एकतर्फी प्रेम (भाग १) लेखक -संदीप पाटील
रोहित,सुमित,चेतना,राधा,वृषाली,युवराज या सहा जणांचा गृप हा त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासूनच सर्वांत जीवलग मित्रांचा ग्रुप म्हणून परिचित होता.ग्रुपमधील रोहित व राधा हे दहावीपासून सोबत असल्यामुळे पुर्वीपासून एकमेकांचे मित्र होते. राधा,वृषाली दोघी खोली करून एकत्र राहत राहायच्या,तर रोहित व सुमित दोघे सुमितच्या नातेवाईकाच्या बंगल्यात भाड्याने राहायचे.तो बंगला छोटासा पण टुमदार होता व वस्तीपासून थोडा बाजूला होता. नातेवाईक नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास होते म्हणून बंगल्याची देखभाल होईल व भाडेही मिळेल या हेतूने त्यांनी सुमितच्या ताब्यात बंगला दिला होता.चेतना गावावरून जाणे येणे करायची. युवराज हा माजी आमदार रावसाहेब देशमुखांचा मुलगा.त्याचा शहरातच खूप मोठा बंगला होता. सुमित व चेतना एकमेकांवर प्रेम करायचे.प्रथम वर्षांपासूनच त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते.अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असतांना सर्व महाविद्यालयाने मैदानावर जे दृश्य बघीतले ते पाहुन कुणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.युवराज व रोहित एकमेकांसोबत भांडत होते.एकमेकांना धक्काबुक्की करत होते,मारण्यासाठी अंगावर धावुन जात होते. मुलांनी मध्यस्ती करत त्यांना आवरले तोपर्यंत कुणीतरी त्यांच्या गृप मधील इतर सदस्यांच्या कानावर ती गोष्ट टाकल्यामुळे इतर सदस्य त्या ठिकाणी पळतच आले.त्यांनी रोहित व सुमितला बाजूला नेऊन काय झाले ते विचारले पण कुणीच उत्तर देत नव्हते.यावर सुमितने सर्वांना कॉलेज कॅन्टीन वर चलायला सांगितले.कॉलेज कॅन्टीन वर गेल्यावर इतरांपासून दुर असलेला टेबल पाहून सर्व तिथे बसले.कुणीच बोलत नाही पाहुन चेतना कोंडी फोडत रोहितला म्हणाली "तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,आपल्या सहा जणांच्या मैत्रीचे, गृप चे उदाहरण इतरांना दिल्या जातात आज तुम्ही एकमेकांसोबत भांडण करून पूर्ण गृप ची इज्जत मातीत घालविली".रोहित युवराजकडे पाहत चेतना ला म्हणाला "तु मला एकट्यालाच का जबाबदार धरतेस?मैत्रीचा गळा घोटणाऱ्यांना, मैत्री नावाचे पावित्र्य नष्ट करणाऱ्यांना तु का बोलत नाहीस".रोहितचे बोलणे ऐकून युवराज पुन्हा एकदा रोहितच्या अंगावर धावून जायला निघाला पण मध्येच सुमित,चेतना,वृषाली,
राधा ने मध्ये येत त्याला अडविले.युवराज रोहितकडे बोट दाखवीत ओरडत म्हणाला यालाच विचारा अगोदर काय ते.
सर्वांनी रोहित ला विचारले तेव्हा रोहित म्हणाला "आजपर्यंत ज्या गोष्टींची चर्चा ग्रुपमध्ये झाली नाही,काही गोष्टी ग्रुपमधील इतर सदस्यांना माहीत नाहीत त्या लक्ष देऊन ऐका. मैत्रीच्या नात्यातून माझ वृषालीवर कधी प्रेम जुळल कळलंच नाही.ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते.पण गेले काही महिने युवराज तीला सारखा प्रपोज करत आहे,तीने नाही म्हटल्यावरही तीला त्रास देत आहे.मी त्याला समजावून सांगितल्यावरही त्याचा त्रास कमी न झाल्यामुळे मला शेवटी त्याच्यावर हात उचलावा लागला".रोहितचे म्हणणे ऐकल्यावर सर्वांनी वृषालीकडे पाहिले,तिने मान हलवीत रोहितच्या म्हणण्याला दुजोरा दिला.राधा युवराजला रोहितची बाजु घेत म्हणाली "युवराज,अरे तो वृषालीचा वैयक्तिक अधिकार आहे,तिने कुणावर प्रेम करावे वा कुणावर करू नये.तुला तीला त्रास देण्याचा काहीही अधिकार नाही." राधाच्या बोलण्यावर युवराज संतप्त झाला,तो वृषालीकडे पाहत बोलला की ठीक आहे तो वृषालीचा वैयक्तिक अधिकार असेल पण आजपर्यंत ही गोष्ट त्यांनी ग्रुपपासून लपवुन ठेवायला नको होती,आज रोहित कॉलेजच्या मुलांदेखत माझ्या अंगावर धावुन आला.मी पण रावसाहेब देशमुखांचा मुलगा आहे.वृषाली माझी कशी होत नाही तेच पाहतो.ती होईल तर माझीच अथवा कुणाचीही नाही आणि तुम्ही सर्व माझी बाजू न घेता या दोघांची बाजू घेता तर तुम्हाला पण मी पाहून घेईल एवढे बोलुन तो निघुन गेला.सर्वजण तो गेल्या त्या दिशेने अवाक होऊन पाहत राहिले.
