विधवा (एक सूडकथा) - Sudhkatha in Marathi |
सह्याद्रीच्या सुळक्याच्या त्या कड्यावर तो उभा होता. गावाशेजारी तो विस्तीर्ण कडा पसरलेला होता. कड्याची अवघड आणि घनदाट वाट तुडवत तो इथपर्यंत आला होता. आपल्याला इकडे येताना कोणी पाहू नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. आपल्या मरणानंतर आपला मृतदेहही कोणाला सापडू नये अशी त्याची मनोमन इच्छा होती. तो द्विधा अवस्थेत इथपर्यंत आला. कड्याच्या टोकावर पोहोचेपर्यंत त्याचा आत्महत्येचा निश्चय पक्का झाला होता. तो आत्महत्या का करतो? कशामुळे करतो? एवढ्या टोकाचा निर्णय त्याने का घेतला? याची सगळी उत्तरे त्याच्या मनात तयार होती. मरण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही तेव्हा, त्याने हा निश्चय पक्का केला.
टोकावर पोहोचेपर्यंत ना ना विचार त्याच्या मनात थैमान घालत होते. पण त्याचा निश्चय डळमळीत झाला नव्हता.
टोकावर पोहोचला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. वातावरण थोडेसे उष्ण जाणवत होते. चेहर्यावर आलेला घाम त्याने शर्टच्या बाहीने पुसला. उंचीवर असल्यामुळे अधूनमधून गार वारा वाहत होता. त्या गार वार्याने त्याला थोडे अल्हाददायक वाटत होते. गार वाऱ्याचा सपकारा चेहर्यावर झाला की एक सुखद जाणीव मेंदूपर्यत जात होती. एरव्ही तो जर चांगल्या परिस्थिती असता तर, त्याने या वातावरणाचा आनंद उपभोगला असता.
पण आता स्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात, कितीही मोठे स्वागत झाले तरी त्याचे काय अप्रूप वाटेल? त्याने एकदा तो जालिम भूतकाळ आठवला, ज्या थोड्या सुखद जाणीवा वाट्याला आल्या त्यांच्या स्मृती डोळ्यापुढे चमकून गेल्या. रुपाचा तो निरागस चेहरा डोळ्यापुढे सर्रकन उमटून गेला. रुपाच्या आठवणीने त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात पाण्याचे बिंदू चमकून गेले. तिची शेवटची धडपड त्याला आठवली तेव्हा, त्याला दुःखाचा एक मोठा उमाळा आला. रूपा मेली तेव्हाच आपण का मेलो नाही या विचाराने त्याला अपराधीपणा वाटला. घरी आई, वडील, बहीण भाऊ आपली वाट बघत असतील. मुलगा नोकरीला लागला आहे, आपल्या जिवाचे कल्याण झाले आहे, असे ज्याला त्याला सांगणार्या बापाचा चेहरा त्याला आठवला. इकडे येताना आईच्या डोळ्यातून अश्रूंची गळणारी धार त्याला आठवली. लहान बहीण, भाऊ यांचा निरागस चेहरा डोळ्यापुढे तरळून गेला. पण या क्षणी त्याला कोणाचाच निरागस चेहरा धीर देऊ शकला नाही. जगण्याची हिम्मत आईचे अश्रूही देऊ शकले नाहीत. तो आतून तुटत तुटत गेला. त्याला तो रूपाचा करुण चेहरा, तिची शेवटची धडपड पुन्हा पुन्हा आठवू लागली. एक मोठा उमाळा मनातून वेगाने बाहेर आला. आणि त्याने त्या उंच कड्यावरून आपला देह खाली झोकून दिला.
ते नोकरीचे पत्र हातात पडण्यापूर्वी, तो एक कफल्लक जीव होता. घरी आई, वडील, भाऊ आणि एक बहीण. वडील कारखान्यात कामाला जात. आई भेटेल त्या घरची धुणी भांडे करून कुटुंबाला हातभार लावत असे. तसा तो परिस्थितीने गरीब. हातावर पोट असलेल्या कुटुंबातला. पण तो स्वाभिमानी होता. कधी कोनापुढे त्याने लाचारीने हात पसरला नव्हता. गरिबीत स्वाभिमानाला जास्त तीक्ष्ण धार असते. हे जणू त्याच्या अंगात भिनलेलेच होते.
आपण कुठेतरी नोकरीला लागावे ही त्याची तळमळ होती. कुठे जागा निघाल्या की फॉर्म भर, कुठे मुलाखत असेल तर तिथे जा. असे त्याचे उद्योग सुरूच असत.
दोन महिन्यापूर्वी एका झेडपिच्या शाळेत त्याने प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज केला होता. बरेच दिवस उत्तर न आल्याने त्याने त्याचा नाद सोडून दिला.
