फुकट काय मिळतं?
जगात जगण्याचे अनुभव कोळून प्यालेले, काळ्याचे पांढरे झालेले वा वरचे काळे असतांनाच नको त्या वयात उडालेले बोलतांना सहज फुकटाचा प्रश्न विचारून सल्ला देतात. 'या जगात फुकटात काय मिळतं? काहीच नाही!'. पूर्व पदात प्रश्न असल्यानं त्यांचा उत्तर पदातला अनुभव नक्कीच डगमगतांना दिसतो.पावला पावलावर पाय ठेवताच पैसा लागतो. पैशाशिवाय इकडची काडी तिकडे फिरत नाही. पैशाशिवाय काहीच नाही .खरच असावं हे एवढे अनुभव समृद्ध लोक ज्यांनी हयात झिजवत हे अनुभव घेतले असतात ते उगाच फुकटाच्या वावड्या कशाला उठवतील!
'नसेल हातात नाना तर शहाणा ही गयबाना' यानुसार त्या 'नाना' ची ,नाण्याची दुसरी बाजूही पाहू यात!
जगात फुकट काय मिळतं? तर बरंच काही! सारंच! माणसानं आपलं शहाणपण, अनुभवाच्या पट्ट्या, आत्मप्रौढी जर थोडा वेळ खुंटीवर फुकट टांगून ठेवत तटस्थ राहत विचार केला, जगण्याचा प्रयास केला तर जगात व्यवहारात निसर्गात फुकटचा खजाना पसरलाय. फुकट आस्वादा, सोबत घेऊन जा,साऱ्यांना वाटा कितीही वाटा, लाटा फुकट .अगदी फुकट.विश्वास नाही बसत ना? पाहूयात जरा फुकट असा विचार करून! करायला काय हरकत आहे.खिशाला चाट नाही लागणार.नसेल पटत तर सोडून मोकळे व्हा!
जगात माणसाला मनुष्य जन्म जी एक अलौकीक बाब आहे तो जन्म फुकट मिळतो. असतील असं विश्वास ठेवला तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यांच्या अजब चक्रात ही लाॅटरी फुकट लागते. भले येणाऱ्याची वाट पाहणाऱ्यांचं दवाखान्याचं बील भरतांना कंबरडं मोडतं पण येणाऱ्या भाग्यवंताला जन्माला येतांना खिशातून दमडी मोजावी लागत नाही. खिसाच नाही तर दमडी कुठून.उलट वरुन येताच फुकटचं टॅव टॅव!
जन्म फुकट त्याही पेक्षा जो नरदेह मिळतो ज्याची जगातल्या कुठल्याच संपत्तीत( कपर्दिक, चलन, हिरे- माणके मोती, सोनं)तुलना होऊ शकत नाही असा तो नरदेह ही फुकट मिळतो.मग आणखी काय हवंय की लोक सवाल करतात की जगात फुकट काय मिळतं! ज्या नरदेहाचा एक एक आॅर्गन - नाक, कान, डोळा, यकृत, ह्रदय अनमोल आहेत ते सारं एकदा नियती फुकट न मागता पुरवत असते. याच नरदेहात ज्या वेगवेगळ्या भावभावना उमडतात साधक बाधक कशाही असोत पण त्या उमडणं जिवाच्या वाढीसाठी, समाजासाठी पोषक ठरतात अशा साधक भावना व्यक्त करण्यासाठी माणसास कोणताच पैसा मोजावा लागत नाही, ना कुठला कर. क्षणात साऱ्या नसा भुवया, त्वचा, आठ्या, आड्या, झुऱ्या ताणल्या जाऊन वा सैल सुटत मेंदूत ह्रदयात रासायनिक रसायन,संप्रेरके झरत सहज सुलभ प्रसंगानुरुप झरझर पणे व थेट व्यक्त होतात. मग प्रेम असेल, लोभ असेल, (लटका) राग असेल, लाजणं, मुरडणं,माया, ममता, मातृत्व या भावना मानवात फुकट उत्पन्न होतात. बाळाचा जन्म होताच आईस मात्वृत्वाची परम पावक भावना लगेच निर्माण होणं किती अनमोल बाब आहे जे निसर्ग फुकट देतो. मग आणखी काय हवंय?
नकटं नाक सरळ करणं, तिरपी दृष्टी सरळ करणं, दातातील विकृती सरळ करणं किती खर्चीक पण या साऱ्या बाबी निसर्ग प्रामाण्याधिक्काने जागच्या जागी हव्या तितक्याच संख्येनं साऱ्यांना फुकट देतो ही बाबच किती मोठी. निसर्गानं देहात नजरचुकीनं म्हणा वा पूर्व पापाचं संचित म्हणा पण खटकी ठेवलीच तर ती खटकी काढण्यासाठी किती यातना होतात, झळ पोहोचते हे ज्या त्या जिवास व आप्तगणासच माहित. म्हणून निसर्गानं कोणतीच खटकी न ठेवता सारं जागच्या जागी दिलंय तेही फुकट ही किती महनीय गोष्ट आहे. तरी माणसं फुकट ओरड करतात जगात फुकट काय मिळतंय?