या गोष्टीला पंधरा दिवस उलटुन गेले.पंधरा दिवस युवराज महाविद्यालयात आलाच नाही.युवराजने गृप मधील सर्वांसोबत संबंध तोडून टाकले.महाविद्यालयात येणे सुरू केल्यावर तो रोहित वृषालीकडे द्वेष व रागाने पाहायचा पण बोलायचा मात्र काही नाही.बघता बघता प्रॅक्टिकल परीक्षा जवळ आल्या.परीक्षा जवळ आल्यामुळे प्रॅक्टिकल करण्यासाठी वेगवेगळ्या बॅच पाडण्यात आल्या.सुमित,चेतना,वृषाली एका बॅच मध्ये तर रोहित,राधा दुसऱ्या बॅच मध्ये होते.युवराज ने वेगळी बॅच निवडली होती.सुमित,चेतना, वृषाली,राधा,रोहित आपापली बॅच सुटल्यावरही एकमेकांसाठी थांबत होते.त्यांना रोज संध्याकाळ व्हायची.एका दिवशी आपापल्या बॅच झाल्यावर सर्व एकत्र आले तर त्यात वृषाली नव्हती.रोहितने सुमित व चेतनाला तिच्याबद्दल विचारताच चेतना म्हणाली की ती डोक दुखत असल्याचे सांगुन मध्येच रूमवर निघून गेली.रोहित ने तीला फोन लावून पाहिला पण तिचा फोन बंद येत होता.सुमित म्हणाला तीचे डोके दुखत असल्यामुळे कदाचित तिने फोन बंद केला असेल.राधाने रोहितला रूमवर गेल्यावर तिच्याशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिले.राधा रूमवर गेल्यावर तीला वृषाली दिसली नाही.तिने तडक रोहितला फोन करून ती रूमवर आली नसल्याचे सांगितले.रात्रभर वृषाली रूमवर आलीच नव्हती.सर्व रात्र रोहितचे राधाला वृषालीबद्दल फोन सुरू होते अन राधा पण वृषालीच्या काळजीत असल्यामुळे त्याला माहिती देत होती.शेवटी दुसऱ्या दिवशी कॉलेज ला लवकर भेटायचे ठरवून ते झोपी गेले.दुसऱ्या दिवशी रोहितचा मोबाईल सकाळीच वाजू लागला.रात्री जागरण झाल्यामुळे सकाळी फोन उचलणे त्याच्या जीवावर येत होते,त्याने कुणाचा कॉल आहे हे पहायला मोबाईल हातात घेतला अन त्याची झोप उडाली.कॉल त्याच्या प्राचार्यांचा होता व त्यांनी त्याच्या ग्रुपमधील सर्वांना घेऊन तात्काळ महाविद्यालयात हजर राहायचे सांगितले.रोहितने सुमित,चेतना,राधा ला फोन लाऊन महाविद्यालयात हजर राहण्यास सांगितले. एवढ्या लवकर तेही प्राचार्यांनी कशाला बोलाविले असेल याचा विचार करत सर्व महाविद्यालयात पोहचले.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.महाविद्यालयात पोहचल्यावर चपराश्याने त्यांना प्राचार्य त्यांच्या केबिनमध्ये सर्वांची वाट पाहत असल्याचे सांगितले.
प्राचार्यांच्या केबिनमध्ये ते आले अन गोंधळात पडले.तिथे चार-पाच पोलीस हजर होते.त्यातील इन्स्पेक्टर ने सर्वांना बसायला सांगून त्यांना म्हणाला "तुमच्या सर्वांसाठी दुःखद गोष्ट आहे व त्याविषयीची माहिती घेण्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे.तुमची मैत्रीण वृषालीचा तिच्याच ओढणीने गळा घोटून खुन झाला आहे.
सकाळीच तीचा मृतदेह महाविद्यालयाच्या गच्चीवर आढळुन आला आहे".ही बातमी ऐकताच रोहितला प्रथम आपण काय ऐकले हे समजलेच आणि जेव्हा इन्स्पेक्टर यांच्या शब्दाचा अर्थ त्याच्या मेंदुत शिरला तेव्हा त्याने जोराने टाहो फोडला.इन्स्पेक्टरने त्याला पाणी पाजले,त्याचे सांत्वन केले.सर्वांच्या डोळ्यांतुन अश्रु येत होते.इंस्पेक्टरने त्यांचा भावनावेग ओसरल्यावर त्यांना काही वस्तु दाखविल्या त्यातील एक वस्तू पाहिल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहिले.ती वस्तू म्हणजे महागडे ब्रेसलेट होते,युवराजला त्याच्या वाढदिवशी मागील वर्षी या सर्वांनीच भेट म्हणून दिले होते.
क्रमशः