असाच दुपारी कुठलेतरी पुस्तक वाचत बसला होता. घरात बहीण काहीतरी काम करत होती. उन्हाने वातावरणात गरमी जाणवत होती. दरवाजा जवळ कोणीतरी आल्याची त्याला चाहूल लागली. त्याने पुस्तक बाजूला ठेवले, तो बाहेर आला. बाहेर पोस्टमनला पाहून त्याला आश्चर्य वाटले. आपल्या उभ्या आयुष्यात, आपल्या घरी पहिल्यांदा पोस्टमन आलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. पोस्टमनने त्याच्या हातात ते पत्र सोपवले आणि तो निघून गेला. त्याने पत्र निरखून पाहिले, पत्र त्याचेच होते. वर एकनाथ देशमुख असा त्याच्या नावाचा उल्लेख होता. पत्र झेडपीचे होते. त्याची उत्सुकता वाढली.
हात थरथर करत होते. त्याने लिफाफा वरच्या बाजूने फाडून आतील पत्र बाहेर काढले. पत्रातील मजकूर तो जसाजसा वाचत होता, तसा तसा त्याचा चेहरा खुलत होता. पत्र वाचून संपले तेव्हा, त्याचा आनंद चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता. सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात त्याची झेडपी शिक्षक म्हणून नेमणूक झाली होती. नोकरीचा आनंद ओसंडून वाहत होता. नोकरीपेक्षा आता गरिबी दूर होईल याचाच आनंद जास्त होता.
रात्र झाल्यावर त्याच सगळ कुटुंब आनंदाने न्हाऊन निघाल. त्या दिवशी घरी गोडधोड जेवण झाल. तो सगळा दिवस आणि रात्र आनंदात गेली.
जाण्याचा दिवस उजाडला. त्याची सगळी तयारी झाली. एक मोठी पिशवी आणि काही छोटे मोठे सामान भरलेली दुसरी पिशवी घेऊन तो निघाला. घरच्यांना निरोप देताना त्याला भरून आल. आई वडीलांनी नीट रहा म्हणून बजावल, तेव्हा त्याने तुम्ही काळजी करू नका म्हणून त्यांना वचन दिल. तसा तो बर्यापैकी गुणी होता. त्यामुळे त्याच्या आई वडीलांना जास्त धास्ती वाटली नाही.
एन. एच चार महामार्गावरून त्याने सातार्याला जाणारी बस पकडली. महामार्गावर बस धावत होती, तशी त्याला घरापासून आपण आता दूर जात आहोत याची जाणीव प्रकर्षाने होत होती.
बस धावत होती तसे त्याचे विचार धावत होते. शाळा कशी असेल? गाव कसा असेल? गावातील लोक कसे असतील?असे अनेक विचार मनात येत होते. त्याला अनुकूल उत्तरेही मनात उमटत होते. भय, आश्चर्य, कुतुहल, जिज्ञासा अशा अनेक भावनांनी मनात थैमान घातले होते.
बस सातारा स्थानकावर थांबली. त्याचे पोस्टिंगचे गाव सातार्यापासून शंभर किमी दूर होते. कमी लोकसंख्या असलेले ते एक छोटे खेडे होते. पांगरी नावाचे ते खेडे, दुर्गम भागात वसलेले होते. त्याने विचारपूस केली तेव्हा, कोल्हापूरला जाणारी गाडी तिकडे जाईल अस त्याला सांगण्यात आले. त्याने कोल्हापूरला जाणारी गाडी पकडली. आणि त्याचा दुसरा प्रवास सुरू झाला. गाडी पुन्हा वेगाने कोल्हापुरकडे धावत होती. दोन तासानंतर तो एका मोठ्या गावाजवळ उतरला. त्या गावापासून आतमधे अजून दहा किमी अंतरावर पांगरी होती.
त्याने पिशव्या सावरल्या. इकडे तिकडे नजर फिरवली. गाव मोठे असले तरी सगळीकडे सामसूम दिसत होती. संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्याला आता घाई झाली. अंधार पडण्याच्या अगोदर आपण पांगरीत पोहोचायला हवे. या विचाराने त्याने थोडी गडबड केली.
तो उभा होता तिथून थोड्या अंतरावर त्याला एक चहाची टपरी दिसली. त्याला हायस वाटल. तो लगबगीने तिकडे गेला. टपरीवर एक कृश माणूस बसलेला होता. बाजूला काही चहाची खरकटी भांडी, बिस्किटचा भुगा, खाली सांडलेला चहा, त्याभोवती घोंघावणाऱ्या माशा असा सगळा पसारा पडलेला होता. त्याने जवळ जात, त्या माणसाला विचारले,
"ओ भाऊ, पांगरीला जायला वाहन मिळेल का?"
त्या माणसाने वर पहात सांगितले,
" आता काही वाहण मिळणार नाही, पण एखादी फटफटी नाहीतर सायकल भेटल, तिकडे फाट्यावर थांबा."
अस बोलून त्याने डावीकडे असलेल्या फाट्याकडे हात केला.
त्या माणसाचे आभार मानून तो फाट्याकडे निघाला. पाच दहा मिनिटात तो फाट्यावर पोहोचला. इकडे तिकडे मान वळवून त्याने एखाद्या वाहनाचा मेळ बसतो का ते पाहिले, पण दूर दूर पर्यंत पण, त्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने मनाशी विचार केला. आता पायीच निघू, वाटेत एखादी मोटारसायकल किंवा मग इतर वाहण मिळाले तर मग बसुन जाऊ. असा विचार करून त्याने, पांगरीची पाटी दिसत होती त्या दिशेने पायी चालायला सुरुवात केली.
