांनाही खूप आवड.त्यामुळं जळगावला बहिण संध्यासोबत कमी व ते साकीलाच जास्त थांबत. दिपाली व प्रभू दिसला की त्यांच्या डोळ्यात मात्र आग उतरे. नसा तडकत, फुगत! तसं पाहता ही आग जुनीच. पण ती ज्यावर व्यक्त व्हावी ती वेळ अजुन आली नसल्यानं धग दिपाली व प्रभूला बसू लागली. संदेश आबा व वहिणीसमोर भैय्यासाहेब एकदम शांत वागत. दिपालीनं कलेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला तर प्रभू दहावीला. गेल्या एक दिड वर्षात प्रभूला तर जास्तच त्रास होऊ लागला. सुटीनंतर तो आईला सपशेल नकारच देत होता. पण आईनं दटावट त्याला पाठवलंच. तो व दिपाली आपली मोठी बहीण जिजाआक्कासही 'भैय्यासाहेब दटावतात, मारतात' हे सांगत. पण जिजाला समोर दिसेचना. तिला मेव्हण्याच्या नात्यानं मष्करी करत असतील असंच वाटे. तरी जिजानं संदेशरावाकडं सांगितलं.
संध्याकाळी संदेशरावानं भैय्याला छेडलं
" भैय्या, त्या पोरांना का दटावतो रे?"
"आबासाहेब, का म्हणजे? माझा साला आहे तो! दिपा साली आहे मग दटावू नको?" भैय्यासाहेबानं हसतच स्पष्टीकरण दिलं.
" मग तर खुशाल दटव!" संदेश राव जोरानं हसत म्हणाले.घरातून आलेल्या प्रभूला भैय्यासाहेबांनी इशारा करतच बोलवलं
" अय बारक्या पंक्चर साल्या! इकडे ये! माझी तक्रार करतो का!"
प्रभू थरथरु लागला. तो घरात परत पलटू लागला. तोच भैय्यानं धावतच त्याला दारात पकडलं. त्याच वेळी नेमकी दिपाली ही घरातून आली.
तिच्याकडं तिरकं रागानं पाहत भैय्यानं प्रभूला उचलत आबासमोर आणलं.
प्रभूला गच्च मांडीत जखडत भैय्यासाहेब त्याला गुदगुल्या करु लागले.
" पंक्चर प्रभू साल्या लहान दाजीची मस्करी समजत नाही का तुला!"
गुदगुल्यांनी प्रभूला हसू फुटू लागलं पण भितीनं अंगही ओलं झालं. तोच हसत हसत संदेशराव उठले व बाहेर पडले. नी तोच मांडीत प्रभूला दाबत पोटात बारीक चिमटा घेतला जाऊ लागला. प्रभू चिमट्यानं कासावीस व घामाघूम होऊ लागला. त्याचा आवाज वाढणार तोच " साल्या आवाज काढला तर याद राख बुटासहीत लाथ घालीन!" पोटातली कळ मेंदूत सरकली व संवेदना खाली उतरू लागल्या.
प्रभु चड्डी ओली करू लागला. भैय्यानं त्याला दूर ढकललं.दिपालीनं प्रभूस उचललं.
" दिपली तू ही मातली! थांब लवकरच तुझी ही पणती पेटवतो!" डोळ्यातल्या आगीनं दोन्ही बहीण भाऊ होरपळले. रात्री संदेश रावाचं कुणीतरी ओळखीचं मुक्कामाला आलं म्हणून विषय थांबला.
सकाळी शनिवार असल्यानं दिपा काॅलेजला गेलीच नाही. प्रभूही मग घरीच राहिला.
संदेशराव पाहुण्यासोबत शेजारच्या गावी गेले. दुपारचा स्वयंपाक करायला लावत त्यांनी मळ्यातून पाहण्यांना देण्यासाठी दोन केळीचे घड आणावयास ते सांगून गेले. पण जिजास लक्षात राहिलंच नाही. माणसं निघून गेली. भैय्या साहेबही घरी दिसले नाही मग जिजा लुना काढायला लावत प्रभूला मळ्यात पिटाळू लागली. प्रभूला मळ्यातल्या छोट्या वाटेवर लुना एवढी जमणार नाही म्हणून दिपालीलाही सोबत पाठवलं. दिपाली प्रभूला बसवत मळ्याकडं लुना काढणार तोच तिच्यात जेमतेम पेट्रोल दिसलं. जिजानं बस स्टॅण्ड वरून पेट्रोल टाकण्यासाठी पैसे दिले. तोच प्रभूलाही रजिस्टर्स घ्यायची असल्यानं ते ही पैसे घेतले. स्टॅण्डवर येताच गाडी सहज परत येईल हा अंदाज येताच तिकडूनच पेट्रोल टाकू असं ठरवत ते निघाले.
मळ्यात बंगलीसमोर लुना उभी करत ते उतरले. प्रभूनं गंगाराम बाबास आरोळी मारली तोच बंगलीतून भैय्यासाहेब बाहेर आले.
