आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_एक
#भाग_एक
भाग 2 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
शिरपा त्याच्या पत्र्याच्या झोपडीत खाटेवर पडून आढ्याकडं बघत खुषीत शीळ घालत होता. त्याला कारणही तसंच होतं. शिरपाला आज पंचविस हजार रूपये रोख मिळाले होते. एवढी रक्कम आपण आयुष्यात कधी हातात घेवू यावर त्याचा विश्वास बसणं शक्य नव्हतं. तरीही ती रक्कम आज त्याच्या हातात होती. घरात आल्यावर त्यानं ते पैसे उशाखाली ठेवले होते आणि भविष्याची स्वप्नं बघत तो खाटेवर पडला होता. म्हणूनच तो खुशीत शीळ घालत होता.
*****
शिरपाला त्याचे जुने दिवस आठवत होते. खरंतर शिरपाचा भंगार वस्तू विकायचा व्यवसाय होता. गेले तीन चार महिने धंदा जरा मंदच होता. रद्दी प्लास्टीक विकून फार काही पैसा सुटत नव्हता. आठवड्यातून एखादे दिवशी लोखंड किंवा पत्र्याचं गिर्हाईक मिळत होतं. त्यावर कसाबसा संसार चालू होता. शिरपा ज्या झोपडपट्टीत राहात होता तिथंच आसपास भंगारचा व्यवसाय करणारे अजून सात आठ जण राहात होते. त्याशिवाय त्यांच्याच कुटुंबातील, बायका, मुलंसुद्धा भंगार गोळा करायला जात असत.
शिरपा सुरूवातीला पाठीवर पोतं टाकून भंगार गोळा करीत असे. दोन तीन वर्षानंतर त्याला व्यवसायातल्या बर्याच खाचाखोचा माहित झाल्या होत्या. त्यांच्या झोपडपट्टीतील नरसू दादा सगळ्यांकडून भंगार गोळा करून त्यांना फुटकळ पैसे देवून, तिथल्याच तीन चार पोरांना कामाला लावून भंगार सॉटिंंग करून मग मोठ्या दुकानात भंगार विकून चांगले पैसे कमवत असे. शिरपाला नुसतं भंगार विकून जगण्यापुरते पैसे कसेबसे मिळत असत. शिरपा तर लहानपणापासून श्रीमंत होण्याची स्वप्नं पहात होता.
कळत्या वयाचा झाल्यापासून नरसूदादा त्याचा आदर्श होता. भंगार विकणारा असून आणि झोपडपट्टीत रहात असूनही नरसू दादाचा रूबाब भारी असे. रंगिबेरंगी कपडे घालून, गॉगल लावून, मोटार सायकलवरून तो ऐटीत फिरत असे. त्याच्या खिशात कायम पैसा खुळखुळत असे. आपण दिवसरात्र कष्ट करून आपल्या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही आणि आपण गोळा केलेल्या भंगारावर हा मात्र श्रीमंत कसा काय याचे शिरपाला आश्चर्य वाटत असे.
एखादे दिवशी चांगला व्यवहार होवून नरसू दादाला चांगला पैसा मिळाला की तो इतर भंगार गोळा करणार्या पोरांना रात्री पार्टी देत असे. त्यांना मनसोक्त दारू प्यायला देत असे. दारू आणि चकण्याचा खर्च तोच करत असे. जेवायला मात्र आपापल्या घरी.
एकदा अशीच नरसूदादानं दिलेली पार्टी संपल्यावर बाकीचे गडी आपापल्या घराकडं गेले. शिरपा मात्र तिथंच थांबला होता. इतरवेळी आलेल्या कमाईतून शिरपा कधीकधी देशी पीत असे. पण आज पार्टी असल्याने सगळ्यांना विदेशीची चव चाखायला मिळाली होती. दादाने त्याला खुषीने अजून एक क्वार्टर प्यायला दिली. हळूहळू नशेचा अंमल वाढू लागला. नरसूनं त्याला घराकडं जायला सांगितलं. पण शिरपा काही तिथून उठेना. नरसूच्या भंगारच्या कट्ट्यावर भरपूर भंगार माल इतस्तः पसरलेला होता. तिथं ठेवलेल्या रबरी टायरवर एक काठी घेवून शिरपा सटा सटा वार करत बसला होता.
नरसूला अंदाज आला की आज शिरप्याचं काहीतरी बिनसलं असावं. त्यानं शिरपाला विचारलं, "काय शिरपा आज घरकडं परत जायाचा ईचार दिसत न्हाई. हितंच मुक्काम करनार हायस की काय आज?"
"न्हाई दादा, जातू की घरला."
"मंग इतका कुनावर कावला हाईस? घरी जायचं सोडून कवापासनं टायरं बडवत बसलायंस ते?"
"काय करणार दादा? एवढं दिसरात मरमर राबून भंगार गोळा करतूया, पण जराबी पैसा हातात र्हात नाय. असं किती वरसं आयुक्ष काढायचं? त्याचा मला लई राग येतुया."
"बरं. तुला ह्यो भंगारचा धंद बंद करायचाय का? दुसरं काय येतं तुला कराया?"
"दुसरं कायच येत न्हाय ना, म्हणून तर. जे येतंय त्यातनं कमाई हुईना. बायकोला आता पाचवा महिना लागलाय. चार महिन्यानी अजून एक माणूस घरात वाढणार. आई, बा हायतंच. कसं भागवणार मी समद्यांचं याचीच चिंता खातीया मनाला."
"हे बघ, माझ्या ओळखीत एक दारूचा गुत्ता चालवणारा हाय. तो देईल तुला काम, दारू पोचवायचं काम हाय, करशील?"
"नाय बा, उगी पोलीसाचं काय लफडं झालं तर जेलची हवा खाया लागंल. अजून पर्यंत तरी आपलं रेकार्ड क्लीयर हाय. पन मला येक सांगा दादा, आपण दोगंबी एकच धंदा करतुया, पण तुम्ही राजावाणी र्हाताय अन् आम्ही कायमचं दळिंद्री, हे गनित काय माझ्या टकुर्यात शिरंना."
"बरोबर हाय. तू काय काम करतो? दिसंल ते भंगार गोळा करतो आणि हाय तसं माझ्याकडं, मिळंल त्या किमतीला घालतो. मी काय करतो, त्याचं सोरटिंग करतो. लोकांसाठी जे उपयोगी नाही ते भंगार म्हनून लोकं टाकून देत्यात. पन त्यात कितीतरी चांगल्या वस्तू असतात ज्याला चोर बाजारात चांगली किंमत मिळती. ती वस्तू बराबर हुडकून मी ती योग्य मानसापतूर पोचवतो. म्हनून मला चांगला पैका भेटतो."
"दादा, मला शिकवाल का उपयोगी वस्तू कोनती हाय ते कसं वळकायचं ते?"
"शिकवनार की शिरप्या, तू तर आपला जिगरी दोस्त हाय, उद्यापासून भंगार घालायचं काम झाल्यावर लगीच घराकडं पळू नगं. माज्याबरोबर सोरटिंगला पण थांबत जा, मग तुला शिकवतो, माल कसा वळखायचा ते."
मग शिरपा घरी निघून गेला.
(क्रमशः)
#आरशातील_नजर_भयकथा
#mbkg_lock
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_एक
#आरशातील_नजर_भयकथा
#mbkg_lock
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_एक