एव्हाना अंधार दाटून येत होता. उष्ण झळा जाऊन, गार वार्याचे झोत अंगाला झोंबत होते. खालचा रस्ता मातीचा होता. बैलगाडी जाऊन रस्त्याचे दोन भाग झालेले होते. रस्त्याच्या मधल्या भागावरून तो भराभर पाय उचलत होता. एक पिशवी खांद्यावर आणि दुसरी हातात घेऊन तो चालत होता.
रस्ता परिचयाचा नसल्यामुळे खालचे अंतर कटत नव्हते. दोन पिशव्यांचे ओझे आणि अपरिचित रस्ता यामुळे पायांना वेग येत नव्हता. जेमतेम एक दोन किमी अंतर पार झाले होते. त्यातच त्याचे त्राण संपून गेले. एखादे वाहन मिळावे ही मनोमन प्रार्थना तो करू लागला. सारखा मागे वळून बघत वाहनाची चाचपणी करत होता. पण वाहनाचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. आठ वाजत आले होते. अंधार अजून गर्द झाला. रातकिड्यांची किर्र आवाज वातावरणात गूढता आणत होता.
अचानक पाठीमागून उजेड आला आणि त्यापाठोपाठ आवाज आला. त्याने पटकन पाठीमागे वळून बघितले. एक मोटारसायकल त्याच्याच दिशेने येत होती. त्याला हायस वाटलं. मोटारसायकल जवळ आली,त्याने आशेने आडवा हात केला.
मोटारसायकल जवळ येत, त्याच्या जवळ येऊन थांबली. एक पंचविशीचा तरुण गाडीवर होता. याच्या हातातील पिशव्या आणि चेहर्यावरचे केविलवाणे भाव पाहून त्याने विचारले,
" काय दादा कुठले आहात?
कुठे निघाले आहात?
त्याने पटकन उत्तर दिले, "पुण्याचा आहे, इकडे पांगरीत प्राथमिक शिक्षक म्हणून आलोय. जरा उशीरा झाला म्हणून, पायीच निघालो."
" बर बर बसा मग". अस म्हणून त्याने त्याला पाठीमागे बसायची खूण केली. हा पिशव्या सावरून पाठीमागे बसला.
गाडी मातीच्या त्या कच्या रस्त्यावरुन पुढे जाऊ लागली. गार वारा अंगाला लागु लागला. त्याला थोड प्रसन्न वाटलं. पिशव्यांच ओझ कमी झाल्यामुळे, अंग सैल झाल होत. अर्धा तास उलटून गेला. वाटेत एक नदी लागली. नदीवरचा पूल ओलांडला की, गावाची वेस लागली. आणि थोड्याच वेळात गाव आला. अंधार असल्यामुळे गावाची रचना लक्षात आली नाही. पण एकंदरीत छोटा गाव दिसत होता. पण काही घरे चांगली मोठाली दिसत होती. काही जुने वाडेही दिसत होते. मोटारसायकल वाल्याने गाडी मंदिराजवळ थांबवली.
" मास्तर आता रात्र झाली आहे. तुमची शाळा आता बंद आहे. आता तुम्ही कुठे थांबणार. इथे कोणी तुमच ओळखीच पण नसेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. आमच्या घरी थांबा. उद्या निवांत सकाळी उठून शाळेत जावा."
"उगाच तुम्हाला कशाला त्रास. मुख्याध्यापक असतील शाळेचे त्यांच्या घरी थांबतो आज. आणि उद्या गावात एखादी रूम पाहतो."
तो म्हणाला.
" मास्तर मुख्याध्यापक आता झोपले असतील, चला तुम्ही आमच्याकडेच."
अस म्हणून त्याने त्याला हाताला धरून घरी नेले.
तो त्याच्या घरी गेला. गावातील रामजी पाटलाचे ते घर होते. त्याच्या सोबत आलेला, त्यांचा मुलगा हिरा पाटील होता. घर मोठे होते. चांगला वाडा होता. अर्धा एकर परिसरात पसरलेला तो चिरेबंदी वाडा पाहून तो हरकुन गेला.
ते दोघे घरात आले. वाड्याच्या वर दोन रूम होत्या, त्या रूम मध्ये त्याला राहायला जागा दिली. तो रूम मध्ये आला. रूम चांगल्या मोठाल्या होत्या. वर पंखा, खाली फरशी, एक कपाट, एक पलंग, त्यावर गादी, पाठीमागे दोन खिडक्या अश्या त्या दोन रूम त्याला मस्त आवडल्या. त्याने दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या. पंखा सुरू केला. थोडा वेळ स्वस्थ पडून, तो आंघोळ करायला गेला. आंघोळ करून तो पलंगावर स्वस्थ पडून राहिला.
