आरशातील_नजर_भयकथा
#mbkg_lock©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_दोन
भाग 3 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
https://marathighoststories.blogspot.com/2020/05/mirror-horror-story-3.html
https://marathighoststories.blogspot.com/2020/05/mirror-horror-story-3.html
दुसर्या दिवसापासून शिरपाचं ट्रेनिंग सुरू झालं. नारसुकडून त्यानं धंद्यातल्या बर्याच खाचाखोचा शिकून घेतल्या. आता गिर्हाईकाकडून भंगार घेताना तो आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करू लागला. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मोजमाप करायला शिकला. चांगला माल स्वस्तात पदरात पाडून कसा घ्यायचा हे त्याला कळायला लागलं. ह्याबरोबरचं गल्ल्यांमधून फिरताना कोणत्या घरात लग्नकार्य आहे, कोणत्या घरात मयत झालीय. कोणत्या घरातील माणसं गावाला जाणार आहेत. घर किती दिवस बंद राहील याचा अंदाज घ्यायला पण तो शिकला. ही माहिती दादापर्यंत पोचवायचे वेगळे पैसे त्याला मिळत असत.
थोडा पैसा जमा व्हायला लागला, तशी त्यानं एक हातगाडी भाड्यानं घेतली आणि त्यावर तो भंगार गोळा करू लागला. हळूहळू दुपारची लोकं घरात वामकुक्षी घेत असताना, गॅलरीत, अंगणात, पत्र्यावर टाकलेल्या वस्तू अलगद कशा उचलायच्या ह्यात पण तो पारंगत झाला. अशा छोट्या मोठ्या वस्तू उचण्यात पाप नसतं असं नरसूनं त्याला पटवून दिलं होतं.
गेला आठवडाभर गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्या इनामदारांच्या वाड्यातून त्याला वारंवार बोलावणं येवू लागलं. जुने पत्रे, मोडक्या बादल्या, फुटकी भांडी, बर्याच वर्षांपासून साठवलेलं जुनं मोडकं तोडकं फर्निचर, पत्रे, लोखंडी वस्तू, अशा बर्याच वस्तू त्याला रोज भंगारात मिळत होत्या. भंगार घ्यायला गेल्यावर तो अडगळीच्या खोल्यांमधून वस्तू काढण्यासाठीही इनामदारांना मदत करत होता. नंतर खोल्या साफ करून राहिलेला माल नीट लावून ठेवत होता. हळूहळू त्याची वाड्यातील लोकांशी चांगली ओळख झाली. मोलभाव करून तो आपण भंगार वस्तूंचीसुद्धा जास्त किंमत देत आहोत असं भासवून त्यानं इनामदारांकडून अनेक चांगल्या वस्तू पटकावल्या होत्या. इनामदारांच्या दृष्टीनं अडगळीच्या आणि भंगार असलेल्या वस्तूत बर्याच अँटिक वस्तू त्याला मिळाल्या होत्या.
हा सगळा खजिना पाहून नरसू दादा एकदम खूष झाला. त्यानं शिरपाला त्यातल्या अॅन्टिक वस्तूला पॉलिश कसं करायचं, किरकोळ दुरूस्ती असेल तर कुणाकडं करायची, कोणत्या मालाला कोणत्या दुकानात चांगली किंमत मिळते हे स्वतःबरोबर फिरवून दाखवलं. आता शिरपाच्या खिशातही बर्यापैकी पैका खुळखुळू लागला.
त्याच्या बायकोला आता सातवा महिना लागला होता. त्यानं तिचं चांगल्या दवाखान्यात नांव घातलं. तिच्या खाण्यापिण्याकडंही तो लक्ष पुरवू लागला. विशेष म्हणजे झोपडपट्टीत रहात असून शिरपा व्यसनी नव्हता. कधीमधी चेंज म्हणून पार्टी होत असे, पण त्याच्या पिण्याचा तो घरातल्यांना कधीच त्रास देत नसे. त्याची बायको रंगी समजुतदार स्वभावाची होती. तीपण आजूबाजूच्या इमारतींमध्ये झाडूपोछा, धुणी-भांडी अशी कामं करून संसाराला हातभार लावत होती. पण आता सहावा महिना लागल्यापासून शिरपानं तिला कामावरून सुट्टी घ्यायला लावली होती. तरीही एकंदर त्याचं बरं चाललं होतं.
*****
आता रोजच तो वाड्यावर जात होता. इनामदारांच्या वाड्यातून जास्त माल मिळाला की त्याला दिवसांतून दोन दोन, तीन तीन वेळा हातगाडीवरून हेलपाटे मारावे लागत असत, किंवा दुसर्या कुणाचा छोटा टेम्पो बोलावला तर मिळणार्या पैशातले बरेचसे पैसे भाडं देण्यात खर्च होत होते. ही गोष्ट त्याने नरसूदादाच्या कानावर घातली. नरसूदादाकडे नुकतीच एक जुनी एम80 विकायला आली होती. ती त्याने शिरपाला दिली. भंगारातील सामान वापरून गाडीच्या मागच्या बाजूला लोखंडाचे बार बसवून घेतले त्यामुळे बराच माल कॅरीअरला बांधून आणणे शिरपाला सोपे जावू लागले.