निसर्गानं नदी,पर्वत, डोंगर, सूर्य चंद्र,तारे आकाश, अवकाश, नभोमंडळ, वातावरण, वारे,पाऊस थंडी, उन सारं सारं फुकट दिलंय. ऋतूपरत्वे भिन्न ,अद्भुत रम्य पहाट, सुंदर प्राची, कातरसंध्या गुढगुंजन करणारी रात, उदाजळीची रम्यता हे सारं अगदी फुकट. हे देतांना यापासुन त्या त्या प्रदेशातील लोकांना भौगोलिक संरक्षण तरी दिलंय वा तसली प्रतिकार शक्ती तरी दिलंय. भारतापुरतं विचार करता उत्तरेकडुन येणाऱ्या थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी मध्ये फुकटात हिमालय उभा करत थंड वारे अडवले असा सोईस्कर विचार आपण फुकट असुनही का करत नसतो?
पावसाची आबादानी, वळीवातील मृद् गंध, थंडीतलं गुलाबीपण, उन्हाची काहीली( जी नकोशी वाटते पण ती ही हवीच) फुलाचा सुगंध, केशर आब्यांचं मोहरणं, गुलाबाचं डहाळीवर डोलणं, रावा- मैनेचं कलकलणं, पिकेचं गुंजन, गुंडूरलाव्याचं झुरणं, झऱ्याचं अवखळणं, लतावेलीचं बहरणं हे सुखावणारे, डोळ्याचे पारणे फेडणारे लाखमोलांचे स्वर्णिम सुखाचे अविष्कार निसर्ग भरभरून फुकट देतो.
खिशाला चाट देऊन महागडी टूर करण्यापेक्षा अमावास्याची भितीदायक असली तरी अनुभवावीच अशी शामल कभिन्न रात, पुनव झटेतली दुधाळ रात, दहिवरात न्हालेली सृष्टी या बाबी ही नियमीतच्या वेळा टाळून व सवयीची नसलेली पण पायी फिरता येतील अशा ठिकाणी सहकुटुंब फुकट फेरफटका मारला तर ही स्थळं फुकटचं नव्या दृष्टीनं रोमांचित करतात. ना पैसा, ना न पेलवणारा प्रवास. ना कुठला ताण.
माणसाच्या शरीरातील साऱ्या क्रिया फुकट होतात. श्वास फुकट, चयापचय फुकट, अन्नपचन फुकट, उत्सर्जन फुकट. ज्यावेळेस यात बिघाड होतो तेव्हा या फुकटच्या गोष्टीचं महत्व अधोरेखीत होतं. व्हेंटीलेटरवर असलेल्याला श्वासाचं महत्व, डायलेसीसवर असलेल्याला फुकटच्या रक्ताभिसरणाचं महत्व पटतं.
जिवनातील पापपुण्याचा चुकलेला हिशोब मांडण्यासाठी मंदिरात, चर्चेत, दर्ग्यात पैसा खर्चून जात मन: शांती मिळवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा थकलेल्या आई वडीलांच्या पायाशी एकातांत दहा पंधरा मिनीटं बसत त्यांना नको काही द्या पण त्याचं निर्व्याज प्रेम कळतंय एवढं समाधान जरी त्यांना दिलं तरी तुमचं साऱ्या पातकाचं परिमार्जन होत साता जन्माचं पुण्य फळाला येईल. हे देखील सारं फुकट. त्यांच्या चरणातच फुकटची तीर्थे, धाम, स्वर्ग आहे.
जगात फुकट काय मिळतं ? सारंच मिळतं हे म्हणणं थोडं धारीष्ट्याचं होईलही. पण काहीच फुकट मिळत नाही हे ही सर्वथा योग्य नाही. माणसाला भूक फुकटची लागत असली तरी ती फुकट भागत नाही म्हणून पैसा लागतो हे अंतिम सत्य स्विकारावंच लागतं पण ते स्विकारतांना माणसानं पैशाचं नको तितकं उदात्तीकरण करतांना मनात पैशाचा इतका सोस, स्वार्थ धरला की प्रत्येकाची धारणा जगात फुकट काहीच मिळत इतपत होण्यात त्याचं पर्यवसान झालं.
मित्रांनो जगण्यासाठी, गरजा भागवण्यापुरता पैसा असणं हा व्यवहार आहे पण त्याच्या राशी निर्माण करण्यासाठी जगणं सोडून त्यामागं धावणं अव्यवहार्य आहे.
कितीही राशी लावल्या तरी जातांना कष्टाच्या पैशातून घेतलेला करगोटाही सोबत येत नाही. दहा दहा जण पुन्हा पुन्हा विचारुन खात्री करतात
" कमरेचा करगोटा तोडला का? कपडा फाडला का? तुमच्या कडे रत्नाच्या राशी असतील पण जातांना कपाळाला कमीत कमी मुल्याचा रुपयाचा शिक्काच चिपकवतात. ना की रत्ने वा ना की नोटाची गड्डी. तो ही सारी सरकटतांना राखेतून काढला जातो. म्हणून जगात फुकट काय मिळतं याचं उदात्तीकरण करत पैशामागे धावत शुद्ध जगणं हरवण्या पेक्षा जातांना लागणारे चार खांदे व पाणी देणारा अजुन तरी फुकट मिळतात हा विचार मनात ठेवत जगात असा भरपूर अनमोल खजाना पडलाय की तो फुकट मिळतो असा फुकट विचार करत सुंदर सहज जगा जिवनाचा आस्वाद घ्या!
.
.हे सारंही फुकटच आहे! पटलं तर घ्या अन्यथा.......मनातून काढून टाका पण ठासून सांगा की जगात फुकट काय मिळतं तर सारंच फुकट! फुकटच!
.
.