थोड्या वेळाने एक गडी खाली बोलवायला आला. खाली जेवायला बोलविण्यात आले. त्याने संध्याकाळी घालायचे कपडे घातले. तो खाली उतरुन जेवायच्या खोलीत आला. रामजी पाटील, हिरा पाटील, त्याचे दोन भाऊ, पाटलीनबाई असे सगळे जेवायला बसले होते. त्याला ताट आधीच वाढले होते. तो ताटावर जाऊन बसला. सगळेजण त्यालाच न्याहाळत होते. त्याला थोड शरमल्यासारख झाल, थोडासा अवघडून गेला तो. पण नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. सगळेजण मनसोक्त गप्पा मारू लागले. मग तो थोडा सैल झाला. त्याला सगळ्यांचे स्वभाव थोडे समजून गेले. रामजी पाटील कडक स्वभावाचे वाटले. पाटिलकी त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. पाटलांचे सगळे पोर पण पाटलाच्या स्वभावाचेच वाटत होते. त्यांच्यात फक्त थोडा हिरा पाटील सौम्य आणि शांत स्वभावाचा वाटला त्याला. त्याच्या मनात असेच काहीतरी विचार चालू असताना.
कोणीतरी पाणी घेऊन आले. तो खाली वाकून जेवत होता. त्यामुळे त्याला सुरुवातीला चेहरा दिसला नाही, पण गौर वर्णाचे पाय आणि श्वेत रंगाची साडी पाहून त्याचे लक्ष वरती गेले.
खरतर वर पाहिल्यावर त्याचा हातातला घास हातातच राहिला असता, पण सगळ्या समोर त्याची ती कृती असभ्यपनाची वाटली असती.
म्हणून त्याने तो घास तोंडात टाकला.
तीच वय साधारणतः पंचवीसच्या आसपास असेल, खरतर गौर वर्ण, नितळ मुद्रा, आणि चेहर्यावरचे नैसर्गिक, प्रसन्न भाव पाहून तिच्या वयाचा अजिबात अंदाज येत नव्हता. ती पाणी वाढत होती, पण त्या साधारण हालचालीत सुद्धा एक नाजूक मोहकता होती, सुंदरता फक्त चेहर्यापुरतीच मर्यादित न राहता, तिचा सगळा देह सुंदर भासत होता. अनैसर्गिक, कृत्रिम शृंगार केलेल्या अनेक तरुणी त्याने, आजवर पाहिल्या होत्या. पण ते कृत्रिम चेहरे बनावटी भासायचे, त्यांच्याकडे एकटक पाहिले की, त्यांच्यातला कृशपणा लगेच जाणवायचा. परन्तु इथे गोष्ट भिन्न होती. इथे सगळे कृत्रिम निकष गळून पडले होते. सौंदर्याचा एक उत्तम
नमुना तो पुढे पहात होता. त्याने केवळ एक वेळ पाहण्यात तीच सगळ सौंदर्य दृष्टीक्षेपात आणल होत. तीला पुन्हा एकदा पाहण्याचा मोह अनावर होऊन त्याने, पुन्हा एकदा मान वर केली.
या वेळेसही तिच्या त्या मोहक सौंदर्याचा त्याला प्रत्यय आला. पण या वेळेस मात्र एक गोष्ट त्याला खटकली. तिचे कपाळ रिकामे दिसत होते. कुंकू पुसल्याचा एक वर्ण त्या ठिकाणी दिसत होता.
याचा अर्थ काय समजावा?त्याला थोड आश्चर्य वाटल. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. श्वेत साडी, स्थिर चेहरा आणि कपाळ रिकामे याचा अर्थ ती विधवा असावी. खूप कमी वयात तीला वैधव्य आल असाव. आता त्याला तिच्या बद्दल उलट जास्त आपुलकी, ओढ वाटू लागली.
काही वेळाने जेवणे उरकली. जेवणानंतर कोणी काही जास्त न बोलता, झोपायला निघून गेले. सगळ्यांचा निरोप घेऊन हाही झोपायला निघाला. श्वेत रंगाच्या त्या साडीवालीचा विचार करतच तो झोपेच्या आधीन झाला.
शाळेतला आज पहिला दिवस. सातवीपर्यंत शाळा होती. शाळा छोटी होती, पण इमारत सुरेख होती. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला होता. सह्याद्रीचे सुळके शाळेतून ठळक दृष्टीपथात येत होते. वातावरण थोडे थंड, थोडे उष्ण असे आल्हाददायक होते. तो शाळा, परिसर पाहून हरखून गेला. तो धरून तीन शिक्षक अजून होते. शंभरच्यावर मुल, मुली होते. एकंदरीत शाळा त्याला मनापासून आवडली.
तो दिवस सगळा धावपळीत गेला. सगळ्यांच्या ओळखी, मुख्याध्यापकांनी केलेली जुजबी विचारपूस, त्याला नेमून दिलेला वर्ग, त्या वर्गातली मुलांशी मारलेल्या गप्पा. असा सगळा आजचा कार्यक्रम होता. आजचा दिवस मजेत गेला होता. दहा ते चार शाळा होती. शाळा सुटल्यावर त्याला अजून दोन तीन कामे होती. रहायला रूम बघायची होती. जेवणाची व्यवस्था करायची होती
चारला शाळा सुटली. मुले घरी निघून गेली. सगळे शिक्षक निघून गेले. तो आपला निवांत आजूबाजूचा परिसर निव्हाळीत निघाला.
