परफ्युम-Cented Horror story |
परफ्युम
नमस्कार, गूढकथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आशा आहे की सांभाळून घ्याल.
नमस्कार, गूढकथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आशा आहे की सांभाळून घ्याल.
अजयने आपले पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले आणि मग ०५ वर्षे अमेरिकेत घालवल्यावर तो भारतात परतला. इथे आल्यावर तो एका नामांकित कंपनीमध्ये वरच्या हुद्द्यावर कामाला लागला. अमेरिकेला जाण्याआधी अजय चिपळूण ला त्याच्या गावातच राहायचा पण आता नोकरी निमित्ताने त्याला पुण्यात रहावे लागत होते. त्यासाठी त्याने कोरेगाव पार्क परिसरात एक घर भाड्याने देखील घेतले होते.
कामात अत्यंत हुशार असल्याने आणि अमेरिकेचा अनुभव असल्याने अजय दिवसेंदिवस प्रगतीची शिखरे चढायला लागला होता. तसे बघावे तर सर्व काही व्यवस्थित चालू होते अजय चे. कोणतेच व्यसन त्याला नव्हते, म्हणावे तर एक आदर्श मुलगा होता तो. पण त्याला एकाच सवयीने अगदी लहानपणापासून डोक्यात घर केले होते. अजय ला परफ्युम वापरायचा आणि वेगवेगळे परफ्युम बनवण्याचा छंद होता. आतापर्यंत त्याने वेगवेगळे परफ्युम बनवले होते. चिपळूण मध्ये देखील तो या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता.
पण पुण्याला आल्यावर त्याच्या या छंदाने वेगळेच रूप घेतले. त्याला आता पर्यंत केवळ नैसर्गिक गोष्टींचा सुवास आवडत होता, पण आता त्याला वेगवेगळ्या मनुष्यांचा वास घ्यावासा वाटू लागला, आणि त्यासाठी तो सतत दीर्घ श्वास घेऊन वास घेत असे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आधी वाटले अजय ला सर्दी झाली आहे पण हळू हळू त्यांना लक्षात आले की हे काहीतरी वेगळेच आहे. पण आता पर्यंत अजय ने कुणाला त्रास दिला नव्हता म्हणून सगळे गप्प बसत होते.
आता अजय च्या आयुष्यात एक मुलगी आली. त्याच्या घराजवळच एक पोळीभाजी केंद्र होते त्या केंद्राच्या मालकांची मुलगी मोहिनी. मोहिनी ही तशी आसपासच्या परिसरात खडूस म्हणूनच प्रसिद्ध होती पण अजयचे आणि तिचे बोलणे कसे वाढले आणि नुसत्या बोलण्याचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात कसे झाले ते अजय आणि मोहिनी ला दोघांनाही कळले नाही. मोहिनीला वेगवेगळी फुले आवडत म्हणून अजय आवर्जून वेगवेगळी सुवासिक फुले मोहिनी साठी घेऊन जायला लागला. वेगवेगळी फुले नेऊन मोहिनी च्या केसात माळणे आणि त्यांचा सुवास घेणे हा रोजचाच कार्यक्रम होऊन गेला अजय साठी.
आज सुद्धा त्याने सोनचाफ्याची फुले नेली होती, तशी गेले ०३ दिवस तो सोनचाफ्याचीच फुले आणत होता पण आज फुले मोहिनीच्या डोक्यात माळून त्याचा सुवास घेतल्यावर त्याने आनंदाने मोहिनी ला मिठीच मारली. मोहिनी पण चकित झाली कारण अजय कधी असा सर्वांसमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणारा नव्हता, पण अजय ला कसलेच भान नव्हते. तो बेधुंद होऊन मोहिनी ला मिठी मारून बसला होता. सोनचाफ्याच्या फुलांचा वास घेत होता.