" काय रे उंदरांनो! कुणीकडं?"
प्रभू भैय्यासाहेबांना मळ्यात पाहताच टरकला. त्याला अपेक्षाच नव्हती.
" भैय्यासाहेब, आक्कानं पाहुण्यांना देण्यासाठी केळीचे घड आणायला पाठवलं!" प्रभू खाली मान घालत भीत भीत सांगू लागला.
" अय साल्या पंक्चर , दाजी म्हण! भैय्यासाहेब काय म्हणतो!" भैय्यासाहेब बंगलीवरून खाली उतरत प्रभूचं बखोटं पकडत गरजले.
दिपाली दूर उभी.
" जा नी तिकडच्या बागेत गंगाराम असेल त्याला सांग!"
दिपाली निघाली.
" तू कुठं निघालीस? मी या पंक्चर उंदराला सांगितलं,तुला नाही! तू इथंच थांब!" भैय्यासाहेब गरजले.
" नाही आम्ही दोन्ही जण जाऊन येतो!" दिपाली घाबरत घाबरत खाली मानेनं बोलत निघाली.
" जा मग!" भैय्यानं प्रभूचं बखोटं पकडत त्याला धावेवर टाकलेल्या खाटेकडं नेत म्हटलं. दिपाली एकटी निघाली. तिला वाटलं लवकर गंगाराम बाबाला शोधून आणू म्हणजे त्यांच्यासमोर भैय्यासाहेब काही करणार नाही. व लगेच इथनं सटकताही येईल.
दिपालीला बागेत जातांना पाहताच भैय्यासाहेब मनात हसले. शिकार आयतीच बागेत शिरतेय तोवर या बारक्या उंदराला खेळवू या.
" चल रे पंक्चर बारक्या साल्या अंगावर चाल माझ्या!" भैय्यासाहेब खाटेवर आडवे झाले.
प्रभू घाबरत घाबरत जाणाऱ्या दिपाली कडं पाहत पालथ्या भैय्यासाहेबाच्या अंगावर चढू लागला. तोच त्याच्या कानफटीत सपाकदिशी हाताचा पंजा उमटला
" पंक्चर साल्या दाजीच्या अंगावर तसाच चढला घाणेरड्या पायानं?"
प्रभूचा गाल फरफर सुजला. तो मोठ्यानं बोंबलला. पोटाच्या दोन्ही बाजुस चिमटे बसू लागले. कळ डोक्यात जाताच प्रभू जोरात भोकांड पसरत ओरडू लागला. त्याचा आकांत ऐकताच दिपाली तशीच मागे फिरली.
" भैय्यासाहेब ,का मारताय त्याला?" दिपालीनं प्रभूला तावडीतून सोडवलं. प्रभू तिच्या मागं रडतच सरकला.
" तू पण भैय्यासाहेब बोलतेय? दाजी बोल!" भैय्यासाहेब लाली उतरल्या डोळ्यानं तिच्याकडं पाहू लागले. नजर डोक्यावरून हळूहळू खाली सरकू लागली. डोळे, गाल, ओठ हनुवटी... करत करत खाली सरकू लागली.
" चल रे बारक्या उंदीर तू जा बागेत! हिला थांबू दे!"
पण दिपाली ही प्रभूसोबत निघाली. तोच भैय्यासाहेबानं तिचा हात पकडला.
दिपालीच्या सर्वांगात सरसरून काटा उभा राहिला. प्रसंग व नियत तिच्या लक्षात आली
" हात सोड मुकाट्यानं!" दिपाली वाघिणीगत फुत्कारली व हात सोडवणार तोच बाही टर्रकन फाडली जाऊ लागली.
" दिपली तुझी पणती आज पेटवत़ोच!"
दिपालीनं ओळखलं. खुमखुमीनं मारणं ठिक. काही बदल्याच्या भावनेनं छेडणंही वेगळं, पण इथं तर......
दिपालीनं मागचा पुढचा विचार न करता हात झटकत हिसका दिला पण तोच भैय्यासाहेबानं कसायानं शेळीला पकडावी तसं पकडलं नी दिपालीनं क्षणाचाही विलंब न करता गरर्कन वळत खाटेवर बसलेल्या भैय्याच्या छाताडात सॅण्डलसहीत लाथ घातली!
असला हल्ला होईल ही नाममात्र अपेक्षा नसल्यानं
भैय्या संतापानं बेफान होत चवताळून उठला पण तो पावेतो प्रभू व दिपाली नं हातास लागेल त्या ढेकळानं दगडानं त्यांनी भैय्यावर मारा सुरु केला.
" साल्या उंदराची पैदास! हा नाग त्या संदेश व जिजीवर डूख धरून बसलाय नी ही उंदरचं मुतायला लागली डोक्यावर! थांबा मुंडी मुरगाळून विहीरीतच फेकतो!"