तो फिरत फिरत नदीजवळ आला. नदीत जेमतेम पाणी होते. ते नितळ पाणी पाहून त्याला आनंद वाटला. नदी काठावरून फिरत फिरत तो पुढे निघाला. एका ठिकाणी खडकावर बसुन तो निवांत ते नदीचे सुंदर रूप न्याहाळत होता. त्याला सभोवतालचे ते वातावरण स्फूर्तिदायक वाटत होते. त्याला आता या वातावरणात रात्रीच्या त्या श्वेत साडीवालीची आठवण झाली. त्या आठवणीने तो एका वेगळ्याच भावनेत गेला. तिची सारखी आठवण येऊ लागली. त्याच उर्मीत तो उठला आणि त्याने हीरा पाटलाच्या घराची वाट धरली.
खरंतर त्याला हिरा पाटलाच्या घराकडे जाण्याचा संकोच वाटू लागला. परंतु आता त्याला इलाज नव्हता. रूम पाहण्याचा वेळ त्याने नदीच्या काठी फिरवण्यात घालवला होता. तो संकोचत पाटलाच्या घराकडे निघाला. पण अर्ध्या मधेच त्याला हिरा पाटील भेटला. हिरा पाटलाने पुन्हा आग्रह केला, तेव्हा तो त्याच्या घराकडे निघाला. ते घरी आले. तीची आता भेट होईल या खुशीतच तो होता. मोठ्या उत्सुकतेने तो जेवायला बसला. तीची येण्याची वाट बघू लागला. ती आता येईल, मग येईल परंतु ती आलीच नाही. शेवटी पाणी द्यायला तर येईल, ही आशाही फोल ठरली. तो विचार करतच खोलीत आला. आल्याआल्या त्याने पलंगावर अंग झोकून दिले. पण झोप लागत नव्हती. डोळ्यापुढे सारखी श्वेत साडीवाली येत होती. त्याची बेचैनी वाढत होती. मनात अनेक भावना तरळून येत होत्या. कोणासाठी तरी पहिल्यांदा त्याला प्रेमळ भावना येत होत्या. मनात विचार चालू होते, तेवढ्यातच खोली बाहेर कोणाची तरी चाहूल लागली. त्याने नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खोलीबाहेर कोणीतरी आहे हे त्याच्या लक्षात आले.
तो उठून दरवाज्याजवळ गेला. आता स्पष्टपणे कोणाचातरी श्वास- उच्छ्वास ऐकू येऊ लागला. कोण असेल असा विचार करत त्याने दरवाजा उघडला.
आश्चर्य आणि मग नंतर अविश्वासाने त्याने स्वतःचे डोळे चोळले. बाहेर श्वेत रंगाच्या साडीवाली उभी होती. जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिले होते, तेव्हा उमटलेल्या भावना, अगदी त्याचप्रमाणे याहीवेळी त्याच्या चेहर्यावर उमटल्या.
"तुमच्या खोलीतले पाणी दुपारी संपले होते. रात्री पाणी लागेल म्हणून पाण्याचा तांब्या घेऊन आले"
असे म्हणून तिने पाण्याचा तांब्या त्याच्यापुढे केला. त्याने थरथरत्या हाताने तो पाण्याचा तांब्या हातात घेतला. तांब्या घेताना तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या हाताला झाला. तेव्हा एक सुखद कळ मेंदूपर्यंत गेली. एखाद्या गुलाब पाकळीला स्पर्श केला आहे, ही जाणीव हाताला झाली. तीने संकोचत हात मागे घेतला. आणि ती जाण्यासाठी वळली. त्याला तिच्याशी खूप बोलायचे होते; पण नेमके त्याच वेळी काय बोलावे हेच त्याला कळेना. ती जाण्यासाठी वळली, तेव्हा तो गडबडीत म्हणाला,
"थांबा जरा".
त्याच्या आवाजाने तिची पावलं अडखळली. ती सावकाश मागे वळली. दोन पावले पाठीमागे आली, आणि तो काय म्हणतो, याची प्रतीक्षा करू लागली.
"पाणी आणून दिल्याबद्दल तुमचे आभार मानायचे विसरून गेलो".
तो काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेला.
ती त्यावर काहीच बोलली नाही. खाली बघत उभी राहिली. थोडा वेळ असाच गेला.
"तुमचे नाव काय"
तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
तिने अलगद थोडीशी मान वर केली. नाव सांगू की नको हे विचार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. थोडा काळ लोटला. तिने अलगद पुन्हा वर बघत म्हटले,
"रूपा"
तिच्या त्या गोड आवाजाने तो आता मंत्रमुग्ध झाल्यासारखा वाटला. रूपा हा शब्द काळजात घट्ट होऊन बसला.
तिने पुन्हा बोलावे, बोलतच बसावे, असे त्याला वाटले. तिला काहीतरी बोलायचे होते. तिचा चेहरा ते सांगत होता. ती थोडी लाजली आणि थोड़े धीट होत तिने विचारले,
"तुमचे काय नाव"?
त्याला त्या प्रश्नाने हुरूप आला.