थोड्या वेळाने आनंदाचा भर ओसरल्यावर तो मोहिनी ला म्हणाला की "माझ्या घरी येशील का?" हे देखील मोहिनी साठी नवीन होते कारण त्यांची ओळख होऊन दीड वर्ष झाले होते पण अजय ने नेहमीच तिच्या त्याच्या घरी येण्याविषयी आडकाठी केली होती आणि आज अचानक तो तिला घरी येण्याबद्दल विचारत होता. मोहिनी ने आनंदाने हो म्हटले. मग ठरल्या प्रमाणे संध्याकाळी ०७ वाजता अजय तिला न्यायला आला. मोहिनी ने अजय नेच तिला दिलेला अजय च्या अत्यंत आवडता असा लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. घरी तिने सांगितले होते की आज ती मैत्रिणीकडे जाणार होती आणि तिच्याच कडे राहणार होती कारण तिने मनोमन अजय बरोबर काय काय करायचे हे सुद्धा ठरवले होते आणि ती त्याच धुंदीत होती.
अजय बरोबर ती त्याच्या घराच्या जवळ पोहोचली आणि बाईक वरून उतरली. अजय म्हणाला, इथेच थांब मी जरा मेडिकल मध्ये जाऊन आलो, तशी मोहिनी देखील लाजली. ती इकडे तिकडे बघत उभी असताना अचानक तिच्या लक्षात आले की तिच्या मागे घराच्या गेट जवळ कोणीतरी उभं आहे, तिने चमकून पाहिले तर एक अत्यंत सुंदर मुलगी उभी होती आणि तिने केसात मोगऱ्याच्या गजरा माळला होता. ती मोहिनीला घाई घाईत म्हणाली की "इथे थांबू नकोस, ताबडतोब निघून जा, अजून वेळ आहे". ती खूप घाबरलेली दिसत होती, एवढ्यात तिला अजून एक मुलगी तिच्या बाईक जवळ उभी आहे असे जाणवले आणि मोहिनी खूप दचकली, ती मुलगी सुद्धा खूप सुंदर होती आणि केसात गुलाबाचे फुल होते तिच्या, ती देखील मोहिनी ला घरात जाऊ नको असे बजावत होती.
अचानक अजय ने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला "चल मोहिनी, झालं माझं काम" असे म्हणून तो घराच्या दिशेने चालू लागला, मोहिनी ने बघितलं तर आता ती गेट जवळची आणि बाईक जवळची मुलगी तिला दिसतच नव्हती, मोहिनी ला वाटले आपल्याला भास झाले आणि ती अजय च्या मागे चालू लागली. घरी पोहचल्यावर अजय ने तिला थंडगार पाणी दिले, आणि ओंजळीत सोनचाफ्याची फुले तो घेऊन आला आणि परत मोहिनीच्या केसात माळायला लागला. मोहिनी ने सांगितले "अरे अजय, माझ्या केसात आधीच मोगरा आहे, तो कशाला काढून टाकतो आहेस?"
अजय ने तिच्याकडे पाहिले, त्याची नजर अत्यंत शांत होती. शांत कसली थंडच म्हणा ना. त्या नजरेला नजर द्यायची हिम्मत मोहिनी ला होत नव्हती. अजय पटकन म्हणाला " पण मला सोनचाफा आणि तू हेच कॉम्बिनेशन आवडते, बाकी कोणते नाही, आणि मोगरा, गुलाब वगैरे आहेत माझ्याकडे परफ्युम च्या रुपात, सोनचाफाच नव्हता, आज मिळेल मला"
मोहिनी ला अचानक कसे तरी व्हायला लागले, तिच्या पोटात प्रचंड आग होत होती. तिने अजय ला विचारले की हे तिला काय होतंय पण अजय च उत्तर ऐकायच्या आतच मोहिनी सोफ्यावर कोसळली.
अजय मग शांत पणे उठला आणि मोहिनी चे प्रेत खेचून आतल्या खोलीत घेऊन जाऊ लागला, जाताना त्याने त्याच्या परफ्युम च्या कपाटाकडे एक नजर टाकली , त्यात वेगवेगळ्या परफ्युम च्या बाटल्या होत्या आणि त्यावर अजय च्या हस्ताक्षरात नावं टाकलेली होती
सोनिया गुलाब
कामिनी मोगरा
आणि एक रिकामी बाटली होती, ती अजय ने हातात घेतली आणि त्यावर लिहिले
मोहिनी सोनचाफा