दिपाली व प्रभूनं पायातले चप्पल काढत भिरकावलं. दिपालीनं भैय्या सावध होतोय तो पावेतो पायातल्या सॅंडलने त्याच्या मुस्काटाचाच वेध घेतला होता. नागाच्या नजरेत वासना उतरल्यावर त्याचं मुस्काटच फोडायला हवं.
दिपाली व प्रभू बागेत घुसले. लुनाकडं पळणं त्यांना शक्यच झालं नाही. भैय्या पाठलाग करू लागला पण तो पावेतो दिपाली व प्रभूनं धूम ठोकत केळीच्या बागा, ऊसातून धूम ठोकली पण ती लुना व साकीच्या विपरीत दिसेनं!
" दिपली छाताडावर लाथ घातलीस याचा वचपा मी घेतल्या शिवाय राहणार नाही! जन्माची अद्दल घडवणार! हा भैय्या प्रतापरावाचा नातू आहे! खुमखुमी आमच्या रक्तातच आहे! पळून पळून कुठं जाणार! घरीच ना! "
मागून भैय्याचं फुत्कारणं कानावर पडतच होतं. दिपालीनं पळता पळताच विचार केला की आता साकीत परतणं म्हणजे मरणच!
" दिपा, चल आता गावालाच निघू!" प्रभू रडतच पळत पळत म्हणत होता.
दिपाली पायाला भिंगरी बांधल्यागत पळतच होती. ओल्या शेतात पाय फसत होते. तिनं ओळखलं तो कुत्रा घरी जाईल व घरी आपण न दिसताच ईदगाव पुलावरून इस्लामपुरची वाट धरत आपल्याला गाठेल. म्हणून ती गावचा रस्ता जवळ असूनही तिकडं न जाता जळगावकडं जाणाऱ्या रस्त्याकडं धावू लागली.तीनेक किमी शेतातून धावत त्यांनी शेजारचं गाव गाठलं. त्यांच्या नशीबानं जवळच्या गावातूनच जळगावला जाणारा टेम्पो भेटला. पेट्रोल व रजिस्टर घ्यायचे पैसे सोबत होतेच. जळगावला येताच ते बस स्टाॅपवर गेलेच नाही. रिक्षानं हाय वे वर येत धुळ्याकडचा ट्रक पकडला. एरंडोलवरून पारोळ्याला ट्रक आला. ट्रक वाल्यास धुळ्याचं नाव सांगितलं होतं.तिची चलबिचल वाढली.पणं तोच त्यांच्या नशिबानं पारोळ्यालाच ट्रक थांबला. ते बसुनच राहिले. ड्रायव्हर क्लिनर जाताच दोघे हळूच खाली उतरत बस पकडत अमळनेरला निघाले. भाडं वाचवलंच. आता सतोना पर्यंत भाडं आरामशीर पुरेल याची दिपालीला खात्री पटली. बाहेर पाऊस सुरू झाला. अमळनेरहून सहाच्या सुमारास शेवटची खाचण्याची बस मिळाली ती पकडत ते खाचण्याहून सतोन्याला आले.
दिपालीला सारं आठवलं.
दिपालीनं सारं रडतच आत्याला सांगितलं. आत्यानं ओळखलं की पोरीनं जे केलं ते योग्यच केलं.कारण बहिणीचा दिर असला म्हणून काय इज्जतीशी खेळ मांडायचा का? आत्यानं सारं ऐकूण मायेनं पाठीवर हात फिरवत तिला धीर दिला.
नदीकाठावरील वाटेवर पाय घसरून पडतांना प्रभुच्या धक्क्यानं आपलाही तोल गेला. त्या पोरानं केस पकडत आपणास सावरलं तेव्हा भैय्या कुत्राच जाणवला. पण लगेच खोल पात्र समोर अंधारात लक्षात आलं.व त्या पोरानं वाचवण्यासाठीच पकडलं हे लक्षात येताच संताप जिरवला. पुन्हा नावेत बसतांनाही त्यानं पुन्हा हातानं ओढतच नावेत घेतलं तेव्हाही पायातली सॅण्डल काढत सडकावं वाटलं. पण तोच त्यानंच तोल सावरत दूर झटकलं. पुन्हा संताप आवरत सतोन्यात आलो.
.
.
गोताबाईनं इंदुबाईस जिजाकडं पाठवत दोघाचं टि. सी आणायला सांगितलं. प्रभू व दिपाली इथंच शिकतील व आम्हालाही मुलींच्या लग्नानंतर सोबतच होईल.
इंदुबाई परतल्या.
दिपालीस केस विंचरतांना आरशात आपल्या एका कानातलं डूल हरवल्याचं लक्षात आलं. तिला वाटलं केळीच्या बागेत वा ऊसाच्या फडात पळतांना पडलं असावं. तिनं दुसऱ्या कानातलं डूल काढत घरात ठेवलं.
.......................…..……....….…...