"एकनाथ देशमुख"
तो तिच्याकडे बघत उत्तरला. तीने मान हलवून त्याच्या उत्तराला होकार दिला. त्याला आता तिला खूप काही विचारावे असे वाटू लागले. तुम्ही श्वेत रंगाची साडीच का घालता? कपाळावर कुंकू पुसण्याचा तो वर्ण का आहे? तुम्ही एवढा शांत का असता? जास्त घराबाहेर पण दिसत नाहीत? असा सगळा इतिहास त्याला जाणून घ्यायचा होता. अनेक अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. जे त्याला विचारायचे होते. पण ती संधी त्याला मिळालीच नाही.
"जाते"
असं म्हणत ती सरसर पायऱ्या उतरून खाली गेली. त्याने हलकेच हात हलवत तिला निरोप दिला. ती संपूर्ण रात्र अनेक भावनाच्या कल्लोळाने व्यापून गेली. तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे लाजणे, तिच्या बोटांचा स्पर्श, या जाणिवांनी त्याला एक सुखद अनुभूती दिली.
ती जेव्हा बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद, सुख त्याला दिसले होते. ती बोलताना जरी संकोचीत असली तरी त्या संकोचन्यात एक परिपूर्ण अर्थ त्याला जाणवला. ते संकोचने एक अर्थपूर्ण, सुखद वाटले त्याला.
आपल्या खोलीत पाणी नाही हे तिला माहीत होते. म्हणजे दुपारी आपण शाळेत असताना ती खोलीत आली होती. एवढे नोकर - चाकर असताना, ती स्वतः आली म्हणजे तिला आकर्षण वाटलं, आपली ओढ वाटली,एका सुप्त आपुलकी वाटली. त्यामुळेच ती वरती आली असेल. रात्री आपल्याला पाणी लागेल? याची जाणीव तीने ठेवली. त्या जाणिवेच्या पाठीमागे आपली काळजी असेल किंवा मग आपल्याला भेटण्याची ओढ असेल. किंवा दोन्हीही असेल. शेवटी काहीही असले तरी. आपण तिच्यासाठी काहीतरी खास आहोत; आणि तेवढीच तीही आपल्यासाठी खास आहे. अशी विचारांची मालिका मनात सुरूच होती. ती कधी संपली, त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही.
आज शनिवार असल्यामुळे तो शाळेत लवकर गेला. रात्रीची ते बेधुंद धुंदी डोळ्यात चमकत होती. शाळेत मोजकेच मुल-मुली आलेले होते. मोरे गुरुजी अगोदरच शाळेत आले होते.
ऑफिसमध्ये तो गेला तेव्हा,मोरे सर शिकवायचे टाचण काढत होते. मोरे सरला त्याची चाहूल लागली, तेव्हा दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. मग शाळा भरेपर्यंत त्यांच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा रंगल्या.
गप्पा राहण्याच्या ठिकाणापर्यंत आल्या.
"देशमुख सर सध्या राहायला कुठे आहात?"
मोरे सरांनी सहज विचारले.
"अजून राहण्याचे ठिकाण नाही मिळाले;पण सध्या हिरा पाटलाच्या घरी आहे राहायला." तो म्हणाला.
" हिरा पाटील! त्यांच्याशी तुमची कशी ओळख?" त्यांनी जरा आश्चर्याने विचारले.
" इकडे येताना फाट्यावरून त्यांच्याच गाडीवर बसुन आलो. तेव्हा झाली ओळख. मग काय रात्र झाली होती. त्यामुळे त्यांनी नेले त्यांच्या घरी. मग आता खोली मिळेपर्यंत थांबलो आहे त्यांच्याच घरी." तो म्हणाला.
त्याच्याकडे बघत मोरे गुरुजींनी होकारार्थी मान हलवली.
ते काहीतरी विचार करत असल्यासारखे दिसले त्यांना काहीतरी सांगायचे होते आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली.
"देशमुख सर पाटलाकडे राहताना जरा जपून राहा.
रामजी पाटील आणि त्याचे पोर लय रागीट स्वभावाचे आहेत. पाटील मोठा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गावात त्याच्या वाटेला कोणी जात नाही. तो बोलताना गोड बोलतो पण त्याच्या बोलण्याच्या पाठीमागे बऱ्याच वेळा धूर्त कावा असतो. तुम्ही शाळेचे गुरुजी आहात, म्हणून जरा तुमच्याशी तो बरा वागला असेल, पण तो नेहमीच बरा वागेल अस नाही. गावातील बर्याच लोकांच्या जमिनी त्याने हडप केल्या आहेत. त्यामुळे त्याचे गावातील बर्याच लोकांबरोबर वाद आहेत.
मागच्या दोन वर्षांपूर्वी असेच एकदा त्याचे आणि गावातल्या सुखदेव पाटलाचे जमिनीवरून भांडण झाले होते. सुखदेव पाटलाची पाच एकर जमीन रामजी पाटलांनी हडपली होती. सुखदेव पाटलाची पार्टी पण मजबूत होती. मग काय जुंपली दोन पाटलामध्ये. सुखदेव पाटलाने भर बाजारात रामजी पाटलाची कॉलर धरली. 'माझी जमीन परत कर, नाहीतर तुझा मुडदा पाडील.' अशी धमकी त्याला दिली. सगळा गाव हा तमाशा बघत होते. रामजी पाटलाचा हा मोठा अपमान होता. तो या अपमानाने व्यथित झाला. मग काय. दुसर्या दिवशी सुखदेव पाटलाचाच मुडदा गावाच्या वेशीजवळ सापडला.