नरसूदादाने शिरपाला एक काम सोपवले. हे इनामदार वाड्यातील साफसफाई कशाकरता करत आहेत आणि ते वाडा विकणार वगैरे आहेत का, तसेच वाड्यात अॅन्टिक माल किती असेल याचा अंदाज काढायला सांगितलं.
शिरपाचा आता इनामदार कुटुंबाशी चांगला परिचय झाला होता. त्यामुळे बोलता बोलता त्याने बरीच माहिती काढली. महिनाभरात घर खाली करून इनामदार कुटुंबिय दुसर्या शहरात वास्तव्यास जाणार होते. वाडा खूपच जुना होता. इनामदार साहेब आणि त्यांच्या पत्नीने इतके वर्ष वाड्याच्या सगळ्या परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. इनामदारांनी त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं होतं. त्यामुळे मुलं आता नोकरी निमित्ताने शहरात स्थाईक झाली होती. त्यांना भविष्यात वाड्यावर रहायला येणं शक्य नव्हतं आणि इथे येवून राहण्यात त्यांना अजिबातच इंटरेस्ट नव्हता, पण आईवडिलांची मात्र त्यांना काळजी वाटत होती.
वाड्यातील आतील भागाची बरीच पडझड झाली होती. आजकाल त्याची दुरूस्ती करणंही परवडणारं नव्हतं, त्यामुळे या दोघांना तिथं एकटं राहणंही धोकादायक झाले होते. मुले सारखी त्यांना शहरात रहायला या असे सूचवत होती.
मुलांनी त्यांना वाडा विकून टाकण्याचा सल्लाही दिलेला होता. पण संपूर्ण आयुष्य त्या वाड्यात व्यतित केलेल्या त्या वृद्ध दांपत्याचा पाय त्या वाड्यातून निघत नव्हता. शेवटी मुलांच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी वाडा सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. पण निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तरी तो वाडा विकू नका किंवा पाडू नका असे दोघांनीही आपल्या मुलांना निक्षून सांगितले होते.
इनामदारांनी वाडा न सोडण्याचं आणखी एक कारण होतं. जेव्हा जेव्हा इनामदारांच्या घरात एखादं शुभ कार्य घडणार असेल किंवा दुःखदायक घटना घडणार असेल तेव्हा तेव्हा त्या वाड्याचा मूळ पुरूष त्यांना मागच्या अंगणामध्ये काळ्या सापाच्या रूपानं दर्शन देत असे. एक भला मोठा कालसर्प, ज्याच्या अंगावर बारीक केसांची लव होती, त्याचे डोळे हिरवे आणी लाल होते, त्याच्या अंगाला एक विशिष्ट असा सुगंध येत असे. अशा सापाचे त्यांना खूप वेळा दर्शन झाले होते. कधीकधी काही अघटीन घडणार असेल तर तो साप इनामदारांच्या स्वप्नात येत असे आणि त्यानं दिलेल्या संकेतानुसार निर्णय घेवून अनेक वाईट प्रसंगातून इनामदार सहिसलामत बाहेर पडले होते.
दर पौर्णिमेला ते त्या मूळ पुरूषासाठी म्हणून नैवैद्याचे ताट मागच्या अंगणात ठेवत असत. तासाभरात त्यांना संपूर्ण ताट मोकळे झालेले दिसत असे. अगदी अन्नाचा एकही कण आजूबाजूला पडलेला नसे. त्यामुळे आपण हा वाडा सोडून गेलो तर त्या मूळ पुरूषाला ते आवडणार नाही असेही त्यांना वाटत होते. इतकी वर्ष करत असलेल्या नैवेद्याच्या परंपरेला खीळ बसेल याची त्यांना भिती वाटत होती.
शेवटी इनामदारबाईंची एक मैत्रिण शेजारच्या वाड्यात रहात होती. तिनं दर पौर्णिमेला मी तुमच्या वतीने मूळ पुरुषासाठी अंगणात नैवेद्याचे ताट ठेवीन असे अश्वासन दिल्यावर इनामदारांचा जीव भांड्यात पडला.
एके दिवशी पहाटे ईनामदारांना स्वप्न पडलं, त्यांच्या घराण्याचा मूळपुरुष त्यांच्या स्वप्नात आला. तो त्यांना "वाडा सोडून जाऊ नका" असे सांगत होता. "वाडा सोडून गेलात तर आपल्या परंपरा कोण सांभाळणार?"
ईनामदारांनी त्याला सांगितले की, "आता वय झाल्यामुळे इथे राहणेही धोकादायक आहे, पण शहरात गेलो तरी आम्ही परंपरांचे पालन करत राहू. आमच्या माघारी आपण पूर्वीसारखेच वाड्याचे रक्षण करावे."
(क्रमशः)
#आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_दोन
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_दोन