#आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_तीन
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_तीन
भाग 4 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
आता शिरपा वाड्यातील सगळ्या खोल्यांतून सराईतासारखा वावरत होता. त्याच्यावर विश्वास बसलेला असल्याने इनामदारांनाही त्याचे वावरणे गैर वाटत नसे. रोजच्या रोज वाड्यावरचा रिपोर्ट शिरपा नरसूदादाला देत होता. या इनामदारांनी वाड्यातल्या वस्तू भंगारात काढल्यापासून आपल्याला चांगले दिवस आले या विचाराने शिरपा मनातल्या मनात इनामदारांवर खूष होता, त्यांचे आभार मानत होता.
शेवटी एके दिवशी इनामदारांनी टेम्पो बोलावून वाड्यातले जरूरीपुरते लागणारे सामान घेवून शहराकडे प्रस्थान केले. परंतु मुलांच्या फ्लॅटमध्ये आधीच सगळे नवे सामान भरलेले असल्याने ते जास्त वस्तु सोबत नेऊ शकत नव्हते. प्रत्येक खोलीला कुलूप लावून त्यांनी वाडा सोडला.
इतके दिवस शिरपाने केलेल्या मदतीची कृतज्ञता म्हणून जाताना त्यांनी शिरपाला शर्टपीस पॅन्टपीस दिले, शिरपाची बायको गरोदर होती म्हणून तिच्यासाठीही साडी दिली आणि जड अंतःकरणाने वाड्याला निरोप देवून इनामदार दांपत्य शहराकडे रवाना झाले. जाताना शिरपाला त्यांनी वाड्यावर लक्ष ठेवायला सांगितले.
*****
पहिले कांही दिवस वाड्यासमोरून जाताना शिरपाला दोघांचीही आठवण येत असे. तो वाड्याला लावलेल्या भल्यामोठ्या कुलपाकडे एक नजर टाकून पुढे निघून जात असे.
आठवडाभरातच नरसूदादाने शिरपाला पार्टीला बोलावले. सोबत इतर भंगार गोळा करणारी दोन मुलं होतीच. आतापर्यंत इनामदार वाड्यातली जी जी माहिती शिरपानं नरसूला दिली होती, ती सर्व माहिती त्यानं परत एकदा त्या मुलांना सांगायला सांगितली. शिरपानं अगदी बारकाईनं केलेल्या निरीक्षणासह वाड्याच्या अंतर्गत रचनेची माहिती त्यांना दिली. वाड्यात किती खोल्या आहेत. कोणत्या खोलीत किती सामान आहे. बाहेर जायला कुठून कुठून मार्ग आहेत. पण शिरपाला एक कळेना की ही माहिती या मुलांना का सांगायची?
यावर नरसू दादानं त्याला एकदम दहा हजार रूपये अॅडव्हान्स दिले आणि दोन दिवसांनी दोन पोरांना रात्रीच्या वेळी वाड्यात घेवून जाऊन, सगळ्या खोल्या दाखवायची ऑर्डर सोडली.
शिरपा म्हणाला की, "दादा, त्यांना जे काय भंगारात द्याचं होतं ते समदं त्यांनी मला दिलं हाय. आता जे शिल्लक हाय, ते त्यांच्या कामाचं सामान हाय. ते त्यांना भंगारातबी द्याचं नाय आन इकायचं पन नाय. नायतर त्यांनी मला तसं सांगितलं असतं. मंग आपण वाड्यात जावून काय करणार?"
"तुला कायंच करायचं नाय शिरप्या. तू फकस्त यांना सगळ्या खोल्या आणि वाटा दाव. फुडं काय करायचं ते आमचं आमी बगतो. नुसतं वाडा आतून दावायचे धा हज्जार रूपये दिलेत तुला."
"दादा तुमचा वाड्यात चोरीबिरी करायचा इचार चाललाय की काय? तसं असंल तर हे धा हजार ठेवा तुमच्याचकडं. मी असलं वंगाळ काम अज्याबात करनार नाय. मी इतके दिस जातोय वाड्यावर, मालकांचा लई इस्वास हाय माज्यावर. शिवाय गल्लीतला मानूस अन मानूस मला वळखतंय. उद्या तिथं चोरी झाली तर तुमी जाल सुटून अन् पोलीस पयले मला धरत्याल."
"हे बघ शिरपा, तू माहिती सांगितली, नाय सांगितली तरी आमी तिथं जानारच हाय. तू आतापर्यंत मला जेवढी माहिती पुरवली तेवढी मला पुरेशी हाय. अन् तुला कळ्ळं का, दुपारी तुझ्या बायकोला पोटात दुकत होतं म्हनून दवाखान्यात निली हुती ते. डाक्टरांनी लय काळजी घ्याया सांगितल्या म्हनं. उद्या काय परसंग आला आणि बाळंतपणाला जादा पैका लागला तर कुठून आणनार हाईस? अन ह्यो पैसा कुनासाठी कमावनार हायस, घरच्यांच्यासाठीच ना, मग गुमान यांच्याबरोबर वाड्याव जा आन् त्यांना सगळी माहिती दे. नंतर तू परत तिकडं फिरकला नाईस तरी काय नाय." शेवटी नाईलाजाने शिरपा वाड्यावर जायला तयार झाला.
(क्रमशः)
#आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_तीन
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_तीन