कुऱ्हाडीचे शंभरेक घाव त्याच्या अंगावर दिसत होते. रामजी पाटील आणि त्याच्या पोरांनी त्याचा काटा काढला होता. आता सगळ्या गावाला माहित होते की हा खून रामजी पाटलानेच केला ;पण कोण त्याच्या विरोधात बोलणार. कोणी साक्ष द्यायला पुढे आले नाही.
पाटील मोकळा सुटला तेव्हापासून पाटलाचे गावात वजन वाढले. सगळा गाव पाटलाला दचकून राहू लागला. त्याच्या नादाला लागण्याची कोणाचीच हिंमत उरली नाही. हिरा पाटील सोडला तर त्याचे दोन्हीही पोर त्या पाटलाच्या स्वभावावरच गेलेले आहेत."
ते बोलणे ऐकून त्याला जरा धक्काच बसला पाटील रागीट स्वभावाचा असावा,हे त्याने पहिल्याच दिवशी ताडले होते. पण तो पाटील गुंड प्रवृत्तीचा असावा याचा अंदाज त्याला आला नव्हता. याबद्दल त्याला आश्चर्य वाटले. पाटलाबद्दल त्याच्या मनात एक भीती बसली. आणि त्याच वेळी त्याला श्वेत साडीवाली रूपा आठवली. त्याला धसकन झाल. उगाच काळजात कसतरी झाल. पाटलाच्या घरातील व्यक्तीवर आपल प्रेम जडल आहे, हे जर पाटलाला कळाले, तर आपलाही सुखदेव पाटील व्हायला वेळ लागणार नाही. भीतीची एक सणक काळजापर्यंत गेली.
लगेच त्याने स्वतःला सावरले. आपण डरपोक किंवा भित्रे नाहीत. स्वाभिमान नावाची गोष्ट आपल्याकडे आहे. त्याच्या मनात चलबिचल चालली होती ती चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
ते पाहून मोरे सर म्हणाले,
"देशमुख सर काय विचार करत आहात."
"काय नाही असाच काहीतरी विचार करत होतो."
खरं तर त्याची तीव्र इच्छा झाली होती की मोरे सरांना रूपाबद्दल विचारावे, तिचा भूतकाल विचारावा, तिचा इतिहास जाणून घ्यावा, तिचा काही वर्तमान असेल तर तोही विचारावा , पण त्याने ते टाळले. आधीच मोरे सरनी पाटलाचा इतिहास सांगून त्याचा वर्तमान भितीदायक केला होता. आणि पुन्हा उगाच त्यांना त्याच्याविषयी शंका आली असती. पुन्हा मग ते काहीतरी सांगत बसले असते, आणि पुन्हा तो घाबरून गेला असता.
तितक्यात शाळेची घंटा वाजली. शाळा भरली होती त्याने डोक्यातले सगळे विचार झटकले, आणि ते दोघेही परीपाठासाठी शाळेच्या मैदानात आले.
दुपार झाली. शाळा सुटली. शनिवार असल्यामुळे दुपारीच शाळा सुटली. त्याला जरा आज उदास वाटू लागले. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे भर दुपारीही जास्त उन्ह जाणवत नव्हते. तो फिरत फिरत नदीकडे निघाला. पहिल्या दिवशी तो बसला होता. ती नदी काठची जागा खूप आवडली होती. तो नदी काठचा खडक मस्त वाटला होता त्याला. शेजारी नदी, बाजूला हिरव्या गर्द झाडांची सावली,नीटनेटका परिसर. त्यामुळे त्या खडकावर बसुन, नदीचे सौंदर्य बघत बसू, असा विचार करत, त्याचे पावले नदीकडे वळाले. रमत गमत तो नदीजवळ आला. नदीवरून येणारे गार वारे सुखद वाटू लागले. वरुन उन आणि बाजूला थंड वारे याने त्याला प्रसन्न वाटले. मनातील मळभ थोडी दूर झाली. तो खडकाजवळ आला. खाली बसला. नदीकडे नजर टाकली. ते मोहक पाणी पाहून त्याला थोडे आल्हाददायक वाटले. नदीवरून नजर फिरवता फिरवता त्याची नजर नदीच्या वरच्या बाजूला गेली. त्याचे डोळे अचानक एका जाग्यावर स्थिरावले. डोळे मोठे करून तो नदीच्या वरच्या अंगाला बघू लागला. कोणीतरी धुणे धूत होते. अंगात बहुतेक श्वेत रंगाची साडी दिसत होती. त्याचे डोळे आनंदाने चमकले.
मळभ पूर्णपणे दूर झाली. तो लगबागीने उठला. वेगाने चालतच त्याने, नदीचे वरचे अंग गाठले. नदीच्या वरच्या अंगाला श्वेत साडीवाली रूपा धुणे धून्यात व्यस्त होती.
तिला कोणाचीतरी चाहूल लागल्याने तिने अचानक वर पाहिले. समोर त्याला पाहताच, ती गडबडली. साडी, पदर ठीक करून ती संकोचून खाली पाहू लागली. क्षण दोन क्षण दोघे एकमेकांकडे बघून गेले. काय बोलावे, कसे बोलावे दोघांनाही काहीच सुचेना.
" काय धुणं धूत आहाता का?"
ती धुणंच धूत आहे हे पाहूनही त्याने विचारायचे म्हणून विचारले.
" नाही जेवण करत आहे."
अस उत्तर द्यावे, अस तीला वाटल. पण तीने स्वतःला आवरले. तीने थोडे स्मित करत " हो" म्हटले.
"रोज दुपारी इकडेच धुणे घेऊन येता का?" - तो
" हो इकडेच येते." - ती
" कोणी सोबती आणायच ना, एवढ्या दूर एकट्या का येता." - तो
" कोण येणार सोबती. एकटीलाच याव लागत. " हे सांगताना तीला कसतरी झाल. तिचा चेहरा थोडा दुःखी झाला. त्याला वाईट वाटलं. उगाच तीला अस विचारल, अस वाटून गेल. थोडा वेळ शांततेत गेला. तो गप्प बसल्याचे पाहून, तीने विचारले.
" तुम्ही आज नदीकडे कसे? "
तीने आपणहून प्रश्न विचारल्यामुळे त्याला बरे वाटले.
" असाच फिरत फिरत आलो होतो. तो नदीकाठचा खडक खूप आवडतो मला. तिथे बसुन नदीचे सौंदर्य पाहण्यात एक वेगळाच आनंद वाटतो. शहरी भागातला गजबजाट पाहिलेला मी. इथल्या शांत, नीरव वातावरणाने भारून जातो"
तो मनातून म्हणाला. त्याचे ते प्रामाणिक उत्तर ऐकून तीला समाधान वाटले. त्याच्यातील तो प्रामाणिकपणा तीला भावुन गेला. त्याचा शांत, सभ्य चेहरा तीला पहिल्या भेटीतच भावला होता. त्याच्या त्या सभ्य चेहऱ्यावरून त्याच्या स्वभावाचे प्रतिबिंब तीला दिसून आले होते. त्याच्या चेहऱ्यात तीला एक आपलेपणा जाणवला होता. तो अनोळखी होता ;पण चेहरा मात्र खूप खूप ओळखीचा वाटत होता. तो कोणाचीतरी आठवण करून देत होता. कोणाची?
लग्नाच्या दुसर्याच महिन्यात मृत्यू पावलेल्या पतीची?
हो! त्यांचीच! अगदी त्यांचीच!!
तीला त्या आठवणीने एक दुःखाचा उमाळा आला. डोळ्यात अलगद एक थेंब आला. त्याच्या नजरेपासून लपुन तीने तो पदराणे पुसला.
त्याच्या चेहऱ्यात तीला मृत्यू पावलेला पति दिसला. त्याच्यात तीचा काही स्वार्थ नव्हता. पण पहिल्याच भेटीत, तो काहीतरी वेगळा भासला होता तीला. त्यामुळे तर पहिल्या दिवशी तो शाळेत गेला तेव्हा त्याच्या रूममध्ये गेली. सगळी खोली स्वच्छ केली. सगळे सामान जागच्या जागेवर मांडले. रात्री त्याला पाणी लागेल. म्हणून त्याला पाणी द्यायला गेली. तिची विचार मालिका अशीच सुरू राहिली. बराच वेळ लोटला. दोघेही काहीच बोलले नाही. फक्त अधून मधून एकमेकांकडे बघू लागले. ती घनघोर शांतता क्षणाक्षणाला वाढू लागली. अचानक नदीत डुबुकsss असा जोरात आवाज आला. बहुदा झाडाची फांदी तुटून पाण्यात पडली असावी. त्या आवाजाने ती मोठ्यांदा दचकली. तिची विचारमालिका अचानक तुटली. ती बेसावध होती. आणि त्याच गडबडीत तीचा तोल ढासळलला, तीचा देह नदीच्या पाण्याकडे झुकला. दोन तीन गिरक्या खात, ती आता नदीच्या पाण्यात पडणारच की, हा विजेच्या चपळाईने तिच्याकडे धावला. तीचा वर झालेला उजवा हात त्याने गपकन पकडला. जोरात खेचून तीला अलीकडे ओढले. तीचा तोल जाऊन ती त्याच्या अंगावर कोसळली.
क्षण दोन क्षण काय झाले? दोघांनाही कळाले नाही. दोघे थोडे सावरले. तीचा श्वास अजून फुललेला होता. भीतीने चेहरा भरून गेला होता. आणि ती तशीच अजून त्याच्या बाहुपाशात होती. दोन्ही हात त्याच्या पाठीला घट्ट धरून होती. तीचा ऊर शांत झाला, भीती कमी झाली. तिने लाजून त्याला मारलेली मिठी सोडली. थोडी दूर जाऊन थांबली.